मुका इसाप अचानक बोलू लागला, तसेच आपल्याकडचे अचानक मुके झालेलेही बोलू लागतील, अशी आशा करू या. ‘नव्या’ने मिळालेला आवाज ‘धारदार’ असतो, असं म्हणतात. ‘धारदार गोष्टीं’ची वाट बघू या…
संकीर्ण - व्यंगनामा
शफाअत खान
  • सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार
  • Tue , 26 March 2024
  • संकीर्ण व्यंगनामा इसाप Isap इसापनीती Isapniti

कणकवलीच्या ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’चे मुखपत्र ‘कनक रंगवाचा’ या रंगभूमीविषयक नियतकालिकात ज्येष्ठ नाटककार शफाअत खान ‘रंगपंचमी’ या नावाने एक धमाल सदर लिहितात. या नियतकालिकाच्या फेब्रुवारी २०२४च्या अंकात प्रकाशित झालेला त्यांचा हा लेख…

.................................................................................................................................................................

आता लेखकाने लिहावं की लिहू नये, असा प्रश्न पडला आहे. लेखक लिहायला बसलाच तर लिहितो कमी आणि खोडतो जास्त, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

लेखक खोडलेलं दिसेल म्हणून लिहिलेले कागद फाडायला घेतो, पण वाचणारे कपटे गोळा करून उलटसुलट वाचतील म्हणून घाबरतो. तो धास्तावला आहे. त्याला लिहिता येत नाही.

बळजबरीने लिहायला बसावं, तर सुरुवात कुठून करावी, हे कळत नाही. सुरुवातीलाच शेवट करून हा लेखनाचा खेळ संपवावा, असं वाटू लागलं आहे.

पूर्वी दिवस बरे होते. नाकटकार तीन-चार तासांची नाटकं लिहीत. शिवाय पाच-पंचवीस गाणी राहत. नाटक रात्रभर चाले.

आता कागदावर मोठं नाटक थापायला बसावं, तर पाना-दीड पानातच पडदा पडतो. टेबलावर अशा टीचभर नाटकांचा पसारा झाला आहे. लेखकाची पार गोची झाली आहे.

पूर्वी मानवजातीची स्थिती बरी होती. चुलीतून सोन्याचा धूर निघायचा.

सोन्याच्या ‘पोल्यूशन’ने गुदगुल्या व्हायच्या. सगळे आनंदात होते. तेव्हा मानव ‘ट्रॅजेड्या’ बघत. रडायला नाटकाला जात. महागडं पुढचं तिकीट काढून ढसाढसा रडत. तेव्हा पैसे देऊन रडायची ‘फॅशन’ होती. आता काळ बदलला. कुणी कुणासाठी रडत नाही. रडणाऱ्यांना कुणी विचारत नाही.

अलीकडे माणसांना सतत आनंद हवा असतो. सतत हसावंसं वाटतं. ते विनोदी नाटक बघायला जातात. पैसे देऊन हसतात. पैसे दिल्यामुळे हसू नये तिथंही हसतात.

विनोदी नाटकाला तुफान गर्दी होते. आता फक्त विनोदी नाटकांचेच प्रयोग होतात.

विनोदी लिहिणं, नाटक करणं अवघड असतं. अस्सल विनोदाच्या मुळाशी राग असतो, खदखद असते.

अलीकडे असा अस्सल विनोद अंगाशी येऊ शकतो. जीवावर बेतू शकतो. आता हसणं, हसवणं सोपं राहिलेलं नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

लेखकाने लिहायचं नाही, रडवायचं नाही, हसवायचं नाही, तर मग आतल्या अस्वस्थतेचं, संतापाचं करायचं काय, हे त्याला कळत नाही.

लेखक स्वतःलाच शिव्या देतो, पण चुकीच्या संस्कारामुळे त्याला शिव्याही देता येत नाहीत. तो संतापतो तरीही सभ्य, सोज्वळ भाषेतच लिहीत राहतो. लेखकाला शिव्या देता येत नाहीत, हीच खरी ‘ट्रॅजेडी’ होऊन बसली आहे.

मराठी संस्कारी नाटकांचे संवाद सोज्वळ असतात. त्यात खलनायक सोडून कुणालाही संताप येत नाही. खलनायकही स्वतः चे दात-ओठ चावत सभ्य भाषेतच बोलतो.

काही मराठी वास्तववादी नाटकात मात्र संताप नसला तरी शिव्या असतात.

संस्कारी प्रेक्षकांना नाटकातल्या शिव्या आवडत नाहीत. ते शिव्या ऐकून संतप्त होतात आणि शिव्या देत नाटकावर चालून जातात.

काही धीट प्रेक्षक कलावंतांना बडवतात. बघणाऱ्यांनाही गुदगुल्या होतात. नाटकातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा हा आनंद मोठा असतो. मराठी रंगभूमीवर अशा घटना अधूनमधून घडत असतात.

मध्यंतरी पुणे विद्यापीठाच्या, ‘ललित कला केंद्र’ या नाट्यशास्त्र विभागातल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सादर केलेल्या छोट्या नाटकावरून वाद झाला. भावना दुखावल्या म्हणून प्रयोग बंद पाडला. हाणामारी, तोडफोडही झाली. पोलीस पोलिसांसारखं वागले. त्यांनी मार खाणाऱ्यांना पकडलं आणि मारणाऱ्यांना बेईज्जत सोडलं.

अनेकांनी या घटनेचा निषेध केला, सभा घेतल्या, लेखही लिहिले.

‘मराठी नाट्य परिषद’वाले काही बोलणार नाही, असा विश्वास वाटतच होता. त्यांनी विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, हा आनंद मोठा आहे. असो!

पुण्यात कलावंतांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी, मुंबईतही ‘आविष्कार’ या संस्थेने ‘निर्भय बनो’ सभा आयोजित केली होती.

मुंबईतले कलावंत सतत कामात असतात. काम नसलेले जास्तच बिझी असतात. शिवाय भीती, दहशत, सभेला जाण्याचे फायदे, तोटे लक्षात घेता फार कुणी येणार नाही, असं वाटत होतं. पण सभेला अचानक गर्दी झाली.

नाटक, सिनेमा, मालिकांमध्ये काम करणारे, नाट्यशास्त्र विभागातून शिकून बाहेर पडलले अनेक तरुण कलावंत जमले होते. त्यांचा उत्साह बघून ‘घाबरलेल्यांना’ही बळ मिळत होतं.

सभागृह तुडूंब भरलं होतं. सभागृहात काही छपन्न इंच छातीचे बाऊंसरही उभे होते. ते आपल्याला वाचवायला उभे आहेत की बडवायला, हे मात्र कळत नव्हतं. आत बाहेर पोलीसही होते.

निखिल वागळे दणकावून बोलले. त्यांना मार खाण्याचा अनुभव आहे. सहा हल्ले त्यांनी पचवले आहेत. ‘पण पुण्यात त्यांच्या गाडीवर झालेला हल्ला, हा सर्वात भयंकर होता’ असं ते म्हणाले.

पुण्यात त्यांच्यावर झालेला खुनी हल्ला त्यांनी बारीकसारीक तपशीलातून उभा केला. मंचावरचे इतर तरुण कलावंतही बोलले. त्यांचा राग नाटकी नव्हता. त्यांच्या कवितेतून, गाण्यातून, बोलण्यातून ठिणग्या उडत होत्या. लोक त्यांना साथ देत होते. टाळ्या वाजवत होते.

एक-दोन पोलीसही टाळ्या वाजवता वाजवता थांबल्यासारखे वाटले. ते थांबल्याचं दुःख नाही, टाळ्यांसाठी त्यांचे हात एकत्र आले, हा आनंद मोठा आहे.

सभेपूर्वी थोडी भीती होती. सभेनंतर भीती मेली. माणसं हलकी झाली. सगळेच खुलले. कारणाशिवाय हसू लागले. पोलीस नोकरीचा भाग म्हणून गर्दी हटवू पाहत होते, पण कुणालाच घरी जायची घाई नव्हती.

‘आता भय मरेल. नाटकही खुलेल, बदलेल. किडूकमिडूक गोष्टींच्या पलीकडे जाईल’, असा विश्वास वाटला. असो!

मध्यंतरी एक भले सभ्य गृहस्थ अचानक भेटले. ‘आविष्कार स्वातंत्र्याचे धोके’ या विषयावर अत्यंत तळमळीनं बोलले. ते खूप प्रेमाने बोलत होते. बोलता बोलता खांद्यावर हात टाकत होते. त्यांना विनाकारण माझ्याविषयी आदर वाटत होता. ते एक-दोनदा पटकन वाकले. ते माझ्या तंगड्यांना स्पर्श करतात की काय, असं वाटून गहिवरल्यासारखं झालं.

त्यांच्या बोलण्यात मुद्दे नव्हते, फक्त प्रेम होतं. प्रेमानं गलबलायला होतं, असं म्हणतात. पण त्यांचं प्रेम अंगावर येत होतं. शब्द खुनशी वाटत होते. हल्ली प्रेम, माया, द्वेष, आशीर्वाद, शाप, शिव्या असं काही वेगळं नसतं. सगळी सरमिसळ झाली आहे. गोंधळायला होतं. असो!

बिहार राज्यात लग्नाची वेगळी पद्धत आहे. तिथे लग्नाळू तरुण मुलींचे बाप, शहरातला एखादा बरा शिकलेला सुस्थितीला, सभ्य मुलगा हुडकतात. त्याला बंदुकीचा धाक दाखवतात, धमकावत, मारत-झोडत, शिवीगाळ करत पळवून नेतात आणि थाटामाटात लग्न लावून देतात. ह्या मंगल लग्नविधीला तिकडे ‘पकडुआ मॅरेज’ असं म्हणतात.

बायको हुंड्यात पिस्तूल आणते. त्यामुळे अशी ‘पकडुआ मॅरेज’ शंभर टक्के यशस्वी होतात. ते एकत्र आनंदाने नांदतात. प्रेम वाढत जातं. बायका, पुढच्या जन्मीही असाच ‘प्रेमळ बिहारी नवरा’ मिळावा म्हणून व्रत करतात. जन्मोजन्मीच्या प्रेमाची सोय होते.

काही जण प्रेमविवाहही करतात. पण धाक दहशत, खूनखराबा नसल्याने प्रेमविवाह यशस्वी होत नाहीत असं म्हणतात. धाक, धमकी, दहशत, शिवीगाळ ह्यात जी गम्मत आहे - ती प्रेमात नाही. हे आपल्याला ठाऊक असल्याने आपण लैला-मजनू, शिरीन- फरहाद, रोमिओ-ज्युलिएटच्या भानगडीत जात नाही. प्रेम दुबळ्यांसाठी असते. प्रेमाची ताकद संपली आहे. प्रेम नकोसं वाटू लागलं आहे.

आता द्वेषाला बरे दिवस आले आहेत. द्वेषाची चढते, खूप टिकते, द्वेषाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

अलीकडे प्रेम नसलेली, पण मनोरंजक पद्धतीने कमी-जास्त द्वेष पेरलेली नाटकं चालतात. सिनेमे टॅक्स फ्री होतात. अशा सिनेमांना सरकारी मदतही मिळते. मोठा सन्मानही मिळतो. असो!

मध्यंतरी कवी गुलजारांना ज्ञानपीठ मिळाल्याची बातमी कानावर पडली. प्रेमाचा सन्मान झाला की काय, असं वाटून आनंद झाला. चिअर्स करतो न करतो तोच पं. रामभद्राचार्यांनाही ज्ञानपीठ मिळाल्याची बातमी कळली. आता आनंद फार काळ टिकावा अशी स्थिती उरली नाही. असो!

मध्यंतरी आदरणीय मोदीजी विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. विद्यार्थ्यांसमोर बोलताना बालमनाचा विचार करून सुविचार पेरावे लागतात. मोदीजींनी सुविचार पेरताना मुलांनी शिव्या देऊ नये, असा सल्ला दिला. माणूस संतापला की, शिव्या देतो. हल्ली सतत संतापावे, अशी स्थिती असल्याने लहान-थोर सगळेच सतत शिव्या देत असतात. आता शिव्यांशिवाय विचार मांडता येत नाही, भांडता येत नाही, प्रेम करता येत नाही.

सकाळी पेपर चाळताना, टीव्हीवर बातम्या बघताना, मोबाईलवर मेसेज वाचताना, नाटक-सिनेमा बघताना स्वतःला आवरावं लागतं. कितीही आवरलं तरी तोंडातून शिवी निसटतेच. आता शिव्यांशिवाय बोलता येणं अवघड आहे. शिव्या न देणाऱ्या माणसाचा संशय वाटावा अशी स्थिती आहे. पण पंतप्रधानांचा मान राखावा म्हणून मी आता शिव्या कमी करण्यासाठी - संताप आवरण्यासाठी शिव्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू केला आहे.

मराठीत शिव्या भरपूर आहेत, पण शिव्यांचा गंभीर अभ्यास झालेला दिसत नाही. खूप प्रयत्नानंतर एक ग्रंथ हाती लागला.

अ.द. मराठे नावाच्या शिक्षकाने, मुलांना शिकवता शिकवता अश्लील म्हणी आणि वाक्प्रचारांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला आहे. सखोल संशोधन केलेलं आहे. हे सगळं महत्त्वाचं संशोधन ‘मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार’ या ग्रंथात धीटपणे नोंदवलेलं आहे.

अनेक लहान-थोर स्त्री पुरुषांना भेटून, अनेक लहान मोठी गावं पालथी घालून त्यांनी हा मौल्यवान ऐवज गोळा केला आहे. या ग्रंथातला ९० टक्के मजकूर स्त्रियांनी पुरवलेला आहे.

दुर्गा भागवतांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच अ.द. मराठे हा महत्त्वाचा ग्रंथ रचू शकले. मराठेंनी हा ग्रंथ दुर्गाबाईंना अर्पण केला आहे.

मराठेंनी फक्त अश्लील ऐवज गोळा केला नाही. त्यांनी शिव्या, म्हणी वाक्प्रचार समजावून घेतले आहेत. त्यांचं सखोल विश्लेषण केलं आहे. त्या मागची मानसिकताही उलगडून दाखवली आहे. त्या मागच्या गोष्टीही सांगितल्या आहेत. गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत. हे सगळं पुन्हा पुन्हा वाचावं असं आहे.

मराठे म्हणतात ‘अश्लील म्हणी आणि वाक्प्रचार हे लोकसंस्कृतीचं महत्त्वाचं अंग आहे. या म्हणी आणि वाक्प्रचार हे विकृत नाहीत, तर ते गंभीर उद्गार आहेत.’

हा ग्रंथ वाचून संपल्यावर शिव्या न देणारेही गंभीर उद्गार म्हणून दोन-चार शिव्या देतील आणि मनातली खदखद बाहेर काढून मोकळे होतील, असा विश्वास वाटतो.

‘ताण-तणावाच्या, दहशतीच्या काळात शिव्यांचा औषधासारखा वापर करता येऊ शकेल का?’ या विषयावर संशोधन व्हायला हवं.

हा काळ सभ्य शब्दांत समजावून घेता येईल, असं वाटत नाही. आता मोठ्या प्रमाणावर असभ्य शब्दांची, शिव्यांची गरज भासणार आहे.

अनेक वर्षांत आपल्याकडे नवीन शिव्या तयार झालेल्या नाहीत. जुन्या शिव्यांची ‘पॉवर’ संपली आहे, हे लक्षात घेऊन मी काही सभ्य शिव्या रचायचा प्रयत्न केला आहे. ‘गंभीर उद्गार’ म्हणून आपण तो गोड मानून घ्याल असा भरोसा वाटतो.

सामाजिक भान नसलेल्या कलावंतांना ‘भान xx’ असं म्हणता येईल. कलेचा कलावंतांचा आदर न करणाऱ्यांना ‘आदर xx’ म्हणून हिणवता येईल. विनाकारण डोकं खाणान्याला ‘ब्रेन xx’ म्हणून हाकलता येईल.

हा प्रयत्न फुटकळ आहे, याची मला जाणीव आहे. आजचा संताप व्यक्त करण्याची ताकद असलेल्या शिव्या रचण्यासाठी वेगळ्या प्रतिभेची गरज आहे. आता सामाजिक गरज लक्षात घेऊन प्रतिभावंतांनी तत्काळ पुढं यावं, असं वाटतं. असो!

काही दिवसांपूर्वी ‘अकबर’ नावाच्या सिंहाची आणि ‘सीता’ नावाच्या सिंहिणीची बातमी वर्तमानपत्रात आली होती. सिंहाच्या नावामुळे कुणाच्या तरी भावना दुखावल्या आणि तो कोर्टात गेला असं कळलं.

थरथरणारा, गयावया करणारा, हात जोडणारा, पाया पडणारा सिंह डोळ्यासमोर आला. लाजल्यासारखं झालं. अशा प्रसंगी शिव्यांची कमतरता भासते. हाता-तोंडाशी बऱ्या शिव्या नाहीत त्याचं वाईट वाटतं. असो!

जगाचं जंगल झालं आहे. इसापची आठवण येते. या जंगलाच्या गोष्टी सांगायला आज इसाप हवा होता, असं वाटतं.

सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी गोष्टी सांगणारा इसाप होऊन गेला. इसाप कुरूप होता. त्याला बोलताही येत नव्हतं. तो जन्मताच मुका होता की नंतर कसलासा धक्का बसून बोलायचा थांबला, हे मात्र कळायला मार्ग नाही.

इसाप बालपणीच बाजारात गुलाम म्हणून विकला गेला होता. ज्यांना बोलता येत नाही किंवा जे बोलत नाहीत, ते स्वस्तात विकले जातात.

पुढे कधी तरी चमत्कार झाला आणि तो बोलू लागला. मनात साठवलेलं सांगू लागला. गुलामांकडे गोष्टी असतात. गुलामांना गोष्टी रचता येतात. तो गोष्टी सांगू लागला..

प्राण्यांच्या गोष्टी सांगून चलाख, धूर्त, दुष्ट, कपटी माणसांना उघडं पाडू लागला. लहान-थोर त्याच्या गोष्टी ऐकू लागले. इसापभोवती गर्दी गोळा होऊ लागली.

इसाप हुशार होता, गुंतागुंतीच्या समस्या चुटकीसरशी सोडवायचा. त्याची गोष्ट ऐकून अडचणीत सापडलेले मोकळे व्हायचे.

इसाप प्रवास करायचा, गोष्टी गोळा करायचा, गोष्टी सांगायचा. भरकटलेल्या माणसांना सुधारू पहायचा.

इसापची हुशारी आणि गर्दी गोळा करायचं कसब बघून क्रोएसम् राजाने त्याचा मानसन्मान केला. त्याला आपल्या पदरी ठेवला.

एकदा राजाने इसापला काही कामानिमित्त ‘डेल्फी’ नावाच्या शेजारच्या राज्यात राजदूत म्हणून पाठवला.

इसाप समुद्र ओलांडून डेल्फीत पोहचला. माणसं गोळा झाली. इसाप गोष्टी सांगू लागला. त्यांच्या जगण्यातही विसंगती उलगडून दाखवू लागला.

लोकांना गोष्टी कळल्या नाहीत. लोक भडकले, चिडले. त्यांनी इसापला मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावली.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

इसापला वाजतगाजत टेकडीवर नेला. कडेवरून ढकलण्यापूर्वी इसापने शेवटची गोष्ट सांगितली-

एक बेडूक पाण्यात तळ्याच्या काठावर रहायचा. समोर जमिनीवर बिळात एक उंदीर रहायचा. दोघेही सख्खे मित्र होते. बेडूक उंदराकडे जायचा. गप्पा गोष्टी, खाणं पिणं व्हायचं. मग एक दिवस बेडकाने उंदराला आपल्या घरी यायचं निमंत्रण दिलं.

उंदीर म्हणाला – ‘तू पाण्यात राहतोस आणि मला तर पोहता येत. नाही. मी तुझ्या घरी कसा येणार?’ बेडूक म्हणाला, ‘चिंता करू नकोस, तू माझा मित्र, मी सगळा विचार केला आहे. सगळी व्यवस्था केली आहे.’

बेडकाने एक दोरी आणली, एक टोक स्वतःच्या पायाला बांधलं, दुसरं टोक उंदराच्या पायाला करकचून बांधलं आणि तळ्यात उडी मारली.

उंदराला पोहता येईना. तो बुडू लागला, सुटण्यासाठी धडपडू लागला. बेडूक हसू लागला.

कपटी बेडकाचं कारस्थान उंदराच्या लक्षात आलं. उंदीर म्हणाला, ‘मी मरतोच आहे, पण तू वाचणार नाहीस. आता तुझा नाश अटळ आहे.’

उंदीर मेला. उंदराचं पाण्यावर तरंगणारं फुगलेलं प्रेत बघून, आकाशात उडणाऱ्या घारीनं झडप घातली आणि दोघानांही संपवलं.

ही गोष्ट संपताच झुंडीने इसापला कड्यावरून ढकलला. तो दरीत कोसळला. झुंडीने जल्लोष केला. इसाप गोष्टींच्या थारोळ्यात पडला, पण मेला नाही. इसाप अजूनही जिवंत आहे.

इसापला मारल्याची बातमी राजाच्या कानावर गेली. राजाने सैन्य पाठवलं आणि गोष्ट सांगणाऱ्याला मारणाऱ्यांचं राज्य संपवून टाकलं.

गोष्टी सांगणारा मेला, तरी त्याच्या गोष्टी छळत राहतात. असो!

शेवटी मुका इसाप अचानक बोलू लागला, तसेच आपल्याकडचे अचानक मुके झालेलेही बोलू लागतील, अशी आशा करू या.

‘नव्या’ने मिळालेला आवाज ‘धारदार’ असतो, असं म्हणतात. ‘धारदार गोष्टीं’ची वाट बघू या…

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......