अजूनकाही
पंडित भवानीशंकरजींच्या मोबाईलवरून परवा व्हॉट्सअप मेसेज आला आणि नेहमीप्रमाणे पंडितजी काय म्हणतात हे बघायला उघडला, तर त्यांच्याच निधनाची बातमी. हे एवढं धक्कादायक होतं की, त्यावर विश्वास ठेवणं कठीण व्हावं! मागच्याच आठवड्यात मी ऑफिसला जात असताना पंडितजींचा फोन आला, तेव्हा नेहमीप्रमाणे जग त्यांच्याच तालात होतं. मला घाई होती, पण पंडितजी गप्पा मारण्याच्या मूडमध्ये होते. ते आमचं शेवटचं बोलणं असणार आहे, याची सूतराम कल्पना मला नव्हती. येण्याचं तसं काही कारणही नव्हतं. पंडितजीची प्रकृती चांगली होती आणि त्यांचे कार्यक्रम, मैफली सुरू होत्या.
पंडितजींची माझी ओळख, माझ्या पु.ल. अकादमीतील पोस्टिंगच्या काळातील. ख्यातनाम बासरी वादक आणि पंडित हरिप्रसाद चौरसियाचे शिष्य विवेकजी सोनार त्यांना घेऊन माझ्याकडे आले होते. आम्ही त्या वेळेस पहिल्यांदा ‘पु.ल. कला महोत्सव’ ही संकल्पना घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमाची जुळवाजुळव करत होतो. त्यात एक कार्यक्रम विवेकजी करणार होते. त्याचं नाव ‘फ्लूजन’ असं होतं. ती एक फ्लूट सिम्फनी असणार होती आणि इतर वादकांसोबत पंडितजी त्यांचा पखवाज (हिंदीत पखावज) घेऊन त्याला साथसंगत करणार होते.
पहिल्याच भेटीत पंडितजींशी माझे सूर जुळले. माझ्या मोठ्या बहिणीच्या यजमानांचेही ते मित्र निघाले. तेव्हापासून काल-परवापर्यंत आम्ही ‘ऑन’ आणि ‘ऑफ’ असे अनेकदा फोनवर बोलायचो. ते भारतातील तालवाद्यांमधले अत्युच्च स्थान प्राप्त केलेले तालवादक होते, तरी माणूस म्हणून कुठलाही कलावंतपणाचा आव न आणणारे दिलखुलास व्यक्ती होते. ते मृदुंगाधारी किंवा जगद्विख्यात तालवादक या ख्यातीची झूल घेऊन कधीही वावरले नाहीत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
पंडितजींचं घराणं संगीतकाराचं. ते जयपूर घराण्याशी संबंधित होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी बाबूलाल, कथ्थक नृत्यांतील पारंगत, पखवाज आणि तबला वादक पिता पंडित यांच्याकडून पखवाज आणि तबला या वाद्याची तालीम घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या वडिलांनी तेव्हापासूनच भवानीजींना सीतारादेवी (कत्थक) आणि पंडित किशन महाराज (तबला) यांसारख्या दिग्गजांच्या कार्यक्रमात साथसंगत करण्यासाठी न्यायला सुरुवात केली होती.
त्यानंतरचं तबल्याचं शिक्षण त्यांनी आजरारा घराण्यातील शिवलालजी कथक यांच्याकडून घेतलं. उत्तर प्रदेशातील हे घराणा तबला प्रशिक्षणातील भारतातील प्रमुख सहा घराण्यांपैकी एक आणि तबल्यातील जटिल बोल आणि मींडचा वापर करण्याबाबत सुविख्यात आहे. तबला आणि पखवाज या दोन्ही वाद्यांत पंडितजी तेवढेच पारंगत होते, तरी पखवाज त्यांची ‘नियत’ होती आणि तेच वाद्य त्यांची अभिन्न ओळख बनलं.
पखवाज हे बॅरलच्या आकाराचं ताल वाद्य आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूनी कातड्याचे (प्राण्यांच्या) आवरण असते. वादक ते आपल्या मांडीवर घेऊन वाजवतात. हे तालवाद्य प्राधान्याने भारतीय शास्त्रीय संगीतातील धृपद पद्धतीत वाजवलं जातं आणि त्यानंतर कमी-अधिक प्रमाणात ओडिसी, कत्थक या नृत्यप्रकारांत.
हे वाद्य तालवाद्यांतील मृदंगम, तबला, ढोल, खोल यांच्या जातकुळीतील आहे. पखवाजाचा उल्लेख ‘रामायण’-‘महाभारता’तही सापडतो. पौराणिक काळात इंद्रदेव, हनुमान आणि गणेश हे पखवाज वाजवायचे म्हणे! अलीकडच्या काळात स्वामी विवेकानंद पखवाज वादन करत. वैदिक पठणातही पखवाज वाजवला जायचा. तबल्याचा उद्गम त्यानंतर झाला. अशा आशयाचे संदर्भ वाचनात येतात.
पंडितजींचं तालाचं प्रेम फक्त पखवाज आणि तबल्यापुरतंच मर्यादित नव्हतं, ते किमान १२ विविध वाद्य वाजवू शकायचे. म्हणून त्यांनी भारतीय संगीत, जॅझ ते चित्रपट संगीतापर्यंत अनेक गोष्टींमध्ये स्वतःचं योगदान दिलं. जागतिक फ्युजन संगीतात त्यांनी Peter Gabriel आणि John McLaughlin या जगप्रसिद्ध संगीतकारांनाही साथसंगत केली. शिव-हरी (पंडित शिवकुमार शर्मा -पंडित हरिप्रसाद चौरसिया) यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘डर’ आणि ‘चांदनी’ या यश चोप्रा दिग्दर्शित चित्रपटांतील सुंदर इंटरलुडसचं श्रेय हरिप्रसादजी पंडित भवानी शंकर यांना देतात. स्टीलचा ग्लास, प्लास्टिकचा मग आणि झाडू यातूनही पंडितजी अद्भुत ध्वनिनिर्मिती करायचे.
पंडितजींच्या स्वतःच्या स्वयंभू संगीत प्रवासाची सुरुवात पाटण्याच्या शास्त्रीय संगीत संमेलनापासून सुरू झाली होती. त्यानंतर पुण्याचं सवाई गंधर्व, मुंबईचं गुणिदास, खजुराहो संगीत संमेलन, राजीव गांधी फौंडेशन, कोलकत्याचं डोवर लेन, अशा अनेक नावाजलेल्या संगीत मैफलींतून त्यांनी प्रसिद्धीचं अत्युच्च शिखर गाठलं.
पंडितजींनी आजवर पंडित रविशंकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित भीमसेन जोशी पंडित जसराज, उस्ताद अमजद अली खान, उस्ताद अल्लारखा, पंडित सामता प्रसाद, पंडित बिरजू महाराज यांच्यापासून लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांना भारतात तसेच इतर देशविदेशांमध्ये साथसंगत केली आहे.
पंडितजींसाठी पैसा ही कधीच अग्रक्रमाची बाब नव्हती. त्यांना संगीत हे परमेश्वराच्या जवळ जाण्याचं माध्यम वाटायचं आणि त्यांच्यासाठी तेच शेवटपर्यंत महत्त्वाचं राहिलं.
पंडितजी पखवाजमधून अद्भुत तालाची निर्मिती करून स्वरांच्या विलक्षण प्रवासाला आपल्याला घेऊन जायचे. खरं तर पखवाजचं सोलो वादन ही फारशी ऐकण्यात न आलेली, अत्यंत कर्मकठीण गोष्ट, पण पंडितजींनी साध्य करून दाखवली. त्यांचं हे सोलो वादन संगीतातील वैश्विक परिमाण गाठायचं. पंडितजींनी या तालवाद्याचा आयुष्यभर प्रचार-प्रसार केला. त्यांना एक मोठं ‘पखवाज महोत्सव’ करायचा होता, ते त्यांचं स्वप्न होतं. तसं ते अनेकदा बोलूनही दाखवायचे. मी अकादमीत असताना तशी चाचपणी ही करून बघितली, पण ते राहून गेलं.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
मालिनीताई राजूरकर : गाणं सात्त्विक, सत्शील आणि घरंदाज; आणि व्यक्तिमत्त्वही!
..................................................................................................................................................................
पंडितजींना संगीतातील अजून काही शिखरं पादाक्रांत करायची होती. प्रत्येक मूडसाठी पखवाज वादन करायचं होतं. त्यात शांत, संयत मेलडीपासून फास्ट बिट तांडवरसापर्यंत अनेक तालांची निर्मिती करायची होती. पंडितजींचा तो ध्यासच होता.
पखवाजाचं मूळ धृपद या भारतीय शास्त्रीय संगीतातील कंठ संगीतातील शैलीसोबत जोडलं गेलं होतं. तेव्हा फास्ट बेस्ड खयाल गायकीसोबत पखवाज सूर धरू शकणार नाही, अशी धारणा झाल्यामुळे पखवाज मागे पडून त्याची जागा तबल्याने घेतली होती. परंतु अनेक वर्षांनंतरच्या अथक परिश्रमानंतर पंडितजींनी ती महारथ प्राप्त केली आणि बदलत्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या काळात आपलं स्थान मजबूत केलं. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याच्या वेगासोबत पखवाजाचा ठेका धरण्याचा आत्मविश्वास त्यांना होता.
पंडितजींचा सिनेसृष्टीत प्रवेश व्ही. शांताराम यांच्यामुळे झाला. त्यानंतर त्यांनी आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, इलियाराजा ते थेट ए.आर .रहमान यांच्या वाद्यवृंदात वाजवलं. पंडितजींनी ‘अधुरी दुनिया’, ‘माता सरस्वती की महिमा निराली’ अशा काही चित्रपटांना संगीत दिलं. त्याचबरोबर ‘रंगिलो राजस्थान’, ‘जय जय हनुमान’, ‘भजन प्रभात’, ‘दीपांजली’ आणि ‘संपूर्ण रामायण’ अशा ऑडिओ अल्बमची निर्मिती केली.
‘संपूर्ण रामायणा’च्या २० कॅसेट्सच्या अल्बमबद्दल पंडितजींचं नाव ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्डस्’ आणि ‘गिनेस बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंदवलं गेलं. पंडित जसराज गौरव पुरस्कार, राजस्थान संगीत नाटक पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रपती पदक यांसोबत तालश्री आणि तालविलास यांसारख्या महत्त्वाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. जागतिक संगीताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारासाठीही पंडितजींना नामांकन मिळालं होतं.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
पंडितजींचं तालाचं प्रेम फक्त पखवाज आणि तबल्यापुरतंच मर्यादित नव्हतं, ते किमान १२ विविध वाद्य वाजवू शकायचे. म्हणून त्यांनी भारतीय संगीत, जॅझ ते चित्रपट संगीतापर्यंत अनेक गोष्टींमध्ये स्वतःचं योगदान दिलं. जागतिक फ्युजन संगीतात त्यांनी Peter Gabriel आणि John McLaughlin या जगप्रसिद्ध संगीतकारांनाही साथसंगत केली. शिव-हरी (पंडित शिवकुमार शर्मा -पंडित हरिप्रसाद चौरसिया) यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘डर’ आणि ‘चांदनी’ या यश चोप्रा दिग्दर्शित चित्रपटांतील सुंदर इंटरलुडसचं श्रेय हरिप्रसादजी पंडित भवानी शंकर यांना देतात. स्टीलचा ग्लास, प्लास्टिकचा मग आणि झाडू यातूनही पंडितजी अद्भुत ध्वनिनिर्मिती करायचे.
जागतिक कीर्तीचे संगीतकार असूनही पंडितजी नेहमीच जमिनीवर घट्ट पाय रोवून असायचे. त्यांचे व्यक्तिमत्त्व उमदे होते. फोन करून अनेकदा घरी जेवणाचं आमंत्रण द्यायचे. त्यांना त्यांच्या कुटुंबाविषयी विलक्षण ममत्व होतं. मुलांविषयी आणि नातवांविषयी भरभरून बोलायचे.
कोविड काळात ते फार अस्वस्थ झाले होते, तरी त्यांना निरनिराळ्या कल्पना सुचत असत. मला पंडितजींनाची एक दीर्घ मुलाखत घ्यायची होती. पण ते राहूनच गेलं. आता मध्येच कधी तरी येणारा त्यांचा फोन आणि ‘हॅलो अंजलीजी, कैसी हैं आप?’ हा प्रश्न कधीच ऐकू येणार नाही….
..................................................................................................................................................................
लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.
anjaliambekar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Pradnya Wele
Fri , 12 January 2024
भावपूर्ण श्रद्धांजली!