अजूनकाही
लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांतल्या मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यापासून राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या घोषित-अघोषित पक्षांच्या उमेदवाऱ्या, पक्षांतर्गत कुरबुरी, आघाड्यांमधली जागावाटपाची रस्सीखेच, युतीत येण्या-न येण्यावरून वा घेण्या-न-घेण्यावरून होत असलेलं राजकारण, विरोध आणि जाहीर झालेल्या वा होऊ घातलेल्या उमेदवारांविषयीचा असंतोष, यांविषयीच्या बातम्यांनी वर्तमानपत्रांची पानं भरून वाहताहेत. त्याविषयी सोशल मीडियावर उपहासापासून मीम्सपर्यंत अनेक आविष्कार पाहायला मिळताहेत. निवडणुकीच्या काळात सोशल मीडिया हा ‘राजकीय करमणुकी’चं मोठं ‘हब’ होतो, याची गेल्या वेळेप्रमाणे याहीवेळी प्रचिती येत आहे. टीव्हीवर तर अतिशय फुटकळ बातम्यांच्या मोठमोठ्या ‘ब्रेकिंग न्यूज’ होताहेत… ‘व्हॉटसअॅप विद्यापीठा’ला तर नुसतं उधाणं आलंय…
हे सगळं पाहून-वाचून मला शालेय जीवनातली एक राजकीय सभा आठवली. गोष्ट तशी बरीच जुनी आहे, तब्बल पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची. मी अकरावी-बारावीला होतो. रोज सायकलवरून पंधरा-सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या निमशहरात जात होतो. तो बहुधा रविवारचा दिवस होता. त्यामुळे महाविद्यालयाला सुट्टी होती. परिणामी नेहमीप्रमाणे दिवस सावकाशपणे चालला होता. तेवढ्यात गावात दवंडी पिटवली गेली की, ‘संध्याकाळी तीर्थपुरीला सभा आहे. तिला ज्यांना यायचं आहे, त्यांच्या जाण्या-येण्यासाठी ट्रॅक्टरची सोय केली आहे. दुपारी अमूक वेळेला अमूक ठिकाणी जमा व्हावं.’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सभा माझ्याच महाविद्यालयाच्या मैदानावर होती. त्यात या सभेला माझ्याबरोबरचे, आगे-मागे असलेले काही मित्रही जाणार होते. त्यामुळे मलाही जावंसं वाटलं. वडिलांनीही परवानगी दिली. मग गेलो.
पण ही सभा कुठल्या राजकीय पक्षाची होती, त्यात कोण काय बोललं, यापैकी आता काहीही आठवत नाही. पण या सभेत ज्या नेत्यांची भाषणं झाली, त्यातल्या एकाने सांगितलेली एक ‘कथा’ मात्र आजही लख्खपणे आठवते. ती कथा अशी –
“ ‘ती’चं लग्न झालेलं होतं. नवरा-मुलांसोबत तिचा तसा छान संसार चालू होता. मुलं होऊन ती खेळत्या वयापर्यंत चालला, म्हणजे तो तसा बराच चालला होता.
‘त्या’चंही लग्न झालेलं होतं. बायको-मुलांसोबत त्याचाही तसा छान संसार चालू होता. इथवर तो चालला होता, म्हणजे तसा बराच चालला होता.
पण… पण ‘ती’ला आणि ‘त्या’ला, दोघांनाही आपापल्या संसारात काहीतरी कमतरता भासत होती. तिच्यावर मात करण्याचा दोघंही स्वतंत्रपणे प्रयत्न करू लागले. पण आहे त्या संसारात राहून ती कमतरता भरून काढता येणार नाही, असं ‘ती’च्या आणि ‘त्या’च्याही लक्षात आलं. मग त्यांनी आपापल्या पातळीवर ‘पर्याया’चा शोध सुरू केला. शोधता शोधता त्यांना ‘एकमेकां’चा शोध लागला. दोघं पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्यांना आपल्या संसारात जी कमतरता आहे, ती या नव्या नात्यातून भरून निघू शकते, याचा ‘साक्षात्कार’ झाला. मग काय, दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी एकमेकांप्रती आणाभाकांची देवाण-घेवाण केली. काही दिवस प्रेमाराधन केल्यानंतर त्यांनी रितसर लग्न करण्याचा निर्णय घेतला. ‘ती’ने आधीच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला, तर ‘त्या’ने आधीच्या बायकोपासून. ‘ती’ तिच्या मुलांसह आली आणि ‘तो’ त्याच्या मुलांसह. दोघांनी विधिवत देव-ब्राह्मणांच्या साक्षीनं साग्रसंगीत लग्न केलं.
आता त्यांचा ‘नवा संसार’ सुरू झाला. सगळ्यांचाच संसार सुरुवातीला चांगलाच चालतो, तसा त्यांचाही चालला. मग त्यांनाही मुलं झाली. हळूहळू ती मोठी झाली. मग ‘ती’ची मुलं, ‘त्या’ची मुलं आणि ‘त्यांची’ मुलं एकमेकांसोबत खेळू लागली. त्यांचा तो खेळ पाहताना त्या दोघांचे डोळे निवू लागले. आपल्या मुलांचे खेळ पाहताना आपला निर्णय किती योग्य होता, याची त्यांना खात्री पटू लागली. दोघांनीही एकमेकांना ‘धन्यवाद’ दिले.
पण एके दिवशी गंमत झाली. त्यांच्या मुलांची आपसांत भांडणं झाली. प्रथेप्रमाणे मुलं भांडण घेऊन आईकडे गेली. त्यांच्या भांडणाचा प्रकार पाहून ती काहीशी चक्रावून गेली, बावरली आणि घाबरलीसुद्धा. काय करावं, हे काही तिला सुचेना. मग ‘ती’ने हा सगळा प्रकार ‘त्या’च्या कानावर घालायचं ठरवलं. संध्याकाळी तो घरी आल्यावर ‘ती’ म्हणाली ‘त्या’ला, ‘आज काय झालं, माहितंय का, ‘तुझी’ मुलं आणि ‘माझी’ मुलं मिळून ‘आपल्या’ मुलांना मारताहेत…’
हे ऐकून तोही चक्रावून गेला, बावरला आणि थोडासा घाबरलासुद्धा.”
एवढं नक्की आठवतं की, ही कथा सांगून झाल्यावर सभेत मोठा हशा पिकला होता. आम्हा पोरांना खरं तर काही नीट कळलं नव्हतं, पण आम्हीपण इतरांच्या मागून हसलो. सभा संपली. घरी आलो. पुढचे बरेच दिवस मी या कथेचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होतो, पण ही ‘राजकीय विडंबनकथा’ काही मला तेव्हा समजली नाही. माझ्या मित्रांनाही समजली नाही, आणि मोठ्यांना विचारण्याची हिंमत आम्ही दाखवू शकलो नाही.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात ‘महायुती’ आणि ‘महाविकास’ आघाडी या दोन्ही आघाड्यांतल्या आणि राष्ट्रीय पातळीवर ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ या दोन्ही आघाड्यांतल्या पक्षांतर्गत, आघाड्यांतर्गत कुरबुरी, ताणातणी, रस्सीखेच, नाराजी, संताप, असंतोष, खदखद, मानापमान, अहमहमिका यांविषयीच्या बातम्या वाचून मनाच्या तळाशी पडून असलेली ही कथा एकदम उसळी मारून वर आली.
एका राजकीय नेत्यानं सांगितलेली ही कथा. त्यामुळे तिला ‘राजकीय विडंबनकथा’ म्हणावं की ‘राजकीय व्यंगकथा’ म्हणावं? खरं तर वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्यासारखं तिला ‘रूपककथा’ही म्हणता येईल, किंवा ना. सि. फडक्यांच्या ‘प्रणयी’ कादंबऱ्यासारखं ‘नवी प्रेमकथा’ही म्हणता येईल.
पण गेल्या दहा वर्षांत आपल्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील राजकारणाची, त्यातही महाराष्ट्रातल्या पक्षीय राजकारणाची जी काही दुर्दशा झाली आहे, ती पाहता या कथेला विंदा करंदीकरांच्या शब्दांचा आधार घेत ‘राजकीय विरुपिका’ म्हणणंच जास्त योग्य राहील…
महाराष्ट्राच्या पक्षीय राजकारणाची गेल्या दहा वर्षांत आधी ‘ट्रॅजेडी’ झाली, मग त्या ‘ट्रॅजेडी’ची ‘कॉमेडी’ होत गेली… आणि आता ती ‘ट्रॅजिक-कॉमेडी’ झालेली दिसू लागली आहे. त्यात अनेक ‘कथा’, ‘व्यथा’, ‘शोकांतिका’, ‘सुखात्मिका’ आहेत, पण या सगळ्यापेक्षाही ‘विरुपिका’ सर्वांत जास्त आहेत, असं वाटतं.
वरची ‘राजकीय विरुपिका’ त्यापैकीच एक…
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment