‘देवावर श्रद्धा असावी’ हे जवळजवळ सगळेच सांगत आले आहेत. मला मात्र देवाचे एकूण वागणे आमच्या आजच्या राज्यकर्त्यांसारखेच वाटत आले आहे. ‘देव’ हा घरच्या म्हातारीला काळ!
जगातले बरेचसे देश हिंडून आल्यानंतर माझी खात्रीच पटली आहे की, देवाचे आपल्या देशात जितके लाड केले जातात, तितके इतरत्र कुठेही होत नसतील. महाराष्ट्रात एवढा मोठा दुष्काळ पडला, तरी गणपतीच्या मोदकांची संख्या एकविसाच्या खाली आली नव्हती. प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या देवळातली दर मंगळवारची गर्दी वाढतच चाललेली दिसते. एके काळी हाच सिद्धिविनायक एकान्तवासात असल्यासारखा होता. आता अंगारकीला तर हजारा-हजारांच्या रांगा तिथे असतात. त्याच रांगा मग धान्याच्या दुकानापुढे लागतात. रॉकेलसाठी लागतात. साखर नाही तर डालडा आल्याचे ऐकल्यावर लागतात. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजपुढे लागतात. आणखी एक रांग रात्री बारा-साडेबाराच्या सुमाराला आमच्या तळमजल्यावरच्या हॉटेलाबाहेर लागते. आबालवृद्धांची रांग!
हॉटेलची मुख्य दारे बंद झाल्यावर स्वैपाकघराच्या बाजूला. प्रत्येकाच्या हातात ॲल्युमिनियमची भांडी, पत्र्याची डबडी, कागदाची बॉक्से वगैरे काहीतरी असते. हॉटेलात शिल्लक राहिलेले अन्न त्या भांड्यांत पडते. रोज रात्री हे उरल्यासुरल्या खाद्यपदार्थाचे अन्नसंतर्पण चालते. त्या मुहूर्ताची वाट पाहत ही माणसे मध्यरात्रीपर्यंत रोज ताटकळत असतात. काळोखात कुठे दडी मारून बसलेली असतात ते कळत नाही. पण स्वैपाकघराचा दरवाजा किलकिला झाला की, त्या अंधारातल्या कोनाकोपऱ्यांतून चारपाच वर्षांच्या अर्भकापासून ते कमरेत वाकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत हा शे-सव्वाशे भुकेल्या जीवांचा घोळका त्या दारापाशी जमतो. मग कचकचाट होतो. अन्नवाटप करणारे आचारीबुवा जोरात खेकसून ‘क्यू’ लावायला सांगतात. क्यू लागतो. आणि ते अन्नसंतर्पण सुरू होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सिद्धिविनायक त्या ठिकाणापासून फार दूर नाही. तसा म्हणे तो सर्वत्र आहे! पण तिथे देवळात कदाचित कीर्तन रंगात आलेले असेल. बुवा त्याच वेळी भक्तांच्या संकटकाली भगवंत कशी धाव घेतात, या विषयावरचे आख्यान संकष्टीचा उपास सोडून आलेल्यांना साग्रसंगीत ढंगात सांगत असतील. माझ्या डोक्यात त्या देवळापुढली रांग आणि रोज मध्यरात्री ही अन्नब्रह्माच्या याचनेसाठी लागणारी रांग, यातले काय खरं, काय खोटे याचे प्रश्न उभे राहत असतात.
आणि मग या दुसऱ्या रांगेसाठी काहीतरी करायला हवे, असा विचार त्या विघ्नहर्त्याला का येत नाही, हा प्रश्न छळायला लागतो. सानेगुरुजी, गांधी वगैरे मंडळींप्रमाणे देवबाप्पांनीही आता मला फसवले आहे, याची खात्री पटली आहे.
देव दीनांचा वाली आहे आणि संकटकाली तो भक्तांच्या मदतीला धावून जातो, याचे पुरावे पौराणिक ललित वाङ्मयाखेरीज मला कुठे सापडतच नाहीत.
असाच एकदा नर्मदेकाठच्या ओंकारेश्वराच्या देवळात गेलो होतो. दगडागोट्यांतून बेबंद वाहणाऱ्या नर्मदेच्या प्रवाहातून होड्या हाकणाऱ्यांचे कसब विलक्षण असते. ओंकारेश्वराचा तो परिसर, तो नर्मदामैया-हे सारे चित्रकारांना तर वेड लावणारे दृश्य! शब्द, चित्र, नाद अशा साऱ्यांनी ते निसर्गवैभव पकडायचा कलावंतांनी प्रयत्न केला आहे, पण हे वैभव कुंचले, लेखण्या आणि वीणेच्या पार आहे.
वास्तविक एवढ्यावरच समाधान मानायला हवे होते, पण ओंकारेश्वराच्या देवळाविषयी ऐकले होते, म्हणून देवळात गेलो. दारातच पुजारीबुवांनी गाठले. पुजारीमहाराज मराठी निघाले. त्यांनी सुरुवातीलाच शंकरजींना नित्य पंचपक्वान्नांचा भोग कसा चढतो, याचे रसभरित वर्णन केले. वास्तविक पुजारीबुवांच्या दोंदाकडे पाहून हे आमच्या आधीच ध्यानात यायला हवे होते. कारण तो भोग भोगून, दुपारची वामकुक्षी वगैरे आटोपून ते संध्याकाळच्या शांभवीची साधनसामग्री जमवायला मंडीत जाऊन राहिले होते.
दख्खनी मंडळी असल्याचा त्यांना शक आला म्हणून हेरून गेले होते. मग त्यांनी आमच्यावर मेहेरबानी म्हणून गाभाऱ्याचा दरवाजा खुलवून दिला. एरवी भोलानाथजींचीदेखील ती निद्रेची वेळ होती. त्यांनी दरवाजा उघडताच शंकरजीच्या पिंडीवर पाच-सात उंदीर खेळून राहिलेले दिसले. आमची चाहूल लागल्यावर उंदीर पळाले. शंकराच्या पिंडीवर खेळायची उंदीर-जमातीला हौसच असावी. कारण स्वामी दयानंदांनाही उंदीर पिंडीवर खेळताना पाहून आर्यसमाज काढायची स्फूर्ती झाली होती!
आम्ही पुजारीमहाराजांना विचारल्यावर त्यांनी प्रसन्न मुद्रेने आम्हांला सांगितलं, ‘जिथं मंदिर तिथं उंदीर आहेतच!’ आणि आपल्या विनोदावर ते ज्या कोडगेपणाने हसले त्याला तोड नव्हती. वर देवापुढे आम्ही काही ठेवावे, अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली. मीदेखील ‘शंकरापुढं आम्ही काय ठेवणार? नर्मदेतले कंकर?’ असे म्हणून त्याला यमकात मारले होते. तरीही आम्ही त्याला एखादी दूध-लोटी पिलवून द्यावी, अशी मांग त्याने केलीच!
हे सारे किती किळसवाणे असते, पण ते तसे नसावे. ‘मंदिरातले उंदीर’ आम्हांलाच कुरतडून जातात. कारण शंकरजीची वामकुक्षी संपल्याची खबर लागल्यावर मंदिराच्या दिशेने लोकांचे लोंढे निघाले होते. मग ही माणसे माझी कोण? ज्या त्यांच्या धर्माच्या कल्पनेशी माझे कुठेच नाते जमत नाही, ते माझे धर्मबांधव कसे? आणि ज्यांच्याशी माझे कुठलेच वैचारिक सूत नाही, ते केवळ एकाच भौगोलिक खंडात राहतात म्हणून देशबांधव तरी कसे?
नर्मदानदीच्या परिसरातल्या त्या साऱ्या सौंदर्याला छेद देऊन जाणारे प्रश्न डोक्यात घेऊन पुन्हा एकदा त्या अनेकांतला एक न होता अनेकांबाहेरचे शून्य होऊन मी बाहेर पडलो.
ओंकारेश्वराच्या शिवलिंगावर मला उंदीर खेळताना दिसले होते. पेरियार नदीच्या काठच्या आद्य शंकराचार्यांच्या कालडी गावातल्या शारदांबेच्या देवळातल्या गाभाऱ्याचे दारही बंद होते. ते तिथल्या नंबुद्रीपादाच्या हातावर रुपया टिचवून मी उघडायला लावले होते. आणि त्या गाभाऱ्यातून झुरळांच्या झुंडी बाहेर पडल्या होत्या! नशीब माझे की, त्या भस्मंभट्टजीला मराठी येत नव्हते. नाहीतर तोही ‘जिथे केरळ तिथे झुरळ आहेच’ म्हणाला असता!
देवांनासुद्धा माणसांसारखे नशीब असावे. सिनेमात जशी काही विशिष्ट नटांची आणि नट्यांची काही काळ चलती असते, तशीच देवांचीही असावी. सध्या गणपतीबाप्पांना खूपच चांगले दिवस आले आहेत. अर्थात सगळ्याच गणपतींना नव्हे. त्या मानाने शंकर-पार्वती, राम, कृष्ण वगैरेंची लोकप्रियता ओसरलेली दिसते. विठूराया हा गरिबांचा देव असल्यामुळे एक पंढरीचा पाटील सोडला, तर बाकीचे विठोबा आणि त्यांचे भक्त यांची आर्थिक परिस्थिती सारख्याच हलाखीची आहे. मला एकदा एक चित्रपट-निर्माते म्हणाले होते की, विठ्ठल हा भक्ताला दारिद्र्यात ठेवणारा देव आहे.
त्यांची बालाजीवर श्रद्धा होती. बालाजी हा पैसे देणारा देव. आंध्र-तामीळनाडूमधले व्यापारी तर त्या तिरुपतिव्यंकटरमणाला आपल्या धंद्यातला ‘भागीदार’ मानून नफ्यातला हिस्सा इमानाने नेऊन त्याच्या हौदात ओततात! माझ्या एका आंध्र मित्राने मला तिरुपतिव्यंकटरमणा हा ‘मोस्ट्ट पावरफुल् गॉड’ आहे असे सांगितले होते. ‘तुम्ही मागाल ते देणारा तो देव आहे’ अशी त्याने बालाजीबद्दल माझ्याकडे भलामण केली होती.
अशा वेळी मला एकच शंका येते. त्या देवाच्या डोंगरावर हजारी पायऱ्या चढून जाणारे भक्त कधी ‘धान्याच्या किमती उतरू देत’, ‘भरपूर रॉकेल मिळू दे’, ‘बिनपागडीच्या जागा मिळू देत’, ‘पिण्याचे पाणी सगळ्यांना विनासायास मिळू दे’ असले मागणे मागत असतील का? नसावेत. कारण व्यापाऱ्यांचा देव गिऱ्हाइकांवर प्रसन्न झाला, तर त्याच्या त्या ‘मुडुपम्’मध्ये काय पडणार? बालाजीला एक हिऱ्याचा कंठा घालायला हजारो गिन्हाइकांचे प्राण कंठाशी आणावे लागतात.
कुठल्या देवाला काय वाहायचे, तसेच कुठल्या देवापुढे काय मागायचे याचेही शास्त्र आहे. भलत्या ठिकाणी भलते मागून नाही ती आपत्ती कोसळते. स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे. मी एका आरोग्यमंदिरात गेलो होतो. हॉटेलांचे शुद्धीकरण करून काढलेल्या ‘आरोग्यमंदिरा’त. तिथे बटाटापुरी चांगली मिळायची. विशेषतः बटाटापुरीबरोबरची वाटल्या डाळीतली मिरचीची चटणी. मी बटाटापुरी रिचवली आणि सवयीप्रमाणे चहा मागवला. काउंटरवरच्या खादीधारी गृहस्थांनी माझ्या तोंडून ‘चहा’ हा शब्द ऐकला आणि तिथून ते कडाडले, ‘‘बाहेर व्हा! हे काय हॉटेल समजलात?’’ मला त्यांनी चहाचे पीयूष करायचीदेखील सवड ठेवली नाही... “मुरलीधर, त्यांचं बिल सांग....”
आरोग्यमंदिरात नुसता ‘चहा’ हा शब्द उच्चारणे, हादेखील गुन्हा होता. मी निमूटपणे उठलो. कारण काउंटरवरचे आरोग्यरक्षक मुंडीछाट पैरणीच्या आत मारुतीचा ताईत वगैरे ठेवून होते. वेटरचे नाव ‘मुरलीधर’ असू शकेल, हे तोपर्यंत मला वाटले नव्हते. पांडू, गणू किंवा गजा एवढ्यात हॉटेलमधल्या पोऱ्यांची नावे संपायची. पण आरोग्यमंदिरात पन्ह्याचा पी- आंबा आणि ताकाचे पीयूष झाले, तसे फडका मारणाऱ्या पोऱ्याचेही पुन्हा बारसे झाले असेल, अशी कल्पना नव्हती.
मी आपला बटाटापुरी आणि तो आरोग्यदायक अपमान गिळून खाली उतरलो आणि तडक इराण्याच्या हॉटेलात जाऊन त्या आरोग्यमंदिरवाल्याच्या नाकावर टिच्चून चहा प्यालो. तात्पर्य, आरोग्यमंदिरात चहा मागवल्याने मी जी आपत्ती ओढवून घेतली, तशी उद्या मारुतीच्या देवळात जाऊन ‘तेलाचे भाव उतरू देत’ असे म्हणालो, तर मारुतराय मला ‘राम’ म्हणायला लावतील.
लहानपणी आम्ही मारुतरायापुढे ‘दंडात बेटकुळी येऊ दे’ असे मागत होतो. पण आमचे गणिताचे मास्तरसुद्धा त्याच्यापुढे तसलेच शक्तिवर्धक मागणे मागत असावे. कारण त्यांच्या हातात भलतीच ताकद असल्याचे पुरावे त्या काळी कोणालाही आमच्या कानशिलावर दिसले असते. दत्तमंदिरात अंगात येणे- अंगाबाहेर जाण्याचे मागणे मागतात.
आमच्या सगळ्या देवांनी आपापले वार लावून ठेवले आहेत. सोमवार हा शंकराचा वार! मग इतर वारी शंकरजींचा उद्योग काय बरे असावा? मी असे प्रश्न विचारले की, काही लोक माझ्यावर नास्तिकतेचा आरोप करतात. वास्तविक माझी आस्तिक होण्याची विलक्षण इच्छा आहे, पण आस्तिकांच्या अनेक गोष्टी मला बुचकळ्यात टाकतात.
नुकतेच आमच्या गावात एका देशी व फोरेन दारूच्या दुकानाचे उद्घाटन झाले. कुठल्याशा थोर नेत्याने ते उद्घाटन केले. म्हणजे समारंभपूर्वक चांदीच्या स्क्रूने बूच उपटून बाटली तोंडाला लावली असेल. त्यानंतरचे त्यांचे भाषण वाचल्यावर मला आपली ही शंका आली, पण त्या उद्घाटनाप्रीत्यर्थ सत्यनारायणाची महापूजा होती. दारूच्या दुकानाच्या उद्घाटनाबद्दल सत्यनारायण असल्यामुळे प्रसादापेक्षा तीर्थाच्या दिशेला मंडळी अधिक श्रद्धेने धावली असतील, असा एक माझा नम्र अंदाज आहे. एरवी दारूचे दुकान आणि सत्यनारायण यांची सांगड कशी घालायची? असले अनेक प्रश्न माझ्या आस्तिक्याच्या आड येतात.
देवांच्या नेमून दिलेल्या वारावरून आठवले. बुधवार हा हिंदू देवांचा ऑफ वार. तसाच रविवार. आमच्या धर्मशास्त्रकारांनी ‘आठवड्याच्या दोन सख्या’ हे तत्त्व केव्हाच स्वीकारले होते. पण रविवार हा ख्रिश्चन आस्तिकांचा वार. बुधवार सुटा होता, तो माहीमच्या चर्चवाल्यांनी पकडला. तिथे ‘नोबीना’ नावाची नवसाला पावणारी नवी देवी आहे. चर्चवाल्यांना ती अलीकडेच सापडल्यामुळे ती ‘नवीना’ तथा ‘नोबीना’ झाली. तिला करायचा नवस जरा गोंधळाचाच आहे.
आपल्याला जिथे दुखणे असेल त्या अवयवाची मेणाची आकृती करून त्या ख्रिस्ती देवतेला वाहिली की, दुखरा अवयव दुरुस्त! त्या चर्चमध्ये सर्व धर्माचे लोक जातात. मेणाचा अवयव वाहतात आणि आपला अवयव दुरुस्त करून बाहेर पडतात. मी या चमत्कारावर विश्वास ठेवायचे ठरवतो. पण आमच्या शेजारच्या चित्रेकाकांना मूळव्याध आहे. आता त्यांनी मेणाचे काय अर्पण करायचे? ब्लडप्रेशरवाल्यांनी काय वाहायचे? आणि मधुमेहवाल्यांनी? मेणाचे अवयव देऊन आपल्या शरीरातले दुखरे अवयव दुरुस्त होतात यावर विश्वास ठेवणारांनी जर मेणाचे मेंदू तिथे नेऊन वाहिले, तर मात्र देवबाप्पांचीच पंचाईत होईल. कारण एकदा मेंदू ताळ्यावर आला की, देवळे, चर्चे, मशिदी, दर्गे यांचा धंदाच बसेल!
या नवसांच्या बाबतीत माझी आणखीही एक पंचाईत होते. आमच्या राजकीय निवडणुकांचे नारळदेखील देवापुढे फुटतात. महाराष्ट्रात तुळजाभवानीपुढे हे किंवा ते माननीय काँग्रेसनेते (काँग्रेसला हल्ली पुढारी नसून नेते असतात.) यथासांग पूजाबिजा करून छत्रपतींवर प्रसन्न झालेल्या या देवीपुढे नारळ फोडतात. तुळजाभवानी ही राजकारणात यश देणारी देवी. विठ्ठल किवा दत्त यांना राजकीय डावपेच कळत नाहीत. एकदा निवडणुकीच्या नवसाला पावून ती सत्तेची खुर्ची देते हे कळल्यावर सर्व पक्षांचे नारळ तिच्यापुढे फुटणार! अशा वेळी कुठल्या उमेदवाराच्या नवसाला पावायचे हा निर्णय ती कशी घेते?
दारूचे दुकान भरभराटीला यावे म्हणून सर्वांच्या ठायी मुसुंबी ठोकण्याची बुद्धी उत्पन्न करणारा सत्यनारायण, कुठल्या पक्षाला मते द्यावी ही बुद्धी मतदारांच्यात उत्पन्न करणारी तुळजाभवानी, ज्युबिल्यांवर ज्युबिल्या घडवून सिनेमावाल्यांची धन करण्यासाठी सिनेमाची चटक लावणारे देव, खोटे हिशेब ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वह्या खऱ्या हिशेबाच्या आहेत, असे आयकर अधिकाऱ्यांना वाटायची बुद्धी देणारे लक्ष्मीनारायण-कसल्या विचित्र जबाबदाऱ्या येऊन पडल्या आहेत, या आमच्या देवदेवतांवर!
परवाच्या पाकिस्तान आणि बांगला देशच्या युद्धात लाहोरला डाक्केवाले मुसलमान हरू देत म्हणून चाललेले नमाज आणि तिकडे लाहोरवाल्यांचा ‘शब्बोनाश’ व्हावा, म्हणून डाक्याला चाललेल्या मिन्नती ह्यात अल्लामियाचेसुद्धा काय हाल झाले असतील!
‘देव’ ह्या प्राण्याबद्दल असे शेकडो प्रश्न निर्माण होत असल्यामुळे, हल्ली माझ्या मित्रांनादेखील माझा ताप होऊ लागलेला आहे. ‘पूर्वी कसा श्रद्धाळू होता. हल्लीच याला काय झालं आहे देव जाणे!’ (त्यांचे सारे देव जाणतो.) अशा रीतीने माझ्याशी वागतात. बरे, प्रत्यक्ष बैठकीत मला विरोध करत नाहीत. पूर्वी मुंबईच्या रस्त्यातल्या मारामारीत ‘जाना दो, जाना दो-पीयेला आदमी हैं’ या समजूतदारपणाने मारामाऱ्यांतून गडबडगुंडा करणाऱ्या माणसाला लोक दूर न्यायचे. पण एकीकडे मात्र “नाही...म्हणजे तू म्हणतोस... ते.. खोटं नाही…” म्हणत हे माझ्यापासूनच दूर जातात. तसे माझे मित्र चांगले आहेत. आगरकर, फुले वगैरे वाचून आहेत. किंबहुना, काही जणांनी मला लोकहितवादी, आगरकर आणि फुले यांच्यातली साम्यस्थळे वगैरे दाखवूनही दिली आहेत.
असा मित्र मुलाच्या लग्नात मला हुंडा घेताना आढळतो. आहेर घेताना दिसतो. मुलीच्या लग्नात त्याची बायको, वरमाया आणि शत्रुपक्षातल्या अन्य साळकायांचे पाय धुताना दिसते. वडीलधाऱ्या माणसाच्या मृत्यूनंतर भटाभिक्षुकांच्या आहारी जाऊन भाताच्या गोळ्यांवर तीळ वगैरे पेरताना दिसतात. खांद्यावर मडकेबिडके धरून सरणाभोवती प्रदक्षिणा घालताना दिसतात. आणि त्या समाजातले आपण कोणीही नाही, ही जाणीव घेऊनच जगावे लागते. जिथे स्नेह वाढीला लागावा तिथे शून्यता वाढत जाते!
मनुष्य नुसता भाकरीने जगू शकत नाही, हे एक श्रद्धावाल्यांचे आवडते मत आहे. पण तो भाकरीशिवाय तर मुळीच जगू शकत नाही. म्हणूनच प्राचीन विचारवंतांनी ‘भरपूर अन्न पिकवा’ असा संस्कृतातून नारा दिला होता. भक्तीचा मळा वगैरे ठीक आहे. पण दुपारच्या वेळी ताटात त्या मळ्यात पिकलेली भक्ती वाढून चालत नाही.
देवादिकांच्या कथा मला फार आवडतात, तशा मला हल्लीच्या लेखकांच्याही चांगल्या कथा आवडतात. मुंबईतल्या लोकारण्यात साऱ्या सुंदर भावनांचा चिखल होऊन गेलेली अरविंद गोखल्यांची ‘मंजुळा’, तिच्या भावनांची यत्किंचितही कदर नसलेला तो तिचा नवरा नामक मालक-स्त्रीजन्माला आल्याची सारी दुःखे भोगणारी ती मंजुळा आणि रामायणातली दंडकारण्यातली सीता यांच्यात मला फरक दिसत नाही. मग सीतेचे देऊळ का? मंजुळेचे का नाही? वास्तविक दोघींचेही नको.
‘महाभारत’, ‘रामायण’ यांसारख्या असामान्य ललित साहित्यातल्या नायकनायिकांची भक्ती कशी करायची? लोकापवादाला भिणारा राम हा मला तत्कालीन समाजपरिस्थितीचे स्वरूप दाखवतो. लोअर कोर्टातली शिक्षा सरकारी अपिलात आणखी वाढवून दिल्याची उदाहरणे असतात. तशी अग्निदिव्याच्या शिक्षेतून पार पडलेल्या सीतेला पृथ्वी दुभंगून तिच्यात गाडून घेण्याची शिक्षा मिळाली. का? तर कुणीतरी तिच्या देहाच्या पावित्र्याची शंका घेतली.
मूल्यांविषयी विशिष्ट आग्रह धरणाऱ्या समाजातले हे एक वाङ्मयीन चित्र! त्यातली योग्यायोग्यता काहीही असो; पण मग ह्या सीतारामापुढे हात जोडून उभ्या राहणाऱ्या नवराबायकोने मागायचे काय? “देवा, तुमच्या प्रपंचासारखा आमचा न होवो.” हे? रामाने रावणाचा वध केला. पुराणकथांतून असुरांचा वध करणाऱ्या अनेक वीरांच्या कथा आहेत. त्या साऱ्यांची देवळे झाली नाहीत. शिवाजीमहाराजांचा पराक्रम काय कमी आहे? पण अजून तरी नवसाला पावणारा शिवाजी गाभाऱ्यात गेलेला नाही. कदाचित या वर्षी गेला असल्यास ठाऊक नाही!
‘रामायण’-‘महाभारता’तल्या प्रसंगांतून उत्तम गीते झाली. नाटके झाली. नृत्ये झाली. आणखीही व्हावीत. पण देवळं कधी झाली? या साहित्यिक व्यक्तिरेखांत नवसाला पावण्याची ताकद केव्हा आली? बाकी कशाचा देव होऊन नवसाला पावण्याची त्याच्यात पॉवर येईल, हे सांगणे अशक्य आहे.
मुंबईतल्या हॉर्निमन सर्कलमध्ये ब्रिटिश अमदानीतल्या गव्हर्नर-व्हाइसरॉयांचे पुतळे आहेत. एकदा संध्याकाळी एशियाटिक लायब्ररीतून परत येताना मी त्या बागेतून येत होतो. तिथे कॉर्नवालिस किंवा अशाच कुठल्या तरी गव्हर्नराच्या पुतळ्यापाशी काही कोकणी घरगड्यांची मी गर्दी पाहिली. पंधरा-वीस रामा आणि त्यांच्या ‘शिता’ पुतळ्यापुढे हात जोडून उभ्या होत्या.
एका इंग्रज गव्हर्नरांच्या पुतळ्यापुढे हात जोडून जर एखादा मुंबईचा म्हातारा पार्शी खडा झाला असता, तर मला तितके नवल वाटले नसते; पण आमचे गाववाले रामा, पांडू, अर्जुना, दुर्पती, शिता, रक्मा ह्यांच्या जीवनात हा कार्नवालिस कसा आला? मी त्या गर्दीच्या दिशेने गेलो. तिथे एक भगत त्या पुतळ्याच्या पायथ्याशी कोंबडे मारून, काकडाबिकडा पेटवून चक्क गावच्या येतोबाला किवा रवळनाथाला गाऱ्हाणे घालावे तसे, “देवा महाराजा...” म्हणून गाऱ्हाणे घालत होता.
हे प्रकरण काय आहे ते समजून घ्यावे म्हणून मीही त्या गर्दीच्या मागे जाऊन उभा राहिलो. चष्मेवाला सायबदेखील पुतळ्याच्या पावरवर ‘सर्दा’ ठेवून आहे, हे पाहून त्यातल्या एकाने माझ्या कपाळी शेंदूरही लावला. त्या पासपोर्टावर मी शेजारच्या म्हाताऱ्याशी बोलणे सुरू केले. ते म्हातारबुवा जवळपासच्या व्यँकेत चपराशाची सर्विस करून रिटायर झाले होते. त्यांनी मला त्या साह्यबाच्या मूर्तीत ‘लय् पावर’ असल्याचे सांगितले. मी त्यांना म्हणालो, “अहो, पण हा एक इंग्लिश गव्हर्नरचा पुतळा आहे. त्याच्यात नवसाला पावायची पॉवर कशी असणार?”
“साहेब, तुमाला ठावूक नाय हा साहेब आमच्या येका गाववाल्याच्या सपनात आला, आनि प्रत्तेक्ष सपनात येवन् त्येला दिष्टांत दिला- अमोशेला कोबडं मारून बगा....”
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
इथून पुढे संवाद अशक्य होता. स्वप्नातले दृष्टान्त ही तर एक अगम्य गोष्ट आहे. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या म्हणीतून आलेलं साधे शहाणपण मी मी म्हणणारे मान्य करायला तयार नाहीत, तिथे आमच्या त्या कोकणी ‘गाववाल्यान्’चे काय?
यंदाच एका चित्रकाराच्या स्वप्नात येऊन शिवाजीमहाराजांनी दर्शन दिले. त्या दर्शनाबरहुकूम त्यांनी काढलेली छत्रपतींची तसबीर आता आपल्या सरकारने स्वीकारली आणि जुन्या तसबिरी रद्द केल्या. कुणाच्या स्वप्नात गणपती येतो. वास्तविक फ्रॉइड आणि त्यानंतरच्या मानसशास्त्रवेत्त्यांनी या विषयावर कितीतरी संशोधन करून स्वप्नांची कारणमीमांसा सांगितली आहे. मला एकच प्रश्न पडतो, की माझ्या स्वप्नात फातिमा का येत नाही? आणि एखाद्या जपान्यांच्या स्वप्नात खंडोबा का जात नाही?
हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती या सर्वांचा दावा एकच आहे, की फक्त त्यांच्याच देवदेवतांचे राज्य या पृथ्वीवर चालते. या देवदेवता, घोडा, कुत्रा, गाढव वगैरे त्यांनीच निर्माण केलेल्या प्राण्यांच्या स्वप्नात कधी जाऊन त्यांना दृष्टान्त देत असतील का? कसलेही काम न करणाऱ्या नंदीबैलाला पुरणपोळी मिळते आणि शेतात राबणारा त्याच शेतकऱ्याचा बैल त्या वेळी आसूड खात असतो. हे का?
हे सारे प्रश्न मला शून्य शून्य करत जात असतात.
‘एक शून्य मी’ या पु.ल. देशपांडे यांच्या मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment