मा. निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे आणि साथींनो, बंद करा ‘निर्भय बनो!’
‘भारत हा भयमुक्त असतानाही चार टाळकी उठून ‘निर्भय बनो’ म्हणत आपला अजेंडा रेटत आहेत,’ हे विधान मला कालपर्यंत खरं वाटत नव्हतं. पण विचार केला की, जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा शहराध्यक्ष सांगतोय, तर त्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे.
मी ‘तटस्थ’ आहे आणि तिसऱ्या ग्रहावर असतो. इथं जमिनीवर थांबलं की, कुठली न कुठली बाजू घेतली जाते. तिकडून कसं आपला काही संबंध नसल्यागत उपदेश करणं सोपं जातं. अंगाला काही चिकटत नाही.
तर, तिकडून तटस्थपणे दुसरी बाजू बघायचा मी प्रयत्न केला, तेव्हा ‘त्यांच्या भारता’च्या ‘भयमुक्ती’ची ‘सत्यता’ पूर्वलक्षी प्रभावाने लक्षात आली!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
तुमच्यावरील हल्ल्याच्या परवाच्या घटनेपासून सुरुवात करू.
‘निर्भय बनो’ सभा होऊ नये, म्हणून सभा उधळण्याची धमकी देणारे निर्भयपणे वावरत होते. त्यांना ‘भय नको’ म्हणून पोलीस तुमच्या शेजारी बसून होते. तुम्ही सभेला हट्टाने जायला निघालात, तर त्यांच्या आणि तुमच्या मध्ये कशाला घुसा, उगाच हल्लेखोर घाबरले तर ‘भयमुक्ती’ला ग्रहण लागायचं, असा सूज्ञ विचार करून ते मागे थांबले असावेत. परिणामी पोलीस असतानाही हल्लेखोर ‘निर्भय’पणे हल्ले करताना दिसतात. पोलिसांनाही वागळेंचे डोके फुटले तरी वरिष्ठच काय, पण गृहमंत्रीही काही बोलणार नाहीत, असा विश्वास असावा. त्यामुळे तेही ‘निर्भय’ होते. पोलिसांना एवढा मोकळेपणा कोण देतो आजकाल?
तसे गृहमंत्री अभ्यासू आणि हुशार माणूस. इथे सत्ता नसतानाही, सेलेब्रिटी आत्महत्येच्या केसमध्ये, मृताच्या घरच्या चिलटांच्या बुडाच्या घामाचा डीएनए तपासायला पाच-पाच केंद्रीय यंत्रणा कामाला लावेल आणि ‘नॅशनल मीडिया’वर ते गाजवत राहील, या क्षमतेचा सखोल अभ्यासू! त्याला हवं असतं, तर ‘धमकोगिरी हीरो’ला आधीच आवरलं असतं की!
आता गेले काही दिवस राज्यात रोज कोणीतरी कोणाला तरी गोळ्या घालतंय! परवा तर यांच्या आमदाराने भर पोलीस ठाण्यात ‘निर्भय’पणे सहा गोळ्या झाडल्या. त्यांना राजीनामा मागितला, तर त्यांनी ‘निर्भय’पणे नाकारला.
‘निर्भय’पणा असा फुकट भेटत नाही!
पहाटे पहाटे गुपचूप शपथविधी करायचे, एवढं लपून-छपून हुडी घालून रात्री जायचं, कट करायचा, एका हातात दंडुका, दुसऱ्या हातात बक्षीस घेऊन आमदार फोडायचे. मग सुरत काय, गुवाहाटी काय, गोवा काय किती ठिकाणी खोके हलवायचे, कमी खर्च असतो का?
एवढ्या कष्टानं मुश्किलीनं मिळवलेली सत्ता अशी कुत्रं गाडीखाली आलं म्हणून घालवायची? आणि का म्हणून?
राज्य काय, राष्ट्रीय स्तरावरही ‘भयमुक्त’ कमी नमुने नाहीत.
यांच्या बाहुबली खासदारावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या महिला खेळाडूंशी लैंगिक गैरवर्तन करण्याचे आरोप झाले. त्यात अल्पवयीन मुलीचा समावेश असल्याने लगेच अटक करावी लागते. पण पोलिसांनी आधी तक्रार नोंदवून घ्यायचे ‘निर्भय’पणे नाकारले, नंतर गुन्हा दाखल करायचे नाकारले. बाहुबली भाऊ अतिशय ‘निर्भय’पणे या काळात मुलाखती देत मोकाट वावरत होते.
त्या मुलीच्या बापाने तक्रार मागे घ्यावी, यासाठी पोलिसांनी कायद्यालाही न घाबरता ‘निर्भय’पणे भरपूर वेळ दिला. आंदोलन करणाऱ्या ताकदवान आंतरराष्ट्रीय पैलवान-कुस्तीगिरांनाही पोलीस घाबरले नाहीत. त्यांना ‘निर्भय’पणे फरफटत नेऊन गाडीत घातले. यथावकाश हे भीतीदायक आंदोलन चिरडले गेले. सत्ता ‘भयमुक्त’ झाली.
त्या आधीही शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जमून मोठ्या संख्येने शेती कायदे परत घ्यावेत, म्हणून आंदोलन करत असताना त्यांच्यावर ‘वॉटर कॅनन’चा मारा करणे, वाटेत खंदक खणून ठेवणे, अडथळे उभे करणे, वीज-पाणी तोडणे, इतकेच काय पण रस्त्यावर खिळ्यांचे पट ठोकणे, अशी शौर्याची कामे केली गेली. एखादा महान नेता असे करायला घाबरला असता, आंदोलकांना भेटायला गेला असता. पण हा अत्यंत ‘निर्भय’ माणूस. ओव्हरब्रीजवर झेंडेधारी निदर्शकांना न घाबरता परत पळून विमानतळ गाठलेला! शेतकरी आंदोलनात शेकड्यांमध्ये आंदोलक मेले तरी हा ‘निर्भय’ माणूस जागचा हलला नाही!
आंदोलक शेतकऱ्यांना एक केंद्रीय मंत्री जीवे मारायची धमकी देतो, मग त्याचा मुलगा शेतकऱ्यांना जीपखाली चिरडून मारतो, तरी हा मंत्री ‘निर्भय’पणे मंत्रीपदी राहतो.
दोन वर्षे लोटली. कालपासून पुन्हा शेतकरी दिल्लीला जायला निघालेत आणि त्यांच्या मार्गावर खंदक, भती, काटेरी तारा आणि खिळे अंथरले गेले आहेत.
किती उदाहरणं द्यायची!
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा
.................................................................................................................................................................
भानगडी करून पळालेला ललित मोदी त्यांच्या ‘अनुकंपा’ तत्त्वामुळे जगभर ‘निर्भय’पणे फिरतो. नीरव मोदी बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून ‘निर्भय’पणे प्रॉपर्टीसाहित निघून जातो. मेहुल चोक्सी तेच करतो. ज्या गांधींनी ‘निर्भय बनो’ हा मंत्र दिला, हे सगळे त्यांच्या गुजरातमधलेच. गांधींची शिकवण अशी ते आचरणात आणतील, अशी कल्पना तरी तुम्ही करू शकता का?
त्यानंतर विजय मल्ल्या बघा. देशाबाहेर जायचे निर्बंध महिन्यासाठी उठतात काय, हे कर्ज बुडवून पैशांसहित ‘निर्भय’पणे राजरोस उडून जातात. कोणाच्या आदेशाने यांना महिनाभर सूट मिळाली, त्याच्यावर काय कारवाई झाली, ते मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. तोही ‘निर्भय’ असणार.
मीडियात जरा काव काव झाल्यावर, कोणाकोणाला प्रसाद वाटप केले आहे, याची यादी जाहीर करू का, म्हणून मल्ल्याने ‘निर्भय’पणे विचारताच, तपास, अटक, खटले याबाबत सर्वांनी चकार शब्द काढणे बंद केले. त्यामुळे ‘निर्भय’पणाचा हा सिलसिला इतरांनीही पुढे चालवला, तो अद्याप चालू आहे.
त्याहून ‘निर्भय’ माणूस म्हणजे नित्यानंद बुवा. हा भोंदू लैगिक गैरव्यवहारात रेड हॅन्ड सापडूनही ‘निर्भय’पणे फिरतो आणि देशाबाहेर जाऊन एक बेट विकत घेऊन तिथं ‘कैलास’ नावाचं राष्ट्र स्थापन करतो.
दुसरा एक खुनी बलात्कारी गुन्हेगार भोंदूबुवा इलेक्शन आल्या की, तुरुंगातून पॅरोलवर सुटून ‘निर्भय’पणे यांचा प्रचार करतो.
तिसरा, सलवार नेसून पळालेला घाबरट भोंदूबुवा, पुढे २०१४ला ‘निर्भय’ उद्योजक होतो. ‘निर्भय’ सरकारच्या कृपेने जागोजागी त्याला जमिनी मिळतात. तो ‘निर्भय’पणे थेट देशातला टॉप श्रीमंतांच्या यादीत पोचतो. तोही बेट वगैरे विकत घेतो.
‘निर्भयपणा’चे किती नमुने सांगावेत!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
देशातले तमाम बारीक-मोठे भोंदू बुवा-बाबा यांच्या कुशीत शिरून ‘निर्भय’पणे फुत्कार सोडत असतात.
एकतर्फी दंगलीत अनेक हत्या, बलात्कार आणि गर्भातली भ्रूणहत्या, जाळपोळ केलेले तुरुंगातील गुन्हेगार, मुदतपूर्व मोकाट सोडण्याचा निर्णय ‘निर्भय’पणे त्यांची विधानसभा घेते आणि ते ‘निर्भयवीर’ गुन्हेगार बाहेर आल्यानंतर ‘त्या’ मर्दुमकीबद्दल त्यांना ओवाळायला यांच्या ‘निर्भय’ स्त्रिया पुढे येतात. पेढे वाटले जातात.
उन्नाव असो, हाथरस असो, सगळीकडे ते त्यांच्यातल्या खुनी बलात्काऱ्यांची ‘निर्भय’पणे पाठराखण करतात.
त्यामुळे त्यांचा पक्ष मॉबलिंचर्स, धर्मांधांचे माहेरघर, खुनी बलात्काऱ्यांचे अभयारण्य, भ्रष्टाचाऱ्यांचे आश्रयस्थान, गुन्हेगारांचा कट्टा, घोटाळेबाजांचा तारणहार झालेला आहे. इतकंच काय, पण पूर्वी महाभयंकर भासणारी समस्त पत्रकारबाळं मालकांसकट आता त्यांच्या मांडीवर खेळतात.
पोलीस, सरकारीबाबू, निवडणूक आयोगच काय, पण कोर्टही त्यांनी प्रेमानं आपलंस करून घेतलेलं आहे. कोर्टाची आधी त्यांना ‘भीती’ वाटायची. आता त्यांना न्यायाची ‘खात्री’ असते.
बघा, इतकं ‘भयमुक्त’ वातावरण गेल्या सत्तर वर्षांत पूर्वी कधीतरी होतं का?
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा
.................................................................................................................................................................
...पण,
यासाठी एक छोटीशीच अट आहे...
तुम्ही टुण्णकन उडी मारून त्यांच्या बाजूला जायचं!
रोज कोणी ना कोणी टुण्णकन उडी मारून तिकडं जातंय. जगातली ‘ती’ एकमेव महान उडीसुद्धा फिकी पडावी अशा या उड्या!
‘भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भ्रष्टाचार वाढवावा’ हेच धोरण!
भोंदुत्ववादाचा एक पतित-पावन वज्रलेप आहे, त्याने पापांसह माणूस ‘पावन’ होतो. शिवाय पापं चालूही ठेवू शकतो.
इन्स्टंट ‘भयमुक्ती’ मिळते… ‘ईडी’ची ‘पीडा’ टळते!
यामुळे ‘केसेस’ वाढायच्या थांबून, फायली गहाळ होतात, शिवाय डोकं शांत राहून झोपही छान लागते.
या सगळ्यावर निर्लज्जपणा फ्री फ्री फ्री (म्हणजे मुक्त)….
आपण काल काय बोललो होतो, आपण आज काय वागलो, याची संगती लावणं कधीच सुटलेलं असतं.
रेटून कितीही खोटं बोला, स्वतः थुंकलेलं पुन्हा गिळा, कालच्या शत्रूला डोक्यावर घेऊन नाचा, कालच्या मित्राचा काटा काढा!
जनतेची मालमत्ता कवडीमोलाने दोस्तांना फुंका, जनतेच्या बँका धनदांडग्या दोस्तांना ‘निर्भय’पणे लुटू द्या!
रोजगार मागणाऱ्या स्वाभिमानी कष्टकऱ्याला, काम न देता त्याच्याच पैशाने धान्याची भीक घालून उपकाराखाली दबवा, लाचार बनवा!
काही खंत ना खेद!
भोंदुत्ववादाच्या या वज्रलेपामुळे सगळं काही नैतिक आणि पावन होतं, अगदी गंगेत डुबकी मारल्यासारखं!
‘नाही पुण्याची मोजणी,
नाही पापाची टोचणी,
जिणे गंगौघाचे पाणी!’
अशी ही आध्यात्मिक अवस्था बरं!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
अशा शांततेत तुम्ही ‘निर्भय बनो’ किंचाळता आणि जनता जागी होते.
मुश्किलीनं ‘लल्ला लल्ला लोरी’ म्हणून, धर्माची चोखणी देऊन झोपवलेल्या लेकरांना असं किंचाळून कोणी जागं करतं का?
मग ही गुंगीतून उठलेली लेकरं लोकशाहीचा हट्ट करायला लागतात.
तुम्हाला म्हणून सांगतो, लोकशाही\डेमोक्रसी ही ‘निर्भयपणा’साठी भयंकर ‘डेंजरस’ गोष्ट आहे.
त्यामुळे ‘सत्ता जाईल’ ही तलवार कायम मानेवर टांगलेली राहते.
मग पुन्हा आमदार फोडायचे…. मग सुरत काय, गुवाहाटी काय, गोवा काय! किती वेळा खोके हलवायचे? कमी कष्ट असतात का? क्यो मियां उन से और पाप करवाते हो?
सत्ता नसेल तर ‘भयमुक्त’ वातावरण कसं राहील?
त्यांनी जेवढी म्हणून मर्दुमकी ‘निर्भय’पणे गाजवली आहे, ती सत्ता असताना... मग बाबरी पाडायची असू दे, नाहीतर गुजरात दंगल असू दे...
पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणार ना?
निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे, ‘बलात्कार न करणं ही सगुणविकृती’. खुद्द त्यांचे ‘वीर’ असं लिहून ठेवतात. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे.
२०१४नंतर तर सगळं राष्ट्र अभयारण्य झालं आहे. अरण्य अर्थात् जंगलचा कायदा आणून ते भोंदूराष्ट्र स्थापन करणार आहेत म्हणे!
मग बरे-वाईट, खरे-खोटे, दुबले-मोटे सगळे एकाच साईडला ‘समरस’तील.
मग काय, एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील.
एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा.
टागोरांची एक कविता आहे -
चित्त जिथे भयशून्य - where the mind is without fear.
मुखडा तसाच ठेवून, त्याचे अंतरे ते कालानुरूप बदलणार आहेत म्हणे! तसेही ‘गुरुदेव’ टागोरांच्या वेशात ‘विश्वगुरू’ शोभून दिसतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
तर,
निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे आणि साथींनो,
‘भयमुक्ती’च्या या दिशेनं राष्ट्राची इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की? ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा!
बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!
आपला,
तटस्थ (तिसऱ्या ग्रहावरून)
टीप - हे पत्र निव्वळ मनोरंजनासाठी असल्याने आणि काय खरं काय खोटं हे आजकाल कळेनासं झाल्याने, यामध्ये सत्याचा काही अंश आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
भारत संपूर्ण ‘भयमुक्त’ झाल्याबरोबर ही टीप काढून टाकण्यात येईल! कारण तेव्हा बहुधा एकच सत्य राहील, सत्याची ‘व्हर्जन्स’ संपलेली असतील.
‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकाच्या फेब्रुवारी २०२४च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
लेखक मिलिंद जोशी ग्राफिक डिझाइनर आणि छायाचित्रकार असून, ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ तसेच इतर पुरोगामी चळवळींशी संबंधित कार्यकर्ते आहेत.
naturemilind@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment