विश्वाविषयी मानवाला असलेलं ज्ञान मर्यादित आहे, म्हणून देव आणि धर्म यांचा आधार घेतलाच पाहिजे, असा युक्तिवाद तर्कशुद्ध नाही, विज्ञाननिष्ठ नाही, असं म्हणणं असणारे फक्त निरिश्वरवादी किंवा नास्तिक नाहीत, तर अज्ञेयवादी किंवा ‘ॲग्नॉस्टिक’ मंडळींचं म्हणणंही असंच आहे.
फरक इतकाच की, देवाचं अस्तित्व नाकारताना अज्ञेयवादी नास्तिक लोकांपेक्षा काहीसे नम्र असतात. देवाला नाकारताना त्यांची भूमिका नास्तिकांपेक्षा मवाळ असते. पण देवाच्या आधाराशिवाय नैतिक तत्त्वांचा पुरस्कार करत मानव हितकर आयुष्य निश्चित जगू शकतो; वैज्ञानिक पद्धतीवर विश्वास ठेवून, पुराव्यांच्या आधारे जगातील गोष्टींचा अभ्यास करून जगाचं ज्ञान होऊ शकतं, असा अज्ञेयवाद्यांचादेखील विश्वास असतो. त्याविषयी ते आग्रहीही असतात, फक्त त्यांच्या आग्रहीपणात ते प्रखर नास्तिकांपेक्षा सौम्य असतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ही कथा अशाच एका अज्ञेयवादी माणसाची आहे. ‘देवाचं काय करायचं?’ असा प्रश्न वारंवार विचारणाऱ्या आजच्या परिस्थितीला अशा प्रकारच्या कथा एक उत्तर म्हणून उभ्या राहू शकतात, ही या कथनामागची भूमिका.
सर लेस्ली स्टीफन हे लेखक, अभ्यासक, इतिहासकार, आणि गिर्यारोहक, हे १९व्या शतकातील व्हिक्टोरियन इंग्लंडमधले एक प्रसिद्ध अज्ञेयवादी. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे कादंबरीकार व्हर्जिनिया वूल्फचे ते वडील.
‘अ बॅड फाइव्ह मिनिट्स इन द आल्प्स’ नावाचा त्यांचा एक मनोरंजक निबंध आहे. त्यांची श्रद्धा आणि तिच्या लागलेल्या कसाची ही कथा आहे. आणि ही कथा त्यांना अक्षरशः डोंगरावरच्या कड्यावर लटकलेले असताना, मरणाच्या दारात अर्धे आत अर्धे बाहेर, अशा अवस्थेत झालेल्या आत्मज्ञानाचीही कथा आहे!
आल्प्समधल्या एका माऊंटन रिसॉर्टमध्ये राहत असताना, एका रविवारी ते दुपारच्या जेवणापूर्वी फेरफटका मारायला बाहेर गेले. वादळी वारे वाहत होते; लवकरच पाऊसही सुरू झाला. निसर्गाचा रंग पाहून लवकर परतलं पाहिजे, हे स्टीफन यांच्या लक्षात आलं. समोर नेहमीच्या वाटेशिवाय बाजूच्या खळाळत्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला आणखी एक पाऊलवाट रिसॉर्टच्या दिशेनं धुक्यात हरवत जात अदृश्य झाल्याचं दिसत होतं. ती वाट अरुंद असली, तरी जवळची आहे, असं सर स्टीफन यांना मनापासून वाटलं आणि स्वतः उत्तम गिर्यारोहक असल्यानं त्या वाटेनं जाण्याची जोखीम पत्करण्याचं त्यांनी ठरवलं.
हवामान अधिकाधिक वाईट होत असल्यानं त्यांनी त्या वाटेवरनं जवळ जवळ पळायलाच सुरुवात केली. सुरुवातीला हे सोपं वाटलं, परंतु नंतर नंतर वाट आणखी अरूंद आणि निसरडी होत गेली. तोल सावरत ते कसेबसे वाट ज्या दिशेनं वर जात होती, तिकडं जात राहिले. पुढं सर्व काही धूसरच होतं.
स्टीफन यांनी पाऊल उचललं आणि अंदाजानं पुढं टाकलं. ते जमिनीवर पडलंच नाही. तोल जाऊन ते वाटेच्या बाजूला असलेल्या उतरणीवरून घसरत गेले; पुढे तर एकदम उभ्या उताराचा कडा आला; तिथं सावरण्यासाठी धडपड करताना स्टीफन यांच्या मनात एकाएकी विचार आला, ‘हीच ती वेळ! इतकी वर्षं आपल्याला मृत्यूबद्दल कुतूहल वाटायचं; तो कुठं आणि कसा येईल असे प्रश्न पडायचे हा तो आला; आता काही क्षणातच येणार!’
कड्यावरून घसरत असतानाच एक हात त्यांनी बाहेर फेकला आणि एका कपारीत तो अडकला; एक हिसका बसून त्यांचं घसरणं थांबलं. अधिक आधार मिळण्यासाठी त्यांनी त्यांचा उजवा पाय बाजूच्या खडकांवर ठेवण्याचा प्रयत्न केला, तोही सुदैवानं यशस्वी झाला. पण तिथं मात्र त्यांची स्थिती गोठल्यासारखी झाली.
तेथून पुढं किंवा वर काही ते स्वतःला खेचू शकले नाहीत. मग त्या खडकालाच एखाद्या घोरपडीसारखे एक हात आणि एक पाय लटकवून ते चिकटून राहिले!
काही क्षणांतच त्यांना आपल्या बिकट परिस्थितीची जाणीव झाली. त्यांच्या लक्षात आलं की, अशा स्थितीत आपण आणखी जास्तीत जास्त वीस मिनिटं लटकून राहू शकतो. त्यानंतर आपले हात-पाय पांढरं निशाण दाखवणार. ओरडण्यात काही अर्थ नव्हता, कारण आजूबाजूला कोणीही नव्हतं.
आणि मूळ वाटेवरून, जी कमीत कमी शंभर यार्ड तरी दूर होती, कुणी गेलं असतं तरी वेगानं वाहणारं वारं, पाऊस आणि खाली वाहणारा प्रवाह, या सगळ्यांच्या आवाजात त्यांचा आवाज त्या वाटसरूला ऐकू जाणं अशक्यच होतं. खेरीज ओरडण्यानं जी शक्ती खर्च होईल, ती लटकून राहण्यासाठी वापरली, तर बरं, असा विचारही स्टीफन यांच्या मनात आला.
त्या अवस्थेत काही वेळ गेला, तसे स्टीफन यांच्या मनात आता रिसॉर्टवर त्यांच्याबरोबर आलेल्या पाहुण्यांचे व तिथल्या जेवणाच्या तयारीचे विचार येऊ लागले. लवकरच ती मंडळी जेवण्यासाठी टेबलाभोवती जमतील. माझी अनुपस्थिती कोणाच्या तरी लक्षात येईल. मग त्यावर थोडी हलक्याफुलक्या पद्धतीची चर्चा होईल, पण माझं काहीतरी इतकं गंभीर झालं असेल, हे कोणाच्याही डोक्यात येणं शक्य नाही. माझ्याबद्दल काळजी वाटण्यास सुरुवात होईल, त्याच्या कितीतरी आधी माझा इथून कडेलोट होऊन काम तमाम झालेलं असेल....
मृत्यू अटळ आहे, हे कळल्यावर स्टीफन यांनी मरण्यासाठी मनाची तयारी करण्याचं ठरवलं. मरताना मनस्थिती कशी असावी, याविषयी अनेक वर्षं केलेले विचार मुद्दाम मनात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. पण मरणाविषयी त्यांनी आयुष्यभर जो काही अभ्यास केला होता, जे काही वाचलं होतं, त्यातल्या कशावरही मरणाच्या दारात उभं असताना मन एकाग्र होत नाहीये, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या मनात राहून राहून फक्त ही वाट शोधून आपण केलेल्या मूर्खपणाचा राग येत होता.
स्टीफन यांनी मोठा श्वास घेतला आणि स्वतःच्या मनाला एक चिमटा काढला. (शरीराला काढणं शक्यंच नव्हतं!) त्याला बजावलं, ‘तुझ्याजवळ जीवनातील काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता फक्त एक चतुर्थांश तास आहे. या पंधरा मिनिटांत स्वतःच्या मूर्खपणाला दोष देण्यापेक्षा ती उत्तरं शोधायला लाग.’
मग त्यांनी मुद्दाम त्यांच्या आवडीच्या प्रश्नांवर विचार सुरू केला- जीवन म्हणजे काय? त्यात माणसानं कोणती भूमिका बजावली पाहिजे? जे जे धर्म आणि पंथ आयुष्यात त्यांनी पाहिले (आणि नाकारले) होते, त्या सर्वांच्या शिकवणीचं सार मृत्यूविषयी काय सांगतं?
ते उजळणी करू लागले. आयुष्याचं मर्म आणि सन्मानजनक मृत्यूविषयी हे सर्व धर्म आणि संप्रदाय वेगवेगळ्या दिशेला निर्देश करत होते. कुठल्याही एकाचं मत दुसऱ्याच्या मताशी जुळत नव्हतं.
स्टीफन यांनी आता एका एका धर्माचा वेगळा विचार करायला घेतला. आणि हे करत असताना त्यांच्या मनात एक विचित्र विचार उपटला. आपण नाकारलेले हे सर्वच धर्म, हे सर्व पंथ खरे असतील तर? आणि असलेच तर या धर्मांना किंवा त्यांच्या पवित्र प्रार्थनेतील तथाकथित सत्याला नाकारल्याबद्दल स्वर्गाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेला देवाने (कदाचित कुत्सित दिलगिरी व्यक्त करून) आपल्याला ‘दुर्भाग्या, कायमचं जळायला नरकात जा’ म्हणून आपली तिकडे रवानगी केली तर?
पण एव्हाना देवाच्या (तो असलाच आणि सर्वसाक्षीही असला तर) हे नक्की लक्षात आलं असेल की, समाज आता पूर्वीइतका सनातनी राहिलेला नाही. बऱ्याच धर्मनिष्ठ रूढीदेखील आता ‘फॅशनेबल’ राहिल्या नाहीत. त्यामुळे तो हल्ली या बाबतीत काहीशी अनुकंपाही दाखवत असेल. पण ही अतिसकारात्मकतादेखील आपल्या विचारांमध्ये शिल्लक असलेल्या पूर्वग्रहांचं, दोषांचं लक्षण आहे व तिच्या नादी लागणं आपल्या प्रकृतीला मानवणारं नाही, हे स्टिफन यांच्या लागलीच लक्षात आलं.
त्यांनी मग विचारांची गाडी एका निराळ्या रस्त्याकडे वळवली. त्यांना वाटू लागलं की, मुदलात आयुष्याविषयीच्या या तथाकथित गंभीर विचारांना कितपत अर्थ आहे?
“मी, लेस्ली स्टीफन म्हणजे या अनंत विश्वाच्या जडसृष्टीतील असंख्य जीवांपैकी एक यकश्चित जीव, जो या कड्यावरून खाली फेकला गेल्यानं, या विश्वाच्या अफाट पसाऱ्यामध्ये कितीसा फरक पडणार आहे? काही क्षणातच या नगण्य शरीराचे अणू खाली दरीत वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात विखुरले जातील आणि नव्या निर्मितीच्या प्रक्रियेचा अंश होऊन जातील. आणि ज्या मानव जमातीचे स्टीफन एक सदस्य होते, ती त्यांच्याशिवाय पूर्वी चालू होती तशीच पुढे चालू राहिल...” पण या विचारानंही त्यांचं समाधान झालं नाही. त्या वियोगाच्या क्षणी शांत वाटण्यासाठी त्यांना आशीर्वादासारखं काहीतरी हवं होतं, खऱ्या समाधानाची भावना जागं करणारं...
विचारात पडलेल्या स्टीफनना एकाएकी कॉलेजात शिकत असताना त्यांनी भाग घेतलेल्या थेम्स नदीवरील नौकेच्या शर्यतीची आठवण झाली. शर्यत सुरू झाली आणि होत राहिली, तशी त्यांची नौका इतर नौकांच्या खूप मागे पडत गेली. जेव्हा पहिल्या काही नौका अंतिम रेषेजवळ पोहोचल्या, तेव्हा तर सर स्टीफन खूपच मागं राहिले होते. जिंकणं बाजूलाच राहिलं, आपण ही शर्यत किमान उत्ल्लेखनीय वेळेतही पूर्ण करू शकणार नाही, हे त्यांना स्पष्ट दिसत होतं. ते कमालीचे थकले होते. शर्यतीतून त्या क्षणी बाहेर पडता आलं असतं. तरीही सर्वोत्तम प्रयत्न करून शर्यत पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे, या भावनेनं ते नौका वल्हवत राहिले आणि त्यांनी ती शर्यत पूर्ण केलीच...
...येस्स! आत्ता, खडकावर लटकताना परिस्थिती काय वेगळी होती?
खेळ संपला होता, तरीही शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहून प्रतिकार करणं, हा मार्गच सुयोग्य होता. या मार्गांची निवड करण्याच्या मुळाशी एक नैतिक पायाही आहे, अशी संपूर्ण खात्री त्यांना वाटली. शिवाय या निवडीसाठी मला देवाची किंवा विश्वातील कोणत्याही धर्म वा संप्रदायाची गरज नाही. हे माझं कर्तव्य सर्वस्वी माणूस म्हणून आहे आणि ते पार पाडणं, ही केवळ माणूस म्हणून माझी गरज आहे. तेवढं कारण हे करण्यासाठी परिपूर्ण आहे; त्याला इतर कोणत्याही समर्थनाची वा आधाराची गरज नाही, असं स्टीफन यांना ठामपणे वाटलं. आणि अचानक खूप शांत आणि समाधानीही वाटू लागलं.
व्हिक्टोरियन लोकांमध्ये ‘कर्तव्य’ ही जवळजवळ एक पारलौकिक गोष्ट असल्याची भावना होती. जॉर्ज इलियट या कवयित्रीने असं लिहून ठेवलं आहे की, ‘देव, अमरत्व, आणि कर्तव्य’ या तीन कल्पनांपैकी तिला नेहमीच पहिली अकल्पनीय आणि दुसरी अविश्वसनीय वाटली, परंतु तिसरी मात्र खऱ्या अर्थानं ‘कालोचित आणि परिपूर्ण’ वाटली.
चार्ल्स डार्विननंदेखील कर्तव्याची सखोल भावना हा मनुष्याच्या सर्व गुणांपैकी सर्वांत उदात्त गुण म्हणून लिहून ठेवलं आहे. या भावनेच्या उत्पत्तीचं श्रेय त्यानं ईश्वराला किंवा ईश्वरावरील श्रद्धेला न देता माणसानं उत्क्रांती दरम्यान निर्माण केलेल्या सामाजिक गटांशी असलेल्या बांधीलकीला दिलं आहे.
स्टीफन यांचे विचारही अशाच धाटणीचे होते. त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली की, त्यांची ईश्वराच्या अस्तित्वावरची श्रद्धा नाहीशी झाली. पण ही घटना नोंदवताना ते म्हणतात, ‘मी आता ईश्वर वा धर्मप्रणित अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नसलो, तरी माझा नैतिकतेवरचा विश्वास शाबूत आणि ठाम आहे.’ ते पुढे म्हणतात, ‘जिवंत असेतोवर सर्व काळ मला सज्जनांसारखं जगायचं आणि मरायचं आहे.’
आज आपल्यापैकी अनेकांना ईश्वराबद्दल श्रद्धा वाटते, ती मनःपूर्वक असतेही. परंतु बऱ्याचदा या श्रद्धेच्या पोटात विशिष्ट अपेक्षा दडलेल्या असतात. मग त्या स्वतःसाठी असतील, कुटुंब, समाज वा देशासाठी असतील. त्यामुळे या श्रद्धेपोटी आपण जी कर्तव्यं पार पाडतो, त्यामागं देवाबरोबरच्या देवाणघेवाणीचे ‘अदृश्य करार’ असतात.
स्टीफन यांच्यासारख्या लोकांसाठी, कर्तव्य ही एक स्वयंसिद्ध आणि स्वतंत्र गोष्ट होती. तिचं आयुष्यातील स्थान देवावर अथवा दैवावर अवलंबून नाही, अशी त्यांची धारणा होती. ते पार पाडणं, हाच त्यांनी त्यांचा ‘धर्म’ मानला. देव आणि देवपण यांना असणारं नैतिकता आणि सत्शीलतेचं अधिष्ठान माणूस त्याच्या आचरणातून स्वतःमध्ये निर्माण करू शकतो. किंबहुना असं देवपणच अस्सल ‘देवपण’ असा त्यांचा विश्वास होता. त्याचा अस्सलपणा सिद्ध करण्यासाठी कुठल्याही धर्माच्या देवालयातील देवाच्या अथवा त्याच्या पुजाऱ्यांच्या ‘सर्टिफिकेट’ची गरज आहे, असं त्यांना कधी वाटलं नाही.
कर्तव्याबद्दलची हीच भावना त्या डोंगरावर लटकलेल्या स्थितीतही मनात ठामपणे उभी राहिल्यानं स्टीफन यांचं मन शांत झालं. मृत्यूच्या दारात त्यांच्या मनाचा उडालेला गोंधळ संपला. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणं, हे माझं माणूस म्हणून कर्तव्य आहे, असा निर्धार करून ते वर्तमान परीस्थितीतून सुटका होण्यासाठी काय करता येईल, याचा पुन्हा विचार करू लागले.
थोडी पाहणी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की, जिथं ते लटकले होते, तिथून एक झोका घेऊन डावीकडं पोहोचू शकले, तर तिथं दिसणाऱ्या एका कपारीस कदाचित दुसऱ्या हातानं पकडू शकतील. पण झोका घेऊन त्यांना त्यांची सध्याची पकड काही क्षणांकरता सोडून द्यावी लागणार होती. हे जमलं नाही तर खेळ खतम!
पण त्या स्थितीत गमावण्यासारखं त्यांच्याकडं काहीच नव्हतं. त्यांनी निश्चय केला; झोका घेतला; इकडचा हात सोडला, दुसरा तिकडे फेकला पण नेम चुकलाच! सर स्टीफन खाली पडू लागले. त्यांनी प्राण पणाला लावून धडपड चालू ठेवली. शेवट नक्की होणार, हे दिसत होतं. त्यांनी धडपड चालू ठेवता ठेवता मनाची तयारीही केली...
…एकाएकी स्टीफनना आपलं पडणं थांबल्याचं जाणवलं. त्यांच्या पायांना अचानक एक आधार सापडला होता. तोही गवतानं आच्छादलेला आणि तिथं पाय लागता लागताच त्यांच्या हातांनाही अचानक दोन मोठ्या कपारींची घट्ट पकड मिळाली!
स्टीफन यांच्या या थरारककथेचा शेवट ते या दिव्यातून सहिसलामत बाहेर पडले, याचा अंदाज ते ही हकीकत सांगायला जिवंत होते, यावरून वाचकांना बांधता आलाच असेल! अर्थात शेवट आनंददायीच होता. पडता पडता शेवटच्या क्षणी सापडलेल्या या भक्कम आधाराच्या जोरावर ते पुन्हा नेहमीच्या मार्गापर्यंत पोहोचू शकले.
प्राणावर बेतलेल्या या घटनेतून आपण सहिसलामत सुटलो, याचं भान आल्यावर त्यांनी हातातील घड्याळाकडे पाहिलं (ते मात्र मनगटावर अद्याप शाबूत होतं!). या संपूर्ण नाटकाला अवघी पाचच मिनिटं लागली होती- ‘अ बॅड फाइव्ह मिनिट्स इन द आल्प्स’!
एका समाधानी अवस्थेत स्टीफन दुपारच्या जेवणासाठी पोहोचले, तेव्हा आपापल्या खोल्यांतून बाहेर पडून हास्यविनोद करत गप्पा मारत त्यांचे सहकारी भोजनासाठी गोळा होऊ लागले होते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
माणूस म्हणून आपल्याला स्वभावतः आव्हानं पेलण्यापेक्षा किंवा अवघड विचारांनी डोकी शिणवण्यापेक्षा सोपी उत्तरं शोधणं सोयीचं वाटतं. अशा सोप्या उत्तरांच्या मागं असलेल्या माणसांना फसवायला टपलेल्यांनाही ही उत्तरं फायद्याची असतात. ही सोपी उत्तरं नवस-सायास, अंगारे-धुपारे, पुजारी-बडवे, अगदी राजकीय नेत्यांच्या स्वरूपातही येतात. माणूस म्हणून आपलं दुर्दैव हे की, आपल्यातल्याच कितीतरी संतांनी आपल्याला जागं करायला आयुष्य वेचली, तरी आज एकविसाव्या शतकातसुद्धा देवाचं दर्शन घेण्यासाठी देवळात प्रवेश मिळावा की न मिळावा, या अधिकारावरून आम्ही रूपकार्थानं आणि शब्दशःसुद्धा स्वतः:ची व एकमेकांची डोकी फोडताना आढळतो.
‘देव शोधायाकारणें। सकळ आपुले अंत:कर्णे समजलें पाहिजे’ हा समर्थांचा उपदेश व इतर अनेक संतांनी दिलेल्या अशाच कानपिचक्यांकडे लक्ष द्यायला आमच्याकडे ना वेळ, ना शहाणपण!
कर्तव्याची भावना ही मानवी स्वभावातील इष्ट आणि नैतिक भावना आहे आणि ती केवळ स्वतःच्या जीवनाद्वारे स्वतःच्या मानवतेविषयीच्या बांधीलकीद्वारे सिद्ध करता येण्याजोगी भावना आहे, असा विचारच आम्हाला नको असल्यामुळे भावनेच्या भरात जे काही केलं जातं, त्यात आम्ही आनंद शोधतो आणि कर्तव्यपूर्तीचं समाधान पाहतो, ही आजच्या घडीची शोकांतिका आहे. या शोकांतिकेला बदलण्याची कुवत आपल्यात काही अंश तरी जागी करण्याचं काम, अशा कथा करतील का?
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. चंद्रशेखर फणसळकर शल्यचिकित्सक आहेत आणि नाटककारही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment