काल महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा झाला. या दिवशी येनकेनप्रकारेण मराठी भाषेची मातब्बरी सांगितली जाते आणि प्रसारमाध्यमांवर सरधोपट पद्धतीनं बोट ठेवलं जातं... प्रसारमाध्यमांची भाषा कशी बिघडत चालली आहे वगैरे वगैरे. त्यात काही प्रमाणात तथ्य नक्कीच आहे. या माध्यमांतल्या मराठी भाषेसमोर आव्हानं आहेतच. किंबहुना अलीकडच्या काळात ती दिवसेंदिवस कडवी होत चालली आहेत, ही गोष्टही खरीच आहे.
मात्र हेही तितकंच खरं आहे की, प्रसारमाध्यमांचा सारा कारभारच भाषेवर अवलंबून असल्यानं त्यांच्या भाषेवर चर्चा व्हायला हवीच, यात दुमत असायचं काही कारण नाही. आपण ज्या क्षेत्रात काम करतो आहोत, त्यातल्या चांगल्या-वाईटाची आपणच कबुली देणं, ही मला वाटतं सर्वच काळात नितांत निकडीची गोष्ट असते…
वर्तमानपत्रं
सुरुवातीला वर्तमानपत्रं पाहू. एकेकाळी मराठी भाषेचं संवर्धन, जतन करण्यात, तिचा प्रचार-प्रसार करण्यात आणि तिला समृद्ध करण्यात वर्तमानपत्रांनी आणि त्यांच्या संपादकांनी अतिशय उल्लेखनीय असं योगदान दिलेलं आहे, ही गोष्ट खरी आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, अच्युतराव कोल्हटकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ह. रा. महाजनी, श्री. शं. नवरे, द्वा. भ. कर्णिक, अनंत भालेराव, प्रभाकर पाध्ये, नानासाहेब परुळकेर, रंगा वैद्य, वा. रा. कोठारी, आचार्य अत्रे, गोविंदराव तळवळकर, माधव गडकरी, नीळकंठ खाडीलकर, अरुण टिकेकर, कुमार केतकर, सुरेश द्वादशीवार, अशा अनेक संपादकांची आणि त्यांच्या वर्तमानपत्रांची नावं सांगता येतील. केतकर-द्वादशीवार वगळता बाकीचं कुणीच आता हयात नाही. पण हे जर संपादक आज हयात असते, आणि त्यांनी आजची वर्तमानपत्रं आणि त्यांची मराठी भाषा पाहिली असती, तर त्यांना काय वाटलं असतं? मला वाटतं ते भवभूतीच्या रामासारखे अत्यंत दु:खी स्वरात म्हणाले असते – ‘ते हि नो दिवसा गता:’ – ‘गेले ते आमचे दिवस!’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
वर्तमानपत्रांच्या हल्लीच्या संपादकांची भाषा अतिशय मिळमिळीत तरी असते किंवा पांडित्याचा आव आणणारी पण प्रत्यक्षात तुच्छतावादी. या संपादकांना त्यांचा कुणी सहकारी सांगत नसावा की, तुम्ही केवळ शब्दांचे फुगे उडवणारं आणि विचारहीन लिहिता. पण कदाचित कुणी हिंमत दाखवून सांगितलंच तरी संपादकमहाशय ऐकतीलच याची खात्री तरी नसावी. दोन तरुण संपादक त्यांच्या वर्तमानपत्रांत कमी आणि फेसबुकवर जास्त लिहितात. जणू त्यांना त्यांच्याच वर्तमानपत्रांत लिहिण्याची बंदी असावी. एक संपादक राजकारणी-कलावंत-लेखक यांच्यावर टीका करताना, ‘अक्कलशून्य’, ‘मूर्ख’, ‘गणंग’ अशी शेळकी विशेषणं सतत वापरत असतात.
हल्लीच्या मराठी वर्तमानपत्राच्या संपादकांना आपल्या शहरातल्या, राज्यातल्या, देशातल्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांवर फारसं अधिकारवाणीनं लिहिता येत नाही, पण त्यापेक्षा आंतरराष्ट्रीय राजकारणावर मात्र ते अतिशय अधिकारवाणीनं लिहितात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आज सकाळी किती वाजता उठले, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन युक्रेननंतर कोणत्या देशावर हल्ला करण्याची योजना बनवत आहेत, ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान हे कसे मूळचे भारतीय असले, तरी पाकिस्तानी आहेत, याची अगदी त्यांना खडानखडा माहिती असते. केवळ त्यांच्याच नव्हे, तर त्यांच्या चार पिढ्यांच्या जन्मकुंडल्या त्यांना तोंडपाठ असतात. पण त्यांना अशी माहिती आपल्या शेजारच्या देशांबद्दल असतेच असं नाही. पाकिस्तान, चीन, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार यांबद्दल या विद्वान संपादकांची पाटी कोरी असते.
पाश्चात्य इंग्रजी वर्तमानपत्रांतला-नियतकालिकांतला मजकूर उचलायचा, तो आपल्या छान शैलीत अनुवादित करायचा आणि अग्रलेख, लेख पाडायचा. काही संपादक तर इतके नामचीन आहेत की, त्यांचा बहुधा असा समज असावा की, त्यांच्याशिवाय महाराष्ट्रात इतर कुणाला इंग्रजी वाचता येत नसावं आणि ते जे वाचतात – ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘न्यू यॉर्क टाइम्स’, ‘टाइम्स’, ‘इकॉनॉमिस्ट’ वगैरे वगैरे – ती नियतकालिकं इतर कुणी मराठी माणूस वाचत नसावा. त्यामुळे ते त्यातले उतारेचे उतारे सरळ अनुवादून काढतात किंवा त्याचं ‘भारतीयीकरण’ करतात.
संपादकांच्या या आत्ममग्नेतेमुळे, अहंमन्यतेमुळे आणि कॉपी-पेस्ट पांडित्यामुळे मराठी वर्तमानपत्रं भाषिक पातळीवर गांजत आणि गंजतही चालली आहेत. साध्या, सरळ, सोप्या शब्दांत बरंच काही सांगता येतं आणि शब्दांचा नेमकेपणाने वापर केला तर, ते प्रभावीही ठरतं. पण साधं, सोपं, सरळ आणि नेमकं लेखन जाणीवपूर्वक ‘हिणकस’ ठरवायचं आणि मराठी-हिंदी सिनेमांची, मालिकांची, गाण्यांची कॉपी करत बातम्यांची, अग्रलेखांची आणि लेखांची शीर्षकं आकर्षक, लक्षवेधी वगैरे करायची, हा हल्लीच्या मराठी वर्तमानपत्रांचा फंडा आहे. अलीकडे सोशल मीडियावरील ‘व्हायरल पोस्ट\व्हिडिओ’ आणि ट्रेंडचाही मोठा प्रभाव पत्रकारांच्या मराठी भाषेवर पडत असल्याचं दिसतं.
एका वर्तमानपत्रात काम करत असतानाची गोष्ट. वर्तमानपत्रातल्या रोजच्या वाक्यरचनेच्या, शुद्धलेखनाच्या चुका यांविषयी आम्ही काही सहकारी सतत मिटिंगमध्ये संपादकांना सांगत असू. त्याला वैतागून त्यांनी काय करावं? एका व्याकरणतज्ज्ञाचं व्याख्यान ठेवलं. आणि त्यांना सांगितलं की, तुम्ही आमच्या सगळ्या पत्रकारांना आमच्या वर्तमानपत्रांत होणाऱ्या वाक्यरचनेच्या, शुद्धलेखनाच्या चुका उदाहरणांसहित दाखवून द्या. त्यासाठी गेल्या आठ-दहा दिवसांतली वर्तमानपत्रं घ्या आणि त्यातल्या चुका सांगा. त्यानुसार ते तयारी करून आले. आणि त्यांनी गेल्या आठ-दहा दिवसांतल्या वर्तमानपत्रातल्या वाक्यरचना व शुद्धलेखनाच्या चुका सांगायला सुरुवात केली.
बातम्या, लेख यांच्यातल्या चुकांची उदाहरणं सांगून झाल्यावर त्यांनी आपला मोर्चा अग्रलेखांकडे म्हणजे संपादकांच्याच लेखनाकडे वळवला. एक-दोन उदाहरणानंतर आम्ही सावरून बसलो. जरा चपापलो. चोरट्या नजरेनं संपादकांकडे पाहू लागलो. कारण त्यात वाक्यरचनेच्या वारेमाप चुका होत्या. इंग्रजी वळणाची इतकी वाक्यं ते दाखवत होते आणि मराठी वाक्यं कसं असायला हवं, हे सांगत होते की, बस्स! सभागृहात धीरगंभीर शांतता पसरली. ते उदाहरणांमागून उदाहरणं सांगत होते, तसतसे संपादक अस्वस्थ होऊ लागले. कारण सगळ्यात गंभीर चुका त्यांच्याच लेखनात होत्या.
आता कधी एकदा हे व्याख्यान संपतं असं आम्हाला आणि त्या संपादकांनाही झालं. व्याख्यान संपल्यावर दोन-तीन संधीसाधू सहकाऱ्यांनी संपादकांच्या बाजूनं मखलाशी करत त्या व्याकरणतज्ज्ञांशी वाद घालून पाहिला. पण तेही खमके. त्यांनी ते हल्ले सहजपणे परतावून लावले. शेवटी कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी संपादक उभे राहिले आणि त्यांनी पं. कुमार गंधर्व यांचा एक किस्सा सांगितला. एकदा एका मैफलीत कुमारांचं गाणं झाल्यावर एक संगीतसमीक्षक आले आणि त्यांनी कुमारांच्या गाण्याच्या व्याकरणातल्या चुका सांगायला सुरुवात केली. कुमारांनी त्यांचं बोलून झाल्यावर त्यांना ऐकवलं – ‘तुम्हाला गाण्याच्या व्याकरणातलं कळतं, मला गाणं कळतं.’ हा किस्सा सांगून ते संपादक म्हणाले, ‘या व्याकरणतज्ज्ञांना व्याकरणातलं कळतं, मला लिहिण्यातलं’.
थोडक्यात, काय तर, संपादकांकडे उमदेपणा नसल्यानं त्यांना आपल्या चुका मान्य करता आल्या नाहीत. आणि मग काय, वाक्यरचना, शुद्धलेखन यांविषयीचं ते व्याख्यान संपादकांनी एक कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून दिलं. त्यातल्या कशाचाही अमल झाला नाही.
आणखी एक मुद्दा. ‘दुरुस्ती आणि स्पष्टीकरण’ असं सदर कुठल्याही मराठी वर्तमानपत्रात नसतं. ‘खुलासा’ किंवा ‘दिलगिरी’ कधीतरी छापली जाते, तीही प्रकरण फारच अंगलट येण्याची शक्यता असेल तर. पण ती कशी, तर ज्याच्याबाबत ती व्यक्त केली जाते, त्याच्यावर उपकार केल्यासारखी. एखाद्या मराठी वर्तमानपत्राने आपल्या चुकीबद्दल मनमोकळेपणाने माफी मागितलीय, अशी उदाहरणं सहसा सापडत नाहीत, निदान अलीकडच्या काळात तरी. मराठी वर्तमानपत्रं आणि त्यात काम करणारे वार्ताहर, उपसंपादक, संपादक हे हल्ली तर ‘सर्वगुणसंपन्न परमेश्वर’ झालेले आहेत. त्यांच्याकडून सहसा चुकाच होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर ‘खुलासा’ किंवा ‘दिलगिरी’ व्यक्त करण्याची वेळही येत नाही.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
भाषेचे राजकारण संकुचित आणि धर्माचे व्यापक व उदारमतवादी आहे?
.................................................................................................................................................................
वृत्तवाहिन्या
टीव्ही हे वर्तमानपत्रापेक्षा कितीतरी वेगवान माध्यम. २४ तास बातम्या देणारं. वर्तमानपत्रं दुसऱ्या दिवशी आपल्या हातात पडतात. तसं टीव्हीचं नाही. त्यामुळे टीव्हीतल्या पत्रकार-संपादकांकडे कुठली कौशल्यं असायला हवीत? तर त्यांचं वाचन, व्यासंग-अभ्यास वर्तमानपत्रांतल्या पत्रकारांपेक्षा दुप्पट किंवा त्याहून जास्त असायला हवं. त्यांची बोलणं, ऐकणं, वाचणं आणि लिहिणं ही चार प्राथमिक भाषिक कौशल्यं वर्तमानपत्रांतल्या पत्रकारांपेक्षा कितीतरी अधिक पटीनं चांगली असायला हवीत. म्हणजे वर्तमानपत्रापेक्षा टीव्हीसाठी जास्त अभ्यास आणि भाषा अवगत असलेले पत्रकार असायला हवेत. प्रत्यक्षात काय दिसतं? टीव्हीतले पत्रकार वर्तमानपत्रांतल्या पत्रकारांपेक्षाही बथ्थड असतात. त्यांचा आणि वाचनाचा फारसा संबंध नसतो आणि त्यांची भाषी तर इतकी दळभद्री असते की, मी तुम्हाला त्याची उदाहरणं सांगायची गरज नाही.
ज्याला नीट बोलता येत नाही, नीट लिहिता येत नाही, तो चांगला बातमीदार असू शकत नाही सहसा. टीव्हीवर दिसणाऱ्या पत्रकारांच्या चुकांची खिल्ली उडवली पाहिजेच. कारण असे पत्रकार हे कमी कष्टात वेळ मारून नेणारेच असतात. ज्यांना आपण करतो ते काम यथायोग्यच असलं पाहिजे, याची जाणीव असते, ते आपल्या चुकांचं कधीही दडपून समर्थन करत नाहीत. टीव्हीमाध्यमात जास्त व्यवधानं असतात, त्यामुळेच तिथं जास्त चांगल्या प्रकारे कौशल्यं अवगत असलेले लोक असणं अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात काय दिसतं? एकदम उलटं. तिथं किमान कौशल्यंही अवगत नसलेले लोकच दिसतात. कारण कमी पगारात अधिकाधिक काम करण्याची ‘वेठबिगारी’ तेच करू शकतात.
अँकर्ससाठी चांगला चेहरा महत्त्वाचा, त्याला धड वाचता येतं की नाही, बोलता येतं की नाही, हे महत्त्वाचं नाही, असाच निकष लावला जात असेल तर संबंधित वाहिनीच्या संपादकालाही जबाबदार धरलं पाहिजे.
टीव्ही पत्रकारांची भाषा चांगली नसेल, तर त्याला ते जेवढे जबाबदारी आहेत, तेवढेच त्यांचे संपादकही. पण हल्ली होतं काय की, इतरांच्या चुकांसाठी केवळ ती संबंधित व्यक्तीच जबाबदार आहे, अशी संकुचित वृत्ती बोकाळल्यामुळे इतरांच्या चुकांचं खापर त्यांच्याच माथी मारलं की, आपली जबाबदारीतून सुटका होते. टीव्ही वाहिन्या आणि त्यांचे संपादक आपल्या वाहिनीवरील धेडगुजऱ्या भाषेचं समर्थन करतात ते यामुळेच. कारण हल्लीच्या संपादकांचीच भाषा धड नसते. त्यांचंच वाचन नसतं. मग ते आपल्या सहकाऱ्यांना काय शिकवणार वा त्यांचं प्रशिक्षण करणार?
प्रश्न हा नाहीये की, टीव्ही पत्रकारांची भाषा इतकी गलथान, उथळ, निर्बुद्ध आणि बाष्कळ का असते. प्रश्न हा आहे की, तुम्ही निवडणार दुय्यम दर्जाची माणसं आणि त्यांच्याकडून अपेक्षा करणार प्रथम दर्जाची. तर तसं होत नाही. कुठेच होत नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. त्याचबरोबर प्रश्न हाही आहे की, दुय्यम दर्जाची माणसं काम दुय्यम दर्जाचं तरी करतात का, तर नाही, ती तिय्यम दर्जाचं काम करतात. पण ते दुय्यम दर्जाचं काम नक्की करू शकतात. त्यासाठी प्रशिक्षण, पुनप्रशिक्षण, कार्यशाळा, रिफ्रेश कोर्स अशा गोष्टी करायला हव्यात. आपण माणसांना आधी यंत्रासारखं राबवतो – खरं तर गुरासारखं म्हणायला हवं, पण आपल्या शाब्दिक अस्मिता इतक्या टोकदार झाल्यात की, त्यावरून वाद व्हायचा, तेव्हा यंत्रच बरा - आणि मग त्यांच्या ‘यांत्रिकीकरणा’वर टीका करतो.
आंतरजालीय माध्यमं
२०००च्या सुमारास जसा ‘डॉट कॉम’ची बेसुमार लाट आली होती, तशी सध्या आंतरजालीय माध्यमांची बेसुमार लाट निर्माण होत आहे. वर्तमानपत्रांतून या ना त्या कारणाने बाहेर पडलेले किंवा काढलेले वा निवृत्त झालेले, टिकू न शकलेले पत्रकार सध्या वेगवेगळी संकेतस्थळं (पोर्टल्स) काढत आहेत, चालवत आहेत. शिवाय वर्तमानपत्रांची, टीव्ही वाहिन्यांची संकेतस्थळं आहेतच. आणि सगळ्यात वाईट भाषा या वर्तमानपत्रांच्या आणि टीव्ही वाहिन्यांची संकेतस्थळांची आहे. ते ज्या बातम्या करतात, ती अतिशय वाईट प्रकारची सिनेमा-टीव्ही-ओटीटी यांत काम करणाऱ्या कलाकारांविषयीची गॉसिप्स असतात. त्यांची शीर्षकं आकर्षक करण्याच्या नादात रहस्यमय, गूढमय आणि कामुकताप्रधान केली जातात. किंबहुना वाचकांनी आपल्या संकेतस्थळाला जास्तीत जास्त भेटी द्याव्यात, यासाठी कामुकतेविषयीच्या बातम्यांचा भडिमार केला जातो.
कुठल्याही नव्या माध्यमासाठी पूर्णपणे नवी रणनीती, धोरणं, नियोजन लागतं. त्या माध्यमाचा साकल्यानं अभ्यास करावा लागतो, त्याची बलस्थानं आणि मर्यादा जाणून घ्यायला लागतात. स्पर्धा जाणून घ्यायला लागतात. हे सगळं केल्यावर या आपल्याला आपण या माध्यमात कितपत काम करू शकतो किंवा नाही, याचा अंदाज येतो. त्यानुसार आपल्याला आपल्या संकेतस्थळाचं धोरण ठरवावं लागतं. तयारी करून कुठल्याही नव्या क्षेत्रात उतरण्याची आपली वृत्तीच नाही. शॉर्टकटनं आवश्यक तेवढी जुजबी माहिती मिळवायची, आणि मुटका मारायचा. यामुळे सर्वांत आधी भाषेला हरताळ फासला जातो, मग बातमीच्या आशयाला आणि मग नीतीमूल्यं, सभ्यता यांना.
येता काळ ऑनलाईन माध्यमांचाच आहे, छापील माध्यमांचा नाही, ही नवी फॅशन सध्या जोरावर आहे. त्यामुळे बातम्या देणारी नवनवी संकेतस्थळं निघत आहेत, न्यूज-फीचर्स पोर्टल्स निघत आहेत. वर्तमानपत्रं त्यांची संकेतस्थळं मॉलमधल्या शोकेसमधल्या मॉडेल्ससारखी अधिकाधिक देखणी करत आहेत. सगळीच संकेतस्थळं नुसतीच देखणी झाली, तर मग त्यांच्यात फरक काय? त्यामुळे बातम्या या मनोरंजन म्हणून सादर केल्या जात आहेत, प्रत्येक बातमी ही सिनेमॅट्रिक-ड्रॅमॅटिक पद्धतीनं तरी सांगितली जाते किंवा ‘वाजीकरण’ करून तरी. यात सर्वांत आघाडीवर मराठी वर्तमानपत्रांची आणि मराठी वृत्तवाहिन्यांची संकेतस्थळं आहेत. ‘बीबीसी’ या जगभर नावलौकिक असलेल्या माध्यमसंस्थेचं ‘बीबीसी मराठी’ हे संकेतस्थळ आहे. त्यावरच्या लैंगिकतेवरच्या बातम्यांची संख्या पाहिली की, त्याला ‘बीबीसी मराठी कामसूत्र’ असंच म्हणावंसं वाटतं.
एक मरतुकडं, दुसरं खंगलेलं
कवी, गीतकार सुधीर मोघे यांची एक सुंदर कविता आहे - ‘शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते’. म्हणजे भाषा ही हमालासारखी असते. ‘फोडिले भांडार, धन्याचा हा माल । मी तव हमाल, भारवाही।।’. पण ज्यांचं आयुष्य काळवंडलेलं, गढुळलेलं, मचूळ, दिखाऊपणाचा वर्ख चढवलेलं असतं, त्यांची भाषाही त्यांच्यासारखी काळवंडलेली, गढुळलेली, मचूळ, दिखाऊपणाचा वर्ख चढवलेली असते. तिच्यात असभ्यता, दांभिकता, अप्रामाणिकपणा, कंठाळीपणा, तारसप्तकाचेच आरोह-अवरोह आणि अगोचरपणा याच गोष्टींचं प्राबल्य असतं. मुद्रित, दृक आणि आंतरजालीय माध्यमांत मराठीपुढे आव्हानं निर्माण होण्याची कारणं ही आहेत की, या माध्यमांत काम करणारे बहुतांश संपादक आणि पत्रकार यांची मराठी भाषाच काळवंडलेली, गढुळलेली, मचूळ, दिखाऊपणाचा वर्ख चढवलेली आहे.
मराठी भाषा हे मराठी प्रसारमाध्यमांचं माध्यम आहे, साधन आहे. सध्याच्या काळातलं त्यांचं साध्य काय आहे? तर पैसा कमवणं. त्यासाठी ते मराठी भाषेचा अतिशय निष्काळजी, बेजबाबदार आणि गलथानपणे वापर करत आहेत. कुठल्याही माध्यमाची अशी फरपट केली जाते, तेव्हा त्या ते माध्यमही निष्प्रभ होत जातं. मराठी भाषेचा मराठी प्रसारमाध्यमं बेमूर्वत वापर करत असल्यामुळे मराठी वर्तमानपत्रं, मराठी वृत्तवाहिन्या आणि मराठी आंतरजालीय माध्यमं यांची मराठी भाषा बिघडली तर आहेच, पण ही माध्यमंही कळाहीन बनत चालली आहेत.
मराठी प्रसारमाध्यमांनी काही वर्षांपूर्वी मराठी साहित्यापासून फारकत घेतली होती. तेव्हा ज्येष्ठ पत्रकार-प्राध्यापक जयदेव डोळे यांनी ‘मराठी साहित्य आणि प्रसारमाध्यमे : एक मरतुकडं, दुसरं खंगलेलं’ असा लेख लिहिला होता. आता मराठी भाषा आणि मराठी प्रसारमाध्यमं यांचीही फारकत होत चाललीय. त्यामुळे मराठी भाषा मरतुकडी होत चालली आहे, तर प्रसारमाध्यमं खंगत चालली आहेत, हे आपल्याला मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही.
जगण्याची आणि जाणून घेण्याची भाषा
प्रसिद्ध हिंदी नाटककार मोहन राकेश यांनी भाषेचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक – ‘जीने की भाषा’ म्हणजे जगण्याची भाषा आणि दुसरी, ‘जानने की भाषा’ म्हणजे जाणून घेण्याची भाषा. आपल्या ‘जगण्याच्या भाषे’वर बाजारपेठेनं कब्जा केलाय आणि ‘जाणून घेण्याच्या भाषे’वर सोशल मीडियानं. आपलं आपल्या संस्कृतीवरचं-मातृभाषा मराठीवरचं प्रेम ‘बाजारवादा’नं हिरावून घेतल्यामुळे मराठी भाषेसमोरची आव्हानं दिवसेंदिवस कडवी होत चालली आहेत. आणि ती केवळ प्रसारमाध्यमांपुरती मर्यादित नाहीत, तर सर्वक्षेत्रीय आहेत.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
कौटुंबिक संवादातल्या मराठी भाषेसमोर आव्हानं आहेत, पाल्य-पालक यांच्यातल्या संवादातल्या, आजी-आजोबा-नातवंडं यांच्यातल्या संवादातल्या, स्त्री-पुरुषांच्या संवादातल्या मराठी भाषेसमोरही आव्हानं आहेत. कार्यालयीन संवादाच्या मराठी भाषेसमोर आव्हानं आहेत. नाटक-चित्रपट-संगीत-गाणी यांतल्या मराठी भाषेसमोर आव्हानं आहेत. राजकीय नेत्यांच्या, सार्वजनिक ठिकाणी बोलण्या जाणाऱ्या, आर्थिक व्यवहार करताना वापरल्या जाणाऱ्या आणि सोशल मीडियावर लिहिल्या-वाचल्या-ऐकल्या जाणाऱ्या मराठी भाषेसमोरही आव्हानं आहेतच की! महाराष्ट्रातलं असं क्षेत्र नाही, असा एक विषय नाही, ज्यात मराठी भाषेसमोर आव्हानं नाहीत.
थोडक्यात, आपण एकप्रकारे ‘भाषिक अराजका’च्या काळात आहोत. त्याचा अपरिहार्य परिणाम प्रसारमाध्यमांतल्या भाषेवरही होताना दिसतो आहे. आपल्या विचारांना राजकीय, सामाजिक व आर्थिक परिमाण, आणि नैतिक, वैचारिक आणि अकादमिक अधिष्ठान गरजेचं असतं. ते राहिल्यामुळे आपल्या प्रसारमाध्यमांचं, साहित्याचं आणि तुम्हाआम्हाआपणसगळ्यांचंच ‘भाषा-भान’ आणि ‘भाषा-विवेक’ यांचं तारतम्य गंडलंय, असं मला वाटतं.
प्रसारमाध्यमांतल्या मराठी भाषेचा ऱ्हास हा आपल्या एकूण सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक ऱ्हासाचा एक भाग आहे, हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ही आपल्या सर्वांची – तुम्हाआम्हाआपणासगळ्यांची सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक शोकांतिका आहे, असं मला वाटतं.
.................................................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment