झुंडीचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत आहे. झुंडीच्या आक्रमणाला होणारा विरोध हळूहळू मावळत चालला आहे. परिणामी सामाजिक समतोल बिघडत आहे
संकीर्ण - पुनर्वाचन
विश्वास पाटील
  • विश्वास पाटील आणि त्यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 23 January 2024
  • संकीर्ण पुनर्वाचन देव God ईश्वर परमेश्वर विश्वास पाटील Vishwas Patil झुंडीचे मानसशास्त्र Zundiche Manasashastra

झुंडीच्या टिकाऊ श्रद्धा आणि समजुती

प्राणीवर्गाच्या शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्यांमध्ये एक महत्त्वाचे साम्य आहे. या वैशिष्ट्यांपैकी काही टिकाऊ असतात, तर काही लवचीक असतात. टिकाऊ वैशिष्ट्ये इतकी टिकाऊ असतात की, अल्पशाही बदलांसाठी शेकडो वर्षे उलटावी लागतात. उलट लवचीक वैशिष्ट्ये थोड्याफार प्रयत्नाने बदलता येतात. पाळीव प्राण्यांची जे पैदास करतात, त्यांना ही गोष्ट अनुभवाने ठाऊक आहे. गायी, म्हशी, कुत्री, घोडे इत्यादी पाळीव प्राण्यांवर सतत प्रयोग करून त्यांच्या गुणधर्मांमध्ये अपेक्षित बदल घडवून आणण्यात त्यांनी यश संपादन केले आहे.

जे शारीरिक लक्षणांच्या बाबतीत खरे आहे, तेच मानसिक लक्षणांच्याही बाबतीत खरे आहे. काही मानसिक लक्षणे भक्कम व ठाम असतात. कितीही प्रयत्न केले, तरी त्यांच्यात बदल होत नाही. उलट काही लक्षणे लवचीक असतात व प्रयत्न केल्याने त्यांच्यावर बदल घडवून आणता येतो. जे प्राण्याच्या, विशेषतः माणसाच्या बाबतीत खरे आहे, तेच राष्ट्राच्याही बाबतीत खरे आहे. किंवा राष्ट्रातील झुंडीच्याही बाबतीत खरे आहे.

झुंडीच्या काही समजुती, श्रद्धा वगैरे अत्यंत ठाम असतात. बदलत्या श्रद्धांच्या आत आपण जर डोकावून पाहिले, तर तळाशी आपणाला कातळाच्या दगडासारख्या घट्ट व भक्कम श्रद्धा व समजुती इतक्या आढळतात. या श्रद्धा व समजुती घट्ट असतात की, कसलाही धक्का त्या सहज पचवू शकतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आपला विषय मानवी झुंडी हा आहे. तेव्हा झुंडीच्या श्रद्धासमजुतींचा विचार करायचा आहे. झुंडीच्या श्रद्धा दोन वर्गांमध्ये विभागता येतील. एक भक्कम व दृढ श्रद्धा, ज्या कसल्याही बाह्य दडपणाला दाद देत नाहीत व दुसऱ्या तात्कालिक मतांच्या स्वरूपातल्या. या दोन वर्गांपैकी पहिल्या वर्गातील श्रद्धा कोणताही बदल न होता, अनेक शतकेपर्यंत टिकून राहतात. याच टिकाऊ श्रद्धांवर ती संस्कृती उभी असते.

पूर्वीच्या काळातील या प्रकारच्या श्रद्धांचे उदाहरण द्यायचे, तर सरंजामशाहीच्या विचारसरणीचे देता येईल. किंवा ख्रिस्ती कॅथलिक पंथाचे वा प्रॉटेस्टंट पंथाचे देता येईल. आधुनिक काळातील उदाहरण द्यायचे, तर ‘राष्ट्रवादा’चे नाव घेता येईल. किंवा लोकशाहीच्या तत्त्वाचे वा सामाजिक विचारसरणीचे घेता येईल. प्रत्येक युगामध्ये काही मते व श्रद्धा ठाम स्वरूपात काम करताना आढळतात. त्याचबरोबर काही कल्पना नव्याने जन्मताना आणि झपाट्याने नष्ट होतानाही दिसून येतात. वाङ्मय व कलाविषयक नवे नवे सिद्धान्त आणि वाद या दुसऱ्या वर्गात पडतील.

कोठल्याही राष्ट्रातील सर्वसामान्य श्रद्धांची संख्या नेहमीच मर्यादित असते. अशा श्रद्धांचा उदय होतो, तेव्हा ते राष्ट्र उत्कर्षाला पोहोचलेले असते; उलट या श्रद्धा जेव्हा अस्तंगत होऊ लागतात, तेव्हा ते राष्ट्र डबघाईला येऊ लागलेले असते. या श्रद्धा म्हणजे त्या त्या संस्कृतीचा पायाच होय.

झुंडी दोन प्रकारच्या समजुती आणि श्रद्धा मनात वागवतात. एक भक्कम कल्पनांवर आधारित श्रद्धा व दुसऱ्या तकलादू कल्पनांवर आधारित श्रद्धा. तात्कालिक, तकलादू स्वरूपाच्या कल्पना झुंडीच्या मनात सहजपणे भरवून देता येतात. परंतु भक्कम स्वरूपातील श्रद्धा सहजासहजी खिळखिळ्या करता येत नाहीत. आणि या श्रद्धा खिळखिळ्या करण्यात यश आले व अशा प्रकारच्या काही श्रद्धा मागे हटवून त्यांच्या जागी नव्या व तितक्याच ताकदींच्या श्रद्धा झुंडीच्या मनावर बिंबवल्या गेल्या, तर या श्रद्धांचे उच्चाटन करता येणे प्रायः अशक्य बनते. त्या समाजामध्ये क्रांती घडून आल्यावाचून त्या श्रद्धांना दूर हटवता येत नाही. किंबहुना ज्या श्रद्धांचे बस्तान व्यवस्थित बसले आहे, त्या श्रद्धा काही ना काही कारणाने डळमळीत बनल्यावाचून तेथे क्रांती होणेसुद्धा अशक्य असते. त्या ठिकाणी क्रांती झाली, याचाच अर्थ तेथील संस्कृतीच्या पायाला धक्का पोहोचला होता. क्रांतीचा प्रारंभ अर्थच प्रस्थापित श्रद्धांचा नाश असा आहे.

लोकमतावर प्रभाव गाजवणारी श्रद्धा नष्ट होऊ लागली आहे, हे सांगता येणे शक्य असते. तेव्हा एखादा समाज पूर्वापार चालत आलेल्या श्रद्धांच्या खरेपणाची शंका घेऊ लागतो, तेव्हा तेथील श्रद्धांना ओहोटी लागली आहे, असे ठामपणे म्हणता येते. बहुतेक श्रद्धा या कल्पितावर आधारित असतात. या कल्पितावर जोवर जनता विश्वास ठेवते, तोवर ते कल्पित जिवंत राहते. कल्पिताच्या व त्या कल्पितावर बांधलेल्या श्रद्धेच्या सत्यतेविषयी आणि सत्यतेबरोबर युक्तायुक्ततेबद्दल लोकात चर्चा सुरू झाली की, त्या श्रद्धेचा अंत व्हावयास वेळ लागत नाही.

तथापि राष्ट्राच्या जुन्या श्रद्धांचा अंत झाला, तरी श्रद्धांनी जन्म दिलेल्या संस्थांचाही त्याच क्षणी अंत होतो, असे नाही. जुन्या श्रद्धा गेल्या तरी त्यांच्या आश्रयाने तयार झालेल्या सामाजिक संस्था पुढेसुद्धा काही काळ पूर्वीसारख्याच काम करत राहतात. कालांतराने त्या श्रद्धेचा लवलेशही जेव्हा समाजमानसामध्ये उरत नाही, तेव्हा त्या संस्थासुद्धा मातीस मिळतात.

संस्कृतींच्या इतिहासाचा आजवरचा अनुभव असा आहे की, स्वतःच्या एकूण एक श्रद्धांचा त्याग करणे कोठल्याही संस्कृतीला शक्य झालेले नाही. असा त्याग करायचा झाल्यास त्या संस्कृतीला स्वतःची रचना आमूलाग्र बदलावी लागेल. आणि ही गोष्ट कोठल्याच संस्कृतीला जमत नाही. परिवर्तनाची प्रक्रिया राष्ट्रामध्ये नेहमीच संथपणे सुरू असते; व नव्या श्रद्धा लाभेपर्यंत त्या श्रद्धांना स्थैर्य येईस्तवर ही प्रक्रिया चालूच राहते. मात्र हे पूर्णत्वास जाईपर्यंत त्या राष्ट्राच्या जीवनामध्ये अंदाधुंदी माजून राहते.

सार्वत्रिक वा सामान्य स्वरूपाच्या श्रद्धा म्हणजे कोठल्यादी राष्ट्राचे खांबच होत. जनतेच्या मनात राष्ट्रीय कर्तव्याची भावना जागी ठेवणे आणि जनतेचा आत्मविश्वास कायम राखणे, ही दोन महत्त्वाची कामे श्रद्धांच्या मदतीने पार पडत असतात. इतके महत्त्व राष्ट्रीय श्रद्धांना असते.

संपूर्ण राष्ट्रासाठी राष्ट्रीय श्रद्धांना असणारे हे महत्त्व प्रत्येक राष्ट्र ओळखून असते. परंपरागत श्रद्धांचा लोप म्हणजे राष्ट्राच्या अपकर्षाची नांदी होय, हेसुद्धा सर्व राष्ट्रे ओळखतात. म्हणूनच स्वतःच्या श्रद्धा अंभग राखण्यासाठी राष्ट्रे अतोनात परिश्रम घेतात. प्रसंगी अत्यंत असहिष्णुसुद्धा बनतात. यासाठी त्या राष्ट्रांना अर्थातच फारसा दोष देता येत नाही. केवळ तात्त्विक भूमिकेतून पाहताना ही असहिष्णुता खटकते. परंतु व्यवहाराचा विचार करता अशी असहिष्णुता आवश्यकही ठरते. कारण सहिष्णुता आणि असहिष्णुता या दोघांच्या झगड्यात सतत सहिष्णुता दाखवणाराचा निश्चितच नाश होऊ शकतो.

पारंपरिक श्रद्धा ज्या श्रद्धा अनेक कारणांनी सांभाळून ठेवण्याच्या योग्यतेच्या आहेत, त्या श्रद्धांचा नाश होऊ दिला, तर राष्ट्राच्या अस्तित्वालाच जर का धोका उत्पन्न होत असेल, तर वाटेल ते मोल देऊन त्या श्रद्धांचे रक्षण करणे राष्ट्राचे कर्तव्य ठरते. मौलिक वाटणाऱ्या श्रद्धांच्या रक्षणासाठी लाखो लोकांनी आपले प्राण दिले आहेत आणि पुढेसुद्धा लाखो लोक तसेच करतील.

राष्ट्रीय श्रद्धांच्या अनुषंगाने निरनिराळ्या रूढी, परंपरा, राजकीय, सामाजिक व नैतिक समजुती इत्यादी तयार होतात. या रूढींमध्ये, परंपरांमध्ये आणि समजुतींमध्ये नेहमीच एक आंतरिक साम्य असते. कारण त्यांचा आधार असणाऱ्या श्रद्धा राष्ट्राला समान असतात. रूढी, परंपरा आणि बौद्धिक समजुतींच्या वर्चस्वाखाली लोकजीवन येत असल्याने राष्ट्राच्या नागरिकांमध्ये काही एक साम्य उत्पन्न होत असते.

हे साम्य अर्थातच बाह्य चेहऱ्यातील नसून आंतरिक आत्म्याच्या संबंधातले असते. बाह्य चेहरे वेगवेगळे असले, तरी जनतेचा आत्मा जणू समान असतो. याचे एकमेव कारण म्हणजे रूढी व परंपरा. या रूढी व परंपरा म्हणजे सर्वांना समान असणारा आत्मा. आत्मा समान असल्याने प्रत्येक राष्ट्राचे महत्त्वाच्या प्रसंगीचे प्रतिसाद त्या त्या राष्ट्राच्या आत्म्याशी सुसंगत असतात. रूढींचे सामर्थ्य सहजासहजी लक्षात येत नाही, परंतु राष्ट्रीय जीवनाच्या प्रत्येक अंगावर रूढींचा ठसा असतो.

स्वतःला स्वतंत्र बुद्धीची म्हणवून घेणारी मंडळीसुद्धा या ठशापासून मुक्त नसतात. आपण असेही म्हणू शकतो की, बौद्धिक श्रद्धा, रूढी व समजुती नागरिकांच्या मनावर ज्या प्रकारची हुकूमशाही गाजवतात, तशा प्रकारची हुकूमशाही कडवे हुकूमशहासुद्धा त्यांच्या नागरिकांच्या मनावर गाजवू शकत नाहीत.

रूढी व परंपरांचे आपण स्वतःच्याही नकळत गुलाम असतो, हे आपल्या कधीच ध्यानात येत नाही. रूढींची सत्ता अदृश्य रूपात चालते. रूढी व परंपरांची ही हुकूमशाही विलक्षण खरी. परंतु मानवी मनावर त्या मनाच्या नकळत गाजवली जाणारी हुकूमशाहीच खरी हुकूमशाही होय. या हुकूमशाहीशी वैर करता येत नाही.

झुंडीच्या सुस्थिर श्रद्धा आणि अस्थिर समजुती व मतप्रणाली

राष्ट्राच्या बऱ्याचशा श्रद्धा स्थिर स्वरूपाच्या असतात. मात्र या स्थिर श्रद्धांच्या पायावर उभ्या असणाऱ्या समजुती, मतप्रणाली वगैरे फारशा स्थिर नसतात. मतप्रणाली आणि बौद्धिक समजुती वारंवार बदलतात. त्यातील काहींचे आयुष्य तर पुरते चौवीस घंटेसुद्धा असत नाही. अशा परिस्थितीत तत्त्ववेत्त्यांकडे एक महत्त्वाची कामगिरी येते. तत्त्ववेत्त्यांना दोन महत्त्वाच्या गोष्टी शोधून काढाव्या लागतात. एक, सतत बदलत जाणाऱ्या परिस्थितीमध्ये पूर्वापार चालत आलेल्या श्रद्धा-परंपरांपैकी किती परंपरा टिकून आहेत, हे शोधून काढणे आणि दोन मतप्रणालींच्या सततच्या भरती-ओहोटीमध्ये सर्वसामान्य श्रद्धा आणि राष्ट्राची प्रतिभा यांचे एकूण कार्य कोणते याचा छडा लावणे.

आपण ज्या श्रद्धांना जुन्या व टिकाऊ समजत होतो, त्यांतील किती खरोखर आज टिकून आहेत आणि झुंडींची मते बदलण्याचा वेग पूर्वी होता, तोच आजसुद्धा कायम आहे की, त्यात फरक पडला आहे, या दोन प्रश्नांचा शोध घेत असता पुढील गोष्टी आढळतात. पूर्वी झुंडीची मते व मतप्रणाली हळूहळू बदलत असत. आज ती फार वेगाने बदलतात. पूर्वी राष्ट्रांच्या ठाम समजुती आणि बौद्धिक श्रद्धा यांच्यामुळे बदलत्या मतांचे नियंत्रण होत असे.

म्हणजे असे की, राष्ट्राच्या ठाम समजुती आणि श्रद्धा यांनी ठरवून दिलेल्या चौकटीतच आणि त्या श्रद्धांनी दिलेल्या दिशांच्या प्रकाशातच बदलती मते बदलत असत. आज जुन्या श्रद्धांचा प्रभाव अत्यंत क्षीण झाला आहे. त्या श्रद्धा गुंडाळून ठेवून नवी मते व्यक्त होत आहेत.

याचा परिणाम असा होत आहे की, अर्ध्याकच्च्या मतांचे अमाप पीक समाजामध्ये येत आहे. हे अर्थात आजवरच्या अनुभवाला धरून असेच आहे. सर्वसामान्य श्रद्धा जेव्हा दुर्बल बनतात, तेव्हा वरवर आकर्षक परंतु तत्त्वतः पोकळ विचारांना ऊत येतो. आज जुन्या श्रद्धांची बैठक कमकुवत बनली आहे. ही बैठक कमकुवत झाल्याचे नवे विचार या बैठकीच्या कसोटीवर पारखून घेणे थांबले आहे. परिणामी कच्च्या पण आकर्षक व सूचक विचारांना भाव आला आहे.

झुंडीचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत आहे. झुंडीच्या आक्रमणाला होणारा विरोध हळूहळू मावळत चालला आहे. परिणामी सामाजिक समतोल बिघडत आहे. झुंडीच्या मताला पूर्वी फारशी किंमत नव्हती. राज्यकर्ते झुंडीच्या मताची पूर्वी फारशी पर्वा करत नसत. आज दिवस बदलले आहेत. आज सगळ्यात आधी झुंडीच्या मताची दखल घ्यावी लागते. झुंडीचे मत मोडणे हे सर्व संबंधितांना आज अडचणीचे व नुकसानीचे ठरते.

अनेक प्रकारच्या कल्पना आज मांडल्या जाऊ शकतात. त्यांतील काही हितकारक असतात, काही अहितकारक. परंतु त्यांचे खरे स्वरूप उघड होण्यापूर्वीच जनता त्यांच्या आहारी जाते. विचार व्यक्त करण्याच्या आड आज कोणीही व काहीही येऊ शकत नाही. झुंडींना नव्याचे आकर्षण असल्याने, कारण नवे म्हणजे प्रगतिकारक असे त्यांना वाटत असल्याने झुंडी नव्या विचारांच्या बळी ठरतात. कारण कोठल्याही प्रकारच्या आवाहनांना त्या वश होतात.

वृत्तपत्रे, नियतकालिके आदींच्या प्रकाशनात घडून आलेली प्रचंड वाढ. या प्रचंड वाढीचा एक परिणाम हा झाला आहे की, अनेक प्रसंगी परस्परविरोधी असणारी मते झुंडीच्या समोर ठेवण्यात येतात. एखादा विचार झुंडीच्या डोक्यात स्थिरावतो न स्थिरावतो, इतक्यात त्या विचाराच्या अगदी विरुद्ध असणारा विचार पुढे येतो. परिणामी कोणत्याच विचाराचा प्रभाव पडत नाही. सगळेच विचार क्षणभंगुर आणि लक्ष न देण्यासारखे ठरतात.

या युगाचे आणखीसुद्धा एक ठळक लक्षण सांगता येईल. पूर्वीच्या काळी लोकमत घडवण्यात आणि लोकांना वळण लावण्यात राष्ट्रीय संस्कारांना महत्त्वाचे स्थान होते. अलीकडे परिस्थिती बदलली आहे. गेल्या शतकापर्यंत राज्यकर्त्यांचे आचारविचार, त्यांच्या महत्त्वाच्या कृती. काही प्रतिभावान लेखकांच्या साहित्यकृती तसेच वृत्तपत्रे लोकमानसावर प्रभाव चालवत असत. महत्त्वाच्या राजकीय वा सामाजिक विषयांवर विचार कसा करावा, कोणती मते धारण करावीत, याचे दिग्दर्शन वर उल्लेखिलेल्या घटकांकडून केले जात होते.

या घटकेला विचारपूर्वक काढलेल्या निष्कर्षांऐवजी सर्वत्र मते प्रदर्शित केली जातात. राजकीय पुढाऱ्यांबद्दल बोलायचे तर एवढेच सांगता येईल की, जनतेला मार्गदर्शन करण्याऐवजी जनतेचा अनुनय करण्यातच हे पुढारी धन्यता मानतात. लोकमताची तर राजकीय क्षेत्रातील मंडळींनी पुरती धास्तीच घेतल्याचे आढळते. त्यांचे स्वतःचे आचरणसुद्धा धरसोडीचे आहे. त्यामुळे राजकारणाला दिशा देण्याचे काम झुंडी करत आहेत.

झुंडीचे मत हेच राजकारणी लोक ग्राह्य समजत आहेत. पुढाऱ्यांनी जनतेला मार्गदर्शन करण्याऐवजी जनताच पुढाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसते. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये पूर्वी भावनेला फारसे स्थान नसे. आज मात्र राजकारण हा भावना उद्दीपित करण्याचा खेळ बनला आहे. जो श्रोत्यांच्या भावनेला हात घालण्यात यशस्वी होतो, तो निवडून येण्यातही यशस्वी होतो, असे आजचे राजकीय समीकरण आहे.

झुंडींना चिकित्सक विचार आणि तर्क यांचे वावडे असते. विचार आणि तर्क वगळल्यावर मागे फक्त भावना उरतात. झुंडींना भावनांची भाषा कळते. झुंडी भावनेच्या भाषेच्या बंदी असतात. त्यामुळे जनता पुढे धावते आणि आशाळभूत पुढारी त्या जनतेच्या पाठी धावत आहे, असे विनोदी व केविलवाणे दृश्य आज जिकडेतिकडे पाहावे लागत आहे.

राजकीय पुढाऱ्यांची दिशा काय ते आपण पाहिले. आता वृत्तपत्रांची अवस्था पाहू. पूर्वी लोकमताचे मार्गदर्शन वृत्तपत्रे करत असत. आता मात्र राज्यकर्ते आणि शासनसंस्थांप्रमाणेच वृत्तपत्रेसुद्धा झुंडीला शरण गेली आहेत. मात्र एका अर्थी आजसुद्धा वृत्तपत्रांचा प्रभाव जाणवतो. वृत्तपत्रांमध्ये सर्वत्र झुंडीच्या मतांचे प्रतिबिंब आढळते व त्या अर्थाने त्या वृत्तपत्रांचा प्रभाव आहे, असे म्हणता येईल.

पूर्वी वाचकाला विचार करावयास प्रवृत्त करायचा वसा घेऊन वृत्तपत्रे चालवली जात होती. आज जमाना बदलला आहे. आज झुंडीच्या आवडीनिवडी विचारात घेऊन वृत्तपत्रे चालवली जातात. त्यामुळे मनोरंजक व करमणूकप्रधान माहिती पुरवणारे घाऊक ठेकेदार एवढी एकच भूमिका वृत्तपत्रांसाठी मागे शिल्लक राहिली आहे.

चांगला विचार, विचारप्रवर्तक तत्त्व संस्थेच्या मनावर बिंबवण्याचे काम वृत्तपत्रांनी केव्हाच थांबवले आहे. सार्वजनिक मतांमध्ये घडून येणाऱ्या बारक्यासारक्या बदलांकडे वृत्तपत्रांचे लक्ष असते, ही गोष्ट खरी आहे. परंतु ते एवढ्यासाठी की, लोकांच्या विचारात होऊ घातलेल्या बदलांमध्ये त्यांना त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने स्वारस्य आहे. हे बदल आपण दुर्लक्षित केले, तर आपला वाचकवर्ग कमी होईल व धंदा बसेल म्हणून वृत्तपत्रांचे मालक व संपादक डोळ्यांत अगदी तेल घालून या बदलांवर लक्ष ठेवतात.

स्वतःला पटलेले विचार त्या त्या लेखकाला मुक्तपणे मांडू देणारी धनिक वृत्तपत्रे व नियतकालिके आता उरलेली नाहीत. अर्थात अलीकडच्या वाचकांच्या दृष्टीने अशा विचारांना फारसे महत्त्व राहिलेले नाही, हेही तितकेच खरे आहे. आजकाल वाचकांना हवी असते ती वाचून लगेच विसरता येईल, अशी मनोरंजक माहिती, प्रसिद्ध व्यक्तींच्या खाजगी कुलंगड्यांची चविष्ट चर्चा, गावगप्पा. आजचा टीकाकार ग्रंथाची वा नाट्यकृतीची हमी देऊ शकत नाही. टीकाकार कदाचित ग्रंथाचे वा नाटककृतीचे आपल्या टीकेने नुकसान करू शकेल; परंतु फायदा नक्कीच नाही.

लोकमतामध्ये दिसून येणारी दिशाहीनता आणि सामान्य श्रद्धा आणि बौद्धिक विश्वास यांची जी पडझड झाली आहे वा होत आहे, त्याचे काही सार्वत्रिक परिणाम दिसून येत आहेत. उदा. पाहावे तिकडे मतांचा गलबला ऐकू येतो. मात्र या मतांच्या बाबतीत सामान्य मनुष्य एक तर उदासीन तरी आहे वा बेपर्वा तरी. झुंडीचे हे अर्थात वैशिष्ट्यच आहे.

प्रत्यक्ष फायद्यातोट्याच्या विषयापलीकडे झुंडींना दुसऱ्या कसल्याही गोष्टीमध्ये स्वारस्य नसते. झुंडीत सामील असलेल्या कनिष्ठ मध्यमवर्ग आणि कामगारवर्ग दोन्ही वर्गांना सर्वच मतांविषयी साशंकता वाटते. नाहीतर हे वर्ग त्या मतांबद्दल उदासीन तरी राहतात. आधुनिक माणूस फार मोठ्या प्रमाणावर उदासीन वृत्तीचा बळी बनतो आहे. कोठल्याच मताबद्दल त्याला खरी आत्मीयता वाटत नाही. याचा अर्थ पूर्वीच्या काळी तात्त्विक विचाराला आणि मतांना जी प्रतिष्ठा होती, ती आज झपाट्याने ओसरत आहे.

परंतु तात्त्विक विचार व मते यांचे सामर्थ्य खच्ची होत आहे म्हणून दुःख करण्याचे कारण नाही. राष्ट्राच्या जीवनामध्ये ही परिस्थिती ओढवणे, याचा अर्थ लोकजीवनाची घसरगुंडी सुरू होणे आहे. हे अर्थातच वाईट आहे. परंतु याच प्रकरणाला एक उजळ बाजूसुद्धा आहे. मागे ज्यांनी नवे धर्म प्रवर्तित केले व झुंडीचे नेतृत्व करता करता झुंडींच्या मनावर आपापल्या शिकवणुका बिंबवल्या, त्या पुढाऱ्यांचा स्वतःच्या शिकवणुकीवर ठाम विश्वास असे. आपल्या विचारांमध्ये आणि शिकवणुकीत काहीही उणीव वा दोष नाही, अशी त्यांना खात्री वाटे. आणि ही मानसिक खात्री ते लोकसमुदायापर्यंत पोहोचवू शकत. त्यांना जी जवळपास दैवी सूक्ष्मदृष्टी लाभली होती, त्या सूक्ष्मदृष्टीच्या जोरावर खंडप्राय लोकसमुदायाचे जीवन त्यांनी आमूलाग्र बदलून टाकले होते. इतका प्रभाव त्या काळात या लोकांना प्राप्त झाला होता.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

आज स्वतःच्या मतावर खरी व दृढ श्रद्धा ठेवणारे लोक उरलेले नाहीत. याच्या उलट प्रत्येक नव्या विचारावर टीका करणाऱ्या, त्या विचाराला नकार देणाऱ्या, त्या विचारात खोड काढणाऱ्या, किंवा त्या विचाराबद्दल उदासीनता दाखवणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. ही गोष्ट एक इष्टापत्तीच म्हणता येईल. कारण पाहावे तेथे आज झुंडींचे प्राबल्य वाढत असलेले आढळते.

झुंडी पूर्वीपेक्षा अधिकाधिक संघटितही होत आहेत. झुंडीत सामील होणारांची संख्यासुद्धा वाढते आहे. अशा वेळी एखाद्या मतप्रणालीने झुंडीच्या मनाचा कब्जा घेणे, ही गोष्ट समाजस्वास्थ्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण कोठलीच मतप्रणाली पूर्ण सत्य असू शकत नाही. आणि काळ पुढे जातो तरी मतप्रणाल्या वैचारिकदृष्ट्या आणि व्यवहारदृष्ट्या मागे राहतात व अर्धसत्ये माणसाला असहिष्णू बनवतात. म्हणून आपण असे म्हणू शकतो की, आज कोठल्याच मतप्रणालीला वाजवीपेक्षा जास्त सामर्थ्य मिळत नाही, ही दैवाची खैर आहे.

कारण तसे झाले असते, तर त्या मतप्रणालीच्या हुकूमशाहीसमोर सर्वांना गुडघे टेकावे लागले असते; आणि मुक्त चर्चेचे आणि मुक्त विचारांचे युग पुढे दीर्घकाळपर्यंत संपुष्टात आले असते. ज्या संस्कृतीमध्ये झुंडीला वर्चस्व लाभले, ती संस्कृती आयुष्याचे शेवटचे क्षण मोजू लागली म्हणून समजा. म्हणूनच झुंडीची मते नेहमी अस्थिर व चंचल असतात, ही बाब खेदाची नसून भाग्याची ठरते. काही काळासाठी का होईना, परंतु त्यामुळे संस्कृतीच्या गच्छंतीचा क्षण पुढे ढकलला जातो.

‘नवी क्षितिजे’कार विश्वास पाटील यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......