ज्यांच्याकडे भरपूर भांडवल आहे, त्यांचा विकास सत्तेतून होत जातोय. पण साधे कामधंदेही नसल्याने जे बेकार आहेत, अशांचे काय? ते ‘रामभक्ती’त इतके मग्न आहेत!
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • अयोध्या आणि राममंदिराचं एक संग्रहित छायाचित्र
  • Wed , 31 January 2024
  • पडघम देशकारण अयोध्या Ayodhya राममंदिर RamMandir राम Ram

अखेर २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या दिवसाची भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते, तो हा दिवस! धार्मिक वृत्तीच्या बहुसंख्य हिंदूधर्मीयांनीसुद्धा हा दिवस दिवाळीसारखा साजरा केला. तो तसा व्हावा, यासाठी केंद्र सरकारने व भाजप-संघाशी संबंधित असलेल्या राज्य सरकारांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची, तर राज्य सरकारने पूर्ण दिवसाची सुट्टी जाहीर केली होती. घरोघरी अक्षता दिल्या होत्या. अनेक ठिकाणी फटाके फोडून, रोषणाई करून हा दिवस साजरा करण्यात आला.

देशभरातील काही नामांकित व्यक्ती, राजकीय पक्षांचे पुढारी, सिनेसृष्टीतील तारे-तारका, मोठमोठे उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक, धार्मिक साधू-संत इत्यादींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. निमंत्रितांपैकी काही लोक हजर राहिले, तर काहींना शक्य झाले नाही. बऱ्याचशा विरोधी पक्षांनी या कार्यक्रमाला राजकीय रंग असल्याचे कारण देत जाणेच टाळले.

केजरीवालांनी दिल्लीत, तर ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये ‘सर्वधर्मसमभावा’ची भूमिका स्पष्ट केली. ‘आम्हीही हिंदू धर्मीय असलो, तरी धर्म हा ज्याची त्याची खाजगी बाब आहे, ज्याने त्याने इतरांच्या धर्माचा द्वेष न करता आपापला धर्म पाळावा, पण शासनाने भारतीय संविधानानुसार धर्मनिरपेक्ष पद्धतीने व्यवहार केला पाहिजे’, अशी अपेक्षा डाव्या पक्षाच्या पुढार्‍यांनी व्यक्त केली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हिंदू धर्मियातील सर्वोच्च धार्मिक स्थान असलेल्या चारही शंकराचार्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. पण त्यांच्यापैकी एकही शंकराचार्य उपस्थित राहिले नाहीत. आपल्या अनुपस्थितीची कारणे देताना, त्यांनी सदरील राममंदिर अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याने, अशा अवस्थेत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करणे, हे धार्मिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे सांगितले. अशा अवस्थेत त्या मूर्तीमध्ये देवादिकांचा संचार होण्याऐवजी दैत्य-दानवांचा संचार होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मात्र पंतप्रधान मोदी यांना मंदिराचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत थांबण्यास अवधी नव्हता. तोवर २०२४च्या निवडणुका निघून जातील, अशी भीती त्यांना वाटली असावी. कारण पुन्हा पंतप्रधान व्हायचे असल्याने, त्यांना मंदिराच्या अपूर्ण अवस्थेतच श्रीरामाच्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करणे महत्त्वाचे वाटले!

जानेवारीतील तिसरी महत्त्वाची तारीख

आतापर्यंत जानेवारी महिन्यात ‘२६ जानेवारी’ (प्रजासत्ताक दिन) आणि ‘३० जानेवारी’ (गांधी हत्या) या तारखांना विशेष महत्त्व महत्त्व होते. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘२२ जानेवारी’ ही तारीख नोंदवली आहे.

खरे तर २२ जानेवारी १९९९ या दिवशी संघाशी संबंधित बजरंग दलातील दारासिंगने ओरिसात ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन मिशनरी ग्रॅहॅम स्टेंस यांना त्यांच्या सहा व दहा वर्षांच्या दोन मुलांसह जीप गाडीमध्ये जाळून मारले होते. त्याला २२ जानेवारी २०२४ रोजीच बरोबर २५ वर्षे झाली. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.

आता ‘जय श्रीराम’ची पुढील वाटचाल कशी राहणार आहे, हे या दिवशी व त्यानंतर घडलेल्या काही घटनांतून दिसून येते. २२ जानेवारी रोजी निघालेल्या मिरवणुकांत अनेक ठिकाणी नथुराम गोडसेचा त्याचं छायाचित्र मिरवून जयजयकार करण्यात आला. मुंबईचे उपनगर मीरा-भाईंदरमध्ये मिरवणुकीच्या गाड्यावर दगडफेक केल्याच्या कारणावरून मुस्लीम समाजाच्या घरादारांवर व दुकानांवर बुलडोझर फिरवण्यात आला.

या शिवाय या मिरवणुकीच्या वेळेस देशातील काही मशिदींवरही हल्ल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. बाबरी मशिद पाडत असतानाच ‘ये तो अभी झाकीं हैं, काशी-मथुरा बाकी हैं’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यानुसार भविष्यात काशीतील ज्ञानवापी मंदिर आणि मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराचाही नंबर लागणार आहे. त्याबाबतच्या कोर्टकचेऱ्या चालू असून नुकताच त्या संदर्भातला एएसआयचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. आता मुस्लिमांनी ज्ञानवापी मंदिरात आम्हाला प्रार्थना करू द्याव्यात, त्यातूनच सामाजिक समरसता वाढू शकेल, असे आवाहन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विटवरून केले आहे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

पंतप्रधान मोदी आणि संसद टीव्हीनं संविधानात ‘रामा’चं चित्र आणि ‘रामराज्या’चा उल्लेख असल्याचं सांगणं, हे ‘अर्धसत्य’ आहे…

‘‘काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी, देशोऽयम क्षोभरहितो मानवः संतु निर्भयाः’’

न्यायालय केवळ ‘निवाडा’ करते, ‘निकाल’ देते, मात्र ‘न्याय’ देतेच असे नाही!

दुधखुळी माणसं आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी टपलेली लबाड माणसं, यांचा सुळसुळाट झालेल्या जगात ‘देव’ या कल्पनेचा वापर स्वतःच्या ‘पोळ्या’ भाजून घेण्यासाठी सर्रास केला जात आहे!

..................................................................................................................................................................

अयोध्या पर्यटनस्थळ आणि ‘बूमिंग सिटी’ही!

खुद्द अयोध्यावासीय त्यांचे शहर तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित होत असल्याने तेथील सर्वसामान्य रहिवाशीही खुश आहेत. कारण आता तेथे हिंदूधर्मीयांची व इतरही पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. पूजापाठ साहित्य, श्रीरामाच्या मूर्ती, त्याची छापील छायाचित्रं, ताईत, अंगठ्या, माळा, अशा नानाविध गोष्टींची मागणी वाढणार. त्याचा तेथील लहान-मोठ्या दुकानदारांना फायदा होणार आहे. पर्यटकांची वर्दळ वाढल्यामुळे हॉटेलिंग, लॉजिंगच्या धंद्यातसुद्धा वाढ होणार. महाराष्ट्रात शिर्डी देवस्थान आणि आंध्रातील बालाजी जे महत्त्व आलेले आहे, कदाचित त्यापेक्षाही जास्तच अयोध्येतील राममंदिराला येणार आहे.

अयोध्येत राममंदिराच्या उभारणीसोबत २०२२पासून धार्मिक पर्यटनस्थळ बनवण्याचेही काम सुरू होते. त्यामध्ये १३ किलोमीटर लांबीचा ‘रामपथ’, ८०० मीटर लांबीचा ‘भक्ती पथ’ आणि ८०० मीटर लांबीचा ‘जन्मभूमी मार्ग’ यांच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम सुरू होताच सरकारने रस्ते, विमानतळ, रेल्वे स्टेशन, रुग्णालये, रस्ते रुंद करणे आणि गटारांच्या लाईनचे काम वेगाने केले. राममंदिर प्राधिकरणाने मंदिराच्या आसपासचा परिसर ‘धार्मिक क्षेत्र’ म्हणून घोषित केला आहे.

या सर्व प्रकारामुळे गेल्या चार वर्षांत अयोध्येतील मालमत्तेच्या किमती दहा पटीने वाढल्या आहेत. चार वर्षांपूर्वी २,००० रुपये प्रति चौरस फूट दराने उपलब्ध असलेली जागा आता १५,००० रुपयांना स्क्वेअर फूटमध्येही मिळत नाहीये.

लखनौ-गोरखपूर महामार्गावरून एक रस्ता नव्या घाटाकडे जातो. तेथून राममंदिर जवळ आहे. तिथे २०१९मध्ये ५ हजार स्क्वेअर फूटाच्या व्यावसायिक मालमत्तेची किंमत ४५०० रुपये प्रति स्क्वेअर फूट म्हणजे २ कोटी २५ लाख रुपये एवढी होती, ती २०२०मध्ये ३ कोटी रुपये झाली. आणि आता ५ कोटींवर त्याचा भाव गेला आहे.  केवळ राममंदिराच्या आसपासच नाही, तर संपूर्ण अयोध्या आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मालमत्तेच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.

भाजपशी संबंधित मुंबईतील खासदार मंगल प्रसाद लोढा, ताज ग्रुप, हैदराबाद ग्रुप, तिरुपती बालाजी ग्रुप अयोध्येत हॉटेल्स आणि टाऊनशिपमध्ये गुंतवणूक करत आहेत. केवळ बड्या रिअल इस्टेट व्यावसायिकांनाच नाही, तर धार्मिक नेत्यांनाही अयोध्येत त्यांची उपस्थिती हवी आहे. अलीकडच्या काळात तिथे अनेक मठ आले आहेत, काही नव्याने निर्माण झाले आहेत.  यापैकी एक दक्षिण भारतातील उत्तरादि मठ आहे.

अशाच लोकांचा उत्तरोत्तर चढत्या भाजणीने विकास होत आहे. त्यामुळे त्यांना आहे हीच सत्ता कायम राहावी, त्यातच आपला विकास सामावलेला आहे, याचे भान आहे. म्हणून या राज्यसत्तेला कोणत्याही जनसमुदायाकडून धोका पोहोचत असल्यास, त्यापासून ती सत्ता वाचावी, यासाठी ते त्यांच्या परीने आटोकाट प्रयत्न करत असतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

बेकारांच्या फौजा ‘रामभक्ती’त मग्न

ज्यांच्याकडे भरपूर भांडवल असते, त्यांचा विकास सत्तेतून होत जातो. पण साधे कामधंदेही नसल्याने जे बेकार आहेत, अशांचे काय? पण ते रामभक्तीत इतके मग्न आहेत की, त्यांना स्वतःच्या प्रश्नाचेही भान राहिलेले नाही. देशातील बेकारांचा प्रश्न फार गंभीर आहे असे सातत्याने म्हणतात, पण हेच बेकार युवक या सत्तेचे झेंडे खांद्यावर घेऊन, मिरवणुका काढून, मशिदीवर हल्ले करून, राममंदिर झाल्याच्या आनंदात गल्लोगल्ली पताका लावण्यात आणि फटाके फोडण्यात मग्न आहेत.

यापूर्वी निदान महाराष्ट्रात तरी भगव्या झेंड्यावर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र व त्याखाली ‘जाणता राजा’ असे लिहिलेले असायचे. आता मात्र या भगव्या झेंड्यावर श्रीरामाचे चित्र आले असून, त्याखाली ‘जय श्रीराम’ लिहिलेले असते. पुढे-मागे प्रसंगोपात त्यात बदल होऊ शकेल, असे वाटते.

खरं म्हणजे भारतात गेल्या हजारो वर्षांपासून एकमेकाबद्दलचा संबंध, आपुलकी, मित्रत्व वाढवण्यासाठी, एकमेकाला अभिवादन करण्यासाठी ‘राम राम’ या शब्दाचा उपयोग होत आला आहे. या शब्दात मृदूता होती, त्यात कोणाहीबद्दलच्या द्वेषाचा लवलेश नव्हता. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही…

.................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......