अजूनकाही
सर्वप्रथम पत्रकार म्हणून घेण्याचा १०० टक्के नैतिक अधिकार असलेल्या महाराष्ट्रातल्या मोजक्या दोन-चार पत्रकारांपैकी एक असलेले निर्भीड, निडर पत्रकार निखिल वागळे आणि सामाजिक कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे व विश्वंभर चौधरी यांच्यावर काल पुण्यात झालेल्या हिंसक\प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध.
आता सुरुवातीपासूनचा घटनाक्रम पाहू या.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने भाजपचे वरिष्ठ पण ‘सक्तीने’ निवृत्त केले गेलेले नेते डॉ. लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला. त्यावर वागळे यांनी टीका केली. त्यात त्यांनी आडवाणी आणि पंतप्रधान मोदी यांना ‘दंगेखोर’ असे संबोधले होते. त्यावरून भाजपच्या हिंसक कार्यकर्त्यांनी अतिशय निंदनीय भाषेत वागळे यांना सोशल मीडियावर ट्रोल केले. भाजपनेते सुनील देवधर यांनी त्यांच्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार केली.
त्यानंतर वागळे सिन्नरच्या ‘लढा लोकशाहीचा! अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा!!’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘निर्भय बनो’ सभेत सहभागी झाले. त्यांनी त्यात सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांनी ९ फेब्रुवारी रोजी पुण्यात ‘निर्भय बनो’ सभा होत असल्याचे जाहीर केले. तेव्हा पुण्याचे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ही सभा उधळून लावण्याची, होऊ न देण्याची जाहीर धमकी दिली. ‘देशात भयमुक्त वातावरण असताना चार टाळकी ‘निर्भय बनो’ म्हणून आपला अजेंडा रेटत आहेत. त्यांचा हा अजेंडा उधळून लावल्याशिवाय पुणे शहर भारतीय जनता पार्टी शांत राहणार नाही’, अशी जाहीर धमकीच धीरज घाटे यांनी दिली होती.
वागळे यांची प्रतिक्रिया जरा आक्रमक होती, हे खरे, पण राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपचेच एक नेते धीरज घाटे म्हणतात, तसे देशात ‘भयमुक्त वातावरण’ असेलच, तर ‘कायद्याचे राज्य’ही असायला हवे. आणि त्यानुसार वागळे यांच्याविरोधात रितसर ‘कायदेशीर कारवाई’ व्हायला हवी होती. त्यांच्या पुण्याच्या सभेला पोलीस परवानगी नाकारतील असे पाहायला हवे होते. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल वागळे यांना अटक करायला हवी होती. देशात ‘भयमुक्त वातावरण’ आहे, असा तुमचा दावा आहे ना, तर मग ‘कायद्याचे राज्य’ का नाही? आणि कायद्याला धरून कारवाई का नाही झाली? उलट वागळेंच्या सभेला पोलिसांना परवानगी दिली, त्यांना सभेआधी तीन तास अडवून ठेवले, पण अटक केली नाही. वागळे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांना सभेच्या ठिकाणी जाऊ दिले. मात्र त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, याची पुरेपूर कल्पना असतानाही त्यांना पुरेसे संरक्षण दिले नाही.
परिणामी पुण्यात भररस्त्यावर भाजपच्या पाच-पन्नास गुंडांनी लाठ्याकाठ्या, दगड, हॉकीस्टिक, शाई घेऊन वागळे यांच्या गाडीवर अतिशय हिंसक\प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या, शाई फेकली, तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या या गुंडांना अडवण्याचे काम पोलिसांपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी, पुण्यातल्या काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यातल्या महिलांनी केले. हा हल्ला इतका भीषण, भयंकर आणि हिंसक होता की, त्यातून सुदैवानेच वागळे, सरोदे आणि चौधरी बचावले, असेच म्हणावे लागेल. त्यांच्या गाडीचा चालक आणि काही कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना अडवत, त्यातही महिलांनी प्रापपणाने त्यांचे संरक्षण करत त्यांना सभेच्या ठिकाणी पोहचवले.
या हल्ल्याचे जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यावरून या हिंसक हल्ल्याची क्रूरता उघड होते. या हल्ल्याच्या वेळी ‘भयमुक्त वातावरणा’चे पाईक असलेले पोलीस काय करत होते? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीही आहेत. त्यांनी पोलिसांना नेमके कुठले आदेश दिले होते? देशातले ‘भयमुक्त वातावरण’ शाबूत ठेवण्यासाठी वागळेंवर त्यांच्याच पक्षाच्या गुंडांनी हल्ला केला तरी, वागळेंना संरक्षण न देता त्यांच्यावर हल्ला होऊ देण्याचे?
राज्यकर्त्यांवर टीका करण्याचा पत्रकारांना घटनादत्त अधिकार आहे. ती टीका तुम्हाला आक्षेपार्ह वाटत असेल तर, त्याच्याशी तुम्ही सहमत नसाल, तर त्याचा प्रतिवाद करा. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करा. किंवा तुमच्या दृष्टीने ती कारवाईयोग्य असेल तर ‘कायदेशीर कारवाई’ करा. पण तसे काहीही न करता सत्ताधारी पक्षाचे नेते वागळेंवर प्राणघातक हल्ला करतात, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या हिंसक हल्ल्याचा निषेध न करता, हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश न देता, उलट एकप्रकारे त्याचे समर्थनच करतात, यावरून धीरज घाटे म्हणतात तसे देशात ‘भयमुक्त वातावरणा’चा असल्याचा ढळढळीत पुरावाच मिळतो.
या क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या हिंसक हल्ल्यामुळे ‘देशात भयमुक्त वातावरण’ कसे आहे, याचे दर्शन पुणेकरांना, महाराष्ट्राला, देशाला आणि काही प्रमाणात जगालाही घडले, हे चांगलेच झाले!
हल्ला केल्यानंतर धीरज घाटे यांनी ‘‘आम्ही जे बोलतो ते करतो…!! स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या परंतु सत्यता बघितले तर नक्षलवादाला खतपाणी घालणाऱ्या निखिल वागलेने ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व भारतरत्न लालकृष्ण आडवाणी जी आणि देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल स्वत:च्या प्रसिद्धीसाठी आक्षेपार्य विधान करून गरळ ओकली होती. त्याचा निषेध म्हणून महायुती पुणे शहराच्या वतीने जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले...!!’’ असे ट्विट केले. ते त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले.
राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या पक्षाचे गुंडप्रवृत्तीचे कार्यकर्ते इतका भीषण, हिंसक हल्ला करतात, त्याबाबत स्वत:च जाहीरपणे ट्विट करतात. त्यावर काल रात्री उशिरा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया द्यावी? तर “कायदा सुव्यवस्था कोणीच मोडू नये, ज्यांनी हे केलं, त्यांना शिक्षा होईल, पण उच्चपदस्थ नेत्यांबाबत बोलताना नीट बोलावं” ही अशी.
राज्यकर्त्यांवर टीका करण्याचा पत्रकारांना घटनादत्त अधिकार आहे. ती टीका तुम्हाला आक्षेपार्ह वाटत असेल, त्याच्याशी तुम्ही सहमत नसाल, तर त्याचा प्रतिवाद करा. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करा. किंवा तुमच्या दृष्टीने ती कारवाईयोग्य असेल, तर ‘कायदेशीर कारवाई’ करा. पण तसे काहीही न करता सत्ताधारी पक्षाचे नेते वागळेंवर प्राणघातक हल्ला करतात, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या हिंसक हल्ल्याचा निषेध न करता, हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश न देता, उलट एकप्रकारे त्याचे समर्थनच करतात, यावरून धीरज घाटे म्हणतात तसे देशात ‘भयमुक्त वातावरण’ असल्याचा ढळढळीत पुरावाच मिळतो.
सत्ताधारी पक्षाचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीच जर इतके बेजबाबदारपणे वागत\बोलत असतील, तर या देशातल्या ‘भयमुक्त वातावरणा’तल्या कायदा-सुव्यवस्थेची, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आणि लोकशाही हक्कांची स्थिती नेमकी काय आहे, यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही.
वागळेंवर झालेल्या हल्ल्याचा काल संध्याकाळपासून सोशल मीडियावर सर्व थरांतून मोठ्या प्रमाणावर तीव्र शब्दांत निषेध केला गेला आहे. अनेकांनी या हल्ल्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. हा हिंसक हल्ला प्रत्यक्ष पाहिलेल्यांनी, अनुभवलेल्यांनी आणि सभेला उपस्थित असलेल्यांनी त्याबाबतचा घटनाक्रम, वस्तुस्थिती सांगितली आहे. म्हणजे सगळे साक्षीपुरावे सोशल मीडियावर जगजाहीर झालेले आहेत. आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचेच नेते असलेल्या धीरज घाटे यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘देशात भयमुक्त वातावरण’ असल्याचे दाखवून द्यावे, नाहीतर या हल्ल्याला राज्य सरकारची मूकसंमती होती, असे तरी जाहीर करावे.
अर्थात हा जीवघेणा हल्ला होऊनही ‘निर्भय बनो’ची सभा झाली. तिला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. काल पुण्याच्या काही वर्तमानपत्रांत वागळे यांच्या सभेवरून वादंग माजले असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या. त्या सोशल मीडियावर शेअर झाल्या. त्या वाचून, विशेषत: त्यात धीरज घाटे यांनी दिलेली हिंसक धमकी वाचून एरवी या सभेला जाऊ न इच्छिणाऱ्या अनेकांनी सभेला जाण्याचा निर्धार बोलून दाखवला. ते सभेला गेलेही. ज्यांची अशी समजूत आहे की, सभेच्या अर्धा-पाऊण तास आधी वागळेंवर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांची सभा एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली, ते पुण्यातल्या सुजाण नागरिकांच्या अवमान करणारे आहेत, हे नक्की.
वागळेंच्या सभेला पुणेकरांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला, त्यावरून ही सभा तर यशस्वी झालीच, पण वागळे-सरोदे-चौधरी यांच्या ‘निर्भय बनो’ या सादेलाही सुजाण पुणेकरांनी पाठिंबा दिला आणि हिंसक हल्लेखोरांना सणसणीत चपराक लगावली, असेच म्हणावे लागेल.
याचाच दुसरा अर्थ असा की, धीरज घाटे यांच्यासारखे सत्ताधारी पक्षाचे गुंडप्रवृत्तीचे नेते ‘देशात भयमुक्त वातावरण’ असल्याचा कितीही डांगोरा पिटत असले, तरी देशातल्या जनतेचा मात्र त्यांच्यावर विश्वास नाही.
वागळेंवर झालेल्या हल्ल्याचा काल संध्याकाळपासून सोशल मीडियावर सर्व थरांतून मोठ्या प्रमाणावर तीव्र शब्दांत निषेध केला गेला आहे. अनेकांनी या हल्ल्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. हा हिंसक हल्ला प्रत्यक्ष पाहिलेल्यांनी, अनुभवलेल्यांनी आणि सभेला उपस्थित असलेल्यांनी त्याबाबतचा घटनाक्रम, वस्तुस्थिती सांगितली आहे. म्हणजे सगळे साक्षीपुरावे सोशल मीडियावर जगजाहीर झालेले आहेत. आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचेच नेते असलेल्या धीरज घाटे यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘देशात भयमुक्त वातावरण’ असल्याचे दाखवून द्यावे, नाहीतर या हल्ल्याला राज्य सरकारची मूकसंमती होती, असे तरी जाहीर करावे.
राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या पक्षाने देशात ‘कायद्याचे राज्य’ निर्माण करून खरोखरच ‘भयमुक्त वातावरण’ निर्माण केल्याची किती उदाहरणे सांगता येतील? उलट अशी देशभरात ‘भयप्रद वातावरण’ असल्याची गेल्या दहा वर्षांतली कैक उदाहरणे सांगता येतील. त्यांची एक मोठी मालिकाच आहे. तरीही देशात ‘भयमुक्त वातावरण’ आहे, असे राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपचे म्हणणे असेल, तर मग निखिल वागळे यांच्यासारख्या एका पत्रकाराची एवढी धास्ती का वाटतेय तुम्हाला?
दुसरी गोष्ट या हल्ल्याचा समाजाच्या विविध थरांतून जसा निषेध केला गेला, तसा राज्यातल्या मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी, विशेषत: त्यांच्या संपादकांनी केला का? का केला नाही? जांभेकर-टिळक-आगरकर-तळवलकर यांचा वारसा मिरवणारी आणि द्विशताब्दीच्या उंबरठ्यावर पोहोचलेली मराठी पत्रकारिताही राष्ट्रीय पातळीवरील हिंदी-इंग्रजी वृत्तवाहिन्यांइतकीच ‘सरकारची बटिक’ झालेली आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली एवढेच.
सत्ताधारी पक्षाचे धीरज घाटे म्हणतात, तसे ‘देशात भयमुक्त वातावरण’ असल्याच्या तीन-चार घटना नुकत्याच महाराष्ट्रात घडल्या आहेत. गेल्या वर्षी सात फेब्रुवारी रोजी बारसू-सोलगावमधील रिफायनरी विरोधात आवाज उठवणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची हत्या केली गेली. त्याच्या तपासाचा राज्यातील मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी किती पाठपुरावा केला? राज्य सरकारच्या पोलिसांनी आजवर काय तपास केला? एका पत्रकाराची अतिशय हिंसक पद्धतीने हत्त्या झाल्यावरही त्याबाबत काहीच होत नाही, हाच या देशात, राज्यात खरोखरच ‘भयमुक्त वातावरण’ आहे, याचा एक पुरावा मानावा लागेल.
नुकताच पुण्यात भाजपच्याच गुंडांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातले नाटक हल्ला करून बंद पाडले, या केंद्राची नासधूस केली, विद्यार्थी-विद्यार्थिनींना मारहाण केली. शिवाय विभागप्रमुख व विद्यार्थ्यांविरोधातच पोलीस तक्रार केली. पोलिसांनाही त्यांनाच अटक केली. नंतर विभागप्रमुख आणि या केंद्राची सोशल मीडियावर अतिशय गलिच्छ प्रकारे निंदानालस्ती करण्याची मोहीम चालवली गेली. कुणी तर सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी. हा या देशात, राज्यात खरोखरच ‘भयमुक्त वातावरण’ आहे, याचा दुसरा.
सत्ताधारी भाजपच्या एका नेत्याने नुकत्याच त्यांच्याच पक्षात सहभागी असलेल्या शिवसेना नेत्यावर थेट पोलीस ठाण्यातच गोळी झाडली. देशात, राज्यात खरोखरच ‘भयमुक्त वातावरण’ आहे, याच्याएवढा उत्तम पुरावा बहुधा गेल्या दहा वर्षांत दुसरा दाखवता येणार नाही बहुधा.
नुकतीच मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या एका माजी नगरसेवकाची ऑनलाईन लाईव्ह कार्यक्रमात गोळ्या घालून हत्या केली गेली. त्याचा आरोपी असलेल्यांनेही नंतर स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया देशात, राज्यात खरोखरच ‘भयमुक्त वातावरण’ आहे, याचा चौथा पुरावा ठरतो. ते म्हणाले, ‘एखादं कुत्रं गाडीखाली मेलं तरी विरोधक गृहमंत्र्याच्या राजीनामा मागतील.’
राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या पक्षाने देशात ‘कायद्याचे राज्य’ निर्माण करून खरोखरच ‘भयमुक्त वातावरण’ निर्माण केल्याची गेल्या दहा-बारा दिवसांत केवळ महाराष्ट्रात दिसलेली ही निवडक उदाहरणे. अशी देशभरातली गेल्या दहा वर्षांतली कैक उदाहरणे सांगता येतील. त्यांची एक मोठी मालिकाच आहे.
तरीही देशात ‘भयमुक्त वातावरण’ आहे, असे राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपचे म्हणणे असेल, तर मग निखिल वागळे यांच्यासारख्या एका पत्रकाराची एवढी भीती का वाटतेय तुम्हाला?
(ताजा कलम : कालच्या वागळ्यांच्या सभेला शरद पवारांच्या पक्षाने, आपने, काँग्रेसने समर्थन दिलं, पवारांच्या एका रणरागिणीने तर शर्थीने वागळे यांना वाचवलं. त्या तरुणीचं मनःपूर्वक अभिनंदन. पण अगदी खरं सांगायचं, तर वागळे यांना कुठल्याही विरोधी पक्षाची गरज नाही. वागळे त्यांच्यासोबत कधी जाण्याची शक्यताही नाही. उद्या वागळे त्यांच्या ध्येयधोरणांवरही अशीच परखड टीका करतील, करत आले आहेत.)
.................................................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment