‘न्याय’, ‘स्वातंत्र्य’, ‘समता’ आणि ‘बंधुता’. ही मूल्ये ‘प्रजासत्ताक भारताची ‘महामूल्ये’ आहेत. ही मूल्ये आपल्या जनमानसात अजून नीट रुजलेली नाहीत, हे आजचे विदारक वास्तव आहे!
पडघम - देशकारण
अनंत राऊत
  • ‘प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 13 February 2024
  • पडघम देशकारण प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये Prajasattak Bhartachi Naitik Mulye अनंत राऊत Anant Raut

‘नीती’ या शब्दाचा ‘मराठी शब्दकोशा’त दिलेला अर्थ न्याय, शिष्टाचार, युक्तता, योग्यता, सदाचाराचे नियम, वर्तन किंवा व्यवस्था असा आहे. माणूस आपले जीवन जगत असताना विविध स्वरूपाच्या कृती करत असतो. अशा विविध स्वरूपाच्या कृती करणे, ही त्याची नैसर्गिक प्रेरणा असते.

यासंदर्भात कांट हा तत्त्ववेत्ता असे म्हणतो की, मानवी प्रवृत्तीचे दोन घटक असतात. एक घटक नैसर्गिक इच्छा, वासना आणि प्रेरणांनी बनलेला असतो. एखाद्या विशिष्ट इच्छेने प्रेरित होऊन त्या प्रेरणेचे समाधान होण्यासाठी माणूस जे कृत्य करतो, ते स्वाभाविक आणि नैसर्गिक असे कृत्य असते. या कृत्याच्या अंगी नैतिक मूल्य नसते. कार्यकारण नियमाला अनुसरून निसर्गात घडणाऱ्या कोणत्याही घटनेसारखीच ती घटना असते.

मानवी प्रवृत्तीचा दुसरा एक महत्त्वपूर्ण घटक असतो, तो म्हणजे विवेकशक्ती. ही विवेकशक्ती सार्वत्रिक तत्त्वांना किंवा मूल्यांना जन्म देते. आणि ही तत्त्वे आदेश म्हणून त्या व्यक्तीपुढे उभी राहतात. माणूस जेव्हा एखादे कृत्य अशा विवेकजन्य सार्वत्रिक आदेशाला अनुसरून करतो, तेव्हा त्या कृत्याद्वारा तो आपल्या विवेकशक्तीची परिपूर्ती करत असतो. त्यामुळेच त्या कृत्याला ‘नैतिक मूल्य’ लाभते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माणसाने समाजात वावरत असताना कोणत्या स्वरूपाचे वर्तन केले पाहिजे, हा नैतिकतेसमोरील महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वतःचे हित साधण्यासाठी इतरांच्या हिताला बाधा न पोहोचवता त्यांच्या हितालाही पूरक ठरेल, अशा पद्धतीने केलेल्या वर्तनाला ‘नैतिक वर्तन’ असे म्हणता येईल. म्हणजेच नैतिकतेमध्ये व्यक्ती आणि समाज या दोहोंचेही हित लक्षात घेतलेले असते. माणसाचे हित किंवा कल्याण साधणे, हा नैतिक आचरणामधील महत्त्वपूर्ण भाग असतो. समाजहित केंद्रस्थानी मानून व्यक्तीने किंवा व्यक्तिसमूहाने केलेले वर्तनच न्याय्य स्वरूपाचे असते. तोच चांगल्या मानवी जीवनाचा शिष्टाचार असतो आणि तीच सुंदर अशी समाजव्यवस्थाही असते.

‘मूल्य’ हा शब्द मुळात अर्थशास्त्राशी संबंधित असलेला आहे. ‘मूल्य’ शब्दाचा अर्थ मोल किंवा किंमत असा आहे; परंतु ‘नैतिक मूल्य’ म्हणून वापरला जाणारा शब्द ‘किंमत’ या अर्थाचे सूचन करत नाही, तर त्या शब्दाला अत्यंत व्यापक असा आशय प्राप्त होतो. मूल्य ही एक मानवी जीवनातील अत्यंत व्यापक अशी संकल्पना आहे किंवा ते एक मानवी जीवनातील कल्याणकारी असे तत्त्व आहे.

माणसांनी सजीवसृष्टीचे जीवन अधिकाधिक सुखावह बनवण्यासाठी प्रगतीच्या ओघात अनेक उदात्त अशी तत्त्वे किंवा मूल्ये निर्माण केलेली आहेत. ही तत्त्वे किंवा मूल्ये मानवी वर्तनाला एक शिस्त लावत असतात. मानवी वर्तन स्वार्थी, स्वैराचारी, दुराचारी बनणार नाही, याची दक्षता घेत असतात. म्हणजेच समाजात अस्तित्वात असलेली नीतिमूल्ये व्यक्तीच्या वर्तनाला काही बंधने घालत असतात. वर्तनाच्या संदर्भात काही नियम घालून देत असतात. ज्या नियमांच्या अनुसरणामुळे सामाजिक सौख्य अबाधित राहत असते.

नैतिक मूल्ये ही निसर्गत:च माणसाला आवश्यक असलेल्या गरजांमधून निर्माण होत असतात. समाजातील प्रत्येक माणसाला आपण सुखी राहिले पाहिजे, असे वाटते. म्हणून ह्युम, जेरेमी बेंथॅग, जे.एस. मिल इत्यादी तत्त्वज्ञ सुख हेच मानवी जीवनातील अंतिम मूल्य आहे, असे मानतात.

मानवी जीवन सुखी कधी होते? तर त्याच्या नैसर्गिक गरजांची पूर्तता होते तेव्हा. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत अशा नैसर्गिक गरजा आहेत; परंतु इथेच मानवी गरजा संपत नाहीत, तर माणूस जीवनातील सौंदर्याचा शोध घेऊ लागतो. त्यातूनच तो आपली ‘संस्कृती’ निर्माण करतो. मानवी संस्कृतीमध्ये सौंदर्यास्वादासोबतच संयम, त्याग, विनम्रता, आदरातिथ्य, आत्मसन्मान, प्रतिष्ठा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

समाजातील काही माणसे जेव्हा जीवनातील संपूर्ण सुख आपल्याच वाट्याला कसे येईल, याची धडपड करू लागतात, निसर्गातील संपत्तीचे स्वतःकडेच केंद्रीकरण करू लागतात, या प्रवृत्तीची माणसे जेव्हा इतरांना लुबाडू लागतात, तेव्हा निसर्गाचा समतोल बिघडू लागतो. कुणी अत्यंत सुखी, तर कुणी अत्यंत दुःखी असे जीवन जगू लागतात. नैसर्गिक संपत्तीच्या असमतोल वाटणीतून संपत्तीधारक लोक अहंकारी, स्ववर्चस्ववादी बनतात आणि संपत्तीवंचित माणसांवर अपमानास्पद जीणे लादतात.

सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठावंचित माणसांना जेव्हा आत्मभान येते, तेव्हा त्यांच्या मनात असंतोष धुमसू लागतो. त्यातूनच ते संघर्षास प्रवृत्त होतात. त्यामुळे मानवी जीवनातील शांतता संपुष्टात येते. हिंसाचार माजू लागतो आणि समाजाचे स्वास्थ संपूर्णपणे बिघडून जाते. मानवी जीवनातील ‘सुख’ हे मूलभूत मूल्य संपून जाते आणि मानवी जीवन अस्थिर आणि वेदनामय बनते.

मानवी जीवनामध्ये जेव्हा विषमता येते, तेव्हा अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होणे अपरिहार्य असते. हा संघर्ष खऱ्या समाजसौख्यासाठीच केला जात असतो. समाजसौख्य हे सातत्याच्या संघर्षाने टिकत नसते, तर त्यासाठी समाजात शांतताही अत्यावश्यक असते. म्हणून ‘शांती’ हे एक मानवी जीवनातील महत्त्वपूर्ण मूल्य ठरते.

निसर्गातील संपूर्ण माणसांच्या संवेदना सारख्याच असतात. माणसाच्या संवेदनांचे सारखेपण हे या सृष्टीतील मूलभूत सत्य आहे. म्हणून ‘सत्य’ आणि ‘समता’ ही मानवी जीवनातील मूलभूत मूल्ये असतात. समाजातील हिंसक प्रवृत्तींमुळे समग्र मानवी जीवन दुःखी होते. म्हणून ‘अहिंसा’ या तत्त्वाला मानवी जीवनात खूप मोठे मोल प्राप्त होते. निसर्गाने सर्वच माणसांना बौद्धिक आणि शारीरिक शक्ती प्रदान केलेली आहे. म्हणून प्रत्येकालाच स्वतःच्या बौद्धिक व शारीरिक शक्तींचा विकास घडवून आणण्याचे स्वातंत्र्य असणे अत्यावश्यक असते. म्हणून ‘स्वातंत्र्य’ हे मानवी जीवनातील मूलभूत मूल्य ठरते.

सृष्टीतील सुखापासून कोणतीही व्यक्ती वंचित राहणार नाही, या पद्धतीने सृष्टीतील संपत्तीची वाटणी करण्याला ‘न्याय्य वाटणी’ म्हणतात. दुष्ट प्रवृत्तीने वागून इतरांवर जुलूम करणाऱ्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा करण्यालाही ‘न्याय’ म्हणतात. म्हणून ‘न्याय’ हेही मानवी जीवनातील महत्त्वाचे मूल्य ठरते.

‘मानवता’ आणि ‘बंधुत्व’ या मूल्यांनाही मानवी जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असते. कारण हीच मूल्ये मानवी जीवन अधिकाधिक सुखी बनवण्यासाठी खूप मोठी मदत करत असतात.

माणसाने आपल्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विविध स्वरूपाची नैतिक मूल्ये तयार केलेली आहेत. त्यातून भक्ती, सेवा, स्वामिनिष्ठा, पातिव्रत्य अशी काही मूल्ये निर्माण झाली. काळाच्या ओघात अशी मूल्ये मानवी जीवनातील समग्र सुखाला बाधा आणत असल्याचेही अलीकडे लक्षात येऊ लागले आहे.

प्रज्ञा, शील, करुणा, राष्ट्रप्रेम, बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, स्वाभिमान, प्रामाणिकपणा, विनय, संयम, प्रेम यांसारख्या गोष्टींचाही मानवी जीवनातील मूलभूत नैतिक मूल्यांमध्ये समावेश करावा लागतो.

आज आपल्या समाजाला नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्याची खूप मोठी गरज आहे. कारण आज असंख्य लोक अत्यंत स्वार्थी, आत्मकेंद्रित, भोगवादी व स्वैराचारी बनताना दिसत आहेत. अशा प्रवृत्तीची माणसे आज सर्वच नैतिक मूल्यांना पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे आज समाजात हिंसाचार, लाचखोरी, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. आपले समाजस्वास्थ्य आज फारच बिघडत चाललेले दिसते. लोक आपली ‘सामाजिक जबाबदारी’ विसरत चाललेले दिसतात.

आपल्या सामाजिक जबाबदारीचा आणि चिरंतन अशा नैतिक मूल्यांचा समाजाला संपूर्णपणे विसर पडला, तर ते सुखकारक समाजजीवनासाठी अत्यंत घातक ठरणार आहे. म्हणून नैतिक मूल्यांची समाजाला पुनःपुन्हा जाणीव करून देणे आणि ती मूल्ये समाजमनात खोलवर रुजवणे अत्यावश्यक आहे.

कोणत्या काळामध्ये कोणती मूल्ये पुन: पुन्हा मांडली पाहिजेत, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्या काळात समाजातील विचाराचे केंद्र हे पारलौकिक जीवन बनलेले असते, त्या काळात ईश्वर, यज्ञ, पुनर्जन्म, स्वर्ग, मोक्ष, नरक यासारखे सिद्धान्त निर्माण होत असतात. या सिद्धान्तांचा जनमानसावर खूप मोठा प्रभाव राहत असतो आणि या प्रभावामधूनच ‘भक्ती’सारखे मूल्य उदयाला येत असते.

ईश्वराची कृपा आणि पारलौकिक सुख प्राप्त करणे, हा भक्ती या मूल्यामागचा हेतू असतो. ‘भक्ती’ या शब्दाचा अर्थ स्तुती, अतिशयोक्त गौरव हा असतो. या मूल्यात अपरिहार्यपणे विषमता सामावलेली असते. समाजात राजेशाही, सरंजामदारी आणि मालकशाहीचे प्रस्थ असते, तेव्हा स्वामीनिष्ठा हे मूल्य सत्तास्थानी असलेल्या मूठभर लोकांना देवत्व बहाल करत असते आणि सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठावंचित बहुसंख्य जनतेला जीवनभर व पिढ्यानपिढ्या मालकाची निमूटपणे सेवा करण्यातच धन्यता मानायला शिकवत असते. स्वामीनिष्ठा हे मूल्य गुलामगिरीचे उदात्तीकरण करत असते.

समाजात जेव्हा अतिरेकी पुरुष वर्चस्व प्रस्थापित होत असते, तेव्हा सती, पातिव्रत्य यांसारखी मूल्ये उदयाला येत असतात. ही मूल्ये पतीला म्हणजेच पुरुषाला तो कसाही असला, तरी देवत्व बहाल करत असतात. समग्र स्त्री वर्गाला पुरुषाची दासी बनवून स्त्री दास्यत्वाचे उदात्तीकरण करत असतात आणि स्त्रीचे माणूस म्हणून असलेले स्वतंत्र जीवनच नाकारत असतात.

जगात आणि आपल्या देशामध्ये वर उल्लेखित विषमतावादी समाजव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या तथाकथित मूल्यांनी खूप मोठ्या कालखंडपर्यंत वर्चस्व गाजवलेले आहे. त्या मूल्यांनी मानवाचा मुक्त विकासही रोखून धरलेला होता. अजूनही या मूल्यांचा जनमानसावर असलेला प्रभाव संपलेला नाही.

भारताने इंग्रजांविरुद्ध आणि या देशातल्या कुप्रथांविरुद्ध जो लढा दिला, त्यातून नव्या काळाची श्रेष्ठ अशी मूल्ये उदयाला आली. भारत स्वतंत्र झाला. त्याने लोकशाही स्वीकारली. त्याबरोबरच तिची गाभाभूत मूल्येही स्वीकारली. त्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून भारताच्या संविधानाची निर्मिती झाली. १९५० साली संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत हा अधिकृतरीत्या सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनला.

आपल्या देशाच्या इतिहासात घडलेल्या या संपूर्ण घटना सुवर्णाक्षरांनी लिहाव्यात आणि ज्यांचे पुनःपुन्हा स्मरण करावे, अशा आहेत. कारण या सर्व घटनांनी भारताला नवी मूल्ये दिलेली आहेत. या मूल्यांच्या केंद्रस्थानी या देशातला सामान्यातिसामान्य माणूस आहे. समग्र माणसांचे त्यांच्या जिवंतपणीच कल्याण करणे, हा या मूल्यांचा उदात्त हेतू आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

ज्या मूल्यांचा जीवनातील इतर मूल्यांसोबतच आपण उल्लेख केलेला आहे, त्या मूल्यांचे नाव आहे ‘न्याय’, ‘स्वातंत्र्य’, ‘समता’ आणि ‘बंधुता’. ही मूल्ये प्रजासत्ताक भारताची ‘महामूल्ये’ आहेत. कारण ही मूल्ये या देशातील जनमानसात खोलवर रुजल्यानेच या देशातील समग्र दोष नष्ट होणार आहेत आणि हा देश आदर्शत्वाकडे वाटचाल करणार आहे.

वर उल्लेखिलेली महामूल्ये आपल्या जनमानसात अजून नीट रुजलेली नाहीत, हे आजचे विदारक वास्तव आहे. देशाला पुढे नेण्यासाठी, राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक व आर्थिक लोकशाहीमध्ये करण्यासाठी, लोकशाही ही भारताची जीवनपद्धती व संस्कृती बनवण्यासाठी, हे वास्तव बदलणे आवश्यक आहे. पण ही गोष्ट अजूनही आपल्या देशातल्या बहुसंख्य माणसांच्या नीटपणे लक्षात आलेली नाही. कारण आपले समाजमन अजूनही पुराणातच अडकलेले आहे. म्हणून आजही आपल्या देशात अधिक प्रमाणात अंधश्रद्धामूलक अशी विषमतावादी परंपरागत मूल्येच नैतिक मूल्ये म्हणून पुनःपुन्हा सांगितली जातात.

आजच्या काळाची महामूल्ये मात्र इथे पुनः पुन्हा सांगितली जात नाहीत आणि ती मूल्ये जाणीवपूर्वक समाजमनात रुजवण्याचा समाधानकारक असा प्रयत्न केला जात नाही. म्हणून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची आपल्या देशात अनेक अंगांनी, अनेक पद्धतींनी विविध कलांच्या माध्यमातून पुन:पुन्हा मांडणी करणे गरजेचे आहे.

‘प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये’ या डॉ. अनंत राऊत लिखित पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश. प्रकाशक – कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद, १५ ऑगस्ट २००६

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......