अजूनकाही
‘विक्रम अॅन्ड वेताळ @ हैबतपूर’ ही पत्रकार देवेंद्र शिरुरकर यांची नवी कोरी कादंबरी नुकतीच देशमुख आणि कंपनीतर्फे प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला त्यांनी लिहिलेल्या मनोगत व प्रस्तावनेचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
आकाशाकडे पाहून, निसर्गाचा अंदाज बांधत शेती करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातला मी. आजोबांची बऱ्यापैकी शेती असूनही त्यांना कधी भरघोस उत्पन्न मिळाल्याचे आठवत नाही. मराठवाड्यातील आमची शेती. माझ्यासकट माझ्या सगळ्याच शेतकरी मित्रांच्या कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी इतर अनेक गोष्टी कराव्या लागतात, हे वास्तव कळत्या वयात समजलेलं. हा धंदा घाट्याचा असल्याचं लवकर उमजलं. त्यामुळे शेतीबद्दलचं भाबडं साहित्यिक चित्र मनात कधीच निर्माण झालं नाही.
शिक्षण आणि पत्रकारितेत आल्यावर शेती, शेतकऱ्यांचं अर्थकारण यातल्या हितसंबंध आणि गुंतागुंतीचा अदमास यायला लागला. घामाच्या दामाबद्दल शरद जोशी आणि ‘शेतकरी संघटने’ने शेतकऱ्यांत निर्माण केलेली जाणीव कितपत रुजली, याचाही अंदाज आला. या वाटचालीत शेतकऱ्यांचा राजकीय प्रक्रियेतील सहभाग, राजकारण्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन, यांबाबत अधिक चौकसपणे पाहायला लागलो. हे लिहिण्याची, मांडण्याची इच्छा तीव्र होत होती. अर्थात या विषयांवर पत्रकार या नात्याने सातत्याने लेख लिहीत आलेलो आहेच. मात्र हे सगळे एका सूत्रबद्ध पद्धतीने मांडण्याचा हा माझा प्रयत्न आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
वतनदार म्हणून गावात वजन, जवळ भला मोठा जमीनजुमला, गाई-म्हशी, बैलं, नांगरटीसाठी स्वतःची वडिलोपार्जित साधनं, यामुळे गावातला मोठा माणूस असलेल्या दासराव पाटलांची ही गोष्ट आहे. कारण कधी काळी अशा घरातली कर्ती माणसं केवळ आपापल्या घरालाच नाही, तर गावालाही आधार देत असायची. पण दुसऱ्या बाजूने कालानुरूप बदलता समाज अन् राजकीय अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकत जुन्याचा आधार घेत कर्तेपणाचं नवं जग उभारणाऱ्या जिवाजीरावांचीही वाटचाल यात आहे.
शेतात राबायचं, काळ्या आईला कौल लावायचा अन् त्यातून जे काही पिकेल, मिळेल त्यावर गुजराण करायची, हा कित्ता वर्षानुवर्षं सुरू आहे. पण ही वहिवाट आता झपाट्यानं बदललीय. दोन दाण्यांच्या बदल्यात हजार दाण्यांचं दान पदरात टाकणारी काळी भुसभुशीत जमीनही कुठंतरी सतत देऊन थकलीय.
शेतीतून मिळणाऱ्या मालाला भाव मिळेनासा झाल्यानं कर्त्या घरातली पुढची पिढीही हा बुडीत धंदा करायला तयार नाही. त्यांनी जगण्यासाठी वेगळी वाट निवडलीय. गावकुसात राहूनच उदरनिर्वाहासाठी वेगळा मार्ग शोधणाऱ्या माणसांना या सगळ्या समस्यांमागची कारणं उमगली आहेत. बदलत्या काळानुसार सत्तेची संसाधनं हाताशी घेत कर्तेपण मिरवणाऱ्या लोकांचं पिकंही फोफावलं आहे. त्यामुळे दासराव पाटलांसारख्या एकेकाळी अख्खे गाव पोराबाळाप्रमाणं सांभाळणाऱ्या लोकांचं कर्तृत्व झाकोळलं जातं. या नव्या कर्त्या जमातीला समस्या सोडवण्यापेक्षा त्या तशाच ठेवण्यात स्वतःचं हित सामावलं असल्याचं वाटतं.
भानुदासराव पाटलांसारखी विचार करणारी माणसं या मूळ समस्येवर शक्य त्या मार्गानं उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. शेतकऱ्यांच्या व्यथा सोडवण्यासाठी निव्वळ राज्यसंस्थेला दोष देऊन चालणार नाही, तर शेतकऱ्यांनाही आधुनिक व्हावं लागेल, अंतर्बाह्य बदलावं लागेल, याचं भान सुटलेलं नाही. स्थितीशील जगण्याला कंटाळलेली वा या कोंडीत जगणं नाकारून नोकऱ्या करणारी भानुदासराव पाटलांची उत्तम, सुभाष ही भावंडं गावमातीपासून स्वतःला अलिप्त ठेवण्यात धन्यता मानतात. पण त्यांची पुढची पाती (अभिषेक, विठ्ठल पाटील) या मूळ दुखण्यावर इलाज करायला लागली आहे.
विठ्ठलाचं नाव घेत शेतात राबणारा बबन शिंदेसारख्या निष्ठावंत शेतकऱ्यांची पिढी या बदलाकडं गुमान बघत राहिली आहे. त्याचा विचारी पोरगा विक्रम मात्र भानुदासराव पाटलांमुळे शेतकरी, संघटना आणि शेतकऱ्यांच्या दारिद्र्याकडं बापासारखा तटस्थपणे बघू शकत नाही. भानुदासरावांसारखाच तोही या बदलाला सामोरा जातो.
ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेनं उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. शेती, शेतकरी याबद्दल तोंडी जिव्हाळा व्यक्त करत ग्रामीण अर्थकारण अन् त्यातून राजकारण करणाऱ्या मनसबदारांच्या पिढ्या, शेती अन शेतकऱ्यांच्या दैन्याला कसे हातभार लावत आहेत, याची जाणीव असूनही याकडे केवळ ‘काळाचा महिमा’ म्हणून बघणारे दासराव, बबन शिंदे. या सगळ्याची मनस्वी चीड बाळगत हे दैन्य संपवण्यासाठी धडपडणारे भानुदासराव पाटील हे कमी-अधिक प्रमाणात सगळ्याच गावखेड्यात दिसून येतात.
शेतकऱ्यांच्या मागासलेपणावर तोडगा काढणारी पाटलांच्या घरातील तिसरी पिढी (विठ्ठल, अभिषेक) मात्र या दुसऱ्या पिढीपेक्षा एक पाऊल पुढे आलीय. केवळ राजकीय यंत्रणेवर विसंबून न राहता शेतकऱ्यांनी स्वतःच बदललं पाहिजे, आधुनिक झालं पाहिजे, स्वतः पिकवलेलं स्वतःच विकायलाही शिकलं पाहिजे, हा विचार शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवणारे हे युवक शरद जोशींची भाषणं ऐकणाऱ्यांची पोरं आहेत.
अभिमन्यू काळे, अभिषेक, विठ्ठल पाटील या नव्या पोरांना शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या ठाऊक आहेत. त्यासाठी जबाबदार घटकही त्यांना माहीत आहेत. पण यातला कोणीही स्थितीवादी नाही, आपापल्या परीनं शेतीचे अर्थकारण फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्यामुळेच ही मुलं शेतकऱ्यांच्या नेहमीच्या ऊस, कापूस, सोयाबीन या पिकांमुळे होणारं नफा-नुकसानीचं गणित मांडतात अन् त्यावरील उपायही सांगतात. नफा होत नसेल तर ती पिकं घेणं बंद करा, असं ठणकावून सांगायलाही मागेपुढे बघत नाहीत. कृषी क्षेत्रातील नव्या कल्पना, तंत्रज्ञान, नव्या पद्धती याचा साधकबाधक विचार शेतकऱ्यांनी करावा, असा त्यांचा प्रयत्न आहे. थोडक्यात, शेतकऱ्यांच्या दुःखाचं, वेदनांचं भांडवल करून रडे काढण्याचा अन् त्याचं उदात्तीकरण करण्याचा वेडगळपणा कोणीच करताना दिसत नाही.
उसासारख्या नगदी पिकाला दुसरा पर्याय नाही, म्हणून भरमसाठ प्रमाणात ऊस लागवड करायला त्यांचा विरोध आहे, कारण ते शेती, शेतकऱ्यांच्या तात्पुरत्या फायद्याचा विचार करत नाहीत. ऊस लागवडीतून शेतकऱ्यांना कारखानदार केवळ साखरनिर्मितीचाच मोबदला देतो, इतर उत्पादनांच्या विक्रीतील हिस्सा नाकारला जातो, यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवड बंद करावी, एवढा टोकाचा विचार करू शकतात.
.................................................................................................................................................................
या कादंबरीच्या मलपृष्ठावरील मजकूर -
“शेतीला ‘काळी आई’ मानून जे पदरी पडेल ते निमूटपणे स्वीकारणाऱ्या भावनिक दृष्टिकोनाला छेद देत शेती प्रश्नांची मांडणी व चिकित्सा करणाऱ्या शेतकरी आंदोलनांची बरीच घुसळण झाली. प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला आव्हान देत शेतकरी तरुण गावोगावी उभे राहिले. मतांच्या राजकारणात पुन्हा नवसरंजामदार उदयाला आले आणि या नवसरंजामदारांशी खऱ्या शेतकरी पुत्रांना दुसरी लढाई लढावी लागली. देवेंद्र शिरूरकर यांच्या या कादंबरीतील हैबतपूर मतदारसंघ हे केवळ एक प्रातिनिधिक कार्यक्षेत्र आहे. सर्व सत्तास्थाने बुडाखाली घेऊन अनिर्बंध सत्ताकारण करणारे आबासाहेब, दिनकरराव; शेतकरी संघटनेच्या भानुदास पाटलांच्या साथीने राजकारणात पाय रोवू पाहणारा विक्रम शिंदे हा तरुण, जात या प्रस्थापित राजकीय आयुधाचाच अवलंब करावा लागण्याची त्याची अपरिहार्यता, नव्या विचारांनी झपाटलेल्या तरुणांची विधायक धडपड, राजकारण बदलण्याच्या ध्यासातून त्यांनी चालवलेले प्रयत्न, असे अनेक पदरी वास्तव या कादंबरीत आहे. शेतजमिनीला ‘काळी आई’ मानण्यापासून ते शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेपर्यंत आणि सरंजामी राजकारणापासून ते नवश्रीमंत, नवसरंजामदारांच्या उदयापर्यंत असे टप्पे या कादंबरीत आलेले आहेत. शेती व्यवस्थेतील व राजकीय क्षेत्रातील स्थित्यंतराचा ही कादंबरी वेध घेते. व्यवस्थेचा चेताळ कादंबरीचा नायक असलेल्या विक्रमच्या मानगुटीवर आहे. त्याखाली विक्रम दबून जातो की, या वेताळाचे जोखड भिरकावून देतो, हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी.”
- आसाराम लोमटे (प्रसिद्ध कथा-कादंबरीकार)
.................................................................................................................................................................
या कथेत मराठवाड्याच्या ग्रामीण जीवनाशी मुळं घट्ट बांधल्या गेलेला आणि शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व्यवस्थेला जाब विचारणारा अनुरागसारखा ध्येयवादी पत्रकार आहे. तर ग्रामीण अर्थकारणाच्या जोरावर राजकारणावर मांड ठोकणाऱ्या आबासाहेबांसारख्या नेत्यांचे शब्द झेलणारे रामदास कोळगे, सुदीप आनंदगावकर यांच्यासारखेही पत्रकार पाहायला मिळतात.
पत्रकारितेच्या माध्यमातून बदल घडेल या भाबड्या आशेमुळे राजकीय प्रक्रियेकडे अलिप्ततेतून पाहणारा अनुराग एक टप्प्यावर विक्रम शिंदेसाठी राजकीय प्रकियेत सहभागी होतो, त्याचा हाही प्रवास रंजक आहे. म्हटले तर हा वस्तुस्थितीवर आधारलेले ग्रामीण राजकारण अधिक खोलवर उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करण्याचा, प्रतिकार करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
गावखेड्यात राहून प्रस्थापितांशी नित्याचे संबंध जोपासणारा, पण मोक्याच्या वेळी विक्रमला साथ देणारा अभिमन्यू काळे, विक्रमला साथ देणारे रहेमान पठाण, लहू पाटील, शेतीकडे साधन म्हणून पाहणारे नरहरपंत कुलकर्णी, राजकारणात सक्रिय असूनही योग्य संधीच्या शोधात असणारे पिलाजीराव शिंदे, मल्हारराव देशमुख, पक्षांतर्गत गटबाजीचा भाग म्हणून मंत्रीपदी वर्णी लावून घेणारे दिनकरराव, ही पात्रं आपल्या अवतीभवतीही दिसतील. हे मांडताना ग्रामीण भागातील प्रस्थापित राजकीय नेत्यांचे रंगढंग, सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी घरातल्या पूर्वसूरींचे पत्ते कट करण्यासाठी रचलेले डावपेच, जातीय गणितं साधण्यासाठी केलेली कसरत, अशी वास्तवावर आधारलेली ही कथा आहे.
‘साखरसम्राट’, ‘शिक्षणमहर्षी’ अशा उपाध्या मिरवणाऱ्या नेत्यांकडे स्वत्व गहाण ठेवून धन्यता मानणारे, भक्कम पगार घेत सावकाऱ्या करणारे बुद्धिजीवी प्राध्यापकही आहेत, तसेच ‘डोनेशन’ देण्याची कुवत नसल्याने ‘सीएचबी’वर गुजराण करत प्रस्थापितांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या लोकांना बळ देणारे हनुमंत उपरेसारखे चळवळे प्राध्यापकही आहेत. जो कोणी आपले हितसंबंध जपतो, त्याला निवडणुकीत कौल द्यायचे धोरण ठेवणारे व्यापारी-दुकानदार आहेत. तसेच येनकेनप्रकारेण ‘दाबजोर’ माल कमावून आरक्षणाच्या जोरावर राजकारणात मोठं पद मिळवण्याची खटपट करणारे निवृत्ती वाघमारेंसारखे निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत.
हैबतपुरात महिलांना त्यांचे प्रश्न समजले आहेत, मात्र अद्याप त्या म्हणाव्या त्या प्रमाणात आक्रमक झालेल्या दिसत नाहीत. पण आपल्या हक्कांची जाणीव त्यांच्यात नक्कीच झालेली आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर (घराण्यात चालत आलेला वारसा, कारखानदारी) वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणूका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण विक्रम शिंदेसारखी आशेचा किरण दाखवणारी विचारी, धाडसी पोरं निपजतात का, हे मात्र शोधावं लागतं.
‘विक्रम अॅन्ड वेताळ @ हैबतपूर’ - देवेंद्र शिरुरकर
देशमुख आणि कंपनी, पुणे | मूल्य - ४५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment