राहुल गांधी काँग्रेसमधल्या प्रस्थापित नेत्यांची ‘फजिती’ का करत आहेत?
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • ‘भारत जोडो - न्याय यात्रे’त राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करताना
  • Tue , 27 February 2024
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress भारत जोडो Bharat Jodo

लोकसभा निवडणुकीची मुळीच पर्वा न करता राहुल गांधी त्यांच्या ‘भारत जोडो - न्याय यात्रे’त पुढे पुढे जात आहेत. जाताना त्यांनी आपले शत्रू आणखी ठळक करणे सुरूच ठेवले आहे. उगाच अद्वातद्वा वा वेडेवाकडे बोलून ते शत्रू निर्माण करत नाहीत. आकडेवारी, लोकांकडून दाखले आणि सामाजिक वास्तव, यांचा आधार घेऊन त्यांची यात्रा झपाट्याने पूर्वेकडून पश्चिमेकडे येते आहे. एकंदर, निवडणुकीच्या राजकारणातल्या नेहमीच्या डावपेचांची पूर्णपणे वजावट करून राहुल गांधी देशात एक नवा आधार उभा करत आहेत.

त्यांच्या भाषणांतले तीन मुद्दे प्रभावी आणि चपखल वाटू लागले आहेत-

१) ओबीसी व दलित जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यांत मामुली वाटा दिला जात आहे.

२) अंबानी-अदानी यांसारख्या मोजक्या भांडवलदारांसाठीच सरकार चालवले जात आहे.

३) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मुस्लीमद्वेष फैलावत आहेत, देशाचे तुकडे करू लागले आहेत.

एवढे सांगून झाल्यावर काँग्रेसला सत्ता मिळाल्यास हे वास्तव आम्ही बदलून टाकू, असे आश्वासनही राहुल गांधी देत आहेत. बेकारी, गरिबी आणि महागाई हे तीन प्रश्नही त्यांच्या भाषणांत मोठी जागा व्यापत आहेत. तरीही राहुल गांधी जात, वशिलेबाजी व शत्रुता अशा सामाजिक विषयांविरुद्ध जोरदार प्रचार करत असल्याने एकीकडे ‘विकसित’ भारताची भरधाव गाडी सोडणारा भाजप आणि दुसरीकडे ‘विकसनशील’ भारताची मध्यमगती गाडी हाकणारा काँग्रेस पक्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे.

राहुल गांधी यांच्या प्रचाराचा त्रास म्हणा वा अडचण, त्यांच्याच पक्षातल्या प्रस्थापितांना होताना दिसते आहे. त्यामुळे ते भराभर पक्षत्याग करून भाजपच्या छत्राखाली जाऊ लागले आहेत. तिकडे जाताना त्यांना काही राजकीय आश्वासने जशी मिळत आहेत, तशीच एक सामाजिक सुरक्षादेखील लाभत आहे. ती सुरक्षा भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि सरसंघचालकांनी ज्याची ग्वाही दिली, त्या सनातन धर्माची असणार आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

भाजप व संघ ज्या त्वेषाने सनातन धर्माची भाषा करत आहेत, त्यामुळे खरे तर काँग्रेसमधल्या तमाम नेत्या-कार्यकर्त्यांनी कान टवकारायला हवे होते. कारण त्यांना म. गांधी, पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही.नरसिंहराव इत्यादी नेत्यांचा आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ठाऊक असणार. वैयक्तिक पातळीवर धर्मपालन करण्यास हरकत न घेणारा काँग्रेस पक्ष संघटनात्मक पातळीवर धर्मापासून चार हात लांब असायचा. परंतु बाबरी मशीद प्रश्नी नरसिंहराव यांच्या संशयास्पद भूमिकेपासून आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सपशेल आर्थिक प्रशासनाने काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते आपल्या निष्ठांपासून ढळले आणि सर्वांत सवंग व उथळ मार्गाकडे गेले.

राजकारण धर्माच्या आधारावर करणे म्हणजे निव्वळ आळशी राजकारण करणे. धर्म समजला काय, न समजला काय, सतत ‘धर्म धर्म’ म्हणत राहण्याने लोक भुलतात. राजकारण घाणरडे मानायचे आणि त्याच वेळी धार्मिक व सश्रद्ध राजकारणी स्वीकारायचे, असे ढोंग सामान्य माणसेही करू लागतात, तेव्हा या देशाला काही भवितव्य नाही, असे मत व्यक्त करण्यात कुठलीही नकारात्मकता मानण्याचे कारण नाही..

…तर राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्या काही डावपेचांनी जुनेजाणते काँग्रेस नेते अस्वस्थ झाले. मल्लिकार्जुन खरगे यांना पक्षाध्यक्ष करण्याने दलित व अन्य मागासवर्गीय जातींचा दबदबा वाढेल, अशी भीती प्रस्थापित काँग्रेस पुढाऱ्यांना वाटली. आता महाराष्ट्रात मराठा जातीला आरक्षण मागण्या-देण्याचे जे राजकारण चालू आहे, त्यामागचा एक मोठा मुद्दा मराठा जातीच्या हातून राजकीय व आर्थिक सत्ता झपाट्याने गमावली जाण्याचा आहेच.

पृथ्वीराज चव्हाण काय, एकनाथ शिंदे काय, या दोघाही प्रभावशून्य न-नेत्यांना जाता जाता आपली छाप पडावी, यासाठी मराठा आरक्षण देण्याची युक्ती सुचली. सामाजिक मागासलेपण मुळीच नसणारी मराठा जात आर्थिक बाबतीतच आरक्षण मागू शकते, पण बाकीच्या सवर्णांना सोबत घेण्यावाचून तिला ते मिळणार होणार नाही. भाजप ओबीसींना गमवायला तयार नाही आणि ब्राह्मण्यही त्यागायला तयार नाही. त्यामुळे त्याला मराठ्यांची गरज तशी फक्त नेतृत्वस्थानासाठीच हवी असते.

म्हणून आपण भाजपमध्ये गेलो, तर आपोआप दोन स्वार्थ साध्य होतील, अशी खात्री मराठा काँग्रेस नेत्यांना वाटते. पहिला, मराठा म्हणून हवेसे नेतेपद लाभते आणि दुसरा, थोडीच मिळणारी अन्य मागासवर्गीय जातींची मतेही मिळू लागतील. म्हणजे दलित जाती व मुस्लीम यांची मते व मिन्नतवारी दोन्ही वगळली गेली तरी चालते. खरगे यांची धोरणे ते दलित असल्याने हिंदूविरोधी, वर्णव्यवस्थाविरोधी आणि जातिविध्वंसक होत गेली, तर आपले कसे, या चिंतेने काँग्रेसनेत्यांनी भाजपचा रस्ता धरला.

जे जे काँग्रेस नेते गेल्या काही वर्षांत भाजपमध्ये गेले, ते फक्त बोलके पुरोगामी होते. त्यांनी जातिभेदविरोधी व जातिविध्वंसक कार्यक्रम कधीच केले नाहीत. दलित खरगे त्यांच्या दृष्टीने एक निमित्त. तसा जातिविध्वंस हा काही काँग्रेसचा कार्यक्रम नव्हता.

१९८९ साली व्ही. पी. सिंग सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भारतरत्न’ देणे आणि मंडल आयोग स्वीकारणे, असे दोन मोठे सामाजिक परितर्वनकारी निर्णय घेताच भाजपने ‘धर्मनिष्ठ राजकारण’ सुरू केले. त्यानंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपची लोकसभेतली सदस्यसंख्या वाढत गेलेली दिसते आणि गेल्या दहा वर्षांपासून तो अत्यंत बेगुमान सत्ता चालवतो, याचा अर्थ काय? तर काँग्रेसच्या सवर्ण, प्रबळ, सरंजामी आणि धंदेवाईक नेत्यांना व त्यांच्या पाठीराख्यांना आपली सत्ता अबाधित ठेवायची होती. सनातन धर्माचे सारे पाठीराखे भाजपच्या मागे जाताना दिसताहेत, त्यामागचे भाजपचे उघडे सवर्णनिष्ठ राजकारणच आहे.

म्हणूनच काँग्रेस असो वा भाजप, हिंदुत्ववादी राजकारण चालूच ठेवणारा एक मोठा समाज गट आज आपण पाहतो आहोत. तो कधी समाजवादी असतो, कधी जागतिकीकरणवादी असतो. त्याने स्वार्थासाठी आंतरराष्ट्रीय भूमिका घेऊन आपले रूप झाकले. आता तो ‘राष्ट्रवादी’ झाला आहे. तो स्त्रीद्वेष्टा, दलितविरोधक, मुसलमान निंदक आणि आदिवासींचा शोषक असे. परंतु काँग्रेसमध्ये तो हे सारे झाकून ठेवे. भाजपमध्ये गेल्यावर काँग्रेसवाले बुजत नाहीत. कारण त्यांच्या खोल मनात साठवलेले अगदी स्पष्टपणे बोलता येते. त्यामुळे आपण समविचारी मित्रांपासून इतके दिवस दुरावलो का, याचे दु:ख फारतर त्यांना सोसायला लागेल.

या काँग्रेसवाल्यांनी पक्षात असताना राज्यघटनेचे महत्त्व कधी ठसवले नाही. मात्र ती बदलावी किंवा तिच्या आडून व तिला उपेक्षून देशाला ‘धर्मनिष्ठ’ वळण द्यावे, असे प्रयत्न कधी केले नाहीत. जातीवाचक शिवीगाळ आणि सामाजिक अप्रतिष्ठेबाबतचा कायदा लागू होताच सर्वांत घाबरले ते सवर्ण काँग्रेसवाले. अट्रॉसिटीचा कायदा त्यांच्या सामाजिक सत्तेला सुरूंग लावणारा ठरला. म्हणून मराठा जातीच्या प्रत्येक आंदोलनांत आरंभी ‘अट्रॉसिटी कायदा रद्द करण्या’ची मागणी पुढे येते अन् मग ती गायब होते.

भाजपमधले गेल्यावरही या काँग्रेसवाल्यांना जातींचा जाच होणारच आहे. एक तर हे पक्षांतर ‘बंधू-भगिनी’, ‘मूलनिवासी’ नसल्याने त्यांना कायम दुय्यम ठरवले जाणार. दुसरे, भाजपकडून वरिष्ठ अशा संघाची मुजोरी, बळजोरी व दहशत स्वीकारावी लागणार.

जनसंघ असल्यापासून भाजपवर बाह्मण व बनिया या दोन जातींची जबर पकड आहे. ती या नवागतांना भारी पडणार. म्हणायला भाजप ओबीसींचा पाठीराखा असतो. मात्र मोक्याच्या सर्व जागा अन्य मागासवर्गीयांच्या हवाली केल्याचे भासवतो आणि सर्व सूत्रे मात्र ब्राह्मण-बनियांच्याच हाती ठेवतो. याचेही मूळ अर्थातच संघाच्या रचनेत लपलेले आहे. संघाने जातींची कितीही आलटापालट करून पाहिली. मात्र ब्राह्मण व बनिया यांना सोडून संघाचा कोणत्याही जातीवर विश्वास नाही.

संघ स्थापनच केला मुळी ब्राह्मणांनी. त्यांनी क्षत्रिय जातीला म्हणजे मराठा जातीला कधीही स्थान दिले नाही. आणि शूद्रांना येऊ देणे संघाच्या म्होरक्यांना मंजूरच नव्हते. मग उरते कोण? तर वैश्य. व्यापारी जातीतले लोक एक तर वरचढ ठरत नाहीत आणि दुसरे, त्यांना पैशाचा, खजिन्याचा व्यवहार उत्तम समजतो. या दोन्ही वर्णांची सत्ता स्थिर असते. अर्थ-काम-मोक्ष-धर्म या चतुष्ट्यात तलवारीशी अथवा युद्धाशी संबंध कोठेही येत नाही. म्हणजे क्षत्रियत्व कायम दुय्यम असते, हे संघाने ठरवून टाकलेले. अर्थ व धर्म या दोन जीवनाधारांनी काम व मोक्ष यांवर ताबा मिळवता येतो. त्यामुळे ब्राह्मण व व्यापारी म्हणजे बनिया यांचाच ताबा राजकारणावर असायला हवा, असे संघाचे तत्त्वज्ञान आहे.

तेच भाजपचेही असणार. मोदी व शहा हे दोघेही वैश्यवर्णीय असून ते ब्राह्मणी राजकारणाचे मोठे आधारस्तंभ आहेत. राजपूत, जाट, मराठा अशा क्षत्रिय वर्णाच्या नेत्यांना ते मुळीच महत्त्व देत नाहीत. राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, ज्योतिरादित्य शिंदे, जयंत चौधरी आदी त्यांच्या लेखी किरकोळ आहेत. विनोद तावडे हे मराठा पुढारी मूळचे संघनिष्ठ असूनही त्यांची भरपूर फजिती मोदी-शहा यांनी केली आहे. (अंबानी-अदानी यांच्या निमित्ताने तमाम भांडवलदारांवर राहुल गांधी करत असलेली टीका जुन्याजाणत्या काँग्रेसवाल्यांना तशीही अडचणीत आणत आहेच.)

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘राजेशाही’त ‘राजा’, तसे ‘लष्करशाही’त ‘लष्कर’ असते आणि सरंजामशाहीत ‘सरंजामदार’ असतो, तसे ‘लोकशाही’त ‘लोक’ असायला पाहिजेत ना? लोकशाहीच्या खेळात लोक कोठे आहेत?

तुम्ही ‘फातिमा नूरजहाँ’ला आणि ‘आर्चीज’ या तरुणांच्या चमूला भेटला आहात का? नसाल, तर तातडीने त्यांची भेट घ्या…

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, याबरोबरच त्यांच्या पुढे काय, याही प्रश्नाचा विचार व्हावा…

गोळवलकर आणि मोदी एका बाजूला अन् खुद्द सरसंघचालक दुसऱ्या बाजूला… असे कसे झाले, एवढ्या शिस्तीच्या, एकमुखाने बोलणाऱ्या संघटनेत? संघ व सरकार या दोघांत अशी विरोधी व टोकाची मते कशी काय?

.................................................................................................................................................................

आता आपण काँग्रेसचे प्रादेशिक राजकारण आणि त्यानिमित्ताने होणारे जातिव्यवस्थापन यांत डोकावू. हा पक्ष इतका मराठाकेंद्री होऊन बसला की, मुस्लीम व दलित यांना तो गृहित धरू लागला. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होवोत की हुसेन दलवाई मंत्री, भालचंद्र मुणगेकर राज्यसभेत जावोत की झिशान सिद्दिकी पक्षत्याग करोत, काँग्रेसने प्रतीकात्मक प्रतिनिधित्वालाच प्राधान्य दिले.

राहुल गांधी यांनी सरळ सरळ संघाला मुस्लीमद्वेषासाठी जबाबदार धरल्यानंतर आणि तसा प्रचार सुरू केल्यावर अनेक मराठा काँग्रेस पुढाऱ्यांची ‘बोबडी’ वळली असणार. त्यांनी कधीच असा थेट अन स्पष्ट प्रचार केलेला नव्हता. सर्वांना चुचकारत राहायचे, असे धोरण या काँग्रेस नेत्यांना इतके लेचेपेचे करून गेले की, काँग्रेसचा प्रत्येक नेता जणू ‘मनमोहनसिंग’च बनला! …मितभाषी, अनाक्रमक, सर्वसमावेशक अन् गुळमुळीत! धर्म, जात, परंपरा, संस्कृती, इतिहास, अर्थशास्त्र अशा कैक विषयांवर मराठा नेते गोलमाल व अघळपघळ बोलत राहिले. वैचारिकता अन् तत्त्वनिष्ठा जणू त्यांच्या गावीच नसते, अशी त्यांची प्रतिमा बनून गेली.

डाव्यांना संपवायला संघाचा वापर करायचा, शिवसेनेला पुढे करून संघावर दडपण आणायचे आणि ‘राष्ट्रीयते’चा धाक दाखवून प्रादेशिक पक्ष खतम करू पाहायचे, असे डावपेच विचारशून्य आधारावर लढवणारी काँग्रेस या जाळ्यातच गुरफटत गेली अन् आक्रसली. संघाचा धोका काँग्रेसने जाणीवपूर्वक नजरेआड केला, कारण त्यांच्या कलानुसार वागले की, त्यांची मते मिळतात, असा काँग्रेस नेत्यांचा अनुभव.

एवढी मोठी ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्राने पाहिली, पण तिची पाळेमुळे काँग्रेसच्याच काळात उखडली गेली. फुले-शाहू-आंबेडकर यांची मूल्ये व राजकारण समाजवादी, शेकाप आणि काही मोजक्या काँग्रेसी नेत्यांनी पुढे नेले. म. गांधी, पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदींच्या तसबिरी अनेक काँग्रेसी नेत्यांच्या घरातल्या भिंती तोलून धरत, परंतु शाहू-फुले-आंबेडकर यांच्या क्वचितच दिसत. त्यातच मंडल आयोगाच्या पुरस्कर्त्यांनी या तीन महापुरुषांना आपल्या वैचारिक आधारासाठी घेताच मराठा व अन्य सवर्ण काँग्रेसवाल्यांना आपले स्थान डळमळीत होण्याची भीती वाटू लागली.

गंमत म्हणजे भाजपने आधी मंडल आयोगाला भरपूर विरोध केला आणि मग बिगर मराठा राजकारण करण्यासाठी छोट्या जाती एकवटायला सुरुवात केली. ओबीसी जातींचा मराठा विरोध त्यांनी जागा केला, मात्र फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव न घेता. याचा अर्थ असा की, मराठ्यांऐवजी मा.ध.व. आणि तत्सम जातींना हिंदुत्वाच्या छताखाली आणून सत्तेचे वाटप करवून घ्यायचे, मात्र ते करताना वरवरचे परिवर्तन दाखवायचे. मूळ गाभा तसाच ठेवायचा. जातिव्यवस्था मोडू द्यायची नाही.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मराठा जातींना आपले सामाजिक-राजकीय-आर्थिक हित सांभाळायचे असल्यास हा मार्ग ठीक वाटला. संपूर्ण नष्ट होण्याऐवजी एक-दोन बाजू दुबळ्या होऊ देणे त्यांना सोयीचे झाले. म्हणून भाजप काय, संघ काय, आमूलाग्र परिवर्तन न करणारे असल्याची खात्री पटल्याने मराठ्यांना आपली सत्ता तडजोडीच्या रस्त्याने टिकवून ठेवता आली. त्यांनी हिंदुत्वाचा भगवा मार्ग तुडवणे सुरू केले.

गेली काही वर्षं तरुण मराठा आंदोलक मराठा जातीत सत्ताधारी व बिगर सत्ताधारी अशी वर्गवारी करू लागले आहेत. हा संघाचा एक डाव आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. वर्गभेद कधीही मिटवता येतात, मात्र सामाजिक उच्चनीचतेचे भेद मिटवणे तसे कठीण आहे आणि त्यासाठी कोण तयार होईल, हाही प्रश्नच आहे.

एकाच क्षत्रिय वर्णात सत्ताधारी-बिगर सत्ताधारी असे वर्ग संघाच्या तत्त्वज्ञानानुसार हवेच असतात. संघ अभिजनवर्गाची सत्ता अपरिहार्य मानतो. म्हणूनच लोकशाहीचा तो शत्रू आहे. या सत्ताधारी क्षत्रियांशी पुरोहित वर्गाने सत्तासोबत करून हिंदुत्वाचे रक्षण केले. सामान्य क्षत्रिय यात कोठे येतो? त्यामुळे आता जे जातिवंत मराठा नेते भाजपमध्ये जात आहेत, ते शूद्र वर्णाच्या व अन्य मागासवर्गीयांच्या वर्चस्वापासून सुटका मिळवतील जरूर, मात्र त्यांच्या बोडक्यावर ब्राह्मण-बनिया कायमचे बसतील आणि त्यांची घुसमट करतील, हे दिसतेच आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या तिहेरी हल्ल्यांमुळे त्यांची पळापळ करवून नव्या पिढीला पक्ष मोकळा करून दिलेला दिसतो आहे…

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......