अजूनकाही
आम्हाला कायमच असं वाटत आलं, किंबहुना ते आमचं ठाम मतच आहे असं समजा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, म्हणजेच आरएसएस तथा संघ परिवार म्हणून जो काही आहे, त्याचा आवाका मर्यादित पण आव मात्र खंडीभर. मुळात नावात ‘राष्ट्रीय’ असलेल्या या संघटनेला नेमकं कोणतं राष्ट्र अभिप्रेत आहे हे आता सर्वांना माहीत आहे. त्यांना राष्ट्र म्हणजे हिंदू राष्ट्र म्हणायचं असतं. हे हिंदू राष्ट्र त्यांना ब्राह्मणी वर्चस्वाच्या हिंदू धर्माचं राष्ट्र म्हणून अभिप्रेत आहे.
पण ५४, ५५, ५६ किंवा ५७ इंची छातीवर हात ठेवून तसं स्पष्ट म्हणायची धमक संघाच्या जन्मापासून आजतागायत त्यांच्यात नाही. गुळगुळीत, मुळमुळीत काही तरी बोलत राहायचं. हिंदू बहुसंख्य म्हणजे हे हिंदू राष्ट्रच आहे. सोयीनं ते हिंदू धर्माभिमानी असतात आणि सोयीनं हिंदू एक जीवनपद्धती असंही म्हणतात. असं म्हणताना मग इथले बिगर हिंदू म्हणजे शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, मुसलमान हे पण त्या अर्थानं हिंदूच. अत्यंत पाताळयंत्री, दामटून खोटं बोलणं आणि अंगाशी आलं की, दात फिस्कारत हसणं ही या परिवाराची वैशिष्ट्यं आहेत. इतर धर्मियांबद्दल विशेषत: मुसलमानांबद्दल अत्यंत विखारी, विषारी प्रचार-प्रसार, कुजबूज हे त्यांचं मुख्य कार्य. आणि सगळ्यात महत्त्वाचा विशेष म्हणजे सोयीनं माणसं वापरायची आणि गैरसोय झाली की फेकून द्यायची.
संघ परिवार काहीतरी भयंकर सेवाकार्य निरपेक्ष भावनेनं करत असतो असा एक प्रचार केला जातो. संघाचं सेवा कार्य म्हणजे काय? शाखा भरवणं (स्त्री-पुरुषांच्या वेगवेगळ्या), वनवासी कल्याण आश्रम, संस्कार भारती, अभाविप अशा संघटना\ संस्था चालवायच्या. तिथंही ढोंगबाजी असतेच. म्हणजे वरचा मुखवटा सेवाव्रती किंवा बलशाली राष्ट्र निर्माणाचा, पण आतला चेहरा ब्राह्मणी वर्चस्ववादी सनातन हिंदू धर्माचा.
स्वत:ला ‘आर्य’ म्हणून घेताना, ते खैबरखिंडातून आले नाहीत तर ते इथंच होते, हे सिद्ध करण्यासाठी जो मूळचा या भू प्रदेशावरचा या मातीतला माणूस आहे, त्याला जग आदिवासी, ट्रायबल म्हणून ओळखतं, त्याला यांनी ‘वनवासी’ बनवला! वनात राहणारा तो वनवासी! कारण त्याला जर ‘आदि’ म्हटलं तर आर्य इथलेच ही लबाडी रेटता येत नाही. वनवासी कल्याण आश्रमाचं काम काय? म्हणजे वरकरणी शाळा, दवाखाने इत्यादी सगळं असतंच, पण अंतर्गत हेतू या आदिवासींची जी आदिम संस्कृती आहे, ती मातीऐवजी गेरूनं सारवून त्यावर ब्राह्मणी हिंदुत्वाची रांगोळी काढायची. त्यांची आदिम कैरू, वाहरू वगैरे नावं बदलून केशव, दीपक करायची. त्यांच्या निसर्गदेवतेला झाकून तिथं राम, लक्ष्मण, सीता, हनुमान मग हळूहळू शिवलिंग वगैरे करत सरस्वती, गणपती सगळे आणायचे. हे असलं ‘भगवेकरण’ म्हणजे वनवासी कल्याण! यासाठीचा मोठा निधी परदेशस्थ ब्राह्मणांकडून येतो आणि इथल्या नवश्रीमंत गरीब ब्राह्मणांकडून, गुजराती व्यापाऱ्यांकडून.
गुजरात दंगलीत मुसलमानांच्या विरोधात याच आदिवासी व इतर मध्यम जातींना वापरण्यात आलं. संघ जातीवर बोलत नाही. जातीअंताच्या लढाईवर बोलत नाही, पण संघ आमच्यात किती आंतरजातीय विवाह झाले, आमचे ओबीसी, एससी, एसटी आमदार, नगरसेवक, खासदार, मंत्री किती हे उच्चरवानं सांगत असतो. पण म्हणून जात संपवण्याची समतेची भाषा न वापरता समरसतेची भाषा वापरतो.
म्हणजे जातीनिहाय विषमता ठेवून सगळ्यांनी समरस होऊन रहा! संघ जातीव्यवस्थेविरुद्ध कधीच बोलत नाही कारण जातीव्यवस्थेवर बोललं की, ब्राह्मणी वर्चस्वाबद्दल बोलावं लागेल, अस्पृश्यता, स्त्रीदास्य यावर बोलावं लागेल. ब्राह्मणी वर्चस्वाखालील हिंदू धर्माचा इतिहास, शिक्षण, रोटी-बेटी बंदी, मंदिर बंदी, सती, बालविवाह, विधवा केशवपन, त्या विधवांचे अघोरी गर्भपात असा सगळा काळा इतिहास आहे या ‘हिंदू’ परंपरेचा. आणि संघ परिवार याच परंपरेच्या अभिमानावर, विचारावर चालतो. गायीला ‘गोमाता’ म्हणणारे हे बाईला ‘दासी’ करतात. कनिष्ठ जातींना गुलाम तर क्षत्रिय, वैश्यांना आपल्या पुरोहितशाहीनं बांधून ठेवतात.
आता अनेकांना वाटेल तुम्ही तेच तेच, जुनं उगाळत बसता! कुठे आता लोक जातपात पाळतात, ब्राह्मण तरी कुठे ब्राह्मण्य सांभाळतात? ते तर मदिरापान, अभक्ष्यपानही करतात. बाई दासी कुठे? आता तर बेटी बचाव, बेटी पढाव अशी धोरणं आखली जाताहेत. वरकरणी हे खरंच आहे. कदाचित आकडेवारीही दाखवली जाईल. पण अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून जेवढ्या म्हणून सामाजिक समतेच्या लढाया झाल्या, तेव्हा संघ कुठे होता? कुठली मौलिक, ऐतिहासिक सामाजिक सुधारणा संघ परिवार अथवा त्यांच्या नेत्यांच्या नावावर जमा आहे? संघ गोखले, आगरकर, महर्षी कर्वे, र.धों. कर्वे यांच्या मागे उभा होता? तो फुले-शाहू-आंबेडकरांच्या मागे होता?
संघाने चवदार तळे, काळाराम मंदिर सत्याग्रहात भाग घेतला? संघाने सतीप्रथा, बालविवाह, विधवांचं केशवपन, गर्भपात बंद करवलं? स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली केली? संघात स्त्रिया नसतात. त्यासाठी ‘वेगळी’ समिती आहे. त्यातल्या स्त्रियांना आमचं आवाहन आहे- त्यांनी संघाच्या शीर्षस्थ नेत्यांना, सरसंघचालकांना विचारावं की, या अमानुष प्रथांविरोधात संघाने कधी पुढाकार घेतला? घेतला तर कधी? कुठे? आणि नसेल घेतला तर का नाही?
संघात किंवा भाजप, अभाविप, संस्कार भारतीमध्ये असणाऱ्या मध्यम जातीतील स्वयंसेवकांना, कनिष्ठ जातीतील स्वयंसेवकांनी आपल्या नेत्यांना विचारावं- समतेच्या लढ्यात आपण कधीच नव्हतो, मग आपण रसमरसतेचे ढोल का पिटतो?
अलीकडेच परिवाराशी संबंधित अभ्यासक, संशोधक, यांचं एक संमेलन सरसंघचालक मोहन भागवतांनी दिल्लीमध्ये घेतलं. तेव्हा उपस्थितांना त्यांनी विचारलं, ‘नवीन कुणी काही लिहिलं? संशोधन केलं? त्यांना हात वर करा.’ सभागृहातले सगळे ‘शोले’तले संजीवकुमार झालेले! एक हात काय, बोट वर नाही. भागवत निराश झाले. त्यांनी मग एक बौद्धिक घेतलं. आपल्या उपक्रमांना वैशिष्ट्यपूर्ण नावं देण्यात संघ परिवार पटाईत. उदा. बौद्धिक. पण कुठल्या स्वयंसेवकाच्या चेहऱ्यावर ‘बुद्धिमत्ता’ दिसते?
संघ आणि परिवाराची दिवाळखोरी एवढी की, यांच्याकडे ना संशोधक, ना शास्त्रज्ञ, ना कलावंत, ना खेळाडू. शाखेवर लाठी फिरवली, सूर्य नमस्कार घालून बलोपासना केली, पण कुणी स्वयंसेवक ठाणे महापौर मॅरेथॉनमध्ये तरी पहिला आलाय? दंड, बैठका काढून कुणी तरी राष्ट्रीय खेळाडू झालाय? मग यांच्या हाती गजेंद्र चौहान, पहलाज निहलानी, अशोक पंडित लागणार! दीनानाथ बात्रांसारखे गंगा उलटी वाहवू पाहणारे शिक्षणतज्ज्ञ सापडणार!! बोकीलांसारखे अर्थतज्ज्ञ जन्माला येणार!!! २०१४पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने इतर पक्षातून विजयी होणारे उमेदवार आयात केले. यात राजकीय वजन असलेले जसे घेतले, तसे नामचीन गुंडही घेतले. इतक्या वर्षांचा इतिहास, शाखा वाढल्या, पक्ष सदस्य संख्या जगात नंबर एक, मग उमेदवार मनसे, सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी, बसपचे का लागतात?
अशा किंवा या आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं भागवत देणार नाहीत. ना मोदी, ना फडणवीस. कारण छुपा अजेंडा हाच त्यांचा मुख्य अजेंडा असतो. मुद्दे भरकटवणं, जातीय-धार्मिक ध्रुवीकरण करणं हेच यांचं खरं काम. बाकी ‘मुँह में राम, बगल में छुरी’ हेच धोरण.
आज हे सर्व लिहिण्याचं कारण काय?
राजकीय यशानं संघ परिवाराला जो उन्माद चढलाय. त्यावरून गोहत्या, राममंदिर आदि विषयावर शिरच्छेदापर्यंत जिभा सैल सुटल्या आहेत, तर कुणी तरुण विजय ‘दक्षिणेत आम्ही काळ्यांसोबत राहतोच की!’ म्हणून बेलगाम वर्णवर्चस्ववादी बोलतो!
कुठून आलीय ही हिंमत? भारतीय लोकशाही, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काडीचा सहभाग नसलेल्या संघ परिवाराने आपला हा हिंदू राष्ट्रवादाचा भगवा उन्माद थांबवावा. अन्यथा न्याय, समता, बंधुत्व आणि सामाजिक सलोखा मानणारा या देशातला सव्वाशे कोटी सच्चा भारतीय या उन्मादाला अशी चपराक देईल की, ज्याचा प्रतिध्वनी खैबरखिंडीतही ऐकू येईल!
लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment