अजूनकाही
१. राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणाऱ्यांचा शिरच्छेद करू, असे चिथावणीखोर वक्तव्य भाजपचे गोशामहलचे आमदार राजा सिंग यांनी केले आहे. हैदराबादमधील एका सभेत बोलताना राजा सिंग म्हणाले, ‘राम मंदिराची निर्मिती केल्यास परिणामांना सामोरे जा, असा इशारा काहीजण देतात. आम्ही तुमच्या याच विधानाची वाट पाहत आहोत. यानंतर आम्ही तुमचा शिरच्छेद करू.’
आता सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणतील, ओळखा पाहू? ते म्हणतील, ‘शिरच्छेदाला विरोध आहे, कोणतंही हिंसक कृत्य होता कामा नये. पण, राम मंदिर झालंच पाहिजे.’ त्यांच्या अनुयायांना अलीकडचं, सामोपचाराचं, सबुरीचं काही ऐकायची, मनावर घ्यायची सवय नसते, झालंच पाहिजे, हे कळीचं वाक्य, तो आदेश. कोणी ना कोणी असं भडकवणारं बोलत राहायचं, मग हे थोडं पाणी मारतात, अशी इंचाइंचाने आग पुढे पेटवत न्यायची.
……………………………………………………
२. आपण कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्जमाफीपूर्वी त्यांच्या हितासाठी काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे पुन्हा कर्जच काढण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये, अशी स्थिती करायची आहे. त्यामुळे शेतीक्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.
कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत, हे तर खरंच आहे. तसं तर मुख्यमंत्रीपदी फडणवीस आहेत, म्हणूनही प्रश्न सुटत नाहीत. त्यांनी इतर विषयांमध्ये घेतलेले निर्णय हे त्या क्षेत्रांचे सगळे प्रश्न सोडवणारे ठरले, असंही काही झालेलं नाही. असा निर्णय फार फार तर त्यांच्या राजीनाम्याचा असू शकतो; त्यांच्याजागी मुख्यमंत्री होऊ इच्छिणाऱ्यांपैकी एकाचा तरी प्रश्न हमखास सुटेल त्यातून. मग शेतकऱ्यांवरच ही ‘प्रश्न सोडवण्याची’ मेहेरनजर का? त्यातून प्रश्न सुटेल याची तरी काय खात्री? शिवाय शेतमालाला योग्य भाव मिळवून देऊन शेतकऱ्याला त्याच्या पायावर उभा करण्याऐवजी शेतीत गुंतवणूक आणण्याचा प्रस्ताव तर शेतकऱ्यांसाठी रोगापेक्षा औषध भयंकर ठरू शकतो.
……………………………………………………
३. देशात गोमांस आणि कत्तलखान्यांवर वादविवाद सुरू असताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यामुळे हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. गायींबद्दल दया नसणाऱ्या व्यक्तींविषयी गुजरात सरकारला कोणतीही संवेदना नाही, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी म्हटले आहे. गाय आमची माता आहे. आमच्या विश्वासाचे प्रतीक आहे. ज्यांच्या मनात गायीबद्दल दयेची भावना नसेल, त्यांना गुजरात सरकारकडून कोणतीही दया दाखवली जाणार नाही,’ असेही ते म्हणाले.
ही तर सरळ खुनाखुनीचीच भाषा झाली. हे रूपानी महोदय गायीबद्दल सहानुभूती दाखवतात म्हणजे दिवसभरात जेवणाच्या वेळेला हिरवा, पौष्टिक चारा खातात की गोबर भाकरी? त्यांची बुद्धी पाहता त्यांच्या गोपुत्र असण्याबद्दल शंका घेता येत नाही. काय सांगावं, सकाळी सकाळी सहानुभूतीपूर्वक लिटर दोन लिटर दूधही देत असतील.
……………………………………………………
४. एका प्रस्तावित योजनेनुसार आता पाकिस्तान चीनसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी गाढवांचा वापर करणार आहे. पाकिस्तानी गाढवं चीनला विकण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. या योजनेमुळे पाकिस्तानला चांगलाच फायदा होणार आहे. गाढवांच्या कातडीचा चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या कातडीपासून मिळणाऱ्या जिलेटिनचा वापर अनेक महागड्या औषधांच्या निर्मितीसाठी केला जातो.
भारतानेही असं पाऊल उचलायला हरकत नाही. पाकिस्तानापेक्षा निश्चितच अधिक संख्येने आणि गाढवपणात अधिक मातब्बर अशी गाढवं आपल्याकडे सापडतील. शिवाय, त्यांचा आणि गायींचा वंश सेम असला, तरी त्यांच्याभोवती पावित्र्याचं वलय वगैरे नाही.
……………………………………………………
५. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या ‘अम्मा कॅन्टीन’च्या धर्तीवर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं सरकारही गरिबांसाठी ‘अन्नपूर्णा कॅन्टीन’ सुरू करणार आहेत. राज्यातील गरीब, मजूर, रिक्षाचालक, कमी वेतन असणाऱ्या नोकरदार वर्गासाठी या योजनेअंतर्गत तीन रुपयांत नाश्ता आणि पाच रुपयांत जेवण दिले जाणार आहे.
आता देशातल्या प्राप्तिकरदात्यांचे तमाम स्वघोषित प्रतिनिधी वाळूत चोची खुपसून निपचित पडून राहिले असतील. त्यांच्या प्राप्तिकरातून देश चालतो, अशी त्यांची गोड गैरसमजूत असते. त्यामुळे ते ठराविक कल्याणकारी योजनांवर ‘अपव्यय अपव्यय’ म्हणून ओरडत असतात. दक्षिण भारतात जयललिता छाप पुढाऱ्यांनी स्वस्त अम्मा कँटीन आणलं होतं. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकऱ्यांच्या आग्रहाने एक रुपयात झुणकाभाकर देण्याचा खेळ खेळून झाला. आता उत्तर प्रदेशात तोच स्वस्त लोकप्रियतेचा महागडा मार्ग अवलंबला गेला, तरी हा वर्ग चिडीचूप्प राहील किंवा या योजनेची क्रांतदर्शी म्हणून भलामण करून दाखवील.
……………………………………………………
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment