अजूनकाही
ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांचा मुलगा डॉ. उत्कर्ष शिंदे आणि महागायक अभिजित कोसंबी यांचा लहान भाऊ डॉ. सत्यजित कोसंबी या दोघांशी बोलायची नुकतीच संधी मिळाली. उत्कर्ष वैद्यकीय डॉक्टरकीचं शिक्षण अमेरिकतून घेऊन आला आहे. आता पुण्यात आकुर्डीला दवाखाना चालवत आहे. सत्यजित मुंबईमध्ये साठे महाविद्यालयात इंग्रजी विभागाचे प्रमुख आहेत. इंग्रजी विषयात तरुण वयात डॉक्टरेट मिळवणारा एकमेव विद्यार्थी असा विक्रम शिवाजी विद्यापीठात सत्यजित यांच्या नावावर जमा आहे.
हे दोघेही डॉक्टर. एक वैद्यकीय, दुसरा साहित्याचा. दोघेही गायक. आंबेडकरी गीतं गातात. त्यांच्या गायकीला आधुनिक ताल आहे. ते संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन गाण्याच्या क्षेत्रात अव्वल ठरले आहेत. दोघेही उच्चविद्याविभूषित आहेत आणि आंबेडकरी चळवळीशी त्यांची उदंड बांधीलकी आहे. दोघंही स्वत:ला ‘भीमाची लेकरं’ म्हणवून घेतात.
शिंदे-कोसंबी ही दोन्ही कुटुंबं बाबासाहेबांच्या विचारांनी उजळून निघालेली, चळवळीसाठी स्वत:हून पुढे असणारी आहेत. शिंदे यांचं कुटुंब मुंबईतलं. कोसंबी कोल्हापूरचे. शिंदे यांनी अमेरिका, दुबई, युरोपमध्ये शो घेऊन भीमाची गाणी, विचार पोहचवलाय. सत्यजित ‘स्वरविहार’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रात भीमविचारांचं जागरण करतात.
या दोघांशी बोलताना कळत जातं की, ही बाबासाहेबंच्या स्वप्नातील मुलं आहेत. बाबासाहेबांना हेच तर हवं होतं.
शिंदे यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर झालेला संस्कार आणि त्यांचं करिअर याविषयी मनमोकळं केलं. ते म्हणाले, “स्वरसम्राट प्रल्हाद शिंदेंचा मी नातू. आजचा आघाडीचा गायक, संगीतकार आदर्श, माझा भाऊ. लहानपणी घरात मला बाबासाहेबांचे विचार उमगले. आजोबा, वडील यांनी आम्ही भावंडांनी शिकलं पाहिजे यावर खूप भर दिला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा बाबासाहेबांचा विचार आम्ही बाळकडू पितात तसा प्यायलो. त्या प्रेरणेतून मी महाराष्ट्रात बारावीला ओपन मेरिट लिस्टमध्ये राज्यात सातवा आलो. मला पुण्यात वैद्यकीय शाखेत डी.वाय.पाटील महाविद्यालयात प्रवेश मिळाला. औषधशास्त्रामध्ये मी औरंगबादला एम.डी.केलं. नंतर याच विषयात पदव्युत्तर शिक्षण इंग्लंड-अमेरिकेत घेतलं. तिथून शिकून आल्यावर पुण्यात आकुर्डीमध्ये ‘डॉ. शिंदे क्लिनिक’ सुरू केलं. माझ्या डॉक्टरकीच्या व्यवसायात मी आता स्थिरस्थावर झालो आहे. पण फक्त व्यावसायिक डॉक्टर म्हणून मी काम करत नाही, तर गरिबांसाठी आरोग्यसेवा देण्याचंही काम करतो. तसे उपक्रम राबवतो. बाबासाहेबांचा विचार इथं मला साथ देतो. फक्त आरोग्य क्षेत्रातच नाही तर इतरही क्षेत्रात मी काम करतो. लोकांनी आम्हाला प्रतिष्ठा, पैसा दिला, आता लोकांना देण्याची वेळ आली आहे.”
वैद्यकीय विषयात परदेशात शिकून येऊन डॉक्टरकी करणारे शिंदे सामाजिक कामाकडे कसे वळले असावेत? अमेरिकेतून परत आल्यावर त्यांनी पैसे कमावण्याची उदंड संधी होती, पण फक्त त्यामागे न पळता त्यांनी हळूहळू सामाजिक क्षेत्रात दखलपात्र काम उभं केलं आहे. हे कसं घडलं?
शिंदे म्हणतात, “माझे आजोबा प्रल्हाद शिंदे हे मोठे गायक होते हे आम्हास ठाऊक होतं, पण नंतर आम्हाला कळलं की, त्यांना सामाजिक कामातही रस होता. एवढे मोठे गायक असताना ते पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडे येथील अंध मुलांच्या शाळेत, वसतिगृहात जात. त्या मुलांना गाणं ऐकवत. त्यांचं मनोरंजन करत. त्याही पुढे जाऊन त्या मुलांना आर्थिक मदत करत. त्यांना ही प्रेरणा बाबासाहेबांकडून जशी मिळाली तशी त्यांच्या आईकडूनही मिळाली. माझी पणजी, रेल्वे डब्ब्यात गाणं म्हणायची. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले. एवढी गरिबी प्रल्हाद शिंदेंनी पाहिली होती. गाण्याची कला होती, पण दारिद्रयही होतं. त्या परिस्थितीतून होरपळून निघालेले प्रल्हाद शिंदे सामाजिक कामाकडे वळले नसते तरच नवल. त्यांचाच वारसा आम्ही पुढे नेत आहोत.”
शिंदे यांच्या सामाजिक कामाचं स्वरूप कसं आहे? त्याविषयी त्यांनी सांगितलं, “आजोबांच्या नावाच्या चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आम्ही सामाजिक काम करतो. गाण्यांच्या देश-विदेशातल्या शोमधून मिळणारा पैसा या कामावर खर्च करतो. ११ जानेवारीला माझा वाढदिवस असतो. त्या दिवशी मी अनाथ मुलं दत्तक घेतो. त्यांच्या शाळेच्या खर्च देतो. अपघातात जखमी झालेल्या, मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत करतो. इमारत बांधकामावर असणाऱ्या मजुरांचे अपघात होतात. त्यांच्या मुलांना शिकण्यासाठी मदत करतो. पुण्यात भोसरी, चिखली या परिसरात वाढदिवसाच्या दिवशी आम्ही एक हजार झाडं लावली. अनाथ मुलांसोबत दिवाळी, होळी साजरी करतो. ११ जानेवारी २०१७ला माझ्या ११ फॅनसह आम्ही देहदान केलं. ही चळवळ वाढवली पाहिजे. त्यामुळे अनेकांना दीवनदान मिळेल, असं मला वाटतं.”
शिंदे आरोग्य आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांत भरारी घेत आहेत. त्यांनी तिशीच्या आत ‘प्रियतमा’ आणि ‘पॉवर’ या दोन सिनेमांना संगीत, गीतं देऊन स्वत:चा ठसा उमटवला. शिवाय बाबासाहेबांच्या विचार-जीवनावरच्या गाण्यांना नवा ऱ्हिदम मिळवून दिला. महाविद्यालयात असताना त्यांनी ‘भीमराव एकच राजा’ हे भीमगीत लिहिलं, संगीतबद्ध केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या गीतानंतर त्यांनी ‘गौरव महाराष्ट्राचा’, ‘आवाज महाराष्ट्राचा’ ही शीर्षकगीतं टीव्ही शोसाठी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शीर्षक गीत शिंदे यांनीच केलं आहे. त्यानंतर ‘मी राष्ट्रवादी’ हे राष्ट्रवादी काँग्रेसचं गेल्या विधानसभा निवडणुकीतलं गाणंही त्यांचंच होतं. असं विविधांगी काम करून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
गीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गायक म्हणून या प्रवासाविषयी शिंदे भरभरून बोलतात. म्हणतात, “ ‘प्रियतमा’ आणि ‘पॉवर’ या चित्रपटांना गाणी, संगीत दिल्याने व्यावसायिक सिनेमांमध्ये आमचा प्रवेश झाला. ‘प्रेमाचा राडा’ हा अल्बम लोकांच्या पसंतीस उतरला.“घुंगराच्या तालामंदी’ हे गाणं खूप गाजलं. माझे आजोबा, वडील भीम गीतं गात होते. त्यापुढे जाऊन नव्या पिढीचा स्वर, ताल, नाद आम्ही भीमगीतांना दिला. ‘जो तो बघा झाला निळा’ हे भीमगीत तसं आहे. आदर्श आणि मी त्यात गायलो आहोत. त्यानंतर ‘तुला जयभीमवाला म्हणू कसा?’ हे गाणं हिट झालं. यूट्यूबवर पाच लाखांवर हिटस त्याला मिळाल्या. ‘भीमांच्या पोरांचा नाद करायचा नाय’ हे गाणंही गाजलं. बाबासाहेबांच्या १२५व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने ‘भीमराव एक नंबर’ हे गाणं हिट झालं. ‘भीमाची चलती’ या गाण्याला यूट्युबवर आठ लाख श्रोते-प्रेक्षक लाभले. बाबासाहेबांच्या जीवनावर आम्ही पोवाडाही गायला आहे. तोही लोकांच्या पसंतीस उतरला. ‘वाघ भीम माझा’ या गाण्याचं शूटिंग शिवनेरी किल्ल्यावर केलं. त्यासाठी खास परवानगी मिळवली. हेलिकॉप्टरमधून हेलिकॅमेरे वापरून आम्ही हे शूटिंग केलं. ते गाणं लोकांना डोक्यावर घेतलं. ‘विषय गंभीर आहे’ हे गीतही लोकांना गौरवलं आहे.”
शिंदे त्यांच्या कलावंत म्हणून केलेल्या कामाबद्दल, गाण्याबद्दल सांगत असताना आपण थक्क होऊन जातो. डॉक्टरकी करणाहा हा माणूस दुबई, अमेरिकेत हाऊसफुल शो करतो. नवी भीमगीतं लिहितो, नव्या ऱ्हिदमचं संगीत जन्माला घालतो…शिंदे घराण्याची चौथी पिढी आता गाते आहे. शोमधून लाखो रुपये कमावते आणि त्यातून जनता जर्नादनाची सेवा करतेय.
आंबेडकरी विचार मानणाऱ्या नव्या पिढीला शिंदे सांगतात, “बाबासाहेबांना नेता माना, इतर कुणाही मागे जाऊ नका. भीमाच्या विचाराच्या प्रकाशात चला. भविष्यकाळ आपलाच आहे. चळवळीतल्या फाटाफुटीनं विचलित होऊ नका. बुद्ध म्हणाले तसं ‘अत्त दीप भव’ या विचाराने जगा. आपण नक्की यश मिळवू शकतो.”
स्वत: यश मिळाल्याने शिंदे इतरांनाही ते मिळेल हे ठासून सांगतात.
आहे की नाही भीमाच्या मुलाची आगळीवेगळी सक्सेस स्टोपी? अशीच न्यारी सक्सेस स्टोरी सत्यजित कोसंबी यांच्या जीवनाची आहे. स्वत:च्या जडणघडणीविषयी कोसंबी सांगतात, “माझा जन्म कोल्हापूरचा. आई शैलजा शिक्षिका. वडील सामाजिक कार्यकर्ते. त्यांनी दलित पँथर, मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मास मूव्हमेंट अशा चळवळीत काम केलं. महाराष्ट्राचा महागायक अभिजित कोसंबी हे माझा भाऊ. कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी, कर्मभूमी, प्रयोगभूमी. माणगाव परिषदेत शाहू महाराजांनी बाबासाहेबांना शाबासकी दिली आणि त्यातून नंतर बाबासाहेबांचं नेतृत्व पुढे आलं. अशा कोल्हापूर शहरात आम्ही तिघा भावंडांवर फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार, चळवळीचे संस्कार झाले. आई शिक्षिका असली तरी घरात आर्थिक अडचण होती. मग मी छोटे गाण्याचे कार्यक्रम करून, निवेदन करून, एका स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये वृत्तनिवेदकाचं काम करून शिक्षणासाठी पैसे मिळवले. शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम.ए., पीएच.डी. झालो.”
कोसंबी यांचा पीएच.डी.चा विषय होता – ‘द इमेज ऑफ द थर्ड वर्ल्ड’. या विषयात तिसऱ्या जगातल्या सामाजिक, सांस्कृतिक क्रांत्यांचा अभ्यास त्यांनी केला. त्यातून त्यांची विचाराची बैठक पक्की झाली. सुरुवातीला प्राध्यापक म्हणून नोकरीसाठी संस्थाचालकांना द्यायला पैसे नसल्याने त्यांना नोकरी मिळेना. पण नंतर मुंबईतील साठे महाविद्यालयात केवळ गुणवत्तेच्या जोरावर त्यांना नोकरी मिळाली. आता ते स्थिरावले आहेत. इंग्रजीचे विभागप्रमुख म्हणून ते काम करतात. शोभा डे, अच्युत गोडबोले या मान्यवर लेखकांबरोबर काम करतात. प्राध्यापकी करता करता त्यांनी ‘स्वरविहार’ हा कार्यक्रम तयार केला. वैचारिक-मनोरंजनपर असा हा कार्यक्रम आहे. यात ते गाणी सादर करतात. निवेदनातून छ. शिवराय, म.फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार प्रेक्षक-श्रोत्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात.
या कार्यक्रमाची कल्पना कशी सुचली? ते सांगतात, “हा गाणी, गोष्टी, वैचारिक संवाद, थोरांची चरित्रं या माध्यमांतून मनोरंजन, प्रबोधन घडवणारा कार्यक्रम आहे. गाण्यांचा कार्यक्रम म्हणून ‘स्वर’ हा शब्द आवश्यक होता. गाण्याचं श्रवण करता करता ‘विहार’ करणं म्हणजे उत्तुंग भरारी घेणं. इथं ‘विहार’ या शब्दाचा अर्थ बौद्धविहार एवढा मर्यादित नाही. या शब्दाचा दुसरा अर्थ आहे- अवकाशात उत्तुंग भराऱ्या मारणं. या कार्यक्रमात विचारांची भरारी अभिप्रेत आहे. अभिजित, प्रसेनजित आणि मी असे आम्ही तिघं भावंडं यात काम करतो. मी सूत्रसंचालन, निवेदन करतो. अभिजित-प्रजेनजित गातात. इतरही कलाकारांची टीम आहे. संपूर्ण कार्यक्रमात श्रोत्यांना आम्ही नामांतर, धर्मांतर, आचारांतर, विचारांतर, स्थलांतर हा वैचारिक प्रवास उलगडून दाखवतो.”
कोसंबी यांच्या वडिलांचं मूळ नाव रघुनाथ. ते नाकारून त्यांनी राजवर्धन हे नाव घेतलं आणि आपली वैचारिक दिशा स्पष्ट केली. आपण सामान्य लोकांपेक्षा वेगळे नाही हे सांगताना महाराष्ट्र शासनाचा ‘दलित मित्र’ पुरस्कार नाकारला. असा भक्कम वैचारिक वारसा असणाऱ्या कोसंबी यांनी मराठीमध्ये वैचारिक निवेदकाचा पायंडा सुरू केला आहे. निवेदक म्हणजे सध्या टवाळीचा विषय, पण कोसंबी वैचारिक निवेदनात विचार पोचवून टाळ्या घेतात.
इंग्रजीचा प्राध्यापक, विचारी निवेदक, गायक, संगीतकार या पलीकडे कवी, लेखक, संसोधक म्हणूनही कोसंबी यांनी तिशीत ओळख कमावली आहे.
उघडतो रोज डोळे, मरण टाळण्यासाठी, शोधतो तुला मी
नव्याने जगण्यासाठी
शब्दांचा हा खेळ अनाहूत, तुला मी समजण्यासाठी
अर्थपूर्ण हा कयास माझा, तुझ्यात उतरण्यासाठी
अशी अर्थपूर्ण कविता कोसंबी करतात. वामनदादा कर्डक यांचं ‘भीमा, तुझ्या मताचे जर पाच लोक असते’ हे भीमगीत ते समरसून गातात.
शिंदे-कोसंबी नवा समाज घडवण्याच्या नादापायी हा सारा खटाटोप करत आहेत. हे नव्या शैलीचे कलावंत आंबेडकरी चळवळीला नव्या उंचीवर नेत आहेत असं म्हणता येईल. हे तरुण आंबेडकरी चळवळीचे रोल मॉडेल का बनू नयेत? आंबेडकरी समाजात उच्चशिक्षण घेऊन सामाजिक बांधीलकी जपणारे हे दोघेच काही अपवाद नसतील. आणखीही बरेच तरुण असतील. त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. विविध क्षेत्रांत असे रोल मॉडेल असतील. त्यांचं कौतुक करत नव्या पिढीला या वाटेनं जाण्याची प्रेरणा मिळणं गरजेचं आहे.
आंबेडकरी चळवळीला पुढे नेणारी ही उदाहरणं आहेत. सध्या चळवळीत निराशेचं वातावरण आहे. चळवळीचा विषय निघाला की, रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटी, गटगट, नेत्यांचं संकुचित वागणं याचीच चर्चा होते. पण चळवळ म्हणजे फक्त राजकीय पक्ष, आंदोलनं, मोर्चे, निवडणुका, नगरसेवक, आमदारक्या, खासदारक्या, मंत्रीपदं एवढंच नसतं. समाजात सत्तेचे अनेक स्तर असतात. सत्ता फक्त मंत्रालयातच नसते. ती विविध क्षेत्रांत असते. सांस्कृतिक क्षेत्रात तर सत्तेचा स्तर सर्वांत प्रभावी असतो. तिथं शिंदे-कोसंबी यांचं नव्या पद्धतीनं काम सुरू आहे. त्यांचे हे प्रयत्न आंबेडकरी चळवळ पुढे नेणारे आहेत.
बाबासाहेबांनंतर कर्मवीर भाऊराव गायकवाड, रा.सू.गवई या नेत्यांकडे पाहत गावोगावचे कार्यकर्ते प्रभावित होत. पुढे नामदेव ढसाळ, रामदास आठवले हे आंबेडकरी तरुणांचे रोड मॉडेल झाले. पण मधल्या काळात आठवले भरकटले. चळवळ अॅड. प्रकाश आंबेडकरांकडे आशेनं पाहू लागली. पण पडझड एवढी मोठी होती की, आंबेडकरही तिची डागडुजी करू शकले नाहीत. अशा परिस्थितीत या चळवळीची राजकीय कोंडी झाली. पण ती उणीव शिंदे-कोसंबी यांच्या पिढीनं इतर क्षेत्रांत आपल्यापरीनं भरून काढण्याचा प्रयत्न चालवला आहे.
शिंदे-कोसंबी यांच्यासारखे जीवनाच्या अनेक क्षेत्रांत आंबेडकरी विचाराचे तरुण पुढे झेपावले तर एका सांस्कृतिक क्रांतीच्या दिशेनं आपण झेपावू शकू. इतर बहुजन तरुणांनाही या ‘भीमाच्या लेकरां’पासून खूप काही शिकता येऊ शकतं. त्यातून ‘सत्ताधारी जमात बना’, हे बाबासाहेबांचं स्वप्न सर्वांनाच साधता येऊ शकेल, असं म्हणण्यास साधार जागा आहे!
लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment