परिवर्तनवादी लेखिका व झुंजार कार्यकर्त्या अॅड. निशा शिवूरकर यांचे ‘महात्मा गांधी आणि स्त्री-पुरुष समता’ हे नवे पुस्तक नुकतेच रोहन प्रकाशन, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकीहाळ यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
म. गांधी हे १९व्या शतकातला सर्वांत निर्भय पुरुष होते. त्यांच्या निरनिराळ्या चळवळींतून त्यांनी लोकांना भयापासून मुक्त केले. त्याचा परिणाम म्हणून सर्व स्तरांतले लोक स्वातंत्र्याच्या लढ्यात जोडले गेले आणि निर्भयपणे लढले. अशा या माणसाची हत्या एका भ्याड संघटनेच्या विचारसरणीने केली. केवळ हत्याच केली असे नाही, तर आजतागायत त्यांना बदनाम करण्याची विकृती चालू ठेवली आहे. या देशाच्या जडणघडणीतला त्यांचा वाटा नाकारला जात आहे. गांधींचे सर्व तत्त्वज्ञानच निरुपयोगी ठरवण्याचे षडयंत्र सध्या चालू आहे. स्त्री-पुरुष संबंधांतल्या त्यांच्या भूमिकेची, प्रयोगाची प्रच्छन्न टिंगल-टवाळी आजही सुरू आहे.
एका बाजूला गांधी विरोधकांच्या या कारवाया चालू आहेत, तर दुसऱ्या बाजूला समतेच्या चर्चाविश्वात गांधीविचारांचा समावेश होताना दिसत नाही. गांधींचा आणि महाराष्ट्राचा विशेष ऋणानुबंध आहे. गांधी विचारांच्या प्रभावी भाष्यकारांची परंपरा इथेच निर्माण झाली. गांधींचे वास्तव्य सेवाग्राममध्ये (वर्धा) दीर्घकाळ होते. अ.भा. काँग्रेस कमिटीच्या बऱ्याच बैठकाही त्यांच्या इथे वास्तव्य असल्याने वर्ध्यात झाल्या. ‘नयी तालीम’चा मोठा प्रयोग वर्ध्यात राबवला जात आहे. असे असताना त्यांच्या समताविषयक विचारांचा समावेश इथल्या चर्चा विश्वात अलीकडेपर्यंत नव्हता.
डॉ. यशवंत सुमंत, डॉ. सु.श्री. पांढरीपांडे, वसंतराव पळशीकर व गांधी विचारांचे विविध भाष्यकार यांनी हे चर्चाविश्व सतत चालू ठेवूनही महाराष्ट्राचे समतेचे चर्चाविश्व म्हटले की, फुले-शाहू-आंबेडकर ही त्रयीच फक्त सांगितली जाते. जन्माने गांधी महाराष्ट्रीयन नाहीत हे खरे, पण विचारांना प्रांताच्या सीमा आपण कशा घालू शकतो? पण हे घडले. वास्तविक आंबेडकरांचा संघर्ष, ‘पुणे करार’ हे सारे इथे घडले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
फुले-शाहूंच्या अनेक विचारांत, भूमिकांत व गांधी विचारांत पुष्कळ साम्यस्थळे आहेत. पण अलीकडे आपापल्या विचारप्रवाहांच्या अस्मितांचा व त्या जपण्याचा कालखंड सुरू आहे. आम्हाला फुले-आंबेडकर-मार्क्स चालतो, पण त्या रांगेत गांधी चालत नाहीत.
वास्तविक या महापुरुषांच्या कार्याचा ऐतिहासिक दृष्टीने विचार करून आजच्या काळाला उचित असा विचार त्यातून शोधला पाहिजे. या ऐवजी ऐतिहासिक व समग्रदृष्टीचा त्याग करून अस्मितांचे जतन सुरू आहे. अर्थातच यात गांधींच्या अनुयायांचाही दोष आहेच. या अनुयायी मंडळींनी गांधीविचार कर्मकांडात व संघटनात्मक शुचितेत बंदिस्त केला. त्यांनी इतर विचारांच्या प्रवाहांशी ना संवाद केला, ना इतरांनी केला. परिणामी सर्वच छावण्या स्वतंत्र राहिल्या व समतेचा लढा कमकुवत झाला. या पार्श्वभूमीवर परिवर्तनवादी लेखिका व झुंजार कार्यकर्त्या निशा शिवूरकर यांनी या पुस्तकात ‘गांधीजी आणि स्त्री-पुरुष समते’च्या विविध पैलूंचा चिकित्सक विचार केला आहे.
या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात गांधीजींचा स्त्री-पुरुष समतेच्या विचारांचा आढावा घेताना महाराष्ट्रातील आद्य बहुजनवादी विचारवंत म. फुल्यांचा विचार व गांधीविचार व जीवन यांतील साम्यस्थळांचा आवर्जून विचार केला आहे. धर्मग्रंथाची चिकित्सा व परमेश्वराची निराकार कल्पना यांतील पहिले साम्य शिवूरकरांनी दाखवून दिले आहे. धार्मिक ग्रंथांची ईश्वर निर्मितता व त्यात स्त्रियांची कर्ता म्हणून असणारी अनुपस्थिती यावर शिवूरकरांनी नेमके बोट ठेवले आहे. सावित्रीबाई व कस्तुरबा यांचे आपापल्या सहचरांशी असणारे प्रेमाचे, निर्मळपणाचे व मैत्रीपूर्ण सहजीवनाचे संबंध होते, हे शिवूरकर संदर्भानिशी दाखवून देतात.
जोतिबांच्या हयातीतच व नंतर सावित्रीबाईंनी उचललेली सत्यशोधक समाजाची जबाबदारी व १९४२च्या आंदोलनात तसेच द. आफ्रिकेमधील लढ्यातही कस्तुरबांनी दिलेली (तुरुंगवासासह) सक्रिय साथ हे आणखी लढाऊपणाचे साम्यस्थळ. फुल्यांचा ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ व गांधीजींनी अनुवाद केलेला ‘अन टू द लास्ट’ (अर्थात, ‘सर्वोदय’) हा ग्रंथ यांच्या प्रेरणा, हेतू हेही एक साम्यस्थळ आहे. आजवर या दोन्ही व्यक्तींमधील साम्यांबद्दल वसंत पळशीकर सोडता, कुणी फारसे लिहिले नव्हते. या पार्श्वभूमीवर फुले-गांधींमधील प्रेरणांच्या, कृतींच्या साम्याचा शोध, हे या ग्रंथाचे निश्चितच वेगळेपण आहे.
फुले आणि गांधी यांनी राष्ट्रसभेच्या मर्यादा दाखवून मुक्तीचा लढा व्यापक करायचा असेल, तर स्त्रियांसह सर्व शोषित घटक या लढ्यात सामील करून घेतले पाहिजेत, या भूमिकेवरून कार्य केले. परिणामी समतेचा लढा केवळ प्रतीकात्मक न होता शोषितकेंद्री झाला. दोघांचाही ‘ट्रिकल डाऊन सिद्धान्ता’वर विश्वास नव्हता.
इथवर फुले आणि गांधी यांच्यामधील साम्य दाखवल्यानंतर लेखिकेने गांधीजींच्या स्त्री-प्रश्न समजून घेण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा तपशीलवार विचार केला आहे. स्त्रियांचा प्रश्न हा मानवी हक्कांच्या आंदोलनाशी दोघांनीही जोडला आहे.
गांधींच्या पूर्वी सुधारकांनी स्त्रीशिक्षण, बालविवाह, विधवा-विवाह, शिक्षण या प्रश्नांवरच्या सुट्या चळवळी सुरू होत्या. पण त्या वरून खाली विचार करण्याच्या पद्धतीच्या होत्या. गांधींच्या विविध प्रश्नांवरील भूमिकांनी समाज जीवनाची अनेक क्षेत्रे ढवळून काढली. आधी राजकीय की सामाजिक, हे द्वंद्व गांधींच्या कार्यक्रमात मोडले गेले. स्त्रियांचे विविध प्रश्न व वसाहतवादाविरुद्ध चालू असणारा स्वातंत्र्याचा लढा यांची गांधीजींनी अचूक सांगड घातल्याचे लेखिका दाखवून देते.
स्त्रियांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास, निर्भयता, स्त्री-पुरुषांचे मोकळे व मैत्रीचे नाते व आत्मनिर्भरता व स्त्री-पुरुष समानता यांनी भारतीय स्त्रियांचे सार्वजनिक अवकाशातील वावरणे अधिक सुसह्य केले. गांधींचा समता विचार सर्वंकष होता, तो तुकड्या-तुकड्याचा नव्हता. याची चपखल उदाहरणे लेखिकेने दिली आहेत. गांधींपासून सुरू झालेल्या या परिवर्तनाचा परिणाम खुद्द लेखिकेवर कसा झाला, याचीही नोंद केली आहे.
गांधीजींनी त्यांच्या काळात स्त्रियांच्या विविध प्रश्नावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात सती प्रथा, बालविवाह, स्त्री शिक्षण, विधवा विवाह, हुंडाप्रथा, बालविधवांचा प्रश्न, विवाहाचे वय, अशा प्रश्नांचा समावेश आहे. पडद्याची प्रथाही त्यांच्या चिकित्सेतून सुटली नाही. स्त्रियांच्या विविध प्रश्नांवरील गांधींच्या भूमिकेत एक समान सूत्र आहेत. एक म्हणजे स्त्रीच्या व्यक्तित्वाची स्वतंत्रता व स्वायत्तता, जीर्ण व निरुपयोगी प्रथा-रूढींचे उच्चाटन, पुरुषांच्या उपभोगात्मक अन्यायाविरोधी चळवळींना पाठिंबा, स्त्री प्रौढ झाल्यावर विवाह, विवाह करावा की न करावा, याबाबतचा व स्वत:विषयीचे अन्य निर्णय स्त्रीने स्वत: घेणे, स्त्री-पुरुषांना समान नैतिक मापदंड (त्यातल्या वेगळेपणाला नकार) ही ती सूत्रे होत.
धर्माचा अर्थ लावण्याची गांधीची भूमिका विलक्षण व वेगळी आहे, हे लेखिकेच्या एकंदर विवेचनावरून लक्षात येते. पसंत नसलेला जोडीदार, हुंड्याला विरोध करणे, यासाठी मुली अविवाहित राहिल्या तरी ती, त्या मुलींचा निर्णय म्हणून गांधींना मान्य आहे. कारण परस्परांवरील प्रेम व परस्परांची संमती, हाच गांधीही विवाहाचा आधार मानतात. वेश्या, देवदासी पद्धत या विषयीच्या गांधींच्या भूमिकेचे विवेचन व विश्लेषण लेखिकेने मुद्देसूद पद्धतीने केले आहे. या संदर्भातील गांधींची वचने, लेखन संदर्भही लेखिकेने दिले आहेत. या विश्लेषणात गांधींच्या स्त्री-पुरुष समतेच्या मूलभूत तत्त्वाचा व दृष्टीचाही प्रत्यय येतो.
‘गांधीजींच्या आंदोलनातील स्त्रियांचा सहभाग’ हे या पुस्तकातील स्वतंत्र प्रकरण आहे. आंदोलनात सामील होणाऱ्या व होऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांची मानसिकता गांधी कशी घडवत असत, याची अनेक उदाहरणे अनेक आंदोलनांच्या संदर्भात लेखिकेने तपशिलाने दिली आहेत. सहभागी स्त्रियांतील काही महत्त्वाच्या स्त्रियांचा उल्लेख व उदाहरणेही लेखिकेने दिली आहेत.
जातीव्यवस्था, आंतरजातीय लग्ने याबद्दल गांधीजींबद्दल बरेच गैरसमज आहेत. बरेच जण गांधींच्या १९१५-१६च्या भूमिकेपाशीच अद्यापही अटकलेले आहेत. समग्रतेचा अभाव व इतिहास दृष्टीचा अभाव ही याची प्रधान कारणे. गांधींच्या जातीप्रथा, आंतरजातीय विवाह याबद्दलची विकसित होणारी भूमिका पाहिली की, गांधींजीची भूमिका स्पष्ट होऊ लागते.
१९२६ साली साबरमती आश्रमात चिरंजीव रामदासचा विवाह अत्यंत साधेपणाने झाला. तो सजातीय विवाह होता. त्यानंतर गांधीजींनी स्वच्छ भूमिका घेतली, या पुढे साबरमती आश्रमात फक्त भिन्नजातीय विवाहच होतील. त्यांच्या सेवाग्रामच्या आश्रमातही आंतरजातीय विवाह झाले आहेत. गांधींचा मुलगा देवदास व राजगोपालचारी यांची मुलगी लक्ष्मीदेवी यांचा विवाहही आंतरजातीय होता. त्याचा निषेध झाला. या विवाहाचे पौराहित्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले होते. धर्मशास्त्रातील अनेक तरतुदींची चिकित्सा गांधीजींनी शास्त्रीबुवांकडून करून घेतली व शेवटी स्वत:ची मते बनवली.
धर्मांतर होणार नसेल तर आंतरधर्मीय विवाहालाही त्यांनी विरोध केला नाही. इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी या हिंदू-पारशी विवाहाला त्यांनी पाठिंबा देऊन समर्थन दिले. जसजशी समाजात सहिष्णुता वाढत जाईल, तसतशी इतर धर्मांची जाण वाढत जाईल, तेव्हा या प्रकारच्या विवाहांचे स्वागत होईल व तशी रितही तयार होईल. स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारण, समाजकारण, वाढते उन्मादी धर्मकारण व त्यातून निर्माण होणारी अहिष्णुता यांनी ही सारी उपलब्धी उधळली गेली.
विवाह कोणत्याही प्रकारचा असो वा कोणाचाही असो जोपर्यंत पती-पत्नींमध्ये सेवाभाव भरलेला आहे, तोपर्यंत तो यशस्वीच होणार, अशी गांधींची भूमिका दिसते. थोडे बारकाईने पाहिले तर परस्परसंमती, परस्परांवरील प्रेम व एकमेकांप्रती असणारा सेवाभाव, ही यशस्वी वैवाहिक जीवनाची कसोटीच गांधीजींनी सांगितली आहे. अशा काही विवाहांचा उल्लेखही लेखिकेने केला आहे.
भारताच्या फाळणीचा कालखंड हा भारताच्या अलीकडील इतिहासातील ‘काळा कालखंड’ म्हणावा लागेल. फाळणीच्या जखमा आजही ठसठसत्या आहेत. फाळणीच्या काळात माजलेला जमातवाद आज भारताला पुन्हा एकदा विघटनाच्या उंबरठ्यावर आणेल की काय, असे भय सध्या अनेकांना वाटते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आज फाळणीच्या अवशेषांची एवढी धग जाणवतेय, तर प्रत्यक्ष त्या काळात फाळणीची धग केवढी असेल?
हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या अपयशाची परिणती फाळणीत झाली, एक फुटीर राजकारण यशस्वी झाले आणि त्या राजकारणाने नंतर फुटीर शक्तींना बळ दिले, तात्त्विक समर्थन दिले व अघोरी व्यावहारिक परिणाम दिले. फाळणीतून अनेक समस्या निर्माण झाल्या. समुदायांमधील परस्परांवर अविश्वास, सूडाची, बदल्याची भावना, सगे-सोयरे मारले गेल्याने निर्माण झालेला क्रोध, पाशवीवृत्तीने स्त्रियांची झालेली विटंबना, उद्ध्वस्त झालेले संसार, रोजी-रोटी, मातृत्व-पितृत्व हरवलेली बालके, बहिष्कृततेचा स्त्रियांवर बसलेला शिक्का या साऱ्याच बाबी फाळणीच्या परिणामी निर्माण झाल्या. माणसांच्या जखमांवर, वेदनांवर आणि मरगळलेल्या किंबहुना मृतवत झालेल्या मनांवर फुंकर घालणे, हे काम नाजूक होते, अवघड होते.
एक अर्थाने गांधीजींच्या आयुष्यातील सर्व अनुभवांचा, तात्त्विक भूमिकेचा कस लागणारे हे काम होते. आश्चर्याची गोष्ट अशी की, गांधी वगळता एकही महाभाग या आव्हानाला सामोरा गेला नाही. नौखाली व दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापन, सलोखा निर्माण करण्याच्या कामात गांधी व त्यांच्याबरोबर असणार्या स्त्री सहकार्यांनी जे अपूर्व धैर्य दाखवले त्याला खरे तर इतिहासात तोड नाही. या साऱ्या परिस्थितीत गांधीजींनी पीडित स्त्रियांना कोणता संदेश दिला, हे पुस्तकातील प्रकरणात विस्ताराने चर्चिले आहे.
‘धर्म आणि स्त्रिया’ या प्रकरणात गांधीजींनी पुराणकथा, ‘महाभारत’, ‘रामायण’ या साहित्यातील व्यक्तिरेखांचा वेगळा अन्वयार्थ लावला आहे. सीता, पार्वती, दमयंती, द्रौपदी यांच्या कथांचा गांधीप्रणित अन्वयार्थ खूप वेगळा आहे. कोणाची तरी पत्नी म्हणून ते यांची ओळख पूर्णपणे मानत नाहीत. लेखिकेने सीतेचे उदाहरण देऊन निर्धारी, आत्मनिर्भर जगणारी नायिका गांधीप्रणित अन्वयार्थ देऊन साकार केली आहे.
अनेक स्मृतिवचनांचा उल्लेख गांधींच्या लिखाणात येतो. त्यातील स्त्रियांबद्दलचा अपमानजनक मजकूर ते अमान्य करतात. धर्मनीतीच्या विरोधी असणारी (म्हणजेच स्त्रीला माणूस म्हणून मान्य न करणारी) वचने वगळून शुद्ध स्मृतिग्रंथ तयार करण्याचे आवाहनही ते करतात. ‘महाभारत’, ‘रामायण’ यांतील नायिकांचा वेगळा अन्वयार्थ लावणारे गांधी लेखिकेने उभे केले आहेत.
विवाह आणि पती-पत्नीचे नाते याबाबतचे गांधींचे विचार आजही बऱ्याच अंशी प्रस्तुत आहेत. शिव-पार्वतीचा विवाह गांधी आदर्श मानतात. पार्वतीने स्वत:हून शिवाला निवडले, ही गोष्ट त्यांना संमती विवाहाची बाब वाटते. ते स्वत: प्रौढ व दोन्हीकडच्या संमतीवर आधारलेला विवाह मान्य करतात. मुलीला साखरपुड्यानंतर मुलाचा पूर्वइतिहास कळाला तर असा वाङ्निश्चय मोडण्याचा निर्धार मुलींनी दाखवला पाहिजे ही गांधींची भूमिका आजच्या विवाहाची पद्धत लक्षात घेता ‘रॅडिकल’ वाटावी, अशीच आहे. काहीही करून विवाह केला पाहिजे आणि त्यासाठी पालकांनी मुलीला सामाजिकरितींच्या दडपणापोटी असहाय केलेले गांधीजींनी नाकारले आहे.
विवाहासंदर्भात गांधीजींनी खोलात जाऊन विचार केला होता असे दिसते. दैनंदिन जगण्यातील घरकामाची वाटणी, स्वयंपाक, पती व्यसनी असणे, आळशी असणे, वर्चस्व गाजवणारा असणे, विवाहानंतर मुलीच्या आई-वडिलांची भूमिका, अशा अनेक प्रश्नांवर गांधीजींनी आपली मते मांडली आहेत व ती सारी मते पितृसत्ताक रचनेच्या विरोधी आहेत व स्त्री-पुरुषांच्या सर्वंकष समानतेवर आधारलेली आहेत. स्त्रीच्या स्वतंत्र व स्वायत्त व्यक्तित्वाचे मूल्य गांधींच्या विवेचनाचा आधार आहे, हे यातून वारंवार स्पष्ट होते. शिवूरकर यांनी दिलेल्या दाखल्यांमुळे गांधी आधुनिक नाहीत, असे आग्रहाने सांगणाऱ्यांना गांधींचा आधुनिक मूल्यांचा आग्रह परस्पर उत्तर देणारा आहे.
आजच्या काळातील ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’, विवाहाशिवायचे मातृत्व, समिंलगी विवाह, या साऱ्या बाबी गांधींच्या काळात नव्हत्या. आजही त्या समाजात मध्यवर्ती नाहीत पण काही अंशी काही समाजगट या पद्धतीने जगू पाहतात, म्हणून आजच्या चर्चाविश्वात या गोष्टी आहेत. गांधीजींनी याकडे कसे पाहिले असते? असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर ‘माहिती नाही’, असे द्यावे लागेल. गांधींचा सबंध विचार हा कुटुंब हा स्थिर, एकक धरून झालेला आहे. कुटुंबाचे विघटन त्यात अपवाद म्हणूनच आहे.
आज शिक्षणाचा वाढलेला प्रसार, नोकऱ्या लवकर न लागणे, स्त्रियांच्या बदललेल्या अपेक्षा व पुरुषांच्याही पत्नीविषयी बदललेल्या अपेक्षा, विभक्त कुटुंबपद्धती व उपलब्ध संतती नियमनाची साधने यांमुळे स्त्री-पुरुषांच्या लग्नाचे वय वाढलेले आहे. अशा वेळी स्त्री-पुरुषांनी आपल्या कामेच्छेचे शमन कसे करावे? कुटुंब अस्तित्वात येत नसेल, मुले होण्याच्या आकांक्षांचे काय करावे? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातून एकत्र मातृ-पितृत्व, विवाहाशिवाय कामसुख, अपत्याविना शरीरसुख साधनांच्या आधारे दीर्घकाळ घेता येते.
अशा वेळी विवाहाचे पावित्र्य वा संस्थात्मक स्वरूपच धोक्यात येऊ शकते का? परस्परसंमती हाच केवळ आधार मानला व तीच एकमेव नैतिकतेची कसोटी मानली तर वरील प्रश्नांचे उत्तर होकारार्थी द्यावे लागते. गांधींच्याच काळात बर्ट्रांड रसेलचे ‘विवाह आणि नीतीमत्ता’ (Marriage and Morals, १९२९) हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. गांधींच्या विवेचनात वरील प्रश्नांविषयी काहीच येत नाही. याचा अर्थ गांधीजींनी हे पुस्तक वाचले होते की नाही, हे कळावयास मार्ग नाही. गांधीजींनी त्यांच्या काळातील विवाहपद्धती, तिची सर्वंकष व्याप्ती व स्त्री-पुरुषांच्या संमती, प्रेम, मैत्री, सहिष्णुता याचा आधार एवढ्याच चौकटीत विचार केलेला दिसतो. या संदर्भात गांधी विचारांचा अन्वयार्थ लावणे बाकी आहे. पण त्यांच्या काळातील पितृसत्ताकतेला, पुरुषी वर्चस्वाला नकार देऊन स्त्रियांच्या व्यक्तित्वाचा, स्वातंत्र्याचा व हक्कांचा विचार क्रांतिकारक होता, हे मान्यच करावे लागेल.
गांधी विचारातील सर्वांत वादग्रस्त भाग कोणता असेल तर ब्रह्मचर्य आणि संतती नियमनामागील त्यांची भूमिका हा आहे. सामान्यत: गांधी विरोधकांनी टिंगल-टवाळीसाठी याचा वापर केला, तर गांधीविचारांचा विचारप्रणालीच्या आधारे विचार करणाऱ्यांनी व विशेषत: विज्ञानवादी अभ्यासकांनी याचा अव्यवहार्य म्हणून अव्हेर केला. दोन्ही बाजूला गांधी नेमके काय सांगत आहेत, जे सांगताहेत त्याच्या गाभ्याशी नेमके काय आहे, याची फारशी चर्चा केली नाही.
वसंतराव पळशीकर, डॉ. यशवंत सुमंत यांनी गांधीच्या ब्रह्मचर्य विचारांचा अन्वयार्थ लावण्याचे प्रयत्न केले आहेत व त्याची नोंद शिवूरकरांच्या लेखनात आहे. गांधींचे ब्रह्मचर्य जीवनसंमुख ही प्रवृत्तीमार्गी होते असे मत लेखिकेने नोंदवलेले दिसते, तर डॉ. सुमंतांनी संयम हे मूल्य गाभ्याशी दिसते, अशी मांडणी केली आहे. ‘कामवासनेचा विवेकशील संयम म्हणजे ब्रह्मचर्य होय’, हे लेखिकेचे मत याबाबतीत फारच महत्त्वाचे आहे. लैंगिकता आणि हिंसा यांचे नाते जर विचारात घेतले, तर स्त्रीवर लैंगिक आक्रमण होऊ शकते, तिच्या नकारातून हिंसाही निर्माण होऊ शकते. म्हणून संयम हा लैंगिक जीवनाचा (व खरे तर एकूणच जगण्याचा) मूलभूत पाया आहे.
विवाहाशिवायच्या कुटुंबाची वा पती-पत्नी संबंधांची गांधीकालीन विचारात फार चर्चा नव्हती. पण त्याच काळात र.धों.कर्वे यांचे लिखाण प्रसिद्ध होत होते. संतती नियमनाच्या साधनांद्वारे स्त्रिया व पुरुष दोघेही अमर्याद लैंगिक स्वातंत्र्य उपभोगू शकतात, अशी नवी कल्पना प्रसृत होऊ लागली होती. अमर्याद लैंगिक स्वातंत्र्य माणसाला खासगी जीवनाच्या परिघाबाहेर पडू देणार नाही, ते एक व्यसनही होऊ शकते, हे लक्षात घेता वसंत पळशीकरांनी म्हटल्याप्रमाणे माणसाला सार्वजनिक जीवनात पूर्णपणे सहभागी होण्यासाठीचा तो अडसरही होऊ शकतो. म्हणून गांधींच्या ब्रह्मचर्य कल्पनेचे संयम हे रूप होऊ शकते. पण हा संयम एकाकी व एकटे राहणाऱ्या व्यक्तींचा संयम नाही.
गांधी सामान्यत: विवाह केलेल्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचार करताहेत. संतती नियमनाच्या साधनांना गांधींचा विरोध आहे. म्हणून संततीनियमन संयमानेच साधावे हा त्यांचा आग्रह आहे. वैवाहिक जीवनात एका टप्प्यावर गांधीजींनी हा संयम आवश्यक मानला आहे. (विशेषत: अपत्ये होणे थांबवल्यानंतर) सुरक्षित काळात फार तर संबंध करावा, असेही गांधीजींनी सुचवले आहे. या साऱ्या चर्चेमधून काही पेच उभे राहतात. केवळ अपत्य प्राप्ती थांबवल्यावर पुढच्या आयुष्यातील कामवासनेचे दमन होऊ शकेल का? आज विशेषत: एक किंवा दोन मुले झाल्यावर विशेषत: तिशी/पस्तीशीच्या वयात स्त्री-पुरुष अपत्य होऊन देणे थांबवतात.
उर्वरित तरुणपणात त्यांना केवळ संयमाने कामवासनेचे दमन होईल का? त्यातही गर्भनिरोधक साधनांची विपुल उपलब्धी असताना दमन का करायचे? याचे उत्तर काय? कामवासना ही माणसांच्या मूलभूत प्रेरणांपैकी आहे. तिचा निरास होणे ही फ्रॉइर्डने स्थिर समाजासाठीची आवश्यक गोष्ट मानली होती. अर्थात केवळ तेवढ्यानेच समाज स्थिर राहील, असे नाही कारण माणूस हा सर्वांत बेभरवशाचा प्राणी आहे. गरजा भागल्यावरही तो मूल्यांनी जगेल, अशी शक्यता गृहीत धरली तरी ती शक्यताच उरते. त्या शक्यतेच्या पलीकडचे सांगता येत नाही. जे कामवासनेचे तेच वैपुल्यावर आधारित समाजाच्या गरजा भागल्यानंतरच्या जीवनाचे.
यावर उपाय म्हणूनच कुरुंदकरांसारखे अभ्यासक गांधी विचारांचा अन्वयार्थ लावताना मार्क्स आणि फ्रॉईड यांच्या जोडीला गांधी ठेवतात. इथे गांधी हे संयमाचे प्रतीक आहे. समाज अभावग्रस्त असो, गरजमुक्त असो संयम हेच समाजजीवनाच्या स्थैर्याला आवश्यक असणारे मूल्य आहे. समाजधारणेतला हा व्यापक विचार लक्षात घेतला तर ब्रह्मचर्याकडे आणखी एका कोनातून पाहता येते व तो कोन म्हणजे ‘तारतम्या’चा. अमर्याद उपभोग व अमर्याद नियमन याच्यामध्ये ‘तारतम्य’ हाच विचार प्रस्तुत ठरतो.
कामवश माणसांना सार्वजनिक जीवनात वावरणे कठीण होते, चळवळी त्यामुळे बदनाम होऊ शकतात व अशा व्यक्तीची सर्जनक्षमताही मर्यादित असते. त्याउलट अमर्याद नियमन म्हणजेच आजीवन ब्रह्मचर्य पाळणाऱ्यांनाही मर्यादा असू शकतात. सार्वजनिक जीवनात (व अलीकडे समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रांत) स्त्री-पुरुषांचा एकत्रित वावर, सहभाग वाढला आहे, अशा वेळी स्त्री-पुरुषांना उपयोगी पडणार आहे तो संयमच. गांधींचा आग्रह संयमासाठी होता हे लक्षात घेतले तर त्यांच्या ब्रह्मचर्य कल्पनेचा विपर्यास करण्याचे कारण नाही. त्याच्या मर्यादा लक्षात घेणे हेच इष्ट. पुरुषांचे ब्रह्मचर्य हे आपल्या समाजात प्रतिष्ठित होते व त्यावरून पुरुषाचे नैतिक श्रेष्ठत्व ठरायचे.
या एकतर्फी पुरुष प्रतिष्ठेला गांधीजींनी स्त्रियांच्या ब्रह्मचर्य पालनाचा अधिकार मान्य करून सुरुंग लावला हे त्यांच्या विचारांचे वैशिष्ट्य. त्यांच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगाबद्दलही इथे काही लिहायला हवे. गांधींच्या ब्रह्मचर्य विचारात टोकाची भूमिका होती, तसेच फाळणीपूर्व काळातील हिंसाचाराचा संबंध ब्रह्मचर्याशी जोडणे पटत नाही, असे लेखिकेने आपले मत नोंदवले आहे. याची तपासणी कशी करायची?
एकतर गांधींसारखा प्रयोगशील माणूस असे प्रयोग कोणाला विचारून करेल, ही शक्यताच नाही. समाजाच्या व सहकाऱ्यांच्या दडपणापुढे ते झुकायची शक्यताही नव्हतीच. या प्रयोगामागचा त्यांचा आधार काय? तर स्वत:च्या पारदर्शक व खुल्या भूमिकेची मनोवृत्ती. गांधी अपयशी झाले असते, तर कदाचित बदनाम झाले असते. ती बदनामी समजून घेता आली असती. पण गांधींचा आत्मविश्वासही त्यांनी पणाला लावला होता. गांधींसाठी त्यांचा संयम व दंगलखोरांना संयम सांगणे, याचा अन्योन्य संबंध होता.
गांधी समाजजीवनातल्या प्रत्येकच क्षेत्रात संयम हे मूल्य रुजवू पाहत होते. संयमाशिवाय समस्येचे आकलन होऊ शकत नाही हेही लक्षात घ्यायला हवे. हा संयम माझ्यातच नसेल तर मी लोकांना कोणत्या तोंडाने शिकवणार हा प्रश्न त्यांच्या मनात असला पाहिजे, असा अंदाज करता येतो. कामवासनेवरील नियंत्रण हे एका अर्थाने हिंस्रतेवरचे नियंत्रण आहे. हिंसा आणि कामवासना याचा आपल्या समाजात जवळपास जैविक संबंध असल्यासारखा आहे. हे लक्षात घेता त्यांच्या सार्वजनिक जीवनातला आत्मविश्वास व स्वत:वरचे नियंत्रण सुटले असते, तर गांधीजींनी कदाचित आमरण उपोषणही केले असते.
ज्या काळात हा प्रयोग झाला तो दंगलीचाच काळ होता. अत्याचारित हिंदू आणि मुस्लीम स्त्रियांच्या मनातील भीती घालवून पूर्ववत शेजारचे सहजीवन सुरू करणे आव्हान होते व ते दीर्घकाळाचे आव्हान होते. हे लक्षात घेता स्वत:चा आत्मविश्वास व धैर्य कायम राहण्यासाठी स्वत:चे आयुष्य त्यांनी पणाला लावले असा अन्वयार्थ लावता येतो. अर्थातच तो सर्वांनाच पटेल असे नाही व तसा आग्रहही नाही.
गांधी आणि कस्तुरबा यांच्या ‘बा’ आणि ‘बापू’ होण्याच्या प्रक्रियेचा उलगडा लेखिकेने या पुस्तकात केला आहे. त्या दोघांच्यातील संघर्ष, सहकार्य त्यातून उभयतांच्या व्यक्तित्वाच्या विकासाचा आलेख लेखिकेने सुरेखरीत्या मांडला आहे. एका अशिक्षित स्त्रीचे रूपांतर जबाबदार कार्यकर्त्यात होऊन व ती स्त्री सार्वजनिक कार्यासाठी संघर्षासाठी सक्षम होण्यात झाला. तसेच गांधींच्या महात्मा होण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या माणूसपणाचा उत्तरोत्तर विकास व्हावा, असे सहजीवन उभयतांच्या वाट्याला आले. महात्म्यालाही मातीच्या पायाने चालूनच महात्मा होता येते, हा निष्कर्ष या प्रकरणातून आपल्या हाती येतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
निशा शिवूरकर यांच्या या ग्रंथाने दोन गोष्टी साध्य झाल्या आहेत. एक म्हणजे वसंत पळशीकर, नरहर कुरुंदकर, सु.श्री. पांढरीपांडे अशा ज्येष्ठ विचारवंतांनी गांधीविचारांना समताविषयक चर्चाविश्वात पुन्हा आणून पूर्वसुरींचा प्रवाह बळकट केला. अलीकडच्या काळात डॉ. यशवंत सुमंतांनी गांधीविचारांचा नवा अन्वयार्थ लावण्याचे अर्थपूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यातून त्यांनी बहुजनवादी गांधींचे नवे रूप सिद्ध केले व गांधींच्या सर्वच विचारांची सूक्ष्म तपशिलानिशी नवी मांडणी केली. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक म्हणजे या मांडणीचा पुढचा भाग म्हणून पाहता येईल.
दुसरी साध्य झालेली गोष्ट म्हणजे गांधीजींच्या वचनांचा पुस्तकात केलेला पुनरुच्चार. शिवूरकरांनी गांधीजींची वचने विपुल प्रमाणात वापरून आपल्या मुद्यांची पुष्टी केली आहे. पेशाने त्या वकील असल्याने त्यांच्या लिखाणातील युक्तिवादावर त्यांचा प्रभाव जाणवतो. अर्थातच इथला त्यांचा युक्तिवाद प्रतिस्पर्ध्याला खोटे ठरवण्याच्या संदर्भातील नाही. कोणालाही खोडून काढणे किंवा निरुत्तर करणे, हे त्यांच्या लेखनाचे उद्दिष्टच नाही. त्यांच्या वाचनातून, चिंतनातून, मननातून त्यांना जाणवलेले गांधी त्यांनी सुसंगतपणे मांडले आहेत.
समतेच्या संदर्भात आणि विशेषत: स्त्री-पुरुषांच्या समतेसंदर्भात तिचे सर्व पैलू त्यांनी विचारात घेतले आहेत. त्यांच्या निष्कर्षांना गांधीवचनाचा भक्कम आधार आहे. स्त्री-पुरुष समता, समानता, स्त्रियांचे स्वातंत्र्य, विवाह, संततीनियमन, सामाजिक काम, ब्रह्मचर्य यांवरच्या लिखाणातून त्यांनी ‘रॅडिकल गांधी’ उभा केला आहे. यातच या पुस्तकाचे योगदान सामावले आहे.
‘महात्मा गांधी आणि स्त्री-पुरुष समता’ - अॅड. निशा शिवूरकर
रोहन प्रकाशन, पुणे | पाने – ४३२ | मूल्य - ५९५ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment