वेळ अजूनही गेलेली नाही. ‘मागोवा’तल्या पिढीची स्वप्ने नव्या पिढीकडे सुपूर्द करून परिवर्तनाची सुरुवात जरूर करता येईल...
पडघम - राज्यकारण
जयदेव डोळे
  • ‘कॉम्रेड शिराळकर : माणूसपणाच्या वाटेवरचा प्रवासी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि त्याच्या प्रकाशन समारंभाचे एक छायाचित्र
  • Tue , 16 January 2024
  • पडघम राज्यकारण मागोवा Magova तात्पर्य Tatparya सुधीर बेडेकर Sudhir Bedekar कम्युनिस्ट Communist कॉम्रेड शिराळकर : माणूसपणाच्या वाटेवरचा प्रवासी Comrade Shiralkar - Manuspanachya Vatevarcha Pravasi

सत्तरी ओलांडलेले तर सारेच समोर मंचावर होते. ८४ वर्षांचा एकमेव होता. स्त्री एकटीच होती. दुसरी तेवढी वयस्कर नव्हती. या सर्वांनी कधी काळी म्हणजे ५० वर्षांपूर्वी ‘मागोवा’ नावाचे एक संघटन उभे केले होते. साम्यवादाच्या जवळचे, पण साम्यवादी पक्षांशी नाते न ठेवणारे ते होते. सुधीर बेडेकर या संघटनाचा तत्त्वचिंतक. ‘तात्पर्य’ नावाचे मासिक या मागोवा गटाचे मुखपत्र. ते मुखपत्रासारखे असूनही त्यात डाव्या व पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांना, लेखकांना, चिंतकांना, कवींना छान जागा मिळे.

तेव्हाच्या नियतकालिकांत अन् दैनिकांच्या रविवार पुरवण्यांत जी वैचारिक चर्चा अथवा वाद नसत, त्या साऱ्यांना ‘तात्पर्य’ने सामावून घेतले. ‘साधना’, ‘माणूस’, ‘मनोहर’सारखी साप्ताहिके त्या काळी तरुणांच्या डोक्याला काही खुराक द्यायचा प्रयत्न करत. परंतु त्याला ठाम, ठोस व ठळक राजकीय तत्त्वज्ञानाचा आधार नसे. तो ‘मागोवा’ गटाच्या या मासिक नियतकालिकाने पुरवला.

म्हणजे एका अर्थाने ते पक्षीय चौकटीऐवजी स्वतंत्र पण मार्क्सवादाचा आधार असणारे विषय हाताळे. त्याचा परिणाम असा झाला की, विषय वा मुद्दा कोणताही असो, त्याचा वाद-प्रतिवाद विशिष्ट टप्प्याने साधार, सतर्क अन् वैश्विक परिप्रेक्ष्यात करायची सवय म्हणा किंवा पद्धती म्हणा, अनेक तरुण-तरुणींना सापडली.

या ‘मागोवा’ गटातल्या मार्क्सवादी तरुणांनी तेव्हाच्या धुळे जिल्ह्यातले शहादा हे आदिवासीबहुल भागातले गाव निवडले आणि तिथे आदिवासी श्रमिकांचे शोषण करणारे सर्व पैलू हाताळायचे ठरवले. त्यासाठी ‘श्रमिक संघटना’ स्थापन केली. पूर्णवेळ कार्यकर्ते तयार करून, त्या भागातल्या आदिवासींच्या भल्यासाठी आणि समाजवादी समाजाच्या स्थापनेसाठी तिथे मोर्चे, सत्याग्रह, प्रचार, जागृती अशी एक चळवळ सुरू केली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बडे जमीनदार, त्यांची दहशत, त्यांचे सर्व सरकारी संस्थांवर असलेले वर्चस्व, कायद्यांची उणीव आणि मध्यमवर्ग व अन्य कष्टकरी वर्गाचे या शोषणाकडे लक्ष वेधणे, अशा अनेक समस्यांची सोडवणूक करणे चालू केले.

आता ‘श्रमिक संघटना’ नाही. तिचा मुख्य चेहरा कुमार शिराळ‌कर, तुळसी परब हयात नाहीत. शिराळकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेले. त्यांच्या स्मृत्यर्थ याच म्हणजे सात जानेवारीच्या मेळाव्यात एक हस्तलिखित पुस्तक प्रकाशित करण्यात आले. वाहरू सोनवणे, दीनानाथ मनोहर, भारत पाटणकर, जयसिंग माळी, नत्थुभाऊ, अनंत फडके, छाया दातार, अशोक राजवाडे, श्याम रंजनकर, दत्ता देसाई, विनया मालती माधव, शांताराम पंदेरे असे शिराळकरांचे सोबती, मित्र आणि सहकारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जमले होते.

हा स्मृतिसोहळा औरंगाबादेत पार पडला. उमाकांत राठोड, सुनीता लोंढे, रमेश जोशी, लोकेश कांबळे या ‘एसएफआय’शी संबंधित कार्यकर्त्यांनी या सर्वांना एकत्र आणले आणि कुमारवरचे लक्षवेधक लेखांचे एक पुस्तकही तयार केले.

असे डाव्या चळवळीत प्रथमच घडले असावे की, तरुण कार्यकर्त्यांनी बुजुर्ग नेत्या-कार्यकर्त्यांचे छोटेखानी संमेलन भरवून त्यांचे अनुभव ऐकून घेतले. काही मार्गदर्शनही करवून घेतले आणि माझ्यासारख्या अनेकांना या बुजुर्ग बंडखोरांचा सहवास पुन्हा घडवला. भावना, व्यक्तिवाद, व्यक्तीस्तोम, स्मरणरंजन अशा गोष्टी डाव्या चळवळीत वर्ज्य असतात. परंतु इतिहास समजावून घ्यायचा असल्याने याही गोष्टी थोड्याफार उगवणार असतात.

साधारणपणे १९६७पासून जगभरच तरुण पिढीच्या बंडाच्या आणि व्यवस्थाविरोधाच्या अत्यंत प्रेरणादायी अशा घडामोडी घडत गेल्या. सॉर्बोन विद्यापीठ, पॅरिस, बीटल्स, व्हिएतनाम, नागरी हक्क चळवळीतली अमेरिका, नक्षलवाद, युवक क्रांती दल, संयुक्त विधायक दलाची राज्य सरकारे, गुजरात सरकारमधील भ्रष्टाचार, सत्यजित राय, मृणाल सेन, ऋत्विक घटक आदींचे बंगाली चित्रपट, शंकर, गंगोपाध्याय आदींचे साहित्य, महाराष्ट्रातली लघुनियतकालिके, दलित पँथर, मराठवाड्यातले विकास व शिष्यवृत्तीवाढ आंदोलन, छात्र युवा संघर्ष वाहिनीची जेपींकडून स्थापना, मग आणीबाणी, जनता पक्ष… आदी नवनव्या उन्मेषांची मालिकाच सुरू झाली.

मार्क्सवादी तत्त्वज्ञानातही उलथापालथ झाली. ‘न्यू लेफ्ट’चा जन्म झाला. सात्रर्, फुको, बाँद्रिलार्द, रेजिस देब्रे, फ्रांझ फॅनन, कॅस्ट्रो, गव्हेरा यांचे राजकीय विचार पसरू लागले. मराठीत मालती बेडेकर, छाया दातार, कमल देसाई यांचे स्त्रीमुक्तीवरचे लेखन बहरले. दलित व उपेक्षित समूहांचे साहित्य मध्यमवर्गाला हादरवू लागले.

अशा घटनांच्या आगेमागेच आयआयटी, मेडिकल, इंजीनिअरिंग यांचे शिक्षण घेणारी शहरी, सवर्ण-मध्यमवर्गीय घरातले तरुण-तरुणी चौकटीबाहेरचे जग पाहायला अन् ते बदलायला सरसावले. काही जण थेट सशस्त्र क्रांती करायला आणि वर्गशत्रूंचा नि:पात करायला जंगलात दाखल झाले; तर ज्यांना हिंसा नामंजूर होती, ते गरीब, आदिवासी, वंचित समूहांच्या उन्नतीसाठी ग्रामीण भागात जात राहिले. शेतमजूर व अन्य कष्टकरी वर्ग यांचे संघटन आणि त्यातून श्रमिकांचा एक प्रखर राजकीय दबाव तयार करण्याच्या कामी ती स्वत:स जुंपून घेऊ लागले. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, राजकीय भान, सत्तेला सहभाग, असा सर्वस्पर्शी कार्यक्रम त्यांच्या डोक्यात घोळत होता.

या बुजुर्गांकडून एक बाब समजली. ती म्हणजे बाबा आमटे यांनी आयोजित केलेल्या श्रमसंस्कार शिबिरांनी आणि आनंदवन, भामरागड येथील त्यांच्या कामाने या तरुणांना काहीतरी वेगळे करायची प्रेरणा मिळाली. कुमार, दीनानाथ, विक्रम कान्हेरे यांची गाठ तिथेच पडली. मैत्री, सोबत व राजकीय संघटन त्यांनी पुढे खूप वाढवत नेले. बाबा मूळचे समाजवादी, पण त्यांनी ना वर्गसंघर्ष सुरू केला, ना जातिविध्वंस. कुष्ठरोग्यांचा उपचार, आधार अन् भविष्यकाल बाबा बनले. सोबत त्यांनी युवकांना बंड, क्रांती, प्रस्थापित मूल्यविरोध हेही समजावले. त्यामुळे बाबा महाराष्ट्रातल्या असंख्य परिवर्तनवादी तरुण-तरुणींचे उर्जास्थळ बनले.

सात जानेवारीच्या ‘कॉम्रेड शिराळकर : माणूसपणाच्या वाटेवरचा प्रवासी’ या पुस्तकात मागोवा गटाचा अन् एका डाव्या कार्यकर्त्यांच्या कामाचा उल्लेख काही लेखकांनी जरूर केला. मात्र शब्दमर्यादेत अन् शिराळकरांची स्मृती या दडपणाखाली एक महत्त्वाची गोष्ट झाकली गेली. राजकीय संकल्पना अथवा राजकीय भूमिका यांचा इतिहास आणि समाजशास्त्र या अंगाने ‘मागोवा’ गटाविषयी तपशीलवार मांडणी व्हायला हवी.

किंबहुना त्याच्या आगेमागे जन्मलेल्या सर्वांवर - युक्रांद, छात्र युवा संघर्ष वाहिनी, श्रमजीवी संघटना, श्रमिक मुक्ती दल, कष्टकरी संघटना, विधायक संसद, तरुण शांती सेना, समता दल, समाजवादी युवक दल इत्यादी - सूत्रबद्ध व सर्वांगीण लेखन व्हायला हवे.

पँथरची ५० वर्षे झाल्याने त्या संघटनेवर काही अंक, पुस्तके, आठवणी प्रसिद्ध झाल्या आहेत. या चळवळी व त्यातल्या कार्यकर्त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भान होते, तसे भारतीय समाजाचेही आकलन होते. वर्ग, जात, वर्ण, लिंग या विषयांवरच्या त्यांच्या अभ्यासाची खोली व व्याप्ती यांना स्वानुभवाची जोड होती. मार्क्स, लोहिया, लेनिन, माओ, लिउ शाओ ची, ट्रॉटस्की, देवीप्रसाद चटोपाध्याय, अशोक मित्र, गो.पु. देशपांडे, राम बापट, एस.के. लिमये, मे.पुं. रेगे, गं.बा. सरदार, दि.के. बेडेकर, नरहर कुरुंदकर, रावसाहेब कसबे, शरद पाटील, ना.य. डोळे, नलिनी पंडित, पुष्पा भावे, विद्या बाळ, मृणाल गोरे, अहल्या रांगणेकर इ. चिंतकांची पुस्तके आणि बौद्धिके त्यांना मिळत.

पुढे काही वर्षांनी ‘मागोवा’मधल्या काहींनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्यानंतर सुधीर बेडेकर हे या गटातले खरेखुरे चिंतक व लेखक काही वैचारिक-तात्त्विक मांडणी करायचे थांबले. पुण्यातल्या बौद्धिक व राजकीय घडामोडींमध्येही ते दिसेनासे झाले. एखादी संघटना अथवा गट मर्यादित प्रभाव पाडू शकतो आणि म्हणून मोठ्या राजकीय पक्षात गेल्याशिवाय आपले ध्येय आपल्याला साधता येणार नाही, असा त्यांचा व त्यांच्यासोबत माकपत गेलेल्यांचा निर्णय झाला का?

याचा अर्थ संसदीय लोकशाहीचे राजकारण अखेरीस निवडणुकीतच आकारास येते. त्यात सामील व्हावयाचे तर पक्ष हवा, असा त्यांचा निष्कर्ष झाला किंवा आणखी काय, कशा चर्चा झाल्या व प्रस्थापित पक्षात का प्रवेश केला, याचीही व्यवस्थित नोंद घेतली पाहिजे.

महाराष्ट्र राजकीय, वैचारिक, सामाजिक क्षेत्रांत अन्य राज्यांच्या कितीतरी पुढे असतो. पण त्याचे हे अग्रेसरत्व देशाचे राजकारण बदलायला तोकडे पडते. त्याची कारणे अनेक आहेत. साम्यवादी विचारांची सत्ता प. बंगाल, त्रिपुरा व केरळ या राज्यांत अनेक वर्षे राहिली. महाराष्ट्र मात्र पुरोगामी वगैरे म्हणवत असूनही पूर्ण डावा कधी होऊ शकला नाही.

त्याची काय कारणे असावीत याची चर्चा नंतर. पण अशा फार महत्त्वाच्या राजकीय संघटनांचा विस्तार महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत होत राहिला आणि त्यांचा प्रभाव पक्षीय राजकारणापेक्षा साहित्य, पत्रकारिता, कला, संस्कृती, राजकारण, श्रमिकांच्या संघटना, स्त्री-पुरुष समता अशा कैक क्षेत्रांवर पडला.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

या मेळाव्याच्या निमित्तानेच त्यावर उलट्या प्रतिक्रियाही उमटल्या. आता कोठे आहे, या विचारांचे अस्तित्व? डावे संपून गेले, कारण त्यांना नव्या पिढ्यांनी नाकारले का? आता असे त्यागी व नैतिक आचरण करून काही साध्य होईल का? मार्क्सवाद कालबाह्य झाल्याचे यांच्या गावी नाही का? इत्यादी.

संघटन हवेच, त्यावाचून राजकीय विचार व मूल्ये यांचा आविष्कार दाखवता येत नसतो. प्रतिगामी शक्ती लोकशाही मार्ग वापरून राज्य करू लागल्या, तर त्यांना प्रतिकार संघटनेशिवाय दुसरा नसतो. प्रचार, संपर्क, साधनसंपत्ती, निधी व कार्यकर्त्यांवरील खर्च यांसाठी एक यंत्रणा, कायदेशीर सल्ले आणि वैचारिक मार्गदर्शन असा मोठा सरंजाम संघटना जिवंत ठेवतात. लोकशाहीत दर्शनीय बाजू नेहमीच सजवाव्या लागतात. मात्र सारी जमवाजमव असूनही डोके रिकामे अन् मन भित्रे असेल, तर त्याचा उपयोग शून्य!

लोकशाही संख्या मागते हे खरे, पण गुणवत्ताही तितकीच महत्त्वाची हे विसरता कामा नये. माणसांची मने आणि डोकी बदलणे हे काम प्रचारकांचे. आज तेच सत्तेवर बसून देश दुर्दशेकडे नेत आहेत. वेळ अजूनही गेलेली नाही. ‘मागोवा’तल्या पिढीची स्वप्ने नव्या पिढीकडे सुपूर्द करून परिवर्तनाची सुरुवात जरूर करता येईल. त्यासाठी राजकीय संकल्पनांची ‘इंटेलेक्चुअल हिस्ट्री’ पुढ्यात असणे निकडीचे आहे. तो सांगावा सर्वांत मौल्यवान!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......