यापुढचे भारतीय राजकारण नव्या त्रिसूत्रीवर चालवले जाणार आहे - भव्य संसद, भव्य राममंदिर आणि दिव्य गुजरात
पडघम - देशकारण
सुनील बडुरकर
  • नवीन संसद, नवीन राममंदिर आणि गुजरात व पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Fri , 02 February 2024
  • पडघम देशकारण संसद Parliament राममंदिर Ram Mandir गुजरात Gujarat नरेंद्र मोदी Narendra Modi

जगातील सर्वांत मोठा ‘प्रजासत्ताक लोकशाही’ देश अशी ख्याती असणे, हे भारताचे गौरवशाली वैशिष्ट्य आहे, याचे मूर्त रूप म्हणजे भारतीय संसदेची भव्य ऐतिहासिक सर्वसंपन्न सुंदर इमारत. या इमारतीचे आयुर्मान अद्याप संपलेले नाही, तरी पण नवीन संसद बांधण्याची योजना जाहीर झाली आणि वेगाने अंमलात आणली गेली. तिचे आणखी बरेच काम शिल्लक असताना अचानकपणे सर्व खासदारांना सूचना गेल्या की, तातडीने दिल्लीला दाखल व्हा. अचानकपणे दिल्लीला का बोलावले कुणालाही माहीत नव्हते. अचानकपणे नव्या संसदेचे उद्घाटन हिंदू धर्मगुरूंच्या हस्ते करण्यात आले, कशासाठी? कुणीही विचारू शकत नव्हते.

अशाच प्रकारे तातडीने राममंदिर उद्घाटन करण्यात येत आहे. संपूर्ण बांधकाम पूर्ण होण्यास आणखी किमान तीन वर्षे कालावधी लागणार आहे, तरी प्रचंड मोठा सोहळा करून रामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. समोर आलेल्या बातम्यांवरून असे दिसते की, ठिकठिकाणचे शंकराचार्य आणि इतर धार्मिक महनीय मंडळींनी चुका निदर्शनास आणून दिल्या आहेत. भाजप-संघाचा हा राजकीय ‘इव्हेन्ट’ आहे, म्हणत आहेत. एरवी धार्मिक व्यक्तीला दबकून बिचकून घाबरून राहण्याचे संदेश आणि शिक्षण लोकांना दिले जाते, पण या ठिकाणी अशा कोणत्याही मताला न जुमानता राममंदिर जगाला खुले केले जाणार आहे. नव्हे ते खुले करण्यात आले आहे.

या बाबी कोण केव्हा कसे ठरवते, हा प्रश्न भाजपमधीलसुद्धा कुणी कुणाला, एवढेच काय, तर स्वतःलाही विचारू शकत नाही. भाजपच्या एकूण राजकीय कृती आराखड्यात तीन मुद्दे होते, ज्याचे ढोल सतत बडवण्यात आले – ‘समान नागरी कायदा’, ‘काश्मीरचे ३७० कलम’ आणि अयोध्येचे ‘राममंदिर’.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सारी भिस्त ध्रुवीकरणावर

हे तीन मुद्दे वेगवेगळे दिसतात, पण त्यांचा एकत्रित गोफ विणलेला होता. हे तीन मुद्दे मुस्लीम धार्मिक समूहाच्या बाबतीत आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचा आधीपासून धार्मिक ध्रुवीकरण अर्थात फूट पाडून कार्यभाग साधणे, असे राजकारण सुरूच होते. त्याचाच पद्धतशीर विस्तार भाजपने मागच्या ७० वर्षांत केला, त्यासाठी भाजप-संघाने असंख्य हातांनी आणि अनेक तोंडानी ध्रुवीकरण मानसिकता भारतीय समाजात भिनवली.

‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ म्हणत म्हणत आता सनातन हिंदू धर्माची पुनर्स्थापना इथपर्यंत संघ-भाजप पोचला आहे. यासाठी भाजपने प्रत्येक टप्प्यावर नवनवे अवतार धारण केले आणि नवीन अवतार लोकांच्या समक्ष उभे केले. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे अवतार आहेत, हे बिनदिक्कतपणे सांगितले जात आहे. मोदीजी हे विष्णूचा अवतार असण्याचे मान्य करवले जात आहे. यामध्ये कुणालाही कसलेही मत व्यक्त करायला परवानगी नाही.

साधारणपणे आधीच्या व्यक्तीने किंवा नेत्याने एखादे काम केले, तर त्याच्या पुढच्यांनी त्याबद्दल नम्रपणे कृतज्ञ होऊन त्यास पुढे न्यायचे असते. एखादी भूमिका असो, एखादा कार्यक्रम असो की प्रकल्प असो. राममंदिर उभारणी हा भाजपचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्याचे निर्णायक राजकारणात रूपांतर करण्याचे सर्व श्रेय हे लालकृष्ण अडवाणी यांचे आहे.

सोमनाथ ते अयोध्या ही जंगी रथयात्रा काढून देश ढवळून काढण्याचे श्रेय हे अर्थातच त्यांचे एकट्याचे असायला हवे. जरी लालकृष्ण अडवाणी यांनी प्रामाणिक सैनिक म्हणून संघाचा अजेंडा राबवला, तरी त्यांच्या कामाचे श्रेय त्यांना द्यायला हवे. पण त्यांना अयोध्येला अजिबात येण्याचे कारण नाही, असे सांगण्यात आले आहे.

वडिलांनी पाया खोदून घर बांधून निम्मे काम पूर्ण करून हातात दिले आणि मुलाने त्यांना घराकडे फिरकू नका असे सांगावे, तसे झाले आहे. पण खुद्द अडवाणी याबद्दल एकही शब्द बोलू शकत नाहीत. भाजपमधील बाकीच्यांनी बोलण्याचा प्रश्न शिल्लकच राहिलेला नाही. कोणीही काहीही बोलायचे नाही, काहीही करायचे नाही, फक्त आमंत्रण निमंत्रण आले, तर हजर राहायचे, असाच कार्यक्रम मागील दहा वर्षे सुरू आहे!

मेहनतीचा ‘गुजरात पॅटर्न’

भाजपचा हा ‘गुजरात पॅटर्न’ आहे, पण हा पॅटर्न अचानक दहा वर्षे आधी जन्मलेला नाही. नरेंद्र मोदीही अचानकपणे राजकीय पटलावर आलेले नाहीत. सलग तीन टर्म्स अर्थात बारा-तेरा वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गुजरातची धुरा सांभाळली. मोदींनी मुख्यमंत्री व्हावे, हेही आपोआप घडलेले नाही. त्यासाठी संघ-भाजपने गुजरात राज्यावर सलग ५० वर्षं लक्ष पुरवले आणि प्रचंड मोठी मशागत केली. स्वातंत्र्यानंतर भारताचे राजकारण ‘गुजरातकेंद्री’ करण्याचे भक्कम धोरण संघाने आखले. या कळीच्या मुद्द्याकडे अद्याप एकाही राजकीय विश्लेषकाने चिकित्सकपणे पाहिलेले नाही.

२०१४ साली संपूर्ण सत्ता हातात येताच भाजपने अर्थात ‘गुजरात पॅटर्न’प्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिभव्य पुतळा नर्मदा सरोवराच्या क्षेत्रात उभारला. त्याची योजना हाती घेऊन पाच वर्षांच्या आताच पूर्ण करण्यात आली. एक भव्य शिल्प जगासमोर ठेवण्यात आले.

राजकीय आणि वैचारीकदृष्ट्या वल्लभभाई पटेल हे कधीच संघाच्या पठडीतले नव्हते, उलट स्पष्टपणे विरोधक होते. तरी भाजपने त्यांचे भव्य स्मारक केले, त्याचे एकमेव कारण ते गुजरातचे सुपुत्र होते. मग महात्मा गांधींचे काय? तर त्यांना ‘राजकीय शत्रू’ ठरवून जनमानसातून हद्दपार करण्याचे धोरण विषारी पद्धतीने चालवले गेले. ‘गुजरात पॅटर्न’ हाच तर आहे की, गांधींना बाजूला करा आणि गुजराती प्रतिमा मोठ्या करा.

आज लालकृष्ण अडवाणी जर समजा गुजरातचे असते, तर त्यांना प्रचंड सन्मानाने जगासमोर मिरवले गेले असते. त्यांना दिलेले काम त्यांनी चोख केले आहे. त्यांनी भाजपला भरपूर मैदान उपलब्ध करून दिले आहे. संघाच्या एकतर्फी भूमिका जोराने देशभर वाजवण्यात अडवाणी मातब्बर राहिलेले आहेत.

‘स्यूडो सेक्यूलर’ ही त्यांनी प्रसिद्ध केलेली कन्सेप्ट आहे. सरळ पाकिस्तानात जाऊन त्यांनी जीनांचे जाहीर कौतुक केले की, तेच अस्सल ‘सेक्युलर’ होते, कारण त्यांनी धार्मिक आधारावर राज्य चालवण्याची भूमिका घेतली. पण त्यांना गुजरातचे सुपुत्र असण्याचे भाग्य लाभले नाही. त्यांचे कर्तव्यपरायण असणे दुय्यम ठरवून त्यांना बाजूला केले जाते आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

पण असे बाजूला ढकलून दुसऱ्याने जागा बळकावणे हे काही नवीन नाही. जयप्रकाश नारायण यांनी उठवले वादळ घेऊन त्या वेळच्या क्रांतीची घोषणा झाली, जनता पक्षाची स्थापना झाली. प्रचंड आंदोलने झाली. जनता पक्षाचे सरकार स्थापन होताना पंतप्रधान म्हणून देवीलाल चौटाला यांचे नाव सर्वसंमतीने ठरवण्यात आले. त्यांनी नवीन कपडेदेखील शिवले. सकाळी शपथविधीसाठी निघताना त्यांना सांगण्यात आले की, तुम्ही नाही मोरारजी देसाई पंतप्रधान होणार आहेत. यालाच ‘गुजरात पॅटर्न’ म्हणतात!

जनता पक्षाच्या आंदोलनात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गोमुत्राने शुद्ध करण्यात आले होते, कारण गांधी हे सनातन हिंदूपणा सोडून हरिजनांची सेवा, अस्पृश्यता निवारण, ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ म्हणत संस्थानांचे आणि इंग्रजांचे राज्य घालवायला निघाले होते.

‘दुही आणि तिरस्कार’ असा ‘गुजरात पॅटर्न’चा एक भाग तेव्हापासून आहे. जयप्रकाश नारायण यांनी आधीच्या जनसंघाला जनता पक्षात सामावून घेतले. अटल बिहारी आणि लालकृष्ण अडवाणी या जोडीने त्या संधीचे अक्षरशः सोने केले आणि भाजपला सत्तेत नेऊन बसवले, पण त्या दोघांना बाजूला करून अजस्त्रपणे सत्ता चालवण्याचे तंत्र यशस्वी झाले.

राहून राहून असेच वाटते, अटल-अडवाणी हे गुजरातेत जन्मले नाहीत, हा त्यांचा दोष आहे का?

यापुढचे भारतीय राजकारण नव्या त्रिसूत्रीवर चालवले जाणार आहे - भव्य संसद, भव्य राममंदिर आणि दिव्य गुजरात.

‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या फेब्रुवारी २०२४च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

लेखक सुनील बडुरकर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विषयांचे अभ्यासक तसेच जाणकार ग्रंथप्रसारक आहेत.

badurkarsunil@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......