अजूनकाही
पत्रकार रवि आमले यांचं ‘प्रोपगंडा : प्रचार | जाहिरात | अपमाहिती | आणि बरेच काही...’ हे पुस्तक आपल्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम करतं. आपण अनावश्यक आणि असत्य माहितीच्या विळख्यात गुरफटलो आहोत. त्यातून जे पद्धतशीरपणे आपल्यापर्यंत पोचवलं जातं, त्यालाच आपण कळत-नकळत ‘सत्य’ मानायला लागतो, याचा हे पुस्तक पर्दाफाश करतं. अनेक उदाहरणांच्या माध्यमातून लेखकाने ‘प्रोपगंडा’ कसा राबवला जातो, हे साधार पुराव्यानिशी सांगितले आहे.
प्रचार, जाहिरात, अपमाहिती आणि बरेच काही उलगडून दाखवणारा हा विषय मराठी वाचकांसाठी तसा नवा आहे. त्यामुळे कुतूहल जागृत होतं आणि पुस्तक वाचून होईपर्यंत ते कायम राहतं. या पुस्तकात एकूण चाळीस लेख आहेत. या पुस्तकात युद्धकाळात ‘प्रोपगंडा’ कसा राबवला गेला, याबद्दल ऊहापोह आहे, हिटलरच्या तंत्राची काही उदाहरणं आहेत आणि भारतीय राजकारणात हे तंत्र कसं राबवलं गेलं, जातंय, याबद्दलची माहिती आहे.
लेखकाने ‘प्रोपगंडा’ किती पूर्वीपासून चालत आला आहे, यासाठी ‘धर्मा’चा दाखला दिला आहे. ख्रिस्ती धर्मानं प्रचारास संस्थात्मक स्वरूप दिलं, असं म्हटलं आहे. “जनसंज्ञापन आणि प्रचारविश्वातील तज्ज्ञ डॉ. ब्रायन ॲन्सी पॅट्रिक यांच्या मते, अशिक्षित अडाण्यांपेक्षा सुशिक्षित ‘शहाणे’ हेच अधिक प्रमाणात ‘प्रोपगंडा’ला बळी पडतात. याचं कारण आहे- शिक्षण”, असं मत लेखकानं नोंदवलं आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो, त्या धांदान्त खोट्या आहेत, हे नंतर लक्षात येतं. त्यासाठी लेखक काही उदाहरणं देतो. पहिल्या महायुद्धाचं कारण ऑस्ट्रिया-हंगेरीचा राजपुत्र आर्चड्यूक फर्डिनांड आणि त्याची पत्नी यांचा खून करण्यात आला, एवढंच सांगण्यात येतं, पण तो मारेकरी सर्बियन होता, मग काय या घटनेसंबंधी अपसमज पसरवण्यात आले आणि सामान्य सर्बियनदेखील ऑस्ट्रिया-हंगेरीचा शत्रू बनवण्यात आला. आणि त्यांचं शिरकाण सुरू झालं. पण सर्बिया या हल्ल्यामागे असल्याचे पुरावे कधीही सापडले नाहीत, हे मात्र सांगितलं जात नाही.
दुसरं उदाहरण म्हणजे, ९/११च्या हल्ल्यासाठी अमेरिकेने सद्दाम हुसेनला जबाबदार ठरवलं. त्यासाठी विनाकारण ओसामा बिन लादेन आणि सद्दामचा संबंध जोडला. जगाच्या दृष्टीनं अमेरिका म्हणते तेच बरोबर, असा लोकांचा समज बनत गेला. कारण अमेरिकेने केलेला परिणामकारक ‘प्रोपगंडा’. सद्दाम विरुद्ध जंग जंग पछाडूनही अमेरिकेला पुरावे सापडले नाहीत.
पण अशा घटनांचा सामान्य माणूस फारसा विचार करत नाही. त्याचा ‘राजकीय’ फायदा मोजके लोक घेतात. हे पुस्तक नेमकं अशा प्रचलित घटनांमागील विवाद्य मुद्द्यांवर बोट ठेवण्याचं काम करतं. त्यामागील ‘प्रोपगंडा’ उलगडून दाखवतं.
लेखक एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करतो- “युद्ध हे केवळ सैन्याच्या आधारे लढता येत नाही. ते लढण्यासाठी देशातील नागरिकांचीही तयारी असावी लागते, आणि ती तयारी तेव्हाच असते, जेव्हा त्यांची युद्धास मान्यता असते.” सामान्यांना आपलं सरकार कसं बरोबर आहे, हे पटवून देण्यासाठी युद्धकाळात त्यांच्या भावनांना हात घालावा लागतो; त्यांना देशकार्यासाठी, स्वतःला झोकून देण्यासाठी, सर्वस्व अर्पण करण्यासाठी प्रेरित करावं लागतं. हे काम हिटलरने फार खुबीनं केलं.. इतकं की, त्याने केलेलं ज्यूंचं नृशंस हत्याकांडदेखील जर्मन लोकांना पटलं. कारण हिटलरने ज्यूंचं पद्धतशीरपणे ‘डेमनायझेशन’ (राक्षसीकरण) केलं होतं.
अमेरिकनांनी पण जर्मनांना या काळात हूणांसारखे आक्रमक श्वापदासारखं दाखवलं. पण सर्वांत आधी जर्मनांना राक्षसासारखं दाखवण्याला सुरुवात केली ती ब्रिटिशांनी. त्यांनी ‘वॉर प्रोपगंडा ब्युरो’ची स्थापना केली. त्यात नामी लोकांना सहभागी करून घेतलं, तेही हे राष्ट्रकार्य समजून त्यात सामील झाले. उदा. आर्थर कॉनन डायल, एच. जी. वेल्स, रुडयार्ड कपलिंग, थॉमस हार्डी, विल्यम आर्चर इ.
अशी सामान्यतः अज्ञात माहिती या पुस्तकात मिळते. अमेरिकेत ‘क्रील समिती’ हेच काम करत होती. तिचं म्हणणं होतं, “श्रोत्यांमधील अतिसामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला उद्देशून बोला. त्याच्यावरच्या सगळ्यांना आपोआपच तुमचे म्हणणे समजेल.” हे वाचलं म्हणजे, मोठ्या राजकीय नेत्यांची भाषणंही सामान्यांच्या भाषेत का असतात, ते कळतं.
.................................................................................................................................................................
प्रोपगंडाचा आजवरचा इतिहास लिहिताना नजरेसमोर नेहमीच चालू वर्तमानकाळ होता. या काळातील घटना-घडामोडी समजून घेण्याच्या कामी, आपल्या मनावर विविध दृश्य-अदृश्य शक्ती टाकत असलेले प्रभाव ओळखण्याच्या कामी हे पुस्तक आले, तर त्यापरता दुसरा आनंद नसेल. वाचकांकडून मिळालेली तीच सर्वांत मोठी दाद असेल.
.................................................................................................................................................................
‘पिवळा प्रचार’ या लेखात एडवर्ड बर्नेज यांच्या ‘अदृश्य सरकार’ या संकल्पनेची ओळख करून दिली आहे. नॉम चॉम्स्की यांनी ‘मीडिया कंट्रोल’ या पुस्तकात लोकशाही व्यवस्थेवर भाष्य करताना म्हटले आहे, ‘लोकांचे लोकांसाठी’ वगैरे हा जो लोकशाहीचा अर्थ आहे, तो शब्दकोशात दिसेल. पण ‘लोकांनी आपले आयुष्य कसे जगावे हे ठरवण्याच्या अधिकारावर बंदी घातली पाहिजे. माहितीची साधने कठोरपणे नियंत्रित केली पाहिजेत. ती अत्यंत संकुचित ठेवली पाहिजेत, अशी लोकशाहीची एक पर्यायी संकल्पना आहे.’
‘प्रोपगंडा’कार राजकारण्यांच्या प्रतिमासंवर्धनाचे कार्यक्रम करतात, ते ‘प्रायोजित’ केलेले असतात. लेनिनने स्वतःचे प्रतिमासंवर्धन करताना ‘साम्यवाद = सोव्हिएत शक्ती + संपूर्ण राष्ट्राचे विद्युतीकरण’ अशी सांगड घातली. लेनिन म्हणजे ‘इलियेच लॅम्प’ असे समीकरण लोकांच्या मनावर ठसवले गेले. आपल्याकडे ‘अण्णा टोपी’ घातली की, माणूस ‘भ्रष्टाचारविरोधी’ अशी प्रतिमा तयार करण्यात आली.
‘बनाना रिपब्लिक’ या शब्दाच्या मागे ग्वाटेमालामध्ये काम करणाऱ्या अमेरिकेच्या ‘युनायटेड फ्रुट कंपनी’कडून झालेला स्थानिकांच्या शोषणाचा किती मोठा इतिहास आहे, याची कथा ‘केळी, बंड आणि प्रोपगंडाभूल’ या लेखात सांगितली आहे. प्रोपगंडाकारांनी कसे अमेरिकन प्रेसिडेंट कुलेज यांच्या प्रतिमानिर्मितीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, ही कथादेखील रोचक आहे.
‘अत्यंत असत्य गोष्ट तुम्ही सतत संगत राहिलात की, हळूहळू लोकांना ती ‘खरी’ वाटू लागते’, ‘प्रजेला पाव मिळत नसेल, तर त्यांनी केक खावा’, हे फ्रान्सच्या सोळाव्या लुईची पत्नी मेरी अँतोनेतचे विधान आहे, असे सामान्यतः मानले जाते, पण ते तसे नसून तिच्या आधी शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या चौदाव्या लुईची पत्नी मेरी-थेरेसचे ते विधान आहे. पण हेच खोटे वाटायला लागते. हा ‘प्रोपगंडा’चा परिणाम असतो. म्हणून ‘हजारो संगिनी आणि चार विरोधी वृत्तपत्रे यांत कुणाचे भय बाळगायचे असेल, तर ते वृत्तपत्रांचे’, हे नेपोलियन बोनापार्टचे विधान महत्त्वाचे मानले पाहिजे.
‘हिटलर ही आपल्या देशाला मिळालेली दैवी देणगी आहे’, असे जेव्हा सामान्यांचे मत बनवले जाते, तेव्हा त्यामागे निश्चितपणे एखादा ‘प्रोपगंडा’ कार्यरत असतो. आणि सामान्य माणसाला आपण त्याच्या प्रभावाखाली आहोत, याची यत्किंचितही कल्पना येत नाही. उलट हे आपले अभ्यासाअंती झालेले मत आहे, असं तो मानत राहतो. त्यातच या ‘अदृश्य हातांची, प्रचारकी मस्तिष्कांची’ कमाल असते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
आजच्या राजकारणातदेखील ही अस्त्रं परजली जातात आणि ती सामान्यांना सहज भुरळ पाडताना दिसतात. आता तर काय, हाताशी असलेली दृक्श्राव्य व समाजमाध्यमं हे काम सहजरित्या करतात. ‘प्रोपगंडा’मध्ये प्रतिपक्षावर जोरदार हल्ला केला जातो, चुकूनही त्याच्याबद्दल कणव दाखवली जात नाही, कारण ती दाखवली तर अपप्रचार फसतो.
एकेक प्रसंग, उदाहरण या पुस्तकात व्यवस्थित उलगडून दाखवलं आहे. भारतीय राजकारणातल्या विविध पक्षांच्या घोषणा आणि त्यामागील प्रेरणा, यांचाही चांगला समाचार घेतला आहे. ते सगळे विवेचन रंजक आहे. उदा. ‘इंदिरा इज इंडिया’, ‘इंडिया शायनिंग’, ‘आम आदमी को क्या मिला?’, ‘गुजरात मॉडेल’, ‘चाय पे चर्चा’ इ.
लेखक लिहितो, “गोबेल्सचे एक विधान आहे, की – ‘आपल्या पहाडांवरील प्रवचनांत येशूने कुठेही पुरावे दिलेले नाहीत. त्यात त्याने फक्त दावे केले आहेत. स्वयंसिद्ध सत्ये पुराव्याने शाबीत करण्याची आवश्यकता नसते.’ यातील ‘स्वयंसिद्ध सत्य’ हा महत्त्वाचा शब्द. ही सत्ये कोणती? तर आपण म्हणू ती.”
थोडक्यात, राजकारणाबद्दल तावातावानं बोलणाऱ्या भावनाशील ‘भारतीय जनमानसा’ला भानावर आणणारं हे पुस्तक आहे. सध्या आपल्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत, म्हणून अधिक विलंब न करता हे पुस्तक वाचायला हवं...
‘प्रोपगंडा : प्रचार | जाहिरात | अपमाहिती | आणि बरेच काही...’ - रवि आमले
मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने – ३८० | मूल्य – ४०० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5194/Propaganda
..................................................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment