आल्डस् हक्सले या इंग्रजी लेखकाच्या एका कादंबरीत एका लक्षाधीशाचे पात्र आहे. या लक्षाधीशाला नरकाची फार भीती वाटत असते, त्याच्या घरी एक शास्त्रज्ञ नोकरीवर असतो. तो त्याला नरक अस्तित्वात नाही, अशी ग्वाही देऊन, सारखा दिलासा देण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्या लक्षाधीशाचे तेवढ्याने समाधान होत नाही व नरकाविषयीची त्याची चिंता काही केल्या दूर होत नाही. असाच चिंताक्रांत होऊन तो एकदा त्या शास्त्रज्ञाला विचारतो, “काय हो! नरक अस्तित्वात असू शकत नाही, असे तुम्ही निर्विवादपणे सिद्ध करू शकता काय?” या प्रश्नाचे त्या लक्षाधीशाला हवे असलेले उत्तर तो शास्त्रज्ञ देऊ शकत नाही. तो म्हणतो, “नाही, मी असे निर्विवादपणे सिद्ध करू शकत नाही. पण तुम्हाला एक प्रतिप्रश्न विचारू शकतो. चंद्राच्या न दिसणाऱ्या भागावर हिरवे हत्ती राहत नाहीत, असे तुम्ही निर्विवादपणे सिद्ध करू शकता काय?”
कशावरून? कशावरून?
त्या शास्त्रज्ञाच्या या प्रतिप्रश्नात एक महत्त्वाचे तत्त्व सूचित केले गेले आहे, ते हे की, एखादे विधान खोटे आहे, असे सिद्ध करता न आले म्हणजे ते खरे आहे, निदान खरे असण्याचा थोडा तरी संभव आहे, असे ठरत नाही. एखाद्या सज्जनाला जर म्हटले, “तू २० वर्षांपूर्वी कुणाचाच खून केला नाहीस, हे सिद्ध कर पाहू. जर तू हे सिद्ध करू शकला नाहीस, तर तुला आम्ही फाशी देऊ.” तर तो काय उत्तर देईल? फार तर २० वर्षांपूर्वी झालेल्या सर्व खुनांची यादी तपासून ते कुणी केले हे तो सांगेल. त्यापैकी काही खुनी सापडले नसल्यास, ते खून ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी मी असणे शक्य नव्हते, असे दाखवून देईल. खून झालेल्या इसमाशी शत्रुत्व असण्याचे मला काही कारण नव्हते, असे पटवून देऊ शकेल. पण एवढे झाल्यावरही आपण त्याला असे म्हणू शकतो : “२० वर्षांपूर्वी तू जेथे राहत होतास त्याच जागी शेकडो लोक मेले असतील. त्यापैकी एखाद्याच्या मरणास तू कारणीभूत झाला नाहीस कशावरून? त्या शेकडो लोकांपैकी एखादा तुझा शत्रू नसेल कशावरून?”
“कशावरून? कशावरून?”च्या या माऱ्यापुढे तो सज्जन फार वेळ टिकाव धरू शकणार नाही. मी खून केला नाही, हे सिद्ध करणे त्याला अगदी अशक्य कोटीतलेच वाटेल. म्हणूनच कायद्यामध्ये कोणाही व्यक्तीने गुन्हा केला, असे सर्व रास्त शंकांचे निरसन होऊन सिद्ध होईपर्यंत, त्या व्यक्तीला निरपराध समजण्यात यावे, असा दंडक आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
असा दंडक घालून देण्यात कायदेपंडित तर्कशास्त्राला जागले आहेत. जगामध्ये खून करण्यापेक्षा खून न करणाऱ्यांचेच प्रमाण हजारो पटींनी जास्त आहे. चोरी करणाऱ्यापेक्षा चोरी न करणाऱ्यांचेच प्रमाण शेकडो पटींनी जास्त आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल आपल्याला विशेष माहिती नाही, अशी एखादी व्यक्ती चोर किंवा खुनी असण्यापेक्षा निरपराध असण्याचाच संभव अधिक असतो. साहजिकच, जे खरे असण्याचा अधिक संभव आहे, ते खरे नाही, असे म्हणणाऱ्यांवरच आपले म्हणणे सिद्ध करण्याची जबाबदारी येऊन पडते. आरोपीचा अपराध सिद्ध करण्याची जबाबदारी फिर्यादीची आहे, हे तत्त्व याप्रमाणे फारच समर्पक आहे.
सिद्ध करण्याची जबाबदारी फिर्यादीवर टाकण्याला आणखी एक कारण आहे व ते म्हणजे शेकडो अपराधी सुटले तरी चालतील, पण निरपराध्याला कधीही शिक्षा होऊ नये, असे दंडविधानाचे ध्येय आहे, हे होय. ‘मी खून केला नाही’ हे सिद्ध करणे फारच कठिण आहे व हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर टाकली तर बऱ्याचशा आरोपींना हे सिद्ध करता न येऊन नाहक फाशी जावे लागेल! उलट, आरोपीचा अपराध सिद्ध करा, असे फिर्यादीला सांगितल्यामुळे, काही खुनी आरोप सिद्ध न झाल्यामुळे सुटण्याचा संभव आहे एवढेच; पण निरपराध माणसांचा बळी जाणे मात्र त्यामुळे वाचेल.
शिवाजीच्या काळाच्या मोटारी!
सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावर टाकावी याबद्दल दंडविधानाने जेवढा विवेक दाखवला आहे, तेवढा तर तत्त्वज्ञ व इतर विचारवंत यांनी दाखवला असता, तर पुष्कळशा विचारसणीमधला गोंधळ कमी झाला असता! धार्मिक विचार हे यातले एक महत्त्वाचे उदाहरण आहे. ‘ईश्वर अस्तित्वात नाही, असे तुम्ही सिद्ध करू शकता काय? करू शकत नसाल, तर स्वतःला निरीश्ववरवादी म्हणवून घेण्याचा तुम्हाला काय अधिकार?’ असे ईश्वरवादी विचारतात. त्यांचे हे विचारणे फारच विपर्यस्त आहे. ‘तू अपराधी नाहीस, असे सिद्ध कर, नाही तर आम्ही तुला फाशी देऊ’ असे न्यायाधीशाने आरोपीला म्हणण्याचाच हा प्रकार!
ईश्वराच्या नास्तित्वापेक्षा ईश्वराच्या अस्तित्वाचाच संभव अधिक आहे, असे ईश्वरवाद्यांनी आधी सिद्ध केल्याशिवाय, ईश्वर अस्तित्वात नाही, असे सिद्ध करण्याची जबाबदारी निरीश्वरवाद्यांवर येत नाही. ‘ईश्वर अस्तित्वात नाही’, असे सिद्ध करता आले नाही, एवढ्यावरूनच केवळ ईश्वरांचे अस्तित्व किंवा त्याच्या अस्तित्वाचा संभव सिद्ध होत नाही.
तत्त्वज्ञानातली कोणतीही नवीन उपपत्ती किंवा विज्ञानातला कोणताही नवा सिद्धान्त जेव्हा मांडला जातो, तेव्हा ती उपपत्ती किंवा तो सिद्धान्त मांडणाऱ्यावरच तो सिद्ध करण्याची जबाबदारी असते, हे सर्वमान्य आहे. जग हे प्रकृतीपासून निर्माण झाले आहे, असे कपिलमुनींनी प्रतिपादिले व लगेच आपल्या प्रतिपादनाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी प्रमाणे दिली. त्यांनी असे म्हटले नाही की, ‘जग हे प्रकृतीपासून निर्माण झाले नाही, असे आधी तुम्ही सिद्ध करा, नाही तर माझे अनुयायी व्हा.’
उद्या एखाद्या अप्रबुद्धाने शिवाजीच्या काळी मोटारी होत्या, असा ऐतिहासिक शोध लावला व या शोधाचे प्रमाण विचारताच ‘शिवाजीच्या काळी मोटारी नव्हत्या, हे सिद्ध करा, नाही तर माझे म्हणणे माना’ असे तो म्हणून लागला, तर सुज्ञ लोक त्याच्या म्हणण्याची काय किंमत करतील? सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची, हे जर बरोबर ओळखता आले नाही, तर विचारांत फारच गोंधळ माजतो.
ईश्वर आणि अस्पृश्यता
ईश्वराचे नास्तित्व सिद्ध करण्याची जबाबदारी नास्तिकांवरच आहे असे प्रतिपादताना ईश्वरवादी कधी कधी ‘चुकावयाचे असेल तर सुरक्षित बाजूने तरी चुका’ या नियमाचा आधार घेतात. ‘नास्ति चेन्नास्ति हानिः। अस्ति चेन्नास्तिको हतः।’ (ईश्वर अस्तित्वांत नसेल तर तो आहे असे मानल्याने आमचें काहीच नुकसान होत नाही. उलट तो अस्तित्वात असेल तर मात्र नास्तिकाला तो नरकात टाकील.) म्हणून ईश्वर आहे, असे मानल्यानेच कमीत कमी धोका पत्करल्यासारखे होते. अर्थात ‘ईश्वर अस्तित्वात नाही’ ही जास्त धोक्याची श्रद्धा बाळगणाऱ्या व ती पसरवू इच्छिणाऱ्या नास्तिकांवरच आपले म्हणणे सिद्ध करण्याची जबाबदारी येऊन पडते.
सिद्ध करण्याची जबाबदारी नास्तिकावर ढकलणारा आस्तिकाचा हा युक्तिवाद, ईश्वराचे अस्तित्व मानल्याने काहीच नुकसान होत नाही, या समजुतीवर आधारलेला आहे. चंद्राच्या न दिसणाऱ्या भागावर हिरवा हत्ती राहतो, असे मानल्याने माझे काहीच नुकसान होत नाही. कारण त्या हत्तीचा माझ्या जीवनाशी कसलाच संबंध येत नाही. मी रोज संध्या करावी की नाही, डॉ. आंबेडकरांना अस्पृश्य मानावे की नाही, विधवांना जाळावे की नाही, गॅलिलिओ व कोपर्निकस याच्यांसारख्या ज्योतिर्विदांचा छळ करावा की नाही, स्वधर्म बदलायला तयार नसलेल्या एखाद्या ‘कुधार्मिका’ची बोटे ऐरणीवर ठेवून घणाने ठेचावी की नाही, असल्या कोणत्याच बाबतीत मला त्या हिरव्या हत्तीकडून प्रेरणा मिळणार नाही.
पण ईश्वरावरील श्रद्धेचे तसे नाही. ईश्वराबद्दल, केवळ तो अस्तित्वात आहे, एवढी श्रद्धा कुणी बाळगत नाही. ईश्वर अस्तित्वात आहे, त्याने मानवाने कशा तऱ्हेने जगावे ते ‘मनुस्मृती’त, ‘बायबला’त किंवा ‘कुराणा’त लिहून ठेवले आहे, या ईश्वरी आज्ञांविरुद्ध जो वर्तन करील, तो पापी व ईश्वरद्वेषी असल्यामुळे त्याचा छळ करण्याचा अधिकार ईश्वरनिष्ठाला आहे, अशा तऱ्हेचे सर्व तत्त्वज्ञान ईश्वरावरील श्रद्धेच्या मागोमाग येते, अशी इतिहासाची साक्ष आहे.
ईश्वर अस्तित्वात आहे व त्याने आपले मनोगत बायबलात व्यक्त केले आहे, अशी जर धर्मगुरूंची श्रद्धा नसती, तर त्यांनी गॅलिलिओ व कोपर्निकस् यांचा छळ केला असता काय? गोमंतकांतील लोकांना बाटवण्यासाठी कुणाला जाळ, कुणाचे डोळे फोड, तर कुणाचा कडेलोट कर, अशा तऱ्हेचे अनन्वित जुलूम केले असते काय?
सारांश, ईश्वरावरील श्रद्धा व एका विशिष्ट जीवनविषयक तत्वज्ञानावरील श्रद्धा यांचा अभेद्य संबंध आहे व या दुसऱ्या श्रद्धेमुळे मानवाचे अनेकदा अपरिमित नुकसान झाले आहे असे इतिहासावरून दिसते. त्यामुळे ईश्वरावर श्रद्धा ठेवल्याने काहीच नुकसान होत नाही, हे म्हणणे खरे मानता येत नाही.
‘खरा’ देव व ‘खोटा’ देव!
बरे, ईश्वरावर श्रद्धा न ठेवण्याने आपले नुकसान होईल, याला तरी काही प्रमाण आहे काय? ईश्वर अस्तित्वात नाही, असे म्हटल्याबद्दल ईश्वर नास्तिकाला नरकात टाकील असे आस्तिक म्हणतात. पण नरकाच्या भीतीपासून आस्तिक तरी कुठे मोकळे आहेत? अल्लावर विश्वास न ठेवणारे नरकात जातात, असे मुसलमान मानतात व उलट आकाशातल्या बापावर विश्वास नसणारे नरकात जातात, असे ख्रिस्ती मानतात. तेव्हा केवळ ईश्वरावर विश्वास ठेवल्याने नरकापासून बचाव होत नाही. ‘खऱ्या’ ईश्वरावर विश्वास असेल, तरच नरकापासून सुटका होईल!
‘खोट्या’ ईश्वराला भजणे व नास्तिक होणे हे तारखेच निंद्य आहे, पण खरा ईश्वर कोणता, हे कसे ओळखायचे? या प्रश्नाचे सर्वमान्य उत्तर देता आले असते, तर जगात धार्मिक युद्धे माजली नसती. बरे, ईश्वर आस्तिकाला नरकात टाकतो, याबद्दल तरी सर्व आस्तिकांचे एकमत आहे काय? काही आस्तिकांच्या मते तर ईश्वराचा द्वेष करणे, हा त्याच्या धार्मिक युद्धे माजली नसती. बरे, ईश्वर नास्तिकाला नरकात टाकतो, याबद्दल तरी सर्व भक्तीचाच एक प्रकार आहे!
अशा विरोधभक्तीमुळेच रावण मुक्त झाला. विरोधभक्तिवाद्यांचा हा पंथ सोडला तरी, ईश्वरावर श्रद्धा न ठेवणारे बर्ट्रांड रसेल, चार्वाक, गौतम बुद्ध वगैरे थोर विचारवंत नरकात जातील, असे निदान डॉ. राधाकृष्णन्, डॉ. व्हाईटहेड वगैरे ईश्वरवादी समजत असतील, असे वाटत नाही. तेव्हा नास्तिक नरकात जाण्याचा जेवढा संभव आहे, तेवढाच आस्तिक नरकात जाण्याचाही संभव असल्यामुळे, ईश्वरावर श्रद्धा ठेवल्याने नरकाची भीती नाहीशी होते, असे म्हणण्यात काही अर्थ नाही.
बंद खोलीतला सैतान
‘सुरक्षित बाजूने चुका!’ असा आस्तिकाचा वरील उपदेश ऐकून एका गोष्टीची आठवण होते. एक चोर मोठ्या कुशलतेने चोऱ्या करत असे व चोरलेला माल आपल्या घरांतल्याच एका खोलीत बंद करून ठेवत असे. काही दिवसांनी त्याच्याजवळ सोने, चांदी वगैर खूप गडगंज संपत्ती जमली. त्या खोलीची झडती घेतली असती, तर कुणालाही त्याच्या चोरीचा सहज पत्ता लागला असता. पण त्या खोलीत कुणी जाऊ नये म्हणून त्याने एक नामी युक्ती केली होती.
त्या खोलीत एक सैतान राहत असून कुणीही खोली उघडली की, त्याच्या नरडीचा घोट घेतो, अशी अफवा त्याने पसरवली. एखाद्या ‘नास्तिका’चा यावर विश्वास बसला नाही, तर तो त्याला म्हणायचा, ‘‘पाहा बुवा या खोलीत सैतान नसेलही, कदाचित् मी स्वतःच तो पाहिला असता, तर जिवंत तरी कसा राहिलो असतो? पण विषाची परीक्षा पाहाच कशाला? खोली उघडली नाही, तर माझे काही बिघडत नाही. मला घरात राहायला इतर पुष्कळ जागा आहे. पण खोली उघडली आणि जर का आत सैतान असला तर माझे दिवस भरलेच! तेव्हा आत सैतान आहे असेच मी धरून चालतो झाले. तूही असेच ‘सुरक्षित बाजूने’ चुकावे यांतच शहाणपणा आहे. खोली न उघडल्यामुळे तुझे नुकसान तर काही होत नाही व खोली उघडून तुझा काही फायदाही नाही. उलट आत सैतान असलाच, तर मग मात्र तुझी चांगलीच गच्छंती होईल.”
या युक्तिवादानंतर कुणाही ‘नास्तिका’ला ती खोली उघडण्याचे धैर्य होत नसे व त्या चोराचे गुपित तसेच राही. पण असे किती दिवस चालणार? पुढे एका नास्तिकाला आपला जीव धोक्यात घालूनसुद्धा त्या खोलीत सैतान आहे की नाही, हे पडताळून पाहण्याची इच्छा झाली. तो त्या चोराकडे जाऊन म्हणाला, “तुझा सैतान मला खाणार असेल तर खाऊ दे! मी आज या खोलीत जाणारच.”
चोराने आपले नेहमीचे सर्व युक्तिवाद त्याला सांगितले, पण तो नास्तिक काही केल्या ऐकेना. शेवटी चोराने निरुपायाने खोलीचे दार उघडले. नास्तिक आत गेला; पाहतो तो काय! त्याला मोठमोठ्या प्रसिद्ध चोऱ्यांचा तलास लागला. चांदमल शेटांचा मोत्यांचा हार, श्रीमंत गुप्त्यांचा घरच्या पाटल्या चिटणिसांकडचे दोन हजार रुपयांचे हातघड्याळ, बडोद्याच्या महाराणीचा हजारो रुपये किमतीचा कोट, सर्व काही आत अगदी एखाद्या दुकानांतल्यासारखे व्यवस्थित मांडून ठेवलेले होते.
ते सर्व पाहून चोराचे बिंग आपल्याला समजले म्हणून नास्तिक फारच हर्षित झाला. पण त्याचा हर्ष फार वेळ टिकला नाही. बाहेर जाण्यासाठी तो परत फिरला, तोच तो चोर हातांत खंजीर घेऊन उभा असलेला त्याला दिसला. सर्व दारे व खिडक्या बंद होत्या. चोर मोठ्याने हसून म्हणाला, “पाहिलास या खोलीतला सैतान? घे आपल्या अपधाडसाचे प्रायश्चित्त!” आपले वाक्य पुरे व्हायच्या आतच त्याने नास्तिकाच्या पोटात खंजीर खुपसला! त्याचा मृत देह त्याने त्याच खोलीत खोल पुरून टाकला!... दुसऱ्या दिवशी गावात जिकडे तिकडे बातमी पसरली : नास्तिकाला आपल्या श्रद्धाहीनतेचे व पापाचे प्रायश्चित्त मिळाले. सैतानाने त्याला एका घासात खाऊन टाकले!
ईश्वराचे अस्तित्व प्रत्यक्ष व अनुमान यांनी सिद्ध होऊ शकत नसले, तरी पवित्र पुरुषांना अतींद्रिय व तर्कातीत अशा ज्ञानाने ईश्वराचा साक्षात्कार होतो व हेच ईश्वराच्या अस्तित्वांच सर्वांत मोठे प्रमाण आहे, असे ईश्वरवादी बहुधा म्हणतात. पण कधी कधी अशा ‘बाबावाक्यं प्रमाणम्’ने त्यांचे समाधान होत नाही व ‘आम्ही शुद्ध तर्काच्या आधारे ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करून दाखवतो’ अशी ते प्रतिज्ञा करतात. अशा वेळी ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ते तीन प्रकारचे युक्तिवाद करतात. त्यांना आपण अनुक्रमे १) मूलकारण-युक्तिवाद २) विश्वाच्या नियमबद्धतेवरून केलेला युक्तिवाद ३) हेतु-युक्तिवाद अशी नावे देऊ.
यापैकी मूलकारण-युक्तिवाद सर्वांच्या परिचयाचा आहे. “प्रत्येक वस्तूला काही तरी कारण असते. त्याचप्रमाणे जगाला देखील कारण असले पाहिजे व हे कारण म्हणजेच ईश्वर होय” असा तो युक्तिवाद आहे. हा युक्तिवाद इतका भोंगळ आहे की, त्यातील तर्कच्युति व विसंगति सात-आठ वर्षांच्या मुलालादेखील कळू शकते.
प्रत्येक वस्तूला जर कारण असतेच, तर ईश्वरालादेखील कारण असलेच पाहिजे व जगाचा निर्माता म्हणून ईश्वर मानायचा, तर ईश्वराचाही निर्माता असा एखादा मोठा ईश्वर असला पाहिजे? ईश्वराने जग निर्मिले तर ईश्वराला कुणी निर्माण केले? असे लहान मुलेदेखील विचारतात. त्यांचे हे विचारणे पोरकट आहे, असे समजून प्रौढ लोक तिकडे दुर्लक्ष करतात. पण वस्तुतः लहान मुलांच्या निरागस मनाला जे सहज कळते ते पुढे अंधश्रद्धामय वातावरणात वाढल्यावर प्रौढांना कळेनासे होते, असे म्हटले पाहिजे.
‘ईश्वर हा स्वयंभू व कारणातीत आहे व त्यामुळे ईश्वराला कोणी निर्मा लागत नाही’, असे प्रौढ लोक वरील प्रश्नाला उत्तर देतात. हे उत्तर ‘मी माझी पोळी राखूनही ठेवीन व खाऊनही टाकीन’, अशा अट्टहासारखे हास्यास्पद आहे. ईश्वर कारणातीत असेल तर ‘सर्व वस्तूंना कारण असते’, हा नियमच खोटा पडतो व मग त्या नियमाच्या आधारे ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. ईश्वराला जर कारण लागत नाही, तर जगाला तरी कारण कशाला पाहिजे?
ईश्वरासाखेच जगदेखील स्वयंभू का असू शकत नाही? ईश्वराची अनावश्यक कल्पना करून मग त्याला स्वयंभू मानण्यापेक्षा ज्याचे अस्तित्व प्रत्यक्षसिद्ध आहे. अशा जगालाच स्वयंभू मानणे जास्त सयुक्तिक आहे.
एका दीडशहाण्या राजाने आपल्या राजधानीच्या भोवती सुरक्षिततेसाठी तट्टयाची भिंत बांधवली व मग ती फार कच्ची आहे, म्हणून त्या भिंतीच्या बाहेर दुसरी एक दगडी भिंत बांधवली, तसलाच प्रकार या कारणकल्पनेत होतो! आधी एक कच्ची भिंत बांधायची व मग ती कच्ची आहे म्हणून दुसरी पक्की बांधायची, यापेक्षा एकदम पक्कीच भिंत का बांधू नये? आधी भुसभुशीत अशी कारणकल्पना करायची व मग ती टिकत नाही, म्हणून स्वयंभूपणाची बुद्धिग्राह्य कल्पना करायची, त्यापेक्षा आधीच स्वयंभूपणाची कल्पना का करू नये?
पागलखान्यातला राजपुत्र
मूलकारण युक्तिवादाचा दुसरा दोष असा की, जगाला कारण असले पाहिजे असे मानले, तरी त्या कारणाला ईश्वर म्हणता येईलच असे नाही. जगाचे कारण प्रकृति व पुरुष यांचा संयोग हे आहे, असे सांख्यतत्वज्ञान सांगते. पुरुष म्हणजे आत्मा व प्रकृति हे एक जड तत्त्व आहे. तेव्हा यापैकी एकालाही ईश्वर ही संज्ञा देता येत नाही. ‘ईश्वर हे जगाचे कारण आम्हाला मान्य नाही’ असे एका हरवलेल्या सांख्यकारिकेत म्हटले असल्याचे लो. टिळकांनी दाखवून दिले आहे.
अर्थात् जगाला कारण असले पाहिजे असे म्हणणारे विचारवंतसुद्धा त्या कारणाला ईश्वर मानायला तयार होतीलच असे दिसत नाही. न्यायीपणा, दयाळूपणा इत्यादि नैतिक गुण व सर्वज्ञता हा बौद्धिक गुण अंगी असल्याशिवाय कोणत्याही तत्त्वाला ईश्वर अशी संज्ञा देता येणार नाही. एक वेडा ‘माझा बाप इंग्लंडचा राजा आहे व मी राजपुत्र आहे’ असे सांगत फिरायचा. ‘तुझा बाप कुठे इंग्लंडचा राजा आहे? इंग्लंडचा राजा तर राणी एलिझाबेथ आहे. तुझा बाप नगरपालिकेत चपराशाची नोकरी करतो आहे’, असे त्याला कुणी उत्तर दिले, तर तो म्हणायचा ‘अहो, जो कुणी इंग्लंडचा राजा असेल, त्यालाच मी आपला बाप मानतो!’
ईश्वरवाद्यांची गत या वेड्यासारखीच आहे. ‘ईश्वर जगाचे कारण आहे’ असे ते आधी म्हणतात. पण जगाचे कारण ईश्वर हे नसून ‘परमाणु’ किंवा ‘ब्रह्म’ असे दुसरेच काही तरी आहे, असे एखाद्याने सिद्ध केले की, लगेच म्हणतात, ‘अहो, जगाचे जे काही कारण असेल त्यालाच आम्ही ईश्वर म्हणतो।’
जग व तांदळाचा ढीग
मूलकारण-युक्तिवादातला तिसरा दोष असा की, जो न्याय जगातल्या प्रत्येक वस्तूला लागू आहे, तो सर्व जगाला लागू होईलच असे नाही, हे तत्त्व त्यात दृष्टीआड केले गेले आहे. तांदळाच्या ढिगातला प्रत्येक कण लहान असतो, पण म्हणून तो ढीग लहान असतो असे ठरत नाही. ‘लहान’ हे विशेषण ढिगाच्या प्रत्येक कणाला लागू होते, पण ढिगाला लागू होत नाही. सैन्यातल्या प्रत्येक शिपायाला दोन हात असतात, म्हणून त्या सैन्यालाच दोन हात असतात असे ठरत नाही. त्याचप्रमाणे जगातल्या प्रत्येक वस्तूला कारण असले, तरी सर्व जगाला कारण असेलच असे म्हणता येत नाही.
वरील उदाहरणावर ती विपर्यस्त असल्याचा कदाचित् आरोप येईल. ‘‘घटकाचे गुणधर्म ते ज्या पदार्थाचे घटक आहेत, त्याला नेहमीच लागू होतील असे नाही. पण घटकाचे बरेच गुणधर्म घटित पदार्थालादेखील अनेक वेळा लागू होतात, हे दाखवून देणे कठीण नाही. माळेतले प्रत्येक फूल लाल असेल तर ती माळ लाल आहे, असे आपण म्हणतो; एखाद्या वर्गांतला प्रत्येक मुलगा मूर्ख असेल तर तो वर्गच मूर्ख आहे, असे आपण म्हणतो, त्याचप्रमाणे जगातली प्रत्येक वस्तु सकारण आहे म्हणून जगही सकारण आहे, असे म्हणायला कोणती हरकत आहे?” असे ईश्वरवादी विचारतील.
त्यांना उत्तर एवढेच की, मूलकारणयुक्तिवादाला पुष्पमालेच्या दृष्टान्तापेक्षा तांदळाच्या ढिगाचाच दृष्टान्त अधिक लागू आहे. कारण जग या संज्ञेत अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा समावेश होतो. जगातील इतर पदार्थांसारखाच जग हा एक पदार्थ नाही. जग या संज्ञेत कार्यांचा अंतर्भाव होतो, त्याचप्रमाणे कारणांचाही अंतर्भाव होतो. अर्थात्, सर्व कारणे जगातच अंतर्भूत आहेत व जगाच्या बाहेर काहीच अस्तित्वात नाही. त्यामुळे जगाचे जगापेक्षा वेगळे असे कारण शोधू जाणे व्यर्थ आहे.
“जग म्हणजे अस्तित्वात असलेल्या यच्चवयावत् वस्तू व ईश्वर हे या जगाचे कारण’, असे जर म्हटले तर ईश्वर ही अस्तित्वात असलेली वस्तू नाही, असे म्हणावे लागेल व ते निरीश्वरवाद्यांच्याच पथ्यावर पडेल. ईश्वर जर अस्तित्वात असेल, तर त्याचा समावेश जगातच होईल व मग ईश्वर हे जगाचे कारण आहे, असे म्हणता येणार नाही. सकारणता हा गुणधर्मच असा आहे की, तो जगातल्या वस्तूंना लागू असला, तरी जगाला लागू होऊ शकत नाही.
हस्ताक्षर व मुद्राक्षर
मूलकारण-युक्तिवादाची याप्रमाणे वासलात लावल्यावर आपण नियमबद्धतेच्या युक्तिवादाकडे वळू. जग हे नियमबद्ध असल्यामुळे जगाला बुद्धिमान् असा कर्ता असला पाहिजे, असा तो युक्तिवाद आहे. ‘‘सूर्य रोज ठराविक वेळेला व पूर्वेकडेच उगवतो. सूर्योदयाच्या वेळेत ऋतुपरत्वे फरक पडला, तरी तो फरक देखील नियमबद्ध असतो व पुढच्या वर्षी अमुक दिवशी सूर्य केव्हा उगवेल हे शास्त्रज्ञांना सांगता येते. चंद्राची पृथ्वीभोवतीची गति, पृथ्वीची सूर्याभोंवतीची गति इत्यादि सर्व घटना इतक्या सूत्रबद्ध व नियमबद्ध आहेत की, एखाद्या शिस्तबाज सैन्याचे संचलनदेखील एवढे पद्धतशीर असत नाही. अशा पद्धतशीर घटना कुणी तरी बुद्धिपुरःसर घडवून आणल्याशिवाय कशा घडतील?”
नियमबद्धतेच्या या युक्तिवादातदेखील मूलकारण युक्तिवादासारखेच अनेक हेत्वाभास आहेत. बुद्धिपुरःसर केलेले व्यापार जडवस्तूंच्या व्यापारापेक्षा जास्त नियमबद्ध असतात अशी कल्पना या युक्तीवादाने गृहीत धरली आहे. पण हे खोटे असल्याचे सहज दाखवून देता येईल. हाताने लिहिलेले अक्षर हा बुद्धिमान् व्यक्तीचा व्यापार आहे व छपाईचे अक्षर हा त्या मानाने जड यंत्राचा व्यापार म्हणून तो बुद्धिहीन वस्तूचा व्यापार आहे. पण असे असूनदेखील छपाईचे अक्षर हस्ताक्षरापेक्षा जास्त नियमबद्ध व सुव्यवस्थित असते की नाही?
गवयाला गाणे म्हणायला सांगितले, तर तो प्रत्येक वेळी अगदी हुबेहूब तसेच गाणे म्हणू शकणार नाही. कधी त्याचे चित्त तल्लीन न झाल्यामुळे त्याचे गाणे रंगणार नाही, तर कधी त्याचे सर्व व्यक्तित्वच संगीतमय होऊन स्वतःला न कळत तो हृदयाचा ठाव घेणाऱ्या ताना छेडू लागेल. पण तेच त्याच्या गाण्याची जर ध्वनिमुद्रिका घेतली, तर ती प्रत्येक वेळी अगदी तसेच गाणे म्हणेल. त्यात कोणताही फरक पडणार नाही.
जड व्यापारापेक्षा बुद्धियुक्त व्यापार जास्त नियमबद्ध असतात हे विधान किती निर्मूल आहे व उलट जिवंत व्यक्तीच्या व्यापारापेक्षा निर्जीव वस्तूंचेच व्यापार कसे जास्त नियमित व सुसूत्र असतात असे दाखवणारी आणखी कितीतरी उदाहरणे देता येतील. तेव्हा जग नियमबद्ध आहे, यावरून केलेला युक्तिवाद ईश्वरावाद्यांच्याच अंगलट येतो. कारण जगातले व्यापार हे बुद्धिमय व्यापार नसून जडाचेच व्यापार आहेत, असे त्यांच्या नियमबद्धतेवरून म्हणता येईल.
माकडाचे टंकलेखन
दुसरे असे की, बुद्धिमान् असा कर्ता असल्याशिवाय नियमबद्ध क्रिया घडूच शकत नाहीत, असे नाही. नियमबद्ध क्रिया अगदी नियमशून्य अशा शक्तींकडूनदेखील केवळ योगायोगाने घडून येऊ शकतात. एखादे माकड जर रोज १० तास आयुष्यभर टेक यंत्रावर टकटक करत बसले, तर १०-१५ वर्षांत एक तरी शुद्ध इंग्रजीतले अर्थपूर्ण वाक्य त्याच्या हातून टंकीत होईल. त्यात काहीच अशक्य नाही. टंकयंत्रावर असलेल्या २६ इंग्रजी मुळाक्षरांची लाखो तऱ्हांनी जुळवणी होऊ शकते. या लाखो तऱ्हांच्या जुळवणीमध्ये काही अक्षरसमूह अर्थपूर्ण असतील व काही नसतील. माकडाने जर १०-२५ वर्षे टंकयंत्रावर टकटक केले, तर हजारो प्रकारचे अक्षरसमूह त्याच्या हातून टंकीत होतील व हजारोपैकी एखादा केवळ यदृच्छेने अर्थपूर्ण असू शकेल. संस्कृतमध्ये याला ‘घुणाक्षरन्याय’ म्हणतात. किड्याच्या चालीनेदेखील एखाद्या वेळी अक्षर उमटते.
अर्थात् किड्याच्या चालीने अक्षर उमटेल ते, किडा लाख वेळा चालला तर त्या लाख वेळातून एखाद्या वेळीच उमटेल. म्हणून किड्याच्या चालीने अक्षर उमटेपर्यंत आपल्याला फार वेळ वाट पाहावी लागेल. किड्याच्या दहा-पंधराच चाली पाहिल्या, तर त्यांपैकी एकीतही अक्षर उमटले नाही, असे बहुधा आढळून येईल.
नियमबद्ध व अर्थपूर्ण अशी कृती केवळ योगायोगाने घडायला याप्रमाणे पुष्कळ काळ लोटावा लागतो. ही अडचण जगातील नियमबद्धता निर्माण होणाच्या बाबतीत फारशी आडवी येत नाही. कारण जग निर्माण होऊन लाखो वर्षांचा काळ लोटला असला पाहिजे. एवढा काळ जगांतील नियमबद्धता केवळ योगयोगाने निर्माण होण्यासदेखील पुरेसा आहे. तेव्हा जग नियमबद्ध आहे एवढ्यावरून ते एखाद्या बुद्धिमान् कर्त्याने निर्माण केले असले पाहिजे, असे सिद्ध होत नाही.
आईचे दूध व उंटाचे खुर
नियमबद्धतेच्या युक्तिवादासारखाच पण त्याहून थोडा वेगळा असा ईश्वरवाद्यांचा एक युक्तिवाद आहे. त्याला हेतुयुक्तिवाद असे म्हणतात. तो असा : जग हे नियमबद्ध आहे एवढेच नव्हे, तर ते हेतुपूर्वक केले गेले आहे असे दिसते. एखाद्या निर्जन प्रदेशात भ्रमण करताना जर आपल्याला एखादी झोपडी सापडली व त्या झोपडीत चूल, सैंपाकाचे सामान, अंथरूण वगैरे दिसले, तर हे सर्व कुणी तरी माणसाने तयार केले आहे, असे आपण एकदम अनुमान काढतो. कारण झोपडी माणसाला राहण्यासाठीच बांधली जाते, चूल सैंपाक होऊन त्याचे पोट भरावे म्हणून मांडली जाते व पलंग त्याला सुखाने झोपता यावे म्हणून केला जातो. वरील प्रत्येक पदार्थ कोणत्या तरी हेतूने तयार केलेला असतो. त्यात काही तरी प्रयोजन असते.
निर्हेतुक नियमबद्धता जरी योगायोगाने किंवा जड कारणामुळे उत्पन्न होऊ शकली, तरी या प्रकारची हेतूपूर्वक नियमबद्धता बुद्धिमान कर्त्याशिवाय दुसरे कुणीही निर्मू शकणार नाही. झोपडी जशी हेतुपुरःसर निर्मिलेली आहे, असें आपण म्हणतो, त्याचप्रमाणे जगदेखील हेतुपुरस्सर निर्मिलेले आहे, असे म्हटले पाहिजे. स्त्री-पुरुषांची शरीररचना पाहिली तर ती दोघांचा शारीरिक संबंध व्हावा, म्हणून कुणी तरी मुद्दाम केलेली आहे, असे म्हणण्याचा मोह होतो. तसेच मूल झाल्याबरोबर आईच्या स्तनात दूध येते, ते त्या मुलाचे पोट भरावे म्हणून मुद्दाम एखाद्या दयाघन व्यक्तीने योग्य वेळी निर्मिले असावे असे वाटते. पुढे इतर अन्न पचण्याची मुलात शक्ती आल्याबरोबर हे दूध हळूहळू नाहीसे होते.
हा प्रकारही उन्हाळा संपल्यावर वाळ्याच्या ताट्या व पंखे यांची जरुरी संपली म्हणून आपण काढून टाकतो, त्या प्रकारासारखाच हेतुपुरस्सर वाटतो. थंड प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर ऊबदार लोकर असते व वाळवंटात चालणाऱ्या उंटाचे पाय भाजू नयेत म्हणून त्याच्या खुरांवर उष्णतानिवारक वेष्टन असते. जिथे मैलोगणती पाण्याचे दर्शन होत नाही, अशा प्रदेशांत तो तहानेने व्याकूळ होऊ नये, म्हणून पाण्याचा भरपूर साठा करण्याचीही त्याच्या शरीरांत व्यवस्था असते.
जगातील हेतुपुरस्सर रचनांची अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. मग निर्हेतूक नियमबद्धता बुद्धिमान् कर्त्याशिवाय सिद्ध होऊ शकली, तरी जगातली ही सहेतूक नियमबद्धता एखाद्या बुद्धिमान् व्यक्तीने बुद्धिपुरःसर निर्मिली असेल, असे समजण्यास कोणती हरकत आहे?... असा हा युक्तिवाद आहे.
महारोगही सहेतूकच आहे काय?
वरील युक्तिवादाला अनेक तऱ्हांनी उत्तर देता येण्यासारखे आहे. एक तर जगातल्या काही गोष्टी सप्रयोजन व सहेतूक दिसत असल्या, तरी इतर अनेक गोष्टी अशा दाखवून देता येतील की, ज्यांचे अस्तित्व अगदीच अप्रयोजक वाटते. बकरीच्या तोंडावरील स्तन, काखेतले केस वगैरे गोष्टी निरर्थक म्हणून प्रसिद्ध आहेत. पुरुषाच्या दाढीमिश्यादेखील अगदीच निरुपयोगी व म्हणून रोज वस्तऱ्याने घोटून टाकल्या पाहिजेत, असेही मत हल्ली प्रचलित आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
मूल झाल्याबरोबर आईच्या स्तनात दूध येते, यावरून विश्वातील घटनांची सहेतूकता ज्यांना पटते, त्यांनी जिच्यात नुकताच यौवनाचा संचार झालेला आहे व जी तरुणांची मने मोहून टाकू लागली आहे, अशा युवतीच्या चेहऱ्यावर अगदी नको तेव्हा फुटणाऱ्या व तिला विद्रूप करणाऱ्या पुटकळ्यांची आठवण विसरू नये!
पाऊस पडल्यामुळे धान्य पिकते व म्हणून पाऊस कुणी तरी हेतुपुरस्सर पाडला असावा, असे अनुमान करणाऱ्यांनी, सुपीक शेतावर ज्याप्रमापणे पाऊस पडतो त्याचप्रमाणे जेथे त्याचा काहीही उपयोग नाही, अशा समुद्रावरही तो पडतो हे लक्षात ठेवावे. जलनिधीवर हेतूपूर्वक पाऊस पाडणारा देव अगदीच निर्बुद्ध असला पाहिजे.
जगातील निर्हेतूक घटनांची वरील उदाहरणे निदान भयंकर व आपत्तिमय तरी नाहीत. पण क्षणार्धांत लाखो जिवांना जिवंत पुरणारा भूकंप, कागदाला खाणाऱ्या कसरीप्रमाणे हळूहळू शरीराला कुरतडून पंगू करणारा महारोग व अंधकाराच्या सागरांत जिवंतपणी गुदमरत ठेवणारी जन्मांधता, अशांसारख्या घटनाही सहेतूकच आहेत, एवढेच नव्हे, तर दयाघन ईश्वराने त्या हेतूपूर्वक आज्ञापिल्या आहेत, असे म्हणणारे एक तर निर्बुद्ध तरी असावेत नाही, तर दुष्ट व निर्घृण तरी असावेत. जगातील सर्वच किंवा बव्हंशी घटना सहेतूक आहेत, असे म्हणायला याप्रमाणे काडीचाही आधार नाही.
डॉ. नी. र. वऱ्हाडपांडे यांच्या ‘विवेकवाद’ या विजय प्रकाशन, नागपूर यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment