भारतीय संस्कृती व संस्कृतच्या अभ्यासामध्ये विहारणारा स्कॉटिश चातक पक्षी
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
राहुल माने
  • पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sun , 09 April 2017
  • ग्रंथनामा Granthnama पीटर पीटरसन Peter Peterson नम्रता गणेरी Namrata Ganneri अरुण टिकेकर Aroon Tikekar द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई The Asiatic Society of Mumbai

अर्वाचीन काळापासून जगातील ज्ञानी भाषा आपल्या भूमीत रुजल्या आणि त्यांनी आपलं साँस्कृतिक वैभव एका वेगळ्या उंचीवर ठेवलं. संस्कृत, पाली, अर्धमागधी, इतर अनेक बोली आणि प्रमाण-भाषा याबरोबरच आपल्या शेकडो वर्षांच्या इतिहासामध्ये लाखो स्मृतीपत्रं, ताडपत्रं आणि वैयक्तिक संग्रहातील पांडुलिपी आपल्या मंदिरांमध्ये, आपल्या लोकसंस्कृतीमधील जाणकार व पंडिती विद्वान व्यक्तिमत्त्वांकडे व बऱ्याच वेळा दुर्लक्षित अवस्थेत कुठेतरी जुन्या हवेली-वाड्यात पडून होती कितीतरी वर्षं.  या प्रचंड वारशाचं जतन करण्याची प्रक्रिया, त्यावर संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना प्रशिक्षित करणं आणि त्यासाठी आवश्यक ते ज्ञान-साधनेचं वातावरण तयार करणं हे एका अर्थानं भारतीय म्हणून आपली जबाबदारी ठरते, परंतु आश्चर्यकारक म्हणा किंवा काही आंतरराष्ट्रीय इतिहासाच्या वळणामुळे म्हणा हे काम हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या ब्रिटिशांनी या प्रकारच्या कामाची भारतामध्ये मुहूर्तमेढ रोवली. ते ब्रिटिश ‘उत्तम-कुशल’ प्रशासक होते, अर्थकारण-राजकारण यांच्या जागतिक बदलांचे स्पंदन टिपणारे दूरदृष्टीचे नियोजक होते, तंत्रज्ञान आणि सामाजिकशास्त्रे यांच्या संगमातून भारतीय उपखंडावर राज्य करणारे अजब संस्थात्मक साम्राज्यवादी होते. परंतु मुळात ब्रिटिश जवळपास संपूर्ण जगावर राज्य करू शकले, याचं कारण म्हणजे त्यांची अनंत अशी ज्ञान-निष्ठा.

याच ब्रिटिश परंपरेतील एका थोर व्यक्तिमत्त्वाबद्दल ‘PETER PETERSON: FOUNDERS AND GUARDIANS OF THE ASIATIC SOCIETY OF MUMBAI’ हे पुस्तक वाचायला मिळालं, ज्यानं आयुष्यभर ज्ञान-साधना करण्यासाठी आणि ते काम उत्कृष्टरीत्या व्हावं यासाठी संस्थात्मक उभारणी करण्याचं काम केलं. ही व्यक्ती होती पीटर पीटरसन. हे पुस्तक लिहिलं आहे प्राध्यापक नम्रता गणेरी यांनी.

मानववंशशास्त्र, भाषा, समाजशास्त्र, भूगोल, पर्यावरणशास्त्र या ज्ञानशाखांबरोबर नकाशे तयार करणं; जंगलं, इतर नैसर्गिक साधनसंपत्तीचं नियंत्रण-व्यवस्थापन करण्यासाठी विविध संशोधन; नियामक संस्थानची स्थापना करणं आणि रेल्वे, तारायंत्रे यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली सत्ताभिमुक प्रशासनावरील पकड घट्ट करणं असे अनेक निर्णय ब्रिटिश राजवटीच्या उदयाला आणि उत्कर्षाला कारणीभूत ठरले. यापलीकडे जाऊन त्यांनी शिकणं, शिकवणं आणि शिकण्यासाठी काही महत्त्वाचे पायाभूत काम केलं. त्यातील काही महत्त्वाचे स्तंभ म्हणजे मुंबईमधील एशियाटिक सोसायटी, मुंबई विद्यापीठ, पुण्यातील डेक्कन कॉलेज आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्था. या सर्वांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा होते पीटर पीटरसन. 

ब्रिटिशानी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर संपूर्ण भारताच्या इतिहासाला समजावून घेण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले. त्यामध्ये इतिहास, मानववंशशास्त्र, पुरातत्त्व-शास्त्र, भारतीय विद्याशास्त्र, भाषाशास्त्र, पुरालेखशास्त्र, भाषाविज्ञान या विषयांचं सखोल अध्ययन करण्यासाठी विविध संस्थांची उभारणी केली. या उभारणीच्या आणि त्यासंबंधित भाषा शिक्षण (मुख्यत्त्वे संस्कृत), त्यासाठीचे विद्यापीठीय पातळीवरील अभ्यासक्रम तयार करणं आणि त्या विषयावर आवड-जाण असणारी नवी पिढी घडवणं हे महत्त्वाचं काम करणाऱ्या ज्या काही मोजक्या व्यक्ती होत्या, त्यांच्यापैकी एक होते पीटर पीटरसन.

मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या संस्थापक सदस्य आणि महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या लोकांच्या चरित्रांचं लेखन आणि संपादन करण्याचा प्रकल्प सोसायटीने हाती घेतला आहे. या मालिकेचे मुख्य संपादक ज्येष्ठ संपादक आणि लेखक अरुण टिकेकर हे होते. त्यांच्या निधनाला या वर्षी जानेवारीमध्ये एक वर्ष पूर्ण झालं. सोसायटीने डॉ. टिकेकर यांच्या जाण्यानंतर त्यांना एक प्रकारे आदरांजली म्हणून हा प्रकल्प अधिक नेटाने पुढे नेण्याचा संकल्प केला आहे. त्या ज्ञान-मालिकेतीलाच एक पुष्प म्हणजे नम्रता गणेरी यांनी लिहिलेले हे छोटेखानी आत्मवृत्त! सोसायटीने डॉ. टिकेकरांच्या नेतृत्त्वाखाली एकूण २५ ज्ञानवान व्यक्तींच्या चरित्राची मालिका प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला होता. या मालिकेत आतापर्यंत १० चरित्रं पूर्ण झाली आहेत. पीटरसन यांच्यावरील हे पुस्तक हे त्यापैकीच एक.

१८२० ते १८३० च्या दरम्यान ब्रिटिशांनी कलकत्ता, दिल्ली, आग्रा तसंच पुणे इथं संस्कृत पाठ्यशाळांची स्थापना केली. तेव्हापासून या पुस्तकात पीटरसन यांच्या योगदानाच्या उत्खननाला सुरुवात होते. १८५८ ते १८९० या काळामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये मुंबई, मद्रास आणि कोलकाता येथील विद्यापीठं, तेथील उच्च न्यायालयं यांची स्थापना केली. याच काळामध्ये ब्रिटिशांनी संपूर्ण भारताच्या सर्वेक्षणाचं काम मोठ्या महत्त्वाकांक्षी पातळीवर अतिशय वेगानं पूर्ण करून २३ विस्तृत अहवाल प्रसिद्ध केले. याच काळामध्ये संस्कृत, भारतीय विद्या आणि पुरातत्त्वशास्त्र यावरील संशोधन प्रसिद्ध करणारी अनेक नियतकालिकं भारतात सुरू झाली.

औद्योगिक क्रांती झालेल्या इंग्लंडमध्ये स्कॉटलंड हा आणखी एक महत्त्वाचा प्रांत. एकोणिसाव्या शतकामध्ये स्कॉटलंडची सुद्धा औद्योगिक, लोकसंख्या, शिक्षण आणि इतर अनेक पातळीवर प्रगती झाली, भरभराट झाली. याच काळामध्ये १८५८ मध्ये स्कॉटलंडमध्ये विद्यापीठं स्थापण्याची सुरुवात झाली. १८६२ मध्ये या मोहिमेचा भाग म्हणून एका संस्कृत अध्यासनाची सुरुवातही झाली. हे सुद्धा सांगितले पाहिजे की, युरोपमध्ये पहिलं संस्कृत अध्यासन पॅरिसमध्ये १८१४ मध्ये सुरू झालं. त्यानंतर जर्मनीमध्ये १८१८ मध्ये आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ, इंग्लंड इथं १८३३ साली सुरू झालं.

पीटरसन या वातावरणात वाढले, शिकले आणि १८६७ मध्ये प्राचीन साहित्यामध्ये (Classics) मध्ये उत्तीर्ण होऊन एम.ए. झाले. त्यानंतर ते ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकायला गेले. तेथून त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. १८७३ मध्ये ते मुंबईच्या बेटावरील हिंदुस्तानी वातावरणात एक संस्कृतचा अध्यापक म्हणून एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये रुजू झाले. ज्या काळामध्ये पीटरसन प्राध्यापक म्हणून रुजू झाले, त्याच काळामध्ये ब्रिटिशांनी नैसर्गिक  तत्त्वज्ञान व खगोलशास्त्र, इतिहास, राजकीय अर्थशास्त्र, पर्शिअन, अरेबिक, गणित, इंग्लिश साहित्य, रसायनशास्त्र, तर्क व नैतिक तत्त्वज्ञान, वनस्पतीशास्त्र, या विषयांतील तज्ज्ञांना महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये नेमण्यास सुरुवात केली होती.

प्राध्यापक म्हणून भारतात रुजू झाल्यापासून पीटरसन यांनी ज्ञानाच्या अनेक क्षेत्रामध्ये मूलभूत योगदान दिलं. मुंबई विद्यापीठाची सिनेट, ‘रॉयल एशियाटिक सोसायटी, लंडन’च्या मुंबई शाखेचं काम असेल, त्याचबरोबर पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये डॉ. भांडारकर यांच्याबरोबर संस्कृत पांडुलिपींचं काम, मुंबईतील ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये संस्कृत व इतर देशी-विदेशी ज्ञान-भाषांमधील संशोधनावर लेख लिहिणं, सार्वजनिक ठिकाणी या अभ्यासाच्या प्रगतीवर भाषणं देणं, आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये सहभागी होऊन त्यावर इतर विद्यापीठातील विद्वानांशी चर्चा करणं, यासारखी आव्हानात्मक कामं त्यांनी अखंडपणे न थकता केली.   

या पुस्तकामध्ये पीटरसन यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विद्यापीठ पातळीवरील राजकारण हे आजच्या घाणेरड्या पातळीवर नसेल, पण काही अंशी तरी घसरले होते, हे त्यांच्याशी संबंधित घटनांना जाणून घेताना समजून येते. त्यांचे आणि डॉ. रा. गो. भांडारकर यांचे ताणलेले संबंध, पीटरसन यांची पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये झालेली बदली, पीटरसन यांच्याविरोधात एल्फिन्स्टनमधील विद्यार्थ्यांनी चालवलेली ‘चले जाव’ मोहीम, तसंच त्यांच्यावर संशोधन कार्यामध्ये होत असलेल्या दिरंगाई व खालावलेल्या दर्जासाठी शिक्षा आणि पुढे विद्यापीठाचे कुलसचिव बनल्यावर तेथील सत्ता-संघर्षामध्ये त्यांच्या बौद्धिक, संशोधन आणि नैतिक समर्पित असण्याबद्दल शंका घेणं, अशा अनेक आव्हानांना पीटरसन यांनी तोंड दिलं.

या सर्व घटनाक्रमांमध्ये डॉ. भांडारकर यांच्या नेमणुकीसंबंधित आणि संस्कृत भाषेतील महत्त्वाचे ग्रंथ सार्वजनिक हितासाठी ‘आधुनिक टीकाशास्त्रा’च्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध करण्याच्या प्रकल्पामध्ये त्यांना काही अवघड प्रसंगांना सामोरं जावं लागलं, हे सविस्तरपणे पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये विशद केलं आहे.  

पीटरसन हे स्वत: त्यांच्या संस्कृत पांडुलिपींच्या शोधाबरोबर या विषयातील संशोधन करणाऱ्या बऱ्याच आंतरराष्ट्रीय विद्वानांच्या संपर्कात होते. या विषयावर त्यांचं मार्गदर्शन आणि विशिष्ट पांडुलिपींचा शोध घेण्यासाठी त्यांना बरेच जण देशाच्या बाहेरून विनंती करत. हे काम करता करता त्यांनी पांडुलिपीचं ग्रंथालयं सुरू करण्याचं काम वाढवलं. उत्तम संशोधनासाठी सर्वोत्तम ग्रंथालयं असावी लागतात. त्याबाबतीत त्यांची दृष्टी खूप मोठी आणि दूरगामी होती. परंतु युरोपिअन विरुद्ध भारतीय विद्वान या वादामध्ये ते बऱ्याच संशोधन स्रोतांना परदेशी लोकासांठी खुले करू शकले नाहीत, हेही तितकंच खरं.

पीटरसन यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या व्यक्ती ज्यांच्यावर व ज्यांच्याबरोबरील नात्याबाबतीत हे पुस्तक महत्त्वाचा प्रकाश टाकते, ते आहेत : १) भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे (स्थापना १९१७) रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७- १९२५), २) संस्कृत व भारतीय प्राच्यविद्येचे ज्येष्ठ जर्मन संशोधक जॉर्ज बुहलर (१८३७-१८९८), ३) सर अलेक्झांडर ग्रांट (एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य) आणि ४) काशिनाथ त्र्यंबक तेलंग, संस्कृत अभ्यासक व बॉंबे हायकोर्टातील वरिष्ठ वकील (१८५०- १८९३).

१८८१ मध्ये पीटरसन हे संपूर्ण भारतामध्ये संस्कृत पांडुलिपींचे सर्वेक्षण आणि संकलन करण्याच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये सामील झाले. या प्रकल्पांतर्गत पीटरसन यांच्यावर उत्तर भारताची जबाबदारी होती. त्यांनी यासाठी तत्कालीन बॉम्बे संस्थान, राजपुताना संस्थान, आणि मध्य प्रांतामध्ये जयपूर, पुष्कर, अजमेर, पुष्कर, चित्तोड, उदयपूर, अहमदाबाद, मेवाड, बूंदी, खंबायत, कोटा, झालरा पठाण, काठियावाड यासह अनेक ठिकाणी प्रवास करून संस्कृत हस्तलिकिथं शोधून, त्यांचं संकलन-जतन, तसंच त्यांचे ऐतिहासिक व संशोधन मूल्य निश्चित करण्याचं काम केलं. या राष्ट्रीय पांडुलिपी प्रकल्पातील त्यांच्या संशोधन कामाचं नंतर प्राच्यविद्याकार भांडारकर यांनी खूप कौतुकही केलं. त्याच सुमारास मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय, प्रसिद्ध राजाभाई टॉवर व जहांगीर हॉलचं उदघाटनही पीटरसन यांच्या कारकिर्दीत झालं, हे विशेष.

या पुस्तकामध्ये बॉंबे एशियाटिक सोसायटीबरोबरच आणखी काही महत्त्वाच्या संस्थानच्या बौद्धिक आणि वैचारिक उलाढालीबद्दल थोडा प्रकाश टाकला आहे. उदा. १) बॉम्बे ब्रांच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन (BBRASGB), २) अँथ्रोपॉलिजिकल सोसायटी ऑफ बॉंबे, ३) बॉम्बे जिओग्राफीकल सोसायटी (BGS), ४) लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे, ५) बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (BNHS).

पीटरसन यांच्यावरील गणेरी यांच्या पुस्तकामध्ये काही महत्त्वाचे ऐतिहासिक प्रश्न सुप्त स्वरूपात आपला पाठलाग करतात, ते पीटरसन यांच्या संशोधनाच्या कारकिर्दीच्या आढाव्याच्या निमित्त्ताने समोर आले आहेत.

१) साम्राज्यवादी सत्ता जेव्हा आपली सत्ता ज्ञान-विज्ञान संशोधनाच्या रडारवरून आरेखित करतात आणि त्याचा वापर करून पुढील सत्तेचे सारीपाट खेळतात तेव्हा पीटरसनसारखे शिक्षक-संशोधक-प्रशासक नक्की कोणाच्या हिताची सेवा करतात?

२) जर ते कोणत्याही प्रकारे भारतीय जनतेची सेवा करत असतील तर त्याचं मूल्यमापन आपल्याला निष्ठुर वस्तुनिष्ठतेनं करणं शक्य आहे का?  

३) जेव्हा पाश्चात्य देश भारतीय उपखंडामध्ये संस्कृत-प्राकृत-पाली किंवा इतर सांस्कृतिक विरासतीचं/वारशाचं संशोधनाच्या चष्म्यातून जतन करतात, तेव्हा ते येथील समाजातील काही ज्वलंत प्रश्नांकडे नव्याने प्रागतिक दृष्टिकोनातून पाहण्याची एक बौद्धिक/विवेकी दृष्टी देतात का?

४) इंग्लिश (किंवा पाश्चात्य) लेखक-संशोधक यांचे भारतीय स्थानिक ज्ञान सेवक व संशोधन हस्तक यांच्याबरोबरचे नातेसंबंध, हे नेहमी मालक-नोकर असेच असते का? संशोधनामध्ये तृणमूल पातळीवर सहभाग व योगदान देणाऱ्या भारतीय लोकांना याचा लाभ, सार्वजनिक प्रशंसा आणि योग्य तो आर्थिक (किंवा योग्य तो ) मोबदला मिळतो का? जर मिळाला नसेल तर का नाही आणि असेल तर कोणत्या प्रमाणात-स्वरूपात?

हे सर्व प्रश्न पीटर पीटरसन यांच्या व्यक्तिमत्त्वातील व आयुष्यातील सकारात्मक योगदानाचं पानापानावर स्मरण करून देतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील व जीवनातील ज्ञानवर्धक लेखक, विद्यापीठ विकासक, ग्रंथालयप्रेमी, संशोधन-उपासक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, अथक परिश्रम करणारा शिक्षण-सेवक या ठळक छटा उठून दिसतात. तसंच स्थानिक ते आंतरराष्ट्रीय या सर्व पातळ्यांवर संस्कृत भाषा असेल किंवा भारतीय संस्कृतीचं उत्खनन असेल, त्याबद्दल सातत्याने संवाद साधणारा आणि त्यासाठी अनंत प्रवासाचं स्वप्न घेऊन आलेला एका स्कॉटिश-इंग्लिश-हिंदुस्तानी-मराठी माणसाचं छोटेखानी चरित्र लिहिताना त्यांच्या एशियाटिक सोसायटीच्या कामाचाही सुंदर गौरव या पुस्तकात केला आहे. पुस्तकाच्या शेवटी असलेली वीस पानांची नोंद-परिशिष्ट आणि दहा पानांची संदर्भ-सूची त्यांच्या भरघोस प्रयत्नांची साक्ष देतात, हेच या पुस्तकाच्या संशोधन मूल्याबाबतीत योग्य निरीक्षण ठरेल.

---------------------------------------------------------------------------------------------------

PETER PETERSON: FOUNDERS AND GUARDIANS OF THE ASIATIC SOCIETY OF MUMBAI By Namrata Ganneri. General Editor : Aroon Tikekar,
Indus Source Books for The Asiatic Society of Mumbai, Mumbai, Mumbai, Pages : 122, Price : 125 rs.

---------------------------------------------------------------------------------------------------

लेखक सार्क विद्यापीठ, दिल्ली इथं अध्ययन करत आहेत.

creativityindian@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......