अजूनकाही
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताज्या ‘पलटी’ने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अर्थात ते एकटेच ‘पलटूराम’ नाहीत, सांप्रतच्या ‘अमृतकाळा’त संपूर्ण देशात अशा पलटूरामांचे पीक फोफावतच चालले आहे. असो, मात्र ४५ आमदार असलेल्या नितीश कुमारांच्या जनता दल (युनाइटेड) या पक्षाला ७८ आमदार असलेल्या भाजपने मुख्यमंत्री पद का द्यावे, याचे उत्तर महाराष्ट्रात सापडते. कारण तिथेही भाजपने (१०५ आमदार) शिवसेनेचे फुटीर नेते एकनाथ शिंदे (४० आमदार) यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलेले आहे. त्या अर्थाने नितीश कुमार हे आता ‘बिहारचे एकनाथ शिंदे’ झाले आहेत.
एक मात्र खरे, शिंदे असोत अथवा नितीश कुमार... कोणाला झाकावे आणि कोणाला काढावे, हे ठरवणारे गारुडी मात्र नवी दिल्लीत बसले आहेत. त्यांच्या इशाऱ्यावरच हा कळसूत्री बाहुल्यांचा प्रयोग चालणार आहे. तो रंगणार किती अथवा कसा, हे पुढील काळात दिसेलच. राजकीयदृष्ट्या प्रगल्भ समजल्या जाणाऱ्या राज्यांत अगदी ‘सेम टू सेम’चा खेळ सुरू आहे.
हा प्रयोग जाणूनबुजून सुरू आहे. गुजरातला लागून महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशला लागून बिहार असला, तरी त्या अजून ‘हिंदुत्वा’च्या ‘प्रयोगशाळा’ का बरे झाल्या नाहीत, ही त्यामागची खंत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस ‘म्हातारी’ झाली असली, तरी मरत का नाही? बिहारमध्ये ‘जंगलराज’चा प्रचार कितीही झालेला असला, तरी लालू प्रसाद यांची पकड ढिली का पडत नाही? असे प्रश्न आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
साधारणतः विधीमंडळात सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. लोकशाहीतील सरकार स्थिर राहावे, याचा तो पहिला नियम आहे. परंतु आता बिहार आणि महाराष्ट्र त्याला अपवाद ठरले आहेत. या दोन्ही राज्यांत संख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदावर बसवण्यात आले असले, तरी त्याची वेसण भाजपच्या हाती आहे. आणि भाजपचे केंद्रीय नेते नाचवतील, तसे त्याला नाचावे लागणार आहे, लागत आहे. या दोन्ही राज्यांत संख्याबळ असूनही भाजपचा मुख्यमंत्री का बरे होत नाही? की पूर्ण बहुमत मिळण्यापूर्वी राज्यातल्या प्रादेशिक पक्षांचा खातमा करण्याचे भाजपचे धोरण आहे?
कर्पुरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ अचानक देण्यात आले. कारण नितीश कुमारांना फुटून जाण्यासाठी संधी वा मुहूर्त पाहिजे होता. तो मिळवून देण्यासाठी कर्पुरी कसे तळागाळातील लोकांचे अभूतपूर्व नेता होते, याचा जणू ‘शोध’ लावण्यात आला आणि त्याचे निमित्त करून नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. एवढेच नाही, तर हे निमित्त साधून त्यांनी राजकारणातील घराणेशाहीवर सडकून टीका केली. एका दगडात दोन पक्षी : एकीकडे लालू प्रसाद व त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव, तर दुसरीकडे राहुल गांधी.
असे म्हणतात की, ७२ वर्षांच्या नितीश कुमारांची प्रकृती आजकाल फारशी ठीक नसते. त्यामुळे ते एका गोतावळ्यात अडकले आहेत. त्यातील काही जण भाजपच्या जवळचे आहेत आणि त्यांच्या प्रभावामुळे नितीश कुमारांना असे पाऊल उचलावे लागले. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया आघाडी’त नितीश कुमारांना संयोजक पद पाहिजे होते, कारण एकदा असे पद मिळाले की, पंतप्रधानपदाचा मार्ग सुकर होणार, अशी त्यांची धारणा. ती किती बरोबर की चूक, हे ज्याचे त्याने ठरवावे.
जातनिहाय जनगणना भाजपच्या नाकावर टिचून नितीश कुमारांनी पार पाडल्याने लालू प्रसाद यादव यांच्यापेक्षा आपण थोर नेता आहोत, असे त्यांचे मत बनले होते. पण २८ सदस्यीय ‘इंडिया आघाडी’तील एकदेखील प्रादेशिक पक्ष त्यांच्या बाजूने जाहीरपणे उभा राहिला नाही. उलट ममता बॅनर्जी यांनी हे पद नितीश कुमारांना देण्याविरुद्ध मत मांडून एक प्रकारे त्यांचा जाहीर पाणउताराच केला. म्हणून नितीश कुमारांनी घुमजाव करून स्वतःचेच हसू करून घेतले!
महाराष्ट्रातले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष योजनाबद्धरित्या फोडण्यात आले आणि बिहारमध्ये नितीश कुमारांचे भाजपातले विरोधक सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. नितीश कुमारांच्या या पूर्वीच्या बंडानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचल्याशिवाय आपण डोक्यावरची पगडी खाली उतरवणार नाही, अशी प्रतिज्ञा म्हणे सम्राट चौधरी यांनी केली होती!
आणि मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी ‘नितीश कुमारांनी आपला दूत पाठवून आपला पक्ष वाचवण्याची विनंती भाजप श्रेष्ठींना केल्यामुळे बिहारमध्ये सत्तांतर झाले’, असा गौप्यस्फोट केला. म्हणजे नितीश कुमार शरण आल्यामुळे त्यांना पंतप्रधान मोदींनी अभय दिले, असा याचा अर्थ होतो.
नितीश कुमार मुख्यमंत्री असले, तरी ते आता हवालदिल, कमजोर आहेत, असा मेसेज द्यायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा नितीश कुमार ‘महागठबंधन’मध्ये होते, तेव्हा त्यांचा सुप्त मुकाबला लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी होता. मग त्यांच्या विरोधात भाजपने नितीश कुमारांना उभे केले, ताकद दिली. लालू प्रसाद यादव हे कधीही विसरू शकत नाहीत.
अनेक वर्षे मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर नितीश कुमारांच्या मनात पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बळावली. त्यांनी गैर-भाजप पक्षांना ‘इंडिया आघाडी’च्या नावे एकत्र केले, पण त्यांनी आपला कसा ‘मामा’ केला, हे नितीश कुमारांना अखेरपर्यंत कळू शकले नाही.
नितीश कुमार काही जयप्रकाश नारायण होऊ शकत नाहीत, जगजीवन राम होऊ शकत नाहीत, कर्पुरी ठाकूर होऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे व्ही. पी. सिंग यांच्याप्रमाणे करिष्मा नाही, पण तरीही त्यांनी नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याच्या प्रयत्न केला आणि आता तोंडघशी पडले.
नितीश कुमार हे एकाअर्थी ‘करिअरिस्ट’ नेते आहेत. नऊ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊनही ते बिहारच्या अस्मितेशी एकरूप झाले नाहीत. त्यांना निवडणुकीचे गणित जमले, पण ते ‘लोकनेते’ होऊ शकले नाहीत. म्हणून दीर्घकाळ सत्तेत राहूनही ते एकाकीच राहिले. त्यांनी जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव यांचा स्वतःच्या राजकारणासाठी वापर केला.
आता त्यांच्या पक्षाचे भविष्य काय? त्यांचा राजकीय वारस कोण? उद्या भाजप सत्तेतून बाहेर पडली, तर त्यांचा जनता दल (यूनाइटेड) एकसंध राहील काय? तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांना तर जनता दलाचा अंत दिसतो आहे...
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
हाच प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबतही विचारला जाऊ शकतो. भाजपने टेकू काढला, तर त्याचे अस्तित्व काय? संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना काढली. मराठी माणूस, मराठी अस्मिता, भूमिपुत्र या प्रश्नावर ती टिकली, वाढली. शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला हा वारसा नाही. आणि तसं काही करण्याची धमकही तिच्यात नाही.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आजवर तालेवार नेते राहिले. त्यांचे पक्ष, त्यांचे विचार वेगळे असले, तरी राज्याच्या हिताबाबत त्यांनी कधी तडजोड केली नाही, प्रसंगी त्यांनी त्यांच्या पक्षातही दोन हात करून महाराष्ट्रचे ‘पाणी’ दाखवले. ती तडफ आता कुठल्याच नेत्यात दिसत नाही.
राजकारणात ‘टाईमिंग’ला महत्त्व असते, तसेच वेळ पडली, तर दम खाण्याला, संधीची वाट पाहत स्वस्थ बसण्याला, विरोधी बाकावर बसून संघर्ष करण्यालाही. बिहारमधील भाजप आणि राजद यांच्यातल्या धुमश्चक्रीचा फायदा उठवून नितीश कुमारांनी गेली जवळजवळ दोन दशके मुख्यमंत्रीपदी राहून राज्यात एक ‘विक्रम’च प्रस्थापित केला आहे. आता मात्र नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची स्थिती ‘न घर का, न घाट का’ अशी झाली आहे. अवघ्या नववी पास तेजस्वी यादव यांनी बिहारचे आपणच भावी नेते आहोत, याची झलक दुनियेला दाखवली आहे.
.................................................................................................................................................................
लेखक सुनील गाताडे आणि व्यंकटेश केसरी दिल्लीस्थित पत्रकार आहेत.
sunilgatade@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment