तीन डिसेंबर २०२३ रोजी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा निवडणुकींचे निकाल लागले. तेलंगणा सोडलं, तर तिन्ही ठिकाणी भाजप जिंकला. भक्तलोकांमध्ये उन्मादाची एकच लाट उसळली. ‘लिबरल’ लोकांमध्ये तीव्र निराशा पसरली.
खरं तर विविध ‘ओपीनियन पोल्स’ आणि ‘एक्झिट पोल्स’मुळे ‘लिबरल’ लोकांमध्ये आशेची लाट उसळली होती. राजस्थान वगळता तर बाकी सगळ्या ठिकाणी काँग्रेस पुढे असल्याचे ‘ओपिनियन पोल्स’ सांगत होते.
बेरोजगारी, बेकारी, महागाई आणि एकूणच ‘जुमलेबाजी’ या पार्श्वभूमीवर ‘मोदी लाट’ फार दिवस टिकू शकणार नाही, अशी ‘लिबरल्स’ची धारणा होती. ‘गोदी मीडिया’मध्ये मोदींचा उदोउदो रात्रंदिवस सुरू होता. लोक रोज रोज थापा ऐकून कंटाळून जाणे स्वाभाविक होते. ‘गोदी मीडिया’मधील चॅनेल्सची व्ह्यूअरशिप कमी होत चालली होती. मीडिया हाऊसेसचे शेअरसुद्धा कोसळत चालले होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर जनतेने मोदी यांच्या विरुद्ध आपले मत बनवले आहे, असे लिबरल्सना वाटत होते. पण ही आशा निकालांमुळे तीव्र निराशेत बदलली गेली. या निकालांमुळे एप्रिलमध्ये येणाऱ्या लोकसभेचे निकालसुद्धा मोदींच्या बाजूने लागणार, अशी भीती अत्यंत आशावादी स्वभाव असलेल्या लिबरल्सच्या मनात तरळू लागली.
हे होते ना होते तोच २२ जानेवारी रोजी अयोध्येमधील रामलला प्राणप्रतिष्ठेच्या जादुई वातावरणाने भारतातील वातावरण भारून गेले. अयोध्येतील रस्ते, मंदिरे, तिथली सजावट, सगळे अक्षरशः जादुई होते.
भाजपने भारतातील सामान्य लोकांना या सोहळ्यात समाविष्ट करून घेतले. अनेक लोकांच्या घरी सोहळ्याच्या निमंत्रणाची अक्षता गेली. भारताच्या पंतप्रधानांनी चार दिवसाची दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. घरोघरी दिवाळीसारखे दिवे लावा, आकाश कंदिल लावा, तोरणे लावा, रांगोळ्या काढा असे आवाहन केले गेले. बाजारात भगव्या पताका, भगवे आकाशकंदिल आणि भगवे ध्वज लाखोंच्या संख्येने विकायला आले. रस्तोरस्ती प्रभु रामचंद्रांच्या वेशात कलावंत उभे करून ‘विजययात्रा’ काढण्यात आल्या.
सोशल मीडिया आणि ‘गोदी मीडिया’वर हजारो मेसेजेस आणि रील्स फिरू लागले. पाचशे वर्षांच्या मुसलमानी गुलामगिरीतून भारत आता मुक्त कसा होतो आहे, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मुसलमान धार्जिणे कसे आहेत, विरोधी पक्षतील लोक भारताला मुसलमानांच्या हाती कसे सोपवू इच्छित आहेत, अशा स्वरूपाचे हे मेसेजेस होते. या सगळ्या देशद्रोही लोकांना मोदी पुरून उरणार आहेत, कारण ते अवतार आहेत, असेही मेसेजेस फिरत होते. मोदी तपस्वी आहेत, प्राणप्रतिष्ठेपूर्वी ते ११ दिवसांचा निर्जळी उपवास करणार आहेत, असे मेसेजेस फिरत राहिले.
प्राणप्रतिष्ठा झाली, त्या दिवशी पंतप्रधान तपस्वी मोदी सोनेरी झळाळी असलेला कुर्ता पेहनून आले. भारताच्या इतिहासात एखाद्या तपस्व्याने सोनेरी झळाळी असलेला कुर्ता पेहेनायची ही पहिलीच वेळ होती. मोदींच्या क़ुर्त्यावर त्यांच्या तपस्येची सोनेरी झळाळी उतरली आहे, असे काही लोक म्हणाले.
प्राणप्रतिष्ठापनेचा भव्यदिव्य कार्यक्रम झाला. पांढऱ्या संगमवरी गर्भगृहात रामललाची सोन्याने आणि हिऱ्या-माणकांनी मंडित झालेली कृष्णमूर्ती शोभून दिसत होती. श्रद्धाळूच नव्हे, तर अश्रद्ध लोकांच्याही डोळ्याचे पारणे फिटले!
प्राणप्रतिष्ठापनेच्या पवित्र कार्यक्रमानंतर भाषणे झाली. त्यात आपल्याला गर्भगृहात ईश्वरी स्पंदनांचा साक्षात्कार झाला, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. यावर ‘मोदीभक्तां’नी त्यांना मनोभावे नमस्कार केला आणि विरोधकांनी विकट हास्य केले. राममंदिर झाले, आता भारत एकसंध होईल, असेही सांगितले. यावर मोदीभक्तांच्या डोळ्यात अश्रू आले, मोदी विरोधकांच्या ओठांवर छद्मी हास्य उमटले.
हे सर्व घडल्यावर दोन-चार दिवसांतच बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी श्रीमान मोदी यांच्याबरोबर युती केली. नीतीशकुमार हे मोदीकालीन भारतातील एक भयंकर प्रकरण होते. धर्मवादी भाजप आणि त्यांचे सेक्युलर प्रतिस्पर्धी यांच्या बरोबर आलटून पालटून त्यांनी अनेक वेळा सत्ता स्थापन केली. २०१४पासून तर त्यांनी पाच वेळा पलटी मारली. हे एक ‘वर्ल्ड रेकॉर्ड’च आहे. आज शंभर वर्षं झाली तरी हे रेकॉर्ड तुटलेले नाही. एक माणूस दहा वर्षांत पाच वेळा पलट्या मारतो आणि तरीही त्याचे मतदार त्याला निवडून कसे देतात, हा प्रश्न २१२४मधील वाचकाच्या मनात उभा राहील. पण अनेक वेळा पलटी मारूनही बिहारमधील लोक त्यांना मतदान करत होते, हे खरे आहे. ‘मोदीकालीन भारता’त तत्त्वांना अजिबात महत्त्व राहिले नव्हते, हेच या वरून आपल्या लक्षात येते.
२०२४ सालच्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या. त्या वेळी आधीच्या विधानसभेच्या निवडणुका, राममंदिर प्रतिष्ठापना आणि बिहारमधील सत्ता पलट आणि विरोधकांना तुरुंगात डांबण्याविषयीचा कोलाहल, अशी सगळी धांदल उडाली.
शिरोजीने नेमक्या या धांदलीवर ही बखर लिहिली आहे. ‘मोदीभक्तां’च्या मते हा सर्व काल म्हणजे भारताच्या इतिहासातील एक ‘सुवर्णयुग’ होते आणि मोदीविरोधकांच्या मते हा एक ‘अॅबसर्ड’ आणि ‘डार्क ह्यूमर’ने अवमंडित झालेला काळ होता. या दोन भूमिकांमध्ये समन्वय कधीच घडून येणार नव्हता. दोन्ही बाजू कडव्या होत्या. यातील कोण जिंकले आणि कोण हरले, हे तेव्हा ठरणारच नव्हते.
आज शंभर वर्षांनी हा काल म्हणजे भारताच्या इतिहासातील एक ‘डार्क ह्यूमर’ने अवमंडित झालेला काळ होता, असा निर्वाळा इतिहासाने दिला आहे. पण हा निर्वाळा अंतिम का मानला जावा? अजून शंभर वर्षांनी म्हणजे २२२४ साली शिरोजीच्या बखरीचे पुन्हा एकदा चिंतन झाले, तर मोदीकाल एक ‘सुवर्णकाल’ होता, असा निष्कर्ष निघू शकतो.
इतिहास म्हणजे आवर्तनांची एक अखंड मालिका असते. महाराष्ट्राचा इतिहास बघितला, तर ज्या कालखंडाविषयी इतिहासाने आपले मत बदलले कधीही बदलले नाही, असा कालखंड फक्त शिवाजी महाराजांचा होता. त्यांचे निर्वाण १६८० साली झाले. त्यानंतर आज २१२४ साल आहे. गेल्या ४४४ वर्षांत महाराज खरे ‘युगपुरुष’ होते आणि त्यांचा काल खऱ्या अर्थाने ओजस्वी काल होता, हे महाराजांबद्दलचे आपले मत इतिहासाने कधीही बदलले नाही. स्वतःला ‘युगपुरुष’ समजणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पायउतार झाल्यावर सुमारे तीन वर्षांतच इतिहासाच्या नजरेत गटांगळी खाल्ली, हे सर्वांनी बघितलेलेच आहे. असो.
उजवे किंवा डावे कुणीच अंतिम सत्याचा कलश हातात घेऊन जन्मलेले नसतात, याची जाणीव शिरोजीला होती. पण मोदीकालीन भारतातील एकूणच तत्त्वच्युत आणि झुंडशाहीच्या राजकारणाला त्याचा मनस्वी विरोध होता. खरं तर मोदीभक्तांना ‘उजवे’ म्हणणे चुकीचे आहे, हे शिरोजीला माहीत होते. हे लोक अति-उजवे म्हणजे फॅसिस्ट प्रवृत्तीचे होते. परंतु याच वेळी मोदींचा साधारण मतदार मात्र उजव्या प्रवृत्तीचा आहे, याबाबत शिरोजीच्या मनात संशय नव्हता.
या बखरीचेच उदाहरण द्यायचे तर अविनाश आणि नाना हे मोदीभक्त अति-उजवे म्हणजे फॅसिस्ट होते, तर अच्युत हा मोदीसमर्थक उजवा होता. या उलट, मोदींचा लिबरल विरोधक साधारणपणे डावा होता, पण अति-डावा नव्हता. म्हणजे प्रवृत्तीने नक्षलवादी वगैरे नव्हता. परंतु गंमत अशी की, मोदीप्रणित सोशल मीडियाने आणि ‘गोदी मीडिया’ने लिबरल विरोधकांना ‘नक्षलवादी’ वगैरे संबोधून त्यांना बदनाम करण्याची मोहीम राबवली होती.
गोंधळाने भारून गेलेल्या त्या काळात मोदीभक्त आणि मोदीविरोधक यांच्यात या वेळी गरमागरम चर्चा झाल्या नसत्या, तरच आश्चर्य होते. अशीच एक कडक चर्चा शिरोजीने रंगवली आहे. शिरोजी एक चांगला इतिहासकार होता, पण त्याने नाटककार व्हायचे ठरवले असते, तर तो अतिशय चांगला नाटककारसुद्धा झाला असता, हे ही चर्चा बघितली तर आपल्या लक्षात येते.
बोली भाषेचा ओघवता प्रवाह आणि चर्चेच्या ओघात तिच्यात ओढले गेलेले विविध विषय आपल्याला येथे पाहायला मिळतात. कधीकधी चर्चा भरकटते आहे काय असाही संशय आपल्याला येतो. परंतु थोड्याच वेळात चर्चेने घेतलेले ते वळण तत्कालीन इतिहासाच्या चित्रणासाठी कसे आवश्यक होते, हे आपल्या लक्षात येते.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे
पांडेजींच्या ठेल्यावर भेटायचे ठरले होते, तेव्हा नेहमीप्रमाणे भास्कर आणि समर येऊन बसले होते. नानांच्या चकचकीत स्कॉर्पिओमधून नाना आणि इतर येतील असे वाटले होते, पण सगळा विरोधी पक्ष नानांच्या नव्या कोऱ्या बीएमडब्ल्यूमधून आले. ते उतरून येईपर्यंत समर आणि भास्करमध्ये हलक्या आवाजात चर्चा झाली. नानांनी जन्मभर देशसेवेचे व्रत केले, पण आता सत्ता प्राप्त झाल्यावर त्यांनी थोडा हात धुऊन घेतला, हे समाजापासून आता लपून राहिले नव्हते.
समर - (गालातल्या गालात हसत) आले नवश्रीमंत देशभक्त.
भास्कर - सत्ता सगळ्यांना भ्रष्ट करते, हे खरे आहे.
समर - भ्रष्टाचार आपल्याला शिवू शकत नाही, असे यांचे म्हणणे होते.
(हळूहळू सगळे येऊन बसले.)
अविनाश - (उत्साहात) झाले की नाही राममंदिर अयोध्येत तुमच्या नाकावर टिच्चून?
भास्कर - आम्ही कधी नाही म्हणालो होतो राममंदिराला?
अविनाश - तुम्हाला नको होते मंदिर व्हायला!
भास्कर - आम्ही म्हणत होतो की, जे काही व्हायचे आहे ते कायद्याच्या द्वारे होऊ द्या.
नाना - बाबरी मशीद पडेपर्यंत कायदा काय करणार होता?
अविनाश - कायद्याच्या मर्यादा कायद्याच्या पलीकडे जाऊन ओलांडाव्या लागतात, हेच या प्रकरणातून दिसून आलंय.
(न्याय हवा असेल तर कायदा थोडा तरी मोडावा लागतो, असे तत्त्वज्ञान ‘मोदीकालीन भारता’त आकार घेऊ लागले होते. कायदा कुठे मोडायचा आणि कुठे मोडायचा नाही, हे अवतारी पुरुषांना बरोबर कळते, असा प्रचार या काळात केला गेला. याचा सरळ सरळ अर्थ - हे अवतारी पुरुष म्हणजेच कायदा - असा होतो, हे लक्षात घेण्याच्या मूडमध्ये मोदीभक्त नव्हते. - संपादक)
भास्कर - एकदा कायद्याची किंवा घटनेची चौकट मोडली की, मग हळूहळू गुंडांचं राज्य सुरू होतं.
नाना - आता ‘रामराज्य’ सुरू झालं आहे. मोदींचे रामराज्य!
समर – ‘रामराज्या’त बुलडोझर चालवले जात नव्हते इतर धर्मांच्या प्रार्थना स्थळांवर.
अविनाश - तुम्ही बेकायदेशीर मदरसे आणि मशीदी बांधायला लागलात तर बुलडोझर चालणारच!
नाना - बुलडोझर कायद्याप्रमाणेच चालतायत. कायदापालन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणेच बुलडोझर चालतात.
समर - कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे चालतात का?
नाना - हे बघा, तुम्ही बेकायदेशीर मशीदी आणि मदरसे बांधायचे, घरे बांधायची आणि आम्ही कोर्टाकडून आदेश आणायचे का?
(मोदीकालीन भारतात मुसलमानांची बाजू मांडायची सोय नव्हती. कुणी मुसलमान समाजाची बाजू घेतली की, मोदीभक्त त्यांना ‘मुसलमान’ म्हणायला सुरुवात करायचे. - संपादक)
भास्कर - मशीदी आणि घरे बेकायदेशीर आहेत की नाहीत, हे कोर्टाला ठरवू देत ना!
नाना - तसं नको. अधिकारी त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे जे काही बेकायदेशीर आहे ते ठरवतील आणि कारवाई करतील. तुम्ही कोर्टात जा. कोर्ट म्हणाले कारवाई चूक होती, तर परत बांधा मशीदी आणि घरं!
भास्कर - आणि जे आर्थिक, मानसिक आणि भावनिक नुकसान होईल, त्याचे काय करायचे?
अविनाश - तुला का पुळका आला आहे त्यांच्या त्रासाचा? झाला त्रास तर होऊ दे!
भास्कर - अशीच कारवाई देशातील इतर बांधकामांवर केली तर चालेल का?
अविनाश - कोर्टाचा निकाल येईपर्यंत कोण गप्प बसणार?
भास्कर - तुझा फ्लॅट ज्या प्लॉटवर आहे, तो प्लॉट वनखात्याचा आहे, अशी नोटिस आली आहे.
अविनाश - आम्ही कोर्टात गेलो आहोत.
भास्कर - कोर्टाचा निकाल येईपर्यंत गप्प कशाला बसायचं?
समर - उद्या बुलडोझर आणून पाडूया तुझा फ्लॅट आणि मग तू कोर्टात जा. कोर्ट म्हणाले की, जमीन वनखात्याची नाहिये, तर परत बांध सगळी बिल्डिंग!
अविनाश - कसला माणूस आहेस तू? आपल्या मित्राची बिल्डिंग पाडायची आहे तुला.
भास्कर - त्याला कुठं पाडायची आहे तुझी बिल्डिंग?
अच्युत - समर एवढंच म्हणतोय की, ज्या न्यायानं तुम्ही मुसलमानांच्या बिल्डिंगा पाडताय, त्याच न्यायानं तुमच्या बिल्डिंगा पाडल्या तर चालेल का?
अविनाश - तू गप बे! तुला एवढा पुळका आलाय, त्यांचा तर पाकिस्तानात जा राहायला.
भास्कर - ये क्या बात हुई?
नाना - बघा मुसलमानांचा विषय निघाला की, यांच्या तोंडातून हिंदी निघते आपोआप. देशद्रोही!
भास्कर - हिंदी राष्ट्रभाषा आहे आपली.
अविनाश - मग ‘ये क्या बात हुई’ असं कशाला म्हणतोस? ‘ये क्या गोष्टी हुई’ असं म्हण. मुसलमानांच्या उर्दूमधले शब्द नको आहेत आता या देशात.
पांडेजी - (हसायला लागतात) उर्दू सिर्फ मुसलमानोंकी भाषा नहीं हैं. ये हिंदू और मुसलमान दोनों की भाषा हैं. उर्दू भाषा मुसलमानोंकी फारसी और हिंदुओं की हिंदी मिलकर तैयार हुई हैं.
अविनाश - ते काही आम्हाला सांगू नका. आता उर्दू शब्द नाहीत म्हणजे नाहीत! फक्त हिंदी, हिंदी आणि हिंदी! संकृतप्रचूर हिंदी!
पांडेजी - हिंदी ये शब्द हिंद शब्दसे आया हैं. हिंद की भाषा हिंदी.
नाना - मग प्रॉब्लेम काय आहे?
पांडेजी - हिंदी ये शब्द फारसी भाषासे आया हैं!
(भास्कर आणि समर हसायला लागतात.)
अविनाश - (चिडत) शक्य नाही. हिंदी हा शब्द हिंदू या शब्दावरून आला आहे. हिंदूंची ती हिंदी!
भास्कर - विकीपिडिया उघडून - हे बघ हिंदीमध्ये आलेल्या फारशी शब्दांची लिस्ट. साया, परेशान, अगर, खुशी, दीवार, हिंद!
अविनाश - शक्य नाही!
भास्कर – अरे, लिहिलं आहे इथं.
अविनाश - खोटं आहे ते!
पांडेजी - (हसत) यकीन कीजिए अविनाशजी, हिंद ये शब्द फारसी से हैं! उससेही हिंदी ये शब्द बना हैं!
अविनाश - फारसी नसणार तो. पर्शियन असेल.
समर - (जोरात हसत) पर्शियन म्हणजेच फारसी.
अविनाश - शक्य नाही!
पांडेजी - यकीन कीजिए फारसी और पर्शियन एकही हैं.
अविनाश - पांडेजी तुम्ही बाता मारू नका.
भास्कर - ‘बाता’ हा मराठी शब्द ‘बात’ या फारसी शब्दावरून मराठीत आला आहे.
अविनाश - मराठीतून हे बाहेरचे शब्द हाकलून दिले पाहिजेत. या शब्दांना दरवाजा दाखवला पाहिजे आता.
समर - दरवाजा हा शब्दसुद्धा फारसीमधून आला आहे.
भास्कर - (हसत) दरवाजालासुद्धा कवाड दाखवले पाहिजे.
अविनाश - (चिडत) तुला एका कवडीची अक्कल नाहिये.
पांडेजी - कौडी ये शब्द उर्दूने हमसे लिया हैं!
भास्कर - मग तो बाटलेला शब्द आपण वापरायचा का?
अच्युत - मला एक सांगा, आपल्या धर्माला मुसलमान येण्याआधी काय म्हणत होते?
पांडेजी - सनातन धर्म!
अविनाश - मग ते नाव घेऊ आपण आपल्या धर्माला!
भास्कर – ‘सनातन धर्म’ या शब्दावर ब्राह्मण-धर्माची छाप आहे. सनातन धर्म हा शब्द सगळ्या जातींना आपला नाही वाटत.
भास्कर – खरं तर ‘सनातन धर्म’ या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. सतत असणारा, त्रिकालालाही पुरून उरणारा तो सनातन धर्म.
अच्युत - मग आपण हेच नाव घ्यायला पाहिजे आपल्या धर्माला.
समर - हरकत नाही पण असा निर्णय केला तर इतर जातींची मतं जायची शक्यता आहे.
नाना - (घाईने आणि निश्चयाने) आता हिंदू हा शब्द बदलता येणार नाही.
भास्कर - आपले मोदीजी ‘हिंदू-हृदय सम्राट’ आहेत. आपण त्यांना ‘सनातन धर्म-सम्राट’म्हणायचे का?
समर - सगळ्या लोकांना ते ‘ब्राह्मण हृदय-सम्राट’ असं ऐकू येईल.
अविनाश - या मुसलमान लोकांनी फार डाळ नासून ठेवली आहे. सगळीकडे घुसले आहेत भाषेसकट!
भास्कर - पण आपले सरसंघचालक म्हणालेच आहेत की, भारतीय मुसलमानांचा आणि आपला डीएनए एकच आहे म्हणून.
समर - म्हणून तर मोदीजी सगळ्या मुसलमान लोकांना जवळ करत आहेत.
अच्युत - काहीही काय बोलतो आहेस?
भास्कर - हे बघ मी छायाचित्रं आणि बातम्या माझ्या फोनमध्ये एका फाईलमध्ये एकत्र करून ठेवल्या आहेत. (फोन दाखवत) हे बघ मोदीजी बोहरा मुसलमान लोकांना भेटताना.
भास्कर - हे बघ खोजा मुसलमानांशी चर्चा करताना.
अविनाश - पंतप्रधानाला भेटावं लागतं सगळ्यांना.
नाना - प्रगतिशील मुसलमान आहेत बोहरा आणि खोजा! प्रगतिशील मुसलमानांचं स्वागतच आहे.
भास्कर - हे बघ लखनऊमध्ये बडा इमामबाड़ा आहे, तिथे भाजपने शिया लोकांची महा-कॉन्फरन्स आयोजित केली होती. शिया लोक फार मागास आहेत, त्यांची प्रगती व्हावी म्हणून ही कॉन्फरन्स आयोजित केली होती.
समर - पासमांदा मुसलमान लोकांच्या मतांसाठीसुद्धा भाजप प्रयत्नशील आहे.
अविनाश - काहीतरी बोलू नकोस. आम्हाला मुसलमानांची मतं नको आहेत.
भास्कर - हे बघ भाजपने पासमांदा मुसलमान लोकांची कॉन्फरन्स आयोजित केली आहे लखनऊमध्ये. अली अन्वर अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली चर्चा चालू आहे.
अच्युत - प्रगतिशील आहेत का हे पासमांदा मुसलमान?
अविनाश - असणारच!
भास्कर - पासमांदा मुस्लीम म्हणजे मुसलमान लोकांमधले दलित आणि ओबीसी.
समर - म्हणजे मुसलमानांमधले मागास!
अविनाश - मोदीजी मागास मुसलमान लोकांना कधीही जवळ करणार नाहीत. हे सगळे मुसलमान निदान मनानं तरी प्रगतीशील असतील.
पांडेजी - लेकिन आपही कह रहें थे परसो - मुस्लीम कभी प्रगतीशील नहीं हो सकता.
नाना - हो, ते वाक्य बरोबरच आहे.
अविनाश - पण मोदीजी करतायत म्हणजे ते बरोबरच करत असणार.
भास्कर - बोहरा झाले, खोजा झाले, सूफी झाले, पासमांदा झाले, शिया झाले, मेमन झाले, अहमदी झाले सगळ्यांशी मतांसाठी चर्चा सुरू आहेत.
नाना - सुन्नी मुसलमानांना तर धारेवर धरलंय ना?
भास्कर - सुन्नींमधल्या बरेलवी मुस्लिमांशी गोड बोलणं चालू आहे.
अच्युत - बरेलवी म्हणजे?
भास्कर - सुन्नी मुसलमान लोकांमध्ये बरेली मदरसेचे आणि देवबंदी मदरसेचे अशी विभागणी आहे. दोन स्कूल्स आहेत ती सुन्नी लोकांची. बरेलवी मवाळ आहेत आणि देवबंदी परंपरावादी आहेत.
समर - ही बघ ५ नोव्हेंबरच्या ‘स्क्रोल’मधली बातमी. बरेलवी मुसलमान आणि देवबंदी मुसलमान यांच्यातल्या फुटीचा मतांसाठी फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न!
नाना - मुसलमानांमध्ये काही छोटे छोटे भाग आहेत, त्यांना समजावून सांगणं शक्य असतं. त्यांना प्रगतीशील करणं शक्य असतं.
भास्कर - पासमांदा मुसलमान एकूण मुसलमानांच्या ४० टक्के आहेत.
अच्युत - बाप रे! म्हणजे पासमांदा मुसलमान हा काही छोटा भाग नाहिये.
नाना - देवबंदी मुसलमानांना तर टाईट केले आहे ना?
भास्कर - हे बघा, ‘हिंदुस्तान टाईम्स’मधली बातमी आहे - देवबंद मधल्या ५१ मुसलमानांचा ‘मोदी-मित्र’ म्हणून सत्कार केला गेला.
समर - आता देवबंदीसुद्धा गोड वाटत असतील तर फक्त मुसलमान ‘टेररिस्ट’च बाहेर राहिले. बाकीचे सगळे कव्हर करून झाले!
भास्कर - टेररिस्ट लोकांना तर काँग्रेससुद्धा बाहेर ठेवते. मग आता तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये फरक काय राहिला?
नाना - मघाशी तुम्ही भाजप मुसलमान लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवत आहेत, म्हणून तक्रार करत होता. आता तुम्ही भाजप मुसलमान लोकांशी संधान बांधत आहे म्हणून तक्रार करताय.
अविनाश - काही करून मोदीजींना शिव्या द्यायच्या. तुरुंगात टाकलं पाहिजे यांना.
भास्कर - स्ट्रॅटेजी आहे ती. जहाल हिंदूंची मतं मिळवीत म्हणून बुलडोझर चालवायचे आणि मग थोड्या वेळानं मुसलमान लोकांशी मागच्या दारानं चर्चा करायची. त्यांची मतं मिळवायचा प्रयत्न करायचा.
समर - काहीही करून सत्ता हवी आहे तुम्हाला.
अविनाश - हे बघ इतके सगळे हिंदू मतं देतायत भाजपला. आम्हाला मुसलमान लोकांच्या मतांची काहीही गरज नाहिये! उगीच बरळू नकोस काहीतरी.
भास्कर - १९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३७ टक्के मतं मिळाली. काँग्रेसला १८ टक्के मतं मिळाली.
अविनाश - मग?
भास्कर - काही ‘ओपिनियन पोल्स’ म्हणत आहेत की, काँग्रेसला आता २९ टक्के मतं मिळतायत.
नाना - पण भाजपची मतं कमी झालेली नाहियेत.
समर - बरोबर आहे, पण इतर विरोधी पक्षांची मतं काँग्रेसकडे फिरायला लागली आहेत.
नाना - पण त्यामुळे काय फरक पडला? मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये आलोच ना निवडून आम्ही?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
भास्कर – ‘हिंदी बेल्ट’मध्ये जे घडलं ते ते बाकीच्या सगळ्या भारतात घडेलच याची हमी कोण देणार?
समर - कर्नाटक आणि तेलंगणामध्ये भाजपने किती मार खाल्ला पाहिलस ना?
अविनाश - आता तर राममंदिर झालं आहे. अबकी बार चारसो पार!
भास्कर - हे बघ ‘ओपिनियन पोल्स’ म्हणतायत की, महाराष्ट्रात वीस-पंचवीस जागा जाणार आहेत तुमच्या. बिहारमध्ये जाणार आहेत, बंगालमध्ये जाणार आहेत.
समर - त्या वेळी मुसलमान लोकांच्या मतांची गरज पडू शकते.
अविनाश - (प्रचंड संतापत) आम्हाला गरज नाही मुसलमान लोकांच्या मतांची.
भास्कर - २०१९ सालच्या निवडणुकीत दर पाच मुसलमानांमधल्या एकानं भाजपला मत दिलं आहे.
समर - म्हणजे भारतातल्या मुसलमान लोकांपैकी सुमारे २० टक्के मुसलमान भाजपला मतं देतात.
अच्युत - काय म्हणतोस? अनबिलिव्हेबल!
समर - पण खरं आहे!
भास्कर - भाजपच्या ३७ टक्के मतांपैकी २ ते ३ टक्के मतं मुसलमान लोकांची असतात ही फॅक्ट आहे. ती मतं काँग्रेसकडं जाऊ शकतात.
समर - भाजपला मतं देणाऱ्या मुसलमानांची मतं काँग्रेसला मिळाली, तर काँग्रेस ३१ टक्क्यांवर येईल आणि तुम्ही ३५ टक्क्यांवर.
भास्कर - या नादात बहुमताचा २७२ हा आकडा हुकला तर केवढ्याला पडायचा मुस्लीम द्वेष!
समर - आता कळलं का सगळ्या मुसलमानांशी संधान का बांधलं जातं आहे ते?
अच्युत - हे कोण मुसलमान आहेत जे भाजपला मतं देतायत?
समर - मुसलमान बायका आहेत तलाक बंदी वर खुश झालेल्या. ‘कॉमन सिव्हिल कोड’ हवे असलेले प्रगतीशील मुसलमान आहेत. शिया मुसलमान आहेत आपल्या धर्मगुरूंनी सांगितलं म्हणून भाजपला मतं देणारे.
अच्युत - शिया धर्मगुरू कशाला मतं द्यायला सांगतील भाजपला?
समर - शिया लोकांत दोन प्रवाह आहेत. भाजपला पाठिंबा देणारे आणि तिला विरोध करणारे.
पांडेजी - शिया और सुन्नी में बनती नहीं हैं. सुन्नी लोगोंको औकात में रखने के लिए शिया भाजपा को वोट करते हैं.
अच्युत - च्यायला गंमतच आहे.
भास्कर - कल्बे जव्वाद हे धर्मगुरू भाजपच्या बाजूला असतात आणि कल्बे सिबतेनसारखे धर्मगुरू विरोधात असतात.
अच्युत - मग काही धर्मगुरू विरोध का करतायत भाजपला?
भास्कर - त्यांचे म्हणणे आहे सुन्नी परवडले पण भाजप नको.
अच्युत - हे खरं असेल तर भारतातलं राजकारण आपल्याला वाटतंय त्यापेक्षा जास्त ‘कॉम्प्लिकेटेड’ आहे, असं म्हणावं लागेल.
अविनाश - असं काही नाहिये. मोदीजी मुसलमान लोकांच्या मतांच्या मागं कधीही जाणार नाहीत.
(प्रखर मोदीभक्तीची बीजे कित्येक वेळा भक्तांच्या प्रखर मुस्लीम द्वेषात आपल्याला सापडतात. - संपादक)
नाना - आता राममंदिर झालं आहे. भाजपला आता कुणाचीही गरज नाही. भाजप पन्नास टक्के मतं घेणार आहे.
अविनाश - अबकी बार चारसौ पार!
भास्कर - आता जातीय जनगणनेचं खूळ सुरू झालं आहे. पासमांदा मुस्लीम म्हणतायत की, आम्हाला आरक्षण पाहिजे.
अविनाश - त्यांना कोण आरक्षण देतंय? केळं घ्या म्हणतील मोदीजी!
समर - पासमांदा मुसलमानांना आरक्षण द्यायला पाहिजे अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षांनी तशी चर्चा सुरू केली आहे.
अच्युत - च्यायला सगळ्यांना आरक्षण मिळायला लागलं, तर आम्ही काय करायचं?
भास्कर - तुम्ही किती टक्के आहात समाजात?
अच्युत - आम्ही साडेतीन टक्के आहोत.
भास्कर - मग तुम्हाला साडेतीन टक्के आरक्षण नक्की मिळेल. मोदी हैं तो मुमकिन हैं!
अविनाश - शक्य नाही. भाजपचा माणूस मुसलमान लोकांना आरक्षण द्यायला पाहिजे, असं कधीही म्हणणार नाही.
भास्कर - ही बघ ‘द हिंदू’मधली बातमी आहे. ७ ऑगस्ट २२ची बातमी आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष के लक्ष्मण काय म्हणाले आहेत बघ.
अच्युत - तुम्हाला कशा कळतात या बातम्या?
भास्कर - आम्ही रोज एक तास पेपर वाचतो.
समर - आणि मुख्य म्हणजे ‘गोदी मीडिया’ एक क्षणसुद्धा बघत नाही.
भास्कर - आम्ही लेख वाचत राहतो वेगवेगळे. नेटवर वेगवेगळे विषय घेऊन सर्च करत राहतो.
अच्युत - मलासुद्धा फॉरवर्ड करत जा ते लेख.
भास्कर - करेन पण एक अट आहे.
अच्युत - मोदीकाकाच्या ‘मीडिया सेल’चे मेसेज फॉरवर्ड नाही करायचे तू आम्हाला. नो ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’!
अविनाश - अच्युत तूसुद्धा वेडा होणार आहेस या लोकांसारखा.
अच्युत - हे दोघं वर्तमानपत्रांचे संदर्भ देऊन बोलतायत. आपणसुद्धा या दोघांसारखं अप-डेटेड राहायला पाहिजे. बास झाली ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’!
अविनाश - एवढं मोठं राममंदिर झालं. मुसलमानांवर विजय मिळाला! अजून काय पाहिजे तुला?
अच्युत - भारत देशात नक्की काय चाललं आहे, हे पाहायचं आहे मला.
नाना - आता आपल्याला काशीची ग्यानवापी मस्जिद हटवायची आहे. मग मथुरेची शाही इदगाह मशीद हलवायची आहे. तिकडे लक्ष दे.
भास्कर - आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, दुबईमध्ये स्वामीनारायण मंदिर झालं आहे. सातशे कोटी रुपये खर्च करून!
अविनाश - झालंच आहे! मोदी हैं तो मुमकिन हैं.
भास्कर - यूएईच्या शेख मोहम्मद बिन झायद यांनी २७ एकर जमीन भेट दिली आहे त्या मंदिराला.
अविनाश - मोदी हैं तो मुमकिन हैं!
समर - इस्लाम मध्ये मूर्तीपूजा मान्य नाहिये. तरीही त्यांनी मंदिरासाठी जमीन दिली.
अविनाश - मोदी हैं तो मुमकिन हैं!
समर – अरे, त्यांच्या मनाचा मोठेपणा मान्य करा!
अविनाश - ते लोक कधी मोठ्या मनाचे असू शकत नाहीत. त्यांनी मोदीजींना घाबरून जमीन दिली आहे.
भास्कर - कितीतरी हिंदू, दुबई आणि आबूधाबी मध्ये गुण्यागोविंदाने नांदवले जातायत. श्रीमंत होऊन परत येतायत.
नाना - पण त्यांना मतांचा अधिकार नाहिये. आपण मुसलमान लोकांना दिलाय तसा.
समर - आपले मुसलमान आपले नागरिक आहेत जन्मानं. दुबईत जन्मलेले लोक इथं आले, तर आपणही मतदानाचा हक्क देत नाही त्यांना.
नाना - पण आपण नागरिकत्व घेऊ नाही शकत दुबईमध्ये.
समर - घेऊ शकतो! नेट उघडून दाखवत - हे बघा कोणीही बाहेरची व्यक्ती नागरीक बनू शकते तिकडे.
अविनाश - तू गप बस!
नाना - तिकडं कुणीही नागरीक बनू शकत असलं तरी हरकत नाही,, पण काशीची ‘ग्यानवापी’ मशीद आणि मथुरेची शाही इदगाह मशीद आम्ही घालवणारच!
भास्कर - पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की, राममंदिर झाल्यावर कुठलाही नवा वाद काढायचा नाही. आता नव्याने भांडणे काढायची नाहीत.
अविनाश - आम्ही काढणार. आम्ही सर्वोच्च न्यायालय बदलू.
समर - आरक्षणापासून प्रोटेक्शन हवं असतं, तेव्हा तुम्हाला सर्वोच्च न्यायालय हवं असतं! मशीदींचा विषय आला की नको असतं.
नाना - आमचं असंच आहे. तुम्हाला काय करायचे ते करून घ्या.
भास्कर - आम्ही काय करणार आहोत? सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. घटनेवर आमचा विश्वास आहे आमचा.
अविनाश - वेळ पडली तर आम्ही सर्वोच्च न्यायालय बदलू, घटनासुद्धा बदलू.
समर - जनता बरी बदलू देईल घटना. दलित बरे बदलू देतील आंबेडकरांनी केलेली घटना.
भास्कर - मोठं आंदोलन उभं राहिलं, तर तुम्ही काय करणार आहात?
अविनाश - आम्ही विरोधी पक्ष राहू देणार नाही. सगळ्यांना तुरुंगात टाकू.
भास्कर - शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहिलं, तेव्हा पाहिलंय आम्ही मोदीजी माघार कशी घेतात ते.
अविनाश - (संतापानं थरथरत) ती माघार नव्हती, देशहितासाठी घेतलेला निर्णय होता तो!
भास्कर - मग जे कायदे मोदीजींनी मागे घेतले, तेव्हा ते देशहितासाठी केले नव्हते का?
अविनाश - तुम्हाला सगळ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. विरोधी पक्षातल्या सगळ्या लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे. देशद्रोही!
भास्कर - विरोधी पक्षाला तुरुंगात टाकून प्रश्न संपत नाहीत. पाकिस्तानात पाहिलंस ना काय झालंय?
अविनाश - काय झालंय?
भास्कर - इम्रान खान निवडून येऊ नये म्हणून त्याला तुरुंगात टाकलं. त्याच्या पक्षाची नाकेबंदी केली. त्याच्या पक्षाच्या उमेदवारांना पक्षाचं चिन्ह आणि नाव मिळू दिलं नाही. त्याच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. असं सगळं झालं, तरी जनतेने त्याच्या नव्वद लोकांना निवडून दिलं.
नाना - असं काही होणार नाही इथं. लोक एन्जॉय करतील विरोधकांना तुरुंगात टाकलं तर! मोदींवर विश्वास आहे लोकांचा.
अविनाश - मोदीजींनी राममंदिर केलं आहे. दुबईमध्ये स्वामीनारायण मंदिर केलं आहे. मोदीजी ‘ग्यानवापी’ मशीद पाडणार आहेत, मोदीजी शाही इदगाह मशीद पाडणार आहेत. ते ‘हिंदू-हृदय सम्राट’ झालेले आहेत.
भास्कर - मग लवकर तुरुंगात टाकून दाखवा विरोधकांना!
अविनाश - दाखवतील दाखवतील. मोदीजींना कसलीही घाई नसते. मोदीजी कधीही घाई करत नाहीत.
समर - मग मंदिर पूर्ण झालेलं नसताना श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची घाई कशाला केली त्यांनी?
अविनाश - तू गप्प बस! मूर्ख कुठला!
भास्कर - मंदिराचा कळस डिसेंबर २४मध्ये बसणार आहे. तो बसल्यावर करायची प्राणपतिष्ठापना!
नाना - मोदीजी कधीच घाई करत नाहीत याचा अर्थ कधी घाई करायची, हे त्यांना कळत नाही असं नाही.
अविनाश - २२ जानेवारीचा मुहूर्त महत्त्वाचा होता. मंदिराच्या पूर्ततेपेक्षा मुहूर्त जास्त महत्त्वाचा असतो!
भास्कर - का लोकसभेच्या निवडणुका धर्म-शास्त्रापेक्षा मोठ्या असतात? (जोरात हसतो)
अविनाश - मोदीजी लोकसभेच्या निवडणुका तशाही जिंकलेच असते.
अच्युत - मी तुला एक विचारू का भास्कर?
भास्कर - विचार की!
अच्युत - तुम्ही लिबरल लोक चांगलं वाचन करता, पण तरीही भारतीय मनासाठी धर्म किती महत्त्वाचा आहे, हे तुमच्या लक्षात का येत नाही?
भास्कर - हे बघ, धर्म महत्त्वाचा आहे, हे आम्हालाही कळतंय. पण राजकारणाची आणि धर्माची गल्लत का करायची?
पांडेजी - सही कह रहें हैं अच्युतजी! गांधीजी ये बात समझ चुके थे! लिबरल लोगोंको इस बारे में चिंतन करना होगा!
भास्कर - धर्म आणि राजकारण एकमेकांपासून दूरच बरे! इतिहासानं दाखवून दिलं आहे अनेक वेळा.
समर - कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे राममंदिर झालं, त्याची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधानांनी कशाला करायची? शंकराचार्यांना द्यायला पाहिजे होता तो मान!
अच्युत - पण सगळ्या शंकराचार्यांनी विरोध केला होता, अपूर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करायला.
नाना - त्यांना काय कळतंय धर्मातलं?
अविनाश - काँग्रेसकडून पैसे खाऊन त्यांनी ऑब्जेक्शन्स काढली.
भास्कर - म्हणजे शंकराचार्यांपेक्षा मोदीजी मोठे का धर्माच्या बाबतीत.
अविनाश - प्रश्नच नाही! शंकराचार्य फक्त धर्मगुरू आहेत. मोदीजी स्वतः अवतार आहेत विष्णूचे!
पांडेजी - आप समझ नहीं रहें हैं भास्कर. कई भारतीय लोगों को कुछ लेना-देना नही हैं की राम-मंदिर मोदीजीने बनवाया या कोर्ट के निर्णय से हुआ. उनका कहना हैं की, राममंदिर प्रभु रामलला की इच्छा से हुआ हैं.
अच्युत - तुम्हा लिबरल लोकांच्या भूमिकांमुळे हे धार्मिक लोक दुखावले जातात. तुमच्यापासून दूर जातात.
पांडेजी - ये कमीं हैं आप लिबरल लोगों की! आपकी वजहसे इन लोगों को कोई चारा नहीं रह जाता. वो लोग मोदीजी की पीछे चले जाते हैं.
अविनाश - असं काही नाहिये पांडेजी. मोदीजी हे ‘धर्मसूर्य’ आहेत. त्यांच्या दिव्य प्रकाशात नाहून निघायचं भाग्य प्रत्येक भारतीयाला लाभलं आहे. प्रत्येकानं त्याचा लाभ घ्यायला हवा.
(भास्कर जोरात हसतो)
अविनाश - इतकं जोरात हसायला काय झालं रे ‘अर्बन नक्षल्या’?
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
भास्कर - परवा बर्ट्रंड रसेलचं फॅसिस्ट लोकांच्या कार्यपद्धतीविषयीचं एक वाक्य वाचनात आलं ते आठवलं म्हणून हसलो.
समर - (हसत) कुठलं वाक्य?
भास्कर - First they fascinate the fools and then they muzzle the intelligent.
अविनाश - तू ‘अर्बन नक्षली’ आहेस. मूर्ख साला!
पांडेजी - अविनाशजी इतने भड़क उठे हैं, तो हमे भी बतलाई उसका मतलब!
भास्कर - फॅसिस्ट लोक सुरुवातीला खोट्यानाट्या गोष्टी पसरवून समाजातील मूर्ख लोकांचे डोळे दीपवून टाकतात आणि नंतर त्या मूर्खांचा वापर करून समाजातल्या बुद्धिमान लोकांची मुस्कटदाबी करतात.
पांडेजी - बाप रे बाप!
अविनाश - चला नाना आपण जाऊ! बास झाला मूर्खपणा! एका अवतारी पुरुषाला फॅसिस्ट म्हणतायत हे लोक
नाना - आणि देशभक्तांना मूर्ख!
(नाना उठू लगातात)
पांडेजी - (तेवढ्यात ) अरे नानाजी भजियाँ तैयार हैं!
(पांडेजी पटकन भज्यांच्या प्लेट्स आणून ठेवतात. भजी बघून नाना परत बसतात.)
नाना - बस अविनाश. भजी खाऊन नंतरच जाऊ. निषेधाचा वॉक-आऊट काय भजी खाऊनही करता येतो! अन्न ब्रह्माकडं पाठ करून वॉक-आऊट करणं योग्य होणार नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
खरं तर पांडेजी आणि अच्युत यांचा मुद्दा विचार करण्यासारखा होता. पण त्यावर विचार करण्याच्या मनःस्थितीत दोन्ही बाजू नव्हत्या. गांधीजीच्या मृत्यूनंतर गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांकडे दुर्लक्ष झाले होते. गांधीजींनी खरा धर्मविचार आणि मानवता एकमेकांच्या विरोधात कसे नसतात, हे दाखवून दिलेले होते. गांधीजींचे राजकारण धर्मभावनेला आपले म्हणत होते. कुठल्या एका धर्माला आपले म्हणत नव्हते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. परंतु पुढच्या काळात गांधीजींच्या विचारांकडे कोणी लक्ष दिले नाही. घटना आणि त्यातून वाहणारी मानवतेची मूल्ये राज्यशकट हाकण्यासाठी पुरेशी आहेत, असे मोठ्या मोठ्या विचारवंतांनाही अनेक दशके वाटत राहिले. यामुळे जी पोकळी निर्माण झाली, ती जहाल धर्मविचारावर आधारित राजकारणाने भरून काढली.
२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला.
‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे. इतिहासाचे हे आवर्तन पलटणे, हा एकच उपाय त्यावर होता. हे आवर्तन लवकर पलटावे यासाठी लिबरल्स मानवतावादी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्योगात होते.
शिरोजी हे सगळे पाहात होता. गांधीजींचा विचार त्याला मोहवत होता. माहितीप्रसरणाच्या या युगातही कायम राहिलेल्या मोदीभक्तांच्या घनघोर अज्ञानाकडे तो आश्चर्याने पाहत होता. त्याच वेळी तो लिबरल विचारवंतांच्या अदूरदर्शी पोथीनिष्ठतेमुळे तो व्यथितही होत होता.
ही, बखर लिहून झाल्यावर शिरोजीने अत्यंत व्यथित मनाने आपल्या रोजनिशीमध्ये इंग्रजी कवी मॅथ्यू आर्नल्ड याच्या ओळी लिहून ठेवल्या आहेत. त्या अशा -
“Swept with confused alarms of struggle and flight,
Where ignorant armies clash by night.”
(“गोंधळ आणि युद्धाच्या हाका यांच्यामुळे एकच घावपळ माजली होती,
अज्ञानात आकंठ बुडालेली सैन्ये रात्रीच्या अंधारात एकमेकांशी लढत होती.”)
भारत देश धोक्यात आहे, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल या दोन्ही पक्षांना वाटत होते. मोदीभक्तांना वाटत होते की, मुसलमानांकडून भारताला धोका आहे. लिबरल्सना वाटत होते की, फॅसिस्ट शक्तींकडून भारताला धोका आहे. भविष्य दोघांनाही दिसत नव्हते. आणि भविष्यात काय घडणार आहे, या अज्ञानाच्या अंधारात ही अज्ञानात बुडालेली विद्वेषी सैन्ये, द्वेषाच्या घनघोर रात्रीच्या गर्भात एकमेकांशी निकाराची लढाई लढत होती.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment