एखाद्या व्यक्तीची सद्ससद्विवेकबुद्धी ही गाढवाच्या सदसद्विवेकबुद्धीप्रमाणे चुकीची व कुचकामाची असू शकेल. प्रत्येकाची सद्सद्विवेकबुद्धी नेहमीच बिनचूक व योग्य निवाडा देईल असे नाही
संकीर्ण - पुनर्वाचन
विनायक सदाशिव गोगटे
  • विनायक सदाशिव गोगटे यांच्या ‘नीतिशास्त्रविचार’ या पुस्तकाचे शीर्षकपृष्ठ
  • Tue , 23 January 2024
  • संकीर्ण पुनर्वाचन देव God ईश्वर परमेश्वर सद्ससद्विवेकबुद्धी Good Conscience

अलीकडील राजकारणात सद्सद्विवेकबुद्धी म्हणजे काय व तिच्या बंधनास मर्यादा आहे की नाही, या प्रश्नास बरेच महत्त्व आले आहे. एका माणसाच्या सद्सद्विवेकबुद्धीस जे पटते, ते दुसऱ्याच्या सद्सद्विवेकबुद्धीस पटत नाही, …एका काळच्या लोकांना जी गोष्ट नैतिकदृष्टया योग्य वाटते, तीच दुसऱ्या काळच्या लोकांना अयोग्य अगर निंद्यही वाटते. यामुळे सद्सद्विवेकबुद्धी ही चीज आहे तरी काय व ती आपणांस कितपत बंधनकारक आहे, हे प्रश्न साहजिकच उत्पन्न होतात.

एका दृष्टीने असे वाटते की, आपल्या सद्सद्विवेकबुद्धीस जी गोष्ट करणे योग्य वाटेल, ती सबंध आकाश जरी कोसळले तरी केल्याशिवाय कधीही राहू नये; यांतच खरे नीतिधैर्य व खरी नीतिनिष्ठा आहे. उलट पक्षी असेही वाटते की, कोणत्याही एका व्यक्तीने सर्वस्वी आपल्याच सद्सद्विवेकबुद्धीवर प्रत्येक बाबतीत इतका विश्वास ठेवू नये.

मिलने विनोदाने म्हटल्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीची सद्ससद्विवेकबुद्धी ही गाढवाच्या सदसद्विवेकबुद्धीप्रमाणे चुकीची व कुचकामाची असू शकेल. प्रत्येकाची सद्सद्विवेकबुद्धी नेहमीच बिनचूक व योग्य निवाडा देईल असे नाही. यासाठी नेहमी आपलेच म्हणणे खरे करण्यापेक्षा, चार लोकांचा विचार घेऊन बहुमताने चालण्यातच शहाणपण आहे. ही दोन्ही तत्त्वे सारखीच खरी व योग्य दिसत असल्यामुळे, यांपैकी अधिक श्रेष्ठ तत्त्व कोणते हे ठरवणे अत्यंत कठिण आहे व तसे ठरवता न आल्यामुळे, काहीच न करता हात जोडून स्वस्थ बसण्याची पाळी कित्येकांना येत असल्यास नवल नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अशी गोष्ट सांगतात की, दोन्ही बाजूंस सारख्याच अंतरावर ठेवलेल्या एकाच प्रकारच्या गवताच्या पेंढ्यांपैकी कोणती खावी, याचा निर्णय करता न आल्यामुळे एक बैल भूकेने व्याकूळ होऊन मेला!

अशीच स्थिती काही विचारी माणसांची होण्याचा संभव आहे. असा हा प्रश्न मोठा बिकट, परंतु मनोरंजक असल्यामुळे, सद्सद्विवेकबुद्धी म्हणजे काय, तिचा  उगम कशात आहे व तिचे स्वरूप काय, या विषयाचे विवेचन या प्रकरणात करण्याचे योजिले आहे. अर्थात्, या योगाने सद्सद्विवेकबुद्धी ही एखाद्या प्रदर्शनात मांडलेल्या वस्तूप्रमाणे स्पष्ट व सुगम होऊन जाऊन तीविषयीचे सर्व प्रश्न एकदम सुटतील, असे कोणी समजू नये.

प्रश्न असा आहे की, एखाद्या पदार्थांची बरी-वाईट चव, वास अगर शोभा कळण्यास ज्याप्रमाणे आपणास आपल्या इंद्रियांचा उपयोग होतो, अगर तर्कशास्त्रातील एखाद्या अनुमानाची सत्यासत्यता ठरवण्यास आपली तार्किक बुद्धी उपयोगी पडते, त्याप्रमाणे नैतिकदृष्ट्या कोणत्याही गोष्टीचा बरे-वाईटपणा ठरवण्यास कोणता मार्ग उपलब्ध आहे?

‘आपली सद्सद्विवेकबुद्धी!’ असे कोणी चटकन उत्तर देईल; परंतु तिचेच स्वरूप ठरवणे अत्यंत कठिण आहे, कारण इतर इंद्रियांप्रमाणे ती दृश्य नसल्यामुळे तिच्या खऱ्या स्वरूपाबद्दल बराच मतभेद होतो, परंतु तिचे खरे स्वरूप समजणे जितके कठीण तितकेच आवश्यकही आहे. तार्किक सिद्धान्तांचे बाबतीत एकवाक्यता अगर सार्वत्रिकता दिसून आली नाही, तरी आपणास त्या गोष्टीचे फारसे महत्त्व वाटत नाही; केवळ मतभेद म्हणून आपण ती गोष्ट सोडून देतो. परंतु नैतिक बाबतीत, म्हणजे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीच्या बाबतीत मतभेद झाल्यास, आपल्या नीति-अनीतीच्या कल्पनांस बसणारा धक्का आपणास सहन होत नाही, व तो मतभेद दूर करण्याचा आपण शक्य तितका प्रयत्न करतो.

काही लोकांचे असे म्हणणे आहे की, कोणतीही गोष्ट करण्याची वेळ आली की, त्या वेळी आपणास तिचा बरे-वाईटपणा एकदम अंतःस्फूर्तीने समजतो व ही अंतःस्फूर्ती म्हणजेच आपली सद्सद्विवेकबुद्धी असे ते मानतात. या मताप्रमाणे अर्थातच कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचार करण्याची अगर नियम ठरवण्याची मुळीच जरूर नाही. कोणतीही गोष्ट करण्याची वेळ आली की, आपली अंतःस्फूर्ती आपणास एकदम बिनचूक निर्णय देते. आपणही मागचापुढचा विचार न करता ताबडतोब त्या अंतःस्फूर्तीच्या आज्ञेप्रमाणे उडी टाकावी!

हे मत ग्राह्य मानल्यास, कोणत्याही कृत्याची युक्तायुक्तता प्रत्येक व्यक्तीच्या त्या त्या वेळच्या इच्छेवर अगर लहरीवर अवलंबून असते, व त्या इच्छेबरोबर अगर लहरीबरोबर बदलतही जाते, असे म्हणावे लागेल. आज मला एकादी गोष्ट करण्याची अंतःस्फूर्ती होईल, परंतु उद्या परिस्थिती यत्किंचितही बदललेली नसताना- तीच गोष्ट करणे मला अयोग्य वाटल्यास, माझे दोन्ही दिवसांचे परस्परविरोधी वर्तन अंतःस्फूर्तीने घडलेले म्हणून सारखेच योग्य अगर नैतिक म्हणावयाचे काय?

शिवाय एकाच बाबतीत निरनिराळ्या व्यक्तींच्या अंत:स्फूर्तीनी निरनिराळा निर्णय दिल्यास, ते सर्व निर्णय सारखेच ग्राह्य मानावयाचे की काय? ते तसे मानल्यास मोठीच अनवस्था होईल, हे उघड आहे. खरी नीतितत्त्वे ही कोणत्याही एका व्यक्तीच्या अंतःस्फूर्तीवर, लहरीवर अगर इच्छेवर अवलंबून नसून, ती पूर्णपणे निरुपाधिक, सार्वत्रिक व शाश्वत असली पाहिजेत; तशी ती नसल्यास सर्वच नीतिमत्ता सापेक्ष होऊन जाऊन, मला जे वाटते ते मला योग्य व तुला जे वाटते ते तुला योग्य असा प्रकार होईल.

अर्थात् परिस्थितीभिन्नत्वामुळे कित्येकदा व्यक्तीव्यक्तींच्या, अगर एकाच व्यक्तीच्या निरनिराळ्या वेळच्या, कर्तव्यांमध्ये भेद होईल. आज जी गोष्ट करणे सर्वस्वी जरूर आहे, ती उद्या करणे योग्य होईलच असे नाही, व एकाला जी गोष्ट योग्य ती दुसऱ्याने करणे योग्य होईलच असेही नाहीं, परंतु परिस्थिती भिन्न नसताना, अगर व्यक्तीव्यक्तींतील भेद महत्त्वाचा नसताना, केवळ अंतःस्फूर्तीच्या सबबीवर आपले नैतिक कर्तव्य करण्याचे टाळणे योग्य होणार नाही.

एखाद्याने सुताराचा धंदा न केल्यास आपण त्यास दोष देत नाही, परंतु खरे बोलणे हा काही माझा धंदा नाही अगर तसे करण्याची मला अंतःस्फूर्ती होत नाही, तेव्हा मला खरे बोलण्याची जरूर नाही, असे कोणी म्हणू लागल्यास ते आपणांस खपेल काय? तात्पर्य, नीतितत्त्वे ही कोणत्याही एका व्यक्तीच्या अंतःस्फूर्तीवर अगर लहरीवर अवलंबून नसल्यामुळे ‘अंतःस्फूर्तीवाद’ त्याज्य मानावा लागतो.

दुसरा आक्षेप असा की, अंत:स्फूर्तीवाद मान्य केल्यास कोणत्याही प्रकारच्या सर्वसाधारण व सार्वत्रिक नीतितत्त्वांची अगर नियमांची आवश्यकता राहणार नाही व तसे करणे शक्यही होणार नाही. निरनिराळ्या व्यक्तींना एकाच वेळी, अगर एकाच व्यक्तीला निरनिराळ्या वेळी, जर निरनिराळी अंतःस्फूर्ती होऊ लागली, तर नीतिनियम तरी कसे घालणार व नीतितत्त्वे तरी कशी ठरवणार?

शिवाय आपली अंतःस्फूर्ती जर प्रत्येक वेळी कार्याकार्याचा बिनचूक निर्णय देण्यास हात जोडून उभी असली, तर अशा तऱ्हेच्या नियमांची जरूर तरी काय आहे? परंतु ही विचारसरणी चुकीची आहे, असे आम्हांस वाटतें. अगदी ठोकळ का होईना, पण काही तरी नीतिनियम असणे अत्यंत इष्ट व आवश्यक आहे, हे कोणीही कबूल करील.

एखादा लहान मुलगा जर आपणांकडे येऊन, शेजाऱ्याच्या बागेतील आंबा चोरू का, म्हणून विचारू लागला तर, ‘अरे बाळा, ही गोष्ट तुला त्या वेळी जी अंतःस्फूर्ती होईल तीवर अवलंबून राहील, मी तुला एकदम सरसकट नियम कसा घालून देऊ? तसे करणे म्हणजे केवळ जुलूम होणार आहे. तू त्या वेळी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला विचार व तिच्या सल्ल्याप्रमाणें वाग’, असा लांबलचक उपदेश करतो काय?

उलट, तू चोरी बिलकूल करता कामा नये असेच आपण त्यास बजावीत नाही काय? कित्येक वेळा चोरी फार काय हिंसा करणेदेखील सर्वस्वी योग्य, परंतु त्यामुळे खोटे बोलू नये अगर हिंसा करू नये, ही सामान्य नीतितत्त्वे कुचकामाची आहेत, असे कोणी म्हणणार नाही. यावर कोणी असे म्हणेल की, या सर्वसाधारण तत्त्वांची अगर नियमांची व्यवहारात अंमलबजावणी करताना नेहमी केवळ आपल्या अंतःस्फूर्तीसच सर्वस्वी प्रमाण मानू नये, हे जरी कबूल केले, तरी ही सर्व साधारण नीतितत्त्वे तरी केवळ आपल्या अंतःस्फूर्तीनेच आपण जाणतो की नाही?

हे म्हणणे खरे आहे. …मूळ नीतिविषयक भावना अगर नीतितत्त्वे परिस्थितीजन्य, अनुभवजन्य अगर तर्कसिद्ध नसून, ती पूर्णपणे स्वयंप्रेरित अगर अंतःस्फूर्त व स्वतः सिद्ध असतात. वाद आहे, तो या सिद्धान्ताबद्दल अगर तत्त्वाबद्दल नसून त्याच्या तपशिलाबद्दल आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक बाबतीत, बिलकूल विचार न करता, त्या तत्त्वांची अमलबजावणी कशी करावी, याची बिनचूक अंतःस्फूर्ती होते की काय, याबद्दल आहे.

विशेषतः दोन परस्परविरोधी कर्तव्यांचा लढा पडला असता अशी अंतःस्फूर्ती मुळीच न झाल्यामुळे कित्येकदा आपली मती कुंठित होऊन जाते, हा अनुभव प्रत्येकास आहेच. परंतु अशी अंतःस्फूर्ती होते, असे मानले तरी, तिच्या बऱ्या-वाईट परिणामांचा अगर उपयुक्ततेचा विचार केल्याखेरीज एकदम तिच्या सल्ल्याप्रमाणे वागणे योग्य होईल काय, हा प्रश्न शिल्लक राहतोच.

असे करणे म्हणजे निव्वळ अविचारीपणा व स्वतःवरील अंधश्रद्धा होय, असे आम्हास वाटते. कोणी निष्काम कर्म-तत्त्वाचा आधार घेऊन असे म्हणेल की, आपणास जे योग्य वाटेल ते आपण केलेच पाहिजे, मग त्याचा परिणाम काहीही होवो, उपयोग होवो अगर न होवो. पण यावर उलट असे विचारता येईल की, कोणत्याही कृत्याचा परिणाम योग्य होईल किंवा नाही, याचा विचार केल्याशिवाय ते कृत्य योग्य आहे की अयोग्य आहे, हे ठरवणेच मूर्खपणाचे नाही काय? केवळ ते कृत्य करण्याची अंतःस्फूर्ती झाली, म्हणून ते योग्य असे म्हणणे शहाणपणाचे होणार नाही.

अर्थात् कित्येक वेळा अशा तऱ्हेचा दूरवर विचार करणे शक्य व इष्टही नसते हे खरे आहे. एखादा मनुष्य नदीच्या पुरात वाहून चालला असता, त्याला वर काढण्यापासून एकंदर त्याचे स्वतःचे व समाजाचे किती कल्याण होईल, याचा विचार करत बसणे अत्यंत मूर्खपणाचे होईल. परंतु अशा वेळी विचार करत बसण्याचा परिणाम वाईट होईल, म्हणूनच आपण असा विचार करणे मूर्खपणाचे समजत नाही काय? आपणांस मुळीच पोहता येत नसून, बुडत्याला वाचवण्याची गोष्ट दूरच राहो, परंतु नदीत पाऊल टाकल्यास आपणावरही तीच पाळी येईल, अशी खात्री असताना नदीत उडी घालणे शहाणपणाचे होईल काय?

कोणत्याही कृत्याची किंमत केवळ त्याच्या परिणामांवरून अगर उपयुक्ततेवरून ठरवावयाची नसते; या अर्थाने निष्काम कर्माचे तत्त्व खरे आहे. परंतु अविचाराने केलेल्या गोष्टीचा परिणाम वाईट झाला तरी, त्याचा दोष ती करणाऱ्याला लागत नाही, असा त्याचा अर्थ नसून, पूर्ण विचारांती केलेल्या कृत्याचा परिणाम जर काही अनपेक्षित अगर आकस्मिक कारणांनी वाईट झाला, तर त्याचा दोष ते कृत्य करणाऱ्याचा नाही, असा आहे.

विशेषतः ज्या वेळी एकाच व्यक्तीच्या मनात परस्परविरोधी अशा दोन अंतःस्फूर्ती उत्पन्न होतात, त्या वेळी परिणामांचा विचार केल्याखेरीज त्यातील श्रेष्ठ कोणती हे ठरवताच येत नाही. खोटे बोलल्याने जर एखाद्या व्यक्तीवर उपकार होत असला, व खरे बोलल्याने जर त्याची मोठी - समजा प्राणहानि- हानि होत असली, तर यांपैकी कोणती गोष्ट साधल्याने एकंदर हित अधिक होईल, हे पाहिल्याशिवाय कोणता मार्ग स्वीकारावा, हे ठरवणे योग्य होणार नाही. ती व्यक्ती निरपराधी असली तर प्रसंगी खोटे बोलूनही तिचा प्राण वाचवणे योग्य व हितकारक होईल. परंतु ती अपराधी व शिक्षेसच पात्र असल्यास, तिचे संरक्षण करणे समाजाला व तिला स्वत:लाही अहितकारक होईल.

नीतिनियमांनादेखील अपवाद असतात हे कोणीही कबूल करील व त्या अपवादाचे मूळ शोधू गेल्यास, ज्या ठिकाणी ते नियम पाळण्याने एखाद-दुसऱ्या त्या बाबतीत अधिक महत्त्वाच्या नीतितत्त्वाचा भंग होत असेल, म्हणजे ते मोडण्यापासून होणाऱ्या परिणामापेक्षाही अधिक वाईट परिणाम होत असेल, त्याच ठिकाणी हे अपवाद उत्पन्न होतात, असे दिसून येईल.

वर म्हटल्याप्रमाणे हिंसा करू नये हे खरे, पण ज्या ठिकाण एखाद्या व्यक्तीची हिंसा न केल्याने हजारो व्यक्तींचा नाश होण्याची खात्री असेल, त्या ठिकाणी अहिंसेच्या तत्त्वापेक्षा त्या तत्त्वाच्या अपवादाचेच पालन करणे कोणीही योग्य मानील.

कित्येक गोष्टींच्या परिणामांकडे दुर्लक्ष्य केल्यास त्या गोष्टी चांगल्या का वाईट, हेच आपणास समजण्यास मार्ग नसतो, व परिणामाकडे नजर न देता जर आपण त्यांचा बरे-वाईटपणा ठरवू लागलो, तर आपला निर्णय चुकीचा ठरण्याचा बराच संभव असतो. दारू पिण्यापासून होणारे सर्व दुष्परिणाम जर आपण दृष्टीआड केले, तर ती गोष्ट वाईट का हे आपणास सिद्ध करता येईल काय?

उलटपक्षी, एक मनुष्य दुसऱ्याच्या शरीरात चाकू खूपशीत आहे, असे दिसल्यास एकदम त्याला शासन करण्याची आपणास अंतःस्फूर्ती होईल; परंतु चौकशीअंती ती त्या दुसऱ्या माणसाच्या रोगपरिहारासाठी चाललेली शस्त्रक्रिया आहे, असे ठरण्याचा पुष्कळ संभव आहे.

वरील विवेचनावरून हे दिसून येईल की, कोणत्याही गोष्टींचा बरे-वाईटपणा ठरवण्यापूर्वी परिस्थितीचा व त्या गोष्टीच्या बऱ्यावाईट परिणामांचा अगर उपयुक्ततेचा विचार केला पाहिजे. नुसती ती गोष्ट करण्याची मला अंतःस्फूर्ती झाली आहे, अगर ती गोष्ट अमुक एका (विशिष्ट) नीतितत्त्वाला अनुसरून आहे, असे म्हणून चालावयाचे नाही. आपली सद्सद्विवेकबुद्धी ही अंत:स्फूर्ती असली, तरी ती नेहमी एकदम बिनचूकच निवाडा देईल असे नाही, व कोणतेही एक नीतितत्त्व सर्व काळी पाळणे योग्य आहे, असेही नाही.

अर्थात्, कोणत्याही गोष्टीच्या परिणामांचा बरे-वाईटपणा हा तरी पुन्हा आपल्या अंतःस्फूर्तीनेच जाणावा लागतो, व अशा रीतीने अखेरचा निर्णय आपली अंतःस्फूर्तीच देते हे वर कबूल केलेच आहे. मात्र परिणामाच्या व परिस्थितीच्या विचाराची जोड अंतःस्फूर्तीस देणे आवश्यक आहे. तशी ती न दिल्यास अंत:स्फूर्ती ही केवळ पतंगाच्या दिव्यावरील झडपेप्रमाणे मूर्खपणाची व आत्मघातकी होईल, असे आमचे म्हणणे आहे.

तात्पर्य, कोणतीही गोष्ट एकंदरीने चांगली की वाईट हे अंतःस्फूर्तीनेच समजते, परंतु ती गोष्ट अमुक एका परिस्थितीत, अमुक एका व्यक्तीने करावी की न करावी, याचा निर्णय करण्यास ती अपुरी पडते. आता हे खरे आहे की, काही काही गोष्टी चांगल्या आहेत अगर वाईट आहेत, हे ठरवण्यास आपणास परिस्थितीचा अगर उपयुक्ततेचा मुळीच विचार करावा लागत नाही.

उदाहरणार्थ, व्यभिचारापासून कितीही चांगली प्रजा निर्माण होण्याचा संभव असला अगर इतर शेकडो फायदे होणार असले, तरी आपला त्या गोष्टीच्या युक्तायुक्ततेचा निर्णय पालटू शकत नाही, अगर त्या फायद्याचा विचार करण्याची आपणास जरूरही वाटत नाही. पण अशा अपवादात्मक गोष्टी सोडून दिल्या, तर दूरवर विचार करण्याची आवश्यकता कोणीही मान्य करील.

परंतु याचबरोबर दुसरीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. केवळ अविचारी, अंध व कोणत्याही तत्त्वाचा आधार नसलेल्या अंतःस्फूर्ती, व्यक्तीव्यक्तीबरोबर अगर एकाच व्यक्तीच्या निरनिराळ्या वेळच्या लहरींबरोबर पालटत जाणाऱ्या अतएव सापेक्ष व बंधनरहित असल्या तरी, आपली मूळ नीती-अनीतीची भावना अगर सर्वसामान्य तत्त्वाविषयीचे आपल्या अंतःस्फूर्तीचे निर्णयही काळाबरोबर अगर व्यक्तीबरोबर पालटत जातात, म्हणून तेही सापेक्ष असे म्हणणे सत्याला धरून होणार नाही.

एका काळी मनुष्याची शिकार करणे योग्य मानत असत, म्हणून अहिंसेचे सर्वसाधारण तत्त्व सर्वस्वी सापेक्ष आहे, असे कोणी समजत नाही. कित्येक निरुपाधिक व सार्वत्रिक सिद्धान्तहि - उदाहरणार्थ, दोन आणि दोन - चार सर्वांना सारखेच स्वतःसिद्ध वाटतात अगर समजतात असे नाही. ज्याप्रमाणे व्यक्ती व्यक्तींच्या अगर निरनिराळ्या काळातील लोकांच्या बौद्धिक व शारीरिक वाढीत भेद असतो, त्याचप्रमाणे तो नैतिक उन्नतीच्या बाबतीतही असतो. परंतु यावरून सर्वच नीतिमत्तासापेक्ष आहे, असे अनुमान करणे चुकीचे होईल. असो.

वरील अंतःस्फूर्तीवादावर केलेल्या एकंदर टीकेवरून कोणास असे वाटेल की, कोणत्याही बाबतीत आपल्या मूळ अंतःस्फूर्तीला परिस्थिती व उपयुक्तता अगर परिणाम यांच्या विचारांची जोड दिली की, तीसच सद्ससद्विवेकबुद्धि म्हणण्यास हरकत नाही; व अशा प्रकारच्या सद्सद्विवेकबुद्धीने दिलेला निर्णय, बहुमताविरुद्ध व वाटेल तितकी संकटे आली तरी, आपण पाळला पाहिजे. परंतु हा निर्णय मान्य करण्यापूर्वी आणखी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे.

कोणत्याही गोष्टीच्या युक्तायुक्ततेचा विचार करताना, आपल्या तार्किक व शांत विचाराखेरीज आणखी एक शक्ती आपले काम करत असते. ती शक्ती म्हणजे आपल्या वैयक्तिक भावना अगर मनोविकार. या मनोभावना व अंतःस्फूर्ती यांमध्ये एक ठोकळ भेद असा सांगता येईल की, अंत:स्फूर्ती ही एका अर्थाने बाहेरचीच, म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या शारीरिक रचनेवर, मनोरचनेवर अगर इतर कोणत्याही बाह्य उपाधीवर अवलंबून नसून, ती पूर्णपणे स्वयंभू व याच अर्थाने सार्वत्रिक असते.

परंतु भावना या पूर्णपणे वैयक्तिक व जशा काही खाजगी मालकीच्या असतात. यामुळे एकाद्या चुकीच्या तार्किक सिद्धान्ताप्रमाणे त्या एकदम रद्द करता अगर मनातून घालवून देता येत नाहीत. अशा रीतीने या आपल्या मनाविरुद्ध व आपल्या नकळतही, आपल्या वरून शांत दिसणाऱ्या विचारसरणीच्या आड दडून तिच्यावर आपला परिणाम करत असतात. तेव्हा त्यांचा पूर्णपणे छडा लावून, आपल्या सद्सद्विवेकबुद्धीमध्ये या बयाचे किती अंग असते, हे शोधून काढल्याशिवाय आपणास तिचे खरे स्वरूप कळणार नाही. परंतु तसे करण्यापूर्वी सदसद्विवेकबुद्धीविषयी प्रचलित असलेल्या इतर एक-दोन मतांचे परीक्षण करून मग त्या विषयास हात घालू.

काही लोकांचे असे म्हणणे आहे की, ज्याप्रमाणे आपणाला एखादे फूल सुवासिक आहे की नाही, अगर एखादा देखावा सुंदर आहे किंवा नाही, हे त्या फुलापासून अगर देखाव्यापासून उत्पन्न होणाऱ्या अनुकूल अगर प्रतिकूल संवेदनांवरून बिनचूक व ताबडतोब समजते, त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीची नैतिक युक्तायुक्तताही त्या गोष्टीमुळे उत्पन्न होणाऱ्या अनुकूल अगर प्रतिकूल संवेदनांवरून बिनचूक समजते. जी गोष्ट अनुकूल संवेदना उत्पन्न करते, ती योग्य आहे, असे समजून ती करण्यास मुळीच मागेपुढे पाहू नये.

 अशा रीतीने आपल्या सदसद्विवेकबुद्धीस आपल्यासौंदर्यविषयक भावनेच्या रांगेस आणून बसवण्याचा, किंबहुना त्या दोन्ही एकच आहेत असे सिद्ध करण्याचा, हा प्रयत्न आहे. आपला सौंदर्यविषयक आनंद हा निर्हेतुक व निःस्वार्थी असल्यामुळे, ‘जे आपणांस सुखदायक ते चांगले व दुःखदायक ते वाईट’ या तऱ्हेच्या अगदी खालच्या दर्जाच्या सुखवादापेक्षा हे मत जास्त समंजसपणाचे आहे, यांत शंका नाही.

परंतु अंतःस्फूर्तीवादावरील बरीचशी टीका या संवेदनावादालाही लागू पडण्यासारखी आहे. एखाद्याला एकादे फूल सुंदर वाटले म्हणजे दुसऱ्यालाही ते तसे वाटेलच असे नाही. किंबहुना आज मला जे फूल आवडेल, ते काही दिवसांनी आवडेलच असेही नाही. प्रत्येक आईला आपले मूल सुंदर आहे असे वाटते, पण दुसऱ्या लोकांचा या बाबतीत बहुशः मतभेद होतो.

अशा रीतीने आपल्या सौंदर्यविषयक भावना बऱ्याचशा सापेक्ष असतात. नीतितत्त्वांप्रमाणे सौंदर्यविषयक सिद्धान्तांत मुळीच सार्वत्रिकता अगर निरुपाधिकता नसते, असे आमचे म्हणणे नाही; परंतु ती सार्वत्रिकता अगर निरुपाधिकता नीतितत्त्वांइतकी नसते, व तशी ती नसली तरी आपणास तार्किक सिद्धान्तांचे बाबतीत मतभेद झाल्यास ज्याप्रमाणे त्याचे महत्त्व वाटत नाही, त्याचप्रमाणे याही बाबतीत काही वाटत नाही.

एखाद्याला समुद्राचा देखावा न आवडल्यास तो मनुष्य फारशा दोषास पात्र होत नाही; परंतु एखाद्या मनुष्यास खरे बोलणे न आवडल्यास प्रसंगी त्याची तुरुंगातही रवानगी होते. सारांश, नीतितत्त्वांना जी सार्वत्रिकता व निरुपाधिकता लागते, ती सार्वत्रिकता व निरुपाधिकता, केवळ आपल्या अनुकूल-प्रतिकूल संवेदनांवरून नीती-अनीतीचा निर्णय केल्यास मुळीच साध्य होणार नाही, व म्हणून सद्सद्विवेकबुद्धी व सौंदर्यविषयक भावना ही एकच आहेत, असे मानता यावयाचे नाही.

उलट पक्षी, अगदी भावनारहित अशा आपल्या केवळ तार्किक बुद्धीला विचारून प्रत्येक गोष्टीची युक्तायुक्तता ठरवावी, असे जे कांटप्रभृति लोकांचे मत आहे, तेही बरोबर नाही. व्यावहारिकदृष्ट्या पाहिले तर अत्यंत समतोल बुद्धीने व तर्कशुद्ध विचार करणारी माणसेच बहुशः क्रियाशून्य असतात, असे दिसून येईल.

कोणत्याही गुणाचा उत्कर्ष होण्यास जी निष्ठा व भावनांचा जोर लागतो तो विचाराने प्राप्त होतोच असे नाही- बहुशः होतच नाही. परंतु केवळ तात्त्विक दृष्टया पाहिले तरी कित्येक गोष्टींची युक्तायुक्तता भावनांचे अभाव कळणेच शक्य असत नाही. परोपकार, एकपत्नीव्रत अगर ज्ञानसंपादन चांगले का, हे ज्याला त्या गोष्टींविषयी प्रेमाची अगर आदराची भावना नाही, त्याला सिद्ध करताच येणार नाही, व म्हणूनच नीती-अनीतीच्या भावना स्वतः सिद्ध आहेत, असे आपण म्हणतो.

आरोग्य पाहिजे असल्यास स्वच्छता ठेवावी अगर ज्ञान संपादन करावयाचे असल्यास अभ्यास करावा, हे तर्काने सिद्ध करता येईल; परंतु आरोग्याचीच काय आवश्यकता आहे अगर ज्ञानसंपादनच का इष्ट आहे, हे तर्काने सिद्ध करणे अशक्य आहे. अशा तऱ्हेने नीतितत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यास, तो कसा निष्फळ होतो, हे कांटच्याच प्रयत्नाकडे पाहिल्यास सहज दिसून येईल.

उदाहरणार्थ, वचन पाळावे अगर आत्महत्या करू नये हे, नियम चांगले का, तर याच्या उलट नियम केल्यास (म्हणजे ते नियम न पाळल्यास) ते आत्मविरोधी होतील, म्हणून वचन मोडावे, असा नियम केल्यास कोणीच कोणास वचन देणार नाही, व मग ‘वचन मोडावे’ हा नियम लागू करण्यास जागाच नसल्यामुळे त्या नियमास आत्मविरोध येईल. त्याचप्रमाणे आत्महत्या करावी, असा नियम केल्यास पृथ्वीवर कोणीच मनुष्य शिल्लक न राहिल्यामुळे ‘आत्महत्या करावी’ या नियमास आत्मविरोध येईल.

म्हणून याच्या उलट जे पहिले नियम ते पाळावे, असा कांटचा अभिप्राय आहे! केवळ तार्किक आत्मविरोधाचीच कांटसाहेबांना भीती वाटत असल्यास ती सहज दूर करता येण्याजोगी आहे. ‘एकाखेरीज सर्व माणसे वचन देईनाश होईपर्यंत वचने मोडावी’ अगर ‘पृथ्वीवर एक मनुष्य शिल्लक राहीपर्यंत आत्महत्या करावी’, असे नियम केल्यास त्यांत वरील आत्मविरोधाचा दोष राहत नाही.

परंतु हे नियम योग्य मानता येतील काय? खुद्द कांटच्या अविवाहितपणासही वरील न्यायाने दोष द्यावा लागेल. उलट पक्ष, परोपकार करावा हे तत्त्व सर्वांनी पाळल्यास काही दिवसांनी परोपकार करण्याची जरूरच राहणार नाही व तो नियम आत्मविरोधी होईल. मग परोपकार करू नये, हे तत्त्व मान्य करावयाचे काय?

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

बोलॅस्टन नावाच्या एका गृहस्थांनी तर याच्याही वर ताण केली आहे. त्यांनी चाळीस वर्षे अभ्यास करून, स्वतःच्या बायकोस ठार का करू नये, याचे कारण असे शोधून काढले आहे की, ‘स्वतःच्या बायकोस ठार मारावे’, असा जर मूळ सिद्धान्त धरला, तर ‘ती स्वतःची बायकोच नाही’ (म्हणजे उरणार नाही, असा अर्थ असेल!) असे त्यावरून अनुमान निघेल म्हणून!! ही विचारसरणी कोणास पटेल ती पटो, व त्यावरून नीती-अनीतीचा बोध कोणास होईल तो होवो!

यावरून हे सिद्ध होईल की, तार्किक बुद्धी व सद्सद्विवेकबुद्धी या काही एक नव्हत. सदसद्विवेकबुद्धीला जो भावनेचा पाठिंबा असतो, त्याचा केवळ तार्किक बुद्धीमध्ये अभाव असतो व नीती-अनीतीच्या बाबतीत सद्सद्विवेकबुद्धीच्या निर्णयांना जी स्वतःसिद्धता असते, ती तार्किक-बुद्धीला कधीच प्राप्त करून घेता येणार नाही. त्याचप्रमाणे सद्सद्विवेकबुद्धी म्हणजे केवळ अंतस्फूर्ती नव्हे, अगर सौंदर्यविषयक संवेदनेप्रमाणेच एक प्रकारची संवेदनाही नव्हे, हे वर दाखवलेच आहे.

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक विनायक सदाशिव गोगटे यांच्या ‘नीतिशास्त्रविचार’ या मार्च १९२४मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकातून साभार. येत्या मार्च महिन्यात या पुस्तकाला १०० वर्षे पूर्ण होतील.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......