‘विवादे विषादे प्रमादे प्रवासे’ हे तुझं पहिलं पुस्तक, म्हणून ते पहिल्याप्रथम वाचायला घेतलं. पहिली तीस पानं वाचली, ती घरंगळली, किंवा मी वाचताना भेलकांडलो. डोक्यात गोतमकाला झाला. म्हणजे बुद्धीच्या घमेल्यात बोडण; आंबले तर आंबोण. वासाने सुस्ती, पेंग, झापड एकवटून. मग झोप उडाल्यावर पुन्हा वाचन.
मी जे सांगणार आहे, तो काही बांधीव निबंध नाही. तुझं लेखन वाचताना मनात जे आलं, जी ‘इम्प्रेशन्स’ उमटली, ती सांगतो. वाचत असताना वाचनाची एक पद्धत तयार होत जाते. आपण समजून घेत वाचत जातो; ती प्रक्रिया मी जे सांगणार आहे, त्यात कदाचित दिसेल. म्हणजे ही माझी आकलन-प्रक्रिया आहे. कारण तुझ्यासारख्या नवीन लेखकाचं लेखन वाचायचं म्हणजे माझ्यासारख्या जुन्या पिढीतल्या वाचकाला नव्या दृष्टीनं ते वाचता आलं पाहिजे; जुनी गृहितकं बाजूला ठेवता आली पाहिजेत. जुन्या आकलनपद्धतींना धरून राहिलो, तर नव्याचं नवेपण आम्हाला, मला समजणारच नाही.
तुझं लेखन अतिशय वेगळ्या धाटणीचं आहे. ‘सात गोष्टींचं पुस्तक’मधल्याही पहिल्या चार कथा वाचून झाल्या आहेत. ‘हिचकॉक’ आज रात्री वाचणार आहे. तुझी ‘नवल’ कादंबरी मी मुद्दाम मागे ठेवली आहे, कारण ते साडेतीनशे पानांचं मोठं प्रकरण आहे. मोठा ऐवज आहे. शिवाय कादंबरीचा फॉर्म तू कसा आपलासा केला आहेस, हे बारकाईनं बघायचं आहे. त्यामुळे ती मागाहून वाचणार आहे. आता तुझ्या लेखनाबद्दल मनात जमलेल्या काही गोष्टी सांगतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
पहिली गोष्ट अशी की, पूर्वीचं लेखन ‘हार्मनी’ला महत्त्व देणारं होतं. ती साधायची असं लेखकांचं उद्दिष्ट असायचं, परंतु ‘सिम्फनी’ ही ‘हार्मनी’हून वेगळी असते. ती मला तुझ्या लेखनात दिसते. ‘हार्मनी’मध्ये गायकाचं गायन आणि त्याला साथसंगत करणारी वाद्यं ही एकाच स्तरावर असतात. ती एकमेकांना पूरक असतात. त्यांचा मेळ जमतो. मेळपूर्ण परिणाम श्रोत्याच्या मनावर होतो.
‘सिम्फनी’त मात्र वेगळ्या पद्धतीचं संयोजन घडून येतं. मी एकदा झुबेन मेहताची लाइव्ह ‘सिम्फनी’ ऐकली होती. १९९०च्या आसपासची गोष्ट असावी. ‘सिम्फनी’मध्ये वाद्यं निरनिराळ्या स्तरांवर वाजतात. ती एकमेकांना पूरक असतीलच असं नाही. किंबहुना ती आपली भिन्नताच जपतात. परंतु या निरनिराळ्या घटकांमधूनही काहीएक संगती तयार होते आणि श्रोत्याला ती बरोबर जाणवते.
ही संगती ‘हार्मनिअस’ नसते, ती ‘सिम्फॉनिक’ असते. तुझं लेखन हे या प्रकारचा परिणाम साधतं. अनेक गोष्टी एकाच वेळी चालू असतात, प्रत्येक घटक आपल्या पद्धतीची भर घालतो, पण त्यांतून ‘सिम्फनी’सारखं काहीतरी आकाराला येतं. तुझ्या लेखनातले धागेदोरे ‘सिम्फनी’मय असतात.
दुसरी गोष्ट अशी की, तुझ्या भाषेत अवघडपणा अजिबात नाही. ती सहज समजणारी भाषा आहे. तिच्यात कसलीही ओढाताण नाही. परंतु त्या भाषेतून तू जे सांगतोस आणि सुचवतोस ते फार गुंतागुंतीचं असतं, फार ‘कॉम्प्लिकेटेड’ असतं. ते समजून घेण्यासाठी वाचकाला श्रम करावे लागतात.
आणखी एक गोष्ट अशी की, तुझ्या लेखनाचं सौंदर्य हे ‘डिस्टॉर्शन’चं सौंदर्य आहे. मी हर्बर्ट रीडचा एक निबंध समीक्षेचा पेपर शिकवताना वर्गात चर्चेला घेतला होता. ‘ब्युटी’ आणि ‘डिस्टॉर्शन’ यांचा काय संबंध असतो, याबद्दल रीड बोलतो. (हा बहुतेक ‘मिनिंग ऑफ आर्ट’ - फेबर अँड फेबर, लंडन, १९३१ - या हर्बर्ट रीडच्या पुस्तकातला ‘डिस्टॉर्शन’ या शीर्षकाचा विभाग असावा.)
१९७३-७४ साली डॉ. रा. शं. वाळिंबे यांच्यासह ‘क्रिटिसिझम’चा पेपर शिकवत असतानाची ही गोष्ट आहे. रीडचं उदाहरण पॉटरीचं, कुंभारकलेचं आहे. कुंभार दर वेळी सुबक आणि सुघड असा घाट निर्माण करत नाही. त्याने बनवलेलं प्रत्येक पात्र काही परिपूर्ण नसतं. कारण ते साचेबद्ध नसतं. कधीकधी तर तो मुद्दाम एखादा खळगा ठेवतो किंवा एखाद्या बाजूला जरासा बाक ठेवतो. म्हणजे तो बुद्ध्या ‘डिस्टॉर्शन’ घडवून आणतो. त्यामुळे पात्राला वेगळी सुंदरता लाभते. तुझ्या लेखनात असा एक पैलू दिसतो.
आपण नेहमी सुरूप विरुद्ध कुरूप अशी चर्चा करतो. एखादी वस्तू सुरूप नसेल, तर ती कुरूप आहे, असं आपण सहज म्हणून जातो. परंतु या दोन्हींहून निराळा असा तिसरा प्रकार असेल, अशी कल्पना आपण का करत नाही? सुरूप असतं, कुरूप असतं, तसं विरूपही असतं. विरूपतेलाही स्वतःचं सौंदर्य असतं. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरूपतेलाही स्वतःचं एक म्हणणं असतं. ते अर्थपूर्ण असतं. ते आपण समजून घेतलं पाहिजे.
अगदी वेगळ्या क्षेत्रातलं उदाहरण घेतो. आताची मुलं-मुली ज्या जीन्स घालतात, त्यांच्यापैकी काही जीन्स विटक्या असतात, त्यांचा रंग उडालेला असतो; तर काही जीन्स गुडघ्यावर मुद्दाम फाडलेल्या असतात. ही मुलं-मुली केस रंगवतात, हायलाइट करतात. हे कुरूप आहे का? हे विरूप आहे का? मला वाटतं हे विरूप असून त्यातून या मुलामुलींच्या मनात जे काही चाललं आहे, ते व्यक्त होतं. तो मानसिक गोंधळ नसतो, तर ते गुंतागुंतीचं म्हणणं असतं. म्हणजे विरूप आपल्याला काहीतरी खळबळीसारखं सांगत असतं. आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मला वाटतं की, तुझ्या लेखनात सुरूप-कुरूप या जोडगोळीच्या पलीकडचं काही असतं.
आता पुन्हा संगीताच्या क्षेत्रातलं उदाहरण घेऊ. कुमार गंधर्व असं म्हणत असत की, मला एखाद्या रागाची ‘प्रोफाईल’ दिसते, तशी मी तुम्हाला गाऊन दाखवतो. व्यक्तीची ‘प्रोफाईल’ असते, ती दिसते; पण रागाची ‘प्रोफाईल’ म्हणजे काय? राग ही काय व्यक्ती आहे? पण कुमारांना ती दिसते. हे जाणवणं आहे. हे दृष्टीला जाणवतं.
कुमार गंधर्व असंही म्हणत की, हमीर राग मला ‘ओणवा’ झालेला दिसतो. आता व्यक्ती ओणवी होते आणि चित्रकार – जर तो तशा प्रकारची चित्रं काढणारा असेल तर – चित्रात ओणवी झालेली व्यक्ती दाखवू शकतो, पण ‘ओणवा’ राग कसा दाखवणार? मुळात तो ओणवलेला दिसणार कसा? ते बघायला कुमारांची दृष्टी लागेल. ती गवसावी लागेल. माझ्यासारख्या जुन्या पिढीतल्या वाचकांना तुझ्या शैलीतलं लेखन वाचण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी अशी दृष्टी विकसित करावी लागेल. उडवून लावणं सोपं असतं; समजून घ्यायला वेळ लागतो.
मी तेंडुलकरांच्या नाटकांवर लिहिलं. जेव्हा तेंडुलकरांच्या नाटकांकडे अद्याप फार लक्ष गेलेलं नव्हतं, त्यांची नाटकं म्हणजे काहीतरी आक्रस्ताळं किंवा आततायी प्रकरण आहे, असं म्हटलं जात होतं. मी तेंडुलकरांची नाटकं समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी कड नाही घेतली; समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मी पिकासोची चित्रं पाहिली. त्याच्या वेडेपणाचा थोडा अभ्यास केला. तो चक्रमपणा करतो. कधी मोडका-तोडका चेहरा वापरतो, कधी एखादा ‘आफ्रिकन मास्क’ वापरतो. तो असं का करतो, याचा विचार केला पाहिजे.
सौंदर्याच्या किंवा सुरूपतेच्या वाटेनं महायुद्धाचा परिणाम आपल्याला दाखवता येईल का? त्यासाठी आपल्याला कदाचित कलेचीच मोडतोड करावी लागेल का? पिकासोचं ‘गर्निका’ हे प्रसिद्ध चित्र आहे. तुला माहीतच असेल. मी एका चित्रकाराला एकदा विचारलं, “तुम्ही जशी चित्रं नेहमी काढता, तशा सौंदर्यप्रधान चित्रांतून पिकासोला युद्ध, हिंसा दाखवता येतील का?” ते म्हणाले, “पिकासोला दाखवता येईल का, ते मला सांगता येणार नाही; पण मी माझ्या चित्रपद्धतीनं ते विषय हाताळू शकेन.” त्यांच्या उत्तरानं माझं समाधान झालं नाही. मला वाटतं की, अशा सौंदर्यमूलक चित्रांतून काही विषय अभिव्यक्त होत नाहीत. सौंदर्यमूलक चित्रांना अंगभूत मर्यादा पडतात. काही विषयांसाठी चक्रमपणाचा रस्ता चोखाळावा लागतो.
तुझ्या लेखनात असा चक्रमपणा आहे, परंतु तो निव्वळ चक्रमपणा म्हणून येत नाही. म्हणजे पर्वती पायांवर चालून चढता येते, तर मी ती हातांवर चालून चढून दाखवतो, अशा तर्हेचा तो चक्रमपणा नाही. त्या चक्रमपणाला स्वतःची चक्रम शिस्त आहे. मला असं वाटतं की, त्याचं मूळ तुझ्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात आहे. तू जे तत्त्वज्ञान वाचलं आहेस, ते तुला पचलेलं आहे. तू अर्धा-कच्चा नाही आहेस. तुझ्या ‘डिस्टॉर्शन्स’मधून ‘ब्युटी’ दिसत राहते.
तुझं लेखन वाचून मनात हे विचार गोळा झाले. लिहिताना आपण वेगळ्या पद्धतीनं लिहितो. ते जास्त ऑर्गनाइज्ड असतं. बोलताना तसा वैचारिक ओघ राहत नाही. हे अंतिम विचार नाहीत. आणखीही काही सुचेल. ते मी कळवेन फोन करून.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
‘कुब्ला खान’ आणि ‘एक द्विज स्थळ’ : सर्जनात अंतर्भूत असलेली जाणीव-नेणिवेची क्रीडा
.................................................................................................................................................................
‘नवल’ची शंभर पाने वाचली. कुतूहलजनक. कादंबरी सहज आकार घेते हे ‘नवल’.
आणखी शंभर पानं वाचली. अंदाज आला आता. कळणं सोपं होतेय. मत तयार होत जाईल. मग बोलू.
२५०व्या पानावर आलोय. नॉव्हेल = नावल (पूर्वी म्हणत) = कादंबरी (बाणभट्टाकडून) = उपन्यास (हिंदी) = गोधडी (दरवेळी नवी तुकडे-जोड) = नवनवी मजा = नवल ... कपाटात हँगरवर रंगीत कपडे ... कसेपण एकत्र ... सूत्र सापडायला हवे ... मग नवल कळायला लागते ... आऊटस्टँडिंग = एक्स्ट्रॉ-ऑर्डिनरी. तूर्त बास.
बोलायचं आहे पुष्कळ.
मुक्त छंद, तशी नवल, मुक्त बंध कादंबरी ... कुठेतरी सुरू, तसाच शेवट ... मध्ये मात्र न हरवलेली ... हरपले श्रेय देणारी ... संज्ञाप्रवाही.
मी कॉलेजजीवनावरच्या काही कादंबर्या वाचल्या आहेत. म्हणजे ज्या कादंबर्यांमध्ये कॉलेजजीवन पार्श्वभूमीला आहे अशा. शशांक ओक यांची ‘अमुकचे स्वातंत्र्य’ ही कादंबरी तू वाचली असशील. अंजली सोमण यांची ‘बंदिश’ ही कादंबरीही तशी आहे. ती पूर्वी पुणे विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात होती. आनंद यादव यांच्या पुस्तकांमध्ये कॉलेजजीवनाचे उल्लेख अधूनमधून येतात, पण ते थोडेसे असतात. नेमाडेंची ‘कोसला’ तर तुला माहीतच आहे.
परंतु कॉलेजजीवनावरची ‘नवल’सारखी कादंबरी मी आजवर वाचली नव्हती. हिच्यात वेगळेपणा आहे. लहान गावाहून किंवा तालुक्याच्या ठिकाणाहून पुण्यासारख्या शहरात आलेला मुलगा, होस्टेलवर राहणारा, असं हिच्यातही आहे. पण तो, त्याच्या होस्टेलवरचे मित्र, त्यांची मागे राहिलेली गावं, वर्तुळं असे एकेक संदर्भ ‘नवल’मध्ये विस्तारत जातात, सामावत जातात आणि फार मोठा पट तयार होतो. एवढे संदर्भ असलेली कॉलेजजीवनावरची कादंबरी दुर्मीळ आहे.
तू दोन-दोन, तीन-तीन शब्दांची वाक्यं लिहितोस. किती लहान वाक्यं! पण काय काय त्या वाक्यांमधून जाणवत राहतं. एकामागून एक अशी ती वाक्यं येतच राहतात. वाक्यांवर थांबावंसं वाटतं. पुढच्या वाक्यांशी ती जोडून घ्यावीशी वाटतात. उडीही मारावीशी वाटते. सगळं एकामागून एक दिसत राहतं चित्रपटासारखं. या कोनातून, त्या कोनातून. हळूहळू सगळं भरत जातं.
या कादंबरीतले संवाद अतिशय लहान, मितव्ययी आहेत! इतके छोटे संवाद कादंबरीत आढळत नाहीत. नाटकात असे संवाद असतात. तेंडुलकरांच्या नाटकांमध्ये आहेत असे संवाद. कादंबरीकार मोठाले संवाद लिहितात. ते खुलासे करतात, स्पष्टीकरणं पुरवतात. तुझ्या संवादांमध्ये ती मुलं स्वतः बोलत आहेत, असं वाटतं. हे लेखकाने लिहिलेले संवाद नाहीत. होस्टेलवरच्या मुलांचं बोलणं रेकॉर्ड करून मग ते लिहून काढले आहेत, असे हे संवाद वाटतात.
मला तुम्हा नव्या लेखकांचं लेखन वाचताना ‘कशिदाकामा’ची आठवण होते. नवे लेखक – तू त्यांच्यात अग्रगण्य आहेस – तयार होणारा कशिदा तर दाखवतातच, पण खालचे टाकेही दाखवतात. कशिदाकाम करताना एका बाजूला उलट-सुलट टाके घातले जातात आणि दुसर्या बाजूला फूल किंवा जे डिझाइन असेल ते तयार होत जातं. बघणारा वरचं फूल बघतो किंवा डिझाइन बघतो. तो खालची टाक्यांची बाजू सामान्यतः बघत नाही. तू तुझ्या लेखनात वरचं नक्षीकाम आणि खालचं टाक्यांचं गुंतकामही दाखवतोस. मला असं वाटतं की, या कामी तुझी तत्त्वज्ञानाची बैठक उपयोगी पडते. तिथून ही सूक्ष्मता येते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
या कादंबरीतल्या निवेदनात वर्णन असतं, मग भाष्य येतं, पुन्हा वर्णन येतं, पुन्हा भाष्य येतं. वाहती वर्णनं, भाष्यांचे थांबे एकमेकांतून निघून एकमेकांत मिसळतात.
टेकडी चढतानाचा अनुभव कसा असतो, तसं वाचताना होतं. आधी आजूबाजूचं दिसतं. थोडं वर गेल्यावर पलीकडचं दिसू लागतं. वर पोहोचल्यावर दूरवरचं सगळं दिसू लागतं. आधी एक झलक, मग दुसरी झलक, मग तिसरी. झलक म्हणू किंवा ‘ग्लिम्प्स’ म्हणू. या झलकांचा-ग्लिम्प्सेसचा गुंता अनुभवायला मिळतो. मागचं पुढच्याशी जोडून घेत वाचावं लागतं.
एखाद्या लहान गोष्टीचे अनेक बारीकसारीक पैलू तुझ्या लहान-लहान वाक्यांमधून दिसत राहतात. साध्या भेळेवर तू दीड पान लिहिलं आहेस! तुझं पाहणं तसं आहे. पाहण्याला न्याय देणारी वाक्यं तू लिहीत जातोस. एखादी वस्तू अनेकानेक कोनांतून कॅमेर्यानं बघावी, टिपावी, मग त्या दृश्यांचं संकलन-संपादन करून रीळ बनवावं, मग ते रीळ उलगडत दाखवावं, तसं तुझ्या कथनात होत असतं. सरळ रेषेतलं, एका कोनातलं हे पाहणं नाही आहे. हे पाहण्याचं ‘नवल’ आहे.
.................................................................................................................................................................
‘विवादे विषादे प्रमादे प्रवासे’ (कथा) - प्रशान्त बागड | शब्द पब्लिकेशन्स, मुंबई | पाने – १२८ | मूल्य - १३५ रुपये.
‘नवल’ (कादंबरी) - प्रशान्त बागड | पपायरस प्रकाशन, कल्याण | पाने - ३६० | मूल्य - ४७५ रुपये.
‘सात गोष्टींचं पुस्तक’ (कथा) - प्रशान्त बागड | पपायरस प्रकाशन, कल्याण | पाने – ११२ | मूल्य - २२५ रुपये.
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. चंद्रशेखर बर्वे हे पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक व समीक्षक आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment