कोची बिएनाले : कलाभिव्यक्तीच्या वेगळ्या प्रकारच्या इयत्तेचं दर्शन!
पडघम - सांस्कृतिक
शिरीष घाटे
  • कोची बिएनाले
  • Mon , 10 April 2017
  • पडघम सांस्कृतिक कोची-मुझरिस बिएनाले Kochi-Muziris Biennale काळा घोडा Kala Ghoda इंडिया आर्ट फेअर India art fair शिरीष घाटे Shirish Ghate

या वर्षीचा कलायोग छानच होता. महानगरांपासून दूरवर राहून कलाक्षेत्रातील नवनवीन प्रवाह\ घडामोडी जाणून घेणं, कलाप्रकाराची ओळख करून घेणं, कलाप्रकार-कलावंतांना समजून घेणं खूपच अवघड असतं. सतत नवं पाहणं आवश्यक असतं. म्हणूनच ‘इंडिया आर्ट फेअर’बद्दल वाचत होतो, पण मुद्दाम तेवढ्यासाठी १४००-१५०० कि.मी. दूर दिल्लीला जाण्याचा योग येत नव्हता. या वर्षी मात्र तो आणलाच. दरवर्षीची ‘वर्ल्ड बुक फेअर’ची वारी चुकून यंदा ‘आर्ट फेअर’ला जायचं ठरवलं. म्हणजे ‘आषाढी वारी’ चुकवून ‘माहेवारी’ केल्यासारखं! ‘मॉडर्न अँड कंटेपररी आर्ट फेअर’ हे बिरुद मिरवणारी ही कलाजत्रा. सलग चार दिवस चालणाऱ्या या कलाजत्रेमध्ये पहिला दिवस निमंत्रितांसाठी असतो, तर पुढे दोन दिवस बिझनेस आणि चार तास प्रेक्षकांसाठी. शेवटचा पूर्ण दिवस रसिक प्रेक्षकांसाठी.

इथं देशातल्या सर्व महानगरांतील महत्त्वाच्या आर्ट गॅलरीज आणि कलेक्टर्सची सुरेख मांडणी केलेली दालनं पाहायला मिळतात. नवीन चित्रकारांपासून जुन्या-जाणत्या, प्रथितयश, थोर चित्रकारांच्या कलाकृतींची सुंदर मांडणी, अप्रतिम लाईट इफेक्ट, सुखद एसीचं थंड वातावरण, खाली कार्पेट, इंग्रजी वगैरे भाषांमध्ये कुजबुजणारे जाणकार, समीक्षक, कलावंत, प्रेक्षक सारंच. आपापले मोठमोठे गळ्यातील कॅमेरे सरसावून फिरणारे रसिक. देश-विदेशातील आर्ट गॅलरीज स्वत:च्या कलावंतांची कला मांडणशिल्पातून, कॅनव्हॉस, व्हिडिओ आणि सर्व प्रकारच्या कला माध्यमातून प्रदर्शित करतात. भरपूर कॅटलॉग्ज, माहितीपत्रकं प्रत्येक दालनातून समोर येतात. तीन अवाढव्य पेंडॉल्समधून एकाच दिवसात सारी जत्रा पाहणं अशक्यच होतं. नवीन कलावंतांसाठी एक छान फ्लॅटफॉर्म या माध्यमातून उपलब्ध होतो हे नक्की. व्यावसायिक दृष्टिकोनातून सादर होणारी या कलाकृतींची खरेदी-विक्री या फेअरचं वैशिष्ट्य. पण यासह हे सर्व पाहण्यासारखं.

यानंतर फेब्रुवारीच्या चार ते बारा तारखेपर्यंत महाराष्ट्राची राजधानी, मुंबईत झालेला काला घोडा महोत्सव. बालकला, सिनेमा, नृत्य, नाट्य, दृश्यकला, संगीत, साहित्य, वास्तुकला, हेरिटेज वॉक, खाद्यजत्रा अन रस्ताभर वेगवेगळ्या कलात्मक वस्तूंची दुकानं एवढा मोठा व्याप या महोत्सवाचा. सात दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत या परिसरातील २५-३० ठिकाणी वेगवेगळ्या कलाप्रकारात चाललेले कार्यक्रम पाहायला मिळतात. ठिकठिकाणचे चित्रपट, त्यावर परिसंवाद आणि चर्चा होतात. नाट्यकलेतील विविध प्रकारांचं सादरीकरण, संगीत आणि गायन क्षेत्रातील क्लासिकपासून पॉपरॅपपर्यंत सर्व प्रकारची संपूर्ण रेंज. पुस्तकं प्रकाशित होतात, काव्यवाचन होतं. त्यावर चर्चाही होते. आठवडाभर मुंबईतील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ठिकाणी सहली निघतात. वास्तूंची पाहणी केली जाते. चर्चा, परिसंवाद, शो, अभ्यास, वर्कशॉप्स सतत सुरू असतात. आपल्याला आवडणारा कलाप्रकार आपण निवडायचा!

शिवाय चौकात अनेक ठिकाणी मांडणशिल्पांचं प्रदर्शन, फोटोग्राफी, क्ले वर्क, कॅनव्हॉसही सुरू असतात. या सर्व गोष्टीत असतात तिथंच चौकामध्ये पन्नास-साठ स्टॉल्स. ज्यामध्ये कलात्मक वस्तूंची विक्री चालते. ज्वेलरी, कपडे, शो पिसेस आणि इतर खूप काही. मुंबईत नेहमीप्रमाणे या स्ट्रीट आर्ट महोत्सवाला अतोनात गर्दी असते. एवढ्या गर्दीत मग कलेशी तडजोड करून हौशी, नवशी, गवशी यांची जत्रा भरते. मार्केटिंग फंडा आणि मनोरंजन एवढाच हेतू उरतो. प्रत्येक जण आपल्या कलाप्रकारातून मनोरंजन करून घेतो. त्यामुळे इथून परत जाताना फारसं काही हाती लागलंच नाही, हे जाणवलं.

याच सुमारास काळा घोडापासून शेजारीच असणाऱ्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये ‘बॉम्बे आर्ट सोसायटीची १२५’ वर्षं या विषयावर सुहास बहुळकरांनी अत्यंत परिश्रमानी साकारलेलं प्रदर्शन पाहायला मिळालं. बॉम्बे आर्ट सोसायटी ही भारताच्या कलाक्षेत्रातील एक वजनदार संस्था. या संस्थेच्या वार्षिक प्रदर्शनामधून गोल्ड मेडल मिळवणं ही सर्वच कलावंतांची इच्छा असायची आणि असा हा मेडलिस्ट कलाक्षेत्रात तळपत असायचा.

संस्थेच्या पहिल्या वर्षापासून आतापर्यंत (१८९४ ते २०१६) ज्या कलाकृतींना गोल्ड मेडल मिळालं, ती प्रत्येक कलाकृती या प्रदर्शनात होती. काही चित्रकारांची मूळ कलाकृती मिळाली नाही, अशा वेळी त्या कलाकृतीचा प्रिंट व त्या कलावंताचं वैशिष्ट्य दर्शवणारी दुसरी कलाकृती इथं होती. गेल्या शतकभरात कलाप्रकारात, अभिव्यक्तीमध्ये, चित्रविषयात, माध्यमात कसकसा बदल होत गेला, याचा नेमका अभ्यास या प्रदर्शनातून होत होता. आबालाल रहिमान, धुरंधर, त्रिंदाद, सॉलोमन, धोंड सर, हुसेन, गायतोंडे, मोहन सामंतपासून आजच्या कलावंतांच्या कामाचा आढावा या प्रदर्शनातून घेतला गेला होता. सुरुवातीच्या काळातील वर्णनात्मक, दृश्यात्मक, द्विमिती-त्रिमितीचा अभ्यास, रंगलेपनाचे प्रयोग, जलरंगापासून आजच्या मिश्र माध्यमापर्यंत विकसित झालेले चित्रप्रवाह एकाच ठिकाणी पाहता आले. १९४०पासून - अमृता शेरगिलपासून- वास्तववादापेक्षा वेगळ्या प्रवाहास सुरुवात झाली. १९८०नंतरच्या जागतिकीकरणापासून अतिभव्य झालेल्या झालेल्या कॅनव्हॉसची अपरिहार्यता दिसून येते. विविध समृद्ध कलाप्रकारात झालेला बदल\प्रवास इथं लख्खपणे पाहता आला. आज या दृश्यकलेला मिळालेलं रूप कशामधून विकसित झालं हे पाहणं फारच वेधक होतं. प्रत्येक कला विद्यार्थ्यांनं अभ्यासासाठी आणि इतरांनी आपल्या कलाजाणिवांना श्रीमंत करण्यासाठी हे प्रदर्शन पाहणं अनिवार्य होतं. कलासाक्षरता वाढवण्याच्या दृष्टीनं अशी प्रदर्शनं इतर ठिकाणी होणंही गरजेचं आहे असं वाटतं.

या सर्व प्रदर्शनाचा मेरूमणी शोभेल असं प्रदर्शन गेली तीन महिने कोची इथल्या कलाप्रांगणात भरलं होतं. व्हेनिस बिएनालेपासून स्फूर्ती घेऊन ‘कोची-मुझारिस बिएनाले’ची सुरुवात झाली. या वर्षीचं हे तिसरं द्वैवार्षिक होतं. गेल्या दोन्ही प्रदर्शनाबद्दल खूप वाचलं होतं. पण पुन्हा तोच प्रश्न, एखादं प्रदर्शन पाहण्यासाठी १४००-१५०० कि.मी. दूरवर जाणं सहजपणे शक्य होत नाही. एखादं चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी उत्तरेला १५०० आणि पुन्हा दक्षिणेला १५०० कि.मी. जाणं म्हणजे वेडेपणाची परमावधीच होती. तरीही शेवटच्या महिन्यात मनानं उचल खाल्ली आणि कोचीचं तिकिट काढायला गेलो… तेव्हा कोची म्हणजे एर्नाकुलम नावाचं स्टेशन असतं हे समजलं.

एकूण तीन तास लेट झालेली कन्याकुमारी एक्सप्रेस पहाटे तीन वाजता निघाली आणि ३०-३२ तासांचा प्रवास करून पहाटे पाच वाजता एर्नाकुलमला पोहोचलो. झोपेतच आपलं उतरायचं ठिकाण येऊन जाईल म्हणून अर्धजागृतावस्थेतच रात्र काढली. पुन्हा तीन तास स्टेशनवर काढून बिएनाले असणाऱ्या फोर्ट भागात पोहोचलो. हा जुना गावाचा भाग. स्टेशनपासून दूर. साधारण अंदाज घेऊन इथलंच एक होम स्टे आरक्षित केलं. आजूबाजूस अशी अनेक घरे होम स्टे म्हणून अनेक परदेशी नागरिकांसाठी होती.

तासाभरात पुन्हा तयार होऊन लगेचच प्रदर्शनस्थळाकडे निघालो. भरपूर ऊन, हवेतला दमटपणा, घाम, समुद्र अन माशाचा वास संपूर्ण वातावरणात. प्रदर्शन स्थळ, तिथली मांडणी, भाषा, गर्दी, अन्न सारंच अनोळखी. अॅस्पिनवॉल हॉल हा प्रदर्शनाचा महत्त्वाचा आणि मुख्य भाग. तिथंच तिकिट विक्री. हे तिकिट सर्व ठिकाणी चालतं. एका चौकात फार आकर्षक नसलेली इमारत, मोठं नसलेलं आवार अशी प्रथमदर्शनी भेट. अगदी सकाळची वेळ असल्याने गर्दी फार नव्हती. थोडेसे परदेशी लोक कॅमेऱ्यांसह. तिकिट काढून एका प्रवेशदारातून आत गेलो. आतमध्ये प्रचंड मोठं आवार. जिथं तिथं भिरपूर झाडी आणि सर्व बाजूस बांधलेल्या इमारती. हॉल क्रमांक एकपासून पाहायला सुरुवात केली आणि इतर गोष्टी दुय्यम बनल्या. पांढऱ्या शुभ्र तख्तपोशीवर लावलेले कॅनव्हॉस, लाईट इफेक्टस, मंद संगीत यापैकी इथं काहीच नव्हतं. कारण या साऱ्याच्या पुढे गेलेल्या कलाप्रकाराचं दर्शन समोर घडत होतं.

कलाप्रकारात अभिव्यक्ती महत्त्वाची. ती कशा प्रकारातून, कोणत्या माध्यमातून केली आहे हा मुद्दा गौण असतो. त्यामुळेच रंग, ब्रश, कॅनव्हॉसपासून योजने दूर इन्स्टॉलेशन, व्हिडिओ, परफॉर्मिंग आर्ट अशा माध्यमातून इथला कलावंत अभिव्यक्त झाला होता. कलेतिहासाकडे पाहता कलाप्रवाहात कितीतरी बदल होत गेले. माध्यमं आणि विचारपद्धतीही बदलत गेल्या. त्यामुळे चित्रांबद्दल अगदी नेहमीसारखीच दृष्टी ठेवून तुम्ही हे प्रदर्शन पाहू शकत नाही. हे काय आहे? काय केलंय हे? समजत नाही, असं म्हणून पुढे निघून जाणं हा यावरचा उपाय होऊ शकत नाही. दृश्यकलेच्या संदर्भातील एका वेगळ्या टप्प्यावरची ही कला आहे. कलावंत आपली अभिव्यक्ती, आपले जगण्याचे संदर्भ, आपले विचार इथं विविध माध्यमांतून मांडतो.

अॅस्पिनवॉलच्या महाकाय गोदामांच्या इमारतीमध्ये ही कलात्मकता ठासून भरलेली होती. देश-विदेशातील काहीतरी वेगळं करू पाहणारे कलावंत इथं होते. इथल्या कितीतरी कलाकृतीचा उल्लेख करावासा वाटतो. अभिव्यक्तीच्या प्रकारांमधून कलावंताची दृष्टी, त्याचा हेतू, कलाप्रेरणा यांचं मनोहारी दर्शन होत होतं. आतापर्यंत अनेकांनी ज्याचा उल्लेख केला त्या स्पॅनिश कवयित्रीच्या कवितेच्या सादरीकरणाबद्दल.

हे सादरीकरण अफाट आणि आश्चर्यकारक होतं. १०० बाय ५० फुटाच्या मोठ्या गोडाउनमध्ये गुढघ्याच्या वर येईल एवढं समुद्राचं पाणी भरलेलं. गोडाऊनमध्ये अंधार. डाव्या बाजूच्या भिंतीवर १२ बाय ३० फूट उंचीची पॅनल्स. त्यावर एकच ओळ- ‘तुम्हाला समुद्र दिसतोय. तो ऐकू येतोय. तो अनुभवय येतोय’. आणि समोर १०-१२ ओळींची पूर्ण कविता- ‘द सी ऑफ पेन’. त्या कवितेकडे त्या समुद्री पाण्यातून चालत जाताना समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूतला तो लहानगा एलान कुद्री दिसायला लागतो आणि या पाण्यातून कवितेकडे जाण्याला एक वेगळाच आयाम मिळतो. ही समुद्र आणि कविता अनुभवण्याची प्रक्रिया थक्क करून सोडणारी होती. अभिव्यक्त होण्यासाठीचं माध्यम आणि मिळणारा परिणाम याची आपण सांगड घालतो. ही कविता अनुभवताना मला आणखी एक प्रश्न पडला- पाण्यात भिजू नयेत म्हणून कपडे वर करून जाणाऱ्यांना हा अनुभव कसा मिळणार? एलानचा पाच वर्षाचा भाऊ आईसह दुसरीकडे असाच मृत्यू पावतो त्याचं काय? माध्यमातून पोहोचलेला एलान सत्य तर मग बाकीचं काय? अशा प्रश्नांना उभं करणारी ही कविता वाचणं अन हा वेदनेचा समुद्र अनुभवणं हीच तर कलानिर्मिती!

अशाच प्रकारचा एकदम वेगळाच दृशात्म अनुभव देणारं इन्स्टॉलेशन होतं दरबार हॉल या ललितकला अकादमीच्या संकुलात. या अतिशय भव्य अशा हॉलमध्ये काचेचं दार ढकलून प्रवेश केल्याक्षणी मिळतो कलात्म अनुभव. संपूर्णपणे पांढऱ्या स्वच्छ भिंतीवर, छतावर, पायाखाली आणि समोर उभ्या दोन उंचच उंच स्तंभामधून छोटी-मोठी प्रतिमांची सरमिसळ दिसते. मध्यभागी स्टेनलेस स्टिलची सहा दळाची कमळ प्रतिमा (भौमितिक) लख्ख प्रकाशात टांगलेली. या साऱ्यामध्ये बसवलेले ३१ डिजिटल कॅमेरे. आपल्याच अनेकविध कोनातून टिपलेल्या प्रतिमा. समोर, डावीकडे, उजवीकडे, खाली, वर आपणच वेगवेगळ्या कोनातून एक्सपोज होत दृश्यमान होतो. आपली प्रत्येक हालचाल वेगवेगळ्या कोनातून उमटत राहते आणि आपल्याच प्रतिमेच्या रंगजाळ्यात आपण हरवून जातो. यूएसएच्या गॅरी हिल या कलावंताचं ‘ड्रीम स्टॉप २०१६’ नावाचं हे इन्स्टॉलेशन. यामध्ये साकारलेला दृश्यमेळ केवळ अप्रतिम अनुभव देणारा होता.

अशा प्रकारचे अनुभव वेगवेगळ्या देशांतून आलेल्या वेगवेगळे कलावंतांनी इथं दिलेत. फोर्ट कोची परिसरात आठ ते दहा ठिकाणी विखुरलेलं हे प्रदर्शन पाहण्यासाठी दोन-तीन दिवस अपुरे पडतात. चित्रकला म्हणजे कशाची तरी, कशावर तरी काढलेली प्रतिकृती अशी धारणा असणाऱ्या माझ्या गावा-परिसरात ही कला पाहण्याची, समजून घेण्याची साक्षरता केव्हा आणि कशी येणार? निसर्गचित्र, व्यक्तीचित्र किंवा हुबेहूब फोटोसारखी दिसणाऱ्या घोटून काढलेल्या प्रतिमा म्हणजेच सर्वोत्तम चित्रकला असं समजलं जातं. आमच्याकडे याशिवाय काही दाखवलं, पाहिलंच जात नाही. त्याविषयी वाचलं जात नाही, ऐकलं जात नाही. अमूर्त चित्रं हसण्याचा विषय ठरतात. अशा वेळी ही चित्रं पाहण्याची साक्षरता आणायची कुठून?

या पार्श्वभूमीवर पेपर हाऊसच्या मोठ्या काळोख्या हॉलमधील ताजमहालवरची कविता आठवते. या अंधाऱ्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा समोर ६०-७० फूट पेपर कॅलिग्राफीतील अक्षरांसह लाटांच्या आकारात अडकवलेला दिसला. त्यावरचा प्रकाशझोत ही कविता अक्षरांच्या लाटांमधून दाखवत होता, तर पायाजवळ दोन्ही बाजूंनी व्हिडिओ प्रोजेक्टरच्या साहाय्याने हीच कविता पाण्याच्या लाटांबरोबर हेलकावत पसरत जात होती. हा अनुभव वाचण्यापेक्षा प्रत्यक्षात घेणंच उत्तम.

अलेस स्ट्रेंजरने बनवलेला भव्य पिरॅमिड. एक थडगं. प्रतीक. आपण त्याच्या अंधाऱ्या गाभ्यामध्ये जात राहतो. चालता चालता वाट दिसत नाही. अंदाजानं चालत राहतो आणि कानावर विविध कोनांमधून वेगवेगळ्या भाषेतील कविता पडत राहतात. वेगवेगळ्या आवाजाच्या पट्टीमधून ही कविता कानामधून मेंदूपर्यंत पसरत जाते. स्वत:च्या देशातून हद्दपार झालेल्या कवींच्या कविता. पिरॅमिडच्या गाभ्यात अंधारात या कविता तुमचा पाठलाग करतात आणि या कवितेला व दृश्यात्मकतेला वेगळाच अर्थ मिळतो.

याशिवाय शेजारच्या काशी आर्ट गॅलरीमध्ये बडोद्याचा तरुण चित्रकार अबिर करमाकर आपलं कॅनव्हॉस ‘होम १६’ घेऊन आला होता. चार दालनांमधून लाइफ साइजचे रंगवलेले कॅनव्हॉस एका सामान्य घराची अनुभूती देत होते. अत्यंत वास्तववादी शैलीमधील हे संपूर्ण भिंतीएवढ्या आकाराचे कॅनव्हॉस एका घराचं चित्र उभं करत होते. एका मध्यमवर्गीय सामान्य घराचा फिल देणारी ही चित्रकृती वेगळाच अनुभव देणारी होती. हॉल, किचन, बेडरूम आणि एक छोटी स्टडी किंवा स्टोअर रूम हा अनुभव एकामागून एक उलगडत जात होता. गच्च भरलेलं पुस्तकांचं कपाट, किचन ओटा, गॅस, भांडी, डबे, ताटं-वाट्या, गाद्यांच्या वळकट्या, स्टिलचं कपाट, भिंतीवरचं घड्याळ, रेडिओ आणि माळ्यावर रचलेल्या बॅगा. एक वास्तववादी घर समोर उभं होत होतं.

कोचीच्याच पी. के. सदानंदने एक मोठं भित्तिचित्र रंगवायला घेतलं होतं. भित्तिचित्राची आपली अजंठापासूनच दीर्घकालीन परंपरा तो यामधून जागवत होता. किती मोठं? तर १५०० बाय ३०० सें.मी. एवढं! प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तो हे चित्र रंगवत होता. समोर चित्रकृती साकारताना आपल्याला पाहायला मिळत होती. पारंपरिक पद्धतीच्या नैसर्गिक रंगामध्ये हे चित्र तो साकारत होता. केरळच्या मिथककथांतून आलेल्या १२ गोष्टी तो रंगवता होता. त्यामधील शेकडो वेगवेगळ्या आकृत्यांचं चित्रण, रंगसंगती व कथानकाचा पसारा…एक भित्तिचित्र साकारताना पाहण्याचा तो अनुभवही विलक्षण होता.

असा अनेक कलाकृतींचा खजिना या प्रदर्शनानं आपल्यापुढे खुला केला होता. अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या हेतूचा, रूपाचा, माध्यमाचा सुमेळ या प्रदर्शनाने मांडला होता. कलेचा प्रवाह एकाच ठिकाणी न थांबता तो पुढे वाहत राहतो. नवनवीन शक्यता, कल्पना, तंत्र, अजमावून पाहिली जातात. त्यातून कलावंत स्वत:ला व्यक्त करत राहतो. जर कलाकार एकाच ठिकाणी थांबला तर एक प्रकारचा साचलेपणा, तोचतोचपणा येत राहतो आणि कला कळाहीन बनते. एखादी विशिष्ट शैलीच चांगली, बाकी सारं वाईट, त्याज्य ही प्रवृत्ती कलासमृद्धीला मारक ठरते. आपल्या कल्पकतेला, विचाराला, कृतीला कुंपणात बंदिस्त करणं म्हणजे स्वत:च कलेचा गळा घोटण्यासारखं आहे.

दिल्लीच्या आर्ट फेअरमधील चित्रपरंपरेतील लिजंडच्या वेगवेगळ्या गॅलरीजमधील उत्तमोत्तम चित्रं, इन्स्टॉलेशन्स; मुंबईच्या महोत्सवातील कलाबाजार आणि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शन यातून कलापरंपरा, प्रवाहाचं दर्शन होत होतं. कोची बिएनालेची इयत्ता थोड्या वेगळ्या प्रकारची होती. इथली दृश्यकला केवळ सुंदरतेचं ब्रिद न मिरवता आशय, हेतू, विद्रोह, जाणिवांचं प्रदर्शन करते. त्यामुळे नेहमीच्या प्रदर्शनासारखं हे प्रदर्शन पाहता येत नाही. ते पाहण्याची नजर तयार करावी लागते. त्यासाठी थोडा अभ्यास करावा लागतो. अशा प्रकारचं काम पुन:पुन्हा पाहावं लागतं. कलेच्या प्रवाहाकडे डोळसपणे पाहावं लागतं. साचेबद्ध, झापडबद्ध रसिकता ही सर्वांत वाईट गोष्ट आहे. नवनव्या गोष्टींचा स्वीकार करायला हवा. समजून घ्यायला हवं. पण त्यासाठी पुन्हा कोचीला पुढच्या बिएनालेला जाणं क्रमप्राप्त आहे.

लेखक सोलापूरस्थित चित्रकार आहेत.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......