मीसुद्धा भारतीय आहे. भारतीय संस्कृतीत वाढलेला आहे. एका कर्मठ कुटुंबात वाढलेला आहे. तरीसुद्धा लहानपणापासून नास्तिक झालो आहे. का झालो, कसा झालो, हे आपण सोडून देऊ या. परंतु माझ्या नास्तिक होण्याचं स्वरूप सांगतो. परमेश्वर म्हणजे, मी माझ्या मनाला समाधान लाभावं म्हणून एक आधार घेतलेली संकल्पना. आणि अशा संकल्पनेचा आधार घेतल्यामुळे माझ्या मनाला एक ‘स्ट्रेन्थ’ मिळते, असा परमेश्वर माझ्या मनामध्ये नाही.
परमेश्वर म्हणजे एक अतिमानवी अशी शक्ती आहे, तिनं विश्वाची निर्मिती केलेली नाही, तरी विश्वाचं नियंत्रण करणारी ती शक्ती आहे आणि त्या शक्तीला मी शरण गेलं पाहिजे, त्या शक्तीचा जर कोप झाला, तर माझ्यावर दुर्दैवाचा प्रसंग कोसळेल आणि ती शक्ती जर प्रसन्न झाली, तर माझ्या आयुष्याचं कल्याण होईल, ही परमेश्वराविषयी जी संकल्पना आहे. अशा परमेश्वराशी माझं भांडण आहे.
ही संकल्पना सामान्य माणसाची असते. एखाद्या ज्ञानेश्वराची संकल्पना ही आध्यात्मिक स्वरूपाची असते. स्वतःच्या आत्म्याला मोक्ष आणि मुक्ती मिळावी म्हणून त्या शक्तीचं ध्यान करावं, नामस्मरण करावं आणि त्यामुळे मनाला शांती मिळावी हा त्यामागं हेतू असतो. अशा संकल्पनेशी माझं भांडण नाही. भांडण नाही एवढ्याच करता की, ती निरुपद्रवी आहे आणि ती त्या त्या माणसापुरती असते, समाजाला त्याचा काही त्रास नाही. अगोदर सांगितलेली संकल्पना मात्र अतिशय उपद्रवी आहे.
ही संकल्पना निर्माण कशी झाली याचा विचार करताना असं लक्षात येतं की, परमेश्वर नावाच्या शक्तीचा कसलाही पुरावा गेल्या पाच हजार वर्षांत माणसाला देता आलेला नाही. त्या संकल्पनेवर माणसाचा दृढ विश्वास कसा बसला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
तर ‘परमेश्वर’ या संकल्पनेचा उगम कसा झाला असेल ते पाहू या. अगदी पुरातन काळ म्हणजे मी पाच हजार वर्षं म्हणतोय, ते अगदी मोजून घ्यायचं नाही. आपला वैदिक काळ साधारण पाच हजार वर्षांपूर्वीचा म्हणतात, त्या अर्थानं घ्यायचं… तर पाच हजार वर्षांपूर्वी माणूस बौद्धिकदृष्ट्या एका सामान्य पातळीवर होता, हे अगदी निर्विवाद आहे. म्हणजे त्याला साध्या साध्या नैसर्गिक घटनांचा अर्थ कळत नव्हता.
म्हणजे पाऊस कसा पडतो, भूकंप कसा होतो, ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो, हे त्याला कळत नव्हतं आणि त्याच वेळेला वेळच्या वेळी पाऊस पडला तर शेती कशी चांगली होते, हे त्याला दिसत होतं. आकाशात वीज कडाडताना पाहून सौंदर्याचा अनुभव मिळत होता. त्याच वेळेला तीच वीज खाली जमिनीवर पडली की, जो हाहाकार माजतो, त्यानं तो गांगरूनही जात होता.
तो या सगळ्या गोष्टींचा असा अर्थ लावत होता की, या सगळ्या शक्तीचं नियंत्रण करणारी एक अतिमानवी शक्ती आहे. ही नियंत्रण करणारी एक फार मोठी जबरदस्त ताकद आहे आणि ही आभाळात कुठेतरी आहे. त्या माणसानं अशी धारणा करून घेणं, हे त्याच्या अल्पबुद्धीचं लक्षण होतं, यात काही वाद नाही. परंतु त्या शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा आपण शोधून काढावा, हे त्या माणूस नावाच्या प्राण्याला गेल्या पाच हजार वर्षांत सुचलं नसेल का? तर त्याचं उत्तर म्हणजे त्याला नक्कीच सुचलं असेल. ही शक्ती शोधून काढायचा त्यानं नक्की प्रयत्न केला असेल.
काही व्यक्तींना साक्षात्कार झालेले आहेत आणि त्यावरून काहींनी असं म्हटलं की, ज्ञानेश्वरांना साक्षात्कार झाला, साक्षात देव दिसला. तुकाराममहाराजांना साक्षात विठोबा दिसला. अशा साक्षात्काराच्या बातम्या ऐकताना माणसाची बरीच शक्ती खर्च झाली. ही साक्षात्कार झालेली माणसं भोंदू नाहीत, प्रामाणिक आहेत. समाजात काहीतरी तळमळीनं काम करणारी आहेत. त्यांना साक्षात्कार झाले असतीलही. पण मला साक्षात्कार होत नाही, याचा अर्थ मी पापी माणूस आहे. तुकाराम-ज्ञानेश्वर यांच्या ‘लेव्हल’वर जात नाही, अशी समजूत त्यांनी करून घेतली. आणि याला पहिला धक्का बसला विज्ञानाच्या उदयानं.
विज्ञानाची सुरुवात झाली चारशे वर्षांपूर्वी. कोपर्निकस या शास्त्रज्ञानं पहिला धक्का दिला. त्यानं सांगितलं की, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नाही, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ‘बायबल’मध्ये सांगितलं होतं की, पृथ्वी ही विश्वाचा केंद्रबिंदू आहे आणि सगळे तारे-ग्रह तिच्याभोवती फिरतात. धर्मगुरूंनी जाहीर केलं की, हा माणूस पाखंडी आहे.
कोपर्निकस काही परमेश्वराच्या वा धर्माच्या विरुद्ध निघालेला नव्हता. तो सत्याच्या शोधात निघालेला होता. त्याला अनुभव व प्रयत्नांनी सत्य दिसलं ते असं की, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे. आणि हे सत्य मांडण्याचं धैर्य त्यानं दाखवलं. आणि विज्ञाननिष्ठ माणसाला प्राण गमवावे लागले. कारण धर्मविरोधी मत मांडलं होतं. इतकं ते माणसाच्या डोक्यात तीन हजार वर्ष घट्ट बसलं होतं.
कोपर्निकसचं संशोधन पकडून पुढं दुसऱ्या शास्त्रज्ञांनी काम केलं. विशेषत: गॅलिलिओला त्याच्या दुर्बिणीच्या शोधामुळे जवळपास हेच भोगावं लागलं. त्यानं माफी मागितल्यामुळे तो सुटला, पण त्याच्या दुर्बिणीतून त्यानं सिद्ध करून दाखवलं की, पृथ्वी सूर्याभोवतीच कशी फिरत आहे ते.
मात्र माणसाच्या मनात ही परमेश्वराची संकल्पना एवढी घट्ट बसली होती की, तिचा त्याग करण्यास तो सहजासहजी तयार होत नव्हता. तो त्याग केल्याशिवाय माणसाला घरेलू वृत्तीच्या आयुष्यात सुख नांदेल असं दिसत नाही. कारण माणसानं परमेश्वर या संकल्पनेचा पाच हजार वर्षांत एवढा उदो उदो केला आहे- तो विश्वाचा पालनकर्ता आहे, अत्यंत दयाळू अशी ती शक्ती आहे, भक्तानं बोलावल्याबरोबर तो धावून जातो वगैरे वगैरे विधानं त्यानं केली आहेत. याच्यावर विश्वास ठेवणं आलं.
तरीसुद्धा परमेश्वराच्या दृष्टीनं एकापाठोपाठ एक धर्म स्थापन झाले. प्रथम फक्त हिंदू धर्म होता. नंतर ख्रिश्चॅनिटी आली आणि बाराशे वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्थापन झाला. या सर्व धर्मामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान ही एकच ‘कॉमन’ गोष्ट आहे. अशी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या अस्तित्वाचा कुठलाही पुरावा आतापर्यंत माणसाला मिळालेला नाही; अगदी इस्लाम धर्म स्थापन होईपर्यंत. आणि हे सर्व धर्म विज्ञानाच्या उदयाच्या अगोदरचे आहेत. त्या नैसर्गिक प्रश्नांची उत्तरं माणसाला सापडत नव्हती. म्हणून एका ‘परमेश्वर’ या संकल्पनेची कल्पना केली गेली.
आज या बहुतेक प्रश्नांचा उलगडा विज्ञानानं केला. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं विज्ञानाला सापडली, असा विज्ञानाचा दावा नाही. विज्ञानाचा हा दावा प्रामाणिकपणाचा आहे. नम्रतेचा आहे. विज्ञानानं काही शोध लावलेले आहेत. काही शोध लागताहेत आणि पुढेही लागतील. विज्ञान उद्धटपणे असं सांगत नाही की, माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, जसं ‘गीता’ वा ‘कुराण’ वा ‘बायबल’ या धर्मग्रंथांमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, असं सांगितलं जातं. असं उद्धटपण विज्ञानाकडे नाही.
हे विश्व कुणी निर्माण केलं, हे आता नाही सांगू शकत; पण आणखी काही वर्षांनी त्याचा शोध लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. या चारशे वर्षांत घडाघडा इतक्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत की, आणखी चारशे वर्षं गेली की, याही प्रश्नांची उत्तरं ते देईल असं दिसतंय.
परंतु आता प्रश्न असा आहे की, आज अस्तित्वात असलेले सर्व धर्म विज्ञानाच्या उदयापूर्वीचे असल्यामुळे ते सर्व कालबाह्य झालेले आहेत. ते सर्व रद्दबातल केले पाहिजेत. या सर्व धर्मांची ‘सर्वधर्मसमभाव’ ही भोंगळ संकल्पना आहे. म्हणजेच सर्व धर्म सारखे आहेत. परंतु हे खरं नाही, हे मला उघड दिसत आहे. सर्व धर्म एकमेकांहून वेगळे आहेत, म्हणूनच ते एकमेकांशी भांडताहेत.
हे धर्म स्थापन झाल्यापासून धर्माधर्मात कलह चालू आहेत. आणि त्यांनी पृथ्वीवर एवढा रक्तपात केलाय, की रक्तपात होण्याचे जे दुसरे अनेक मार्ग आहेत, म्हणजे रोगराई, दैवी प्रकोप यांच्यामुळे जेवढी माणसं मारली जातात, त्याहून कितीतरी अधिक माणसं धर्माधर्मात जे कलह झाले, जी युद्धे झाली, त्यामध्ये मारली गेली आहेत. उदाहरणं द्यायची झाल्यास ख्रिश्चनांची बूचर्डस म्हणा, मुसलमानांचे ‘जिहाद’ म्हणा किंवा आपल्या सहिष्णू अशा हिंदू धर्मातही वर्णव्यवस्थेखाली उच्चवर्णीयानी नीचवर्णीयांची केलेली कत्तल म्हणा, हाल म्हणा किंवा अगदी अलीकडील १९८४मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखधर्मियांची दिल्लीत झालेली भयानक कत्तल, अशा कत्तलींमध्ये माणसांचं इतके रक्त सांडलं गेलंय की, धर्म शांतिप्रेमाचा संदेश देतात, असं म्हणतात. त्याचा अर्थ मला कळत नाही.
धर्मग्रंथात हे सगळं प्रेमाबद्दल असतं, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण पाहतो, पाच हजार वर्षांचे व्यवहार पाहतो, तेव्हा असं दिसतं की, हे धर्म एकमेकांशी भांडत आहेत. हे धर्म कालबाह्य झाले आहेत, म्हणून ते सर्व ‘रिटायर’ केले पाहिजेत. परमेश्वराला ‘रिटायर’ करण्याचा अर्थ हा की, ही संकल्पना तुमच्या डोक्यातून काढून टाकल्याशिवाय ‘निधर्मीपणा’ची संकल्पना तुमच्या डोक्यात घुसणार नाही.
सर्व मानवाचा एक धर्म केला पाहिजे. त्यात परमेश्वरत्वं अधिष्ठान नाही. त्यात केवळ नीतिमत्तेचं अधिष्ठान असेल. त्यात केवळ शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन असेल. त्यात सौंदर्यदृष्टीचं अधिष्ठान असेल. असा सबंध मानवजातीला कवेत घेऊ शकेल, असा एक धर्म (धर्म हा शब्द वापरायचा असेल तर) असेल. समाजाची धारणा करतो, तो ‘धर्म’ या अर्थाने हा शब्द मी वापरतो आहे. मात्र समाजाचे काही नीतिनियम हे पाळलेच पाहिजेत.
तर सर्व धर्म बाद करायचे असतील, तर आपल्या डोक्यातील परमेश्वर ही संकल्पना नाहीशी केली पाहिजे, तर मानवतेच्या एका प्लॅटफॉर्मवर आपण जगाला काही देऊ शकू. विश्वधर्माची कल्पना अनेक लोकानी मांडली आहे. विवेकानंदांनी मांडली आहे. त्यानी एके ठिकाणी म्हटलं आहे की, बुद्ध हा सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय? त्यानं आपला हिंदू धर्म सोडून स्वतःचा बुद्ध धर्म स्थापन केला. तो सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ हिंदू आहे, इतकं भोंगळ विधान विवेकानंद करूच शकत नाहीत.
त्याचा अर्थ असा असावा की, जो लोककल्याणाकरिता सातत्यानं कर्मयोग आचरणात आणतो, तो खरा हिंदू, मग त्याचा धर्म कुठलाही असेल. हिंदू धर्माची व्याख्या त्यांनी इतकी व्यापक केली आहे, असं मला वाटतं. बुद्धाला त्यांनी ‘खरा कर्मयोगी’ अशाकरता म्हटलं, की तो सातत्यानं लोककल्याणाकरिता झटला. तो कुठल्या धर्माचा हे विचारत राहिला नाही, आणि इतकी ‘वाईट’ व्याख्याच जर तुम्हाला हिंदू धर्माची वा कुठल्याही धर्माची करायची असेल, तर ती आम्हाला मान्य आहे.
मला सांगा, परमेश्वराचं अस्तित्व तुम्ही पाच हजार वर्षं सांगत आहात, ते कशाच्या आधारावर? त्याचा पुरावा जोपर्यंत तुम्ही देत नाही, तोपर्यंत ते शक्य नाही, असं मी मानणार. नास्तिक लोकांचं मी समजू शकतो, पण आस्तिक लोकांचं मला समजत नाही. ते कशाच्या जोरावर आस्तिक राहिले आहेत. त्या गोष्टीच्या अस्तित्वाचा कसलाही पुरावा नाही. तुमचं जर म्हणणं आहे की, परमेश्वर नावाची गोष्ट आहे, तर ती सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची नाही का?
श्रद्धा या सगळ्या आंधळ्या असतात. डोळस श्रद्धा आणि आंधळ्या श्रद्धा असं नसतं. आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, त्याला श्रद्धा म्हणतात. विश्वास आणि श्रद्धा यामध्ये फार मोठा फरक आहे. माझा कुसमाग्रजांवर विश्वास आहे, गांधींवर विश्वास आहे, असं मी म्हणू शकतो. पण मी गांधींवर श्रद्धा आहे, असं म्हणतो, तेव्हा त्यांनी जे जे केलं आहे ते ते बरोबरच असलं पाहिजे किंवा गांधी एक कर्तुम-अकर्तुम शक्ती आहे, असं मी मानत असतो, असा अर्थ होतो. मी परमेश्वरावर श्रद्धा किंवा विश्वास कशाच्या आधारावर ठेवणार? तो मला डोळे झाकूनच ठेवावा लागतो. प्रथम परमेश्वर या संकल्पनेवर विश्वास ठेवावा लागतो आणि मग त्याला पूर्ण शरण जावं लागतं.
मी आस्तिक बनण्याची शक्यता आहे की नाही, हे मी सांगू शकत नाही. शक्यता मी नाकारत नाही. आज मी आस्तिक नाही. पण उद्या मी आस्तिक बनू शकणार नाही, असं काही मी सांगू शकणार नाही. त्याची शक्यता फार थोडी आहे. बहुतेक ती नसावी. मी स्वतःला ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ माणूस मानतो. रसेलनी एके ठिकाणी असं म्हटलं की, बुद्धिवाद ही साधी गोष्ट नाही, फार कठीण असा तो वसा आहे. जर तुम्ही बुद्धिप्रामाण्यवाद एका प्रश्नाला लावायचा ठरवलात, तर विश्लेषण करता करता जिथपर्यंत तुम्हाला फरपटत घेऊन जाईल, तिथपर्यंत जायची तयारी पाहिजे. ज्या उत्तराशी आणून सोडेल, ते उत्तर स्वीकारायची तयारी पाहिजे, तर मी परमेश्वर नाही या निष्कर्षापर्यंत गेलो, तेव्हा तो माझ्या सगळ्या ‘ऑर्ग्युमेंट’चा एक भाग असतो.
आइन्स्टाईन हा जगातील सर्वांत मोठा शास्त्रज्ञ, परंतु तो जगातील सर्वांत मोठा बुद्धिप्रामाण्यवादी आहे, असं काही म्हणता येणार नाही. केवळ आइन्स्टाईन मानतो, म्हणून मी परमेश्वराला मानणार नाही, किंवा केवळ मार्क्स परमेश्वर नाही म्हणतो, म्हणून मी परमेश्वर नाही, असं म्हणणार नाही. मार्क्सच्या मार्क्सवादाने जी काही विधाने केली, त्या मार्क्सवादालाही लोकांनी परमेश्वर करून टाकला. तो शब्द प्रमाण मानण्याची मला गरज वाटत नाही. ‘कुराणा’मध्ये वा ‘वेदां’मध्ये वा ‘बायबल’मध्ये लिहिले आहे, तेच प्रमाण, त्याचप्रमाणे आइन्स्टाईन म्हणतो, तेच प्रमाण मी मानणार नाही.
दुसरा किंवा सवाई आइन्स्टाईन म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं, तो स्टिफन हॉकिन्स नावाचा शास्त्रज्ञ आज हयात आहे. तो संपूर्ण गलितगात्र झालेला आहे. त्याला चालता येत नाही. त्याचा फक्त मेंदू काम करतो. त्याच्या पोटात जी थोडीफार शक्ती आहे, त्यानं तो कॉम्प्युटरवर काम करतो. सबंध विश्वाचा उगम कसा झाला, शेवट कसा होईल, याविषयी त्याचं संशोधन महत्त्वाचं आहे. याविषयीच्या संकल्पना त्यानं सिद्ध करून दाखवल्या आहेत. गलितगात्र असूनही तो आकडेवारीनं विश्वाचे अस्तित्व सिद्ध करून दाखवतो. त्याची थिअरी जेव्हा मांडली, तेव्हा तो म्हणाला, हे विश्व असं आहे, त्यात परमेश्वराला कुठं जागा आहे?
शेर्ले मैक्लिन या नटीला आपल्याला काही आध्यात्मिक अनुभव येतो, असं एकदा वाटू लागलं, तेव्हा ती या माणसाकडं गेली. आणि त्याला विचारलं, ‘Do you believe God in this?’ त्याला बोलता येत नाही. त्यानं कॉम्प्युटरवर लिहून दिले ‘No’.
गणपतीला आपण देव मानतो, गाईच्या पोटात देव आहे, असं मानतो. पृथ्वीवरील पंचमहाभूते परमेश्वरानं निर्माण केली आहेत, असंही मानतो. निसर्गाला आपण देव मानत नाही, तर निसर्ग परमेश्वरानं निर्माण केला, असं आपण मानतो. देव मानतो म्हणजे आपण नक्की काय मानतो?
मूर्तिपूजा ही आपल्या प्राथमिक अवस्थेतल्या बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. प्रत्येक गोष्टीचा निकष बुद्धिवादानं लागू शकतो. म्हणजे माणसांची भावना मी नाकारत नाही. उदा. आकाशात एखादं सुंदर दृश्य पाहताना तुम्ही भारावून जाता. सौंदर्यदृष्टी ही माणसाची एक आवश्यक गोष्ट आहे. शेवटी या निष्कर्षाप्रत यावं लागतं की, माणसाला समाजात नीतिमत्तेशिवाय कुठलीही व्यवस्था करता येणं शक्य नाही. निदान त्यानं करू नये.
जो मनुष्य परमेश्वराला अधिक मानतो, तो ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ असूच शकत नाही. काही यश मिळालं की, परमेश्वरामुळे मिळालं असं तो म्हणतो. साधी एक गोष्ट सांगतो- माझा एक पुतण्या प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाच्या रांगेत दप्तर घेऊन उभा होता. वेळ सकाळची ८-८.३०ची होती. मी त्याला म्हटलं, ‘अरे, तुझी ११ वाजता परीक्षा आहे ना! मग तू इथं काय करतोयस?’ तो म्हणाला,“अकरा वाजता माझी परीक्षा आहे. मी दर्शन घेऊन परीक्षेला जाणार आहे.’ मी त्याला म्हणालो, ‘गाढवा, तू चार तास घरी अभ्यास केलास, तर तू पास होण्याची शक्यता जास्त नाही का?’
हा फरक आहे. त्या माणसाची श्रद्धा असते की, गणपती त्याला यश देईल. मला वाटतं, त्यानं अभ्यास केल्याशिवाय त्याला यश मिळणार नाही. माणसानं प्रयत्नांवर संपूर्ण विसंबून राहिलं पाहिजे.
मात्र आपला भारतीय समाज पाच हजार वर्षं थंड गोळ्यासारखा स्वस्थ पडून होता. आणि त्याचं कारण ‘ठेविले अनंते तैसेचि रहावें’ ही वृत्ती. परमेश्वर जे देतो तेच जगावं. त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न कधी करू नये. लाथेखाली तुडवले जातोय तर तुडवून घ्या. कारण तशी परमेश्वराची इच्छा आहे. त्याविरुद्ध तुम्ही बंड करू नका. आपल्यावर पाच हजार वर्षांत एवढी आक्रमणं झाली की, भारतीय समाजाला ती परतवून लावण्याचा कधी त्वेष आला नाही. तो प्रत्येक आक्रमकापुढे नमत राहिला. पायदळी तुडवला गेला, पण जगत राहिला. त्याचं कारण हेच होतं की, ‘आपला परमेश्वर आहे. तू काळजी करू नकोस’. मला तर वाटतं, तो झुरळासारखा जगत राहिला. याला काय अर्थ आहे?
परमेश्वर मी लहानपणीच नाकारला. तसा मी कर्मठ कुटुंबात वाढलो. माझी मुंज झाली. मग संध्या करणं, पूजाअर्चा करणं, या गोष्टी आल्याच. या सगळ्या गोष्टींचा मला राग यायचा. या सर्व गोष्टींची ‘रिअॅक्शन’ म्हणून मी नास्तिक बनत गेलो. लहानपणी एक अपघात घडला. मी राहत होतो, तिथं विठोबाचं एक देऊळ होतं. तिथं आवारात एक मूर्तिकार विठोबाची मूर्ती बनवत होता. त्याचं मूर्ती घडवण्याचं काम कुतूहलानं बघत असे. एक दिवस मी माझ्या घरच्या माडीवर त्याची वाट बघत होतो. तो येत आहे हे मी पाहिलं आणि खाली जायला निघालो. जिना उतरून खाली आलो, एवढ्यात एका ट्रकनं त्याला उडवलं. मला शॉकच बसला. तेव्हा माझ्या डोक्यात आलं, परमेश्वर हा दयाळू आहे. आणि हा माणूस तर देवाची मूर्ती घडवणारा म्हणजे त्याचा परमभक्त. मग त्याला कसं देवानं झुरळासारखं चिरडून मारलं? आपल्याला देव देव आहे असं सांगतात, ते खरंच आहे का, हा विचार मनात आला. माझं वाचनही भरपूर होतं. या साऱ्याचा परिणाम म्हणून मी नास्तिक झालो.
पुढं मी मोठा झाल्यावर मला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आलं आणि मी सत्यनारायण पूजेला बसणार नाही, तिथं पैसा टाकणार नाही, पूजा करणार नाही, असं सांगू लागलो.
आता नास्तिक समाज नक्की वाढतो आहे. बरेच लोक बुद्धीचा, विचारशक्तीचा वापर करू लागले आहेत. परमेश्वर हे थोतांड आहे, हे त्यांना कळू लागलं आहे. त्याच्या मागं जाण्यात माणसाचं नुकसान जास्त झालं आहे. हे मानेवरील जोखड झुगारून दिलं पाहिजे. आपल्या उद्धाराचा मार्ग सापडू शकेल, असा म्हणणारा वर्ग वाढतो आहे हे नक्की. पण तो मोठा समाज म्हणून निर्माण झालेला नाही.
परमेश्वराचा विचार माणसाच्या डोक्यातून जायला फार वेळ लागेल, कारण लहान मुलाच्या डोक्यात लहानपणापासून आपण हे घुसवत असतो. लोक देवाच्या दर्शनासाठी रांग लावून उभे असतात, हे पाहून मला खरोखर चिंता वाटते. आपल्या माणूसपणाचा अपमान होतोय, असं मला वाटतं. प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये फरक कुठला असेल, तर माणसाला बुद्धिमत्ता आहे, विचारशक्ती आहे, स्मरणशक्ती आहे. तर प्राण्यात ती नाही. असं सांगतात, माणसाचा चार पंचमांश मेंदू जनावराचा आहे आणि एकपंचमांश मेंदू केवळ माणसाचा आहे. हा माणसात व प्राण्यात असलेला फरक आहे. माणूस आपली विचारशक्ती दुसऱ्या कुणाकडे गहाण टाकतो, तेव्हा तो सबंध माणूसजातीचा अपमान करतो. तो जाणूनबुजून एक बौद्धिक, मानसिक गुलामगिरी पत्करतो. ही गोष्ट फार चिंतेची आहे, असं मला वाटतं.
शंकरराव चव्हाणांसारखा एक जबाबदार माणूस सत्यसाईबाबाला वंदन केल्याशिवाय साधं एक पाऊलही पुढं टाकू शकत नाही, ही बाब मला चिंताजनक वाटते. हा माणूस जाणूनबुजून बौद्धिक गुलामगिरी पत्करतोय, हा शासन करायला नालायक आहे.
माझा अंधश्रद्धेला आक्षेप आहे, तो हा आहे.
माणसाला मनात असुरक्षित वाटतं आणि तो अंधश्रद्ध होत जातो. असंख्य पातळ्यांवर माणूस अंधश्रद्ध होत जातो. त्यात राजकारण केलं जातं. राजकीय माणसं सत्ता मिळवण्यासाठी या गोष्टीचा गैरफायदा घेतात. लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळत त्यांना धर्मवेडे करतात, देवभोळे करतात आणि असं सांगतात की, अयोध्येला राममंदिर बांधलं की, भारतीय समाजाचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. असं सांगणं ही उघडउघड धूळफेक असते आणि हेही राजकारणी जाणूनबुजून करतात. त्यात सामान्य माणूस बळी पडतो. कारण त्याची बुद्धी कुठेतरी गहाण पडलेली असते. स्वतःची बुद्धी तो स्वतंत्र विचार करायला वापरू लागला तर ती गोष्ट होणार नाही.
आज हिंदूंमध्येच काय, मुसलमान तसेच ख्रिश्चन धर्मामध्येही धर्मवेडेपणा वाढत चालला आहे. रशियात ‘तो’ प्रयोग फसला, कारण निधर्मीपणा त्यांच्यावर लादला गेला होता. प्रबोधनाच्या नावानं जर ते निधर्मीवादाकडं वा निरिश्वरवादाकडं गेले असते, तर आज रशियात जो प्रसंग उद्भवला तो उद्भवला नसता.
जो माणूस ईश्वर मानत नाही, त्याचा विचार मला आदर्श वाटतो. फुल्यांनी क्रांतिकारक विचार मांडताना ‘निर्मिती’ ही कल्पना मांडली, तेव्हा तो त्यांच्या विचारातला मला उणेपणा वाटला. आंबेडकरांसारखा माणूस ठामपणे सांगतो की, ‘मी निरिश्वरवादी आहे. तरीसुद्धा मी हिंदू धर्म सोडण्याची भाषा करतो, तेव्हा ती निधर्मी होत नाही. फक्त बुद्धधर्मीय होते. का तर बुद्ध हा निरिश्वरवादी होता. बुद्धाने ईश्वर नाकारलेला होता म्हणून मला बुद्ध धर्म स्वीकारावासा वाटला.’ पण या गोष्टीला माझा विरोध आहे. मग जो माणूस परमेश्वर मानतो, त्याला मी कधीच आदर्श मानत नाही. मग तो ज्ञानेश्वर असो, तुकाराम असो, की कुणी संत-महंत असो.
मी बर्ट्रांड रसेलला मानतो. तो म्हणतो, ईश्वर नाही, अशी माझी श्रद्धा आहे आणि मी नास्तिक आहे.
मला चार्वाकचा विचार सर्वांत जवळचा वाटतो. तो माणूस पाच हजार वर्षांपूर्वी वैदिक काळात होऊन गेला. त्यानं ‘ईश्वर’ ही संकल्पनाच नव्हे, तर आत्मा ही संकल्पनाही नाकारली होती. पुनर्जन्म नाकारला होता. म्हणून तो मला सर्वांत जवळचा…
‘परमेश्वर’ ही संकल्पना भव्य आहे. भारतीय संस्कृतीत पुरुष प्रकृतीच्या माध्यमातून ईश्वर निर्माण झाला, अशी संकल्पना आहे. त्यात प्रतिभेचा अंश नक्कीच आहे. पण एक दगडाची मूर्ती स्वतः बनवायची आणि त्याला परमेश्वर मानायचा. त्या मूर्तीचं नीट चाललं की, सारं व्यवस्थित आहे हे मानायचं हे मला मान्य नाही. परवाचं एक उदाहरण सांगतो… ‘महाराष्ट्र टाइम्स’सारख्या प्रागतिक वृत्तपत्रामध्ये गणपतीच्या दिवसात मुसळधार पावसाबाबतच्या एका बातमीचं शीर्षक असं होतं : ‘मुसळधार पावसामध्ये गणपतीचा मंडप मात्र शाबूत.’ बाकीच्या बातमीत होतं, तुफान पाऊस पडतोय, रेल्वेत माणसे अडकून पडलीत. अनेक झोपडपट्ट्या वाहून गेल्या आहेत. अनेक माणसे वाहून गेली आहेत. हा हलकल्लोळ यावेळी चालू असता गणेश नावाची जी देवता आहे, ती स्वतःचा मंडप मात्र शाबूत ठेवते आहे आणि याला आम्ही ‘विघ्नहर्ता’ म्हणतो! अशा ठिकाणी माणूस आपली बुद्धी का गहाण टाकतो, ते कळत नाही.
आपण ज्या ज्या अंधश्रद्धा आहेत असं म्हणतो, म्हणजे बुवाबाजी, भानामती, करणी, मूठ मारणं, फलज्योतिष बघता येणं, या सगळ्या अंधश्रद्धांचं मूळ परमेश्वर या संकल्पनेत आहे आणि दैवशक्ती ही कल्पना केल्याशिवाय तुम्ही अंधश्रद्ध असूच शकत नाही.
सत्यसाईबाबा हात फिरवून अंगठी कशी काढू शकतो, तर त्याला दैवी शक्ती प्राप्त झाली आहे. एखाद्या बाईच्या अंगात आलं की, ती भविष्य कशी सांगू शकते, तर तिच्यात दैवी शक्ती आहे. प्रत्येक अंधश्रद्धेच्या मुळाशी देवी शक्तीवरचा विश्वास आहे. तो विश्वास म्हणजे सगळ्या अंधश्रद्धांचं मूळ आहे. ते मूळ म्हणजे दैवी शक्ती ही संकल्पना उखडल्याशिवाय म्हणजेच परमेश्वर ही संकल्पना डोक्यातून काढून टाकल्याशिवाय अंधश्रद्धेचं निर्मूलन होणार नाही.
पाच हजार वर्षांपासून अनेकानी प्रयत्न केले. कपिल, कणाद, चार्वाक तसेच अनेक संत झाले. आगरकर, फुले झाले. आणि आतापर्यंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे प्रयत्न झाले, परंतु अंधश्रद्धा कमी होत नाहीत. गेली पाच हजार वर्षं त्या जास्त जास्त दृढ होत चालल्यात.
‘ईश्वर’ ही संकल्पना आपणच निर्माण केली आहे. समजा, एखादं मूल निर्जन बेटावर वाढलं, तर त्याच्या डोक्यात ईश्वर ही संकल्पना येईल का? नक्कीच नाही.
सागराला, सूर्याला नमस्कार करणं हा संस्काराचा भाग आहे. मात्र मी नमस्कार केला नाही, तर अपटीत घडेल, हा श्रद्धेचा भाग झाला. पूजेला माझा विरोध नाही, पण पूजा काही स्वार्थी भावनेनं केली जाते, त्याला माझा विरोध आहे. पूजेला विरोध करण्याचं कारण नाही. त्यामध्ये भावना कुठल्या आहेत, ते महत्त्वाचं आहे. समुद्र ही नियतीची एक शक्ती आहे. ती मला भरपूर देते. त्यावर माझं आयुष्य अवलंबून आहे. आणि असा समुद्र थोडा ओसरला आहे. उद्यापासून माझ्या बोटी मी हाकारणार आहे, तर त्याआधी हा तुला नमस्कार. हा अतिशय सुंदर संस्कार आहे.
म्हणून पूजा करणं या प्रकाराला माझा विरोध नाही. त्यामागे भावना काय आहे हे महत्त्वाचं आहे. परमेश्वराची पूजा करतात, त्याबद्दल मला आदर आहे. मला तो व्यक्त करावासा वाटतो आणि ती कृतज्ञता व्यक्त करणं, हा सुंदर संस्कार आहे. बहुसंख्य लोक पूजा करतात की, माझं काहीतरी भलं व्हावं. आज मी पूजा केली नाही, तर काहीतरी अशुभ होईल, असे अनेक शिकलेल्यांनाही वाटत असतं.
अलीकडील एक उदाहरण. मी ३० तारखेला अहमदाबादला होतो, आणि २९ तारखेला गणपती विसर्जन झालं. मुंबईला विसर्जन सोहळा पाहून हा गृहस्थ अहमदाबादला आला आणि ३० तारखेला महाराष्ट्रात भूकंप झाला. तर हा डॉक्टर असलेला बुद्धिवंत माणूस सांगत होता की, विसर्जन करताना एका गणपतीची मूर्ती उलटी झाली. खाली डोकं व वर पाय. त्यामुळे संतापून गणपतीनं अशी लाथ मारली, त्यामुळे हो प्रकोप झाला आहे. आता गणपतीची शांती करण्यासाठी एक यज्ञ होणार आहे. आणि त्यामध्ये दोन-तीन कोटी रुपये खर्च येणार आहे. तर याला कसली विचारशक्ती वा बुद्धिमत्ता म्हणायची?
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
परमेश्वराची भाविकपणे पूजा करणारी माणसं मला माहीत आहेत. त्यांचा आदर मी करतो. माझी आई गोंधळली होती. तिला वाटायचं, ही एक प्रचंड शक्ती आहे. त्याकडे काही मागायला जावं, हा त्या शक्तीचा अपमान आहे. खऱ्या अर्थानं जी माणसं धार्मिक असतात, त्यांच्याशी माझं काही भांडण नाही. परंतु धर्म हा प्रकार स्वतःच्या स्वार्थाकरता राबवला जातो ते वाईट. मला तसे परमेश्वराचे काही अनुभव आले नाहीत आणि त्यामुळे मी ईश्वर आहे असं म्हणण्याचं धाडस केलं नाही.
ज्ञानेश्वरांना ईश्वराचा साक्षात्कार झाला, तुकारामांना झाला, परमहंसांना झाला आणि तुम्ही सांगता परमेश्वर नाही. मग तुम्ही त्यांच्यापेक्षा शहाणे का? तर मी म्हणतो, ते तुकाराम, ज्ञानेश्वर यांना साक्षात्कार झाला. त्यांना साक्षात्कार झाला असणारच. आणि मी तो साक्षात्कार तुमच्या ‘हिप्नॉटिझम’ पद्धतीनं घडवून आणू शकतो. असा माझा दावा आहे. बरं, साक्षात्कार झाला, मग ते तो साक्षात्कार इतरांना घडवू शकले का? साक्षात्कार होऊनसुद्धा लोकांनी तुकारामाच्या पोथ्या बुडवल्या नि ज्ञानेश्वरांचा छळ केलाच ना? मग साक्षात्कार घडले, तर काय मोठं झालं? मग काय मोठं मैदान मारलं?
आज आमच्या दाभोलकरांकडे अनेक मोठे कार्यकर्ते संमोहनामुळे राम-कृष्ण यांचा साक्षात्कार घडवून दाखवू शकतील. तुकाराम-ज्ञानेश्वर यांना नक्कीच साक्षात्कार घडला असणार. कारण ही माणसं खोटं बोलणारी नव्हती. मात्र सत्यसाईबाबासारखा माणूस असं म्हणतो, तेव्हा तो नक्कीच थापा मारतोय, बदमाशी करतोय, असं समजायला हवं.
हा मूळ लेख ‘माझं बुद्धिप्रामाण्य’ या नावाने ‘अबकडई’च्या दिवाळी १९९३च्या अंकात प्रकाशित झाला होता.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 25 January 2024
लागू साहेब चार्वाकाला आपला मानतात. ठीके. पण मग मानवी आयुष्याचं प्रयोजन रहात नाही. मानवी देह म्हणजे केवळ हाडामांसाचा गोळा होतो. तसाही जन्मास आलेला प्रत्येक जीव मरणारच आहे. मग लागू साहेबांना ठार का मारू नये? निदान खाणारं एक तोंड तरी कमी होईल. गरीबाच्या मुखात घास पडेल.
असो.
लागू साहेब ज्या धर्माचं आणि परमेश्वराचं वर्णन करताहेत तो वाळवंटी पंथ आहे. त्याचा हिंदू धर्माशी काडीमात्र संबंध नाही.
-गा.पै.