अजूनकाही
ज्येष्ठ पत्रकार आ. श्री. केतकर यांची ‘अग्रिनप्रलय’ ही पहिलीवहिली कादंबरी नुकतीच कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. तिला केतकर यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
काही घटना आपल्याला हादरवून टाकतात. विसरू म्हटलं तरी विसरता येत नाहीत. कितीही करायचे नाही म्हटलं, तरी त्याबाबतचे विचार मनात घोळत राहतात. हे कसं घडलं असेल, त्याला काही कारण असेल का, की हा केवळ क्षणिक उद्रेक असेल असंही वाटतं. पण बारकाईनं विचार करायला लागलं की, जाणवतं कदाचित यामागे काही कारण वा कारस्थानही असू शकेल. मग त्या घटनेच्या संदर्भातल्या बातम्यांकडं आपण बारकाईनं बघू लागतो. त्याबाबतचे संदर्भ जमा करतो. कोड्याचे एकेक तुकडे जुळून हळूहळू एक चित्र आकार घेऊ लागतं. पण ते स्पष्ट नसतं आणि पूर्णही वाटत नाही. मग आपण पुन्हा सारी सामग्री घेऊन नव्यानं जुळवाजुळव करतो. तरीही चित्रात काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत राहतं. त्यामुळे आपण त्या संदर्भात शोध घेत राहतो.
अचानक काही धागे मिळतात आणि चित्र आणखी स्पष्ट होऊ लागतं. आता तर्कशास्त्राची मदत घेऊन, कल्पनेच्या भराऱ्या न मारता, योग्य मांडणी करत पुढं जायचं आणि चित्र पुरं करायचं, हा एकच मार्ग असतो. पहिल्यापासून घटनाक्रम तपासून त्याची पुन्हा मांडणी करायची. पण आता त्याला तर्काच्या आधारानं केलेल्या योग्य विचाराची जोड असते. वेळ लागतो, पण चित्र अधिक पूर्ण होत असल्याचं जाणवतं. नवा हुरूप येतो. काटेकोरपणा वाढतो आणि अखेरीस चित्र पूर्ण झाल्याचं समाधान लाभतं.
तसंच काहीसं या कादंबरीबाबत झालं. दोन दशकांपूर्वी घडलेल्या त्या घटनेनं सारा देश हादरला होता, आणि त्यानंतर जे काही घडलं, त्यानं अवघा देशच नाही, तर जग अवाक झालं होतं. त्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून जे काही केलं गेलं, त्यानं तर देशाला काळिमा लागला. आणि काही काळातच त्यामागे हात असलेले देशाचे सत्ताधीश झाले, तरी तो आजतागायत पुसला गेलेला नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
उलट तो गेल्या दशकात त्यांच्याच राजवटीत, राज्यकर्त्यांच्या पाठबळानं आणि आपल्यावर कोणतीही कारवाई होणार नाही या विश्वासामुळे. देशात काय घडतंय याची शरम वाटावी, अशी वेळ आपल्यावर वारंवार येत आहे. कारण माणुसकीचा मागमूसही अशा घटनांत नसतो. जे कुणी हे करतात, ते बेभान, लगामच नसल्यानं स्वैर उधळलेले आणि भक्कम पाठिंब्यामुळे ‘कोण आम्हा वठणीवर आणू शकतो, तेच पाहतो’, अशा मग्रूरीत असतात.
लाजेकाजेस्तव किंवा सत्तेपुढे दबून न गेलेल्या आणि त्याची तमा न बाळगणाऱ्या एखाद्या न्यायाधीशानं कर्तव्याला जागून शिक्षा केली, तरी तीमधून आपली लवकर सुटका होईल किंवा केली जाईल, इतकंच नाही, तर सुटका झाल्यावर आपला सत्कार होईल. नंतर कोणतं तरी मोठं पदही मिळेल, हा विश्वास त्यांना असतो. तसे अनेकदा झालं आहे, होत आहे, हे वाचकांना आठवत असेल.
हे सांगायचं कारण म्हणजे अनेक जण तेव्हापासून माझ्याप्रमाणेच अस्वस्थ झाले असतील. हा अस्वस्थपणा कमी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी मी माझा मार्ग शोधला. नाही, हे खरं नाही. हा मार्ग मला अचानक सापडला, असं म्हणावं लागेल. एकदा याच विषयावर विचार करत असताना सवयीनं ते सहज लिहिलं गेलं. आणि मग हा प्रकार आवडत गेला. हे लेखन एकदा वाचावं असं वाटलं. वाचायचं ते त्रयस्थपणं. म्हणजे, हे आपलं लेखन आहे, हे विसरून वाचलं. त्या वेळी हे अगदीच काही फालतू नाही, असं मनात आलं. त्यामुळे विश्वास आला आणि हा प्रकार सुरू ठेवायला हरकत नाही, असं वाटलं.
अर्थातच तो चालू राहिला. पानं वाढू लागली. काय प्रकारं याला आकार द्यायचा याची आकृती मनात नव्हती. तरीही कथानक आपलं आपणच आकार घेत होतं. जाणूनबुजून त्यात ढवळाढवळ करायची गरजच नव्हती आणि तशी इच्छाही नव्हती. वाचलं होतं, ऐकलंही होतं की, अनेकदा कथानकातील पात्रं आपलं भवितव्य आपणच ठरवतात. आधी वाटायचं हे कसं शक्य आहे, पण आता त्याचाच प्रत्यक्ष अनुभव येत होता. कदाचित दीर्घकाळ मनात त्याबाबतच विचार सुरू असल्यानंही असं झालं असेल. झालं ते काहीतरी वेगळंच होतं, पण तरीही चांगलं वाटत होतं. आपण केवळ निमित्तमात्र असणं म्हणजे काय याचा अनुभव येत होता.
हे सारंच आश्चर्यकारक होतं, आणि तरीही हवंहवंसं वाटत होतं, कारण त्यामध्ये थोडा का असेना आपला सहभाग आहे, ही भावना सुखावणारी होती. मुख्य म्हणजे पात्रं त्यांच्या मनाप्रमाणे वागत असली, तरी ती मोकाट सुटून त्यामुळे कथानक भरकटायला नको, ही दक्षता घ्यायला हवी होती. तशी ती जाणीवपूर्वक घेतल्यानं प्रवाहीपणाला बाधा न आणता कथानकात अपेक्षित आटोपशीरपणाही येत होता.
एकंदरीत आता कादंबरी आकार घेऊ लागली. पात्रांची नावं मुद्दामच वेगळी ठेवली. आडनावं वगैरे काही नाही. त्याप्रमाणं कोणत्याही गटाचं नाव कुणाबरोबर जोडता येईल, असं ठेवलं नाही. अर्थात कुणाला त्यातून काही ओळखीचं वाटूही शकतं. पण तसं तर अनेक बाबतींत म्हणजे कथा कादंबऱ्या वाचताना किंवा नाटक सिनेमे पाहताना होऊ शकतं, हे अनेकांच्या अनुभवाचं असेल.
मुळात प्रश्न कथानकात जे काही घडतं, ते खरंच घडतं का याचा आहे. आणि समजा घडवलं गेलं असलं, तर ते कोणत्या पद्धतीनं घडवण्यात आलं असावं, त्याला कुणाची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत-सहाय्य असावं, याचा तर्कशास्त्राच्या आधारे घेण्यात आलेला हा शोध आहे. यासाठी दैनिकं, साप्ताहिकं आणि, नियतकालिकांतील बातम्या, लेख मुलाखती यांचा आधार घेतला आहे.
खास उल्लेख करायचा तो पत्रकार-लेखिका राणा अय्युब यांच्या ‘गुजरात फाइल्स’ या पुस्तकाचा. ते वाचताना अनेक गोष्टींचा उलगडा झाला, अनेक नव्यानं कळल्या आणि त्या पुस्तकाची चर्चा का होऊ दिली गेली नाही, का घाबरूनच ते धोरण प्रसिद्धीमाध्यमांनी स्वीकारलं, याचा अंदाज वाचक करतीलच.
तर सांगायचं म्हणजे या बातम्या, लेख इत्यादीमुळे आपण योग्य प्रकारे जात आहोत, असा विश्वास आला. एकीकडं लिहिणं सुरू होतं. दरम्यानच्या काळात अधूनमधून आणखी बातम्या, लेख येत होते. नवनवी माहिती मिळत होती. त्यातून काही गोष्टी दडपण्याचा प्रयत्न कसा करण्यात आला, हे कळलं आणि त्या विश्वासाला बळकटी आली. तसा प्रयत्न का केला गेला, कुणाला वाचवण्यासाठी करण्यात आला, हे उघड गुपित होतं.
या साऱ्याचा मोठाच उपयोग झाला. आणि त्याचा आधार घेताना कादंबरीतील पात्रांच्या व्यक्तिमत्त्वांनाही आकार येत गेला. आपण योग्य प्रकार पुढं जात आहोत, हा विश्वास आला. कोणतंही कथानक वाचकाची उत्सुकता वाढवणारं आणि त्याला खिळवून ठेवणारं हवं. याबरोबरच त्याला विचार करायला लावणारं. आणि ते तसं होत आहे, हे जाणवत होतं. अखेर एका क्षणी लेखन पूर्ण झालंय असं वाटलं. परंतु पुन्हा नजरेखालून घातल्यावर मात्र ते अपूर्ण, काहीतरी राहून गेल्यासारखं वाटलं.
सुरुवातीलाच ‘उपोदघात’ लिहिला होता, तो वाचकांना आपण पुढं काय वाचणार आहोत, याची उत्कंठा वाटावी म्हणून. अर्थातच ‘उपसंहार’ यायला हवा, हे साहजिकच होतं. आधीचा मजकूर वाचताना तोही अचानकच सुचला. आणि तो लिहून झाल्यानंतर आता कादंबरी खऱ्या अर्थानं पूर्ण झाली, असं वाटलं.
काय करता येईल, हे पाहण्यासाठी कादंबरी नव्यानं पुन्हा वाचली, त्या वेळी काही ठिकाणी भर घालण्यास वाव आहे, असं जाणवलं. आणि ही भर मूळ लेखनाला जोड दिल्यासारखी वाटता कामा नये, हे महत्त्वाचं होतं. हे काम आव्हानात्मक होतं. तरीही ते जमत गेलं. त्यामुळे कथानकाला जोड दिल्यासारखं न वाटता ते एकसंधच राहिलं.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
असो. तर देशात आज काय चाललं आहे, याबाबत भिन्न मतं आहेत. तीही दोन टोकाची. कुणी म्हणतात, हा ‘अमृतकाल’ आहे, तर काहींना हा ‘जहरकाल’ वाटतोय. याबाबत अर्थातच वाद होणार, पण देशातील एकूण परिस्थितीचा वास्तव विचार केला, तर काय आढळतं.
विकास होतोय हे खरंच आहे. पण कोणाचा, हा प्रश्न विचारायला मात्र सामान्य जनता घाबरते. कारण वाढत चाललेली बेरोजगारी, इंधन, जीवनोपयोगी वस्तू, प्रवास या साऱ्यांमध्ये भाववाढ सुरूच आहे. त्याबरोबरच काही हातावर मोजता येण्याजोग्या धनाढ्यांची संपत्ती अनेक पटींनी वाढलेली दिसतीय. त्यामुळे येणारा दिवस कसा काढायचा, याचीच प्रत्येकाला काळजी आहे. सेन्सेक्स, निफ्टी नवनवे उच्चांक गाठत आहेत. पण त्याचा फायदा ठरावीक लोकांनाच मिळणार. आणि ते कोसळले तर तेच लोक ‘हाय हाय’ करत हलकल्ल्लोळ माजवणार. त्यांना दिलासा देण्यासाठी अर्थातच हे सरकार मोठी मदत करणार. जशी त्यांची लाखो कोटींची कर्ज एकदम माफ करून टाकली. पण मामुली रकमेसाठी मात्र सामान्यांना प्रचंड त्रास देण्यात येतो.
या साऱ्यामुळे हे सरकार कुणाचं या प्रश्नाचं उत्तर सहजच मिळतं. पण अनेकांना अद्याप याचं काही वाटत नाही. अंधभक्त आणि त्यांची ही भक्ती आश्चर्यकारक वाटते. कदाचित असं का, याचंही उत्तर शोधावं असं वाचकांना वाटेल.
‘अग्लिनप्रलय’ - आ. श्री. केतकर | तेजस प्रकाशन, कोल्हापूर | पाने - २०० | मूल्य - ३०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment