अजूनकाही
‘सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिका)च्या २०२३च्या ‘समाजकार्य : विशेष कार्य पुरस्काराने’ काल १६ जानेवारी २०२४ रोजी पुण्यात नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते शांताराम चव्हाण यांना समारंभपूर्वक गौरवण्यात आले. त्यानिमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेत प्रकाशित झालेल्या लेखाचं हे पुनर्मुद्रण....
.................................................................................................................................................................
सिद्धान्तांची आठवण सोयीनेच येणाऱ्या व्यावसायिक राजकारण्यांची छायाचित्रे चौकाचौकात मिरवण्याच्या या काळात सिद्धान्तांना जीवनाचा आधार समजून जगणारा शांताराम चव्हाण यांच्यासारखा कार्यकर्ता सर्वांनाच गैरसोयीचा वाटतो. अशा कार्यकर्त्याचा पुरस्कार देऊन सत्कार होतो, ही गोष्ट चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ आणि ऊर्जा देणारी आहे.
रस्त्यावरच्या माणसांचा नेता ही गेल्या काही वर्षांतली शांताराम चव्हाणांची ओळख आहे, ते त्यांचे बिरुदच आहे. ‘गरिबी हा शाप नव्हे, तो व्यवस्थेचा अपराध आहे, त्याची शिक्षा निरपराध माणसांना होता कामा नये’, असे मानणाऱ्या लोकशाही समाजवादी चळवळीत शांतारामभाऊ वाढले. राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत ते केवळ खेळ खेळले नाहीत, तर सामाजिक न्याय, समता, बंधुता या मूल्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
शांतारामभाऊंचे वडील पांडुरंग ऊर्फ पांडोबा चव्हाण हे प्रजासमाजवादी पक्षाचे कार्यकर्ते होते. नाशकातील चांदवडकर लेनमधील त्यांचे ‘पॉप्युलर हेअर कटिंग सलून’ हा त्या वेळी सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांचा अड्डा होता. या अड्ड्यात आपोआपच राजकीय शिक्षण होत राहिले. भाऊंचे बालपण असे राजकीय वातावरणातच घडले. गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राच चळवळ, यांवरील चर्चा ऐकतच ते मोठे झाले. ‘समाजवादी समाजरचना झालीच पाहिजे’, हा आग्रही विचार त्यांच्या वडिलांच्या कामाचा पाया होता. या विचारांचा प्रभाव शांतारामभाऊंवर कायम आहे.
पुढे ते एचएएलमध्ये फाईल क्लार्क म्हणून रुजू झाले, तरी ते तेथे रमले मात्र नाहीत. त्यांची स्वतंत्र वृत्ती स्वत:ची वाट शोधत होती. त्यातूनच त्यांनी सुखाची नोकरी सोडून प्रिंटिंग प्रेस टाकला. प्रिंटर म्हणून ते चांगले यशस्वी ठरले.
देशात आणीबाणी पुकारण्यात आली, तो काळ मुस्कटदाबीला शांतता व धरपकडींना शिस्त म्हणण्याचा, नागरिकांचा श्वास गुदमरविणारा होता. भाऊंनाही स्वस्थ बसवले नाही. गुप्तता बाळगून भूमिगत चळवळीचे साहित्य छापण्याच्या कामात ते गुंतले. वसंत नारगोलकरांचे ‘जयप्रकाश जी ने कहा ही था’ हे पुस्तक त्यांनी असेच गुपचूप छापले आणि थेट जयप्रकाशजींची भेट घेण्यासाठी अतिशय नाट्यमय घटनांचा सामना करत त्यांच्यापर्यंत पोहचले. पुढे जनता पर्वात नव्या नेतृत्वाचा उदय झाला, त्यात भाऊ आघाडीवर होते. पण जनता पक्ष ही खरोखर एक आघाडी होती. जनता पक्षाची आघाडी फुटताच एकसंधपणे भाजप या नव्या वाटेने जनसंघ चालू लागला. समाजवाद्यांच्या मात्र पार चिरफळ्या उडाल्या.
ऐंशी नंतरचे दशक हा सामाजिक-राजकीय घुसळणीचा काळ होता. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान, बाबा आढाव यांच्यासारखे समाजवादी नेते महाराष्ट्रभर समता, सामाजिक न्याय यांची मांडणी करत होते. बाबा आढावांनी केलेल्या मनुवादाच्या मांडणीने भाऊ प्रभावित झाले व सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन नामांतर आंदोलनात सक्रिय राहिले.
भाऊंसारख्यांचा सात्त्विक संताप ही खरे तर समाजाच्या जिवंतपणाची निशाणी आहे. हा लोभसवाणा संताप ही या थंड समाजाला मिळणारी ऊब आहे. नाही तर सारे निपचित पडून अन्याय सहन करण्यालाच शांतता समजू लागतील! सार्वजनिक जीवनात इतक्या स्वच्छ चारित्र्याचा माणूस पहायला मिळणेही दुर्मीळ आहे. निवडणुका लढवून उरलेला निधी खिशात घालण्याऐवजी त्यांनी सर्व हिशोब जाहीर मांडून उरलेले पैसे राष्ट्र सेवादलाला देऊन टाकले.
नव्वदच्या दशकातील पुढचा टप्पा होता मंडल आयोगाच्या मागणीचे आंदोलन. नाशिक जिल्ह्यामध्ये मंडल आयोग कृती समितीच्या माध्यमातून शांतारामभाऊ व इतरांनी चळवळ उभी केली. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीने इतर ‘मागासवर्गीय’ सत्तास्थानापर्यंत पोहोचलेही, पण ते केवळ माळी, धनगर, वंजारी, तेली असे जमीनदारच. ग्रामीण भागातील बलुतेदारी नष्ट झाली या कारणाने गावातून विस्थापित होऊन शहराकडे स्थलांतरित झालेले स्वतःच्या जीवित राहण्याचा हक्क, रोजगार यांच्यासाठी वणवण करायला लागले. स्वत:चा रोजगार स्वतः शोधून, निर्माण करून हा वर्ग स्वयंरोजगारित झाला. हॉकर्स, टपरीवाला, पथारीवाला झाला. भाऊ असंघटितांसाठी पदरमोड करून लढत राहिले. देशभर फेरीवाल्यांच्या प्रश्नावर अनेक संघटना काम करत होत्या, त्यातूनच राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झाली.
नाशिक शहरातील साधारण २५,०००हून अधिक व्यावसायिकांच्या रोजगाराला भाऊंच्या हॉकर्स नेतृत्वाखालील युनियनमुळे संरक्षण मिळाले. प्रस्थापित समाजाने पत नाकारलेल्या, रस्त्यावरील या छोट्या व्यावसायिकांचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे, हे ओळखून यांना पत मिळवून देण्यासाठी २ ऑक्टोबर १९९८ रोजी डॉ. राममनोहर लोहिया नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. व्यावसायिक शिस्त नसलेला वर्ग सोबत घेऊन, पारदर्शकतेने सर्व व्यवहार सांभाळत पतसंस्था आज २५व्या वर्षात ‘ब’ दर्जा मिळवून स्वत:च्या मालकीच्या जागेत काम करत आहे.
राजकारणात शांतारामभाऊंनी जॉर्ज फर्नांडिस आणि इतर जहाल वाणीच्या नेत्यांना आपला नेता मानून त्यांच्या निर्णयाशी आपले राजकीय आयुष्य जोडून दिले. वेळ येताच हे पुढारी जातीयवाद्यांशी पाट लावून पळाले, तेव्हा मात्र भाऊंनी त्यांना दमदारपणे विरोध केला. समता पार्टीचे नाशकात विसर्जन करून भाऊंनी आपली वाट वेगळी केली, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.
शांतारामभाऊंसारखा असंघटित क्षेत्रातील हॉकर्स-टपरीधारकांचा नेता नाशिकच्या औद्योगिक नगरीत सामर्थ्याने उभा करणे सहज शक्य होते. त्यासाठी फार आर्थिक पाठबळाचीही गरज नव्हती, पण तोपर्यंत समाजवाद्यांच्या कामगार आघाड्या आपले स्वत्वच गमावून बसल्या होत्या. पक्षबळ पाठीशी नसल्याने समाजवादी कार्यकर्त्यांची अवस्था त्रिशंकूसारखी झाली. जनता पक्षाच्या चिंधड्या उडाल्यामुळे सर्वांत जास्त नुकसान शांतारामभाऊंसारख्या प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्त्याचे झाले. राजकीय आयुष्यच उद्ध्वस्त झाले.
शांतारामभाऊंचे वडील पांडुरंग ऊर्फ पांडोबा चव्हाण हे प्रजासमाजवादी पक्षाचे कार्यकर्ते होते. नाशकातील चांदवडकर लेनमधील त्यांचे ‘पॉप्युलर हेअर कटिंग सलून’ हा त्या वेळी सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांचा अड्डा होता. या अड्ड्यात आपोआपच राजकीय शिक्षण होत राहिले. भाऊंचे बालपण असे राजकीय वातावरणातच घडले. गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राच चळवळ, यांवरील चर्चा ऐकतच ते मोठे झाले. ‘समाजवादी समाजरचना झालीच पाहिजे’, हा आग्रही विचार त्यांच्या वडिलांच्या कामाचा पाया होता. या विचारांचा प्रभाव शांतारामभाऊंवर कायम आहे.
स्वत:च्या वाढदिवसाचे मोठे मोठे बॅनर लावून स्वतःला लोकांच्या माथी मारण्याचा उद्योग न करताही शांतारामभाऊंना रस्त्यावरची माणसं ओळखतात. पोलिसांच्या लेखी ते चिथावणीखोर भाषणे देणारे उपद्रवी माणूस आहेत. गरिबांच्या ओरडण्याचा शांतताप्रेमी नागरिकांना फारच त्रास होतो. भाऊंनाही खरे तर शांतताच हवी आहे, पण गरिबांची घरे जाळून निर्माण केलेली स्मशानशांतता नको आहे. अन्याय दिसला की, ते खवळतातच.
२००६ साली गंगाघाटावरील भाजीवाल्यांना शहरातील गुलहौशी सौंदर्यवाद्यांनी लांबवर फेकून द्यायचे ठरवले. १५० वर्षांची परंपरा असलेला बाजार अविवेकी आग्रहाखातर नष्ट होणे हा केवळ गरिबांच्या रोजीरोटीचाच प्रश्न नाही तर शहराच्या सांस्कृतिक हानीचाही प्रश्न आहे, असे मानून ते या संघर्षात उतरले. पोलिसांचा मार सोसला, कोर्ट केसेस मागे लागल्या. शेवटी तटस्थ नागरिकांची एक समिती बनवून त्यांनी हा बाजार सुरू करवलाच. मात्र शासनाने ‘स्ट्राइकिंग फोर्स’चा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. मानवी हक्क आयोगाकडे भाऊंनी हे प्रकरण नेले, पण तेथेही न्याय मिळत नाही, हे लक्षात आल्यावर आपला निषेध बेडरपणे स्पष्ट केला.
राजकीय कार्यकर्त्यांवरील केसेस मागे घेण्याचा निर्णय तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. पाटलांनी जाहीर केला. सोयीस्कर राजकीय हितसंबंधितांवरील केसेस त्वरित मागे घेण्यात आल्या, पण भाऊंवरील खोट्या केसेस मागे घेतल्या गेल्या नाहीत. यामुळे ते त्रासले, वैतागले पण जिथे जिथे अन्याय घडला तिथे धावलेच, कारण डॉ. लोहियांच्या ‘गुस्सा करो’ या शिकवणुकीचा त्यांना कधीही विसर पडत नाही.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
भाऊंसारख्यांचा सात्त्विक संताप ही खरे तर समाजाच्या जिवंतपणाची निशाणी आहे. हा लोभसवाणा संताप ही या थंड समाजाला मिळणारी ऊब आहे. नाही तर सारे निपचित पडून अन्याय सहन करण्यालाच शांतता समजू लागतील!
सार्वजनिक जीवनात इतक्या स्वच्छ चारित्र्याचा माणूस पहायला मिळणेही दुर्मीळ आहे. निवडणुका लढवून उरलेला निधी खिशात घालण्याऐवजी त्यांनी सर्व हिशोब जाहीर मांडून उरलेले पैसे राष्ट्र सेवादलाला देऊन टाकले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा, मंडल आयोग अंमलबजावणी चळवळ, भंगार व्यापारी युनियन, भंगार वेचक महिलांचे रक्षण, शेतकरी आंदोलन, पोलिसांशी- प्रशासनाशी सतत संघर्ष, पतसंस्थेची उभारणी, हे सारेच एखाद्या चित्रकथेसारखे भुरळ घालणारे आहे. या राजकीय सामाजिक घटनांचे सखोल तपशील त्यांनी आपल्या ‘हरवलेल्या वाटेवरचा प्रवासी’ या आत्मकथेत लिहिले आहेत.
आज त्यांचे वय ८० वर्ष आहे. थकवा जाणवतोय. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे पाय लंगडतो आहे, पण हृदयातील अंगार जागा आहे. जागतिकीकरणाच्या लाटेने आता सर्वच जण भारावलेले आहेत. सेन्सेक्सच्या शिखराकडे नजर लावून चाललेल्या मध्यम व उच्च वर्गाला पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या कष्टकऱ्यांच्या किंकाळ्या ऐकूही येत नाहीत. त्या ऐकू येऊ नयेत, यासाठी चित्रवाणीचे संच २४ तास सुरू आहेत. एक भ्रामक जाल मॅट्रिक्ससारखे आपल्या भोवताली विणले जाते आहे. अशा वेळी शांताराम चव्हाण मात्र ‘मॅट्रिक्स’ सिनेमामधील मॉर्फससारखे एकाकीपणे लढत आहेत. वास्तवाची जाणीव करून देणारी लाल गोळी ते आपल्याला खायला लावणारच, कारण त्यांची तर टोपीच लाल आहे!
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment