मानवी जगण्याची एकूण होरपळ आणि प्राथमिक प्रेरणांची रटरट व्यक्त करण्यासाठी ‘आधुनिक कथे’सारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही
ग्रंथनामा - झलक
विश्राम गुप्ते
  • ‘उगी उगी मर्दानगी’ या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Sat , 03 February 2024
  • ग्रंथनामा झलक सतीश तांबे Satish Tambe उगी उगी मर्दानगी Ugi Ugi Mardangi

प्रसिद्ध कथाकार सतीश तांबे यांचा ‘उगी उगी मर्दानगी’ हा आठवा कथासंग्रह नुकताच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. यात ‘बुडला रे डुबला डुबा’, ‘(Y)’ आणि ‘उगी उगी मर्दानगी’ या तीन दीर्घकथांचा समावेश आहे. याशिवाय ‘मी का लिहीत नाही’ हा तांबे यांनी १९८७ साली अभिरुचिमध्ये लिहिलेल्या लेखाचा समावेश आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ‘सतीशच्या कथेची कथा’ हा विश्राम गुप्ते यांचा त्यांच्या सुरुवातीच्या पाच कथासंग्रहांतील कथांविषयीचा आणि त्यांच्या अनुषंगाने कथाकार तांबे यांच्याविषयीचा तब्बल ५९ पानांचा आणि १५, २३५ शब्दांचा लेख आहे. त्या लेखाचा हा संपादित वानवळा…

.................................................................................................................................................................

आजपर्यंत त्याचा एक कवितासंग्रह, सात कथासंग्रह, आणि समीक्षेची दोन अशी एकूण दहा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्याच्या पुस्तकांचा क्रम असा: ‘छापल्या कविता’, (कवितासंग्रह) ‘राज्य राणीचं होत’, ‘माझी लाडकी पुतना मावशी’, ‘रसातळाला ख.प.च.’, ‘मॉलमध्ये मंगोल’, ‘ना.मा.निराळे’, ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’, ‘काम तमामऽवाघा बॉर्डर’ (कथासंग्रह), ‘लेखाजोखा’ आणि ‘हळक्षज्ञ’ (समीक्षा).

दहा पुस्तकं, त्यातलं प्रत्येक आशयाने भारी आणि तेसुद्धा तीनचार वर्षांच्या अंतराने छापून येणं. म्हणजे सतीश नियमित लिहिणारा लेखक आहे. मात्र त्याला बहुप्रसवी लेखक म्हणता येत नाही.

जाहिरातीच्या क्षेत्रात तो काम करतो. त्यासाठी तो मुंबईच्या विविध स्टुडिओत जातो. म्हणून तो रोज मांड जमवून लिहू शकत नसेलही, पण वर्षाकाठी त्याच्या तीन ते चार दमदार कथा दिवाळी अंकात असतातच. त्या मराठी साहित्याच्या विश्वात ‘ऑफबिट’ ठराव्यात, अशा आशय आणि शैलीने संपन्न असतात. या कथांचं वेगळेपण त्यांच्या शीर्षकांपासून सुरू होतं.

‘मला शीर्षक सुचल्याशिवाय कथा लिहिता येत नाही’ असं तो सांगतो. कथेच्या आशयाबद्दल आणि घाटाबद्दल अत्यंत सजगपणे विचार करणारे लेखकच शीर्षकापासून कथेचा विचार करत असावेत. लिहिण्यापूर्वीच शीर्षक ठरलं, तर लेखनाचा फोकस आपोआपच शार्प होत असावा. हा फोकस फक्त शीर्षकामुळेच येतो, हे म्हणणं मात्र पुरेसं नाही. लिखाणाचा फोकस शार्प होण्याचं दुसरं कारण म्हणजे, तुम्ही जे बघता ते कितपत शार्प नजरेनं याला महत्त्व आहे. लेखक म्हटला की निरीक्षण आलंच. पण त्याचेही खूप प्रकार आहेत.

जे आहे ते बघून ते जसं आहे तसं तंतोतंत आणि तपशीलवारपणे सांगणं हा एक सोपा प्रकार आहे. याला आपण वास्तववादी लिखाण म्हणतो. सतीशच्या कथा वाचताना तो केवळ वास्तववादी निरीक्षणं नोंदवत नाही हे कळतं. त्याच्या शार्प नजरेला वास्तवाच्या वरवरच्या पापुद्रयांखाली दडलेलं काहीतरी खोलवरचं दिसत असतं. म्हणून त्याच्या कथा इतक्या अर्थपूर्ण होतात. 

घर बांधताना आधी प्लॉट, मग घराचा नकाशा, मग सिमेंट, वाळू, लोखंड, मग खोदकाम, बांधणी, सजावट आणि पझेशन हे टप्पे सतीश त्याच्या प्रत्येक कथेत वापरतो. चांगला आर्किटेक्ट घराची जशी निर्दोष रचना करतो, तशी सतीश आपल्या एकेक कथांची करतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सतीशने आजतागायत सुमारे पन्नासेक कथा लिहिल्या असाव्यात. थोड्या जास्तच, पण कमी नाही. सतीशचे एकूण सात कथासंग्रह आहेत. त्यापैकी पहिल्या पाच प्रकाशित कथासंग्रहात समाविष्ट असलेल्या प्रातिनिधिक कथांचं मी पुनर्वाचन केलं.

त्याचा पहिला कथासंग्रह ‘राज्य राणीचं होतं’ हा २००४ साली प्रकाशित झाला. त्यापूर्वी वीस वर्षांपासून सतीश कथा लिहीत होता. पण त्याला त्या प्रकाशित करायची घाई नव्हती. अशी घाई न करणं, आपलं घोडं पुढे न दामटणं त्याच्यासारख्या निःसंग माणसालाच शोभून दिसतं.

सतीशची पहिली कथा १९८३च्या मे-जूनमध्ये ‘अनुष्टुभ’च्या अंकात प्रकाशित झाली. कथेचं नाव आहे ‘जोडपेपण’. स्त्री-पुरुष संबंधावरची ही कथा नव्याने लग्न झालेल्या जोडप्याची आहे. नवरा-बायको नात्यातली नव्हाळी संपते आणि एकमेकांना सर्वस्व देण्यास आतुर झालेली जगातली कोट्यवधी जोडपी कालांतरानं आपआपल्या खाजगी आवडीनिवडींमुळे स्वतःच्या एकटेपणाच्या तुरुंगात स्वतःला डांबून घेतात. स्त्री-पुरुषांच्या विसंवादी नात्याची ही शोकांतिका अपवाद नाही, तर नियम आहे. 

सर्वसमावेशकता हा सतीशच्या एकूण कथांचा डोळ्यात भरणारा गुण आहे. काहीच नाकारू नका, सगळ्याचा स्वीकार करा, ही आत्मजाणीव सतीशला त्याच्या वयाच्या तिशीतच आली. स्त्री-पुरुषाच्या मनातल्या परस्परांविरुद्धच्या अढी, त्यांच्या मनाचं अंधारं पर्यावरण, तिथे घटक्यात उभे होणारे तातडीचे संघर्ष आणि घटक्यात विरून जाणारे त्वेष आणि प्रेमाचे आविर्भाव, आविर्भावच... या सगळ्या मानवी विचार-विकारांचं भान सतीशला त्याच्या पहिल्या कथेपासून म्हणजेच चाळीस वर्षांपूर्वीच आलं होतं.

ज्या मोकळ्या जगण्याबद्दल सतीश समरसून लिहितो, तसं जगणं आपल्याला शक्य होईल का, असा प्रश्न मला सतीशच्या कथा वाचताना पडतो. सतीशचा मुक्ततावाद एक साहित्यिक पवित्रा नसून, तो त्याच्या हाडांच्या आत मुरून गेलेला विचार आहे. हा मोकळेपणा त्याच्या रक्तवाहिन्यांतून वाहत असतो.

सर्वसमावेशकता हीच खरी नवी नैतिकता आहे. दारू न पिणं, जुगार न खेळणं किंवा चोरी न करणं, ही जुनी नैतिकता झाली. ती वाईट नाही, पण फक्त तिच्या भरवशावर आज कुठलाही लेखक नैतिकतेचं चिरेबंद बांधकाम करू शकणार नाही. नैतिकतेबद्दल चढ्या आवाजात बोलायची बऱ्याच लेखकांना आज खोड जडलेली आहे. पण आपल्या आवाजाचा व्हॉल्यूम जराही न वाढवता सतीश मस्त जगत असतो, सभोवताली बघत असतो आणि ते आपल्याला गोष्टीरूप सांगत असतो. या शांत, जराशा लाजाळूच म्हणा ना, नैतिकतेची सुंदर रूपककथा म्हणून मला त्याची ‘नाकावरून स्वभाव सांगणाऱ्याची गोष्ट’ फार आवडते.

एक सुशिक्षित बेकार तरुण कल्पकपणे कुडमुड्या ज्योतिषी होतो. हस्तरेषा, किंवा पत्रिका न बघता तो माणसांचं भविष्य त्यांच्या नाकाच्या ठेवणीवरून सांगू लागतो. हे अगदी भन्नाटपणे कथेत येतं.

आपला स्वभाव माणसांच्या सहवासाने करप्ट होतो. त्याचं नैतिकपण राखायचं असेल, तर निसर्गाकडे परतून जा, हे जगातल्या एकूण एक रोमँटिक कवी, लेखक आणि तत्त्ववेत्त्यांनी सांगितलेलं सत्य सतीशला या वरवर आचरट पण खोलवर अर्थपूर्ण कथेत सांगावसं वाटलं आहे. या कथेची ओरिजनॅलिटी अपूर्व आहे. तिच्यातली निरीक्षणं फक्त ज्याला बैलाच्या पाठीवरची थरथर बघून आनंदाचे भरते येतात, असा लेखकच करू जाणे.

सर्वसामान्य वाचकांना बुद्धिवान करण्याचा वसा घेतलेल्या श्याम मनोहरांना जशी फिक्शन लिहिताना समाज प्रबोधनाची ऊर्मी येते, तशी काही सतीशला येत नाही. त्याच्या मनात वाचकाबद्दल कुठलाही तुच्छ भाव दिसत नाही. कारण त्याला बोलघेवड्या प्रबोधनाच्या मर्यादा माहीत आहेत, आणि माणसाच्या मनाचा असीम थांग सुद्धा लागलेला आहे. कसं, ते त्याच्या ‘बिनबायांच्या जगात ब्रह्मचाऱ्याचं लग्न’ या कथेत मस्त येतं.

सतीशची ही कथा वाचताना सोवळा वाचक बिचकून जाऊ शकतो, पण या कथेकडे फक्त तर्रर्र झालेल्या मित्रांच्या अचकट विचकट बोलण्याची कथा म्हणता येत नाही. स्त्री, तिच्या आंतरिक गरजा, सेक्सची प्राथमिक प्रेरणा, पुरुषांचं धटिंगणासारखं वागणं, बोलणं, यावर अत्यंत आतून असं सतीशमधला लेखक बोलतो. त्याची खुमारी प्रत्यक्ष कथा वाचतानाच कळते.

ज्ञानाचे दोन प्रकार. एक पुस्तकी. दुसरं थेट. एक वाचून येतं तर दुसरं जगून. म्हणजे नीट जगून. सतीश जगण्याचं काम मनस्वीपणे करत असल्याने त्याला पंडित होण्याची गरज नाही. अशा विफल पांडित्याचा आणि सफल जगण्याचा अनुभव म्हणजे ‘पठारावर अमर’ ही मित्रकथा. या कथेची दृश्यात्मकता अप्रतिम आहे. कथेतलं हिरवंगार, चोहीकडून क्षितिजापर्यंत धावत जाणारं ते पठार वाचकाला वेडं करतं. ही कथा जर शंभर जणांनी वाचली, तरी तिचा तात्त्विक आशय त्या शंभरांपैकी शंभर वाचकांना पोहोचेल असं वाटतं.

ज्या सत्तेचं आपल्या सगळ्यांना सुप्त कौतुक असतं त्या सत्तेतून काय साध्य करायचं असतं? अधिक सत्ता की अधिक आनंद? सत्तेतूनसुद्धा आंतरिक आनंदाचे मळे फुलवता येतात, असं अनोखं तत्त्व जर कोणी सांगितलं, तर आपल्यासारखे कुंपणावर बसणारे सुद्धा सत्ताकांक्षी होतील. सतीशची ‘राज्य राणीचं होतं’ ही कथा सत्तेचा सांस्कृतिक परीघ वाढवणारी नीतीकथा आहे. सत्ता म्हणजे फक्त स्पर्धा आणि हिंसा नाही तर सत्तेच्या परिघात उत्कट प्रेम, उत्स्फूर्तता, रसिकता, प्रणय आणि तरलता अशा सगळ्या लोभस गुणांचा सुद्धा अंतर्भाव होऊ शकतो, हे सतीश इतकं भन्नाट शैलीत सांगतो की, आपण आधुनिक कथा वाचतोय, पुराणकथा वाचतोय की, परीकथा हा प्रश्न वाचकाला पडू शकतो.

सतीशच्या ‘जोडपेपण’ या कथेतला नवरा-बायकोचा तो क्रूर विसंवाद कुठे, अन् या कथेतला राणोबा आणि त्याची मेहुणी या दोघांनी मिळून एकच क्षण सुंदर करण्याची ही भावना कुठे? ही प्रेमकथा वाचल्यानंतर ती सत्यनारायणाच्या कथेसारखी घरोघरी सांगितली जावी, असं मी सतीशला भारावून कळवलं होतं. असो.

 

जगातल्या समग्र कडकोबा राण्यांनी राणोबा व्हावं आणि जगातल्या समग्र राणोबांनी राणोबाच राहावं, ही विश्वात्मक प्रार्थना करून मी सतीशच्या दुसऱ्या कथा संग्रहाकडे वळतो. त्याचं नाव आहे : ‘माझी लाडकी पुतना मावशी’.

माणसं जशी प्रेमात पडतात तशी ती द्वेषातसुद्धा पडतात. प्रेमाच्या माणसाला मिठी मारावीशी वाटते, तर ज्याचा द्वेष वाटतो त्याचा खून करावासा वाटतो. हो खूनच. पण हा विचार आपण आपल्यापासून सुद्धा लपवून ठेवतो. आपल्यातला पोलीस आपल्यातल्या चोराला धरतो, पण आपल्यातला पोलीस इन्स्पेक्टर आपल्यातल्या खुन्याला धरू शकत नसतो. याचं कारण आपण खुनाचा विचार आपल्या नकळत करतो. चोरीचं तसं नसावं. ती करणं गुन्हा असला तरी पाप नाही. खून मात्र पाप आहे. अशा या न केलेल्या मानसिक खुनाची गुंगवणारी कथा म्हणजे सतीशची ‘खुनाच्या हद्दपारीची कथा.’

सतीशच्या कथा मानवी भावनांचं थेट प्रक्षेपण करतात. त्यात देशीवाद, स्त्रीवाद, परिवर्तनवाद इत्यादी-ज्यांची आज मराठी साहित्यात चलती आहे अशा - विचारधारांची मंचीय सरमिसळ नसते. सगळ्या विचारधारांचा अंत झाल्यानंतरच मानवी अस्तित्वाचं/असलेपणाचं कूट सुरू होतं ही कदाचित सतीशची छुपी तात्त्विक धारणा असू शकते. छुपी अशासाठी की, याबद्दल त्याने आजपर्यंत कधी कोणाकडे वाच्यता केलेली दिसत नाही. कुठलेही वैचारिक चष्मे न वापरता जगाकडे थेट बघणाऱ्यांची आणि तसंच जगणार्‍यांची हीच विशेषता असते. चर्चा कमी, जगणं जास्त. म्हणजे एकदम जग्गी!

सतीश अनुभवाचे विविध स्तर खूप बारकाईने जोखत जातो. पण त्याच्या कथांचा भ्रमणमार्ग बघितला, तर त्या सुरचिततेपासून गोष्टीवेल्हाळ होताना दिसतात. म्हणून त्याच्या सुरुवातीच्या कथा मला नंतरच्या कथांच्या तुलनेत अधिक संकल्पनाधिष्ठित आणि रचनेच्या अंगाने टाइट वाटतात. सतीशचं निवेदनशैलीच्या अंगाने होणारं हे ट्रान्सफॉर्मेशन महत्त्वाचं आहे. सुरचिततेपासून त्याचा प्रवास उत्स्फूर्ततेकडे, नेमकेपणापासून किंचित बोलघेवडेपणाकडे, आणि कथा ‘लिहिण्यापेक्षा तिची गोष्ट सांगण्याकडे’ हे ट्रान्सफॉर्मेशन आहे, असं मला वाटतं.

 

त्याच्या तिसऱ्या कथा संग्रहानंतरच्या म्हणजे ‘रसातळाला ख.प.च.’मध्ये येणाऱ्या कथांचा अनुभव पुरेसा सार्वत्रिक, आणि त्यांची निवेदन शैली मला अघळपघळ, जास्त बोलकी वाटते. मानवी अनुभव दोन अंगाने सांगता येतो. व्यवस्थित रचून किंवा अघळपघळ बोलून. पहिल्या प्रकाराला मी कथा म्हणतो, दुसऱ्या प्रकाराला गोष्ट. कथा लिहिली जाते. गोष्ट सांगितली जाते. असो, सध्या आपण सतीशच्या कन्सेप्चुअल कथांबद्दल बोलतोय. म्हणजे या जगातलं एखादं तत्त्व सतीशला उमगतं. मग त्याभोवती कोळी जसा जाळं विणतो, तसा सतीश आपल्या कथेचं जाळं विणू लागतो. जाळ्यात जसा कोळी मध्यवर्ती असतो, तशी सतीशच्या कथेत ही संकल्पना मध्यवर्ती असते.

जगाकडे नीट बघणाऱ्याला जग हे एखाद्या दृश्यासारखं प्रतीत होतं. ते तसं न बघणाऱ्याला मात्र या जगात फार काही दिसत नाही. आपण जेव्हा या भोवतालच्या जगाकडे एका काल्पनिक फ्रेममधून बघू लागतो, तेव्हा या दृश्यसमृद्ध जगाकडे आपण अचंबित होऊन बघू लागतो, आणि बघता बघता आपलं भान हरपतं. (त्या जग्गीसारखं) जगणं म्हणजे भान हरपणं. ते न हरपता जगणं म्हणजे रखडणं.

जेव्हा डोळ्यांना हे दृश्यच दिसेनासं होतं, तेव्हा जगण्याचं प्रयोजनच उरत नाही. कारण जे बघतो, ते जर दुसर्‍याला आपण सांगू शकत नसू, तर बघायचं तरी कशाला, आणि जगायचं तरी कशाला, असा प्रगल्भ प्रश्न ‘होवो होवो सृष्टी दृष्टीआड’ या कथेतल्या रसिक आजोबांना पडतो. तो फक्त सिनेमा करणाऱ्या तरुण विदिशाला नीट कळतो.

या कथेत सतीशने निसर्ग, फ्रेम, उत्स्फूर्तता, आंतरदृष्टीचा विकास, हेन्री डेव्हिड थोरो या अमेरिकन निसर्ग तत्त्ववेत्त्याचा संदर्भ, बघणं म्हणजे जगणं आणि जगणं म्हणजेच बघणं, असे त्याला आवडणारे विविध फिलॉसॉफिकल विचार सहज सिच्युएशन्समधून खुलवले आहेत. त्यात दोन पिढ्यांचा सुंदर समन्वयसुद्धा बघायला मिळतो. सिनेमा सृष्टीत काम करणार्‍या, उत्तम आधुनिक संवेदना जोपासणार्‍या ऑफबिट विदिशाला आजोबाच्या वयाच्या माणसाशी नीट संवाद करावासा वाटतो. हे खूप छानपणे कथेत येतं.

माणसाचं मोल नेमकं कसं जोखायचं? त्याने कमावलेल्या स्थावरजंगम इस्टेटीवरून की, त्याच्या मनाच्या समृद्धीवरून? इस्टेट करणाऱ्या, नाव कमावणाऱ्यांनाच जग किंमत देतं, आणि सच्च्या माणसांची सच्चाई न ओळखताच त्यांना हिडिसफिडिस करतं. माणूस म्हणजे त्याचा जमीनजुमला की त्याचं मन? एक सनातन प्रश्न. त्यावर सतीश कायम विचार करत असतो. त्याचा कौल अर्थात सच्च्या माणसाच्याच बाजूने असतो. पण तरी अशा सच्च्या सुंदर माणसाचा होणारा अपमान तो माणूस म्हणून थांबवू शकत नाही. लेखक म्हणून मात्र त्या वेदनेला तो शब्द देतो.

गरीब दिसणाऱ्या पण समृद्ध मनाच्या माणसाला भिकारडं समजणं, आणि श्रीमंत असणार्‍या भणंग मनाच्या माणसांना मान देणं, हा या जगाचा नियम आहे. त्यात यापुढे कुठलाही बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. या अन्यायातूनच विश्वाचा तोल जातो. सतीशसारखे लेखक तो आपल्या लेखनातून सांभाळतात. ‘तीन तिघाडा’ ही कथा विश्वाचा ढासळलेला तोल सावरण्याची कथा म्हणून मला मौलिक वाटते.

ज्याला अपमानाचा सखोल अनुभव असतो तोच अपमानित माणसांबद्दल नीट लिहू शकतो. अपमान ही भावना तशीही समजावून घ्यायला मानसन्मान या भावनेच्या तुलनेत अवघडच आहे. अशा अवघड व आव्हानात्मक भावना ग्रीक देव अ‍ॅटलस जसा पृथ्वीचा गोल खांद्यावर पेलून धरतो, तसा सतीश आपल्या खांद्यावर लीलया पेलून धरतो.

‘जे जे अवघड ते ते अनुभवून बघावे’असा सुप्त बाणा ठेवून सतीश जगाकडे बघतो, म्हणून माणसांच्या जाणिवेच्या सांदिकोपर्‍यात लपून बसलेले अनेक काळेबेरे व्यवहार तो निरखू शकतो. पुरुष म्हटला की त्याचा स्वभाव पुरुषी, आणि स्त्री म्हटली की, तिचा स्वभाव स्त्रीसुलभ असे स्टिरिओटाइप्स घेऊन आपण मोठे होतो. मात्र पुरुष स्त्रीसुलभ, आणि स्त्री पुरुषी असू शकते, या शक्यतेची पाल सतीशच्या मनात चुकचुकते. त्यातून ‘माझी लाडकी पुतनामावशी’ ही भन्नाट कथा जन्मते.

या कथेचं नेपथ्य मुंबईतली चाळ आहे. चाळ सतीशच्या कथांचं आवडतं आर्किटेक्चर आणि मानवी स्वभावाचं उत्खनन करणारी आर्कियालॉजीसुद्धा आहे. चाळीत वाढलेला माणूस, किंवा संयुक्त कुटुंबात वाढलेला माणूस हा बंगल्यात वाढलेल्या किंवा चौकोनी कुटुंबात वाढलेल्या माणसाहून अधिक सोशिक, अधिक दिलदार आणि अधिक चॅप्टर असतो, असं मला वाटतं. सतीशच्या कथा या चॅप्टरपणाला खुलवून सांगतात.

सगळ्या प्रकारची विकृती सतीश या लेखकाला स्वीकृत असल्याने तो या ‘परव्हर्शन’बद्दल समरसून लिहू शकतो. मानवी विकृतीबद्दल जयवंत दळवींनीसुद्धा खूप लिहिलं. पण त्यांची विकृती ही नग्न शरीरं, वेडेविद्रे मानसिक व्यवहार, आणि उघडावाघडा सेक्स यापुरतीच मर्यादित होती. दळवींनी आपल्या साहित्यात विकृती फोडणीसारखी वापरली. सतीश या विकृतीचीच मेन रेसिपी करून टाकतो. अशा विकृतीचा उगाच बाऊ करू नका, हे तो त्याच्या वाचकांना सुचवतो.

स्वीकृत आणि विकृत या दोन संकल्पनांमधला फरक व्यक्तिसापेक्ष असतो, असं उत्तर आधुनिक तत्त्वज्ञान मानवी लैंगिकतेचं उत्खनन करणार्‍या त्याच्या काही निवडक कथांमध्ये प्रभावीपणे सांगितलं जातं. त्याची ‘पुतनामावशी’ अशीच वरवर विकृत पण वास्तवात अर्थपूर्ण जगणारी एक स्वयंभू स्त्री आहे. पुतनामावशी म्हणजे कृष्णाला स्तनपानातून विषारी दूध पाजणारी राक्षसीण वगैरे. पण सतीशची ही मावशी स्तनपानातून स्त्री-पुरुष या द्य्वर्थी मानसिकतेच्या धूसर सीमेवर वावरणार्‍या रासवट तरुणाला, बापूला कायम माणसात आणते. त्याच्यातलं माणूसपण तेववते. पुतनामावशीसारख्या आरभाट स्त्रीची, आणि भंगून नंतर सांधलेल्या बापूची कथा सतीशच लिहू जाणे.

वाकडी लैंगिकता, ट्रान्सजेंडरचे मनोव्यापार, स्त्री-पुरुषांच्या कोंडलेल्या वासना आणि त्यांचा अनपेक्षित असा फसफस आविष्कार, त्यातून निर्माण होणारे मानवी अस्तित्वाचे पेच इत्यादीवर सतीशने किमान पंधरा ते वीस प्रत्ययकारी सेक्सकथा लिहिल्या आहेत. त्यांचं वेगळं संकलन करून टॅबू मानल्या गेलेल्या भल्याबुऱ्या सेक्सला सतीशने कसं हाताळलं, यावर खूप सांगता येण्यासारखं आहे.

जन्मल्यानंतर प्रत्येक माणसाला मरणाची भीती आणि सेक्सची आसक्ती, या दोनच करकरीत प्रेरणा कुरतडत असतात. त्यामुळे गावोगावी कुडमुड्या सेक्सॉलॉजिस्ट्सचं फावतं. लैंगिक समस्यांचं अचूक निदान होऊच शकत नाही इतक्या त्या परस्पर विरोधी प्रेरणांमध्ये लडबडलेल्या असतात. त्या फक्त सहृदयपणे समजून घेतल्या जाऊ शकतात अशी सतीशची धारणा दिसते. म्हणून त्याच्या बहुचर्चित सेक्सकथा वाचकाला तापवण्याऐवजी शांत करतात. सेक्सबद्दलच्या त्याच्या अशा प्रगल्भ अ‍ॅप्रोचमुळेच सतीश आधुनिक मराठी साहित्यातलाच नाही, तर आधुनिक भारतीय साहित्यातला सखोल दृष्टी असलेला एक मोठा लेखक ठरतो.

या सतीश तांबे नावाच्या लेखकाच्या डोक्यात दिवसभर नेमकं काय सुरू असतं? हे त्यानेच खुद्द आपल्या एका गमतीदार कथेत खुलवून सांगितलं आहे. या कथेचं नाव आहे ‘लेखकाचं डोस्कं आणि न्हावी’. त्याच्या दुसऱ्या कथासंग्रहातली ही अखेरची कथा. या संग्रहातल्या आशयाने अती गंभीर कथांवर हलकाफुलका उतारा म्हणून त्याने ही कथा त्याच्या दुसर्‍या संग्रहात शेवटी समाविष्ट केली असावी. ही कथा पहाटे उठून वाचली की, दिवस खूप छान जातो, असा माझा अनुभव आहे.

खूप बौद्धिक धमाल असलेली ही कथा पूर्णपणे वास्तववादी रितीने सतीश सादर करतो. मात्र कथेतलं हे वास्तव प्रत्यक्षात असूच शकत नाही, याची वाचकाची खात्री पटते. वास्तववादी शैलीत अदभुत कथा सांगण्याचं सतीशचं तंत्र जसं ‘राज्य राणीचं होतं’, ‘नाकावरून भविष्य सांगणाऱ्याची गोष्ट’ या कथांमध्ये प्रकटतं, तसंच ते लेखक आणि न्हाव्याच्या धमाल कथेतसुद्धा प्रकटतं. कुठला मराठी लेखक गावातल्या नाव्हाव्याकडे गाढवाला भादरायला घेऊन जाईल हो? आणि कुठला न्हावी चारचौघांसमोर त्या गाढवाला भादरून काढेल? पण सतीश ही गंमत मन लावून करतो. यात गाढवाचं भादरलं जाणं, लेखकाचं आणि गणप्याचं एकमेकांवर कुरघोडी करणं मस्तच रंगलंय.

‘लेखकाचं डोस्कं आणि न्हावी’ ही दोघांनी एकमेकांवर केलेल्या कुरघोडीची कथा असली, तरी तिचा फोकस फक्त गंमत दिसत नाही, तर तिच्यातून सतीशचा माणसांबद्दलचा उदार दृष्टीकोनच दिसून येतो. हा दृष्टीकोनच त्याच्या कथांचा आत्मा आहे.

 

सतीशचा तिसरा कथासंग्रह ‘रसातळाला ख.प.च.’ अशा अनोख्या शीर्षकाचा आहे. हे ख.प.च. म्हणजे खाणं, पिणं आणि चढणं. म्हणजे सेक्स. नव्या अर्थव्यवस्थेमुळे मध्यम वर्गांच्या हाती भरपूर पैसा आला. त्यातून या वर्गाची सांस्कृतिक प्रगती काही झाली नाही. फक्त त्याची खाण्यापिण्याची, टुरीझम आणि सेक्सची हाव मात्र वाढली, असा एक थेसिस या संग्रहात ब्लर्ब म्हणून छापला आहे. मला मात्र तो त्या कथेचं मर्म टिपणारा वाटत नाही.

सुमारे पन्नास पानांच्या, आणि संग्रहात पहिल्याच असलेल्या या शीर्षककथेचा फोकस मला मध्यमवर्गाचं म्हणजे ख.प.च. वर्गाचं अधःपतन वाटत नाही. तर असाध्य मानवी समस्येवर माणसाचा काही इलाज नसतो, हे सत्य ही कथा वाचताना मला जाणवलं. या कथेतला पेच ख.प.च. वर्गात समाविष्ट न होणारा एखादा झोपडपट्टीचा दादा, भूमीहीन मजूर, किंवा एखादा स्थानिक मुकेश अंबानी कसा सोडवेल? या प्रश्नाने मला त्रस्त केलं. सतीशच्या खूप कथा वाचकांना असे वैचारिक खेळ खेळायला उद्युक्त करतात.

ही कथा खुद्द एका लेखकाचीच आहे. आपल्या भेदक कथांतून मध्यमवर्गाच्या आत्मसंतुष्टतेवर हल्ला करणारा, अशी या लेखकाची ख्याती आहे. त्याची अशीच एक कथा वाचून त्याची बालमैत्रीण सुमती - जी त्याला तीसेक वर्षं भेटलीच नसते आणि जिला तो साफ विसरून गेला असतो - ती फोन करते. तिला भेटायला लेखक तिच्या घरी जातो. मात्र हे तो लेखक आपल्या बायकोपासून लपवून ठेवतो. सुमती लेखकाचं उत्स्फूर्त स्वागत करते. दोघं लहानपणातल्या भेटी उगाळत न बसता थेट विषयावर येतात. सुमती त्याला आपली कथा, म्हणजे आपला पेच दुसर्‍या तिसर्‍या भेटीत उलगडून सांगते. ते ऐकून लेखक साफ उडून जातो.

हे सगळं थेटपणे किवा सोप्या रितीने सतीश सांगत नाही. या सांगण्यात अनेक बारीकसारीक आणि भारी निरीक्षणं आहेत. मानवी मनाचं ब्रिलियंट उत्खनन त्यात येतं. स्त्री-पुरुष संबंध, लग्न, प्रेम,  सेक्स, समाज, इत्यादींबद्दल ओरिजिनल इनसाइट्स या कथेत खूपच आहेत. एखाद्या रहस्यकथेसारखी गुंगवून टाकणारी ही कथा वाचताना मला का कुणास ठाऊक, पण अल्फ्रेड हिचकॉक हे नाव आठवत होतं. तो असं काहीतरी भयंकर करायचा म्हणतात.

या कथेबद्दल वाचकाला अखंड बोलता येईल. पण ही कथा सतीशने मनोरंजनासाठी लिहिली नाही, तर तिचा उद्देश सुमतीच्या मनात गोंधळ घालणाऱ्या स्त्रीसुलभ आणि मानवसुलभ वेड्यावाकड्या प्रेरणांचं तांडव वाचकांसमोर सादर करणं हा आहे.

बेबंद, अनियंत्रित म्हणून ट्रॅजिक माणसांच्या समूहाची प्रदीर्घ नीतीकथा म्हणजे सतीशची ‘पळवाटा वाटा पाताळाच्या’ ही सुमारे पन्नास पानांची कथा. या कथेचा शेवट एखाद्या नीती कथेसारखा आहे.

चार दीर्घ कथा असलेल्या याच कथा संग्रहातली तिसरी कथा म्हणजे सतीश ज्या विषयावर ऑबसेसिव्हली विचार करतो, त्या सेक्सबद्दल आहे. प्रौढ माणसांची सेक्सची भावना जेव्हा कालांतराने क्षीण होऊ लागते, तेव्हा बहुतेक माणसं कशी मुंडीछाट कोंबडीसारखे वागतात. त्यातून मग अनैसर्गिक लैंगिक उद्दिपन करणाऱ्या उपायांची कशी चलती सुरू होते, हे या कथेत बोलघेवड्या शैलीत येतं.

वियाग्राच्या गोळ्या घेऊन स्वतःचा स्टॅमिना वाढवणारी माणसं आपण ही गोळी घेतो, हे मात्र कायम लपवून ठेवतात. पण या कथेचा निवेदक याबद्दल नीट बोलणारा आहे. त्यालासुद्धा आपल्या क्रमाने विझत जाणार्‍या पुरुषत्वाबद्दल चिंता आहे. एकदा तो चुकून टेलिव्हिजनवर करीना कपूरला नाचताना बघतो आणि तिच्यातले पुरुषी विभ्रम बघून चेतावला जातो. आपल्याला करीनासारख्या सुंदर स्त्रीतसुद्धा ‘हिजडेपण’ दिसतं म्हणजे आपण ‘होमो’ तर नाही, असं त्याला वाटतं. तिथून ही कथा आत्मनिवेदनाच्या सुरात विकसित होत जाते.

बडबडी शैली आणि रोजमर्राचे संदर्भ असलेली ही कथा म्हणजे सतीशचं सरळ, वाकड्या, नैतिक आणि अनैतिक सेक्शुआलिटीवरचं गंभीर चिंतन आहे. आपली सेक्शुआलिटी आणि जेंडरची कल्पना सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाने निर्धारित होते, असं पोस्टमॉडर्निझम आणि लिबरल आर्टला प्रिय असलेलं तत्त्व या कथेतलं अध्याहृत विधान आहे. ते आजच्या काळात फार रिलेव्हंट आहे. ते आत्मसात केल्याने आपल्या सगळ्यांची लैंगिक सहिष्णूता वाढीस लागेल, असं मला वाटतं.

या तिसऱ्या संग्रहातली अखेरची म्हणजे चौथी कथा ‘नांदा सौख्यभरेचा वांदा’ अशा गमतीदार शीर्षकाची आहे. तिची संवेदनशीलता अनोखी आहे. एखादी मनस्वी स्त्री काय चीज असू शकते आणि तिची बुद्धिमत्ता किती असांकेतिक, अपारंपरिक आणि अनपेक्षित असू शकते, याची झलक ही कथा आहे. ही कथा वाचणं एक रोमहर्षक अनुभव आहे. अभिजात परीकथेला किंवा पुराणकथेला जवळ जाणारी तिची भरजरी भाषा, आणि खास दरबारी वातावरण या कथेत आहे. अशी अफलातून सिच्युएशन फक्त सतीशलाच सुचू शकते.

शंभरांपैकी नव्याण्णव लेखकांना सुचणार नाहीत अशा अकल्पित गोष्टी रचणारा सतीश हा मूलतः आधुनिकतावादी लिबरल संवेदनशीलतेतून जगाकडे बघणारा लेखक आहे, असं मला म्हणायचं आहे. जगाच्या काळ्याबेर्‍या आणि गोऱ्यामोऱ्या व्यवहारांकडे तो उत्सुक नजरेने, आणि निर्वैर मनाने बघत असला, तरी तोसुद्धा एक चष्माच वापरतोय असं मला वाटतं. मात्र त्याचा चष्मा जीए किंवा ग्रेस वापरत तसा काळाकुट्ट नाही. तर तो फोटोसेन्सेटिव्ह आहे. म्हणजे सूर्य प्रकाशानुसार (परिस्थितीनुसार) या चष्म्याची शेड गडद किंवा हलकी होते. त्यामुळे जीएंना हे जग जसं कायम निराशावादी वाटलं, किंवा ग्रेसला हे जग जसं कायम सौंदर्यऊर्मींनी उचंबळणारं वाटलं, तसं काही या जगाचं अतिरेकी दर्शन सतीशला होताना दिसत नाही.

त्याचा दृष्टीकोन तिसराच आहे. आणि त्यात कुठल्याही भावभावनांबद्दल सोवळा अभिनिवेश नाही. म्हणूनच कधी निराशा, कधी सौंदर्यऊर्मी, कधी प्रेम, कधी द्वेष, कधी असूया, कधी लाज, कधी अपराधीभाव, कधी मुग्धता, कधी बुद्धीचातुर्य आणि वारंवार लैंगिकतेच्या अनुषंगाने स्त्री-पुरुषांच्या मनात निर्माण होणारे स्वीकृत-विकृत ताणतणाव व भले-बुरे गंडं सतीशच्या परंपराच नसलेल्या नवकथेच्या या जाळ्यात अलगद धरले जातात. ‘तीन तिघाडा’ कथेतल्या त्या रघूच्या जाळ्यात नदीतलं ते चांदणं असंच अलगद धरलं जायचं, आठवतं?

 

सतीशचा चौथा कथासंग्रह २०१३ साली प्रकाशित झाला. त्याचं नाव आहे ‘मॉलमध्ये मंगोल’. आठ दीर्घकथांचा हा संग्रह दोन विषयांमध्ये विभागला जाऊ शकतो. दमन आणि अभिव्यक्ती. दमनाची थीम घेऊन सतीश पात्रांच्या मनात लपवलेल्या गोष्टींचा बॉम्बस्फोट करतो. त्यातून वाचकाला नवं काहीतरी कळतं. अभिव्यक्तीची युक्ती वापरून तो पात्रांच्या मनातल्या अस्पष्ट गोष्टींना स्पष्ट करतो. त्यामुळे वाचक विचारसमृद्ध होतात.

माणूस वरवर जसा दिसतो, तसा तो नसतो. तो जगताना बरंच काही दुसर्‍यापासून आणि स्वतःपासूनही लपवतो. कधीतरी त्याचं हे बिंग फुटतं आणि त्या माणसाचा सगळा खेळ खलास होतो, अशी अस्सल मानसशास्त्रीय थीम असलेली या चौथ्या कथासंग्रहातली पहिली कथा म्हणजे ‘तळघरातील बुरखेधाऱ्याची गोष्ट’. बेधडकपणे नेहमी खरं ते सांगणार्‍या, उत्स्फूर्त जगणार्‍या, कलाकार विलासची ही कथा आहे.

लैंगिक पापाच्या कल्पनेपोटी सामान्य माणसं असामान्य आत्मताडन करू शकतात, हे सतीश सांगतो. तसं बघितलं तर अवघ्या मानवी संस्कृतीचा उद्देश मनातल्या पापावर विजय मिळवणं हाच वाटतो. पाप ही एक मानसिक घटना असते. तिथून ती रौद्ररूप धारण करून प्रत्यक्षात कृतीबद्ध होते. अशा पापाचा निचरा सांस्कृतिक उपायांतून म्हणजे देवधर्म, व्रतवैकल्य, सणवार, यात्रा आणि परिक्रमा इत्यादीतून करण्याचा सर्वसामान्य माणसांचा कल असतो. धार्मिक प्रेरणांच्या मुळाशी गेलं तर बरीच माणसं धर्माचा वापर मनातल्या पापभावनेवर औषधोपचारासारखा करताना दिसून येतात. ‘मुटकुळा’मधल्या यशोदेच्या आईचं पापक्षालन या दृष्टीनं बघता येतं.

सतीश हा प्रसंगी वैचारिक कीस काढणारा लेखक वाटतो. तरी त्याला केवळ ‘विचारप्रधान लेखक’ म्हणता येणार नाही. विचार करता करता तो माणसांच्या अनियंत्रित भावनांच्या गर्तांमध्ये अलगद उतरतो, आणि माणूस म्हणजे भावना आणि विचार याचं अनोखं मिश्रण आहे, हे सिद्ध करतो. ‘सवाई आनंद’ ही त्याची विचारकथा मला फार पटली, कारण ती वाचून एखाद्या गोष्टीचा किती बारकाईनं विचार करता येतो, आणि तो करता करता माणूस किती सहजपणे भावनांनासुद्धा आपल्या विचारप्रक्रियेत समाविष्ट करू शकतो, हे कळलं. अरे व्वा! आपल्याला असं काही सुचलं नसतं, असं एखाद्या वाचकाला ही कथा वाचून वाटू शकतं.

सतीश आयुष्याला थेट भिडणारा माणूस आहे. अशी माणसं जे निरखतात ते जगातल्या श्रेष्ठ माणसांना विचाराअंती सुचलेलं असतं. या कथेतला अविनाश हा सतीशचा जुळा भाऊ वाटतो. त्याला कुठल्याही गोष्टीच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले बारीकसारीक भावनांचे, प्रेरणांचे, इच्छांचे, आकांक्षांचे आणि असूयेचे सुवर्णकण दिसून जातात. त्यांना आपल्या कथेत आणून तो आपल्या कथा अर्थगर्भ तर करतोच, पण त्या वाचताना वाचक सर्वांग तल्लखी अनुभवतो.

सतीशच्या कथा ‘रिप्रेशन’ आणि ‘एक्स्प्रेशन’ या दोन मोड्समध्ये लिहिल्या आहेत, हे मी यापूर्वी सुचवलं होतं. ‘मुटकुळा’ ही त्याची कथा रिप्रेशनची मानली, तर ‘सवाई आनंद’ ही निपुत्रिक माणसाच्या धूसर प्रेरणांचा शोध घेऊन अंतिमतः ही प्रेरणा स्पष्ट करणारी, म्हणून मला एक्स्प्रेशनची कथा वाटते. ती जितकी कन्सेप्चुअल आहे तितकीच भावनाप्रधानसुद्धा.

असंच काहीतरी सतीशच्या ‘मॉलमध्ये मंगोल’ या कथेत होतं. ही कथा एका मॉलमध्ये सुरू होते. मध्यमवयीन विनय हा कथेचा निवेदक. जगरहाटीकडे कायम निरखून बघणं हा त्याचा एकमेव छंद. चंगळवादी समाजात राहूनसुद्धा तो स्वतःच्या गरजा कमीत कमी ठेवतो. लग्नबिग्न न करता सडाफटिंग राहतो. उत्तम नोकरी करतो आणि फावल्या वेळेत मुंबईतले रस्ते चालतो. चालताना विविध माणसं निरखतो. त्यांच्या अंतःप्रेरणांवर खोल विचार करतो. सगळ्यात राहून सगळ्यांपासून वेगळं राहणारा विनय नवी अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, माणसाची उपभोगाची भूक, त्याचं वस्तूप्रेम यावर तल्लख निरीक्षणं नोंदवतो.

वरवर ‘मॉलमध्ये मंगोल’ ही कथा बाजारू संस्कृतीची, चंगळवादाची, स्पर्धात्मक जगण्याची सांकेतिक समीक्षा म्हणून अनेकांना भावू शकते. पण या मॉलच्या नेपथ्यातून सतीश वाचकांना चंगळवादापलीकडलं काहीतरी नैतिक सांगतो. ते अनघड मानवी नात्यासंबधी आहे. माणसं एकमेकांपासून आणि स्वतःपासून काहीतरी लपवत जगत असतात. हे लपवणं त्यांच्या इतकं अंगवळणी पडतं की, ते स्वतःचं हेच रूप खरं मानू लागतात. मग काहीतरी होतं... त्यांना स्वरूपाचा साक्षात्कार होतो. तो अनेकदा उभारी आणणारा नसतो. माणसं मोडून पडतात. सावरतात आणि धडपडत पुढचा प्रवास करतात. मंगोल या कथेत असं खूप काही मानवी अवस्थेबद्दल ठासून भरलेलं आहे.

सतीशच्या सेक्सकथांमध्ये हिजड्यांना विशेष स्थान आहे. त्यांचं समाजाच्या परिघावरचं उपेक्षित जगणं, त्यांच्या वाट्याला येणारे अपमान, त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज आणि त्यांची आपल्याला वाटणारी किळस सतीश प्रभावीपणे टिपतो आणि ती वाचकांशी शेअर करतो ‘प्रेम की सुगंध’ हे पात्र खरं की खोटं, आणि ज्या जेंडरनगरमध्ये हे पात्र भेटतं, ते नगर खरं की खोटं? हे प्रश्न वाचकाने स्वतःच्या कल्पनाशक्तीनुसार सोडवायला हवेत.

 

मानवी जगण्याची एकूण होरपळ आणि प्राथमिक प्रेरणांची ही रटरट व्यक्त करण्यासाठी आधुनिक कथेसारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही, हे सतीशला ठाऊक आहे. त्याचा पाचवा कथासंग्रह या दृष्टीने बघण्यासारखा आहे. ‘ना.मा.निराळे’ असं शीर्षक असलेला हा संग्रह २०१५ साली प्रकाशित झाला. त्यातली पहिली कथा आहे ‘तुमची मनू आणि अज्ञानातला आनंद’. या कथेचा निवेदक वाचकांना विश्वासात घेऊन त्याच्या आयुष्यातली एक गोष्ट सांगतो.

निवेदक वस्तुनिष्ठपणे जगणारा, फालतू भावनांना धूप न घालणारा जरासा क्रूर आणि बऱ्यापैकी कुत्सित इसम असतो. नर्मदा मावशीला फजित करण्यासाठी तो इतक्या वर्षांनंतर त्या दुकानदाराला - जो आता नातवंडांचा आजोबा झालेला असतो - त्याला फोन करतो आणि नर्मदाबाईना त्यांच्याशी बोलायला भाग पाडतो. गोरामोरा झालेला तो वयस्क दुकानदार नर्मदाबाईंना ओळखसुद्धा देत नाही. मावशींच्या तरुणपणी त्यांना सगळे ‘नमू’ म्हणत असतात. दुकानदार त्यांना लाडाने ‘मनू’ अशी साद घालत असतो. ते आठवून नर्मदाबाई ‘मी तुमची मनू’ अशी ओळख करून देण्याचा प्रयत्न करतात. पण दुकानदार फोनच कट करतो. ज्या प्रेमाच्या आठवणीवर नर्मदाबाई आजपर्यंत जगत होत्या, ते प्रेम कसं बोगस होतं, हे निवेदक नर्मदाबाईंना सिद्ध करून देतो. त्यांच्या अज्ञानातल्या आनंदाला नख लावून आसुरी आनंद घेतो. हे सगळं कथेत खूप प्रभावीपणे येतं.

सर्वसामान्य माणूस नेपोलियन किंवा शिवाजीसारखा शूर असण्याची गरज नसते. फक्त त्याला जगण्याच्या दंगलीत आपला आब राखता आला तरी पुरेसं आहे. असा आब ‘म्हणून नव्हे...तर म्हणून’ या कथेत दुसर्‍यांदा विधवा झालेली शशी नीट राखते. चेहऱ्यावर वांग असलेली, दिसण्यात कोणाच्याही नजरेत न भरणारी पण मनाने उमदी असलेली शशी, एका सावत्र आणि एका सख्या मुलाची आई आहे. तिने या दोन्ही मुलांचा विश्वास संपादन केला आहे. अशी कर्तव्यदक्ष कुशल शशी श्रीकांतसारख्या वरवर चांगल्या, पण खोलवर व्यवहारी माणसाकडून आलेल्या तिसऱ्या लग्नाच्या ऑफरला नकार देते. तसा देऊन ती स्वतःचा छान आब राखते. हे बघून शशीसारख्या स्वच्छ विचार करणाऱ्या बायका आपल्या आजूबाजूला असतीलच, याचं भान जागृत होतं.

वरवर ही कौटुंबिक कथा वाटू शकते. त्यातल्या सिच्युएशन्स मस्त डेव्हलप होतात. पण अखेरीस अटीतटीचा निर्णय भावनेच्या भरात न घेता शशी तो पूर्ण विचाराअंती आणि आत्मप्रत्ययाला जागून घेते. माझा निर्णय तू म्हणतोस म्हणून नव्हे, तर मला वाटतं म्हणून मी घेतेय, असं स्वयंप्रज्ञ शशी श्रीकांतला अखेरच्या पत्रातून सांगते. तिची क्लारिटी ही खास सतीशच्या बुद्धिवान पात्रांची क्लारिटी आहे. एखाद्या निर्णयाचे किती पदर संभवतात आणि त्यांचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात, हे ही कथा वाचताना कळतं.

सतीशची निवेदनशैली, मी सुरुवातीलाच सुचवल्यानुसार क्रमाने क्लिष्टतेपासून सुबोधतेकडे उत्क्रांत ज्ञाली आहे. आपल्याला माहीत असलेली एखादी घरगुती गोष्ट दुसऱ्याला सांगावी तसा सतीश आपल्या पोतडीतून गोष्टी काढून त्या वाचकांना साध्या, सरळ शैलीत ऐकवतो. अशा कथनात्मक सोप्या शैलीचा तोल सांभाळणं कठीण असतं. जर सांगायलाच मुद्दलात फार काही नसेल तर कथा ढेपाळते. त्यामुळे सतीशच्या कथा नीट उभ्या राहतात, त्या फक्त साध्या निवेदन शैलीमुळेच नाही, तर त्या कथांमधल्या उष्ण अनुभवांमुळे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

त्याच्या या पाचव्या कथासंग्रहातल्या कथा निवेदन शैलीच्या अंगाने सोप्या वाटतात. तसं बघितलं तर, सगळ्या कथा आपल्या सगळ्यांच्या भोवताली कायम तरंगत असतात. फक्त त्या कथा म्हणून ओळखण्याचं कौशल्य कथालेखकांजवळ असतं. इतर माणसं त्यांना घटना म्हणून बघतात आणि कालांतराने त्या घटना विसरून जातात.

मात्र एका घटनेतून दुसरी घटना आणि तिच्यातून तिसरी हे घटनाचक्र एखाद्याला किती त्रस्त करू शकतं आणि त्यामुळे एखादी संवेदनशील व्यक्ती कशी उद्ध्वस्त होऊ शकते, याचा नमुना म्हणून ‘ना.मा.निराळे’ या गोष्टीकडे बघता येतं. एक नास्तिक माणूस एक आस्तिक माणसाला भेटतो. दोघांची मैत्री होते. दोघं मिळून बारमध्ये जातात. मी आस्तिक कसा झालो आणि, माझं आस्तिक्य कसं संशयास्पद आहे, हे आस्तिक नास्तिकाला सविस्तर सांगतो. ही कथा खरं म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगितलेली काळजातली गोष्टच आहे. नास्तिकाचं काम ऐकण्याचं आहे. एरवी फार न बोलणारा आस्तिक या कथेतल्या उमद्या स्वभावाच्या नास्तिकाला बघून खुलतो आणि ही कथा साकारते.

सतीशची स्त्री-पुरुष पात्रं विकल असली तरी बुद्धिवान आहेत. ती आपल्या भावनांना नीट व्यक्त करतात. त्यांच्या श्रद्धा ज्याला ‘लिबरल’ म्हणतात अशा आहेत, आणि त्यांची व्हिजन मोकळीढाकळी, सामाजिक मान्यतेला भीक न घालणारी, अपारंपरिक आहे. हे नवे विचार सतीशची पात्रं सहज संवादांतून साध्य करतात. अशा संवादांना किंवा बोलण्याला चालू काळात ‘डिसकोर्स’ म्हटलं जातं. सतीशचा हा डिसकोर्स त्याच्या पाचव्या कथासंग्रहात समाविष्ट झालेल्या ‘एका डॉटकॉमचे पाळण्यातले पाय’मध्ये प्रभावीपणे येतो.

आशयाने एकदम नव्या म्हणजे पोस्टमॉडर्न असलेल्या या कथेचा विषय स्त्री-पुरुष संबंध हाच आहे. हा सतीशचा अगदी आत्मीय विषय आहे. अडतीस वर्षांच्या एका कलंदर पत्रकाराची ही कथा आहे. हा पत्रकार नव्याचं स्वागत करणारा पुरेसा लिबरल, म्हणजे अगदी तिरपागड्या पद्धतीने मनमोकळा आहे. दुसऱ्यांदा लग्न जमवणाऱ्या एका वेबसाईटवर हा योगायोगाने पोहोचतो. तिथं गंमत म्हणून स्वतःची ओळख करून देताना ‘मी एक हत्या केली असून मला लसणीची फोडणी दिलेली साबुदाण्याची खिचडी आवडते’, अशी स्वतःची ओळख करून देतो.

स्मार्ट आणि मॅच्युअर मेखला या पत्रकाराच्या निमंत्रणाला प्रतिसाद देऊन एक दिवशी त्याच्या थेट घरी पोहोचते. मराठी पांढरपेशा वर्गात स्मार्ट, चटपटीत बोलणारे स्त्री-पुरुष पायलीचे पन्नास असतील, पण मेखलासारखी संवेदनशील, वाक्पटू आणि समजूतदार बाई, आणि तशाच स्वभावाच्या त्या हुशार पत्रकारांसारखी माणसं महाराष्ट्रातच नाही, तर एकूण भारतातच संख्येने कमी असतील, असं मला वाटतं.

दोघांचा हा चटपटीत, विनोदाची झालर असलेला बुद्धिवान संवाद फारच गुंगवून टाकतो. त्या दिवाणखान्यातलं वातावरण किंवा घराबाहेरचं ऊन किंवा ढग, वारा किवा उकाडा कथेत सतीश आणत नाही. या अर्थानं कथेत वातावरण दिसत नाही. मात्र किचन, तिथली भांडी, तिथल्या वस्तू, चिल्ड बियरचा अखंड सप्लाय, आणि दोघांच्या मानसिक विरेचनाचा उत्कर्ष गाठणाऱ्या त्या हृद्य कहाण्या, ही या कथेची खासीयत आहे. या दोघांचे उत्तर आधुनिक ‘डायलॉग्ज ऑफ प्लेटो’ ऐकून वाचकालासुद्धा काहीतरी स्मार्ट बोलण्याची सुरसुरी येऊ शकते. सतीशच्या कथांची ही एक गंमतच आहे.

या कथेचा उत्कर्षबिंदू फक्त दोन नव्या मित्रांच्या बोलण्यापुरताच मर्यादित राहत नाही. तर अखेरीस मोकळी ढाकळी मानसिकता लाभलेली ही दोन शरीरं सहजपणे एकत्र येतात. सतीशच्या कथांच्या बाबतीत हा शिखर अनुभव, नाही म्हटला तरी, अपवादात्मक आहे. सामान्यतः त्याचे ‘प्रोटॅगॉनिस्ट’ माणसं आणि बाया एकमेकांना समर्पित होताना क्वचितच दिसतात. या कथेत मात्र दोघांचं मीलन होऊन एक सर्वांग विरेचन घडतं.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

अखेरचं, या कथा वाचताना माझ्या मनात एक प्रश्न येरझारा घालत होता. कुठलीही प्रभावी साहित्यिक कृती वाचल्यानंतर तो मला छळतो. तो असा- सतीशची संवेदनशीलता ही सर्वसमावेशक, सहिष्णू, मोकळीढाकळी आणि एकदम अपारंपरिक म्हणून संपूर्ण नवीन आहे. ती एक पवित्रा म्हणून जुन्या आणि नव्या अशा दोन्ही डगऱ्यांवर पाय ठेवून स्वतःला मारून मुटकून अभिजात किंवा आधुनिक ठरवण्याची कसरत करताना दिसत नाही. पण केवळ सच्चेपणाच्या या भांडवलावर असाध्य मानवी अवस्थेचा यक्षप्रश्न सुटू शकतो का? हा प्रश्न सतीशलासुद्धा अधूनमधून भेडसावत असावा असं वाटतं. किंबहुना प्रत्येक निष्ठावान फिक्शन लेखकाला या प्रश्नाचं भूत कधी ना कधी दिसतंच.

आकाश व्यापून राहिलेली ही असाध्य मानवी अवस्था लेखकाने दुर्लक्षित करून लिहायचं ठरवलं, तर त्याचं लिखाण सुलभ होऊन जातं. मग वरवरचं सामाजिक किंवा सांस्कृतिक किंवा प्रादेशिक किंवा नाकासमोरचं जाडंभरडं वास्तव त्याला महत्त्वाचं वाटू लागतं. यावर मग महत्त्वाकांक्षी लेखक सुलभ उत्तरं सुचवतात. वाचक अशी उत्तरं मान्य करून धन्य होतात, आणि लेखक ती सुचवून कृतार्थ. पण सतीशच्या कथा वाचून धन्यतेचा हा भाव क्वचितच जागा होतो.

असाध्य मानवी अवस्थेवर उत्तरच नसल्यामुळे होणारी मनाची तगमग उत्तरं दिल्यानं येणाऱ्या शांतीच्या तुलनेत कितीतरी अधिक पटीने मौलिक आहे.

‘उगी उगी मर्दानगी’ – सतीश तांबे | अक्षर प्रकाशन, मुंबई | पाने – १६८ | मूल्य – २२० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......