बऱ्याच काळानंतर मराठीत ‘नवा नायक’ अवतरलाय... हीज नेम इज अगस्ती… ओन्ली अगस्ती!...
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
रवि आमले
  • ‘अगस्ती’ मालिकेतील तिन्ही पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Sat , 20 January 2024
  • ग्रंथनामा शिफारस अगस्ती Agasti श्रीकांत बोजेवार Shirkant Bojevar

नेम इज अगस्ती… ओन्ली अगस्ती!

म्हणजे तो असे जेम्स बॉण्ड यांच्या शैलीत म्हणत नाही, परंतु तो आहे बॉण्डच. मराठीतला आणि मराठीही. फरक एकच, की जेम्स बॉण्ड हे ‘हिज मॅजेस्टिज सर्व्हिस’मध्ये होते. एमआय-सिक्सचे गुप्तचर होते ते. अगस्ती कोणाचाही चाकर नाही. तो डिटेक्टिव्ह आहे, खासगी गुप्तहेर आहे. तरणाबांड अन् रुबाबदार असा की, ज्याच्या दर्शनमात्रे खुबसुरत बालांचा कलिजा खलास व्हावा. त्याचे नाव अगस्ती. पण नावावर जायचे नसते. तसले काही ‘ऋषित्व’ त्यात नाही. त्याला मादक मदालसांचे मुळीच वावडे नाही. जीमट्रेनर मल्लिका ही त्याची निकटची मैत्रीण. त्याच्यावर ‘एफ यू’ वगैरे शिवीगाळ करत वैतागण्याचा अधिकार आहे तिला. पण त्याही पार त्यांचे नाते जाते. म्हणजे त्याच्या अपार्टमेन्टची एक चावी तिच्याकडेच असते. तिने रात्रीच्या वेळी कधीही यावे. आणि मग -

‘त्याच्या डेरेक रोझच्या कमरपट्टीतून डाव्या हाताची दोन बोटं आत खुपसत मल्लिकाने आपला दुसरा तळहात, व्यायामामुळे कणखर झालेल्या आणि सूतभरही पुढे न आलेल्या त्याच्या पोटावर दाबत अगस्तीला बेडवर ढकललं…’ - असे घडावे.

चित्रपटांत कंटिन्यूटी नावाचा प्रकार असतो. अगस्तीच्या कथांत मल्लिका हा त्या कंटिन्यूटीचा भाग आहे. एरवी मग जेम्स बॉण्ड यांना हर नव्या चित्रपटात एक नवी मदालसा भेटते, त्याचप्रमाणे अगस्तीलाही तशा तलम अग्नीच्या ज्वाला भेटतच राहतात. तो धगीने तो पाघळतच राहतो. उदाहरणार्थ, ती २०० वर्षांपूर्वीच्या अंगठीच्या प्रकरणात भेटलेली शगुफ्ता. खास मुसलमानी अत्तरी सौंदर्य ते. -

‘वय साधारण पस्तिशीतलं असावं. नितळ, गव्हाळ वर्ण आणि त्यावर काळ्या रंगाची सलवार, कुर्ता. कुर्त्याच्या गळ्याभोवती नाजूक सुवर्णनक्षी, पायांत चांदीचे पैंजण, कानांत लोंबते झुमके, जणू आत्ताच पान खाल्लं असावं असे लालचुटूक ओळ, डाव्या नाकपुडीचा फुगवटा जिथे संपतो तिथे नाजूकसा हिरवट हिरा लकाकत होता आणि कमरेच्या खालीपर्यंत पोचलेल्या, मोकळ्या सोडलेल्या रेशमी केसांच्या लडी. हातात आयफोनचा लेटेस्ट अवतार.’

तर ही अशी शगुफ्ता असो की, ‘न्यूड पेंटिंग’ प्रकरणातील चव्वेचाळीशीतील विवाहित इला, त्यांनी सोपवलेले गूढ अगस्तीने उलगडल्यानंतर त्याही त्याच्या मिठीत उलगडणार. हे ओघाने आलेच.

तर असा हा अगस्ती. एवढे एक ‘काम’ सोडले की, मग आपल्या अर्नाळकरी ‘झुंजार’ची आठवण करून देणारा. आणि अर्थातच आधुनिक. तो कथ्था कलरच्या देखण्या अन् विविध करामतीयुक्त अशा इंडियन रोडमास्टर बाइकवरून (एक्स शोरूम किंमत अक्षरी चव्वेचाळीस ते सत्तेचाळीस लाख रुपये फक्त!) मुंबईभर फिरत असतो. त्याच्या कानाच्या बाळीत छुपा कॅमेरा असतो. रात्री आलिशान बेडवर, डेरेक रोझची इनरवेअर (किंमत साधारणतः पाच ते पंधरा हजार.) घालून निजता निजता तो दिवसभरातील कामाच्या नोट्स आयपॅडला डिक्टेट करत असतो. एकदम टेकसॅव्ही असतो तो. पण म्हणून आजच्या त्या आयटीकुलींप्रमाणे काही तो सकाळी उठून बर्गरबिर्गर हादडत नसतो.

झुंजारचा सेवक होता नेताजी. तो प्रसंगी हाणामाऱ्याही करायचा. आदित्यचा सेवक मात्र त्यातला नाही. तो आदित्यचे घर आणि डॅक नावाची मांजर सांभाळतो. त्याचे नाव सुंदरसिंग. तो सक्काळी सक्काळी अजिंक्यला, छान मोड आलेल्या मूगाच्या धिरड्याचे अन् मल्टिग्रेन ब्रेडचे सँडविच करून देतो. तसा अजिंक्य मुंबईभर फिरत असल्याने त्याने मुंबैय्या खाद्यसंस्कृतीशीही छान जुळवून घेतलेले आहे. तो अब्दुलच्या टपरीवरची मुगाची दालफ्राय आणि तेल लावून शेकलेली गव्हाची रोटी विथ शहाळ्याचे पाणी जेवढ्या तब्येतीने हाणतो, बेस्टच्या बसस्टॉपवर बसून फ्रँकी जेवढ्या सहजतेने खातो, तेवढ्याच सहजतेने तो ‘ताज’च्या डिलक्स स्वीटमधली ‘तस्मानियन रेन’ या मिनरल वॉटरची बाटलीही (किंमत सुमारे साडेचारशे-पाचशे फक्त.) तोंडास लावतो. कुठलेही अन्न हे त्याच्यासाठी ‘ब्रह्म’च असते. 

जेम्स बॉण्ड वा झुंजारादी नायकांप्रमाणे असणारा हा अगस्ती त्यांच्याहून आणखी एका बाबतीत प्रचंडच वेगळा आहे. त्याच्या पूर्वसूरींप्रमाणेच तो अष्टावधानी आहे, हुशार आहे. किंचित शेरलॉक होम्सही आहे. त्याची स्मरणशक्ती अफलातून आहे आणि तर्कबुद्धीला तोड नाही. तो हसत हसत संकटे अंगावर घेतो आणि त्यातून हसत खेळत सुटतो. तो कूट समस्यांचा हा हा म्हणता कूट पाडतो. प्रसंगी गुंडांना वगैरे कुटतोही. रात्री घरी आल्यावर तो छान मद्याचा आस्वाद घेतो. आंग्लगाणी ऐकत पडतो. टीव्ही पाहतो. हे सगळे आहेच. पण आपला हा नायक वाचतोही. तो मुराकामी वाचतो, श्रीलाल शुक्ल वाचतो, किरण येले वाचतो. हृषिकेश गुप्तेची नवी कादंबरी त्याला माहीत असते. त्याच्या घरात चार कपाटे भरून पुस्तके असतात. तर येथे तो इतरांहून वेगळा ठरतो. त्याच्यात हा गुण नक्कीच त्याच्या जन्मदात्याकडून आला असावा…

त्यांचे नाव आहे श्रीकांत बोजेवार. लेखक, कवी, पटकथाकार आणि ज्येष्ठ पत्रकार.

बऱ्याच काळानंतर मराठीत अशा प्रकारचा एक नायक त्यांनी आणला आहे. रोहन प्रकाशनने प्रसिद्ध केलेला ‘अगस्ती इन ॲक्शन’ हा त्यांच्या डिटेक्टिव्ह कथांचा संच सध्या नावाजला जातो आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मराठीत तशा रहस्यकथा, साहसकथा, डिटेक्टिव्ह कथा भरपूर. आपल्याकडे पहिली रहस्यकादंबरी प्रसिद्ध झाली त्याला आता १३७ वर्षे झाली आहेत. तो काळ पाहा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होऊन अवघे एक वर्ष झाले होते. पुण्यात नुकतेच फर्गसन महाविद्यालय सुरू झाले होते. अजून तिकडे इंग्लंडमध्ये सर ऑर्थर कॉनन डॉयल यांच्या शेरलॉक होम्सचा जन्म व्हायचा होता. आणखी एक वर्षाने त्याचा पाळणा हलणार होता. त्या सालात, सन १८८६ रोजी आपल्याकडे ‘वेशधारी पंजाबी’ ही पहिली रहस्यकादंबरी प्रसिद्ध झाली आणि या वाङ्मय प्रकाराने वाचकांना मोहविले. कुठल्याशा फ्रेंच रहस्यकथेवर आधारलेली हरि नारायण आपटेंची ‘चाणाक्षपणाचा कळस’ ही कादंबरी आली १९२६मध्ये.

रहस्यकथा, चातुर्यकथा यांच्या बहराचा काळ सुरू झाला, तो मात्र दोन महायुद्धांच्या मधल्या काळात. १९५०नंतरची दोन दशके हा त्यांचा महाराष्ट्रातील सुवर्णकाळ. त्यावरची लखलखीत नाममुद्रा होती ती बाबुराव अर्नाळकरांची. त्यांना कोणी साहित्यिक मानो न मानो, त्यांनी लिहिले भरपूर. एखाद्यास ऐकून मुर्च्छा यावी असा आकडा आहे तो. तब्बल १४८० रहस्यकादंबऱ्या.

एस. एम. काशीकर हे त्यांचे समकालीन. त्यांच्यानंतर आली तो गुरूनाथ नाईक, दिवाकर नेमाडे, सुभाष शहा आदींची फौज. (पंकज भोसले यांनी हे लेखक आणि त्यांच्या कथा-कादंबऱ्या यांचा इतिहास लिहून मराठीत एक मोठे काम केले आहे. त्यांचे त्यावरचे पुस्तक लवकरच येत आहे.) तर या अशा प्रकारच्या कादंबऱ्यांना लाभलेली लोकप्रियता, त्यांचा खप हे सारेच विस्मयकारक असले, तरी समीक्षकांच्या लेखी मात्र हा सारा रंजनपर ‘लगदा’च. तसे का, हा वेगळा वादाचा विषय.

येथे एकच बाब लक्षात घ्यायला हवी, की प्रकाशकाच्या मागणीनुसार, जिलेबी पाडावी तशा प्रकारे महिन्याला चार चार दीर्घकथा पाडल्यानंतर त्यास उत्तम साहित्य म्हटले जात नाही, म्हणून अश्रू ढाळणे योग्य नाही, याचे भान त्या लेखकांना होते. ते वाचकांनीही ठेवायला हवे. याचा अर्थ यात काहीच उत्तम नव्हते असे नव्हे. ते होतेच. माधव मनोहरांनी ‘बाबुराव अर्नाळकर हे एडगर वॉलेसपेक्षा श्रेष्ठ कथाकार आहेत,’ अशी ग्वाही दिलेली आहे. हे एडगर वॉलेस आज इंग्रजीतील प्रतिष्ठित कादंबरीकार मानले जातात. तर अशा लेखकांच्या काही कादंबऱ्या तरल्यात. बाकीची पुस्तके कालौघात रद्दीच्या दुकानांतूनही गायब झाली.

हे मात्र कोणीही मान्य करील की, या रहस्यकादंबऱ्यांनी वाचकांच्या काही पिढ्यांना निश्चितच रमविले. अनेकांना त्यांनी वाचनाची गोडी लावली, साहित्याकडे वळवले. अर्नाळकरांचे नाव त्यात कानाला हात लावून घ्यावे लागेल. त्यांच्या झुंजार, धनंजय, काळा पहाड या कादंबरी-मालांनी वाचकांना वेड लावले असे म्हटले जाते, तेव्हा तेथे ‘वेड’ हा शब्द शब्दशः वेड या अर्थाने घ्यायचा असतो, इतकी ‘क्रेझ’ होती त्यांची त्याकाळी.

शेरलॉक होम्सच्या लंडनमधील ‘२२१बी बेकर स्ट्रीट’ या पत्त्यावर लोक पत्र पाठवत असत. हे ‘भाग्य’ मराठीत अर्नाळकरांच्या नायकांनी कमावले होते. मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील ‘झुंजार महल’ किंवा ‘धनंजय’चे गावदेवीतील घर शोधत तरूण मुले तेव्हा रात्रीच्या वेळी फिरत असत. हे वेड पुढच्या काही पिढ्यांपर्यंत कायम राहिले. कदाचित आज पन्नाशीत असलेली पिढी ही त्या कादंबरीॲडिक्टांची अखेरची पिढी असावी. हे असे का झाले, हा मोठाच प्रश्न आहे. म्हणजे एका विशिष्ट अशा प्रकारच्या रहस्यकथांचे पिक येथे मोठ्या प्रमाणावर तरारते. आणि मग हळूहळू ते रान बरड होत जाते.

ही अशी परिस्थिती का यावी? याची कारणे विविध. त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे कागदटंचाई व परिणामी वाढलेले कागदाचे भाव. त्यामुळे अशा कादंबऱ्या मोठ्या प्रमाणावर प्रकाशित करणे हे परवडेनासे झाले. काही प्रकाशक त्यात बुडाले. दुसरे कारण - काळ. तो आता बदलला होता. तशात एकीकडे सुहास शिरवळकर वेस्टर्नपटाच्या धर्तीवर इकडे दारा वगैरे पात्रे आणत होते. त्यांची कथनशैली हाच काय तो त्या कादंबऱ्यांतील वाचकांना धरून ठेवणारा भाग होता.

चंद्रकांत काकोडकरांचा रामराव राजे हा वकिल-डिटेक्टिव्ह सहसा ‘काकोडकर’मधूनच भेटत असे. गुरुनाथ नाईकांचे कादंबऱ्यांचे पाडकाम सुरू असे. तेथेही अनेकदा अंगापेक्षा बोंगा मोठा अशा स्वरूपाची रहस्ये आणि त्यांच्या नायकांची बाळबोध धाडसे हे असे सारे एकीकडे होते आणि दुसरीकडे आता निमशहरांतील पदपथांपर्यंत इंग्रजीतील जेम्स हेडली चेज ते फ्रेंडरिक फोरसिथ, रॉबर्ट लडलम आदी मंडळी भेटू लागली होती. वाचकांसमोरचे जग विस्तारत चालले होते.

मराठीतील नव्या रहस्यकथाकारांच्या विश्वाला मात्र त्यांच्या मध्यमवर्गीय आकलनाची मर्यादा होती. नायक परदेशात गेला वा खलनायक चिनी वगैरे असला, म्हणून काही कथेला आंतरराष्ट्रीय परिणाम येत नसतो हे समजण्याएवढा येथील वाचक विकसित झाला होता. आजही आपल्या मराठी सुसंस्कृत घरांत ‘मृत्यूंजय’, ‘श्रीमान योगी’, ‘छावा’, ‘ययाती’ आणि गेला बाजार ‘कोसला’ ही ‘मस्ट वाचने’ मानली जातात. तद्वत नव्वदच्या दशकात पुण्या-मुंबईत शिकणाऱ्या महाविद्यालयीन पोरांना ‘पॅपिलॉन’, ‘कार्पेटबॅगर्स’, ‘गॉडफादर’ हे वाचले नसेल, तर होस्टेलांतून रस्टिकेट करत असावेत. तर अशा कादंबऱ्यांमुळे वाचकांची दृष्टीही विकसित झाली होती. अशा विविध बाबींच्या एकत्रित परिणामातून तो पूर ओसरला. आणि आता एकदम एकविसाव्या शतकात श्रीकांत बोजेवारांचा ‘अगस्ती’ आला. हे कसे काय?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अलीकडेच ठाण्यात एका खासगी कार्यक्रमात त्यांची भेट झाली. गप्पांच्या ओघात अगस्तीचा विषय आलाच. त्यांना विचारले, ‘एकदम हा जॉनर?’

त्यांनी सांगितले की, ते डिटेक्टिव्ह कथांचे पहिल्यापासून फॅन. शाळेत, महाविद्यालयात असताना त्यांनी ही अशी बरीच पुस्तके वाचली होती. खासकरून ती वेदप्रकाश शर्मा आदींची हिंदी पॉकेटबुक्स. मराठीत बाबुराव अर्नाळकर, गुरूनाथ नाईक. त्या काळात काय निघायची ती पुस्तके. हल्ली तसे काही कोणी लिहितच नाही. पण आजही लोकांना हा जॉनर आवडतो आहे.

हे खरेच आहे. आजही अर्नाळकरादी लेखकांच्या आठवणींनी ‘सा रम्या नगरी’टाइपचे उसासे टाकताना दिसतात. हा खचितच नॉस्ताल्जियाचा - स्मरणरंजनाचा - भाग. आपल्या तारुण्यातील तेव्हाच्या त्या मौजेचा प्रत्यय पुन्हा घेण्याची ओढ असावी त्यामागे. हे झाले मराठी साहित्याबाबत. एरवी हा जॉनर आपल्यासोबत सतत होताच. तो पडद्यावरून येत होता. बॉण्ड तर होताच. पण जेसन बोर्न होता. इथन हंट होता. जॅक रिचरही वेगळा नव्हता. ‘फॅमिली मॅन’मधला श्रीकांत हा तर आपलाच. ते सारे हेर, असे म्हणावे, तर हिंदी-इंग्रजीतून उत्तमोत्तम रहस्यपटही येत होते. तेव्हा रहस्य, त्याची उकल, त्यातील ॲक्शन हे सारे आजही आवडीने चाखले जात होतेच. त्याला मरण नाही.   

तर याबाबत श्रीकांत बोजेवार एकदा रोहन प्रकाशनच्या चंपानेरकरांशी गप्पा मारत होते. बोलता बोलता म्हणाले की, आजही असा नायक आला तर लोकांना तो निश्चितच आवडेल. पण त्याचा बाज आजचा हवा. आजचा म्हणजे कसा? तर त्याचे रुप, त्याचा प्रताप, त्याचा साक्षेप, त्याचे बोलणे, त्याचे चालणे हे आजच्या अत्याधुनिक, तंत्रस्नेही जगाशी मेळ साधणारे पाहिजे… अगदी मनापासून तळमळीने बोलत होते ते. तर ते ऐकून प्रकाशक म्हणाले, अहो, तुम्ही एवढं बोलता आहात. तुमच्या मनात तो नायक, त्या कथा असा सारा नकाशा तयार आहे. तर तुम्हीच का नाही तशा कथा लिहित?

बोजेवार यांनी हो ना करत होकार दिला आणि त्यातून मराठीत हा नवा नायक अवतरला. अगस्तीकथा आकाराला आल्या. ‘हरवलेलं दीड वर्ष’, ‘अंगठी १८२०’ आणि ‘न्यूड पेंटिंग @ १९’ या त्या तीन रहस्यकादंबरीका.

काही तरी विपरित घडते. वरवर साधी वाटणारी ती गोष्ट. पण खोलवर पाहणाऱ्यास दिसते, की त्यात काही तरी गूढ आहे. हा पाहणारा असतो रहस्यकथांचा नायक. तो त्या गूढाचा पाठलाग करू लागतो. त्याला जाणवते, की त्या रहस्याचेही अनेक पदर आहेत. तो एकेकाचा वेध घेत पुढे सरकतो आणि अंतिम तथ्यापर्यंत येतो. रहस्य उकलतो. खलांना शिक्षा करतो. आणि तो रहस्यवेध पाहून आपण वाचक मात्र अवाक् होतो. नायकाच्या बुद्धीचातुर्याने, धाडसाने स्तिमीत होतो. खलनायकांच्या कारस्थानी मेंदूतून जन्मलेली षड्‌यंत्रे, त्यातील कुटीलतेने हबकून जातो. आणि त्यांचे पारिपत्य झाले की आपलीच सुटका झाल्यासारखे वाटून संतोषतो. साधारणतः याच रूळावरून सहस्यकथानकाची गाडी जात असते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

एकंदर वृत्तपत्रीय बातमीप्रमाणेच रहस्यकथांमध्येही काय, कोण, कधी, कुठे, का आणि कसे या षट्‌ क-कारांना महत्त्व असते, पण त्यातही उत्सुकतेचा अधिका भाग असतो तो ‘कसे’ याबद्दलचा. या ठिकाणी बोजेवार यांच्या कादंबऱ्या त्यांच्या पूर्वसुरींहून काही अंगुळे तरी नक्कीच उंच जातात. त्यातील रहस्य हळुहळू समोर येते. वाचक त्यात गुंतून जातो. त्या रहस्याचा घट्ट पीळ तयार होत जातो आणि मग सुरू होतो त्याच्या भेदाचा प्रवास. त्यात अगस्तीचे बुद्धीकौशल्य पणाला लागते.

तर हा सारा प्रवासच पाहण्या-वाचण्यासारखा आहे. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे येथे रहस्याचा जो पीळ तयार करण्यात आला आहे, तो कोठेही लेचापेचा वाटत नाही. लॉजिक नावाची एक गोष्ट असते आणि ती अशा लेखनात तर नीटच पाळायची असते. अन्यथा रहस्यकथांचा फियास्को होतो. श्रीकांत बोजेवार यांनी घटना, घडामोडी, प्रसंग, व्यक्तिरेखा यांची मांडणी करताना ते सारेच तर्काच्या कसोटीवर घासून घेतल्याचे दिसते. त्यात कोठेही वाचकाच्या मनी, लेखकराव आपल्याला निर्बुद्ध समजतात की काय, अशी मस्तकी तिडिक आणणारी भावना निर्माण होत नाही.

भक्कम प्लॉट असेल, तर्कशुद्ध रहस्य असेल, तरच त्याच्या उलगड्यात मौज. श्रीकांत बोजेवार यांनी ते येथे व्यवस्थित साधले आहे. ते ‘कसे’ याची वर्णने करत गेल्यास रहस्यफोडीचा गुन्हा घडायचा. तेव्हा ते प्रत्यक्षातच वाचलेले बरे. ते नक्कीच आनंददायी ठरेल. हां, त्यासाठी एकच अट. ती आपली समीक्षकी दृष्टी जरा बाजूला ठेवावी. 

अगस्ती : ‘हरवलेलं दीड वर्ष’, ‘अंगठी १८२०’ आणि ‘न्यूड पेंटिंग @ १९’ - श्रीकांत बोजेवार

रोहन प्रकाशन, पुणे | पाने - ३२० | मूल्य - ३६० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......