‘मेंढूरपाक मुर्दाबाद, भावांनो!’, मुर्दाबाद, मुर्दाबाद, मेंढूरपाक मुर्दाबाद! मुर्दाबाद, मुर्दाबाद, मेंढूरपाक मुर्दाबाद!!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
मुकेश माचकर
  • ‘आत्मपॅम्फ्लेट’ या सिनेमाचं पोस्टर
  • Thu , 07 March 2024
  • कला-संस्कृती मराठी सिनेमा आत्मपॅम्फ्लेट Aatmapamphlet आशीष अविनाश बेंडे Ashish Avinash Bende परेश मोकाशी Paresh Mokashi

‘मेंढूरपाक मुर्दाबाद, भावांनो!’ सिनेमावर कुठे नियमित लिहीत असतो, तर ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या रसास्वादाला (परीक्षण म्हटलं की, उगाच आपण कोणी उच्च आणि हुच्च आहोत, असा दंभ निर्माण होतो!) हेच शीर्षक दिलं असतं… का, त्याचा काही भाग इथं उलगडेल, बाकीचा समजण्यासाठी थिएटरात जाऊन सिनेमा पाहायला लागेल.

पहिली गोष्ट म्हणजे ‘आत्मपॅम्फ्लेट’ हे नाव उत्तम आहे, समर्पक आहे आणि निव्वळ वैचित्र्यपूर्ण म्हणून ते दिलेलं नाही, या नावाची परेश मोकाशी स्टाइल गंमत करायला काहीच हरकत नाही; पण हे उच्चारायला अवघड आणि अर्थबोध न होणारं नाव दिलं नसतं, तर सिनेमा पाहिला असता, चालला असता वगैरे ‘मार्केटिंग ग्यान’ देणाऱ्या भिडूंना आपण ‘अय फँड्री’ असं हिणवणार नाही, पण त्यांना आपला ‘कयामत से कयामत तक’ कोपरापासून नमस्कार!

‘आत्मपॅम्फ्लेट’ हा एक चक्रम सिनेमा आहे. हा चक्रमपणा परेश मोकाशी यांच्या सिनेमांच्या, नाटकांच्या प्रेक्षकांच्या परिचयाचा आहे. चक्रमपणात भाषिक आणि काही बाबतीत दृश्यात्मक मांडणी ‘ग्रँड बुडापेस्ट हॉटेल’, ‘फ्रेंच डिस्पॅच’ अशा सिनेमांचा आणि अलीकडेच नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’ या लघुपटाचा दिग्दर्शक वेस अँडरसन यांच्या शैलीची आठवण करून देते. ‘योगायोगानं हे दोघंही आज ५४ वर्षांचे आहेत आणि या मजकुराचा लेखकही त्याच वयाचा आहे, हा उदाहरणार्थ एक विलक्षण योगायोग आहे.’, हे वाक्य सिनेमा पाहिलेल्यांच्या डोक्यात ‘आत्मपॅम्फ्लेट’चा निवेदक परेश मोकाशी याच्याच आवाजात ऐकायला आलं असेल…

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

अँडरसनच्या ‘…हेन्री शुगर’मध्ये कथाभाग सुरू असतानाच कथानायक आणि इतर व्यक्तिरेखा अगदी गद्य भाषेत निवेदनही करतात आणि लगेच कथेतल्या प्रसंगांतही सहभागी होतात. ‘आत्मपॅम्फ्लेट’मध्ये निवेदन आणि कथानकाची सांगड आहे, पूर्वार्धात तर सर्व वेळ पार्श्वभूमीला घडणाऱ्या प्रसंगांवर सतत निवेदनच आहे. ते निव्वळ गद्य नाही. जुन्या काळातल्या थिएटरांमध्ये सिनेमा सुरू व्हायच्या आधी फिल्म्स डिव्हिजनची समाचारचित्रं म्हणजे न्यूज डॉक्युमेंटरी दाखवली जायची. त्यांना मराठीत भाई भगत यांच्या आवाजात एका विशिष्ट शैलीतलं निवेदन असायचं. त्याच शैलीतलं हे निवेदन आहे.

त्यामुळे दोन गोष्टी घडतात - हा आशयाची यथातथ्य, लिनियर मांडणी करणारा सिनेमा नाही, तर जत्रेतल्या आरशात दिसतं, तसं विरूप वास्तव दाखवणारा सिनेमा आहे, हे कळून जातं (इथं ही ट्रीटमेंट समजून घेतली, तर ‘आशयाची यथातथ्य मांडणी केली असती तर’ उद्भवले असते, ते आशयासंदर्भातले प्रश्न बाद होतात) आणि हा सिनेमा एका विशिष्ट काळातला आहे, हेही ही शैली अधोरेखित करून जाते. निवेदक हा कथानायक आहे, तरीही तो समोरच्या नाट्यात थेट न गुंतता, भावविभोर न होता, तटस्थपणे निवेदन करतो, आपल्यालाही सिनेमाकडे पाहण्याची तिरकस नजर देऊन जातो.

इथवर आलेल्या वाचकाला प्रश्न पडला असेल की, सिनेमा आशीष बेंडे या दिग्दर्शकाचा आहे, कथाही त्याचीच आहे, तर मग त्याची चर्चा करताना परेश मोकाशी यांचा उल्लेख का केला आहे? कारण या सिनेमाचा स्क्रीन प्ले परेश मोकाशी यांचा आहे, निवेदन त्यांच्या आवाजात आहे आणि उपहास, विनोद, उपरोध, अॅब्सर्डिटी या सगळ्यांचं ‘मोकाशी कॉकटेल’ या सिनेमात काठोकाठ भरलेलं आहे.

सिनेमाच्या नायकाचं नाव आशीष बेंडेच आहे, म्हणजे हे कथाकार आणि दिग्दर्शकाचं ‘आत्मपॅम्फ्लेट’ आहेच… पण, ते ढोबळमानानं १९६५ ते १९८५ या काळात जन्मलेल्या आणि १९९०च्या दशकात कळत्या वयापासून ते तारुण्यापर्यंतच्या अवस्थेत असलेल्या बहुतेकांचं ‘आत्मपॅम्फ्लेट’ आहे (हा शब्द तुम्हाला इथं वारंवार वाचायला लागेल, अशी रचना सदरहू लेखकानं मुद्दामच केलेली आहे, म्हणजे तुम्हाला त्याची सवय होईल- प.मो. आवाजातली सूचना).

अनेकांनी ‘शाळा’ या मिलिंद बोकीलांच्या कादंबरीवरील सिनेमाची आणि त्या सिनेमाला आशीष बेंडे हे सहाय्यक दिग्दर्शक असल्याची आठवण काढून या सिनेमात ‘शाळा’ डोकावते, असा एक निष्कर्ष काढला आहे. तो फारच सरधोपट आहे. ‘आत्मपॅम्फ्लेट’ हे ‘शाळा’च्या फारच पुढचं प्रकरण आहे, कारण जिथं सिनेमा शाळकरी प्रेमाचं वळण घेत असतानाच धर्म आणि जातवास्तवाच्या केंद्रस्थानी असलेल्या मुद्द्यावर येतो. तिथून पुढे त्याचं बाह्य स्ट्रक्चर नवथर प्रेमकथेचंच असलं, तरी आतलं आशयद्रव्य बदलतं… सिनेमाच्या शेवटापर्यंत ते अशक्यप्राय कोटीतल्या अॅब्सर्डिटीकडे जाऊन सगळ्या जगाची रचना बदलण्याचं अतीव भाबडं स्वप्न पाहतं… पण त्यात वाईट काय? भाबडी माणसं चांगली असतात, त्यांच्या बळावरच तर जग चालतं!

हा सिनेमा पाहताना किती जणांना ‘सैराट’ची आठवण आली असेल, मला माहिती नाही. मला मात्र ती आली. तिथं नागराजने ‘चित्रहार टाइप गीतसंगीता’चा सापळा लावून मध्यंतरानंतर जातिभेदाच्या भयंकर वास्तवाचा दगड प्रेक्षकांच्या डोसक्यात घातला होता. ‘आत्मपॅम्फ्लेट’मध्ये निरागस शाळकरी प्रेमकथेच्या आवरणातून जणू ‘सैराट’चा व्यत्यास मांडला आहे. हे एकमेकांना समांतर सिनेमे आहेत. आजच्या आपल्या समाजात ‘ऑनर किलिंग’ (सैराट) हे जसं एक वास्तव आहे, त्याचबरोबर यशस्वी, कुटुंबसंमत, आनंदी आंतरजातीय विवाह (आत्मपॅम्फ्लेट) हेही एक वास्तव आहेच की! किंबहुना त्यांचं प्रमाण अधिक असेल… नागराजने जातीपातींत विभागलेला समाज दाखवताना आसूड ओढणारी शैली वापरली आहे, मोकाशी-बेंडे गुदगुल्या करून डोळ्यातून पाणी काढतात, एवढाच फरक.

मोकाशींच्या लेखनात लॉरेल हार्डी, चार्ली चॅप्लिन यांची आठवण करून देणाऱ्या निरागस व्यक्तिरेखा अधिक असतात, थेट खलनायकी कृत्यं करणारे खलपुरुष, रक्तपात, हाणामारी यांच्या भानगडीत ते पडत नाहीत. पण समाजातल्या हिंसेच्या वास्तवापासून ते दूर पळत नाहीत. फक्त हिंसा दाखवण्यासाठी शाळकरी मुलांमधल्या मारामारीचं ‘रूपक’ वापरतात.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

तुम्ही आशीष बेंडेची ‘(सिने) आत्मकथा’ वाचली, पाहिली आहे का? नसेल तर जरूर पहा… ‘आत्मपॅम्फ्लेट’ असं तिचं सार्थ आणि यथार्थ नाव आहे…

काहींना हा सिनेमा पाहून ‘लाल सिंग चड्डा’ची आठवण झाली, काहींना ‘शाळा’ची. खरं तर ‘लाल सिंग चड्डा’ऐवजी अलीकडेच आलेल्या झोया अख्तर यांच्या ‘द आर्चीज’ या सिनेमाची आठवण व्हायला हवी. कारण दोन्हींची जातकुळी जास्त साधर्म्य असलेली आहे. आणि ‘शाळा’ऐवजी नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ची आठवण व्हायला हवी. ‘सैराट’ ही आपल्या देशातल्या वर्चस्ववादी जातवास्तवाची भेदक शोकांतिका आहे, तर ‘आत्मपॅम्फ्लेट’ ही आपल्या वर्चस्ववादी जातवास्तवाची छेदक सुखात्मिका आहे.

.................................................................................................................................................................

या सिनेमाच्या सगळ्या शैलीशी थोडा फटकून असणारा तीव्र कडक स्वर फक्त ‘मेंढूरपाक’ या रेसिपीच्या वेळी लागतो, पण ती रेसिपी हाच तर या सिनेमाचा गाभा आहे. समाजात जन्मलेल्या लहान बाळावर धर्माचे आणि जातीचे संस्कार करून आपण सगळे मानव म्हणून एक आहोत, या जाणीवेपासून कसं दूर नेलं जातं, हे सांगणारी ही रेसिपी चरचरीत आणि झणझणीत जमलेली आहे…

नायकाच्या वयाशी देशातल्या महत्त्वाच्या घडामोडींची सांगड घालत हा सिनेमा जातो, तेव्हा तो वर उल्लेखलेल्या वयोगटातल्या प्रेक्षकांचं ‘आत्मपॅम्फ्लेट’ बनतो. त्यातला सगळ्यात प्रत्ययकारी भाग आहे वयाच्या एका टप्प्यात जात आणि धर्म यांची जाणीव होण्याचा. हा ‘नाइन्टीज किड्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिढीच्याच आयुष्यात घडू शकणारा प्रकार आहे. त्याआधीच्या पिढ्यांच्या धर्म-जातींच्या ओळखी शतकानुशतकांपासून मुरलेल्या होत्या.

१९९०नंतर धार्मिक ओळखी जागवून कट्टर करण्याचा उद्योग झाला. त्यावर जातीय ओळखी कट्टर करण्याचा उतारा शोधला गेला. त्यामुळे नाइन्टीजच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढ्यांना हे माहितीही नसेल की, एक पिढी अशी होती (किंवा काटेकोरपणे दोन पिढ्या) जिच्यात (किमान निमशहरी भागांतली) मुलं आधी मित्र बनली, घट्ट मित्र बनली, कुणाकुणाच्या प्रेमात पडली आणि नंतर त्यांना जातवास्तव समजलं… असंही काही असतं हे कळलं… 

काहींनी हे नव्वदच्या दशकातले संस्कार घट्ट धरून ठेवले… काहींनी पुन्हा त्या ‘मेंढूरपाक’ ओळखीच्या सुरक्षित छावणीचा आसरा घेतला… नंतरच्या पिढ्या तर घट्ट ‘मेंढूरपाका’तच जन्माला आलेल्या आहेत… त्यांना ‘मेंढूरपाक मुर्दाबाद’ म्हणण्याचं बळ मिळण्यासाठी हा सिनेमा पाहणं आवश्यक आहे. ‘भावांनो…’ ही हाक किती मोलाची आहे, तेही त्यातून कळून जाईल.

मोकाशी यांचं लेखन आणि बेंडे यांची सिनेमाची सगळी मांडणी, यांच्यात काहीही सुटं सुटं नाही, एकाच माणसानं दोन्ही गोष्टी केल्या असाव्यात, इतकं हे प्रकरण एकमेकांत मुरून गेलेलं आहे. मोकाशी यांच्या लेखनाचा बाज चित्रभाषेत उतरवताना हास्यनिर्मिती आणि हास्यास्पदता यांच्यात एक सूक्ष्म रेषा राहते फरकाची… ती तारेवरची कसरत अफाट सहजतेनं केलेली आहे बेंडे यांनी.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

आपलं ‘आत्मपॅम्फ्लेट’ असं पडद्यावर आणण्याचं भाग्य फार कमी लोकांना लाभतं आणि ते फार कमी लोकांना पेलतं. बेंडे यांना ते साधलं आहे. त्यांना छायालेखन, ध्वनिलेखन, पार्श्वसंगीत, संकलन या सगळ्याच तांत्रिक बाजूंची समसमा जोड मिळालेली आहे. एका मस्त लयीत सिनेमा सुरू होतो आणि शेवटपर्यंत तसाच चालत जातो. त्याचे सगळे लेयर उलगडत जात असताना लयताल बिघडत नाही.

तीन वयोगटांतले नायक-नायिका आणि त्यांचे मित्र यांचं कास्टिंग अफलातून आहे. या नव्या पिढीच्या कलावंतांनी दिग्दर्शकाचा बाज आणि मोकाशींची भाषा, त्यांचा टोन आणि त्यानुसार भावदर्शन फार परफेक्ट आत्मसात केलं आहे. एका वयोगटाकडून दुसऱ्याकडे जाताना अजिबात जर्क बसत नाही. सहकलाकारांची साथही उत्तम आहे.

थोडक्यात, हे एक उत्तम जमून आलेलं प्रकरण आहे, ‘हट के’ सिनेमे पाहण्याची आवड विकसित झालेल्या मराठी प्रेक्षकांनी आवर्जून थिएटरला जाऊन हा सिनेमा पाहायलाच हवा. अजून किती दिवस तो, गैरसोयीच्या वेळांना का होईना, दाखवला जाईल, याची शंकाच वाटते (मी दहिसरच्या आयनॉक्सला सिनेमा पाहिला, तिथं बाहेर पोस्टरही नाही सिनेमाचं आणि शो एकच, दुपारी अडीचचा).

नाइन्टीजच्या पिढीला आत्मप्रचितीचा आनंद मिळेल, आपण काय मिळवलं, काय हरवलं, याचा पुन:प्रत्यय येईल. आधीच्या आणि नंतरच्या पिढ्यांना आपल्या आयुष्यात ही एक विशिष्ट आत्मप्रचिती कधीच का आली नव्हती, हेही कळून जाईल.

ता. क. : आपल्याबरोबर जन्माला येऊन, आपल्याबरोबर लहानाचे मोठे होऊन आता ‘भक्तगणां’त जमा झालेल्या मित्रांना हा सिनेमा त्यांचं तिकीट काढून दाखवा… पडलाच फरक तर पडला… आपण प्रयत्नच केले नव्हते, असा बट्टा नको राहायला.

.................................................................................................................................................................

लेखक मुकेश माचकर सध्या ‘मार्मिक’ या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक आहेत. त्याशिवाय नावाजलेले चित्रपटसमीक्षक तर आहेतच.

mamanji@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख