शुक्रवारी, ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यात ज्येष्ठ पत्रकार-संपादक निखिल वागळे यांच्यावर पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि त्यांच्या पाचपन्नास गुंडांनी लाठ्याकाठ्या, हॉकीस्टिक, दगड आणि शाई यांचा मारा करून त्यांची गाडी फोडली. पुण्याच्या भर रस्त्यावर त्यांना चार वेळा घेरण्यात आलं. पण काही राजकीय पक्षांच्या आणि इतर कार्यकर्त्यांनी निडरपणे या गुंडांना अडवत वागळे यांना कुठलीही शारीरिक इजा होऊ दिली नाही.
अशा भीषण हल्ल्याने एखादा माणूस भयभयीत होऊन मूर्च्छित पडला असता किंवा सभेत बोलूही शकला नसता. पण वागळेंसाठी असे हल्ले नवे नाहीत. यापूर्वी त्यांच्यावर पाच हल्ले झाले आहेत. आणि त्यातले जवळपास सगळेच शिवसेनेने केलेले आहेत. त्यात वागळेंना व्यासपीठावरून खाली खेचून लाथ्या-बुक्क्यांनी मारहाण झालेली आहे. पण त्या प्रत्येक हल्ल्याच्या वेळी वागळे जसे पुन्हा निडरपणे शिवसेनेच्या विरोधात उभे राहिले, तसाच कालचा सत्ताधारी भाजपने केलेला हिंसक हल्ला होऊनही वागळे निडरपणे सभेच्या ठिकाणी पोहचले. सभेत नेहमीप्रमाणे परखड, घणाघाती बोललेही. त्यांच्या या सभेला पुण्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
त्यामुळे या हल्ल्याची बातमी मराठीतल्या आघाडीच्या वर्तमानपत्रांनी कशा प्रकारे दिली, हे मुद्दामहून पाहण्यासारखं आहे.
दै. ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर दर्शनी छायाचित्रासह ‘पत्रकार वागळे यांच्या वाहनावर हल्ला’ अशी बातमी असून, ती पुढे पान चारवर दिली गेली आहे. या पानावर ‘वागळे यांच्याविरोधात गुन्हा’, ‘मला मारायला फडणवीसांनी माणसे पाठवली : वागळे’, अशा अजून दोन बातम्या आहेत.
दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीमध्ये पान दोनवर ‘निखिल वागळे यांच्यावर हल्ला’, ‘भारताचा हिंदू पाकिस्तान होऊन देणार नाही (वागळे)’, ‘निखिल वागळेंवर पुण्यात गुन्हा दाखल’, ‘कोणावरही हल्ला खपवून घेणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार’ अशा चार बातम्या आहेत.
दै. ‘प्रभात’च्या पुणे आवृत्तीमध्ये पान पाचवर ‘ ‘निर्भय बनो’सभेपूर्वी राजकीय गोंधळ’, ‘मोदी सरकार पुन्हा आले, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा (वागळे)’ अशा दोन बातम्या आहेत. या दोन्ही बातम्या अतिशय सविस्तर असल्याने हे संपूर्ण पान त्यालाच दिलं आहे.
दै. ‘पुढारी’च्या पुणे आवृत्तीमध्ये पान एकवर ‘निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला’ अशी बातमी असून, ती पुढे पान सातवर मोठ्या छायाचित्रासह दिली आहे.
दै. ‘पुण्यनगरी’च्या पुणे आवृत्तीमध्ये पान तीनवर दोन छायाचित्रांसह ‘पत्रकार निखिल वागळे यांच्या मोटारीवर पुण्यात हल्ला’ अशी व्यवस्थित बातमी आहे.
दै. ‘सामना’च्या पुणे आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर ‘निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला’ अशी दोन छायाचित्रांसह बातमी असून, ती पुढे पान पाचवर दिली गेली आहे. ‘सामना’ हे तसंही शिवसेनेचं (ठाकरे) एकप्रकारे अघोषित ‘मुखपत्र’च आहे, आणि सेनेने वागळे यांच्यावर अनेक वेळा असेच हिंसक हल्ले केलेले असल्यानं ‘सामना’त कदाचित त्यांची बातमी येणारही नाही, अशी अटकळ होती. पण या बातमीला ‘पुण्यात भाजपची झुंडशाही; पोलिसांकडून बघ्याची भूमिका’ असं उपशीर्षक देऊन ‘सामना’ने ‘यथोचित वर्णन करणारी बातमी’ हा पत्रकारितेच्या व्यावसायिक नीतीमूल्याचा एक निकष – सत्यता, हाही स्पष्टपणे अधोरेखित केला आहे.
दै. ‘लोकमत’च्या पुणे आणि मुंबई आवृत्त्यांमध्ये ९, १० आणि ११ फेब्रुवारी या तिन्ही दिवशी वागळे यांच्याविषयीची एकही बातमी आलेली नाही. (मुंबईच्या दै. ‘प्रहार’मध्येही नाही.) मात्र १०ला घोसाळकर यांच्या खुनाविषयीच्या दोन बातम्या पान एकवर प्रकाशित झाल्या आहेत, तर त्यांच्याविषयीच्या इतर बातम्यांना दुसरं संपूर्ण पान दिलं आहे. घोसाळकर यांचा खून ही जशी ‘राजकीय हिंसा’ आहे, तशीच वागळेंवरील हिंसक हल्ला हीदेखील ‘राजकीय हिंसा’च आहे, पण बहुधा ‘लोकमत’ला तसं वाटत नसावं.
मराठी पत्रकारितेचं एक वेळ जाऊ द्या, पण दै. ‘लोकमत’च्याच म.य. दळवी, महावीर जोंधळे, सुरेश द्वादशीवार या संपादकांनी जे व्यावसायिक पत्रकारितेचे आणि नीतीमूल्यांचे मानदंड प्रस्थापित केलेले आहेत, त्याचाही बहुधा ‘लोकमत’ला विसर पडला असावा.
सगळ्यात गमतीशीर बातमी आहे दै. ‘लोकसत्ता’च्या पुणे व मुंबई आवृत्त्यांमध्ये. या दोन्ही आवृत्त्यांमध्ये पहिल्या पानावर ‘पुण्यात पुरोगामी कार्यकर्त्यांवर भाजपचा हल्ला’ अशा शीर्षकाखाली एका छोट्या छायाचित्रासह बातमी आलीय. पुणे आवृत्तीची बातमी पुढे पान सातवरही दिली गेलीय. मात्र मुंबई आवृत्तीची जेमतेम तीन कॉलमी बातमी पहिल्याच पानावर संपते. छायाचित्रही नाईलाजानं दिल्यासारखं वाटावं, इतकं छोटं आहे.
‘लोकसत्ता’ची ही बातमी वाचून अनेक प्रश्न पडतात. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले आहेत. ते नुसते पाहताना आपलासुद्धा थरकाप उडतो. हा हल्ला ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला, तेही भीतीनं थिजून गेल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या आहेत. हा हल्ला केवळ निखिल वागळे यांनाच ‘टार्गेट’ करून केला गेला, हेही त्या व्हिडिओमधून सरळ सरळ दिसतं. हल्ला करणारे केवळ वागळे यांच्याच नावाचा पुकारा करत होते, हेही त्यातून स्पष्टपणे अधोरेखित होतं. हल्ला झाला, तेव्हा गाडीत वागळे यांच्यासोबत अॅड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि एक महिलाही होती, पण हल्लेखोर केवळ वागळे यांनाच ‘टार्गेट’ करताना दिसतात. तरीही ‘लोकसत्ता’च्या बातमीचं शीर्षक आहे – ‘पुण्यात पुरोगामी कार्यकर्त्यांवर भाजपचा हल्ला’.
म्हणजे हा हल्ला केवळ वागळे यांच्यावर झालेला नसून त्यांच्यासोबत गाडीत असलेल्या इतरही तिघांवर झाला आणि हे सगळे ‘पुरोगामी कार्यकर्ते’ होते, असं ‘लोकसत्ता’चं म्हणणं दिसतं. हा हल्ला भाजपने केलाय, याचा उल्लेख केलाय, हे विशेषच म्हणायला हवं.
या बातमीत पुढे म्हटलं आहे की, ‘सभेसाठी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अॅड. असीम सरोदे आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे निघाले असता, त्यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून मोटारीच्या काचा फोडल्या.’ प्रत्यक्षात पाच-पन्नास हल्लेखोरांनी लाठ्याकाठ्या, हॉकीस्टिक, दगड यांचा मारा वागळे यांच्या गाडीवर केला, शाई फेकली. हा हल्ला प्रभात रोड ते दांडेकर पूल या दरम्यान पाच वेळा झाला. हे सगळे सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झालेल्या व्हिडिओजमधून दिसते. पण ‘लोकसत्ता’च्या बातमीत मात्र हल्लेखोर किती, त्यांनी वागळे यांच्या गाडीच्या काचा कशानं फोडल्या, कशा प्रकारे फोडल्या, हल्ला किती वेळा केला, यापैकी कशाचाच उल्लेख नाही.
शीर्षकात नसला तरी बातमीत निदान वागळे यांचा उल्लेख तरी केलाय, यातच समाधान मानावं, असं ‘लोकसत्ता’चं धोरण दिसतं. तेही एक वेळ ठीक आहे. पण हा हल्ला केवळ आणि केवळ वागळे यांनाच ‘लक्ष्य’ करून करण्यात आला, तशी जाहीर धमकी पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली होती, हल्ला केल्यानंतरही त्यांनी ट्विट करून त्याचं समर्थनही केलं आहे. तरीही ‘लोकसत्ता’च्या या बातमीनुसार हा हल्ला ‘पुरोगामी कार्यकर्त्यां’वरच झालेला हल्ला आहे.
म्हणजे ‘लोकसत्ता’च्या या बातमीमधून ‘वागळे हे पत्रकार कमी आणि पुरोगामी कार्यकर्ते अधिक’ आहेत, असा अर्थ ध्वनित होतो. परिणामी, वागळेंनी दोनेक दशकं मुंबईतून ‘महानगर’ हे मराठी सायंदैनिक मालक-संपादक म्हणून चालवलेलं आहे, ‘आयबीएन-लोकमत’ या मराठी वृत्तवाहिनीचे संपादक म्हणून एका दशकाहून अधिक काळ काम केलं आहे, या वस्तुस्थितीकडेही दुर्लक्ष केल्यासारखं दिसतं.
याचा दुसरा अर्थ असाही होतो की, हा हल्ला त्यांच्यावर पत्रकार म्हणून झालेला नाही, तर केवळ ‘पुरोगामी कार्यकर्ता’ म्हणून झालेला आहे. विद्यमान राज्य व केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना ‘पुरोगामी कार्यकर्त्यां’चा तिटकाराच आहे. त्यांचा ते सतत ‘उद्धार’ करत असतात. त्यामुळे या सरकारच्या काळात ‘पुरोगामी’ या शब्दाला ‘शिवी’चं स्वरूप आलं आहे. त्याच अर्थानं तर ‘लोकसत्ता’ने ‘पुरोगामी’ हा शब्द वापरलेला नाही ना?
वागळेंवर हा हल्ला का झाला, तर केंद्र सरकारने मागच्या आठवड्यात भाजपचे वरिष्ठ नेते (आता निवृत्त) लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार जाहीर केल्यानंतर वागळेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आडवाणी आणि पंतप्रधान मोदी यांचा ‘दंगेखोर’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर अतिशय असभ्य भाषेत ‘उद्धार’ केला! भाजपनेते सुनील देवधर यांनी वागळेंविरोधात पुण्यात रितसर पोलीस तक्रारही केली.
९ फेब्रुवारी रोजी पुण्यात होत असलेल्या ‘निर्भय बनो’ या सभेत आपण सहभागी होत असल्याचे वागळेंनी जाहीर केले, तेव्हा भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांची सभा उधळून लावण्याची जाहीर धमकी दिली. ती ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर छायाचित्र व मजकूर अशा स्वरूपात प्रकाशितही झाली होती. प्रत्यक्षात त्यांच्या सभेच्या आदल्या दिवशी ‘इंडिया आघाडी’तल्या घटक पक्षांनी आणि ‘महाविकास आघाडी’ने वागळेंच्या सभेला संरक्षण देण्याचं जाहीर केलं. म्हणून मग धीरज घाटे व त्यांच्या हल्लेखोरांनी वागळेंना सभेला पोहोचण्यापूर्वी रस्त्यात अडवून त्यांच्यावर हा हिंसक\प्राणघातक हल्ला केला असावा.
सरकारच्या ध्येयधोरणांवर, निर्णयांवर टीका करणं, हे पत्रकारांचं कामच असतं. तसा अधिकार पत्रकारांना भारतीय लोकशाहीनं, न्यायसंस्थेनं आणि राज्यघटनेनंच दिलेला आहे. अर्थात त्याची माहिती धीरज घाटेंसारख्या गुंडप्रवृत्तीच्या भाजपेयींना असण्याची शक्यता नाही. अन्यथा ‘देशात भयमुक्त वातावरण असताना’ चार टाळकी ‘निर्भय बनो’ असे कसे म्हणू शकतात, त्यांना आम्ही धडा शिकवू’, अशी जाहीर धमकी आणि हल्ला करून झाल्यावर ‘आम्ही जे बोलतो ते करतोच… वागळेंना जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले’ अशी दर्पोक्ती त्यांनी ट्विट करून केली नसती.
हे धीरज घाटे भाजपचे पुणे शहराध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री भाजपचेच देवेंद्र फडणवीस. म्हणजे वागळेंवरचा हिंसक\प्राणघातक हल्ला हा एकप्रकारे ‘सरकारपुरस्कृत हिंसाचारा’चाच प्रकार होता. त्यातही तो वागळेंसारख्या एका ज्येष्ठ पत्रकार-संपादकावर झाला. पण ‘लोकसत्ता’च्या लेखी त्याला फारसं महत्त्व नाही. असं का? ही बातमी नाही का? नसेल, तर मग ती दिली तरी कशासाठी? दिली, तर मग अशा प्रकारे अर्धवट स्वरूपात का दिली? असे प्रश्न निर्माण होतात.
‘लोकसत्ता’च्या विद्यमान संपादकांनी पुण्यात समकालीन माध्यमांच्या जबाबदारीविषयी दिलेल्या एका इंग्रजी व्याख्यानाचा मराठी सारांश ३ डिसेंबर २०२३ रोजी पान चारवर ‘माध्यमांची जबाबदारी वाढली आहे…’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाला आहे. त्यात म्हटलं आहे की, “…५ डब्ल्यू आणि १ एच (व्हॉट, व्हेन, व्हेअर, हूम, हू आणि हाऊ) हे बातमीचे पारंपरिक स्वरूप आणि व्याख्या आता कालबाह्य झाली आहे. आताच्या परिस्थितीत बातमीच्या व्याख्येत आणखी २ डब्ल्यूंचा समावेश करावा लागेल. पत्रकारितेची व्याख्या समकालीन करण्यासाठी त्यात आणखी २ डब्ल्यू जोडावे लागतील. ‘आताच का?’ आणि ‘पुढे काय?’ (व्हाय नाऊ व व्हॉट नेक्स्ट) हे ते दोन डब्ल्यू. हा अतिशय महत्त्वाचा बदल पत्रकारास आजच्या काळात त्याच्या व्यवसायाशी सुसंगत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील.”
याला जोडूनच पुढे असं म्हटलं आहे की, “हे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. प्रामाणिक, सत्य आणि विनातडजोड पत्रकारितेला ‘देशद्रोही’ म्हणून हिणवले जात असल्याच्या काळात हे दोन डब्ल्यू आणखी आवश्यक ठरतात.”
दुर्दैवानं या विधानांचं प्रत्यंतर निदान वागळेंविषयीच्या ‘लोकसत्ता’च्या बातमीतून तरी नक्की येत नाही, असंच म्हणावं लागेल.
दुसरी गोष्ट, वागळेंनी अडवाणी-मोदी यांच्यावर केलेल्या टीकेशी ‘लोकसत्ता’ सहमत नसेल, ती अनुचित आहे, असं वाटत असेल, तर मग अग्रलेख वा संपादकीय स्फूटातून त्याचा समाचार घ्यायला हवा होता. कदाचित वागळेंचा ‘समाचार’ घेण्याइतके ते ‘दखलपात्र’ पत्रकार नाहीत, असं वाटल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं असावं. तेही समजण्यासारखं आहे. पण त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाच्याच पदाधिकाऱ्याने चिथावणी देत केलेला हिंसक हल्ला, हाही ‘किरकोळी’त मोडीत काढावा, इतका ‘सामान्य’ आहे का?
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
.................................................................................................................................................................
सगळ्याच सत्ताधाऱ्यांना गमजा मारण्याची सवय असते. ते त्यांना सोयीचं तेवढंच बोलतात आणि सोयीचं तेवढंच ऐकतात. सत्याचा सामना करण्याची, टीका सहन करण्याची धमक त्यांच्यात सहसा नसतेच. जवळपास सगळेच सत्ताधारी थोड्याफार फरकाने असेच असतात. खरं तर आपल्या गाजावाजासाठी त्यांच्या दिमतीला सबंध शासकीय-प्रशासकीय यंत्रणा असते, त्यांचे देशभरात पसरलेले कार्यकर्ते असतात, चाहते असतात… इतका सगळा फौजफाटा असूनही विद्यमान सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षांचीही टीका सहन होत नाही, आणि पत्रकारांचीही तर नाहीच नाही. अर्थात हेही तितकंच खरं आहे की, कुठलेच सत्ताधारी कटु बोलणाऱ्या पत्रकाराची फारशी ‘पत्रास’ बाळगत\ठेवत नाहीत, पण ‘लोकसत्ता’सारखी आघाडीची माध्यमंही आपल्याच पेशातल्या ज्येष्ठ पत्रकाराबाबतही तशीच वागू लागली आहेत, असं समजायचं का?
सत्ताधाऱ्यांचे गैरव्यवहार, दुर्वर्तन आणि भ्रष्ट कारनामे जनतेसमोर आणून त्यांना सत्तेतून खाली खेचणं आणि स्वत: सत्ताधीश होणं, हे आपल्या देशातल्या विरोधी पक्षांचं तसं ‘घटनादत्त’च काम असतं. पण देशातल्या प्रसारमाध्यमांचा आणि त्यात काम करणाऱ्या कुठल्याही पत्रकाराचा असा कुठलाही ‘अजेंडा’ नसतो. सत्ताधाऱ्यांना जे छापलं-सांगितलं-दाखवलं जाऊ नये, ते छापणं-सांगणं-दाखवणं हे माध्यमांचं-पत्रकारांचं घटनादत्त आणि व्यावसायिक कामच असतं.
वागळे एक पत्रकार म्हणून तेच तर करत आहेत. सत्ताधाऱ्यांना ते आवडत नाही, हे एक वेळ समजून घेता येईल, पण ‘लोकमान्य लोकशक्ती’ असं बिरुद मिरवणाऱ्या ‘लोकसत्ता’सारख्या एका प्रतिष्ठित आणि जबाबदार वर्तमानपत्राला त्यात न आवडण्यासारखं काय आहे? तुमच्याच पेशातले, तुमच्यासारखंच काम करणारे, तुमच्यासारखीच सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे तेही पत्रकारच आहेत की! वयाने, अनुभवानेही ज्येष्ठ आहेत.
वागळे जरा जास्त आक्रमकपणे बोलतात-लिहितात ही गोष्ट खरीच आहे. त्यामुळे त्यांची सगळी मतं सगळ्यांनाच पटतील असंही नाही. पण असहमती वेगळी आणि त्यांच्यावर झालेल्या अतिशय हिंसक पद्धतीच्या प्राणघातक हल्ल्याबाबतची उदासीनता वेगळी.
माध्यमं आणि त्यातल्या पत्रकारांनी अन्याय-अत्याचाराच्या, दडपशाहीच्या, दमनाच्या आणि हिंसाचाराच्या विरोधात भूमिका घ्यायची असते. ‘लोकसत्ता’ ती अनेकदा घेतोही. मग वागळेंवरील हल्ल्याबाबत दुजाभाव का झाला असावा?
वागळेंची मतं आक्रमक असतील, पण ‘लोकसत्ता’च्या विद्यमान संपादकांचाच आवडता शब्द वापरायचा तर त्यांच्यावर ‘निवडक नैतिकते’चा आरोप करता येणार नाही. वागळे राज्यातल्या-केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांवर जशी टीका करतात, तशीच शरद पवार-त्यांचा पक्ष, अजित पवार-त्यांचा पक्ष, एकनाथ शिंदे-त्यांचा पक्ष, काँग्रेस, वंचित, उद्धव ठाकरे-त्यांचा पक्ष आणि राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेसपासून डाव्यापर्यंतचे पक्ष व नेते, अशा जवळपास सर्वच राजकीय पक्षांवर, त्यांच्या नेत्यांवर आणि त्यांच्या ध्येयधोरणांवरही टीका करतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
वर ३ डिसेंबर रोजी ‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या विद्यमान संपादकांच्या ज्या व्याख्यानाच्या सारांशाचा उल्लेख केला आहे, त्यातच ते शेवटी शेवटी असं म्हणतात की, “आयुष्यातील प्रत्येक पावलावरील मूर्खतेला प्रश्न विचारणे हे माध्यमांचे काम आहे. समाजाला त्याच्या झोपेतून जागे करण्याची जबाबदारी माध्यमांची आहे. ही जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी आधी माध्यमांना जागे होऊन वास्तवाचा सामना करावा लागेल. ते हे करतील का?”
वागळे वेगळे काय करतात? ते सरकारला, विरोधी पक्षांना, समाजाला आणि माध्यमांनाही प्रश्न विचारून, टीका करून जागे करण्याचे, निदानपक्षी हलवण्याचेच काम करत आहेत की! ‘लोकसत्ता’चे विद्यमान संपादक ‘पत्रकारांनी ‘अनप्रेडिक्टेबल’ असलं पाहिजे’ असंही आपल्या अग्रलेखांतून, व्याख्यानांतून अनेकदा सांगत असतात. वागळेही ‘अनप्रेडिक्टेबल’ आहेतच की! त्यांची विविध राजकीय पक्षांवरील आणि त्यांच्या नेत्यांवरील टीका ‘प्रेडिक्टेबल’ वाटू शकते, पण कुणालाच गृहित धरू न देणं आणि कुठलीच गोष्ट गृहित न धरणं, यापेक्षा वेगळं काय असतं ‘अनप्रेडिक्टेबल’ असणं?
थोडक्यात, वागळेंसारख्या ‘निवडक नैतिकता’ नसलेल्या आणि ‘अनप्रेडिक्टेबल’ असलेल्या ज्येष्ठ पत्रकार-संपादकावर झालेल्या अतिशय हिंसक स्वरूपाच्या प्राणघातक हल्ल्याची बातमी, ‘लोकमान्य लोकशक्ती’ असलेलं ‘लोकसत्ता’सारखं प्रतिष्ठित-नामांकित वर्तमानपत्र इतकं ‘सामान्यीकरण’ करून देत असेल, तर त्यातून काय बोध घ्यावा?
वागळेंवर हल्ला झाला, हे योग्यच झालं, हा?
की वागळेंवर हल्ला झाला, त्यालाच तेच कारणीभूत आहेत, हा?
असे ‘विषारी विनोद’ हेच सर्वमान्य ‘सत्य’ म्हणून स्वीकारले जाण्याचे दिवस फार लांब नाहीत बहुधा…
.................................................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment