दुधखुळी माणसं आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी टपलेली लबाड माणसं, यांचा सुळसुळाट झालेल्या जगात ‘देव’ या कल्पनेचा वापर स्वतःच्या ‘पोळ्या’ भाजून घेण्यासाठी सर्रास केला जात आहे!
पडघम - सांस्कृतिक
चंद्रशेखर फणसळकर
  • अयोध्येतील राममंदिराचं एक संग्रहित छायाचित्र
  • Wed , 03 January 2024
  • पडघम सांस्कृतिक राम Ram रामायण Ramayan अयोध्या Ayodhya राममंदिर Ram Mandir

जगणं म्हणजे येऱ्यागबाळ्याचं काम नसून, ती एक सतत करावी लागणारी लढाई आहे, हे विश्वात आगमन झाल्या झाल्या आद्य मानवाच्या ध्यानात आलं. जगत राहण्यासाठीची ही लढाई जन्माबरोबर ‘पॅकेज डील’ म्हणूनच आली आहे. पहिल्या श्वासापासून चारी बाजूंनी हरतऱ्हेचे आणि चित्रविचित्र वैरी अंगावर येणार, ते अगदी शेवटचा श्वास घेईपर्यंत उसंत मिळू देणार नाहीत, हे वास्तव त्याला त्याच्या उपजत हुशारीमुळे समजायला वेळ लागला नाही.

सुरुवातीच्या काळात निसर्गाचा कोप आणि अवतीभोवतीच्या प्राण्यांचा धोका, तर नंतर निसर्गाच्या दणक्यांसोबत आपणच निर्माण केलेल्या सामाजिक व्यवस्थेच्या लाथा-बुक्क्या, यांच्याशी लढत लढतच त्याला जगण्याची कसरत करावी लागू लागली.

हा आद्य मानव सुरुवातीला या तारेवरच्या कसरतीनं गांगरून गेला. ज्यांच्या बळाविषयी अंदाज नाही, अशा नवनव्या अज्ञात शत्रूंचा रोज सामना करताना, या लढाईला आपलं एकट्याचं बळ अपुरं आहे, हे त्याच्या लक्षात आलं. पण न लढून सांगतो कुणाला नाही, लढलो तर मरण ठरलेलं!

मग कशाच्या आधारावर कुणाच्या बळावर झुंजायचं, असा प्रश्न त्याला पडला. स्वतःच्या बांधवांचा त्यानं आधार घेतला; त्यांनाही दिला. त्याचा जगाच्या जंगलात टिकून राहण्यासाठी फायदा नक्कीच झाला. पण सगळे प्रश्न सुटले नाहीत. नवनव्या शत्रूंची आव्हानं निरंतर उभी राहत होती. एकत्रितपणे, समूहाने त्यांचा सामना केला, तरी शक्ती पुरेशी नाही, हे माणसाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.

मग काय करायचं? प्रश्न तडक जीवन-मरणाचा होता. गळ्याभोवतीच्या फासाप्रमाणं हा प्रश्न त्याला आवळायला लागला. घुसमट करून सुन्न करू लागला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

अशा अवस्थेत माणसानं स्वतःची हुशारी वापरून ‘आपुली आपण’ सोडवणं करून घ्यायचा प्रयत्न केला. यात स्वतःसाठी ‘सपोर्ट सिस्टिम्स’ निर्माण केल्या. काही कल्पकतेतून आणि काही अंत:प्रेरणेतून ‘देवाची निर्मिती’ ही अशाच प्रक्रियेचं फलित. जगण्यासाठी लढण्याचं बळ पुरेसं नसणाऱ्या माणसानं लढायला लागणाऱ्या सगळ्या शक्ती ज्याच्यात एकवटलेल्या आहेत, अशा ईश्वराला जन्माला घातलं. गंमत म्हणजे ज्याला त्यानं जन्माला घातलं, त्या ईश्वरालाच तो ‘मायबाप’ म्हणू लागला! ‘मी चि मज व्यालो | पोटा आपुलिया आलो|’ अशा (तुकोबांना उमगलेल्या) उफराट्या न्यायाने!

कालांतरानं शहाणपणामुळे माणसाची प्रगती वेगानं होत, तो हा हा म्हणता इतर प्राण्यांच्या किती तरी पुढे गेला. इतकंच नव्हे, तर अल्पावधीत जीवनाच्या युद्धात निर्णायक वर्चस्व मिळवून जगावर राज्य करू लागला. पण म्हणून अस्तित्वासाठीच्या लढाईतून त्याची सुटका झाली नाही. फक्त काळानुरूप त्याचे वैरी बदलत गेले.

आजच्या घडीला तर माणसाचा सर्वांत मोठा शत्रू माणूसच झालेला दिसतो. आपल्या अस्तित्वाला आज सर्वांत अधिक धोका स्वतःकडूनच आहे, हे त्याला ‘वळलं’ नसलं तरी ‘कळलं’ नक्कीच आहे. दुर्दैवानं या संभाव्य विनाशक परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या कारणांपैकी देव हे एक कारण व्हावं, ही यातली सर्वांत उपरोधिक गोष्ट आहे. यात दोष माणसाचाच आहे. त्यानेच जन्माला घातलेल्या देवाच्या नावावर तो स्वतःला व जगाला संपवायला निघाला आहे.

या सगळ्या प्रास्ताविकाचं प्रयोजन काय? तर अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अयोध्येच्या राममंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी आणि साधु-संत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

आजच्या घडीला तर माणसाचा सर्वांत मोठा शत्रू माणूसच झालेला दिसतो. आपल्या अस्तित्वाला आज सर्वांत अधिक धोका स्वतःकडूनच आहे, हे त्याला ‘वळलं’ नसलं तरी ‘कळलं’ नक्कीच आहे. दुर्दैवानं या संभाव्य विनाशक परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या कारणांपैकी देव हे एक कारण व्हावं, ही यातली सर्वांत उपरोधिक गोष्ट आहे. यात दोष माणसाचाच आहे. त्यानेच जन्माला घातलेल्या देवाच्या नावावर तो स्वतःला व जगाला संपवायला निघाला आहे.

रामाला हिंदू धर्मात देवाचं स्थान आहे. त्याला विष्णूच्या दशावतारातील सातवा अवतार मानलं जातं. पण रामाविषयी जनमानसामध्ये आदर आणि प्रेमाची भावना निर्माण होण्याचं खरं कारण मात्र, त्याने मानव म्हणून जगताना ज्या आदर्श पद्धतीनं आयुष्य व्यतीत केलं त्यात आहे. एक पुत्र, बंधू, पती आणि राजा म्हणून राम धर्माच्या ज्या आदर्श मर्यादा राखत जगला, त्यामुळे त्याचा ‘मर्यादापुरुषोत्तम’ असा गौरव झाला.

‘रामायणा’त उल्लेख आहे त्यानुसार रामाने आई-वडिलांच्या आज्ञांचं सदैव पालन केलं. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. राम एकपत्नीव्रती व राजधर्माचं पालन करण्यात तत्पर होता. प्रजेनं सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्याने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला.

इतकंच नव्हे, तर राम हा आदर्श शत्रूही होता, असाही उल्लेख ‘रामायणा’त आहे. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, “मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.”

अशा ‘मर्यादापुरुषोत्तम’ रामाच्या अयोध्येत होणाऱ्या मंदिराचं उद्घाटन हा सर्वच भारतीयांसाठी विशेषतः हिंदू धर्मीयांसाठी जिव्हाळ्याचा सोहळा आहे, आणि ते तसा असायला हवा, याविषयी मतभेद होण्याचं कारणही नाही. पण इथं मांडण्याचा मुख्य मुद्दा आहे तो असा - विश्वात घडणाऱ्या गोष्टी या एका सर्वशक्तिमान परमेश्वराच्या कृपेनं घडतात, त्या कशा घडाव्यात, घडू नयेत है सर्वथा तो ठरवतो, त्याच्या इच्छेनुसारच प्रत्येक गोष्ट घडते, त्याची इच्छा नसेल तर घडत नाही, या सर्व कल्पना मानवानं तो अनेक गोष्टींबद्दल अज्ञानी होता, तेव्हा केल्या आणि मानल्यासुद्धा. पण जसजशी विज्ञाननिष्ठ आणि तर्कशुद्ध विचार पद्धत विश्वाच्या व्यवहाराविषयीची सत्यं उलगडत गेली, तसतसं एका सर्वशक्तिमान परमेश्वराचं ‘विश्वनियंता’ म्हणून अस्तित्व नसण्याची शक्यता माणसाच्या लक्षात आली. आणि त्याचं सार्वभौमत्व मानत जगत राहण्याची त्याची गरज संपली.

निव्वळ मूल्यांवरची निष्ठा, शुद्ध आचरणावरची श्रद्धा, प्रामाणिक भावना, विवेक यांच्या आधारावर जगण्याची लढाई लढता येते, हे विज्ञानाचं प्राबल्य असलेल्या काळातही आपण नाकारलं आहे. आणि केवळ ‘तीर्थी धोंडा पाणी’ म्हणून शिल्लक राहिलेल्या देवाचं आणि देवळांचं राजकारण बोकाळलेल्या सद्य परिस्थितीत आपण स्वतःला शहाणे म्हणवून घेत आहोत!

तथापि समाजाला एका आत्मीयतेच्या नात्यानं बांधून ठेवायला कठीण काळात परस्परांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी उत्तेजन देण्याचं काम करायला, माणसाच्या मनात नैतिक आणि सत्शील आयुष्य जगण्याची प्रेरणा निर्माण करायला देव या संकल्पनेचा अजूनही उपयोग होईल, हे माणसातील शहाण्यांनी जाणलं. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्नही केले.

पण दुर्दैवानं दिसतं ते असं की, शहाणपण विसरलेली दुधखुळी माणसं आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी टपलेली लबाड माणसं, यांचा सुळसुळाट झालेल्या जगात ‘देव’ या कल्पनेचा वापर स्वतःच्या ‘पोळ्या’ भाजून घेण्यासाठी सर्रास केला जात आहे!

खरं तर अयोध्येतील देवळातील रामाची मूर्ती असो वा एखाद्या खेड्यातील छोट्या ओढ्याकाठच्या झाडाखालची रामाची मूर्ती असो, त्यांमधून जर माझ्यामध्ये रामातील ‘आदर्श मानव’ संक्रमित झाला नाही, तर शेवटी ती मूर्ती म्हणजे एक दगड तर राहतोच, पण तिची पूजा करणारा मीही दगडच राहतो!

आणि झालंय तसंच. देवळातल्या रामाची पूजा होत असताना, त्या पूजेचा सोहळा होत असताना माणसा-माणसाच्या अंतरंगातला देव निद्रिस्तच राहिला आहे. त्याचा जागर झालाच नाही, तर या सगळ्या कार्यक्रमाचा देव आणि ‘देवपणा’शी दुरान्वयानेही संबंध राहणार नाही.

प्रत्येक मनुष्यात, त्याची जात-पात-रंग-धर्म-देश कुठलाही असला, तरी देवपण वास करतं, हे जगभरातील जाणत्या माणसांनी वारंवार सांगितलं आहे. अर्थात ‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’ याची अंतस्थ जाणीव मूळातून सर्वांना असणं शक्य नसतं. पण ज्यांच्यामध्ये ती असते, ते इतरांमधील निद्रिस्त अवस्थेतील जाणीव जागी नेहमीच करत आले आहेत.

जसजशी विज्ञाननिष्ठ आणि तर्कशुद्ध विचार पद्धत विश्वाच्या व्यवहाराविषयीची सत्यं उलगडत गेली, तसतसं एका सर्वशक्तिमान परमेश्वराचं ‘विश्वनियंता’ म्हणून अस्तित्व नसण्याची शक्यता माणसाच्या लक्षात आली. आणि त्याचं सार्वभौमत्व मानत जगत राहण्याची त्याची गरज संपली. पण दुर्दैवानं दिसतं ते असं की, शहाणपण विसरलेली दुधखुळी माणसं आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी टपलेली लबाड माणसं, यांचा सुळसुळाट झालेल्या जगात ‘देव’ या कल्पनेचा वापर स्वतःच्या ‘पोळ्या’ भाजून घेण्यासाठी सर्रास केला जात आहे!

तुकोबा, गाडगेबाबा, विवेकानंद, साने गुरुजीं, येशू ख्रिस्त, पैगंबर या सर्वांनी हेच केलं. लोकांच्या अंतरातील देवळांचा जिर्णोद्धार करून तिथं रामासारख्या आदर्श माणसाची प्रतिष्ठापना करणं, हेच आयुष्याचं एकमेव ध्येय असल्याप्रमाणे ही माणसं झटली.

तुकोबांनी ‘वीटेवरी पाहिलेले शब्दातीत’ अडाणी लोकांसाठी त्यांच्या अद्भुत शब्दांनीच रंगवलं, तेव्हा ती वीटेवर रचलेल्या दगडांची निर्जीव रचना न राहता त्याची ‘विठूमाय’ झाली. पण हा विठोबा ‘रोकडा’ भेटावा अशी इच्छा असेल, तर ‘सज्जनांना भेटा’ असं सांगायला ते विसरले नाहीत. ‘आहे देव ऐसी वदवावी वाणी’ असं म्हणता म्हणता ‘नाही देव ऐसे मनीं अनुभवावे’ असंही ते म्हणाले.

वास्तविक सामान्य माणसाला वाटणाऱ्या देवाच्या आधाराविषयीच्या सहानुभूतीतून आणि रंजल्या-गाजल्यांच्या ‘चुलीवरच्या तव्यासारख्या खडतर आयुष्याविषयीच्या ममत्वापोटी ‘आहे देव ऐसी वदवावी वाणी’ असं तुकोबा म्हणतात. पण लगेचच ‘देव नाही ऐसे मनी अनुभवावे’ असं म्हणताना त्यांची भूमिका विवेकनिष्ठ माणसास त्याचा विवेक हाच कठीण परिस्थितीत आधार म्हणून पुरतो, त्यासाठी देव असण्याची त्याला गरज लागत नाही, अशा अर्थाची होते.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

सर्व भारतीय उपखंडात एकच राम असावा, एकच ‘रामायण’ असावे आणि एकच रावण असावा, हा संघपरिवार व भाजपचा हेतू आढळतो. पण त्यांचा रावण नेमका कोणता?

आजच्या ‘सुपरडुपर ऐतिहासिक दिवसा’ची संक्षिप्त पूर्वपीठिका

अर्वाचीन काळात कोट्यवधी भारतीयांच्या मनात ‘रामा’चे नाव कोणी रुजवले असेल तर, ते म. गांधीजींनी!

माणसांचे मुखवटे पांघरलेली भलतीच कुठली तरी जमात, माणसांना माणसांतूनच हद्दपार करत आहे. केवळ माणसांनाच नाही, तर त्यांचा वर्तमान, इतिहास आणि भविष्यकाळही

‘सेक्युलर’ शक्तींना टिकून राहायचे असेल, पुन्हा उभे राहायचे असेल, तर ‘धर्म’ ही बाब वजा करून चालणार नाही आणि जनतेची भाषा आपलीशी करून ‘भारतीयत्वा’च्या चर्चेचा भाग व्हावे लागेल

धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भातील मूलभूत बाबींचा सामना करावा लागत असलेला आणि वैविध्य असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे

..................................................................................................................................................................

आणि हेच त्यांचं खरं सांगणं आहे. पण तुकोबांना देव्हाऱ्यात बसवून त्यांची पूजा करण्यासाठी पुढे पुढे करणाऱ्या लोकांना त्यांच्या शब्दांच्या अर्थाचा मात्र विसर पडला. किंबहुना बऱ्याच जणांनी या ओवीतील ‘आहे देव ऐसी वदवावी वाणी’ ही पहिली ओळच सोयीस्करपणे लक्षात ठेवली.

गाडगेबाबांनी गावोगावी फिरून गरीब आणि अडाणी लोकांना ‘देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका’, अशी शिकवण आयुष्यभर दिली.

रंजल्या-गांजल्यांची सेवा ही ‘शिवज्ञाने जिवेर सेवा’ परमेश्वराची सेवा आहे, हे जाणून विवेकानंदानी परिव्राजक होऊन गरिबांची सेवा करत सगळा देश पालथा घातला.

दुर्दैवाने या सर्व मोठ्या मंडळींच्या कार्याचा आज घाऊक विसर पडलेला दिसतो, किंवा आपल्या स्वार्थाच्या ते आड येत असल्याने आपण त्यांच्याकडे मुद्दाम कानाडोळा केला आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

निव्वळ मूल्यांवरची निष्ठा, शुद्ध आचरणावरची श्रद्धा, प्रामाणिक भावना, विवेक यांच्या आधारावर जगण्याची लढाई लढता येते, हे विज्ञानाचं प्राबल्य असलेल्या काळातही आपण नाकारलं आहे. आणि केवळ ‘तीर्थी धोंडा पाणी’ म्हणून शिल्लक राहिलेल्या देवाचं आणि देवळांचं राजकारण बोकाळलेल्या सद्य परिस्थितीत आपण स्वतःला शहाणे म्हणवून घेत आहोत!

‘दस स्पोक झरथुस्त्र’ या पुस्तकात ‘देव मेला आहे आणि आम्ही त्याला ठार मारले आहे’, असा खळबळजनक दावा फ्रेडरिक नीत्शेने एकोणिसाव्या शतकात केला. वास्तविक त्या वेळी युरोपीय समाजात होत असलेल्या बदलांवरची नीत्शेची ती प्रतिक्रिया होती. तत्कालीन युरोप हा पारंपरिक धार्मिक श्रद्धांना, विशेषतः ख्रिस्ती धर्मात रुजलेल्या श्रद्धांना छेद देणारे सांस्कृतिक बदल अनुभवत होता. विज्ञान, तर्क आणि धर्मनिरपेक्षतेचं महत्त्व वाढलं होतं आणि लोक धार्मिक सिद्धान्त व आध्यात्मिक दाव्यांच्या वैधतेवर प्रश्नं उपस्थित करत होते. नीत्शेच्या लेखनातही तोवर नैतिक मूल्यांचा पाया म्हणून मिरवणाऱ्या पारंपरिक धार्मिक दृष्टीकोनास ठाम असा नकार होता.

विचारवंत जेव्हा ‘देव मेला आहे’ असं म्हणतात, तेव्हा ते खरोखरच देवाला मारत नाहीत, तर तो त्यांचा देवाची किंवा देवत्व नावाच्या सत्त्वाची पुनर्स्थापना माणसाच्या अंतरात करण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी ते निद्रिस्त माणसाला जागं करण्यासाठी कळवळून हाका मारत असतात. जगभरच्या सर्व संतांनी सतत हेच केलं, किंबहुना ज्यांनी हे केलं, ती सर्व मंडळीच खऱ्या अर्थानं संत. त्यांनाच आपण ‘साधू’ म्हणून ओळखलं पाहिजे, देव तेथे आहे, हे जाणलं पाहिजे.

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. चंद्रशेखर फणसळकर शल्यचिकित्सक आहेत आणि नाटककारही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......