अजूनकाही
ईश्वर म्हणजे ‘सत्य’. काही वर्षे झाली, ‘ईश्वर सत्य आहे’ असे म्हणण्याऐवजी ‘सत्य ईश्वर आहे’ असे मी म्हणू लागलो आहे. हेच मला जास्त न्यायाचे वचन वाटते. सत्यावाचून या जगात इतर काही नाही.
येथे सत्याची व्याख्या व्यापक करायची आहे. ते सत्य चैतन्यमय आहे. हा सत्यरूपी ईश्वर आणि त्याचे कायदे हे वेगवेगळे नाहीत, एकच आहेत, म्हणून तेही चैतन्यमय आहेत. तेव्हा हे जग सत्यमय आहे, असे म्हणणे किंवा नियममय आहे, असे म्हणणे दोन्ही सारखेच. या सत्यात अनंत शक्ती भरलेली आहे. ‘गीते’च्या दहाव्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे, त्याच्या एका अंशाने जग टिकून राहिले आहे. म्हणून जेथे जेथे ‘ईश्वर’ असा शब्द येतो, तेथे तेथे ‘सत्य’ शब्द वापरून अर्थ लावला, तर ईश्वराविषयीचे माझे मत समजू शकेल.
परमेश्वरच सत्य आहे, असे म्हणण्यात दोष हा येतो की, परमेश्वर आणखीही काही आहे, असा त्यातून अर्थ निघतो. परमेश्वर सहस्रनामधारी आहे हे खरे, परंतु परमेश्वराच्या बाबतीत बहुनामाची कल्पना करण्याने ज्या वस्तूला आपण सर्वार्पण करू इच्छितो, ती वस्तू लहानशी आहे, असे वाटण्याचे भय राहते. पण ‘सत्य हेच परमेश्वर’ असे म्हणण्यात दुसरी सर्व नावे बाजूला पडतात, ध्यान फक्त सत्याचेच राहते आणि अद्वैतवादाशी हे अधिक जुळते. नास्तिकवादाला त्यात स्थानच राहत नाही, कारण नास्तिकसुद्धा ‘अस्ति’ला मानतो आणि ‘अस्ति’चे मूळ रूप सत् आाहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ईश्वर निराकार आहे आणि सत्यसुद्धा निराकार आहे. यावरून सत्य म्हणजे ईश्वर, असे मी पाहिले किंवा असा निष्कर्ष मी काढला असे नाही. मी असे पाहिले की, ईश्वराचे संपूर्ण विशेषण सत्य हेच आहे. बाकी सारी विशेषणे अपूर्ण आहेत. ईश्वर हा शब्दसुद्धा एक विशेषणच आहे, त्याने त्या अनिर्वचनीय महान् तत्त्वाची विशेष ओळख होते. पण ‘ईश्वर’ या शब्दाचा धात्वर्थ घेतला (ईश् - सत्ता चालवणे ) तर तो शब्द नीरस वाटतो.
ईश्वराला सत्ताचालक म्हणून ओळखण्याने बुद्धीचे समाधान होत नाही. सत्ताचालक म्हणून ओळखल्याने त्याच्याविषयी आपल्या मनात एक प्रकारचे भय जरी उत्पन्न होत असले आणि त्यामुळे पाप करण्याची भीती वाटून पुण्यकार्य करण्याला प्रोत्साहन मिळत असले, तरी असे भय वाटून झालेले पुण्यसुद्धा पुण्य राहत नाही. पुण्य करायचे तर पुण्याकरताच, मोबदला मिळवण्याकरता नव्हे. असे अनेक विचार करता करता एक दिवस असे मनात आले की, ईश्वर सत्य आहे असे म्हणणे हेही अपूर्ण वचन आहे, सत्य हेच ईश्वर आहे, हे वचन, मनुष्याची वाचा ज्या मर्यादेपर्यंत जाऊन पोचू शकते तेथपर्यंत, पूर्ण वचन आहे.
तिन्ही त्रिकाळी जे असू शकते असे सत्यच असणार, कारण ‘सत्’ म्हणजे असणे. पण, सत्यालाच ईश्वर म्हणून ओळखल्याने श्रद्धा कमी होण्याचे कारण नाही. माझ्या दृष्टीने तर उलट ती वाढली पाहिजे. मला तरी तसाच अनुभव आला आहे. सत्याला परमेश्वर म्हणून ओळखल्याने आपण अनेक भानगडींतून सुटतो. चमत्कार पाहण्याची किंवा ऐकण्याची इच्छा राहत नाही.
ईश्वरदर्शनाचा अर्थ समजायला कठीण वाटतो, पण सत्यदर्शनाचा अर्थ समजायला काहीच अवघड नाही. सत्यदर्शन खुद्द जरी कठीण असले- ते कठीण आहेच - तरी जसजसे आपण सत्याच्या जवळ जवळ जात जाऊ, तसतसे आपल्याला त्या सत्यरूपी ईश्वराचे काही काही दर्शन होत जाते. त्याने पूर्ण दर्शनाची आशा वाढते आणि श्रद्धाही वाढते.
कोणी ईश्वराला डोळ्यांनी पाहिलेले नाही. आपल्याला त्याला हृदयाने ओळखायचे आहे, त्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे, त्याच्या रूपात मिळून जायचे आहे. हा ईश्वर सत्य होय, किंवा सत्य हेच ईश्वर असे म्हणा. सत्य म्हणजे खरे बोलणे एवढेच नाही. सत्याचा अर्थ या जगात जे निरंतर त्याच्या रूपाने होते, आहे आणि असेल आणि ज्याच्याशिवाय दुसरे काही नाहीच, जे स्वतःच्याच सत्तेने आहे, ज्याला कोणाच्या आश्रयाची गरज नाही, उलट ज्याच्या आश्रयाने अस्तित्वमात्र सर्व आहे ते सत्य. सत्यच शाश्वत आहे, बाकी सर्व क्षणिक आहे.
त्याला आकाराची जरूर नाही, तेच शुद्ध चैतन्य आहे, तेच शुद्ध आनंद आहे. त्याला ईश्वर म्हणू, कारण त्याच्या सत्तेच्या योगानेच सर्व चालते ते आणि त्याचा कायदा दोन्ही एकच आहेत. म्हणून तो कायदा चैतन्यरूप आहे. या कायद्याच्या आधाराने सगळे तंत्र चालते. या सत्याची आराधना हीच प्रार्थना, म्हणजेच आपली सत्यमय होण्याची तीव्र इच्छा, ही इच्छा अष्टौप्रहर असली पाहिजे. पण आपल्यांत इतकी जागृती नसते. म्हणून अमुक वेळी आपण प्रार्थना, आराधना किंवा उपासना करावी, म्हणजे ती करता करता आपल्या मनात अष्टप्रहर सत्याचे चिंतन राहू लागेल.
ईश्वर सत्य आहे असे तुम्ही कशावरून म्हणता, असे तुम्ही मला विचारले आहे. माझ्या लहानपणी मला हिंदू धर्मग्रंथांत ‘विष्णूसहस्रनाम’ म्हणून प्रसिद्ध असलेली ईश्वराची नामे पाठ करायला शिकवलेली होती. पण या नामावळीत ईश्वराची सर्व नावे आली असे नाही, जितके म्हणून जीवजंतू या जगात आहेत, तितकी सर्व ईश्वराचीच नावे आहेत, अशी आमची श्रद्धा आहे.
आणि ते खरे आहे असे मला वाटते. म्हणून आम्ही ईश्वर नामरहित आहे असे म्हणतो; आणि ईश्वराची रूपे अनंत असल्यामुळे आम्ही त्याला रूपरहित समजतो; तसेच तो अनेक भाषांच्या द्वारा आमच्याशी बोलत असल्यामुळे आम्ही त्याला वाणीरहित मानतो. अशी त्याची अनेक वर्णने करता येतील.
आणि जेव्हा मी इस्लामधर्माचा अभ्यास करू लागलो, तेव्हा इस्लाममध्येसुद्धा ईश्वराला अनेक नावे आहेत, असे मला आढळून आले. ‘ईश्वर हा प्रेम आहे’ असे जे म्हणतात त्यांच्याबरोबर मी ‘ईश्वर हा प्रेम आहे’ असे म्हणेन, पण मनातल्या मनात समजेन की, ईश्वर हा प्रेम असला, तरी ईश्वर हा सत्य आहे, हेच खरे.
मनुष्याच्या वाणीने जर ईश्वराचे पूर्ण वर्णन होणे शक्य असले तर, माझ्यापुरता तरी, ईश्वर सत्य आहे, या निर्णयाप्रत मी आलो. परंतु दोन वर्षांपूर्वी मी आणखी एक पाऊल पुढे गेलो आणि म्हटले की सत्य हे ईश्वर आहे. ‘ईश्वर हा सत्य आहे’ आणि ‘सत्य हे ईश्वर आहे’ या दोन विधानांमधला सूक्ष्म भेद तुम्हाला दिसून आलाच असेल.
या निर्णयावर मी जवळ जवळ पन्नास वर्षांपूर्वीपासून सतत भाणि अविरत सत्याचा शोध केल्यानंतर आलो आहे. त्यानंतर मला आढळून आले की, सत्याच्या जास्तीत जास्त जवळ पोचण्याचा मार्ग प्रेम हा आहे. परंतु ‘प्रेम’ या शब्दाचे इंग्रजीत तरी अनेक अर्थ आहेत, आणि विकार या अर्थी मानवी प्रेम अधःपातालासुद्धा कारणीभूत होऊ शकते, असेही मला आढळून आले.
मला असेही दिसून आले की, ‘अहिंसा’ या अर्थाने प्रेमाच्या उपासकांची संख्या जगात फारच मर्यादित आहे. परंतु सत्याच्या संबंधांत मात्र मला दोन अर्थ कधी आढळून आले नाहीत आणि सत्याच्या आवश्यकतेच्या किंवा शक्तीच्या बाबतीत नास्तिकांनीसुद्धा आढेवेढे घेतलेले नाहीत. परंतु सत्य शोधून काढण्याच्या उत्साहाच्या भरात नास्तिकांनी ईश्वराचे अस्तित्वच मुळी नाकारण्याला मागेपुढे पाहिलेले नाही. अर्थात् त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून ते बरोबरच आहे. आणि या बुद्धिवादी विचारसरणीमुळे ईश्वर सत्य आहे’ असे म्हणण्यापेक्षा ‘सत्य ईश्वर आहे’ असे म्हणणे अधिक योग्य होईल, असे मला दिसून आले.
चार्ल्स ब्रेडलॉ यांचे नाव मला आठवते, ते स्वतःला नास्तिक म्हणवून घेण्यात भूषण मानत. परंतु त्यांच्यासंबंधी जी थोडीबहुत मला माहिती आहे, त्यावरून मी त्यांना कधीही नास्तिक म्हणणार नाही. ईश्वराला भिऊन चालणारे गृहस्थ असेच मी त्यांना म्हणेन. पण ते माझ्या म्हणण्याचा निषेध करतील. मी जर त्यांना म्हणेन की, ‘ब्रॅडलॉसाहेब, तुम्ही सत्याला भिऊन चालणारे गृहस्थ आहात, ईश्वराला भिऊन नव्हे.’ तर त्यांचा चेहरा उजळेल. ‘सत्य हेच ईश्वर आहे’ असे जर मी म्हटले, तर त्यांच्या निषेधाला जागाच राहणार नाही. अनेक तरुणांचा आक्षेप मी हेच सांगून दूर केला आहे.
याच बाबतीत दुसरी एक अडचण लक्षात घेतली पाहिजे. ती अशी की, लक्षावधी लोकांनी ईश्वराच्या नावावर अनन्वित अत्याचार केले आहेत. शास्त्रज्ञ सत्यसंशोधनाच्या नावावर क्रूर कृत्ये करत नाहीत असे नाही. सत्याच्या आणि विज्ञानाच्या नावाने जिवंत प्राण्यांची चिरफाड करून पशूंवर किती अमानुष अत्याचार केले जात आहेत, याची मला माहिती आहे. तेव्हा ईश्वराचे तुम्ही कसेही वर्णन करा, मार्गात अनेक अडचणी उभ्या राहतात.
परंतु मानवी मन ही एक मर्यादित वस्तू आहे आणि तुम्ही जेव्हा मनुष्याच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडच्या वस्तूसंबंधी किंवा तत्त्वासंबंधी विचार करू लागता, तेव्हा तुमच्या हालचालीला मर्यादाच पडते. शिवाय, आमच्या हिंदूंच्या तत्त्वज्ञानात आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे, ईश्वरच फक्त आहे, दुसरे काही अस्तित्वातच नाही.
आणि हेच सत्य इस्लाम धर्माच्या कलेमांत जोर देऊन आणि स्पष्ट करून मांडलेले तुम्हाला आढळेल. त्यांत स्वच्छ असे म्हटले आहे की, अल्लाह हाच एक आहे आणि दुसरे काही नाहीच. वस्तुतः ‘सत्’ या संस्कृत शब्दाचा अक्षरशः अर्थ ‘ज्याला अस्तित्व आहे ते’ असाच आहे.
याकरता, आणि आणखी अनेक कारणे मी देऊ शकेन त्याकरता, ‘सत्य हाच ईश्वर’ ही व्याख्या अत्यंत संतोषप्रद आहे, असा माझ्या मनाचा निर्णय झाला आहे. आणि जेव्हा तुम्हाला सत्याचा ईश्वररूपाने शोध घ्यायचा असेल, तेव्हा त्याचे अपरिहार्य साधन प्रेम म्हणजे अहिंसा हेच आहे, आणि साध्य व साधन हे पर्यायवाची शब्द आहेत, असे माझे मत असल्यामुळे ‘ईश्वर हा प्रेम आहे’ असे म्हणायला मला मुळीच दिक्कत वाटत नाही.
‘तर मग सत्य म्हणजे काय?’
प्रश्न अवघड आहे खरा, पण तो मी ‘अंतरात्मा जे सांगतो ते सत्य’ असे म्हणून माझ्यापुरता सोडवला आहे. तुम्ही विचाराल, मग वेगवेगळ्या लोकांच्या मनात वेगवेगळी आणि परस्परविरुद्ध सत्ये कशी येतात? याचे उत्तर असे की, मनुष्याचे मन हे असंख्य माध्यमांच्या द्वारा काम करत असते आणि मनाच्या विकासाची क्रिया ही सर्वांच्या बाबतीत सारखीच नसते, हे लक्षात घेतले, म्हणजे त्यावरून एकाचे जे सत्य ते दुसऱ्याचे असत्य असू शकेल, हे ओघानेच येते, आणि म्हणून ज्यांनी प्रयोग करून पाहिले आहेत, ते अशा निर्णयावर आले आहेत की, ते प्रयोग करताना काही अटी पाळाव्या लागतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
शास्त्रीय प्रयोग चालवण्याकरता जसा एक शिक्षणाचा शास्त्रीय अभ्यासक्रम आवश्यक असतो, तसेच आध्यात्मिक क्षेत्रात प्रयोग करण्याची पात्रता येण्याकरता कडक असे पूर्वतयारीचे नियम पालन आवश्यक असते. म्हणून आपल्या अंतरांतील आवाजाविषयी बोलण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखाव्या. याकरता आमच्याकडे अनुभवावर आधारलेले असे मत आहे की, सत्याचा ईश्वरस्वरूपात ज्या कोणाला वैयक्तिक शोध घ्यायचा असेल, त्याने कित्येक व्रतांचे पालन करणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, सत्याचे व्रत, ब्रह्मचर्याचे व्रत (व्रत अशाकरता की, तुमचे प्रेम तुम्ही सत्यरूपी ईश्वर आणि इतर व्यक्ती किंवा वस्तू यांत विभागू शकत नाही), अहिंसेचे, अकिचन राहण्याचे आणि अपरिग्रहाचे व्रत. ही पाच व्रते तुम्ही आचरल्यावाचून त्या प्रयोगाला तुम्ही आरंभही करू नये. इतरही अनेक अटी सांगितलेल्या आहेत, पण मी त्या सर्वांविषयी तुम्हाला सांगत बसत नाही. एवढेच सांगितले म्हणजे पुरे की, ज्यांनी हे प्रयोग केले आहेत, त्यांना माहीत आहे की, अंतरीचा आवाज आपल्याला ऐकू येतो, असे ज्याने त्याने म्हणणे हे वाजवी नसते.
आज जो तो कसल्याही यमनियमांचे पालन न करता मनोदेवतेतेचा हक्क सांगू लागला आहे. त्यामुळे इतके असत्य जगापुढे मांडले जात आहे की, त्यामुळे जग गोंधळून गेले आहे. मी आपल्यापुढे अत्यंत विनयपूर्वक एवढेच मांडू शकेन की, अत्यंत निरहंकार वृत्ती ज्यांची झालेली नाही, त्यांना सत्य सापडणे शक्य नाही. सत्यसागरावर विहार करण्याची जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही स्वतः ‘शून्य’ बनले पाहिजे.
‘गांधी विचारदर्शन : सत्याग्रह-विचार’, खंड ४मधून साभार.
प्रकाशक - महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment