दुर्दैवाने ‘अभिजनवादी इतिहास’ हा ‘लोकप्रिय इतिहासा’पेक्षा अधिक लोकप्रिय आहे. कारण सत्तारूढ वर्गाची समाजावरील वर्चस्ववादी पोलादी पकड. म्हणून खऱ्या अर्थानं इतिहास राज्यशास्त्राची ‘बालवाडी’ आहे!
पडघम - सांस्कृतिक
अनिरुद्ध देशपांडे
  • सातव्या ‘विवेक जागर परिषदे’चे बोधचिन्ह
  • Mon , 05 February 2024
  • पडघम सांस्कृतिक इतिहास विवेक जागर परिषद

७ व ८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान जालन्यामध्ये सातवी ‘विवेक जागर परिषद’ झाली. लोकायत विचारमंच, नांदेड; स्थानिक संयोजन समिती, जालना आणि प्रागतिक इतिहास संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या परिषेदत ७ ऑक्टोबरच्या पहिल्या सत्राची सुरुवात दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे यांच्या निबंधवाचनाने झाली. त्या निबंधाचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

मी कल्पना केली नव्हती की, इथे आपणासमोर येऊन धार्मिक इतिहासलेखनाच्या संदर्भात आपणास संबोधित करेन. ज्याला मराठीत ‘अध्यात्मवादी इतिहासलेखन’ असे संबोधले जाते, तेच हिंदीत ‘आध्यात्मिक इतिहासलेखन’ म्हणून ओळखले जाते. ‘इतिहासलेखन’ या विषयावरच्या संभाषणासाठी मी एक आकृतीबंध तयार केला पाहिजे, जो वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन इतिहासलेखनाचे सौंदर्य खुलवणारा महत्त्वाचा पैलू ठरेल, ऐतिहासिक व राजकीय महत्त्व ठरवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

विषय खूप मोठा आहे. तसा आजवरचा इतिहास हा अभिजन वर्गानेच लिहिला आहे. कारण प्रत्येक समाजातील शिक्षण घेण्याचे कार्य हे केवळ अभिजन लोकच करत होते. ज्या लोकांना आपण ‘वंचित समूह’ (subaltern masses), ‘कष्टकरी वर्ग’, ‘शेतकरी’,  ‘आदिवासी’, ‘बहुजन समाज’ वा ‘समाजातील सामान्य लोक’ असे संबोधतो, त्यांना अगदी पूर्वीपासून अगदी विसाव्या शतकापर्यंत शिक्षण घेण्याची मुभा नव्हती. ते वाचू-लिहू शकत नव्हते. त्यांनी भक्तीसंप्रदायातील संत निर्माण केले. जे थोडे बहुत वाचू-लिहू शकत होते, त्यांचे लिखाण त्यांनी निर्माण केले. परंतु सर्वसाधारणपणे कायद्याने प्राचीन काळातील मध्ययुगीन सरंजामशाही कालखंडातही त्यांना शिक्षण घेण्यास बंदी होती. जे कोणी शिक्षण घेण्याचा, अक्षर ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत, त्यांना भयानक कठोर अशा शिक्षेस सामोरे जावे लागत असे.

अशा परिस्थितीमध्ये भूतकाळात जे इतिहासलेखनाचे काम झाले आणि जेवढेही ऐतिहासिक ग्रंथ लिहिले गेले (उदा., मिथके, कविता, पोवाडे, राजा-राणीच्या कथा किंवा पुराण इ), ते सर्व लिखाण शिक्षित लोकांनीच केलेले आहे. आणि ही सर्व शिकली-सवरलेली मंडळी सामान्यतः अभिजन वर्गातूनच आलेली असत. तर हे ठरलेलं गणित आहे - त्यांच्या सर्व इतिहासलेखनात एकच ‘अभिजनवादी तत्त्व’ आढळून येते.

या सर्व पार्श्वभूमीवर मी आपल्यासमोर माझी काही निरीक्षणे नोंदवू इच्छितो. सर्वप्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की- ‘इतिहास म्हणजे काय?’ इतिहासलेखन काय असते? इतिहासलेखनाच्या एक नव्हे, तर अनेक व्याख्या आढळून येतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

आपण एका गृहीतकापासून सुरुवात करू या. गृहीतक असे की – ‘इतिहास हे संस्कृतीचे चरित्र / वर्णन असते’. जर इतिहास संस्कृतीचे वर्णन (चरित्र लिखाण) असेल, तर त्याचा महत्त्वाच्या प्रश्नांशी संबंध येणार नाही का? ते इतिहासलेखन संपूर्णतः लिहिला गेलेला इतिहास असेल? मी या ठिकाणी मौखिक इतिहासासंदर्भात बोलत नाही. आपण मौखिक परंपरा (oral tradition)बद्दल बोलू शकतो, जो एका अंगाने एखाद्या प्रकारच्या इतिहासाला स्मृतीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असू शकेल आणि जो पुढे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केला जात असतो. जर आपण इतिहासलेखनासंदर्भात बोलत असू किंवा इतिहासाला लक्षात ठेवण्याचा विचार करत असू, तर आपण इतिहासाला आठवणींच्या कप्प्यात दडवून  ठेवतो.

तर इतिहास काय आहे? इतिहासाची सुरुवात केव्हापासून झाली? मनुष्य आणि जनावर यांत फरक केला जाऊ शकेल की, प्राण्यांच्या डोक्यात भूतकाळ, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळ यांची कल्पना असत नाही, ती केवळ मानवामध्ये असते. आणि मानव त्याच्याजवळ असणाऱ्या कल्पनाशक्तीच्या आधारे भूतकाळाला भविष्याशी साधण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडण्याच्या प्रयत्नात तो वर्तमानात जगत असतो.

इतिहासालाही अशाच प्रकारे समजून घेण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. ‘संस्कृती’ नावाची गोष्ट या सर्व प्रयत्नांतून उदयाला येते. भविष्याचा वेध घेण्याच्या कल्पनेतूनच  ‘संस्कृती’ नावाच्या घटकाचा जन्म होतो. यातच कौशल्य, तंत्रज्ञान, स्वतःच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगणे- त्यातच भाषा, आकलन, विचारशक्ती अशा प्रकारच्या बाबी दडलेल्या असतात.

त्यामुळे मग संस्कृती/ सभ्यता कोण निर्माण करतं, या मूलभूत प्रश्नांशी भिडायला होतं. संस्कृती जन्माला कोण घालतं? की संस्कृती केवळ तेच लोक निर्माण करतात, जे इतिहास लिहितात? किंवा संस्कृती निर्माण करण्यात, घडवण्यात त्या लोकांचाही तेवढाच हातभार असतो, जे इतिहास लिहीत नाहीत, पण इतिहास घडवतात? कारण उत्पादनाशिवाय इतिहासाची आपण कल्पनाही करू शकत नाही. आता आपण इथे बसलो आहोत, वर्षानुवर्षे लोक असेच बसायचे, उठायचे, भाषेद्वारे परस्परांशी संवाद साधायचे, जेवायचे, कौशल्य वापरायचे, वस्तूंचा/ उत्पादनांचा वापर करायचे.

ही जी इतिहासाच्या व्याप्तीमधील भौतिकता आहे, ती घडवण्यात इतिहासातील मजूर आणि शेतकरी (कुणबी) यांचे फार महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘अभिजनवादी (अभिजात) इतिहासलेखन’ या योगदानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येते. त्यामुळे ‘अभिजनवादी इतिहासलेखना’च्या (Elitist Historography) ‘संस्कृती’ या घटकासंदर्भात जो दृष्टीकोन असतो, तो ‘गैर-अभिजनवादी इतिहासलेखना’पेक्षा वेगळा असतो.

प्राचीन काळापासून इतिहास लेखनासंदर्भात दोन मुख्य प्रवाह आढळून येतात. साधारणतः मी असं म्हणतोय - असं नाहीये की, यात छोट्या छोट्या इतर काही मांडणीचे पद्धती, प्रकार नाहीत. एक खूप जुनी ब्राह्मणवादी पद्धत इतिहासाकडे बघायची, समजून घेण्याची दिसून येते. ज्याने आपल्या संदर्भीय /असंदर्भीय हिंदू अभिजनवादी दृष्टीकोनाचा सर्वांत मोठा भाग व्यापून टाकला आहे.

दुसऱ्या बाजूला इतिहासात कोणत्या घटना घडल्या? इतिहासातील कोण कोण माणसे होती? ती काय करत होती? त्यांची विचार पद्धती कशी होती? ते इतिहास या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहत होते? हे आपणाला इतिहासात ज्याची ओळख ‘विज्ञानवादी पंथ’ म्हणून ओळखले जाणारे ‘बौद्ध दर्शन’ व ‘जैन दर्शन’ यांतून होते. या ज्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या सारात्मक परंपरा आहेत, त्या मध्ययुगीन कालखंडात भक्ती संप्रदायांमध्ये परावर्तित होताना दिसून येतात. यामध्ये इतिहासाची जी कल्पना केलेली आहे, ती आपल्याला ‘डेट ऑफ फुड्स’सारख्या पुस्तकातून आढळून येते. याची मांडणी रविदासांनी केली आहे. हे पुस्तक सर थॉमस मन् रो यांच्या ‘युटोपिया’ या पुस्तकासारखे भासते. एका अशा समाजाची कल्पना - ज्यामध्ये सर्व लोक समान आहेत, हे सर्व लोक सोबत असूनसुद्धा एका समता असलेल्या इतिहासाला सोबत घेऊन जगत आहेत आणि समतेच्या इतिहासाची कल्पना करत आहेत.

तर हे दोन मुख्य प्रवाह आहेत. जे इतिहासलेखनामध्ये आणि इतिहास दर्शन यांत आढळून येतात. याची खूप पूर्वीपासून भारताच्या इतिहासात सुरुवात झालेली आहे. म्हणून एकदा का संस्कृतीची व्याख्या केली की, तुमचा दृष्टीकोन तुम्ही संस्कृतीची व्याख्या/ मांडणी कशी करता, यावर अवलंबून असतो. तुमच्या मते संस्कृती नेमकी काय आहे? आणि जर तुमच्याकडून संस्कृती व्याख्या करून झाली, संस्कृतीची म्हणजे मानवी संस्कृतीची, तर त्याच्यानंतर इतिहासकार असणाऱ्याचे एक खूप महत्त्वाचे कार्य आपल्यासमोर प्रगट होण्यास सुरुवात होते. ते कार्य असं असतं की- इतिहास लिहिताना, त्याची मांडणी करताना, इतिहासकाराला हे दर्शवावे लागते की, संस्कृतीची घडण कशी होते? ती कशी बदलत जाते? त्या त्या भूप्रदेशावर कशी निर्माण झाली? संस्कृती निर्माण होण्याची कारणे शोधणे, हेही आहे.

जेव्हा तुम्ही संस्कृतीच्या निर्माणामागची कारणमीमांसा करता, तेव्हा तुम्हाला ‘अभिजनवादी इतिहासलेखन’ आणि ‘गैर-अभिजनवादी इतिहास लेखन’ यांतील फरक ठळकपणे समजायला मदत होते. या दोन्ही पद्धतीचा इतिहासाकडे पाहण्याच्या सैद्धान्तिक दृष्टीकोनात फरक आढळून येतो.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने राज्य सरकारने ‘एका दगडात अनेक पक्षी’ मारण्यात सध्या यश मिळवलं असलं, तरी हा ‘आगीशी खेळ’ ठरू शकतो. पण त्याची पर्वा कोण करतो!

मराठा आरक्षण : दुखणे खरे आहे, पण उपाय चुकतोय... मराठे, इतर मागास वर्गीय समूह एकाच जात्यात दळले जात आहेत

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, याबरोबरच त्यांच्या पुढे काय, याही प्रश्नाचा विचार व्हावा…

महाराष्ट्राचं ‘सामाजिक स्वास्थ्य’ फार काही बाळसेदार नाही, पण जे आहे तेही मराठ्यांच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनांनी धोक्यात येण्याची शक्यता आहे!

मराठ्यांची ‘शोकांतिका’ ही सबंध महाराष्ट्राचीच ‘शोकांतिका’ आहे, हे समजून घेण्याची गरज आहे!

मराठा जातीला मागास म्हणून आरक्षण मिळणे अजिबातच शक्य नाही, हे सर्वश्रुतच आहे; आणि ते आंदोलनकर्त्यांनाही माहीत आहे, पण…

..................................................................................................................................................................

मी काही तत्त्वज्ञ नाही, मी इतिहासकार आहे. आणि इतिहास या विषयात सर्वांत महत्त्वपूर्ण आणि सर्वात अवघड प्रकरण हे इतिहासाच्या बदलाला सत्य करून दाखवणे आणि त्याचे स्पष्टीकरण देणे, हे असते. एक जबाबदारी म्हणून विचार केला, तर समाजशास्त्रज्ञ म्हणून, मानववंशशास्त्रज्ञ म्हणून इतिहासाचे वर्णन करणे, हे इतिहासकाराचे काम नाही. आमचं काम हे बघणं आहे की- का? आणि कसा समाज बदलत गेला? कोण आहेत त्याचे बदलाचे घटक?

दुसरं म्हणजे अभिजनवादी लोकांनी समाज बदलवला. त्याचबरोबर असे लोक, ज्यांचा उल्लेख अभिजनवादी लोकांकडून इतिहासात केला गेला नाही, ते लोक खऱ्या अर्थाने समाज गतीने बदलवण्याच्या प्रक्रियेतील सर्वांत महत्त्वपूर्ण घटक ठरतात. म्हणून जी पुरोगामी चळवळ, प्राकृतिक आंदोलने भारतात दिसून येतात. जोपर्यंत सामान्य लोकांमध्ये हा विश्वास निर्माण होणार नाही की, तेच खऱ्या अर्थाने इतिहास निर्माण करणारे घटक आहेत, आणि फक्त इतिहासाचे बळी आहेत, तोपर्यंत ते इतिहासाचे दूत बनू शकणार नाहीत.

तर एक झाला अभिजनवादी वर्गाने लिहिलेला ‘अभिजात इतिहास’ (अभिजनवादी इतिहास) आणि एक आहे - ‘लोकप्रिय इतिहास’ (popular history), जो लोकांच्या दृष्टीकोनातून येतो किंवा ज्यास आपण म्हणतो की, तळागाळातील लोकांच्या दृष्टीकोनातून (history from below) लिहिला गेलेला इतिहास. एक असतो, ‘शिखर दृष्टीकोन’ (Top term perspective) आणि एक असतो ‘सामान्य दृष्टीकोन’ (history from below).

या दोन्ही प्रकारचा इतिहास व इतिहासलेखन यांनासुद्धा खूप मोठा इतिहास आहे. ‘अभिजनवादी इतिहासलेखन’ आणि ‘लोकप्रिय इतिहासलेखन’ यांच्यातला संघर्ष हा केवळ एका वर्ग खोलीमध्ये शिकवण्याचा विषय आहे, ही भूतकाळात घडून गेलेली घटना आहे, ही वास्तविक घडलीच नसेल, हे सर्व मानून घेणे, म्हणजे आपण आपलीच केलेली फसवणूक असेल. कारण हा संघर्ष जोपर्यंत समाजात वर्ग संघर्ष असेल, जोपर्यंत जाती-संघर्ष असेल, जोपर्यंत लिंगभेद संघर्ष असेल, जोपर्यंत तृतीयपंथी वर्गसमूहाचा संघर्ष असेल, तोपर्यंत हे दोन्ही दृष्टीकोनसुद्धा एकमेकांसमोर शड्डू ठोकून एकमेकांना लोळवण्याचा प्रयत्न करतील.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

पण खेदाची गोष्ट म्हणजे दुर्दैवाने ‘अभिजनवादी इतिहास’ हा ‘लोकप्रिय इतिहासा’पेक्षा अधिक लोकप्रिय आहे. कारण या सत्तारूढ वर्गाची समाजावरील वर्चस्ववादी पोलादी पकड. म्हणून खऱ्या अर्थाने इतिहास राज्यशास्त्राची ‘बालवाडी’ आहे.

हा इतिहास एवढा लोकप्रिय का आहे? त्याची कारणे काय आहेत? ती आपल्याला समजली पाहिजेत. जर अभिजात इतिहास एवढा लोकप्रिय नसता, तर मला तुमच्यासमोर भाषण देण्याची काहीही गरज नव्हती. आपला विजय झालाच होता म्हणायचे मग! परंतु लोकप्रिय इतिहासाचा दृष्टीकोन लोकप्रिय नाही, म्हणून एक प्रकारे तो आपला पराभवच आहे. यासाठी हे समजून घेणे खूप महत्त्वाचे ठरेल की, अभिजात दृष्टीकोन काय आहे? म्हणजे ज्या शत्रूला तुम्हाला पराभूत करायचे आहे, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न.

अभिजनवादी इतिहास हा नेहमी शासक वर्गाचा राहिला आहे. त्याला नेहमी राज्यामार्फत उत्तेजन दिले गेले आहे. तो शासक वर्गाच्या नियंत्रणात आणि अधिपत्याखाली राहत आला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजच्या काळातही तेच चालू आहे. आपणास आढळून येईल की, अभिजनवादी इतिहास हा खऱ्या अर्थाने वर्चस्वादी कथांचा इतिहास आहे. जो माध्यमाद्वारे तुमच्या-आमच्यात फार शिताफीने पेरला जातो. ज्याला ग्राम्ची (Antonio Gramsci- Italian Neo Marxist writer) ‘शासक वर्गाच्या सिद्धान्ताचा मार्ग’ म्हणून संबोधतो.

आता मी अभिजनवादी इतिहासलेखनाच्या मुख्य वैशिष्ट्यांचा शोध घेण्याकडे वळतो. आपण अभिजनवादी इतिहासलेखनाला एका वेगळ्या संज्ञात गुंफूया – ‘हिस्टरीऑलॉजी’ (Historology), म्हणजे इतिहासशास्त्र. यात तुम्हाला इतिहास आणि मिथक यांचे मिश्रण दिसते. एका अर्थाने मूलतः तो पौराणिक इतिहास (mythological history) आहे. जो विद्यार्थ्यांना सांगितला जातो, लोकांना सांगितला जातो आणि पुढे पुढे अनेक घटकांपर्यंत पोहोचवला जातो.

जेव्हा तुम्ही त्याला ‘इतिहासशास्त्र ’(Historology) असं म्हणता, तेव्हा त्यात तुम्हाला पोवाडा, धर्मशास्त्र, महाकाव्य, वीरकथा आढळून येतील. आणि भारतीय इतिहास तुम्हाला राजकीय इतिवृत्तांतात /बखरीमध्ये सापडेल. हा इतिहास लिहिणारे ‘दरबारी इतिहासकार’ असत. त्यांनी इतिहासाचे मोठे मोठे ग्रंथ लिहिले. मध्ययुगीन कालखंडात आणि प्राचीन कालखंडात लिहिलेला राजे-महाराजे यांचा इतिहास केवळ त्यांचेच गुणगान करताना दिसतो. मग तो पोवाडा असो, किंवा स्वच्छंद इतिहासकार असो.

या पद्धतीने लिहिलेला इतिहास हा खूप जुना इतिहास आहे. तो होमरच्या ‘इलियड’ आणि ‘ओडिसी’पर्यंत जातो. आपल्या देशात ‘रामायण’ व ‘महाभारत’ यांसारख्या महाकाव्यातून किंवा पौराणिक कथा- पुराणातून इतिहासाचे दर्शन घडून येते. प्राचीन काळात किंवा प्राचीन काळातील भाषेच्या संदर्भात त्याला ‘आख्यान’ म्हटले गेले आहे. अशाच प्रकारचा इतिहास तुम्हाला बखरी, शायरीमध्ये दिसून येतो.

आपल्याकडे ९० टक्के ‘अभिजातीय वर्गा’चाच इतिहास आढळून येतो. सर्वसाधारणतः आपल्या इथे असणारे कष्टकरी, शेतकरी हे युरोपातील कामगार व शेतकऱ्यांच्या तुलनेत अशिक्षित दिसून येतात. इथे शिक्षणाची परंपरा दिसत नाही, अक्षरओळख नसे, लोकांना शिक्षण दिले जात नसे, त्यामुळे साक्षरता नव्हती. परिणामी या लोकांची कुठलीही लिखित साधने दिसत नाहीत. युरोपमध्ये पंधराव्या व सोळाव्या शतकानंतर एक लाट आली आणि साक्षरतेकडे ख्रिश्चन सुधारकांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की, युरोपियन इतिहासात आपल्याला खूप सारे कामगार वर्गाचे, शेतकरी वर्गाचे व कारागीर /बलुते यांचे दस्तावेज पाहायला मिळतात.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने राज्य सरकारने ‘एका दगडात अनेक पक्षी’ मारण्यात सध्या यश मिळवलं असलं, तरी हा ‘आगीशी खेळ’ ठरू शकतो. पण त्याची पर्वा कोण करतो!

मराठा आरक्षण : दुखणे खरे आहे, पण उपाय चुकतोय... मराठे, इतर मागास वर्गीय समूह एकाच जात्यात दळले जात आहेत

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, याबरोबरच त्यांच्या पुढे काय, याही प्रश्नाचा विचार व्हावा…

महाराष्ट्राचं ‘सामाजिक स्वास्थ्य’ फार काही बाळसेदार नाही, पण जे आहे तेही मराठ्यांच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनांनी धोक्यात येण्याची शक्यता आहे!

मराठ्यांची ‘शोकांतिका’ ही सबंध महाराष्ट्राचीच ‘शोकांतिका’ आहे, हे समजून घेण्याची गरज आहे!

मराठा जातीला मागास म्हणून आरक्षण मिळणे अजिबातच शक्य नाही, हे सर्वश्रुतच आहे; आणि ते आंदोलनकर्त्यांनाही माहीत आहे, पण…

..................................................................................................................................................................

एक प्रकार असतो, इतिहास अनुमानाने लिहिणे आणि दुसरा असतो, दस्तावेजांच्या आधारे इतिहास लिहिणे. या दोन्ही इतिहासात आपल्याला खूप मोठे अंतर दिसून येते. युरोपियन इतिहासलेखनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय इतिहासात त्याचे संकेत पाहावयास मिळतात. ते सर्व युरोपमधून येताना दिसतात.

आपल्याकडे ती मुद्रण/ प्रकाशन संस्कृती १९व्या शतकापासून विकसित होण्यास सुरू झालेली दिसून येते. त्याअगोदर आपल्याकडे सर्व संस्कृती ही मौखिक परंपरेची होती. आपल्याकडे लोकप्रिय इतिहासाची संदर्भीय साधने त्यांच्या तुलनेत कमी होती. त्यामुळे आपल्याकडे जो इतिहास लिहिला गेला, त्यातला ९० टक्के सुखवस्तू वर्गाने लिहिलेला आहे. हा सुखवस्तू वर्ग हाच बव्हंशी शासक वर्ग असायचा.

विसाव्या शतकात पोहोचेपर्यंत आपल्याला अशा इतिहासाची ओळख करून दिली जात असे की, जो इतिहास ‘लोकप्रिय इतिहास’ आहे. परंतु प्रत्यक्षात काळजीपूर्वक निरीक्षण केलं, तर लोकप्रिय इतिहासाच्या नावाखाली ‘अभिजनवादी इतिहास’ आपल्या माथ्यावर मारण्याचा प्रकार आहे, ही अक्कल येण्यास सुरुवात होते.

‘राष्ट्रवादी इतिहास’ राष्ट्राच्या इतिहासाबद्दल असतो. राष्ट्रवादाबद्दल आहे, परंतु, प्रत्यक्षात जेव्हा तो भारतमाता विषयी बोलतो, किंवा भारत देशाबद्दल बोलतात, राष्ट्राबद्दल बोलतात, राष्ट्रवादाबद्दल बोलतात तर त्याच्यामध्ये त्या देशातल्या लोकांचा समावेश असतो की नसतो?

१९व्या शतकात गुरुदेव रवींद्रनात टागोर यांनी ‘भारतमाता’ ही संकल्पना सर्वांत अगोदर  मांडली होती. ते म्हणाले- हे भारतमातेचे मंदिर पहा, भारतमाता अश्रू ढाळतेय आणि याच संकल्पनेला मध्यवर्ती सूत्र करून बंकिमचंद्र चटर्जी यांची खूप सुप्रसिद्ध कादंबरी आहे. मला असं वाटतं, त्या कादंबरीने आपल्या देशातील जातीयवाद, जातीयवादी विचारधारेला खूप उत्तेजन मिळाले. त्या कादंबरीचे नाव आहे – ‘आनंदमठ’! त्यावर एक चित्रपटही बनवला गेला होता.

त्यात भारतमातेच्या मंदिरावर प्रश्न उपस्थित केला जातो, तर भारतमाता ही काय एखादी मूर्ती आहे? भारतमाता म्हणजे देशातील लोक आहेत का? तर राष्ट्रवादी इतिहासलेखन तुम्हाला एक गैर-अभिजनवादी इतिहास म्हणून प्रयत्न करताना दिसून येतं. परंतु जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनाचे काळजीपूर्वक वाचन करा, आपलं डोकं व्यवस्थित जागेवर ठेवून वाचन करा की, खरंच राष्ट्रवादी तुमच्या राष्ट्रासंबंधी व स्वतःच्या इतिहासाबद्दल काय काय सांगू इच्छितात?

आदर्श राष्ट्र व वास्तववादी राष्ट्र यांत खूप मोठा फरक असतो. जसे इतिहासात आदर्शामध्ये आणि व्यवहारात/ वास्तवतेत खूप मोठा फरक असतो. वास्तववादी इतिहास हा आदर्शवादी इतिहास, ऐतिहासिक दृष्टीकोन या खूपच वेगळा असतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

हे चिंतन मला अभिजनवादी इतिहासासंबंधीच्या दुसऱ्या महत्त्वाच्या निरीक्षणावर घेऊन जातं. तर, इतिहासासंबंधी अभिजातवादी दृष्टीकोन ही अभिजात्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांच्या डोक्यातून बाहेर पडलेली कल्पना आहे. लिहितं कोण, तर बुद्धिजीवी लिहितात. प्रत्येक युगात, प्रत्येक समाजात बुद्धिजीवी वर्ग असतोच असतो. तो लिहितो. त्याच्याकडे सिद्धान्त असतात, मुबलक वेळ असतो, लिहिण्याची साधने असतात, सहसा तेच लोक लिहीत असतात. तो नेहमी स्वतःचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी व स्वतःच्या अस्तित्वाच्या औचित्यासाठीच इतिहास लिहिल आणि आपल्या वर्गाचे गुणगानच करत राहील…

आम्हीच सर्वांत श्रेष्ठ आहोत, आमची जात सर्वांत श्रेष्ठ आहे, आम्ही माननीय /मोठे आहोत, आम्ही फार ज्ञानी आहोत, आमच्यातच ज्ञानाचे गुण सापडतील, आम्ही फलाने फलाने आहोत, आम्हीच पवित्र कुळातले आहोत, आम्ही उच्च आहोत आणि हे जे इतर जातीतले आहेत ते नीच कुळातील आहेत, यांना धर्माचा इतिहास कुठे ठाऊक आहे? त्याची तुम्हाला पुष्कळ उदाहरणे सापडतील.

तुम्ही लोक अभिजनवादी इतिहासलेखनाची ओळख करून घेत नाही. तुम्ही व्हॉट्सअप विद्यापीठात शिक्षित होताय. काय सांगतं व्हाॅट्सअ‍ॅप? - नेहरूंचे वडील मुसलमान होते. कुठे वाचलं? व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो आला होता. गांधींना पाहिलं पोरींबरोबर नाच-गाणं करताना! एका शाळेत ती चित्रफीत चालवली गेली, तिथून व्हॉट्सअ‍ॅपवर. ती कुठल्या तरी मेजवानीमधील चित्रफित (व्हिडिओ) होती, ज्यामध्ये गांधींसारखी वेशभूषा करून कोणीतरी तरुणीसोबत नृत्य करताना दिसून येत होतं, सिगारेट ओढताना दिसून येत होतं. काहीही बोलायचं आपलं! खूप सारी वैशिष्ट्ये आहेत या व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठाची!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

म्हणून जेव्हा-केव्हा तुमच्या हाती एखादे इतिहासाचे पुस्तक लागेल, आणि जर तुम्हाला असे आढळून आले की, इथे अतिशयोक्ती करून इतिहासलेखन झालंय, तर तुम्ही समजून चालायचं की, तुमच्या हातात जे इतिहासाचे पुस्तक पडले आहे, ते अगदी खात्रीशीर अभिजनवादी दृष्टीकोनातून लिहिलं गेलेलं आहे. त्यासाठी तुम्ही पुढील काही सूत्रं लक्षात ठेवा -

१) घटनांना खूप अतिरंजित करून सांगितलेलं असेल, त्याला खूप महत्त्व दिलेलं असेल. उदा., युद्धवर्णन. युद्धवर्णनांवर आधारित इतिहास हा ‘राजकीय इतिहासा’चाच एक भाग असतो, तो ‘अभिजनवादी इतिहासलेखना’साठी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असतो.

२) केवळ एकाच्या वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेतून हा इतिहास निर्माण झाल्याचे भासवण्यासाठी त्या इतिहासावर जास्त भर देण्याला आम्ही इतिहासकार लोक असे म्हणतो - महान व्यक्तींच्या इतिहासाचा सिद्धांत इतिहास कसा रचला जातो? इतिहास हा थोर, महान व्यक्ती, महान राजे, महान सुलतान, महान बादशहा यांच्या वैयक्तिक संकल्पनांमुळे घडून येतो. हे सर्व समजून घेणे फार महत्त्वाचं आहे.

३) इतिहासाकडे मुळात प्रामुख्याने राजकीय, लष्करी आणि मुत्सद्दीगिरी या दृष्टीकोनातून बघितले गेले आहे. आजही तुम्हाला जास्तीत जास्त वर्णने लष्करी इतिहास, राजकीय इतिहास आणि मुत्सद्दी इतिहास यांचीच सापडतील. या पद्धतीचे इतिहासलेखन ‘अभिजनवादी इतिहासलेखना’तच पाहायला मिळते.

४) महान व्यक्तींच्या इतिहासाचा सिद्धान्त हा खूप जुना ‘अभिजनवादी सिद्धान्त’ आहे. या इतिहासात राजे-महाराजे यांचा गौरव आणि त्यांच्या वैयक्तिक इच्छेनुरूप बघण्याची इतिहासाची पद्धत हा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसतो. हा इतिहास कसा घडून येतो? अमुक राजा जेव्हा चांगले वाटतं, तेव्हा चांगलंच होतं. जेव्हा तमुक राजाला वाईट वाटतं, तेव्हा वाईट होतं.

५) तुम्हाला नेहमी असे आढळून येईल की, अभिजनवादी इतिहासलेखनात सर्वसाधारणपणे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहासाकडे दुर्लक्ष केले जाते. अभिजनवादी इतिहासकार सामाजिक संघर्ष आणि सांस्कृतिक संघर्ष याकडे पुरेसे लक्ष देताना दिसून येत नाहीत. हासुद्धा अभिजनवादी इतिहासलेखनाचा अतिशय महत्त्वपूर्ण लक्ष पैलू लक्षात घेणे गरजेचे आहे.

६) भारतीय इतिहासलेखनाच्या संदर्भात, अभिजनवादी इतिहास हा राजकीय कारणास्तव धर्म आणि धार्मिक संघर्ष यांचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करताना दिसून येतो. अभिजनवादी नेहमी भूतकाळातील धार्मिक संघर्षालाच ठळकपणे अधोरेखित करताना दिसतील, कारण वर्तमानकाळातील त्यांचे राजकीय स्वार्थ. धार्मिक इतिहासाचे महत्त्वाचे काम म्हणजे तुमचे रक्त खवळवणे. त्यात वास्तववादी विचार नसतो, चिकित्सा नसतो वा चिंतनशील मार्ग नसतो.

७) अभिजनवादी इतिहासाचा सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे विशेषतः १९व्या शतकात देशाची कल्पना म्हणून उदयास आलेली संकल्पना. कल्पनाही की- देश कल्पना ही इतिहासाचे वाहन आहे. असे असणे हे भूतकाळातील सुवर्णयुगाचा मार्ग आणि शोध प्रशस्त करण्याचे काम करते.

हा अभिजनवादी इतिहास आपल्या स्वतःच्या विचारसरणीच्या फायद्यासाठी इतिहासाची संपूर्णपणे तोडफोड करताना दिसून येतो. आणि हेच तुम्हाला सांगतील की, तुम्ही इतिहास लिहा, पण त्यात वैचारिक मुद्दे, विशिष्ट विचारधारा असता कामा नये. कारण विचारधारा तयार करण्याचे काम आमच्यावर सोपवा ना! तुम्हाला ते काम करायची काय गरज! ते असे ढोंग करतील की, त्यांची मांडणी ही वैचारिक नाही, विशिष्ट विचारधारेची नाही.

.................................................................................................................................................................

अनुवाद - प्रा. प्रमोदकुमार कृष्णराव जायभाये (उपप्राचार्य/ इंग्रजी विभागप्रमुख, संत रामदास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, घनसावंगी)

pramodjaybhay@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......