प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।
संकीर्ण - श्रद्धांजली
अतिंद्र सरवडीकर
  • स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे (जन्म - १३ सप्टेंबर १९३२, मृत्यु - १३ जानेवारी २०२४)
  • Sat , 10 February 2024
  • संकीर्ण श्रद्धांजली प्रभा अत्रे Prabha Atre अतिंद्र सरवडीकर Atindra Sarvadikar

डॉ. प्रभा अत्रे भारतीय संगीतातलं जणू कैलास लेणं. भारतीय रागदारी संगीतातलं सौंदर्य आणि लालित्य जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या सर्वार्थानं श्रेष्ठ कलाकार...

त्यांचा नादमय आवाज, सादरीकरणातली अफाट तयारी, नावीन्य, अगदी शेवटपर्यंत कायम राहणारी माधुरी, सहजता, व्यक्तिमत्त्वातली प्रसन्नता या सगळ्यांनी श्रोता तत्काळ प्रभावित व्हायचा. मग चिकित्सेनं थोडं निरखून पाहायला लागलं की, या सगळ्यामागची त्यांची साधना, अखंड चिंतन, निर्मिती क्षमता हे सगळं पाहून मन थक्क होतं! कलेचं ‘शिवधनुष्य’ रसिकांसाठी त्यांनी ‘इंद्रधनुष्य’ केलंय, याची प्रचीती येते.

शास्त्रोक्त संगीताच्या क्षेत्रात ज्यांना पूर्वपरंपरा लाभली आहे, ज्यांच्या घरातच संगीत होतं आणि ज्या निवडक गंडाबंध शिष्यांना मोठ्या गुरूंची अनेक वर्षांची विशेष तालीम लाभली; अशांचाच पुढे कलाकार म्हणून बोलबाला झाला, असं साधारणपणे घडलेलं दिसतं. प्रभाताईंच्या बाबतीत अगदी आगळं घडलं! त्यांच्या घरात म्हणे त्यांच्यापूर्वी कोणी संगीत ऐकतसुद्धा नव्हतं. खरं तर सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडूनही तशी थोड्याच कालावधीसाठी त्यांना प्रत्यक्ष तालीम लाभली. मग पुढचा सगळा प्रवास त्यांनी एकलव्याप्रमाणे स्वाध्यायानं केला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

स्वयंप्रतिभेनं संगीताच्या क्षितिजावर उंच भरारी घेतली. अढळपद मिळवलं. उस्ताद अमीर खान आणि उस्ताद बडे गुलाम अली खान हीदेखील त्यांची प्रेरणा स्थानं. या दोन्ही उस्तादांनाही प्रभाताईंचं कौतुकच वाटायचं. या दोन्ही खांसाहेबांनी युवावयातल्या प्रभाताईंचं मैफलीतलं गाणं ऐकलं होतं आणि मनमोकळी दादही दिली होती.

एकदा एका मुलाखतीत अमीर खान यांना विचारलं गेलं की, तुम्हाला पुढच्या पिढीबद्दल काय वाटतं? तेव्हा त्यांनी पिढीतल्या उत्तम कलाकार म्हणून प्रभाताईंचं नाव आवर्जून घेतलं होतं. सुरेशबाबू आणि हिराबाईंनाही आपल्या या प्रज्ञावंत शिष्येचा अभिमान होता. प्रभाताईंनी किराणा घराण्याचा वारसा नुसता चालवला नाही, तर सर्वार्थानं समृद्ध केला, पुढे नेला.

आडवळणांनी या वळणावर प्रभाताईंकडे गाणं शिकायला मिळणं, हा माझ्या आयुष्यातला विलक्षण भाग्ययोग. मी मूळचा सोलापूरचा आणि प्रभाताई पुण्या-मुंबईत. परंतु त्यांच्या गाण्याची मोहिनीच अशी जबरदस्त होती की, शिकायचं तर यांच्याकडेच असं मी नकळत्या वयातच ठरवून टाकलं. कुठलीही ओळख नसताना धाडसानं एकदा मुंबईला गेलो, त्यांची भेट घेतली आणि शिकवण्याची विनंती केली. माझं गाणं ऐकून, थोडी पारख करून प्रभाताईंनी शिष्य म्हणून स्वीकारलं आणि त्यांच्याकडचा माझ्या शिक्षणाचा प्रवास २००३मध्ये सुरू झाला.

त्यांचं गाणं ‘प्रेडिक्टेबल’ नसे. त्यात अनेक ‘सरप्रायझेस’ असत. म्हणूनच ते शिकणं महाकठीण! त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, मन मानेल तसा वळणारा आवाज आणि विलक्षण कल्पनाशक्ती क्षणोक्षणी थक्क करणारी. प्रभाताई अखंड संगीतचिंतनात असलेल्या मला फार जवळून अनुभवायला मिळालं, त्याचा माझ्या मनावर अतिशय खोलवर परिणाम झाला. लहानसहान गोष्टीतही त्यांच्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, विनम्रता हे गुण प्रकर्षानं जाणवायचे. हे सगळे संस्कार नकळत माझ्या अंतर्यामी खोलवर रुजले. गुरूंनी दाखवलेल्या प्रकाशवाटेवरून चालताना अवघं जीवन उजळलं.

भारतीय संगीताच्या क्षेत्रात स्त्रीगुरू अगदी कमी होऊन गेल्या आहेत. एक तर आपल्या समाजात स्त्रियांच्या स्वतंत्र कर्तृत्वाला तशी उशिराच मान्यता मिळाली. स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत दुय्यमच स्थान होतं. एखाद्या स्त्रीगुरूनं अनेक पुरुष शिष्यांचं गुरू असावं, हे कदाचित म्हणूनच पचनी पडणारं नव्हतं. तरीही भीमसेन जोशींच्या तानेवर म्हणे केसरबाईंचा प्रभाव पडला होता, कुमार गंधर्व अंजनीबाई मालपेकरांकडे फार भक्तिभावानं शिकले होते, मोगुबाई कुर्डीकरांनी काही पुरुष शिष्यांना तालीम दिली होती, हिराबाईंकडेही काही पुरुष शिष्य शिकले होते. (सुधीर फडकेंसारखे मोठे गायक हिराबाईंना गुरू मानत), राजाभाऊ कोगजे रसूलन बाईंकडे ठुमरी शिकले होते. अशी मोजकी उदाहरणं सापडतात!

यानंतरच्या पिढ्यांमध्ये गंगुबाई हनगल, गिरिजादेवी, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, वीणा सहस्रबुद्धे, धोंडुताई कुलकर्णी, माणिक भिडे, अश्विनी भिडे यांसारख्या सुप्रसिद्ध गायिकांकडे अनेक पुरुष शिष्य मोकळेपणानं शिकू लागले, असं आढळतं. यामधले अनेक शिष्य व्यावसायिक कलाकार म्हणूनही यशस्वी ठरले. गुरुतत्त्व आणि संगीतासारखी कला हे दोन्ही लिंगभेद, जाती-वर्णभेद, वयातला फरक या सगळ्याच्या पलीकडचं आहे हेच यामधून सिद्ध होतं.

अर्थात गुरू तसा अधिकारी आणि विचारवंत हवा. पुरुष गुरूंकडे शिकून त्यांच्यासारखे पुरुषी हातवारे करणाऱ्या असहज, अति जोरकसपणे गाणाऱ्या गायिकाही आहेतच. स्त्री आणि पुरुष यांच्या आवाजाच्या पट्टीतला फरक, तसंच सादरीकरणाच्या लहेजातला फरक ओळखून शिकवण्याची क्षमता गुरूकडे असावी लागते. स्त्री आणि पुरुष यांची व्यक्त होण्याची आपापली वृत्ती असते. स्त्रीचे कोमल स्वरलगाव, नाजूक वळणं पुरुषी आवाजात ठोस, जोरकस वाटू शकतात. अगदी स्वरावली तीच असली तरीही. ते एक्स्प्रेसशन तसंच फुलू द्यावं. व्यक्त होण्याची, अशी सहजसुंदर जाणीव शिष्यामध्ये निर्माण केली जावी.

प्रभाताईंना सुरेशबाबूंची तालीम मुख्यत्वे मिळाली, तसेच उस्ताद बडे गुलाम अली खान, उस्ताद अमीर खान यांसारख्या भरदार मर्दानी आवाजाच्या पुरुष गायकांच्या गाण्यातून त्यांनी प्रेरणा घेतली. असं असलं, तरी त्यांचं गाणं पुरुषी झालं नाही किंवा दुसऱ्या कुणाची नक्कल ठरलं नाही.

या जिवंत उदाहरणातून योग्य तो आदर्श माझ्यासमोर ठेवला गेला. मला शिकवताना प्रभाताईंचं सगळ्या संदर्भात बारीक लक्ष असे. उत्तम पुरुष आवाज बनण्यासाठीची आवश्यक खर्जसाधना, योग्य उच्चारण, मोकळा आवाज, सर्व सप्तकांत गुंजणारा आवाज यासाठी आवश्यक रियाजाची पद्धत त्यांनी मला दाखवली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला त्यांनी कधीही त्यांच्या (स्त्रियांच्या पट्टीत गायला लावलं नाही. कायम माझ्या सफेद दोन या पुरुष सुरात शिकवलं. त्यासाठी त्यांना कष्ट पडले तरीही!

माझ्या शिक्षणाच्या काळातच पुरुषांनी पुरुषवाचक अर्थ असलेल्या बंदिशीच गाव्यात, असा विचारही त्यांनी मांडला. भारतीय संगीतात असा विचार कुणीतरी प्रथमच मांडलाय. यामुळे भारतीय शास्त्रोक्त संगीत सादर करण्यात आमूलाग्र बदल घडू शकतो. स्वतःच्या योग्य बदल केलेल्या अशा बंदिशी त्यांनी मला शिकवल्या. जसं ‘जिया मोरा ना लागे बैरी बालमुवा’ असं त्यांच्या स्त्री शिष्या गातात, तर मला त्यांनी ‘जिया मोरा ना लागे बैरी सजनिया’ अशा प्रकारचा बदल करायला लावला. असा विचार करायला मुळात तेवढी उच्च प्रतिभा आणि तशा विपुल नवीन संगीत रचना करू शकणारी निर्मितीक्षमता हवी.

सुरुवातीची वर्षं मी प्रभाताईंकडे राहूनच शिकलो. त्यामुळे शिकत असताना त्यांचं इतरांना शिकवणंही मला जवळून पाहता आलं, जास्त शिकता आलं. ताईंनी अनेक शिष्यांना प्रेमानं खाऊपिऊ घालून निरपेक्षपणे शिकवलं. एरवी प्रेमळ आणि अत्यंत रुजू व्यक्तित्वाच्या प्रभाताई शिकवताना फार काटेकोर आणि कडक असत. एखाद्या स्वराची हालचाल, एखादा कण किंवा खटका जरी वेगळा झाला, तरी त्या अस्वस्थ होत. आपलं ऐकणं एवढं चांगलं हवं की, गाणाऱ्यानं केवढा श्वास घेतलाय, तेही समजलं पाहिजे, असं त्या सांगत.

बंदिश जशी आहे तशीच मांडण्याबद्दल त्या आग्रही असत. शिकवतानाही त्यांच्या गाण्यातली सगळी वळणं, हालचाली इतक्या सुबक असत की एखाद्या डौलदार, प्रमाणबद्ध शिल्पकृतीचा त्यात आभास व्हावा. त्यांच्या बंदिशीच्या मुखड्यावर एवढीशीही सुरकुती कधी पडली नाही, तो कायम टवटवीत आणि तजेलदार राहिला.

प्रभाताईंकडची शिक्षणाची सुरुवातीची वर्षं मला फार अवघड गेली. त्यांच्यासमोर गाणं म्हणजे अडखळणं आणि धडपडणं यांची जणू काही शर्यतच सुरू व्हायची. एक तर माझं सुरुवातीचं संगीतशिक्षण वेगळ्या पद्धतीनं झालं होतं, त्यात मी होतो १६-१७ वर्षांचा सोलापूरहून पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात प्रथमच शिकायच्या निमित्तानं आलेला. ताईंचं भारदस्त, एखाद्या देवतेसारखं व्यक्तिमत्त्व, त्यांच्या आवाजातलं तेज, परिणामकारकता या सगळ्यांचं दडपण येऊन माझ्या तोंडातून स्वरच फुटायचा नाही. शिकावं तर खूप वाटे पण अप्रूप, भीती, संकोचलेपण अशा संमिश्र भावना माझ्या मनात दाटून येत. कालांतरानं शिकण्याच्या अनावर ओढीनं या सगळ्या अडचणींवर मात केली. त्यांचं गाणं हळूहळू उलगडायला लागलं. भीतीची जागा भारावलेपणानं घेतली. झपाटून रियाझ सुरू झाला. स्वरांची वळणं, त्यांना जोडून येणारे गोड स्वरकण, रसिलेपण, भारदस्तपणा, मींडेचं इंद्रधनुष्य आणि खटक्यांची अचूक पेरणी! त्यामागचा कार्यकारणभाव, त्यात ओथंबलेली भावना साद घालू लागली. सरगम आणि तानेचे अद्भुत आकृतिबंध सतत मनात फेर धरू लागले. ताईच्या गाण्याचं आणि विचाराचं वेगळेपण जाणण्याची क्षमता निर्माण होऊ लागली आणि संगीताचा एक वेगळा प्रदेश माझ्यासमोर उलगडू लागला.

प्रभाताईंनी सुरुवातीला अनेक दिवस यमनच शिकवला. त्यांच्या सुरातून यमनसारखा रागही असा उभा राहत असे की, आपण सुरुवातीला शिकलेला आपल्याला सोपा वाटलेला यमन तोच हा राग आहे का असा संभ्रम पडायचा! अत्यंत सुरीला गुंजणारा गंधार आणि टोकदार तीव्र मध्यम अशी स्वरांची विशिष्ट स्थानं, कल्पक आणि प्रशांत आलापीतून रागरूपाला घातलेली साद, गंधारावरून रिषभाच्या मींडेनं नादब्रह्मात विलीन होणारा षड्ज, विनासायास येणारे पेंचदार आणि दमसासयुक्त तानांचे गतिमान आकृतिबंध, लयीला लपेटून येणारी सरगम, सारंच वेगळं!

प्रभातासारखे विस्तृत, ठेहरावयुक्त आणि सुंदर आलाप फार थोड्या कलाकारांनी केले असतील. त्यांची तानांची रचना अत्यंत सौष्ठवपूर्ण, वक्र, वेगवान आणि चांगलीच गुंतागुंतीची असे. तरीही त्यातलं माधुर्य कुठेही कमी होत नसे हे विशेष! हे असं संतुलन फारच थोड्या कलाकारांना जमलेलं आहे. त्यांच्या गाण्यात विविध वळणवाटांनी जे स्वरकण आणि स्वरबंध वापरले जात त्यांचं नोटेशन करणं ही कठीणच! परीक्षा पाहणारं. त्यांची योजना चुकली की, सगळंच फिस्कटणारं!

त्यामुळे हे गाणं ऐकायला कितीही गोड, सहजसुंदर वाटत असलं तरी ते अनुसरायला अतिशय कठीण, स्पष्ट, नादमय शब्दोचार, तालाच्या मात्रांवर आघात न करता भरून राहिलेली सूक्ष्म डौलदार लय, रागातल्या वेगळ्या जागा शोधून आकर्षक नवी स्वरवाक्य बनवणं आणि वेधकपणे समेवर येणं या सर्व गोष्टीचा एखाद्या संमोहन अस्त्रासारखा माझ्यावर प्रभाव पडला. संगीताचं भव्य आणि उत्कट दर्शन होत राहिलं आणि माझी झोळी शिगोशीग भरत राहिली.

तालीम झाली की, कित्येकदा त्या रात्री मला झोप यायची नाही. बंदिशी, लयीचे झोक, नवनव्या कल्पक जागांची नक्षी, सगळं एकापाठोपाठ एक डोक्यात फिरत राहायचं. त्या गायकीतल्या तत्त्वांचा तो साक्षात्कारच होता. शिकलेले राग आणि बंदिशी नंतर केव्हाही गाताना ताई समोर बसून शिकवत आहेत असा भास व्हायचा आणि एका अनामिक भावनेनं अजाणताच कधी डोळे भरून यायचे.

मला संगीतात मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली, तेव्हा त्यांनी आनंदानं पार्टी मागितली होती. माझ्या लग्नाला आशीर्वाद द्यायला त्या आवर्जून सोलापूरला आल्या होत्या आणि मला करोना झाला, तेव्हा तब्येतीची विचारपूस करायला त्यांचा रोज हॉस्पिटलमध्ये फोन यायचा. अशा अनेक आठवणी आहेत. त्यांचं असं प्रेम मिळणं आणि त्या ऋणांत राहणं, हेच शिष्य म्हणून परमभाग्याचं आहे.

अभिजात प्रतिभेचा अष्टपैलू हिरा ज्या काळात शास्त्रोक्त संगीतातले दिग्गज आणि श्रोते केवळ परंपरागत संगीत प्रस्तुतीलाच अस्सल मानत असत, त्या काळात प्रभाताईंनी केवळ स्वरचित बंदिशी गायल्या. वेगळा कलाविचार धुंडाळला. त्यातल्या वेगळेपणामुळे आणि उच्च गुणवत्तेमुळे जाणकारांना त्याला मान्यता द्यावी लागली.

रसिकांना तर या नव्या रचनांनी केव्हाच आपलं दिवाणं केलं होतं. त्यांच्या पहिल्या स्वरचित बंदिशी असलेली मारुबिहाग, कलावती रागाची १९७१ सालात आलेली रेकॉर्ड आजही घराघरात वाजत असते. शास्त्रोक्त संगीताची कदाचित ही सर्वाधिक विक्री झालेली रेकॉर्ड असावी. भारतीय शास्त्रोक्त संगीतात केवळ स्वरचित संगीत गाऊन असं उच्च स्थान प्राप्त करणं ही ऐतिहासिक आणि कधीही न घडलेली घटना आहे.

ख्याल ठुमरी, दादरा, धृपद, धमार, टप्पा, टपख्याल, ठुमख्याल, तराणा, चतुरंग, त्रिवट, गीत, गझल, भक्तिगीत अशा अनेक गानप्रकारांतल्या ५००हून अधिक नव्या बंदिशी त्यांनी रचल्या. त्या पुस्तकरूपात प्रकशित ही केल्या. ‘जागु मैं सारी रैना मारुबिहाग’, तन मन धन- कलावती, माता भवानी दुर्गा, नंद नंदन- किरवाणी अशा त्यांच्या अनेक बंदिशी तर सामान्य श्रोत्यांनाही तोंडपाठ असतात.

प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. आलाप, तान, बोल यांच्यापेक्षा वेगळा सांगीतिक आशय व्यक्त करणारी त्यांची सरगम म्हणजे केवळ कसरत नाही, त्यात लालित्याचा परमसुंदर आविष्कार असे. सरगमचा शास्त्रीय पक्षही सर्वप्रथम प्रभाताईंनीच संगीतजगतासमोर ठेवला. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली.

प्रभाताईंना गाण्याचा कोणताही प्रकार वर्ज्य नव्हता. ललितरचनांमधला त्यांचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. प्रभाताईंची ठुमरी म्हणजे नुसतंच लाजणंमुरडणं नसे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण यामुळे श्रोते कायमच मंत्रमुग्ध झाले.

प्रभाताईंनी कोणत्याही नव्या-जुन्या ठुमऱ्या गाव्यात! ‘कौन गली गयो शाम’, ‘बालमा छेडो मत जा’, ‘जा मैं तोसे नाहीं बोलू’, ‘रतीया किधर गवाई’, यासारख्या ठुमऱ्यांमधल्या खास जागा, गुंफलेल्या अलौकिक स्वरसंगती, पुकार आणि हृदयस्पर्शीपणा आज एवढ्या वर्षांनंतरही रसिकांना विसरता येत नाही.

मला आठवतं, एकदा प्रभाताईंचा पंढरपूरला कार्यक्रम होता, तेव्हा मला त्यांच्या सोबत जाता आलं. कार्यक्रमानंतर आयोजकांनी ताईंच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा केली. एक पागोटं बांधलेले वयस्क शेतकरी गृहस्थ दर्शनासाठी तिथे आले होते. त्यांनी प्रभाताईंना अक्षरशः साष्टांग दंडवत घातलं; म्हणाले ‘कौन गली गयो श्याम’मध्ये तुम्ही पांडुरंगाला काय आतून हाक मारली आहे, आज तुम्ही आलेलं त्यालाही आवडलं असणार. त्या सामान्य शेतकऱ्याचे निरागस आणि मनापासून आलेले ते शब्द ऐकून आम्ही सगळेच क्षणभर स्तिमित झालो. असा जनसामान्यांपर्यंत पोहोचणारा त्यांच्या गाण्याचा अमिट प्रभाव होता.

प्रभाताईंनी उपशास्त्रीय संगीतातही सातत्यानं अनेक नव्या रचना केल्या, तसंच अनेक पारंपरिक रचनांना त्यांनी आपला असा खास प्रभारंग दिला. ‘घिर के आई बदरिया’, ‘कागा रे जारे जा’, ‘रंग डार गयो मोपे’ अशी अगणित कजरीगीतं, दादरे आणि होरीगीतं त्या ढंगदारपणे गात. ‘कैसा बालमा दगा दे गया’ (मिश्र कनकांगी), ‘सावरो नंदलाला’ (मिश्र शिवरंजनी), ‘बसंती चुनरिया’ (नायकी कानडा), ‘अजहूं न आयो मेरो सावरिया’ (मांड भैरव) या वैशिष्ट्यपूर्ण ललित रचनाही प्रभाताईंच्याच. जुने रसिक सांगतात उमेदीच्या काळात ‘जा कुणी शोधूनी आणा’, ‘दारी उभी अशी मी’, ‘हम जून मे जिधर निकलते हैं’, ‘बडी आरजू हैं’, ‘कळीचे फूल होताना’ अशा गझला गाताना त्या असा माहोल जमवत की तोबा!

प्रभाताईंनी काही रागांच्या स्वरूपात बदल केला, काही सांगीतिक घाट वेगळ्या प्रकारे हाताळले. सरगमसारख्या संगीतसामग्रीचं वेगळेपण अधोरेखित केलं, रागसमय, रागरस यांना शास्त्राच्या कसोटीवर तपासून पाहिलं. अनेकदा विद्वानांनाही विचार करायला उद्युक्त केलं! या सगळ्या प्रयोगशीलतेमागे विचारांची बैठक भक्कमपणे उभी असलेली दिसे. दूरदृष्टी ठेवून परंपरेला बदलण्याचं त्याचं धाडस आणि क्षमता दिसते. लोकप्रिय असणाऱ्या एखाद्या आघाडीच्या कलाकारानं संगीतावर लेखन करणं, संशोधन करणं, पुस्तकं प्रकाशित करणं किंवा शिक्षणक्षेत्रात काम करणं हे आपल्या भारतात फार क्वचित घडलेलं आहे. प्रभाताईंनी या सगळ्या क्षेत्रातही मानदंड प्रस्थापित केले.

प्रभाताईंनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने फार मोठ्या जनसमूहास सुमारे १९४०-५०च्या दशकापासून २०२३पर्यंत मागची ७०-७५ वर्ष आनंद दिला. १९५०च्या दशकात क्वचितच कुणी कलाकार परदेशात भारतीय शास्त्रीय संगीत सादर करत होता, तेव्हा प्रभाताईंनी सतत परदेशदौरे करून कार्यक्रम, व्याख्यानं, शिक्षण या सर्व मार्गांनी भारतीय कंठसंगीत परदेशातही लोकप्रिय होण्यास हातभार लावला. परदेशात तिकीटविक्री होऊन सभागृहांमध्ये व्यावसायिक कार्यक्रम केलेल्या प्रभा अत्रे याच पहिल्या भारतीय कंठसंगीताच्या कलाकार होत्या. दिवाळीपहाटचे आज अनेक कार्यक्रम होत असतात, पण असा कार्यक्रम ताईंनीच १९७० साली पहिल्यांदा केला होता. भारतीय शास्त्रीय संगीतातल्या शीर्षस्थ कलाकार म्हणून प्रभाताईंची कारकीर्द जगभरात अत्यंत यशस्वी ठरली. त्यांचा काळ त्यांनी अक्षरशः गाजवला.

व्रतस्थ स्वरयोगिनी प्रभाताईंनी वैयक्तिक आयुष्यात प्रचंड चढउतार अनुभवले. आघात पचवले. अडचणींना समर्थपणे तोंड दिलं. एकटीनं वाटचाल केली. पण, त्या कशाचीही कुठेच वाच्यता केली नाही. सतत असायचा तो एक विलक्षण प्रसन्नपणा आणि चेहऱ्यावरचं समाधान. त्यांच्या वडिलांना फसवून एका भाडेकरूनं हडप केलेली पुण्यातली जागा अनेक वर्षांच्या कोर्ट केसनंतर त्यांच्या ताब्यात आली होती. तिथे त्यांनी स्वखर्चानं भव्य ‘स्वरमयी गुरुकुल’ बांधलं. देशपरदेशातले अनेक विद्यार्थी तिथे राहून शिकले. नव्या-जुन्या कलाकारांचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जात. आई-वडिलांचं आणि गुरूंचं ऋण त्यांनी खऱ्या अर्थानं फेडलं. नव्या होता. त्यासाठी त्यांनी काही नवीन बंदिशीसुद्धा रचल्या होत्या, पिढीतल्या अनेक शिष्यांना सक्षम बनवलं.

अनेक कलाकारांच्या मागे त्यांच्या चाहत्यांचे, आयोजकांचे आणि प्रशंसकांचे कंपू असतात. ज्यामुळे त्या कलाकारांना आणखी मोठेपणा मिळतो. प्रसिद्धी मिळते. प्रभाताई या सगळ्यापासून कायमच दूर राहिल्या. त्यांच्या स्वभावातच एक अलिप्तपणा होता. त्यांनी फक्त निखळ साधना केली, अत्यंत सचोटीनं आणि प्रामाणिकपणे. पद्मविभूषणसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार स्वतःहून त्यांच्याकडे आले. त्या नेहमी परिधान करत तशा शुभ्र वस्त्रासारखं त्यांचं निर्लेप व्यक्तिमत्त्व होतं. त्याला वैराग्याची भगवी किनार होती. स्वरयोगिनी हे विशेषण त्यांना सर्वार्थानं साजेसं होतं.

प्रभाताईंसारख्या सर्वार्थानं श्रेष्ठ गुरूकडे शिकायला मिळणं हा माझ्या आयुष्यातला ‘गुरुयोग' अलौकिकच म्हणायला हवा! त्यांच्या मार्गदर्शनाने योग्य दिशेने माझी वाटचाल सतत होत राहिली. प्रत्यक्ष गाण्याबरोबरच त्यांचा संशोधन, चिंतन, योग्य प्रकारे शिकवणं आणि नव्या संगीतरचना करण्याचा गुणही मी घेण्याचा प्रयत्न केला. गायक म्हणून काम करत असतानाच माझ्यातल्या रचनाशीलतेला आणि लेखनक्षमतेलाही न कळत कोंब फुटले. बघता बघता अडीचशे-तीनशे बंदिशी करून झाल्या, सुगम संगीताच्या क्षेत्रातही अनेक गाणी प्रसिद्ध झाली. काही पुस्तकंही प्रकाशित झाली. डॉक्टरेट झाली. कधी कधी मागे वळून पाहताना माझा मीच विचार करतो की हे कसं शक्य झालं आपल्याला? तेव्हा तुकाराममहाराजांच्या ओळी सहजच माझ्यासमोर येतात-

‘आपणा सारखे करिती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे।

सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी॥’

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

आपल्या व्रतस्थ आणि अनुशासनपूर्वक जीवनपद्धतीमुळे प्रभाताई शेवटपर्यंत गात्या होत्या, कार्यरत होत्या. वयाच्या अगदी ८०-८५व्या वर्षांपर्यंत त्या स्वतः कार चालवत असत. त्यांना कुठलाही आजार कधी झाला नाही, साधा चष्मासुद्धा त्यांना कधी वापरावा लागला नाही. १४ जानेवारी २०२४ रोजी त्यांचा मुंबईतल्या हृदयेश समारोहात कार्यक्रम होणार होता. त्यासाठी त्यांनी काही नवीन बंदिशीसुद्धा रचल्या होत्या, १० तारखेला आम्हा शिष्यांना शिकवल्या होत्या.

परंतु त्यापूर्वीच अनपेक्षितपणे १३ जानेवारी २०२४ रोजी पुण्यातल्या त्यांच्या स्वरमयी गुरुकुलमधल्या निवासस्थानी वयाच्या ९२व्या वर्षी अत्यंत शांतपणे, कुठल्याही प्रकारच्या त्रासाशिवाय प्रभाताईंनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अंत्यदर्शनाला जनसागर उसळला होता. देशभरातले शीर्षस्थ कलाकार, विविध क्षेत्रांतील मान्यवर, संगीतरसिक, विद्यार्थी दूरदुरून आवर्जून आले होते. त्यांच्या महायात्रेत स्पीकर वरून रस्तोरस्ती त्यांच्या आवाजातील त्यांचे ख्याल, ठुमरी, आणि इतर अभिजात गानप्रकार गुंजत होते. लोक त्यांच्या घराच्या खिडक्यांमधून, गच्चीवरून पुष्पवृष्टी करत होते. अश्रूंनी श्रद्धांजली वाहत होते.

भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून पूर्ण शासकीय सन्मानासह प्रभाताईंना शेवटची मानवंदना दिली गेली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रभाताईंच्या जाण्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. श्रद्धांजली अर्पण केली. ज्या सौंदर्यपूर्ण रितीनं ताई त्यांची गाण्याची मैफल पूर्ण करायच्या तशाच शानदारपणे त्यांनी त्यांच्या जीवनाची मैफलही पूर्ण केली. एक आदर्श सृजनशील कलाकार आणि आदर्श व्यक्ती अशीच प्रभाताईंची ओळख जगात कायम राहील.

वंदे गानप्रभा स्वरयोगिनी,

नादरूप अनूप बखानी ।

स्वर लय ताल सरस कहाई,

रागरूप बहुरूप दिखायी,

कलाविद्या सकल गुण ग्यानी,

सृजन कहन सब ही जग मानी।

(‘शब्द रुची’ मासिकाच्या फेब्रुवारी २०२४च्या अंकातून साभार)

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. अतिंद्र सरवडीकर सुप्रसिद्ध गायक असून स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे वरिष्ठ शिष्य आहेत.

atindra2010@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......