‘महाशक्ती’, ‘महासत्ता’ असलेल्या ‘नव्या भारता’च्या सुजाण नागरिकांनो, ‘मतदान’ करण्याशिवाय तुमच्यासमोर तरणोपाय नाही...
संकीर्ण - व्यंगनामा
देवेंद्र शिरुरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 13 March 2024
  • संकीर्ण व्यंगनामा निवडणूक Election लोकशाही Democracy

‘नेमीच होते निवडणूक’ या उक्तीनुसार येत्या काळात लोकसभा निवडणूक होईल. बहुधा जुनंच सरकार नव्यानं शपथ घेईल. मग काय, भारत ‘महाशक्ती’ होईल आणि ‘विश्वगुरू’सुद्धा! फक्त या नव्या सरकारला वाढत्या लाभार्थ्यांसाठी नव्या ‘रेवड्यां’ची तरतूद तेवढी करावी लागेल. देशातील अजून काही बहुसंख्य समाजघटक ‘आम्हाला मागास ठरवा’, म्हणून आंदोलनं करतील, शेतकऱ्यांना पुन्हा ‘एमसीपी’साठी आंदोलन उभारावं लागेलच. विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी, पदवीधर तरुण नोकरीसाठी उपोषणं करतील.

पण हे तुम्ही विसरू नका की, क्रांती झाल्यासारखा देश बदललाय. धडाधड मेट्रो उभारल्या जाताहेत, उड्डाणपूल उभारले अन् पाडलेही जाताहेत. दिवसाकाठी दहा-बारा किलोमीटर रस्ते बांधले जाताहेत. पुढच्या दहा वर्षांत महानगरांतली लोकसंख्या आणखी वाढेल, त्यांच्या पायाभूत गरजा वाढतील, त्यांना राहायला घरं लागतील, वाहतुकीच्या सुविधा वाढ़तील, बँकांना कर्ज घेणारे ग्राहक मिळतील, मरेपर्यंत हप्ते फेडून जगणाऱ्यांची संख्या वाढेल. या वाढत्या संख्येचे बँक, विमा, इपीएफओमधील व्यवहार जमेस धरून सरकारला अधिक मोठे दावे करता येतील – ‘हा पहा, नवा भारत, समर्थ-सशक्त भारत… नव्या भारतात रोजगारही केवढा वाढलाय!’

शहरं वाढताहेत, या शहरांतील पायाभूत सुविधांचं जाळं वाढतंय आणि रोजगारही! लोक मोठ्या प्रमाणात शहरांत राहायला येतील, त्यांच्या या स्थलांतरामुळे ‘नवा भारत, समर्थ भारत’ उभा राहील. शहरात पोट भरायला आलेल्यांपैकी काही मिळेल त्या नोकऱ्या करतील, काही चहा-भजी-भाजी विकतील, पण शहरातच राहतील. त्यांच्यासाठी सरकार स्वस्तातल्या घरांच्या योजना जाहीर करेल, वर्तमानपत्रांत मोठमोठ्या जाहिराती करून किती लाख लोकांना घरं दिली याचे आकडे जाहीर करेल!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पण मग तुम्ही विचाराल, यांची गावखेड्यात राहिलेली भावंडं काय करताहेत? तर त्यांच्यासाठी या ‘नव्या भारता’त सोय आहेच की! त्यांनी शेती करावी. वर्षातून चार महिने जमेल ते पिकवावं, सरकार देईल त्या दरानं विकावं अन् नाहीच काही पदरात पडलं, तर ‘मागास’ म्हणवून घेण्याच्या आंदोलनात उतरावं.

तेही जमलं नाही, तर जवळच्या मंदिरात ‘राम’नामाचा जप करावा. वर्षातून तीनदा बँकेत पडणाऱ्या ‘पीएम किसान’चे सहा हजार रुपये उद्योगपतीच्या थाटात उचलावेत. आता तेवढेच रुपये राज्य सरकारही देतंय आहे, तेही घ्यावेत. स्वतःला अ‘नाथ’ समजू नये.

शेती जमली नाही, तर शेतमजूर व्हावं. मनात कुठल्याही कारणामुळे निराशा आली किंवा शिक्षण असूनही लायकीप्रमाणे नोकरी मिळत नसल्याने वैफल्याची भावना निर्माण झाली, तर ‘नमो सरकार’च्या ‘डिबीटी’चा वेग किती वाढलाय, याचा विचार करावा. माणसाकडे नेहमी स्वार्थपरायणता हवी, केवळ आपल्या पोटापुरता विचार करणं, ही धोकादायक विचारसरणी आहे. तिचा ताबडतोब त्याग करावा. त्यापेक्षा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात कसे पैसे पडताहेत, याचं स्मरण करावं. नतदृष्टासारखा विचार करू नये, या ‘नव्या भारता’त काय-काय चांगलं घडतंय, याच्या ‘व्हॉटसअ‍ॅप विद्यापीठा’तल्या बातम्या वाचाव्यात. देशात नव्या विमानतळांची संख्या किती वाढलीय, आकाशातून किती विमानं उडताहेत हे पहावं, उगाच एखाद्या महिन्यात पोटाला चिमटा घेऊन, पैसे साठवून सहकुटुंब चांगल्या हॉटेलात जेवायला जाऊन बिलावर पडलेल्या ‘जीएसटी’चा विचार करू नये.

बुद्धिजीवींनी महागाई वाढलीय म्हणून चिंता करत बसू नये. ‘माय-बाप सरकार’ तीन रुपये किलो तांदूळ, पाच रुपये किलो गहू देतंय अन् तुम्ही मूर्खासारखे रोजगार काय मागत बसलाय! तुमच्यातील काही जण म्हणतील, पंजाबात वीज फुकट मिळतेय, तिथलं सरकार आणखी काय-काय फुकट देतंय. तुम्हालाही हे सगळं मिळेल. अन्नधान्य, वीज, आनंदाचा शिधा, मोफत एसटी, रेल्वे प्रवास सगळं-सगळं मिळेल, तुम्ही फक्त शिक्षण, नोकरी, रोजगार मागायचा नाही.

मुळात कुठलंच सरकार रोजगार, शिक्षण यांसारख्या ‘किरकोळ’ गोष्टी देण्यात वेळ वाया घालवू इच्छित नाही. त्यामुळे सरकारकडे काही मागायचंच असेल, तर अनुदान मागा, कर्जमाफी मागा. ती तुम्हांस हमखास मिळेल. कारण हे सरकारच मुळी ‘कल्याणकारी राज्य’ ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी सत्तेत आलेलं आहे, असेल, असणार आहे…

तुम्हाला गरिबीतून वर काढायचा सरकारचा निश्चय किती पक्का आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही का? पंचवीस कोटी लोकांना आधीच गरिबीतून बाहेर काढलंय सरकारने!

सरकारच्या मते ‘नव्या भारता’त गरीब, महिला, मागासवर्गीय याच प्रमुख जाती उरल्या आहेत. तुम्हाला यापैकी कुठल्याही एका जातीत समाविष्ट होऊन स्वतःचं ‘कल्याण’ करून घेता येणं सहजशक्य आहे. तुम्ही केवळ सरकारच्या ‘डिलिव्हरिंग स्टेट’ या प्रतिमेची काळजी घ्या. उगाच या प्रमुख जातींत विभागल्या गेलेल्या मतदारांच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या आयुष्याची किती माती होतेय, त्यांना त्यांचा उत्पादनखर्चही मिळत नाही, असा विचार करत बसू नका. अहो, शेतकरी मातीतच काम करतो, त्याला पुन्हा मातीत ढकलल्यानं असा काय फरक पडणार आहे?

या पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढताना सरकारला किती यातना झाल्या असतील, याचा विचार कधी केलाय का तुम्ही? नवी रुग्णालयं, नव्या रेल्वे गाड्या, या गाड्या बनवण्याचे नवे कारखाने, काय घडत नाहीये देशात? इंजिनियर, पी.एचडी.धारक पोलीस, लष्कर भरतीसाठी रांगा लावताहेत अन् तुम्ही नोकऱ्या नाहीत म्हणून ओरडता आहात. तुमच्या जिभेला हाड कसं नाही!

नजर टाकाल त्या जगाच्या काना-कोपऱ्यातले लोक भारताकडे मान उंचावून, टक लावून, लवून आणि जमेल त्या पद्धतीनं बघताहेत. केवढी मोठी ‘आर्थिक महासत्ता’ झाला आहे हा देश, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले असतात. ते दिसत असूनही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता आहात.

जगभरात भारताच्या विजयाचे, विकासाचे नगारे वाजवले जाताहेत अन् तुम्ही आपले कर्मदरिद्र्यासारखे आर्थिक अंदाजपत्रकात शिक्षणासाठीची तरतूद वाढवा म्हणून कोकलताय! काय पडलंय आधुनिक शिक्षणात! आपल्या गौरवशाली इतिहासात डोकवा, पोथ्या-पुराणं पाहा, म्हणजे तुम्हाला शेकडो आईन्स्टाईन, एडिसन सापडतील.

या ‘नव्या भारता’त सरकार सर्वस्तरीय आप-परभाव कायमचा मिटवायचा प्रयत्न करतेय, त्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांतले ‘आदर्श’, ‘व्यवहार’कुशल, ‘पाणी’दार नेते आपल्यात सामावून घेऊन ‘एक भारत, समर्थ भारत’ची उभारणी करतंय. तुम्ही मात्र इतर पक्षांतल्या डागाळलेल्या नेत्यांना सोबत का घेतलं, म्हणून नाराज होताय? किती संकुचित दृष्टी आहे तुमची!

अहो, आहात कुठं? सरकार आता ‘भ्रष्टाचारमुक्त’ व्यवस्था उभी करतंय. बँका बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्यांना कोणीच वाचवू शकणार नाही, असे सज्जड कायदे केलेत या काही वर्षांत सरकारने. नव्या उड्डाणपुलावरून पळून जाताना, छोट्या नव्या विमानतळावरून ‘प्रायव्हेट’ विमानानं जातानाही आपल्या तपास यंत्रणा अशा करबुडव्यांना गजाआड घालू शकणार आहेत. त्यामुळे तुम्ही घराचा, गाडीचा एखादा हप्ता चुकला म्हणून बँकवाले तगादा लावतात, फायनान्सवाले गाडी ओढून नेतात, अशा शुल्लक तक्रारी करून या देखाव्यास अपशकून करू नका!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘नवा भारत’ आता चंद्रावर माणूस पाठवणार आहे. तुम्ही सर्वसामान्य माणसाचं ‘पर कॅपिटा’ इन्कम किती वाढलंय, जीवनशैली किती उंचवलीय, असले पारंपरिक अर्थशास्त्रीय प्रश्न उपस्थित करत आहात, काय म्हणावं तुम्हाला! तुम्हाला ‘नव्या भारता’च्या नव्या ‘डिजिटल इकॉनॉमी’ची जगभर सुरू असलेली चर्चा कशी काय ऐकू येत नाही. कमाल आहे राव तुमची!

गेल्या दहा वर्षांत सगळं काही एवढ्या झपाट्यानं बदललंय की, विरोधकांनाही पाय फुटलेत अन् ते यात्रा काढत सुटलेत. अध्यात्मात देवदर्शनाचं किती महत्त्व असतं‘ सरकार जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करत सुटलंय. त्यात कुठली कसर राहता कामा नये म्हणून काँग्रेसचे युवराज काश्मीर ते कन्याकुमारी अन् देशाच्या कुठल्याही कोणापासून विरुद्ध दिशेनं यात्रा काढत, दिसेल त्या देवस्थानांना भेटी देत देणग्या सुटलेत. त्यांनाही पटलंय आता, स्वतःच्या विकासाचा मार्ग हिंदुत्वाच्या ‘अमृत’काळातूनच जातोय...

‘सबका साथ सबका विकास’ म्हणत मोदीजी सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना भाजपमध्ये घेताहेत, कधीतरी ते आपल्याला त्यांच्या पक्षात घेऊन एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बनवतील, असं मागणंही युवराज ‘रामलल्ला’ चरणी घालणार असल्याची चर्चा आहे म्हणे!

त्यामुळे ‘महाशक्ती’, ‘महासत्ता’ असलेल्या ‘नव्या भारता’च्या सुजाण नागरिकांनो, यांना मतदान करण्याशिवाय तुमच्यासमोर तरणोपाय नाही. हेच तुमचे ‘उद्धारकर्ते’ आहेत!     

..................................................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......