प्रसिद्ध कवयित्री मीनाक्षी पाटील यांचा ‘उत्तर-आधुनिकता आणि मराठी कविता’ हा काव्यसमीक्षाग्रंथ नुकताच पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या ग्रंथातल्या शेवटच्या प्रकरणाचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच भारतीय समाजाच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली, परंतु ती पूर्णपणे ब्रिटिश वसाहतवादी सत्तेने नियंत्रित केलेली होती. हळूहळू शिक्षण, तंत्रज्ञान, दळणवळण साधने, संपर्क प्रसार साधने आदींच्या प्रसारामुळे भारतीय समाज खऱ्या अर्थाने समकालीन प्रगत पाश्चात्त्य समाजाच्या संपर्कात आला आणि भारतीय समाजाला आधुनिक मूल्यांचा परिचय झाला. साक्षरता प्रसार व मुद्रण माध्यमाच्या उपलब्धतेमुळे मौखिक साहित्याची परंपरा मागे पडून त्याची जागा मुद्रित साहित्याने घेतली. आधुनिक मूल्यांच्या संस्कारामुळे जीवनाविषयीचा बदलता आधुनिक दृष्टीकोन साहित्यातून व्यक्त होऊ लागला.
स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय समाज हा प्रबोधनवादी विचारांनी भारलेला होता. समीक्षकांच्या मते मराठी साहित्यातील आधुनिकतेचे नाते युरोपिय आधुनिकवादी चळवळींशी जोडलेले आहे. आधुनिकवादी चळवळी किंवा आधुनिकतावाद समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर युरोपीय समाजाची आधुनिकता ही विशिष्ट काळातील एक अवस्था आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. याचे मुख्य कारण म्हणजे युरोपीय समाजाच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही तीन-चार शतके सुरू होती.
युरोपातील आधुनिकतेचा प्रारंभ हा प्रबोधनवादी चळवळीपासून झाला, असे मानले जाते. सामान्यतः चौदावे ते सोळावे शतक या काळात युरोपमध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात फार मोठे मन्वंतर झाले. या काळात ज्ञानक्षेत्रात आणि भौतिक जीवनात झालेली क्रांती व अठराव्या, एकोणविसाव्या शतकातील प्रबोधनवादी चळवळ, या दोन्हींमधून आधुनिकता ठसठशीतपणे व्यक्त झालेली दिसते. या कालखंडात भूतकाळ व भविष्यकाळ असा दोहोंचा वेध घेण्याचा प्रयत्न दिसतो. प्राचीन विद्यांच्या अभ्यासाबरोबरच नवनवीन ज्ञानशाखांचा अभ्यास, बुद्धिवादी दृकोन, धर्मव्यवस्थेच्या वर्चस्वाला हादरा ही या काळाची काही ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पुढील कालखंडात याच्याही पुढे जाऊन धर्मचिकित्सा, इतिहास मीमांसा, उदार मानवतावाद, मानवकल्याणाचे ध्येय, वैज्ञानिकदृष्टी केंद्रस्थानी आलेले दिसते. याचाच अर्थ युरोपमध्ये अठराव्या-एकोणविसाव्या शतकात समाजाच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली दिसत असली, तरी या आधुनिकीकरणाची मूळे १४व्या ते १६व्या शतकात जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत घडून आलेल्या फार मोठ्या मन्वंतरात मुख्यतः दडलेली आहेत. प्रबोधन युगात व्यक्तिजीवनात धर्माच्या जागी व्यक्तिवाद व विवेकवाद यांची स्थापना झाली. भौतिक व तात्त्विक पातळीवर एक आधुनिक नवसमाज घडण्याची ही एक प्रक्रिया सुरू झाली.
आधुनिकतेच्या मूल्यव्यवस्थेमध्ये बुद्धिप्रामाण्यवादाला अनन्यसाधारण महत्त्व होते. धर्म, सरंजामदारी, अंधश्रद्धा, पारंपरिकता या गोष्टींना विरोध करीत त्यांच्या ठिकाणी विज्ञान, व्यक्तीचे स्वातंत्र्य, इहवादी दृष्टीकोन, समता या गोष्टीची प्रतिष्ठापना महत्त्वाची मानली जाऊ लागली. मानवी बुद्धीच्या साहाय्याने विकास घडवून आणून माणसाचे आयुष्य सुखसमृद्धीचे करता येईल, असा आशावाद आधुनिकतेच्या व्यवस्थेमागे होता.
पाश्चात्त्य आधुनिकतावादामागे प्रबोधनाची आणि पुनर्स्थापनेची पार्श्वभूमी होती. धर्म आणि विज्ञाननिष्ठा किंवा विवेक आणि श्रद्धा यांचा संघर्ष होता. फ्रेंच राज्यक्रांतीतून जीवनाच्या विविधांगात जे परिवर्तन झाले, त्याला जो वैचारिक आधार होता त्याबाबतचा संदेह व त्याचे पुनर्मूल्यन म्हणजे ‘आधुनिक प्रवृत्ती’ होय, असे सामान्यतः मानले जाते.
विवेकवाद, वैज्ञानिकदृष्टी, वाढती भौतिक प्रगती यांच्या प्रभावामुळे ‘आधुनिकता’ ही समाजाची केवळ एक अवस्था न राहता जीवनमूल्य बनले. ‘आधुनिक असणे’ म्हणजे आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतून उदयाला आलेल्या मूल्यव्यवस्थेचा स्वीकार करणे, हे महत्त्वाचे ठरले.
या पार्श्वभूमीवर एकोणिसाव्या शतकातल्या महाराष्ट्राचा विचार केला, तर असे दिसते की, महाराष्ट्रातील विचारवंतांवर या ‘आधुनिक’ विचारसरणीचा फार मोठा प्रभाव पडला. त्या काळात नवशिक्षणासोबतच धर्मचिकित्सा, वैज्ञानिकता, उदारमतवाद या मूल्यविचारांच्या परिचयामुळे एकूणच जगण्याचा पुनर्विचार फार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि त्याचा अपरिहार्य परिणाम त्या काळातील साहित्यातून व्यक्त झालेला पाहायला मिळतो.
त्या काळात केशवसुत, ह.ना. आपटे यांसारख्या लेखकांच्या लेखनातून व्यक्त होणारी बंडखोरी, आधुनिक दृष्टी या साऱ्याच्या केंद्रस्थानी 'माणूस'च होता. प्रारंभीच्या या काळातील मराठी कवितेत आधुनिक मूल्यांचा आविष्कार होताना दिसत असला, तरी त्या कवितांना ‘आधुनिकतावादी’ म्हणता येणार नाही. केशवसुतांच्या कवितेनंतर पुढील काळात कुसुमाग्रज, अनिल, मुक्तिबोध, विंदा, सुर्वे यांच्या कवितेत मानवी मूल्यांना महत्त्व देणारी जीवनवादी ‘क्रांतदर्शी’ जीवनदृष्टी पाहायला मिळते, 'आधुनिकता' या विचारव्यूहाचा आविष्कार पाहायला मिळतो.
यापुढील काळातील मर्ढेकर, मुक्तिबोध, चित्रे, कोलटकर, सारंग यांच्या कवितेतून आधुनिकता, प्रयोगशीलता, व्यक्तिवाद यांचे प्रभावी दर्शन घडताना दिसते, या अर्थाने त्यांच्या कवितेला ‘आधुनिकतावादी’ म्हणता येईल. अर्थात त्यांना 'आधुनिकतावादी' म्हटले तरी त्यांच्याबाबतचे एक महत्त्वाचे निरीक्षण असे आहे की, त्यांनी त्यांच्या कवितेतून इथल्या परंपरेचा धागा मात्र वगळलेला दिसत नाही. ते ‘आधुनिकता’ मानत नाहीत, याचा अर्थ विश्वाबद्दलचा भाबडा आदर्शवाद, आशावाद त्यांच्या कवितेत दिसत नाही, तर ते त्यांच्या कवितेतून ‘आधुनिक’ मानल्या गेलेल्या मूल्यांबाबतचा भ्रमनिरास अधोरेखित करतात आणि या अर्थाने ते ‘आधुनिकतावादी’ होत. परंतु त्यांच्या कवितांमधून त्यांनी परंपरेला पूर्णपणे नाकारलेले आहे, असेही दिसत नाही, तसेच ते पूर्णपणे इहवादी आहेत, असेही दिसत नाही.
या कालखंडात ज्या ज्या गोष्टींना ‘आधुनिक’ विचारात महत्त्वाचे मानले जात होते, त्या त्याविषयीचे अनेक प्रश्न ‘आधुनिकतावादा’त उपस्थित झालेले दिसतात. आधुनिक मानल्या गेलेल्या आदर्श मूल्यांविषयीचा भ्रमनिरास, अर्थशून्यतेचे भान, व्यक्तिवाद, मौलिकता, प्रयोगशीलता, कलेची स्वायत्तता, श्रेणीबद्धता, अशी आधुनिकतावादाची काही ठळक वैशिष्ट्ये त्या काळातील कवितेतून दिसून येतात.
याच कालखंडात ‘आधुनिकतावादा’चा पुरस्कार करणाऱ्यांकडून प्रयोगशीलतेच्या नावावर एक चौकटबंद स्वतंत्र विश्व निर्माण केले गेले. कलेतील स्वायत्ततेच्या नावाखाली एक प्रकारची हुकूमशाही निर्माण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली की काय, अशी स्थितीदेखील निर्माण झाली.
आधुनिकतावादातील ‘अभिजात’ आणि ‘लोकप्रिय’ या श्रेणीबद्धतेमुळेदेखील एक प्रकारच्या तुच्छतावादाला बळकटी मिळते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. उदा. बहुजनाची जी संस्कृती (mass culture) आधुनिक काळात निर्माण झाली, तिच्याकडे आधुनिकवादी साहित्यातून काही वेळा तुच्छतेने पाहिलेले दिसते. त्यामुळे ‘आधुनिकते’ची स्थिती आणि कलेतील, साहित्यातील ‘आधुनिकतावाद’ यांच्यामध्ये एक प्रकारचे विरोधाचे नाते दिसून येते.
पारंपरिक कलात्मक संकेतव्यूह मोडीत काढून सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयोग, विशेषतः रूपाच्या व घाटाच्या पातळीवर करत राहणे, हे कलेतील आधुनिकतावादाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, परंतु रूपाच्या पातळीवरील प्रयोगशीलतेबरोबरच राजकीय वा सामाजिक पातळीवर पारंपरिक दृष्टीकोन, हे सुद्धा आधुनिकवादामध्ये आढळतात. वृत्तीच्या बाबतीत अभिजन प्रवृत्ती आणि बहुजन प्रवृत्ती असा हा अंतर्विरोध आहे, असेही प्रत्ययाला येते. आधुनिक आविष्कार आणि पारंपरिक भूमिका, असे हे द्वंद आहे.
थोडक्यात, आधुनिकतावादाचा संबंध हा सामाजिक गुंतागुतीच्या पर्यावरणाशी आहे असे दिसून येते. मूलतः मराठीतल्या साठोत्तरी कवींच्या कवितेतून दिसणाऱ्या आधुनिकतावादी प्रेरणा या पाश्चिमात्य साहित्यपरंपरेतून प्रेरित होत्या. त्यामुळे आधुनिकतावादी साहित्यामध्ये एका विशिष्ट वर्गाचेच संकुचित व मर्यादित सांस्कृतिक विश्वाचे चित्रण होऊ लागल्यामुळे त्याला मर्यादा पडली. या आधुनिकतावादी साहित्यातून नवतेचा आव आणलेला दिसत असला, तरी साहित्याची संरचना मात्र पारंपरिकच राहिली. त्यामुळे या आधुनिकतावादी आत्मकेंद्री जाणिवेतून बाहेर पडण्याच्या तीव्र जाणिवेतूनच साहित्यातील उत्तर-आधुनिक स्थितीचा प्रारंभ झालेला दिसून येतो.
आधुनिकतेच्या काही पैलूंकडे साशंकतेने पाहणाऱ्या आधुनिकतावादामध्येच असणारे अंतर्विरोध पुढील काळात स्पष्ट होऊन आधुनिकतेची अवस्था आणि एकूणच आधुनिकतावाद संपल्याची जाणीव निर्माण झाली व त्यातूनच पुढे उत्तर-आधुनिकतावाद सुरू झालेला दिसतो. आधुनिकतावादामध्ये अनुस्यूत असणाऱ्या तत्त्वांचीच तार्किक परिणती म्हणजे उत्तर-आधुनिकवाद, असेही मत काही विचारवंतांनी नोंदवलेले आहे.
पारंपरिक ज्ञानमीमांसेमध्ये ‘ज्ञाता’ आणि ‘वस्तू’ असे ज्ञानप्रक्रियेचे घटक गृहीत धरलेले होते. त्यांपैकी वस्तुरूपाचे विघटन आधुनिकतावादामध्ये झाले, तर उत्तर-आधुनिकवादामध्ये त्याही पुढची अवस्था गाठली जाते. त्यात केवळ वस्तुरूपाचे, वस्तुगततेचेही विघटन होत नसून ज्ञातृगततेचे, सुसंगत अशा ज्ञात्याचे /कर्त्याचेही (subject, agency) विघटन होते.
साधारणतः १९६०नंतरच्या काळात विकसित पाश्चात्त्य समाजात कला व विद्याशाखा यांमधील आधुनिकता लोप पावली की काय, असे वाटण्याइतपत तीव्र स्वरूपाचे बदल दिसू लागले. येथेच उत्तर-आधुनिकतेचा किंवा उत्तर आधुनिक स्थितीचा प्रारंभ झाला, असे मानले जाते.
विकसित, आधुनिक मानल्या गेलेल्या देशांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक व राजकीय प्रक्रिया सुरू झाल्या. त्यातून उत्तर-आधुनिक परिस्थिती निर्माण झाल्याची लक्षणे दिसू लागली. या काळात भांडवलशाहीचे स्वरूप हळूहळू बदलत गेले. केवळ शासकीय सत्ता वापरून एकाधिकार गाजवण्यापेक्षा बाजारपेठेचे प्रचंड आकर्षण वापरून भांडवलशाहीने स्वतःचे संरक्षण सुरू केले. बचत करण्यापेक्षा खर्च करण्यावर भर देणे, मानवी व्यक्तिनाच ‘साधन’ आणि ‘भांडवल’ म्हणून वापरणे, या प्रक्रियांमधून भांडवलशाहीचे नवे रूप प्रत्ययाला येऊ लागले, तिचे ‘उत्तर-आधुनिक’ रूप स्पष्ट होऊ लागले.
आधुनिकतावादाने या आधुनिक समाजव्यवस्थेची, मूल्यव्यवस्थेची परखड चिकित्सा केली, काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आणि याच विचारात उत्तर-आधुनिकवादाचा उगम दिसून येतो. रोलँ बार्थस्, मिशेल फुको, जॅक देरिदा या उत्तर-आधुनिक विचारवंतांच्या लेखनात त्यांचे आधुनिकतावादाशी असलेले नाते दिसून येते, परंतु त्यांनी केलेली मांडणी मात्र अंतिमतः आधुनिकतेच्या विरोधातच दिसते. अशा प्रकारे अनेक वैचारिक अंतर्विरोधांनी, परस्परविरोधी कल्पनांनी उत्तर-आधुनिक विचार आकाराला आला आहे.
मूलतः आधुनिकता व उत्तर-आधुनिकता या पाश्चात्त्य संस्कृतीच्या दोन अवस्था आहेत, असे मत अनेक विचारवंतानी मांडले आहे, परंतु या संदर्भातील उत्तर-आधुनिकतावादाची सैद्धान्तिक मांडणी करण्याचे पूर्ण श्रेय ज्याँ फ्रान्सुआ ल्योतार या फ्रेंच विचारवंताला जाते.
मूलतः आधुनिकतावादात ज्या ज्या गोष्टींना अतिरेकी महत्त्व प्राप्त झाले होते, त्या सर्वांना उत्तर-आधुनिकवादाने परखडपणे नाकारले. जसे की, आधुनिकतावादातील केंद्र, पाया, अभिजात व लोकप्रिय ही श्रेणीबद्धता, मौलिकता, कलेची स्वायत्तता, सलगता यासारख्या अनेक गोष्टी उत्तर आधुनिकतावादात नाकारलेल्या दिसतात. सामान्यतः आत्मजाणीव, चिंतनपरता, खंडितता, सातत्यहीनता, अनिश्चितता, बहुविधता, विकेंद्रितता, हास्यास्पदता, आंतरसंहितात्मकता अशी काही वैशिष्ट्ये उत्तर-आधुनिक साहित्यात प्रकर्षाने व्यक्त झालेली दिसतात.
आशय वैशिष्ट्यांच्या दृष्टीने विचार केल्यास उत्तर-आधुनिकतावादात कोणतीही वैचारिक, सैद्धान्तिक चौकट किंवा विचारधारा ही सार्वभौम निरपेक्ष व सनातन सत्य नसते, हा चिंतनाचा मुख्य गाभा मानलेला आहे. या अर्थाने उत्तर-आधुनिकता कोणत्याही एका विशिष्ट वर्गाची सांस्कृतिक मक्तेदारी व त्या वर्गाने ओरडून ओरडून लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केलेले तथाकथित अंतिम सत्य नाकारते. उत्तर- आधुनिकतेत विविधता आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य असते.
थोडक्यात उत्तर-आधुनिकतावाद्यांनी संस्कृतीचे एकारलेपण नाकारले, अनेकत्व स्वीकारले, बहुसांस्कृतिकतावाद स्वीकारला. इतिहासाच्या संगतवार, सलग मांडणीला नाकारताना कोणताही एकसत्तावाद तीव्रतेने नाकारला.
मूलतः जागतिकीकरणपूर्व काळातला सामाजिक अनुभव आणि जागतिकीकरणोत्तर कालखंडातील सामाजिक अनुभव हा भिन्न असल्याने त्या अनुभवांना दिलेला भावनिक प्रतिसादही अपरिहार्यपणे भिन्न असणं अगदी स्वाभाविक होते. जागतिकीकरणोत्तर काळात भारतासारख्या उतरंडप्रिय समाजातील (hierarchical) जुनी मूल्ये, ज्येष्ठ पिढीबद्दल धाक, चिरंतन समजल्या जाणाऱ्या पारंपरिक मूल्यांबद्दलचा आदर अशा अनेक गोष्टी बदलत जाऊन, ही उतरंडप्रिय व्यवस्था बदलत जाऊन लोकशाही, समतेच्या, मानवतेच्या नव्या मूल्यांची प्रतिष्ठापना करणारी एक आडवी (horizontal) समाजव्यवस्था अस्तित्वात आली.
या अशा आडव्या समाजरचनेत स्थैर्याऐवजी गतिशीलता, दडपणाऐवजी संवाद, जन्मदत्त अधिकारांऐवजी मानवी अधिकार, रम्यतेऐवजी प्रखर वास्तवतेचे दर्शन, एका विकल्पाऐवजी अनेक विकल्पांची उपलब्धता हे उत्तर-आधुनिक काळाचे म्हणजे आडव्या समाजरचनेचे महत्त्वाचे विशेष ठरले.
संपूर्ण जगभरातले दडपलेले आवाज उत्तर-आधुनिक काळात मुक्तपणे व्यक्त होऊ लागले. उत्तर-आधुनिक विचारात विविधतेला, सर्वसमावेशकतेला महत्त्व असल्याने लोकतत्त्वाला, लोकशाहीला, विकेंद्रीकरणाला महत्त्व आले. केंद्रांऐवजी परिघांवरच्या आवाजांना महत्त्व प्राप्त होऊन, सर्वच क्षेत्रातील एकचालकानुवर्ती हुकुमशाही केंद्रे संपुष्टात आली. भाषा, धर्म, समाज, राष्ट्र यांच्या तथाकथित भिंती कोसळून विकेंद्रीकरणाला महत्त्व आल्याने स्थानिक गोष्टींना व्यासपीठ प्राप्त होऊ लागले. जगभर विषमता नष्ट करणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक चळवळी निर्माण होऊन ‘प्रतिसंस्कृती’ (counter culture) निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागला.
साहित्य, समाज, विचार, सामाजिक व्यवहार, ज्ञानाची क्षेत्रे अशा सर्वच गोष्टींच्या सरमिसळीतून निर्माण झालेल्या या उत्तर-आधुनिक संस्कृतीने विकेंद्रीकरणाला नितांत महत्त्व दिले. या उत्तर-आधुनिक संस्कृतीतून निर्माण झालेल्या उत्तर-आधुनिक साहित्याच्या निर्मितीमागे समाजात विचारांच्या आणि अनुभवांच्या सामान्यतः स्वीकारल्या गेलेल्या तथाकथित पद्धतींना धक्का देऊन अस्तित्वाची निरर्थकता जाणवून देणे, तद्वतच आपली तथाकथित सुरक्षिततेची भावना ज्या आभासी आधारांवर लटकलेली आहे, त्यांच्यातील फोलपणा दाखवून देणे, हा विचार व्यक्त झालेला दिसतो.
उत्तर-आधुनिकतेची एक स्थिती असलेल्या जागतिकीकरणामुळे संपूर्ण जगच एका खेड्यासारखे झाले व या साऱ्याचे अपरिहार्य दर्शन उत्तर-आधुनिक साहित्यातून व्यक्त झालेले दिसते.
१९९०नंतरचा कालखंड हा जागतिकीकरणाच्या बदलत्या सांस्कृतिक पर्यावरणामधील अनेक घडामोडींचा कालखंड होय. याच कालखंडात मराठी साहित्यातील साठोत्तरी वाङ्मयीन प्रवाहांचे स्वरूप आमूलाग्र बदलले. या वाङ्मयीन प्रवाहांवर जागतिकीकरणाचा प्रभाव पडला. आधुनिक मराठी साठोत्तरी कविता जागतिकीकरणाची प्रक्रिया समजावून घ्यायला अपुरी पडते, असे नव्वदोत्तर कवितेला वाटू लागल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर-आधुनिकतावादाच्या दृष्टीकोनातून या कालखंडातील कवितेचा अभ्यास करणे महत्त्वाचे वाटल्यानेच प्रस्तुत ग्रंथात त्याविषयी सविस्तर विवेचन केले आहे.
जागतिकीकरणानंतरच्या काळात सुसंगती, एकात्मता, सलगता या कल्पनाच बाद झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मूल्यांबाबतचे एक संदिग्ध वातावरण निर्माण झाले. खरे-खोटे, सत्य-असत्य, बरे-वाईट, नीती-अनीती याचा विवेक करता न येणं, अशी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली. त्यामुळे आर्थिक प्रश्नांबरोबर, आर्थिक पेचांबरोबर अनेक सांस्कृतिक प्रश्न आणि पेचही निर्माण झाले आहेत.
याचा काही एक परिणाम १९९०नंतरच्या मराठी कवितेवर झाला आहे. साठोत्तरी कालखंडातील आधुनिकतावादी कवितेत ‘स्व’विषयक (Self) अनेक प्रश्न उपस्थित केलेले दिसतात, परंतु उत्तर-आधुनिक विचारात हा ‘स्व’च विखंडित झाला, तर काही वेळा हा ‘स्व’च नष्ट होतोय की काय, असे Loss of selfचे ‘स्व’ हरवल्याचे किंवा तो self नेमका Define न करता येणं यासारखे अनंत प्रश्न निर्माण झालेले दिसतात.
यातूनच पुढे Loss of Identity, मी कोण? माझी ओळख काय, यासारखेही प्रश्न विस्तारत गेलेले दिसतात. आधुनिकतावादात ज्या ‘वास्तवा’ला (Reality) फार महत्त्व प्राप्त झालं होतं, त्याच वास्तवाच्या जागतिकीकरणोत्तर काळात पार चिंधड्या उडालेल्या असून आभासी वास्तवाने (virtual Reality) स्व व स्वेतर यातल्या सीमारेषाच पुसून टाकल्याने एक ओळख हरवलेला (Loss of Identity) असा समाज कसा निर्माण झाला, या सर्व गोष्टींचं दर्शन नव्वदोत्तरी कालखंडातील या ग्रंथात निवडलेल्या आठ कवींच्या कवितेत प्रभावीपणे व्यक्त झालेलं दिसतं.
जागतिकीकरणोत्तर काळातील विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळे ‘माणूस’ असण्याविषयीचेच अनंत प्रश्न निर्माण झालेले दिसतात. End of history, End of Ideology, End of Man, Death of the Author वेगवेगळे प्रश्न उत्तर-आधुनिक विचार उपस्थित करत राहतो.
अशा रीतीने उत्तर- आधुनिकवाद एक प्रकारच्या नकाराचं तत्त्वज्ञान मांडता मांडता ‘Now’ हे ‘या क्षणा’चं तत्त्वज्ञान घडवताना दिसतो. जागतिकीकरणोत्तर काळात सर्वत्र पसरलेलं Multinational's चं जाळं, अक्राळविक्राळ मॉल संस्कृती, सोशल मीडियाचा प्रचंड वेग, विज्ञान-तंत्रज्ञानाची अफाट गती या साऱ्याचं दर्शन उत्तर-आधुनिक साहित्यातून घडतांना दिसते.
मराठी कवितेपुरतं या संदर्भात बोलायचं ठरवलं, तर जागतिकीकरणोत्तर कालखंडातील हा सारा प्रचंड वेगानं होणारा बदल नव्वदोत्तरी कालखंडातील कर्वीना नेमका उमगलाय. त्यामुळे साठोत्तरी कवींच्या कवितेत येणारा व्यवस्था परिवर्तनाचा रोमँटिक आग्रह या नव्वदोत्तर कवींनी सहज टाळला आहे. अर्थात नव्वदोत्तर उत्तर-आधुनिक जाणिवा आपल्या कवितेतून व्यक्त करणाऱ्या या कवींसोबतच साठच्या दशकातील सेंटिमेंटल भावगीतांसारखी भावबंबाळ कृतक स्वरूपाची कविताही समांतररित्या लिहिली जात आहेच. परंतु त्या कवितांमधून जागतिकीकरणोत्तर कालखंडात निर्माण झालेल्या अनंत प्रश्नांना भिडणाऱ्या व्यामिश्र संवेदनशीलतेचं अजिबात दर्शन घडत नाही. त्यामुळे त्या प्रकारच्या भावबंबाळ कवितांचा या ग्रंथात विचार केलेला नाही.
जागतिकीकरणोत्तर काळात विविध मानवी समाजांतर्गत बौद्धिक आणि सांस्कृतिक संकर शक्य झाल्याने उत्तर-आधुनिक विचाराच्या पर्यावरणाला पूरक वातावरण निर्माण झालं आणि ते कवितेतही सहज झिरपलं. खरे तर ज्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक इ. इ. प्रश्नांची पार्श्वभूमी साठ-सत्तरच्या दशकातल्या बंडखोर चळवळींना होती, ते सारे प्रश्न काही नव्वदनंतरच्या काळात पूर्ण संपुष्टात आलेत असे घडले नाही, तर उलट त्यात अधीकच्या प्रश्नांची, संघर्षांची भर पडली.
या साऱ्या प्रश्नांकडे जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानानं बदललेल्या जगण्याकडे नव्वदोत्तर कवी एका वेगळ्याच सामाजिक-सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून बघू लागल्यामुळे त्यांच्या कवितेच्या आशय-अभिव्यक्तीचा पोतच आमूलाग्र बदलला. जागतिकीकरणाने जगभरात आर्थिक समृद्धीसोबतच एक फार मोठा संस्कृतिसंकरही घडून आला आणि त्यातून निर्माण झालेल्या व्यामिश्र संवेदनशीलतेचा एक ‘डिव्हाइस’ म्हणून नव्वदोत्तर कवींनी वापर करून घेतलेला दिसतो. आर्थिक स्वायत्तता की सांस्कृतिक अस्मिता या जागतिकीकरणोत्तर काळात उभ्या राहिलेल्या एका फार मोठ्या उत्तर-आधुनिक तात्त्विक प्रश्नाला नव्वदोत्तर कविता फार जोरकसपणे भिडताना दिसते.
मूलतः जागतिकीकरणाचे परिणाम हे काही फक्त भौतिक स्तरावरच झाले, असं नव्हे, तर ते सांस्कृतिक स्तरावरदेखील तितक्याच जोरकसपणे झाले. अर्थात ही प्रक्रिया द्वितर्फी आहे. त्यामुळे काळाच्या ओघात बदलणाऱ्या जगासोबत आपल्या जाणिवांमध्ये होणाऱ्या बदलांना नाकारून जुन्यालाच कवटाळून बसण्याची वृत्ती वास्तवाला बदलू शकत नाही, हे भान नव्वदोत्तर कवितेत व्यक्त झाले आहे. या दृष्टीकोनातून पाहिल्यास ही कविता खऱ्या अर्थाने भोवतालाचं नेमकं भान प्रकट करणारी कविता आहे, असे म्हणता येते.
जुन्या काळाच्या स्मरणरंजनात अडकून त्याचे कितीही गोडवे गात बसले तरी जागतिकीकरणाची सर्वव्यापी सामाजिक प्रक्रिया थांबू शकणार नाही याचे नेमके भान नव्वदोत्तरी कवना आहे. अर्थात त्यामुळे जागतिकीकरणाला ‘चांगलं’ किंवा ‘वाईट’ अशा कोणत्याही एकाच चष्म्यातून न बघता समाजातला एक अभूतपूर्व बदल (Paradigm shift) म्हणून वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहिल्यामुळे कोणतेही अंतिम सत्य महत्त्वाचे न ठरता समकालीन वास्तवाला समजून घेणं, त्या प्रक्रियेला महत्त्व देणं हे नव्वदोत्तरी उत्तर-आधुनिक कवितेत महत्त्वाचं ठरलं आहे. अशा पद्धतीने उत्तर-आधुनिक शैलीनुसार कवितेच्या संहितावाचनाचे परस्परविरोधी (self-contradictory) प्रयोगदेखील झालेले पाहायला मिळतात.
जागतिकीकरणोत्तर काळात माहितीतंत्रज्ञान क्रांतीमुळे तर संपूर्ण जगण्याचं डिजिटलायझेशन होऊ लागले आहे. साहित्याच्या संदर्भात विचार केला तर छापील संहितेची जागा डिजिटल ‘अतिसंहिता’ (Hypertext) घेऊ पाहत आहे. अतिसंहितेत एका संहितेतून दुसऱ्या संहितेत शिरण्यासाठीचे दुवे (Links) उपलब्ध असतात, त्यामुळे वाचक एका संहितेतून दुसऱ्या संहितेत सहज शिरू शकतो. या अर्थाने अतिसंहिता ही परस्परसंवादी (Interactive) अशी असल्यामुळे अतिसंहितेत विविध साहित्यप्रकारांची उत्तर-आधुनिक सरमिसळ सहजपणे प्रकट होते.
उत्तर-संरचनावादी विचारात कोणतीही संहिता ही एखाद्या स्वतंत्र ‘बेटा’सारखी नसते, तर तिचे नाते, तिचा अर्थ हा अन्य संहितांवरही अवलंबून असतो यालाच ‘आंतर-संहिता संबंध’ (Inter-textuality) म्हटलेले आहे. या संदर्भात फ्रेंच विचारवंत डेल्यूझ (Gilles Deleuze) आणि फेलिक्स ग्वात्री (Felix Guattari) यांनी ऱ्हायझोम (Rhizome) म्हणजे ‘भुईसपाट पसरत जाणाऱ्या मुळां’च्या प्रतिमेचा वापर केला आहे. त्यांच्यामते एखादी संहिता किंवा मानवीविचार हे या ऱ्हायझोमसारखे असतात.
अविनाश सप्रे यांनी ‘अभिधानंतर’ दिवाळी २००६च्या अंकात आंतर-संहिता संबंध व ऱ्हायझोम प्रतिमा यांना नव्वदोत्तर कवींशी जोडलेले आहे. त्यांच्या मते, “नव्वदोत्तरी कवितेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कवितेला ‘केंद्र’ नाही आणि ‘केंद्र’ नाकारण्याची ही बंडखोर वृत्ती ही उत्तर- आधुनिक तत्त्वजाणिवेचा एक प्रभावी आविष्कार आहे. केंद्र निर्माण झाले की, त्याची एक सत्ता निर्माण होते आणि ती सत्ता टिकवण्यासाठी एकाधिकारशाहीचा धोका संभवतो. त्यामुळे कवितेपेक्षा कवीचे महत्त्व वाढले की, अवांतर गोष्टींना येणारे महत्त्व टाळण्यासाठी उत्तर-आधुनिक विचारात केंद्र ही संकल्पनाच नाकारली आहे. नव्वदोत्तर कवींच्या विविध काव्यसंग्रहातून हायझोम सारखा एक आंतर-संहितासंबध (Inter-textuality) प्रत्ययाला येतो. एकाच्या काव्यविचारातील पाळेमुळे दुसऱ्याच्या, तिसऱ्याच्या काव्यविचारात ऱ्हायझोमसारखी पसरलेली दिसतात, या कर्वीमध्ये एक वेगळाच काव्यात्म भ्रातृभाव (Poetic Brotherhood) प्रत्ययाला येतो आणि नव्वदोत्तरी कविता ही ‘समकालीन’ आहे, हे विधान खऱ्या अर्थाने, आणि व्यापक रूपात इथे सिद्ध होते.’’
उपरोक्त विधानाचा प्रभावी प्रत्यय प्रस्तुत ग्रंथात निवडलेल्या कवींच्या कवितांचा विचार करताना सातत्याने येतो. साठोत्तरी काळात किंवा त्यापूर्वीच्या काळात एकेका कवीची स्वतंत्र ओळख (Identity) असायची, पण जागतिकीकरणोत्तर काळातील या उत्तर-आधुनिक संवेदन व्यक्त करणाऱ्या या कवींच्या कवितेतून Loss of Self हा एक वैश्विक भाव व्यक्त होत असल्याने त्यांच्या कवितेतून एक व्यक्ती म्हणून उभे राहण्यापेक्षा अनेक आवाजांची सरमिसळ त्यामध्ये जाणवते या अर्थाने ऱ्हायझोम'सारखी ही नव्वदोत्तर कविता एकमेकांत गुरफटलेली दिसते.
जागतिकीकरणोत्तर काळात फार मोठ्या प्रमाणात बौद्धिक आणि सांस्कृतिक संकर झाला आणि संपर्काचे, संस्कारांचे असंख्य मार्ग उपलब्ध झाल्यामुळे नव्वदोत्तर कवितेला ‘बहुसंपर्कप्रवण’ असे पर्यावरण लाभले. जागतिकीकरणामुळे पारंपरिक स्थिर समाजाची रचनाच अंतर्बाह्य बदलली व स्थिर मूल्यांची जागा सातत्याने होणाऱ्या मूल्य परिवर्तनाने घेतली. या परिवर्तनातून असह्य भावनिक ताणतणाव निर्माण झाले, किंबहुना असे वेगवेगळ्या स्तरावरचे ताणतणाव हेच उत्तर-आधुनिक समाजाचे वैशिष्ट्यच आहे. या साऱ्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून नव्वदोत्तर कालखंडातील नव्या कवितेतून आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच स्तरातील संकल्पनांची, अधिसत्तेची विरचना पाहायला मिळते.
या नव्वदोत्तर कवितेला देशीवादी, सौंदर्यवादी किंवा महानगरी अशा कोणत्याही चौकटीत बसवणे तिच्यावर अन्यायकारकच ठरेल, कारण ही कविता सर्व प्रकारच्या चौकटींचा निषेध करते. जागतिकीकरणोत्तर काळात अवतरलेल्या उत्तर-आधुनिकवादाने जे एक साहित्यिक पर्यावरण निर्माण केलं, त्या साहित्यिक पर्यावरणात साधारणतः तीन प्रकारची कविता दिसून येते.
एक म्हणजे थेट उत्तर-आधुनिकतावादाचा प्रभाव असलेली, दुसरी उत्तर-आधुनिक लक्षणांचा काही एक संस्कार दिसणारी कविता, तर तिसरा प्रकार म्हणजे थेट अनुकरणातून पुढे आलेली. अशा रितीने नव्वदोत्तर काळात उत्तर-आधुनिक संवेदन व्यक्त करणाऱ्या कवितेसोबतच समांतररीत्या महानगरी, महानगरेतर छोट्या शहरातील, कृषी-संस्कृतीशी संबंधित गावगाड्यातील, दलित, आदिवासी समूहातील अशा वेगवेगळ्या संवेदनांशी संबंधित कविता समकाळाचा वेध घेतांना दिसते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
या विविध संवेदनांसह लिहिणाऱ्या कर्वीमध्ये अरुण काळे, महेंद्र भवरे, भुजंग मेश्राम, प्रज्ञा दया पवार, नीरजा, कविता महाजन, वीरधवल परब, दिनकर मनवर, मंगेश काळे, मनोज पाठक, श्रीकांत देशमुख, संतोष पद्माकर पवार, अजय कांडर, गोविंद काजरेकर, अविनाश गायकवाड, लोकनाथ यशवंत, गणेश विसपुते, प्रफुल्ल शिलेदार, श्रीधर नांदेडकर, दासू वैद्य अशी अनेक नावे घेता येतील. परंतु या वेगवेगळ्या संवेदनांसह व्यक्त होणाऱ्या अनेक कवींच्या कवितांचा वेध या ग्रंथात साकल्याने घेणे शक्य नाही. त्यामुळे विस्तारभयास्तव विषयाची एक निश्चित अशी चौकट आखून उत्तर-आधुनिक संवेदन ज्यांच्या कवितेत प्रभावीपणे व्यक्त झाले आहे, अशा नामदेव ढसाळ, श्रीधर तिळवे, हेमंत दिवटे, वर्जेश सोलंकी, सलील वाघ, सचिन केतकर, संजीव खांडेकर आणि मन्या जोशी अशा आठ निवडक प्रातिनिधिक कवींचाच समावेश या ग्रंथात केला आहे.
नव्वदोत्तर कालखंडातील उत्तर-आधुनिक जाणिवा व्यक्त करणाऱ्या या आठ निवडक कवींनी आपापल्या अनुभवक्षेत्राशी संबंधित प्रश्न प्रामाणिकपणे आजच्या वर्तमानाच्या भाषेत जोरकसपणे उपस्थित केले आहेत. उपरोक्त वस्तुस्थिती पाहता मराठी कवितेत उत्तर-आधुनिक विचार पूर्णांशाने प्रकट झाला आहे, असे जरी ठामपणे म्हणता येत नसले, तरी प्रस्तुत ग्रंथात निवडलेल्या आठ निवडक कवींच्या कविता पाहता, त्यांच्या कवितांमधून ‘उत्तर-आधुनिक संवेदन’ प्रभावीपणे व्यक्त झाले आहे, असे अभ्यासांती निश्चितपणे म्हणता येते.
‘उत्तर-आधुनिकता आणि मराठी कविता’ - मीनाक्षी पाटील
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई | पाने – २३० | मूल्य – ३२५ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment