…आधी काँग्रेसची ढासळणारी ‘तटबंदी’ सांभाळा!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 17 February 2024
  • पडघम राज्यकारण काँग्रेस Congress अशोक चव्हाण Ashok Chavhan नाना पटोले Nana Patole

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याच्या घटनेचा धुरळा आता खाली बसण्यास सुरुवात झाली आहे. चारपेक्षा जास्त दशकं अशोकराव काँग्रेसच्या राजकारणात मुंबईपासून दिल्लीपर्यंत वावरले. त्यांना पाच वेळा विधानसभेत आणि दोन वेळा लोकसभेत काँग्रेसचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ते दोन वेळा मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षही होते.

म्हणजे पक्षानं त्यांना भरपूर काही दिलं आहे, तरी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. स्वत:चा आब राखून राजकारण करण्याची अशोकरावांची शैली आहे, वचावचा बोलण्याचा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे कोणतीही आगपाखड न करता, काँग्रेसवर टीकेचे विखारी बाण न सोडता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना घाबरून काँग्रेसचा त्याग करावा लागणार असेल, तर त्यांनी याआधीच तो निर्णय घेतला असता.

शिवाय आता राजकारणात फार काही त्यांना मिळवायचं बाकी राहिलं आहे, असंही नाही. काँग्रेसचा त्याग केल्यावर काँग्रेस नेते, माध्यमे आणि राजकीय विश्लेषकांनी केलेल्या विखारी टीकेलाही अद्याप त्यांनी उत्तर दिलेलं नाही, ते जेव्हा बोलतील, तेव्हाच त्यांच्या पक्ष सोडण्याचं नेमकं कारण समजेल.

पण मुळात मुद्दा अशोकरावांनी काँग्रेसचा त्याग करण्याचा नाही, तर राज्यातील काँग्रेसच्या होत चाललेल्या संकोचाचा आहे. पक्षांतरं, फूट पडण्याची देशाच्या राजकारणातील ही काही पहिली घटना नाही. खुद्द काँग्रेसमध्येच आजवर अनेकदा फूट पडलेली आहे; अनेकांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेही आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

महाराष्ट्रापुरतं बोलायचं, तर यशवंतराव चव्हाण ते शरद पवार असा काँग्रेस सोडण्याचा आणि ‘परतवारी’चा लांबलचक इतिहास आहे. या व्यापक पटावर वावरलेल्यांनी पक्षत्याग आणि ‘परतवारी’ची स्पष्टीकरणंही दिलेली आहेत. ती सर्व पटणारी आहेत, असंही नाही.

महाराष्ट्रात काँग्रेसने फुटीचे अनेक आघात पचवलेले आहेत. इंदिरा काँग्रेस आणि संघटना काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस मार्गे ‘पुलोद’ सरकारसाठीचा ‘खंजीर प्रयोग’, असे अनेक दाखले या संदर्भात देता येतील. या काळात नरेंद्र तिडके (१९७८) ते आता नाना पटोले असं नेतृत्व राज्यात काँग्रेसला लाभलं. अत्यंत कठीण काळात प्रमिलाकाकी चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांना साथ दिली होती. त्यानंतर एकही बलदंड प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला लाभला नाही. परिणामी राज्यात काँग्रेसचा संकोच होत गेला, हे विसरता येणार नाही.

त्याच म्हणजे इंदिराजी गांधींच्या काळापासून साध्या तालुका अध्यक्ष नेमण्याचेही अधिकार प्रदेशाध्यक्षांना राहिले नाहीत, इतका हा पक्ष दिल्लीच्या ‘किचन कॅबिनेट’च्या ताब्यात गेला. पक्षाची संघटनात्मक बांधणी करणारं नेतृत्व अस्तास गेलं आणि राज्यातले नेते दिल्लीच्या ‘कृपे’वर अवलंबून राहू लागले. पक्षाची संघटनात्मक वीण विसविशीत होत जाण्याचा हा काळ होता आणि त्याचा कधी फारशा गांभीर्यानं विचार झाला नाही, अजूनही होत नाही.

१९९५नंतर तर काँग्रेसला राज्यात विधानसभा निवडणुकीत कधीही १०० जागांचा आकडा गाठता आलेला नाही. लक्षात घ्या, नेमका हाच काळ भारतीय जनता पक्ष हळूहळू राज्यात आणि देशातही विस्तारण्याचा आहे. असं असलं तरी काँग्रेसचा मताधार मात्र जागांच्या प्रमाणात घटलेला नाही.

राज्यात काँग्रेस पक्षाचा मोठा संकोच होण्याची सुरुवात २००९च्या विधानसभा निवडणुकीपासून झाली. पक्षाच्या जागा ८२ इतक्या कमी झाल्या आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीत तर त्या ४२वर आल्या. २००९मध्ये काँग्रेसचे राज्यात लोकसभेवर १७ उमेदवार विजयी झाले होते. हा आकडा २०१४मध्ये २वर आणि २०१९मध्ये १वर आला! मात्र असं असलं, तरी २००९च्या निवडणुकीत काँग्रेसला ७२ लाख ५३ हजार ६३४ मतं होती आणि २०१४च्या निवडणुकीत हा आकडा ८८ लाख ३० हजार १९० इतका होता.

मताधार कायम असूनही जागा कमी होत गेल्या, कारण विलासराव देशमुख यांच्यानंतर सर्वार्थानं राज्यभर संपर्क असणारा एकमुखी नेताच काँग्रेसकडे उरला नाही. राज्याचं मुख्यमंत्रीपद १९९५नंतर काँग्रेसकडे आलं, पण ते राष्ट्रवादीच्या कुबडीवर आणि नेमक्या याच काळात प्रदेशाध्यक्षही दुबळे लाभले. राज्यात संघटनेत चैतन्य निर्माण करणारा प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पक्षाला लाभला नाही. माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून विक्रमी काळ राहिले, पण पक्षाला राज्यव्यापी नेतृत्व देण्यात ते साफ अयशस्वी ठरले आणि दिल्लीतल्या ‘हाय कमांड’नेही त्याकडे लक्ष दिलं नाही.

प्रदेशाध्यक्ष किती दुबळा झाला, तर पक्षाध्यक्षाच्या संमतीचा एकही उमेदवार २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ‘हाय कमांड’ने दिला नाही. अखेर आक्रमक भूमिका घेतल्यावर प्रदेशाध्यक्षांच्या शिफारशीनुसार केवळ एकाला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. तोही शिवसेनेतून आयात करण्यात आलेला होता. आणि तोच एकमेव उमेदवार राज्यातून विजयी होणारा ठरला.

तेव्हा प्रदेशाध्यक्ष अशोकरावच होते! त्यांच्या नाराजीची बीजं तेव्हापासून अंकुरायला सुरुवात झाली, असं म्हणायला भरपूर वाव आहे.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल तर बोलावं तितकं कमीच. खरं तर, उद्धव ठाकरे यांनी भाजपशी केलेली निवडणूकपूर्व युती तोडली, म्हणून काँग्रेसला पुन्हा सत्तेत येता आलं, पण ही सत्ता घालवण्याचं मुख्य श्रेय पटोलेंचं आहे. त्यांनी तडकाफडकी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं, तेही सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी-शिवसेनेला न सांगता.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा

‘घराणेशाहीचे कांदे’ नाकाने सोलण्याचा भाजपचा ‘नस्ता’ उद्योग!

नितीश कुमारांची अगतिकता...

‘रामा’बाबत काँग्रेसचा गाफीलपणा!

कोंडीत सापडलेले उद्धव ठाकरे...

भाजपची हडेलहप्पी!

.................................................................................................................................................................

पुढे काय घडू शकेल, यांचा अंदाज न घेता विधानसभा अध्यक्षपदी वेगवेगळ्या कारणांनी सत्ताधारी आघाडीतील कुणाचीच निवड करता आली नाही आणि आधी शिवसेनेत व नंतर राष्ट्रवादीत फूट पडली, तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची कधीच न सुटू शकणारी राजकीय कोंडी झाली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना तर केविलवाण्या पद्धतीनं ‘बॅकफूट’वर जावं लागलं. अध्यक्षपद जर रिक्त नसतं, तर राज्यात काँग्रेस, आधी उद्धव ठाकरे आणि नंतर शरद पवार यांना राजकीय ‘अरण्यरुदन’ करण्याची वेळच आली नसती! 

(बाय द वे, राष्ट्रवादीचे एक दिग्गज नेते गेल्या आठवड्यात म्हणाले, त्या काळात आमच्या आघाडीत इतकी बेदिली माजलेली होती की, पुन्हा निवडणूक झाली असती, तर विधानसभा अध्यक्षपदी आमचा उमेदवार निवडून येण्याची कोणतीही शक्यता उरलेली नव्हती. आणि हे घडलं ते केवळ पटोलेंच्या एककल्ली वागण्यामुळे!)

प्रदेशाध्यक्ष म्हणूनही पटोले किमान प्रभावी ठरलेले नाहीत, कारण ते चांगले ‘स्ट्रीट फायटर’ असतीलही, पण धोरणी राजकारणी म्हणून हवी असणारी दीर्घ दृष्टी त्यांच्याकडे मुळीच नाही, ते लघुदृष्टीचे (Myopic) आहेत. केवळ अशोकरावच नाही, तर मिलिंद देवरा, बाबा सिद्दकी, आशीष देशमुख हे नेते पक्ष सोडणार आहेत; पक्षाच्या बैठकीला सहा आमदार अनुपस्थित राहणार आहेत (म्हणजे राज्यसभेची निवडणूक झाली असती, तर मतं फुटून काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला असता) याचा अंदाज त्यांना येत नाही, कारण त्यांचा संपर्क राज्यव्यापी नाही. पक्षातील जुन्याजाणत्या आणि विद्यमान ज्येष्ठ नेत्यांशी संवाद नाही, त्यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नागपूर ते मुंबई (मार्गे दिल्ली) एवढाच वावर आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘प्रदेश काँग्रेस’चा त्यांनी ‘विदर्भ काँग्रेस’ असा संकोच केलेला आहे. राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डातील १८पैकी ८ सदस्य विदर्भातील आहेत. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सोशल मीडिया, मुख्य प्रवक्ता अशी बहुसंख्य पदं विदर्भाकडे आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम पक्षात असंतोष होण्यात, कुरबूर वाढण्यात झालेला आहे.

अजून सर्व काही हातातून निसटलेलं नाहीये, हे लक्षात घेऊन पटोलेंनी स्वत:ला सावरावं. मिलिंद देवरा, बाबा सिद्दकी, आशीष देशमुख गेले, आता अशोकरावही गेले, त्यांचा काय जो ‘चिवडा’ होईल, त्याची चिंता पटोले आणि राज्यातील अन्य काँग्रेस नेत्यांनी सोडावी. गेलेल्यांचं ‘राजकीय भवितव्य’ काय यांची पतंगबाजीही सोडावी आणि पक्षाचा कोसळणारी तटबंदी सावरावी. ढासळणारे बुरुज भरभक्कम करावेत, त्यातच त्यातूनच प्रदेश काँग्रेसचं भलं होईल.

एकदा का बुरुज पूर्ण ढासळले आणि तटबंदी मोडून पडली, तर राज्यात काँग्रेसची ‘जीर्ण हवेली’ होईल, याचं भान विशेषत: पटोलेंना येणं, हे प्रदेश काँग्रेससाठी नितांत गरजेचं आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......