रामलल्लाची पुनर्स्थापना झाली, मशीद होतेय… आता एक पाऊल पुढे जात अयोध्येत देशात अस्तित्वात असलेल्या इतर धर्मांच्या उपासना पद्धतीचीही प्रतीकं उभारावीत…
पडघम - देशकारण
विनय हर्डीकर
  • डावीकडून पहिली ओळ - अयोध्येतील राममंदिर, बौद्ध स्तुपाचं एक प्रातिनिधिक छायाचित्र, अयोध्येत होऊ घातलेल्या मशिदीचं संकल्पित चित्र | डावीकडून पहिली ओळ - गुरुद्वारा, जैन मंदिर, चर्च आणि अग्यारी यांची प्रातिनिधिक चित्रं
  • Fri , 09 February 2024
  • पडघम देशकारण अयोध्या Ayodhya राममंदिर RamMandir राम Ram

अखेर अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले. अत्यंत भव्य आणि शांततापूर्वक वातावरणात हा सोहळा पार पाडल्याबद्दल भारतीय जनता आणि नमो सरकारचे मी अभिनंदन करतो. रामलल्लावरून १९८०च्या दशकात म्हणजे तब्बल ४० वर्षे सुरू असलेल्या कलहाला अखेर पूर्णविराम मिळाला. अयोध्येत या वेळी झालेला सोहळा जल्लोषपूर्ण आणि दिमाखदार होता.

एकट्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याऐवजी नमोंनी महाकाव्यात वर्णन केल्याप्रमाणे रावणावर विजय मिळवून हनुमान, सीता, लक्ष्मण यांच्यासह परतलेल्या रामाची प्राणप्रतिष्ठा केली असती, तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. मग रामाच्या स्वागतासाठी मार्गावर फुलं उधळण्याची गरजच पडली नसती!

पण आपण अशा समाजात राहतो, जिथे आपले नेते हे ‘अवतारी पुरुष’ आहेत आणि विधात्याने एखाद्या निश्चित उद्दिष्टपूर्तीसाठीच त्यांना पृथ्वीवर पाठवले आहे, असा विश्वास बाळगला जातो. धर्म-अधर्माच्या लढाईतली त्यांच्या सहभागाची भूमिकाही ‘विधिलिखित’च असते!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

प्रजासत्ताक दिनाच्या चार दिवस आधी रामलल्ला अयोध्येत विराजमान झाल्याचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला. जानेवारीच्या त्या आठवड्याच्या सुरुवातीला (२२ जानेवारी) देशाने धार्मिक जल्लोष केला अन् शेवट धर्मनिरपेक्ष उत्सवाने झाला. सर्वसामान्यांनी हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरे केले. या दोन्ही दिवशी सरकारी सुट्टी होती म्हणून नव्हे, तर भारतीय मनातील द्वैत जोपासण्याची मुभा इथल्या ‘राज्यघटने’नेच त्यांना बहाल केली आहे म्हणून.

आपण एकाच वेळी जुन्याचे आणि नव्याचेही स्वागत करतो, एकाच वेळी प्राचीन आणि आधुनिक काळात रमतो, एकाच वेळी धर्म आणि धर्मनिरपेक्षता जगतो. आपण लोकशाही अंगीकारलेली असूनही ‘व्यक्तीपूजक’ आहोत. एकाच वेळी दोन्ही डगरीवर पाय ठेवणे, हा आपला स्थायीभावच आहे!

हा सोहळा दणक्यात, पण तरीही शांततेत पार पडला. यात कुठलं उल्लंघन झालं असलंच, तर ते आवाजाच्या ‘डेसिबल’ मर्यादेचंच झालं असेल! रामलल्ला सर्वांचे असल्याचे मोहन भागवत वा नमो वारंवार सांगत असले (काही मुस्लीम अयोध्येला हजर होते), तरीही हा हिंदूंचा उत्सव होता. या उत्सवादरम्यान देशभरातील मुस्लीम शांत राहिले, त्यांच्या या संयमाला  दाद द्यायला हवी!

अयोध्येच्या या भव्य महोत्सवाच्या राजकीय आणि सांस्कृतिक परिणामांचा विचार करणं रंजक ठरू शकतं. कारण आता लोकांनी नमोंना ‘अवतारी पुरुषा’च्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

पहिल्यांदा राजकीय परिणामाचा विचार करू. रामलल्ला विराजमान झाल्यानंतर आता सगळे राजकीय ग्रह सत्ताधाऱ्यांना वश झाले आहेत, हे सांगायला कुण्या ज्योतिषाची अथवा प्रशांत किशोरची गरज राहिलेली नाही.

रामलल्ला थाटामाटात स्वगृही आले आहेत अन् बहुतांश हिंदू समूहाला त्यांचं भविष्य नमोंच्या हाती सुरक्षित असल्याची खात्री पटली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया आघाडी’चं विघटन सुरू झालं आहे. रामनवमीनंतर लगेच निवडणूक पार पडेल आणि मतदार रामलल्लाचं नाव घेत मतपेट्यापर्यंत जातील. उत्तर भारत आणि विशेषतः हिंदी भाषिक राज्यांच्या पट्ट्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल ही आता केवळ ‘औपचारिकता’ उरली आहे.

ओडिशा आणि पश्चिम बंगाल ही बिगरहिंदी भाषिक राज्यंही रामलल्ला महिमेपासून पूर्णतः अलिप्त राहू शकणार नाहीत. ‘इंडिया आघाडी’तील ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांनी पश्चिम बंगाल आणि दिल्लीत ‘एकला चलो रे’चा निर्णय घेतला आहे; तर बिहारमधील ‘इंडिया आघाडी’चे धारकरी नितीश कुमार यांनी पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी जवळ करत नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रीय पातळीवरचं युद्ध जिंकू शकणार नसल्यानं आपापल्या राज्यातील वर्चस्व टिकवण्याचा व्यवहार्य निर्णय ममता बॅनर्जी- अरविंद केजरीवाल- नितीश कुमार यांनी घेतला, यात आश्चर्य कसलं? गुजरात हे नमोंचं गृहराज्य आहे आणि महाराष्ट्रात भाजप पुरेशी सक्षम आहे. ‘इंडिया आघाडी’ला रोखण्यासाठी भाजपने सोबत घेतलेले एकनाथ शिंदे व अजित पवार गट जोरदार प्रयत्न करतीलच.

केरळ आणि तामिळनाडूमध्ये रामलल्लाचा महिमा चालणार नाही, हे खरं आहे. पण या दोन्ही राज्यांतून ६० लोकसभा खासदार निवडून जातात. केरळमध्ये कधीच एकतर्फी मतदान होत नाही आणि तामिळनाडूत या नाहीतर त्या डीएमकेला मतदान होतं, तिथं कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा करिष्मा चालत नाही.

आंध्र प्रदेशात काँग्रेस आणि टीआरएस राज्यात परस्परांचे विरोधक आहेत. (हे दोन्ही पक्ष ‘इंडिया आघाडी’तील सहकारी आहेत) खर्गे यांच्या कर्नाटकात बिगरभाजप आघाडीला बाहेरून ‘ऑक्सिजन’ची गरज भासते.

एवढंच नव्हे, अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला कमी लेखण्याचा वा त्यावर संपूर्ण बहिष्कार घालण्याचा ‘इंडिया आघाडी’च्या नेत्यांचा निर्णय हिंदू मतदानाबाबत त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. अर्थात ही चूक ते नजीकच्या काळात (निवडणूक जाहीर होण्यापूर्वी) अयोध्येला जाऊन लोटांगण घालून दुरुस्त करू शकतात.

रामलल्ला विराजमान झाल्यानंतरचे सांस्कृतिक परिणाम नक्कीच गुंतागुंतीचे असतील. रामलल्लाची पुनर्स्थापना ही व्यापक सौहार्दाचा शेवट नसून, सुरुवात ठरावी, याची काळजी घ्यायला हवी.

पर्यायी जागेवर अयोध्येत मशीदही उभारली जाणार आहे (ती जितक्या लवकर उभारली जाईल, तेवढं चांगलं!). तिचं बांधकाम रमजान महिन्यानंतर सुरू होणार आहे, असं सांगितलं जात आहे. ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन’ (IICF) या संस्थेची देखरेख करणार आहे, तिला ‘बाबरी’ संबोधलं जाणार नाही, हे विशेष.

हिंदू आणि मुस्लिमांच्या धर्मनिरपेक्षतेला गती देण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की, देशातील हिंदू, मोहन भागवत आणि नमो यात एक सकारात्मक भूमिका बजावू शकतील. मशिदीच्या बांधकामाची जबाबदारी मुस्लीम समुदाय आणि आयआयसीएफपुरती सीमित न ठेवता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नमोंनी त्यात सहभाग घ्यावा, किमानपक्षी तिच्या उभारणीत रस असल्याचा संदेश निरपेक्ष भावनेनं जाऊ द्यावा. 

भाजप सध्या केंद्रात आणि उत्तर प्रदेशात सत्तेवर आहे. त्यांनी असा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय स्तरावर पुढाकार घ्यावा. आयआयसीएफ आणि इतर मुस्लिमांच्या समन्वयानं हे काम तडीस न्यावं. नवीन मशिदीच्या बांधकामाला न्यायालयीन शब्दच्छल वा प्रशासकीय लालफितीचा अडसर निर्माण होऊ नये, याची तजबीज ते नक्कीच करू शकतात.

भारतभरातील वास्तुविशारद, डिझायनर, शिल्पकार आणि बांधकाम तज्ज्ञांना यात सहभागी करून घ्यावं.

मशिदीचं बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण होईल, ती भव्य असेल याची काळजी घ्यावी. रामलल्लाप्रमाणेच ती आपल्या समाजासाठी धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक होईल, याची काळजी घ्यावी.

याही पुढे एक पाऊल टाकत अयोध्येत आता देशात अस्तित्वात असलेल्या इतर धर्मांच्या उपासना पद्धतीचीही प्रतीकं उभारावीत. वैदिक, हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी आणि बौद्ध या सहा धर्माचे अनुयायी आपल्या देशात वास्तव्य करतात.  शीख आणि जैन या दोन धर्मांना काही जण ‘पंथ’ मानतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

याशिवाय भारतात आपली उपासनापद्धती घेऊन जगणारे पारशीही नांदतात. परस्परांच्या श्रद्धांच्या आड न येता, आपापली उपासना जोपासण्याचं पथ्य सर्वांनी भारतात पाळलं आहे. जेव्हा जेव्हा आपल्या व्यक्तिगत वा सामूहिक श्रद्धांमध्ये इतरांच्या हस्तक्षेपाची धास्ती बळावली, तेव्हा तेव्हा हे सौहार्द धोक्यात आलं आहे… अन्यथा इतर वेळी सगळे गुण्या-गोविंदानं नांदत आलेले आहेत.

या सगळ्यांसाठीच अयोध्या सर्व उपासनापद्धतीचं केंद्र बनवता येईल. निव्वळ मंदिर, मशिदीवर न थांबता एक वैदिक मठ, एक चर्च, एक स्तूप, एक सिनेगॉग (यहुद्यांचं प्रार्थनास्थळ), एक अग्यारी, गुरुद्वारा, एक जैन तीर्थस्थळ निर्माण करता येईल. या सर्व इमारती भव्य, निर्मळ आणि सुंदर होऊ द्या. सर्व उपासक आपापल्या केंद्रात जातील आणि नंतर निरपेक्ष भावनेनं इतरांच्या श्रद्धास्थानांनाही भेट देतील. त्यातून खऱ्या अर्थानं जगभरात एक संदेश जाईल की, भारत ‘विश्वगुरू’ होण्यास पात्र आहे.

रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेपासून या दिशेनं सुरू होणाऱ्या वाटचालीसाठी हे अभिमानास्पद केंद्र असेल.

(ताजा कलम - मी हे लिहीत असतानाच वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी देण्याचा निर्णय दिला आहे. एक जुनी, अडचणीची आठवण. फैजाबादच्या एका न्यायाधीशाने ऐंशीच्या दशकात असाच निर्णय दिला होता. इतिहासाची पुनरावृत्ती होणारच असेल, तर त्यातून ती शोकांतिका वा प्रहसन या स्वरूपात न होवो.

..................................................................................................................................................................

लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत. त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.

vinay.freedom@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......