न गुदमरणारे, न गुरगुरणारे, ना कधी ‘गुस्सा’ करणारे ग़ुलज़ार आणि युद्धकाळात कादंबरी कशी लिहू म्हणणारा युक्रेनी कुर्काव्ह…
पडघम - साहित्यिक
जयदेव डोळे
  • भारतीय लेखक ग़ुलज़ार आणि युक्रेनियन लेखक आंद्रे कुर्काव्ह
  • Thu , 07 March 2024
  • पडघम साहित्यिक ग़ुलज़ार Gulzar ज्ञानपीठ पुरस्कार Jnapith award आंद्रे कुर्काव्ह Andrey Kurkov अनुराधा पाटील Anuradha Patil

कविता लिहिणारी माणसं वर्तमानपत्र वाचतात की नाही, माहीत नाही. कवींच्या घरी जाऊन पाहायला हवं. टीव्हीवरच्या बातम्या तरी बघतात का, सांगता येत नाही. बघतही असतील. आपल्याला त्यांच्या या वर्तमानाचा वेध वगैरे घेणाऱ्या अवस्थेबद्दल अगदी कळायलाच हवं असं काही नाही. त्यांच्या कविता वाचल्यावर आपण जाणूच की, गडी वर्तमानपत्र वाचतो बरे का!, टीव्हीसुद्धा बघतो. कारण त्याच्या कवितांमध्ये आजकालच्या राजकारणावर काही भाष्य अन् हळूहळू एकरंगी होत गेलेल्या वर्तमानपत्र-टीव्हीबाबत काही मत प्रकट झालेलं आहे.

कवयित्री तशा वर्तमानकालीन राजकारणावर कमी लिहितात, असं दिसतं. अनुराधा पाटील सोडल्या, तर बाकीच्या कोण अन् किती हे सांगता येणार नाही, एवढी संख्या अल्प आहे. या आमच्या कवयित्रीबाई कशा ‘गुस्सा’ झाल्या आहेत बघा –

‘राम मंदिराची वर्गणी

नाकारली म्हणून

समोरच्या डोळ्यांत

आणि खिडकीच्या

फुटलेल्या काचा गोळा करताना

केविलवाणी झाली

स्वातंत्र्याची व्याख्या’ (मूकनाट्य)

पुढे आणखी खूप ओळी आहेत एका अस्वस्थ कविमनातून सळसळत बाहेर पडणाऱ्या.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

तशा ग़ुलज़ार यांच्या आहेत का, असा प्रश्न आहे. ग़ुलज़ार यांना कोण्या एका धार्मिक अन् ‘धर्मोपजीवी’ माणसासह ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळाल्याचं वृत्त तसं जुनं झालं, पण त्या कारणानं जे जे ग़ुलज़ारसारखे आहेत, ते आवर्जून ग़ुलज़ारांची निर्जंतुक, निरामय अन् निर्मळ प्रशंसा करू लागले आहेत. ही भक्तमंडळीही वर्तमानपत्र वाचत नाहीत, टीव्ही बघत नाहीत बरं का!

आता आम्ही कवी-कवयित्री मंडळींस वर्तमानपत्र वाचता का, टीव्ही बघता का, असं निष्कारण विचारत नाही. ते आम्ही विचारण्याचं कारण ‘ज्ञानपीठा’त दडलं आहे. हा जो पुरस्कार अथवा पारितोषिक आहे, त्याची मालकी ‘टाइम्स ऑफ इंडिया’कडे आहे. इंग्रज आपल्या देशावर राज्य करत, तेव्हापासून ते आहे. ते अर्थातच इंग्रजी भाषेत आहे आणि जन्मापासून आजपावेतो सरकारची ‘री’ ओढणं हेच त्याचं ध्येय राहिलं आहे. त्यामुळे अनेकांचा ‘ज्ञानपीठ’ सरकारी असल्याचा गैरसमज होतो की काय, कळत नाही.

‘ज्ञानपीठ’ म्हणजे साहित्यातला सर्वोच्च सन्मान असाही एक अपसमज आहे. तो ‘टाइम्स’च्या पत्रकारांनी अन् ‘टाइम्स’मुळे उभ्या राहिलेल्यांनी निर्माण केलेला आहे. कधी काळी टाइम्ससमूहात चांगली नियतकालिकं आणि चांगले साहित्यिक-संपादक नोकऱ्या करत असत. त्यांचा दबदबा म्हणा किंवा त्यांची आवडनिवड, त्यामुळे ज्ञानपीठ म्हणजे उत्कृष्टतेचं प्रतीक बनून गेलं. तसाही उत्कृष्टता अन् पुरस्कार यांचा संबंध नसतोच.

ग़ुलज़ार यांना ‘टाइम्स’ कुटुंबातलेच ‘फिल्मफेअर’ नावाचं मासिक बंद पडल्यावरही पारितोषिकांच्या निमित्तानं टिकून ठेवलेलं बक्षीस अनेकदा मिळालं आहे. म्हणजे तसे ग़ुलज़ार काय आणि अन्य साहित्यिक, गीतकार काय, यांना ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ठाऊक असणारच. तरीही स्वत:ला जागतिक घडामोडी, राजकारण, सामाजिक उलथापालथ, आर्थिक आपत्ती यांपासून लांब ठेवणारे साहित्यसर्जक ढिगानं आहेत.

त्यांचे शिरोमणी ग़ुलज़ार आहेत. त्यांनी गेल्या १० वर्षांत वर्तमानपत्र वाचलेलं नाही, टीव्ही पाहिलेला नाही किंवा इंटरनेट उघडून त्यात ते डोकावलेले नाहीत. कारण त्यांनी ना काही राजकीय भाष्य केलं, ना वर्तमानाबद्दल अस्वस्थता प्रकट केली, ना हिंदूराष्ट्रनिर्मिती, संविधानावर अतिक्रमण आणि पक्षफोडी आदी घटनांवर काही काव्यमय प्रतिक्रिया नोंदवल्या.

ग़ुलज़ारांचे एक चाहते व जुने परिचित पत्रकार ओम थानवी यांनी अशी तक्रार ‘वायर’मध्ये लेख लिहून केली आहे. आजकाल पत्रकार म्हटलं की, विश्वासार्हतेची लागलीच लुडबुड सुरू होते. पण हे थानवी उडाणटप्पू अथवा उल्लू मुळीच नाहीत. शिल्लक राहिलेल्या स्पष्टवक्त्या पत्रकारांपैकी ते एक आहेत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे आम्हालाही वाटू लागलं की, ग़ुलज़ार उत्तम कवी आहेत, मात्र ते व्यवस्थेवर गुरगुरत नाहीत की, तिच्यावर ‘गुस्सा’ करत नाहीत!

त्यामुळे युक्रेनचे एक साहित्यिक आंद्रे कुर्काव्ह यांनी ‘गार्डियन’ या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत जी मतं मांडली, ती वाचून आम्ही थरारून गेलो. ते राहतात त्या किव्ह शहरात बॉम्ब पडू लागले आणि त्यांना बचावासाठी घर सोडावं लागलं. त्यांचं एका कादंबरीचं लेखन ७० पानांपपर्यंत झालं होतं. ते त्यांनी अर्धंच सोडलं, असून युद्धभूमी, वंशविच्छेद, पुतीन यांचा सूड आणि हुकूमशाहीचा उच्छाद आदी विषयांवर लेख, वार्तापत्रं, मुलाखती आदी लेखन आरंभलं आहे. भवताल पाहता कादंबरी लिखाणातला आनंद उपभोगणं हा अपराध असल्यासारखं त्यांना वाटू लागलं. कल्पनाविश्वाहून सध्याचं वास्तव अधिक महत्त्वाचं आहे, असं ते म्हणतात.

कुर्काव्ह जगाला माहीत झाले, ते त्यांच्या ‘डेथ अँड द पेंग्विन’ या १९९६च्या कादंबरीमुळे. त्यांचं लेखन उपहास, उपरोध, सामाजिक भाष्यं, राजकारण यांनी लक्ष्यवेधक बनतं. गंमत म्हणजे कुर्काव्ह रशियन भाषेत लिहितात. त्यांची पुस्तकं युक्रेनियन भाषेत अनुवादित होतात. सध्या युक्रेनचे नागरिक काल्पनिक साहित्य कमी वाचत असल्याची जाणीव त्यांना आहे.

ग़ुलज़ार म्हणतील, ‘ ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ लिहिणारे तुकाराम माहीत आहेत, मात्र तुकारामांसारखं भांडण किंवा वाद करणं आम्हाला मंजूर नाही. प्रसंग वर्णिल्यानंतर आम्ही प्रासंगिक गीतं लिहितो. आम्हाला सध्या कोणताच दिग्दर्शक प्रस्थापित सत्ताधाऱ्यांविरुद्ध टीका करणारं काव्य लिहायला सांगत नाही. मग आम्ही ते कसं लिहिणार?’ बहुधा ग़ुलज़ारांमधला दिग्दर्शक मागे पडला असावा. तो गायब आहे.

खरंय ग़ुलज़ारसाहेब, पण भवतालचं राजकारण आणि त्याची अमलबजावणी करणारे कसं सांगतील आमच्यावर कविता लिहा म्हणून? मुळात सत्ताधाऱ्यांना त्यांचं कौतुक, गौरव, स्तुती करणारं लेखन आवडत असतं, हे बहुतांश साहित्यिकांना माहीत असतं. त्यामुळे एक तर ते करू लागायचं किंवा भलतेच विषय हाताळून विद्यमान व्यवस्थेवर कसलंही भाष्य करणं टाळायचं, अशी युक्ती तरी करू लागायची. म्हणजे सारं कसं सुरक्षित आणि सुखरूप! त्या अनुराधाबाईंना कोणी सांगितलं होतं का असं लिहायला?-

‘महागाई नियंत्रणात आहे

सांगतंय सरकार पुन्हा पुन्हा

खरं म्हणजे

सर्वच गोष्टी नियंत्रणात आहेत

विरोधक सोडून’ (‘संसदेच्या आरशात’)

ही दीर्घ कविता पुढे देशद्रोह, शहरी नक्षली, टुकडे टुकडे गँग, महासत्ता, गरिबी, बेकारी, आदी अनेक प्रश्न मांडत जाते अन् कवयित्री एक नागरिक म्हणून किती जागरूक आहे, हे स्पष्ट करते.

ग़ुलज़ार यांचं अशा तऱ्हेचं जागृत, रोखठोक नागरिकत्व कोठे वाचनात आलेलं नाही. त्यांचे म्हणजे ग़ुलज़ार यांचे चाहते मराठी भाषकांत भरपूर आहेत. इतके की, ग़ुलज़ार हाच त्यांचा लेखनाचा व प्रसिद्धीचा विषय असतो. ‘ग़ुलज़ारोपजीवी’ असं त्यांना म्हटलं पाहिजे. खुद्द ग़ुलज़ारच विद्यमान प्रश्नांवर काही मांडत नाहीत म्हटल्यावर ही अनुयायी मंडळी तरी कशी पुढे येतील?

आमच्या मते ग़ुलज़ार यांनी मौज प्रकाशनाच्या विचारसरणीची जागा घेतली आहे. सारं काही उत्तम, पण जराही उपद्रवी नाही. नावीन्य, प्रयोगशीलता अगदी भरभरून, पण तिने विस्मय अन् वाहवा उत्पन्न केली, वादळं नाहीत. ना काही हादरवलं, ना काही उखडलं. सौंदर्य, शैली, भाव, पोत, कलामूल्य, कलाजाणिवा अशी शास्त्रीयता आणि तंत्रात्मकता भरपूर आणली. परंतु सभोवतालाबाबत ना उदबोधन केलं, ना काही उजागर केलं. तसं करण्याला प्रचारकी लेखन, पक्षनिष्ठा आणि अभिव्यक्तीत येणारे अडथळे ठरवण्यात आलं.

‘बांधीलकी’ मानणाऱ्यांना साचेबंद व चाकोरीबंद म्हणता म्हणता यांचाच साहित्यप्रवाह दोन आखीरेखीव काठांमधून सुखात, निवांत वाहू लागला. तटस्थ व अविचल राहण्याचा यांचा पवित्रा व्यवस्थेपुढच्या ‘शरणागतीचा जाहीरनामा’ ठरू लागला. शोषण, अन्याय, विषमता, भ्रष्टाचार, जातीयता हे कवितांचे विषय होण्याला वाङ्मयबाह्य परिस्थितीची घुसखोरी मानलं गेलं. भूमिका घेण्यानं ‘साहित्यमूल्य’ बाटतं, असं शुद्धत्व प्रत्येक कलाकृतीत आहे का नाही, ते तपासणं सुरू झालं. अशोक वाजपेयी अशाच शुद्धतेबद्दल काय म्हणतात ते पाहा –

‘क्षमा करो स्वच्छ लोकतन्त्र के निर्मल नागरिकों,

तुम्हारे स्वच्छता अभियान में तुम्हारे साथ नहीं हूँ

और अपनी आत्मा की असह्य अपवित्रता और गन्दगी में

उभ-चूभ हो रहा हूँ!

मुझे पता है कि मैं तुम्हारी गिनती में नहीं हूँ :

मच्छर मारने का धुआँ नगरपालिकाएँ बिना चुके

फैलाती रहती हैं!

क्षमा करो नागरिकों

कि नृशंसता, निरपराध को मारने की तुम्हारी अदभुत

वीरता में

मैं अपनी कायरता के कारण शामिल नहीं हूँ |’ (‘क्षमा करो’)

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

ग़ुलज़ार यांना सदैव पांढऱ्या शुभ्र कपड्यांत पाहणाऱ्यांना आपणा सर्वांभोवती पसरलेली ‘सांप्रदायिक’तेची अन् ‘उर्मट बहुसंख्याकवादा’ची घाण अजून ग़ुलज़ारांच्या कपड्यांना कशी लागली नाही, याचं आश्चर्य वाटायला हवं. निदान आपल्यावर काही डाग पडल्यावर तरी ग़ुलज़ार गुरकावले असते, ती घाण पसरवणाऱ्या लोकांवर! पण तसं झाल्याचं दिसत नाही. शुभ्रतेच्या नादात ग़ुलज़ार शुद्ध राहिलेले दिसतात.

आत्यंतिक व्यक्तिगतता हा सौंदर्यवादी कलाकारांचा दागिना असतो. तो मोठा सुंदर असतो. त्यांच्या प्रतिमा आणि प्रतीकं त्यामधूनच आकारास येतात, पण तो सर्व काळ आनंद देत नाही. आणि फक्त आनंदनिर्मिती हाच एकमेव वाङ्मयाचा हेतूही नसतो. त्वेष, खेद, चीड, पश्चात्ताप, रुखरुख, अपराधीपणा, इशारा, प्रतीकार हेही असतात. म्हणूनच हुकूमशहांना कवी, लेखक, पत्रकार आवडत नाहीत. काही भारतीय कवी-कादंबरीकार यांना मात्र हुकूमशहा आवडतात, असं वाटू लागलं आहे…!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Swapnil Hingmire

Thu , 07 March 2024

या लेखाबद्दल धन्यवाद... मेरे अपने आणि आंधी हे दोन्ही गुलज़ारांचे चित्रपट.. "मेरे अपने" या चित्रपटातले "हाल-चाल ठीक-ठाक है" हे गाणं https://www.youtube.com/watch?v=oZZMehyXpds तर "आंधी" चित्रपटातले "सलाम किजियें" हे गाणं https://www.youtube.com/watch?v=pn0szF61OUM अशी गाणी किंवा कविता गुलज़ारांना परत लिहावेसे का वाटलं नसावं


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......