गुलाबजाममध्ये ‘गुलाब’ कुठे असतो?
कोंबडीवड्यात ‘कोंबडी’ कुठे असते?
श्रीखंडात ‘श्री’ कुठे असतो?
हवेली, मावळ तालुके आहेत, पण ‘गावे’ कुठे आहेत?
महानगराचे नाव मुंबई, पण ‘मुंबई गाव’ कुठे आहे?
बोरमाळेत ‘बोरे’ कुठे असतात?
चपलाहारात ‘चप्पल’?
शीर्षकात विचारलेला प्रश्न असा या सहा नमुन्यांसारखा आहे. नावाला नाव आहे, पण त्यात काहीच नाही. त्यामुळे ‘राजेशाही’त ‘राजा’, तसे ‘लष्करशाही’त ‘लष्कर’ असते आणि सरंजामशाहीत ‘सरंजामदार’ असतो, तसे ‘लोकशाही’त ‘लोक’ असायला पाहिजेत ना? होय. ते असतात अन् आहेत. मग प्रत्यक्ष लोक असण्याऐवजी त्यांनी निवडलेले प्रतिनिधी असतात. खरे तर गेली नऊ वर्षे प्रश्न असा पडला आहे की, लोक आहेत, परंतु लोकशाही कुठे आहे?
हा प्रश्न विचारला की, हिंदुत्ववादी अन् पंतप्रधान एका आवाजात भारताला ‘मदर ऑफ डेमॉक्रसी’ म्हणायला लागतात. म्हणजे यांना लोक व लोकशाही यापेक्षा ‘मदर’चे जास्त कौतुक आहे. आता यात काय गफलत आहे, ते आधी पाहू.
‘आई होणे’ हा निसर्गाचा भाग आहे. पशु, पक्षी, माणसे यांतले नर-मादी संभोग करून आई-वडील होतात. ‘प्रसवणे’ हा निसर्गक्रम असून तो सर्वस्वी माणसाच्या हातात आता गेल्यामुळे, तेवढा तो आपोआप होणारा राहिलेला नाही. म्हणजे ‘मदरिंग’, ‘फादरिंग’ आता लांबवता येते अन् क्षमता असूनही टाळता येते.
लोकशाही राज्यव्यवस्था आणि त्यासाठीचे राजकारण माणसाची निर्मिती आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
राज्यव्यवस्थांचा इतिहास बघितला, तर सर्व ‘शाह्या’ अजमावल्यानंतर माणसांनी ‘लोकशाही’ नावाची एक व्यवस्था तयार करून स्वीकारली. ती ठोस, ठाम अथवा पक्की नसते, हे ठाऊक असूनही त्यातल्या त्यात तीच चांगली, या हेतूने जगाने ती पत्करलेली आहे. राजकीय इतिहास लोकशाहीचे ‘जनकत्व’ रोमन संस्कृतीकडे देतो. त्याबद्दल ऐतिहासिक पुरावेही सादर केले जातात. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात लोकशाहीचा जन्म युरोपात झाल्याचे शिकवले जाते.
‘लोकशाही’ व ‘प्रजासत्ताक’ हे शब्द समावर्ती वाटले, तरी तसे ते नाहीत. ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ असे चीन स्वतःला म्हणवून घेतो, पण त्या देशात ‘लोकशाही’ नाही, हे सारे जग जाणते. उत्तर कोरिया या लष्करशाहीच्या अमलाखाली अनेक वर्षे जगणारा देश स्वतःला ‘डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’ असे म्हणवतो, पण तो ना धड साम्यवादी, ना आणखी काही. ‘इस्लामिक रिपब्लिक’ व ‘ख्रिश्चन रिपब्लिक’ म्हणवणारेही अनेक देश आहेत. तिथे धर्मसत्ताक कारभार चालतो की, प्रजासत्ताक, यांत गोंधळ आहे. परंतु ही विसंगती आहे, विपर्यास आहे, एवढे नक्की.
भारत त्यांच्या वाटेवर निघाला आहे, त्याचे काय?
आम्हाला छळणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर एका व्यक्तीकडे नक्की असणार, हे आम्हाला ठाऊक होते. त्यांचे नाव जोगेश्वर शिवाजी अर्थात जो. शि. कुलकर्णी असे असून ते फार ज्येष्ठ, जुनेजाणते हिंदुत्ववादी आहेत. आम्ही ‘लोकशाहीच्या खेळात लोक कुठे आहेत’ हा प्रश्न घेऊन त्यांच्या घरी गेलो. त्यांचे नाव जो. शि. कुलकर्णी असले, तरी त्यांची ख्याती ‘नानासाहेब’ अशी जास्त होती.
आम्ही खास ब्राह्मणी आवाज काढत बाहेरून ओरडलो, ‘आहेत का नाना घरात?’ आवाज ऐकून काकू बाहेर आल्या. त्या कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या. उजवा हाताचा तळवा छातीपुढे आडवा करून आणि मानेने दूर दिशेला हिसका देऊन त्यांनी आम्हाला कळवले की, नाना शाखेत गेले आहेत. आमचा चेहरा बुचकळ्यात पडलेला पाहून काकू पुन्हा हाताने आम्हाला ‘या’ म्हणाल्या. अन् पाच बोटांची जूट करून सुचवले की, पाच मिनिटांत घरी पोचतीलच!
आम्ही पादत्राणे बाहेर सोडून नानांच्या बैठकीत शिरलो. भिंतीवर गोळवलकर, हेडगेवार यांच्या भल्या मोठ्या तसबिरी होत्या. बाजूला नाना तेव्हाच्या चड्डीत शाखेतून बाहेर येतानाचे एक छायाचित्र फ्रेम करून लावलेले. एकदम ऐटीत अन् राष्ट्रसेवेने तृप्त झालेल्या चेहऱ्यामुळे नाना फारच छान दिसत होते. काकूंनी एका हाताने पाण्याचे भांडे आणून दिले. पुन्हा ‘बसा’ असा हाताचा इशारा करून त्या घरात अदृश्य झाल्या.
तिसऱ्या मिनिटाला नाना आले. आम्हाला बघून ‘अरे व्वा! अलभ्य लाभ. काय म्हणतोय पुरोगामी महाराष्ट्र?’ असा जोरदार घाव घालून तेही आत गेले. हातपाय धुवून, कपडे बदलून बैठकीत आले. गोळवलकर गुरुजींच्या तसबिरीखाली बसले.
आम्ही त्यांना ज्या प्रश्नासाठी आलो होतो, तो सांगितला- ‘लोकशाहीच्या खेळात लोक कुठे आहेत?’
नाना पुन्हा काही खोचक, बोचरा डायलॉग फेकतील, म्हणून आम्ही सावरून बसलो, तोच त्यांनी दुःखी स्वर काढून म्हटले, ‘खेळच झालाय हो नुसता. अहो, लोकांचं सोडा. आम्हीही ‘लापता’ झालो आहोत.’
आम्हाला हा मोठा धक्काच होता. नानांकडून लोकशाहीची अशी पाठराखण? वाटले होते, नाना नेहमीसारखं खिल्ली उडवतील, हुकूमशाहीची तरफदारी करतील, पण इथं तर भलतंच. आता आम्ही दुसऱ्यांदा बुचकळ्यात पडलो. आमचा ‘सचिंत’ चेहरा पाहून जो. शि. कुलकर्णी उर्फ नाना समजले.
एरवी आपण कधी स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता इत्यादी विषयांवर आमच्याशी चर्चा करताना विरोधात कायम असू, हे त्यांना बहुधा आठवले. त्यांच्या ठाम भूमिका आम्ही खोडत असू, तरीही नाना त्यांच्या मुद्द्यांवर चिकटून असत. तसेही ते फार वाचत नाहीत. विद्वत्ता, अभ्यास, संशोधन, प्रतिवाद यांना ते महत्त्व देत नाहीत. त्याऐवजी संबंध, जिव्हाळा, आपुलकी, सख्य, घरोबा अशा प्रयत्नांनी त्यांचा लोकप्रिय होण्याचा खटाटोप चालतो. आम्ही त्यातलेच एक. मतभिन्नता झाली, तरी आम्ही एकमेकांना अंतर दिले नव्हते. म्हणूनच हक्काने त्यांच्यापाशी आलो.
“हे बघा, उदगीरकर, तुमचा प्रश्न मला कळला. माझे उत्तर ऐकून तुम्ही धक्का पचवू शकला नाहीत, हेही मला उमजले. पण खरंय हो, लोक कुठं दिसत नाहीत, हे मलाही जाणवते.” नाना बोलले.
हे म्हणजे अतीच झाले. आधीच त्यांचा सारा कारभार गुप्त अन् पडद्याआडचा. नाना जे काही बोलले, त्याचे पदर कसे उलगडून बघावेत, आम्हाला काही कळेना.
नाना पुन्हा बोलले,
“तुम्हाला देशाचं शिक्षणमंत्री, शेतीमंत्री किंवा पर्यावरणमंत्री कोण आहे, हे माहीत आहे का? किंवा केंद्र सरकारच्या एक डझन मंत्र्यांची नावं सांगून दाखवा. तुम्हाला बक्षीस देतो.”
तिसऱ्यांदा आम्ही बुचकळ्यात पडलो. आज नाना आपल्याला नुसते बुचकळून काढत आहेत, असे आम्हाला वाटू लागले. पण त्यांनी विचारल्याप्रमाणे आम्ही आमच्या मेंदूला ताण दिला, एक नाव आठवेना. आपण रोज बारकाईनं पेपर वाचतो, असा आमचा अहंकार एका क्षणात खल्लास झाला. आमची वाचाच खुंटली.
“बघा! तुम्ही पास झालात माझ्या परीक्षेत. एकही नाव तुम्हाला आठवलं नाही, याचा अर्थ माझ्या मते ‘लोकशाही’त ‘लोक’ आता नाहीत.” इति नाना.
बापरे! नाना हे काय बोलत आहेत? मंत्र्यांची नावं माहीत नाहीत, म्हणजे लोकशाही नाही अन् लोकही नाहीत, असे कसे? नानांना म्हटले, “जरा आम्हाला समजेल असा खुलासा करा. तुम्ही एकदम शाखेतली सांकेतिक भाषा वापरू लागला आहात.”
नाना खुलले. “केंद्रीय मंत्री केवढं मोठं पद! अवघ्या देशाचा एका खात्याचा कारभार हा माणूस बघतो. खूप मोठी सत्ता त्याच्या हातात. देशाचा चेहरामोहरा पालटवू शकतो तो. परंतु आज त्या मंत्र्याचाच चेहरा ‘गायब’ झाला असून, त्याचा ‘मोहऱ्या’सारखा वापर चालू झालाय. मंत्री नाहीतच कुणी आज, आहेत ते गुलाम!”
हे काय ऐकतोय आम्ही? साक्षात नाना आमच्यासारखे बोलू लागले, म्हणजे काय? वाटलं, नाना खेचत असावेत. आज जो. शि. कुलकर्णी आम्हाला जमिनीवर लोळवण्याची संधी शोधत आहेत, असं वाटू लागलं. आतून काकू येऊन नानांचं मुस्कट दाबून तर टाकणार नाहीत ना, असं भयही मनाला स्पर्श करून गेलं. नाना बंड तर करणार नाहीत ना? आम्ही पुरते गडबडलो.
नाना पुढे सुरू झाले. म्हणाले, “आता घरी येता येता तात्यारावांनी पेट्रोल भरायला मला घेऊन त्यांची गाडी पंपावर नेली. आत शिरताना आमचं स्वागत भल्यामोठ्या आकाराच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. मनाशी म्हटलं, झाली की, दहा वर्षं, आता पुरे! मोदीजींकडे बघतानाच पेट्रोलियम खात्याचा मंत्री कोण, हे आठवायचा प्रयत्न केला. तात्यांनाही नाव सापडेना. मग आठवतील ती सारी खाती आणि त्यांचे मंत्री डोळ्यांपुढं आणू लागलो. गडकरी, राजनाथ, सीतारामन्, बस्स गाडं पुढंच जाईना.”
“अहो, नाना, याचा अन् आमच्या प्रश्नाचा काय संबंध?”
“सांगतो ना, उदगीरकर, जरा दम धरा. ७८ मंत्री आहेत आमच्या मोदीसाहेबांना सहकारी म्हणून. ते सारे मिळून देश चालवतात. एवढी मोठं काम करणाऱ्यांची नावं नको का माहीत? जर त्यांच्यासारखे लोक अनाम-बेनाम होत असतील, तर सामान्य लोकांचं काय अस्तित्व? ते असतात हो, सर्वत्र असतात. मला सांगा, लोकशाहीचा गाडा हे ७८ जण हाकत आहेत, पण त्यातले बहुसंख्य आपल्याला अज्ञात, तर आपल्या सारख्यांची दखल कोण घेईल?”
आमची ट्यूब आता पेटली. नाना आम्हाला असे सांगू पाहत होते की, देशाचा कारभार हाकायचा जो ‘लोकशाहीचा खेळ’ चालू आहे, त्यातल्या खेळाडूंचीच नावं देशाला ठाऊक नाहीत, तर मग हा खेळ पाहणाऱ्या प्रेक्षकांची काय बिशाद? पक्के खेळाडू असावेत, म्हणून तर मोदीजींच्या खांद्याला खांदा भिडवून देशाला पुढे पुढे नेत आहेत ना ते सारे? पण हो! नानांचं म्हणणं असं होतं की, तीन-चार नावं अधूनमधून झळकतात. उर्वरित सारा खेळ एकटाच माणूस खेळतो आहे. मंत्रीच खेळत नसतील, तर लोक कुठून येतील?
“नाना, तुमच्या तोंडून, तुमच्याच घरी आम्ही, हे आम्ही काय ऐकतोय कळत नाही. तुम्ही वाजपेयी-अडवाणी पिढीचे असल्यामुळे तुम्हाला सांघिक खेळाची आवड असावी. शाखांमध्ये सारखं सारखं सामूहिक अन् सांधिक खेळाचं महत्त्व पटवलं जातं, ते आम्हाला ठाऊक आहे. सत्तेचा खेळ तुमच्या पिढीपर्यंत सांघिक होता. आता तो कमी माणसांत खेळायची सोय असेल, तर तुम्हाला का पोटदुखी? मोदीजी-शाहजी यांना जर दोघांनाच देश हाकता येतो, असं वाटलं, तर काय चूक त्यात? नाही तरी मोदीजी ते तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रांत लोटीत आहेत, त्याला जास्त माणसं लागतच नाहीत.” आम्ही नाना अजून मोकळे व्हावेत, या बेतानं बोलून मोकळे झालो.
जो. शि. कुलकर्णी आमच्या या सरबत्तीने जरासे विचारमग्न झाले. त्यांनी इकडेतिकडे पाहिलं. मान स्वयंपाकघराकडे करून त्यांनी त्यांच्यासाठी दूध अन् आम्हाला चहा सांगितला. काकूंनी ‘आणते आणते’ म्हणून होकार भरला. त्या दोघांचं इतकं जुळलेलं होतं की, दुसऱ्या मिनिटाला काकू आमच्या पुढ्यात हजर! बहुधा शाखेतून आल्या आल्या नानांना दुधाची सवय असावी. आधी दोन घोट त्या दुधाचे घेऊन नानांनी आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केली.
“उदगीरकर, तुमचं निरीक्षण अगदी योग्य आहे. मात्र भूमिका ती भूमिकाच, त्यात काही बदल होत नसतो. आम्ही अजूनही त्याच भावना प्रमाण मानतो आणि त्यानुसार खेळ वगैरे खेळतो. आता या सांघिक खेळामधून बाजूला होऊन कुणी स्वतःचा खेळ खेळू लागला, तर आम्ही त्याला बजावतो आधी. मग तो ऐकेनासा झाला की, त्याच्याशी संबंध तोडतो.
“तुम्ही डावी मंडळी त्यावर विनोद करता, ते आम्हाला माहीत आहे. आमची संघटना बऱ्याचदा ‘ते आमचे कार्यकर्ते नाहीत’ असे खुलासे करत असते. आमच्यात राजीनाम्याची प्रथा नसते. मुळात कार्यकर्ता असणाऱ्याला ‘मेंबरशिप’ची पावती फाडावी लागत नाही. आमच्याकडे आपखुशीनं या, आपल्या मर्जीनं जा, असा कारभार असतो. तुम्ही ज्या दोन नेत्यांची नावं घेत आहात, त्यांनी अजून रामराम ठोकलेला नाही, परंतु ज्या तऱ्हेनं त्यांचं ‘असंगाशी संग’ करणं चालू आहे, ते आम्हाला रुचत नाही.” नाना.
हे पुन्हा बुचकळ्यात टाकणारं झालं. म्हणजे नानांनी चौथ्यांदा आमची ‘फ’ केली, हे आम्हाला जाणवलं. हा बाबा नेमकं काय सांगू बघतोय हेच कळेना. त्यांच्या संघटनेचं सारं काम इशाऱ्यानं चालतं, हे ठाऊक असल्यानं आम्ही चलाखीनं एक डाव टाकला-
“पण नाना, एकीकडे तुम्हीच मला लोक कोण अन् किती आहेत, तसंच ते माहीत आहेत का, असं विचारताय आणि दुसरीकडे तो खेळ तुम्हीही निवांतपणे बघत बसलाय. आमच्या शंकेचं तुम्ही निवारण करणार आहात की नाही? ‘लोकशाही’च्या खेळात ‘लोक’ कुठं आहेत?”
नाना बहुधा सावरले किंवा सावध झाले, म्हणून त्यांनी एकदम माझ्याकडे रोखून पाहिलं, आपली काहीतरी गडबड झाल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. आम्हालाही वाटतं होतंच की, नानासारखे लोक असे आपल्यासारख्या परक्यापुढे आपल्याच विचाराच्या लोकांवर टीका कशी काय करतील? आम्हाला नाना कोण काय समजून बोलले, त्यांनाच ठाऊक. सरतेशेवटी नानांनी तोंड उघडलं.
“तुमचा प्रश्न ‘लोकशाही’च्या खेळात ‘लोक’ कुठं आहेत, असा होता ना? मलाच खरं तर तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की, लोकशाही-लोकशाही म्हणून तुम्ही जिचा गजर सारखा करत असता, ती आली कुठून? आणली कुणी? परक्यांनीच दिलेली अन् युरोपात जन्मलेली तुम्ही स्वीकारली ना? कुणाला म्हणजे लोकांना विचारून तुम्ही ती आणली होती का? नाही. लोक काही बोलत नसतात, याचा फायदा घेतला तुम्ही उदगीरकर. आमच्यावर लादली तुम्ही लोकशाही तुमची. मुळात या देशाला गरजच नाही लोकशाहीची. आपल्या देशाचा पाया ‘समरसता’ आहे. हजारो वर्षांपासून आपण एकमेकांशी ‘समरस’ झालो आहोत. ‘समरसते’त ज्यानं त्यानं आपली पायरी ओळखून वागायचं असतं. बरोबरी करायची नसते प्रत्येकाशी. तुमच्या लोकशाहीत लोक असतात, म्हणून केवढा गदारोळ उडालाय, दिसतंय ना? असे लायकी नसलेले लोक निवडून देता तुम्ही. ते मग उरावर बसतात आमच्या...”
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
नाना मध्येच थांबले. हेही आपण नको ते बोलून गेलो, असं त्यांना वाटल्याचं आम्हाला जाणवलं. आम्ही नानांचा असा दुहेरी अवतार प्रथमच पाहत होतो. कोणते नाना खरे, असं वाटून आम्ही कितव्यांदा तरी बुचकळ्यात पडलो.
नाना म्हणजे आमचे जो. शि. कुलकर्णी आता पुढे काही बोलणार नाहीत, हे आम्ही समजून चुकलो. हातात बराच काळ धरून ठेवलेली कपबशी आम्ही उठून त्यांच्या समोरच्या टीपॉयवर ठेवली अन् नानांना उभ्यानंच नमस्कार केला. पायात चप्पल घालून बाहेर पडलो.
बाहेर पुन्हा काकू भेटल्या. त्या अजूनही फोनवर होत्या. उजव्या हातानं त्यांनी आम्हाला ‘बरंय’चा इशारा केला. हसल्यासारखं दाखवलं आणि आपलं अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपायच्या कामी जुंपल्या. आतला माणूस काय बोलतोय, कुणाशी बोलतोय याचा पत्ता नाही अन् आतलाच पण सध्या बाहेर असणारा दुसरा माणूस तासभर झाला, तरी बोलणं थांबवत नाही, हे पाहून आम्ही बुचकळ्यात पडता पडता वाचलो. कितीदा पडावं?
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment