ईश्वर ही एक फोल कल्पना आहे, किंवा ईश्वर असलाच तर त्याला प्रार्थना आवडत नाही, देवळे आवडत नाहीत, आणि प्रार्थना करणारांना तो शिक्षा करतो. तेव्हा निदान देवळे बांधण्यात पैशाचा अपव्यय करू नये
संकीर्ण - पुनर्वाचन
र. धों. कर्वे
  • र. धों. कर्वे आणि ‘ ‘समाजस्वास्थ्य’मधील निवडक लेख’चे मुखपृष्ठ
  • Mon , 22 January 2024
  • संकीर्ण पुनर्वाचन देव God ईश्वर परमेश्वर र. धों. कर्वे R. D. Karve

ईश्वराची अगाध लीला

मार्चच्या १५ तारखेला येथील ‘रॅशनॅलिस्ट ॲसोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेची वार्षिक सभा व भोजन झाले. त्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ॰ एरूळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या चालू युद्धाने आपल्या संस्थेच्या नास्तिक मतांना चांगलाच पाठिंबा मिळाला आहे. जेथे ईश्वराचे विशेष बंड आहे, त्या इटलीची पार फजिती झाली आहे आणि त्याला कोठे तोंड काढायला जागा नाही. इंग्लंडात जेव्हा जेव्हा बादशहांच्या आज्ञेवरून सार्वजनिक प्रार्थना झाली, तेव्हा तेव्हा देशाचे काहीतरी भयंकर नुकसान झालेले आढळून येते. कित्येकदा तर लोक प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमलेले असताना चर्चवर बॉम्ब पडलेले आहेत. (ईश्वराला स्वत:च्या वसतिस्थानांची, म्हणजे देवळांची, मुळीच काळजी घेता येत नाही, हे हिंदुस्थानात तर अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. अनेक वेळा मुसलमानांनी हिंदू देवळांतील मूर्ती फोडल्या आहेत व देवळांची संपत्ती लुटून नेली आहे.) आज जर्मनीला जर कोणी चांगलाच हात दाखवला असेल, तर तो रशियाने. आणि रशियात तर ईश्वराला कोणीच विचारत नाही. अथवा काही धार्मिक लोक जरी रशियात असले, तरी तेथे नास्तिकांचाच विशेष भरणा आहे आणि तेथील सरकार ईश्वराला स्थान देत नाही. जर्मनीची प्रथम अनेक ठिकाणी सरशी झालेली दिसली, तरी आता त्यांची त्रेधा होत आहे. यावरून जर काही तर्क निघत असेल तर तो हा की, ईश्वर ही एक फोल कल्पना आहे, किंवा ईश्वर असलाच तर त्याला प्रार्थना आवडत नाही, देवळे आवडत नाहीत, आणि प्रार्थना करणारांना तो शिक्षा करतो. तेव्हा निदान देवळे बांधण्यात पैशाचा अपव्यय करू नये, इतके तरी यावरून दिसते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

देव दयाळू का?

देव दयाळू आहे, अशी एक कल्पना प्रचलित आहे. अर्थात देवच काल्पनिक असल्यामुळे त्याचे बाबतीत वाटेल त्या कल्पना करायला सर्वांनाच मोकळीक असते. पण ईश्वर मानणारांनीदेखील जर थोडासा सरळ विचार करायचा प्रयत्न केला, तर त्यांना हे सहज दिसले पाहिजे की, जगात जे अत्याचार नेहमी चाललेले असतात, त्यांत निरपराधी माणसांचे इतके निष्कारण नुकसान होत असते की, ते पाहिल्यावर देव दयाळू आहे, असे म्हणायला बिलकूल जागा राहत नाही.

याला उत्तर म्हणून ईश्वरवादी लोक पुनर्जन्म पुढे करतात. ‘एखाद्याने मागील जन्मी जर पापे केलेली असली, तर त्यांचे फळ त्याला या जन्मी भोगावे लागते, त्याला ईश्वर काय करील?’ क्रौर्याच्या आरोपातून ईश्वराचा बचाव करण्याकरता जी ही पुनर्जन्माची कल्पना काढलेली आहे, ती केवळ वकिली आहे. आणि एखाद्या बावळट वकिलालादेखील ती शोभण्यासारखी नाही; कारण ईश्वराला कर्माविरुद्ध काही करता येत नाही, अशी स्पष्ट कबुली त्यात आहे. म्हणजे या बचावात त्याच्या सर्वशक्तिमत्तेवर धाड आणली आहे.

आणि दुसरे असे की, हे जग आणि पुनर्जन्म वगैरे सगळेच जर ईश्वराने उत्पन्न केले आहे, तर त्यात जे जे काही होईल, त्याबद्दल ईश्वरच जबाबदार राहतो. म्हणजे मागील जन्मातल्या पापांचीदेखील जबाबदारी त्याच्यावरच येते; ती या बचावाने टळत नाही.

पण अशी ही बावळट वकिली करून ईश्वराला दयाळू म्हणण्याचा हा अट्टाहास लोक का करतात? जगात जर अत्याचार नेहमी दिसतात, तर ईश्वर अत्याचारी आहे, असे सरळ कबूल का करत नाहीत? याचे कारण शोधणाराला ते सापडणे कठीण नाही. धार्मिक ग्रंथांचा थोडा अभ्यास केल्यास ते सहज सापडते. ‘बायबला’त असे स्पष्ट सांगितले आहे की, ‘तुम्ही इतर कोणत्याही देवांना भजता नये, कारण तुमचा देव मी, आणि मी असहिष्णू आहे. माझा जो द्वेष करील, त्याच्या मुलांनाच नव्हे तर तिसऱ्या-चौथ्या पिढीपर्यंत त्याच्या सर्व वंशजांना मी शिक्षा करतो. पण जो माझ्यावर प्रेम करून माझ्या आज्ञा पाळील, त्याला मी दया दाखवतो.’ या अशा देवाला कोणत्याही रीतीने वाईट म्हणता नये, त्याची नेहमी स्तुतीच करत राहिले पाहिजे, नाहीतर तो काय करील कोणाला ठाऊक? अशी भीती धार्मिक लोकांना एकसारखी वाटत राहिली तर नवल नाही.

‘बायबला’तला देव हा फक्त ख्रिस्ती लोकांचाच नव्हे, तर मुसलमानांचाही देव तोच आहे. कारण ख्रिस्ती धर्मातच तथाकथित सुधारणा करून महंमदी धर्म निघालेला आहे. आदम आणि इव्हसंबंधी ‘बायबला’त दिलेली हकीकत मुसलमान मान्य करतात. तेव्हा त्यांच्या देवाबद्दल वेगळे लिहायला नको.

हिंदूंचा देवदेखील असाच आहे, याची साक्ष ‘भगवद्गीते’वरून पटेल. ईश्वर एक आहे, ही कल्पना ‘बायबला’त नाही, तशीच हिंदू धर्मातही नाही. हिंदू धर्मात तर एक देवयोनीच कल्पिलेली आहे आणि ईश्वर एक आहे, ही कल्पना बरीच अलीकडची आहे. ‘गीते’तला श्रीकृष्ण सांगतो की, जगात माझ्याशिवाय काही नाहीच, बाकी सर्व माया आहे. पण याचा अर्थ इतकाच की, देवयोनीदेखील मीच उत्पन्न केलेली आहे. ते असो. पण हिंदू लोकदेखील देवाला दयाळू का म्हणतात, याचे कारण ‘भगवद्गीते’त सापडते.

‘ये यथा मा प्रपद्यंते तांस्तथैव भजाम्यहम्’ या श्लोकावर टीका करताना व आणखीही पुढे वामनाने ‘यथार्थदीपिके’त लिहिले आहे – ‘परि कल्पवृक्षस्वभाव। अगा! मी देवाधिदेव । ज्या रूपी ज्याचा जैसा भाव । त्या रूपे तैसींच मी फळे देतो ।। ... दोष लावता ईश्वरा । दोष लागती त्या पामरा । निर्दोष समजे त्या नरा । ईश्वर करी निर्दोष ।। ...हा कल्पवृक्ष अन्न देतो। म्हणता अन्नची देतसे तो । हा धोंडे देतो म्हणजे तो । धोंडमार होतो त्यावरी । म्हणूनी भगवद्वाणी बोलते । की ‘ये यथा मा प्रपद्यंते’ ।

यात श्रीकृष्णाने स्पष्ट धमकी दिली आहे की, ‘संभाळून रहा! मला तुम्ही दुष्ट म्हटलेत, तर मी तुमच्यापुरता दुष्ट होईन. मला दयाळू म्हटलेत, तरच मी तुमच्यावर दया करीन. तेव्हा दयेची अपेक्षा करणारे बिचारे पामर त्याला दयाळू न म्हणून काय करणार? न म्हटले तर हा काय करील कोणाला ठाऊक? तेव्हा त्याला दयाळू म्हटलेले काय वाईट?

तेव्हा लोक जे देवाला दयाळू म्हणतात, ते त्यांना देव खरोखर दयाळू वाटतो म्हणून नव्हे. कारण देव दयाळू आहे, असे खरोखर कोणाला वाटेल? पण ‘दुर्जनं प्रथमं वंदे’ हा जो व्यावहारिक नीतिनियम आहे, त्याला अनुसरूनच देव दयाळू आहे, असे म्हणणे लोकांना भाग पडते.

आणि म्हणूनच आमच्यासारख्या नास्तिकांना लोक नेहमी सांगत असतात की, ‘अरे बाबा! तुला तरी कोठे नक्की माहीत आहे की, देव नाहीच म्हणून? मग तो आहे असे समजून त्याची थोडीशी स्तुती केली तर बिघडले कोठे? नसला तर आपले थोडेसे श्रम फुकट जातील एवढेच. पण असला तर केवढा फायदा होईल? पण तुमच्यासारखे देवाची निंदा करत सुटले, आणि देव खरोखरच असला, तर परिणाम किती भयंकर होतील, पाहा ना? तेव्हा आपले आहे असे धरून चालणे बरे, असे नाही का वाटत?’

पण आमच्यासारख्यांची खात्री असते की, देव म्हणजे एक थाप आहे, बुजगावणे आहे. त्याला आमच्यासारखे लोक भीक घालत नाहीत.

* * *

आमच्या एका आस्तिक मित्राला एकदा अशी शंका आली की, जग उत्पन्न करण्यापूर्वी ईश्वर एकटाच असला पाहिजे. मग त्याला या नसत्या उठाठेवी सांगितल्या होत्या कोणी? जग उत्पन्न करा, त्यातल्या त्यात माणसे उत्पन्न करा, त्यात आत्मा घाला, त्यांच्यामागे पापपुण्य लावा, त्यांना शिक्षा किंवा बक्षीस देण्याकरता स्वर्ग, नरक, रोगजंतू, धरणीकंप वगैरे भानगडी करा, यात त्याला काय मिळाले? आणि समजा काही मिळाले असले, तर त्याचा अर्थ असाच होत नाही का, की त्यापूर्वी ईश्वराला ही उणीव भासत होती? ईश्वराला उणीव असणे शक्य आहे का?

ही शंका त्याने आमच्यापुढे टाकली. आम्ही नास्तिक खरे, पण त्याच्या समाधानाकरता ईश्वर गृहीत धरून तर्कशास्त्र चालवायला आमची मुळीच हरकत नव्हती. यामुळे आम्ही त्याला सांगितले की, “ईश्वर कितीही परिपूर्ण मानला आणि त्याला कसलीही उणीव असणे शक्य नाही, असे जरी मानले, तरी एक उणीव तुम्हा आस्तिकांनादेखील कबूल करावी लागेल. ईश्वराला स्तुतीची फार आवड आहे, असे तुम्हीच म्हणता. ‘देव भावाचा भुकेला’, ‘स्तुती करावी परमेश्वराची’ वगैरे गोष्टी तुम्ही लहान मुलांना सांगता, तेव्हा तुमच्या मताने त्या खऱ्या असल्या पाहिजेत. मग ईश्वर जर एकटाच असला, तर त्याची स्तुती कोण करणार आणि भक्ती कोण करणार? तेव्हा माणसे उत्पन्न करणे त्याला भागच होते.

“त्याने मुकी जनावरे उत्पन्न करून पाहिली; पण त्यांनी जरी कदाचित मनातून ईश्वराची भक्ती केली, तरी त्यांना काही स्तुती करता येत नाही! तेव्हा माणसेच केली पाहिजेत. बरे, त्यांना सुखी ठेवलं, तर ती ईश्वराला विसरतील; तेव्हा त्यांना दुःखातच ठेवणे भाग होते, त्यांचा छळ करणे भाग होते. ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’, हे आस्तिकांनीच लिहिलेले आहे. आता तू म्हणशील की, मग ईश्वर थोडे तरी सुख का देतो? पण त्याचे कारणदेखील उघड आहे. मनुष्याला जर मुळीच सुख दिले नाही, तर तो एकदम जीव देईल; मग तो स्तुती कशी करणार? का, पटते की नाही?”

आमच्या मित्राला यावर काहीच बोलणे शक्य नव्हते. मनातून तर आमचे म्हणणे पटले, पण स्तुतीची आवड हा काही मोठासा चांगला गुण म्हणता येत नाही, आणि ईश्वराचा हा दोष आहे म्हणावे, तर पाप लागते. यामुळे तो काहीच न बोलता एक मोठा सुस्कारा टाकून गप बसला.

 (जुलै १९४४)

 

 

ईश्वराचे अस्तित्व मानण्याची जरुरीही समंजस लोकांना दिसत नाही आणि तो मानणे सयुक्तिकही दिसत नाही आणि सामान्यतः लोक जे गुण ईश्वरामध्ये आहेत असे मानतात, ते परस्परविरोधी आहेत, हे मागील लेखात दाखवले. ही अडचण टाळण्याकरता धार्मिक लोक सांगतात की, ईश्वराच्या कृत्यांवरून त्यांच्या गुणांचे अनुमान करता नये, कारण ईश्वराची करणी अगाध आहे. पण असे म्हटल्यास ईश्वराचे गुणवर्णन करण्याचाही हक्क राहत नाही.

याही अडचणीतून एक वाट धार्मिक लोकांनी काढली. ती अशी की, ईश्वर निर्गुण आहे, निराकार आहे. अर्थात आकार हा एक गुणच आहे, तेव्हा निर्गुण म्हटले म्हणजे त्यात ते आलेच. पण एवढ्याने अडचण नाहीशी होत नाही. इतकेच नव्हे, तर ही युक्ती अगदीच मूर्खपणाची आहे. ईश्वराने जग निर्माण केले असे मानले, तर ते निर्माण करण्याची शक्ती हा गुण त्याच्यात असलाच पाहिजे. तेव्हा तो निर्गुण कसा? शिवाय मनुष्याचे सर्वच ज्ञान गुणांवर अवलंबून असते. इतकेच नव्हे तर आपल्याला फक्त गुणांचेच ज्ञान असते, दुसरे कसलेच नसते.

मी ज्या टेबलावर लिहीत आहे, ते मला चांगले माहीत आहे. पण माहीत आहे याचा अर्थ काय? त्याचा आकार आणि रंग मला दिसतात, ते हाताला कठीण लागते, त्याचा उपयोग होतो, तो माझ्या मनाला समजतो. पण हे सगळे त्या टेबलाचे गुण आहेत. टेबलाच्या ठायी जर एकही गुण नसला, तर त्याचे ज्ञान कोणालाच होणे शक्य नाही. निर्गुण असून ईश्वर आहे म्हणणे हा केवळ शाब्दिक विश्वास आहे, मानसिक विश्वास नाही. ज्याला गुण नाही, अशा कशाचीही आपणास कल्पनादेखील करता येत नाही, कारण कल्पना करणे, याचा अर्थच एखाद्या वस्तूचे कोणते तरी गुण मनात आणणे.

वास्तविक ईश्वर आहे, इतके म्हटल्यानेदेखील आपण असेच म्हणतो की, अस्तित्व हा एक गुण ईश्वराच्या अंगी आहे. तेव्हा ईश्वर निर्गुण आहे, असे म्हणण्याला काही अर्थ नाही. असा कोणी असेल असे घटकाभर म्हटले, तरीही त्याचे ज्ञान आपणास होणे शक्य नाही, हे उघड आहे. तेव्हा ही युक्ती फोल आहे.

स्वर्ग, नरक वगैरे तर केवळ कविकल्पना आहेत, हे थोड्या विचारांती समजेल. या गोष्टींवर खरा विश्वास बहुतेक कोणाचाच नसतो. कारण या गोष्टी खऱ्या मानणाऱ्या मनुष्याच्या वागणुकीत फरक दिसला असता. मरणानंतर स्वर्गात किंवा नरकात जायचे आहे, असे जर लोक खरोखर मानत असते, तर सदाचारी लोकांना मरणाची मुळीच भीती वाटली नसती व दुराचारी लोकांना अतिशय वाटली असती. पण तसे दिसत नाही.

समजा, आत्महत्या करणे हे पाप आहे असे मानले, तरीही सदाचारी लोकांची मरणाला तोंड देण्याची नेहमी तयारी पाहिजे. निदान त्यांनी मरणाला भिता नये. पण एखादा मिशनरी रानटी लोकांच्या हातात पडून त्यांनी त्याची चटणी करण्याचा बेत केला, तर तो पळून जायचा प्रयत्न का करतो? तो तर धर्माचा प्रसार करणारा अत्यंत पुण्यशील प्राणी. त्याने का भ्यावे? इतकेच नव्हे, तर धार्मिक लोकांनी केव्हाही कोणत्याही रोगावर औषध घेता नये, कारण लवकर स्वर्गात जायला मिळाले तर बरेच. पण असे किती लोक आहेत? स्वर्ग, नरक वगैरे सगळ्याच थापा आहेत. त्या भोळ्या लोकांना घाबरवायला किंवा भुलवायला उपयोगी पडतात, यापेक्षा त्यात अर्थ नाही.

मनुष्यजातीच्या बाल्यावस्थेत वादळ, उल्कापात, धरणीकंप वगैरे नैसर्गिक प्रकारांनी घाबरून जाऊन मनुष्याने निरनिराळ्या देवांची कल्पना केली, यात काही नवल नाही. मनुष्य रागावला म्हणजे ओरडतो, तसाच देव रागावला म्हणजे वादळ उत्पन्न करतो, ही कल्पना त्या वेळी साहजिकच होती. नंतर मनुष्याला हळूहळू जास्त अक्कल आली आणि या गोष्टींची नैसर्गिक कारणे त्याला समजू लागली. तेव्हा या कल्पना वितळल्या आणि अशा अनेक देवांच्या जागी एका ईश्वराची कल्पना आली.

पण अनेक देवांची जुनी कल्पना पुष्कळच अधिक समंजस होती, कारण देवांचे आपआपसात भांडण होते, असे मानले म्हणजे फारशी अडचण राहत नसे. पण दयाळू आणि सर्वशक्तिमान असा एकच परमेश्वर मानल्याने गेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे अनेक अडचणी उत्पन्न होतात. ईश्वराच्या अंगी सर्व उत्तम गुण असले पाहिजेत आणि त्याची शक्तीही प्रचंड असली पाहिजे, अशा वेगवेगळ्या दोन कल्पना मनात आल्या; पण त्या एकत्र करताना, त्यांचा मेळ बसत नाही, हे कोणी पाहिले नाही आणि तो न बसल्यामुळेच ईश्वराची करणी अगाध झाली!

मेळ बसत नाही, या गोष्टीकडे एकदा डोळेझाक केली की, मनुष्य ईश्वरासंबंधी पाहिजे ते बकण्यास मोकळा होतो आणि धार्मिक लोकांना तर मान तुकवणे भागच पडते. सत्याचा आणि या बकण्याचा संबंध तिळमात्र नसतो. उदाहरणार्थ, ‘चित्रमय जगत’मध्ये ‘ईश्वर आहे काय?’ या विषयावर एका लेखकाने पुढील विधाने केलेली आहेत -

१) ईश्वर आहे.

२) ईश्वर व आत्मा एकच आहेत.

३) ईश्वर आनंदस्वरूपी असून विश्वव्यापी आहे.

४) ईश्वर स्वर्गादिक कोणत्याही विशिष्ट स्थळी राहत नाही.

५) प्रत्येक भूतमात्र ईश्वराचा अवतार आहे. या अर्थाखेरीज कोणत्याही अर्थाने ईश्वर अवतार घेत नाही.

६) ईश्वर प्राणिमात्राच्या पाप-पुण्याचा झाडा घेत नाही. कर्मतत्त्वाने ज्याच्यात्याच्या कर्माचे फळ त्यास आपोआप मिळत असते.

७) ईश्वराची भक्ती करता येत नाही; परंतु त्याच्या साक्षात्काराचा आनंद अनुभवता येतो.

८) मंदबुद्धीच्या लोकांनी अव्यक्त ईश्वराच्या साक्षात्काराकडे जाण्याकरता म्हणून काल्पनिक सगुण ईश्वराची उपासना केल्यास चुकीचे नाही, परंतु तो एक केवळ टप्पा आहे, हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे.

९) अपरोक्ष अनुभवाखेरीज ईश्वराचे अस्तित्व कोणत्याही प्रमाणाने सिद्ध होत नाही.

१०) अपरोक्ष अनुभव येईपर्यंत तर्कशुद्ध श्रद्धेने साक्षात्कारी ब्रह्मवेत्त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. (स. वि. बर्वे, एम. ए., मुंबई).

या बकण्याचा काही अर्थ होतो, असे आम्हास वाटत नाही. ईश्वर व आत्मा दोन्हीही काल्पनिकच आहेत, पण हे दोन्ही एकच याचा अर्थ काय? ईश्वर आनंदस्वरूपी आहे, याचा अर्थ काय? आनंद हे जर ईश्वराचे स्वरूप असेल, तर आनंद विश्वव्यापी कसा असू शकतो? दुःखी मनुष्यदेखील आनंदीच असतो काय? ही दुःखी मनुष्याची चेष्टा आहे. भुकेलेल्याला सांगावे, ‘अरे तुला भूक लागलेली नाही. तुझे पोट भरलेलेच आहे’, तसे हे आहे.

कर्मतत्त्वाने कर्माचे फळ मिळत असते, याचा अर्थ इतकाच होतो की, ईश्वर कोणत्याही गोष्टीत ढवळाढवळ करत नाही. मग ईश्वर मानायचा का? साक्षात्कार म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणे किंवा कोणत्याही इंद्रियाचे द्वारा अनुभव मिळणे, केवळ मनात कल्पना येणे, याला साक्षात्कार म्हणता येणार नाही. मग तो अनुभव कसा मिळतो? तो मिळतो याला प्रमाण काय? की कोणीही साक्षात्कार झाला असे म्हटले की, ते खरे मानावे? कोणीतरी म्हणतो हे प्रमाण पुरेसे नाही, मग तो मनुष्य कितीही विश्वासास पात्र असो; कारण तो भ्रम असण्याचा संभव असतो.

ईश्वर निर्गुण असतो, असेच या लेखकाचे म्हणणे आहे; परंतु सगुण ईश्वराची उपासना करणे चूक नाही, असे ते सांगतात. ईश्वराला जर गुण नाहीत, तर ते कल्पिणे ही चूकच आहे, नाही कशी? चुकीची कल्पना हा टप्पा कसा होऊ शकतो? दक्षिणेकडे जाताना काही अंतर उत्तरेकडे जाणे, हा कधीही टप्पा होणार नाही. त्याने खरी कल्पना येणे कठीणच होईल. पुरावा कशाला म्हणतात, याची या गृहस्थांना कल्पनाच नाही. म्हणूनच ते अपरोक्ष अनुभव येईपर्यंत साक्षात्कारी ब्रह्मवेत्त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवण्यास सांगतात. निदान ठेवण्यास हरकत नाही असे सांगतात.

श्रद्धा कधीही तर्कशुद्ध असू शकत नाही. काही बाबतीत श्रद्धा ठेवणे कदाचित सोयीचे होईल, पण ते शास्त्रीय प्रमाण नव्हे. आणि हे साक्षात्कारी ब्रह्मवेत्ते ओळखले कसे? ते फसवत नाहीत किंवा त्यांना भ्रम झाला नाही कशावरून? अमेरिका खंड पाहिले नसले तरी ते आहे असा आपण विश्वास ठेवतो; कारण ते नसताना आहे असे सांगण्यात कोणाचाही फायदा नसतो आणि अमेरिकेच्या अस्तित्वाची पाहिजे तितकी प्रमाणे व्यवहारदृष्ट्या मिळतात, म्हणून आपण जरूर तर तशी श्रद्धा ठेवून वागतो.

पण ईश्वरावर श्रद्धा ठेव म्हणणारे लोक श्रद्धा असल्याप्रमाणे कधीच वागत नाहीत. ते फक्त श्रद्धा ठेवा असे सांगतात आणि ईश्वर आहे, या थापेवर आज कितीतरी भट, हरदास, पुजारी, फसवे साधू, धार्मिक व्याख्याने देऊन झोळी फिरवणारे वगैरे लोकांचे पोट भरते. तेव्हा त्यांचे म्हणणे खरे कसे मानावे?

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

मनुष्य कितीही प्रामाणिक असला तरी त्याला भ्रम होणे शक्य असते आणि भ्रम याचा अर्थच हा की, तो भ्रम आहे, हे त्याचे त्याला ओळखत नाही. तेव्हा हे साक्षात्कारवाले लोक प्रामाणिक असले, तरीही या बाबतीत त्यांचेवर विश्वास ठेवता येत नाही आणि वरील लेखकच म्हणतात की, याशिवाय त्याला दुसरा पुरावा नाही. एक स्वतःला साक्षात्कार झाला पाहिजे किंवा दुसऱ्यावर विश्वास ठेवला पाहिजे!

शास्त्रीय पद्धतीच्या विचारात एकट्याच्या मतावर कोणतीही गोष्ट खरी मानत नाहीत. ती अनेकांनी प्रयोग करून खरी ठरावी लागते. साक्षात्कारवाल्या लोकांत एकमत कधीच होत नाही. प्रत्येकाचा साक्षात्कार वेगळा. तेव्हा शास्त्रीय मनःप्रवृत्तीच्या मनुष्याला त्यावर कधीही विश्वास ठेवता येणार नाही. ज्याला साक्षात्कार झाला असे वाटेल, तो कदाचित ते खरे मानील आणि त्याला त्याबद्दल दोषही देता येणार नाही.

वेड्याच्या इस्पितळातल्या एखाद्या मनुष्याला आपण अखिल ब्रह्मांडनायक आहोत असे वाटले, तर त्याला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. एखादा उपासनीमहाराजही आपणाला ‘अखिलब्रह्मांडनायक’ म्हणवून घेतो आणि बावळट लोक त्याचे नादीही लागतात; पण समंजस लोकांनी तसे करण्याचे कारण नाही. भ्रमिष्टांच्या बडबडीला किंवा आपमतलबी साधूंच्या वटवटीला जर कोणी पुरावा समजू लागला, तर तो वेडाच्या सीमेवरच आहे. अशा लोकांना नेहमी वेड लागतेच असे नाही. कधीकधी ते जन्मभर तसेच अर्धवट राहतात, पण ती वेडाची पायरी आहे.

(नोव्हेंबर १९३८)

‘ ‘समाजस्वास्थ्य’मधील निवडक लेख’ या प्रा. अनंत देशमुख यांनी संपादित केलेल्या आणि पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......