‘आम्हीही भारताचे लोक’ : तृतीयपंथीयांबद्दलच्या पूर्वग्रहांनी सामाजिक मानसिकतेला प्रचंड विळखा घातला आहे. त्यातून सुटायचे असेल, तर आपल्या पूर्वग्रहांचे ‘डी-कंडिशनिंग’ करावे लागेल!
ग्रंथनामा - झलक
अंजली जोशी
  • ‘आम्हीही भारताचे लोक’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 22 December 2023
  • ग्रंथनामा झलक आम्हीही भारताचे लोक Aaamhihee Bhartache Lok तृतीयपंथी एलजीबीटीक्यू हिजडा Hijadaa

तृतीयपंथी/पारलिंगी समुदायाच्या व्यथा आणि त्यांच्या निवारणासाठी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, शासकीय अशा विविधांगी दृष्टिकोनांतून विचार मांडणारे ‘आम्हीही भारताचे लोक’  प्रकाशित हे पुस्तक नुकतेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र कार्यालयाद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. १४ व १५ सप्टेंबर २०२३ दरम्यान पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या परिषदेतील चर्चा या पुस्तकात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तृतीयपंथी/पारलिंगी समुदायाला भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हानांबद्दल समाजामध्ये जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्याचे काम करणाऱ्या या पुस्तकाचे संपादन डॉ. दीपक पवार (विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ) यांनी केले आहे. या पुस्तकाला समुपदेशन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अंजली जोशी यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

समाजातील उपेक्षित व वंचित व्यक्तींना निदान सहानुभूती किंवा कणव तरी मिळते, परंतु तृतीयपंथीयांना तीही मिळत नाही. सार्वजनिक जीवनात तृतीयपंथीयांशी जवळजवळ सगळ्यांचाच कधी ना कधी संबंध येतो, पण एकाही व्यक्तीला तृतीयपंथीयांना ‘तुझं नाव काय?’ असा साधा माणुसकीचा प्रश्नही विचारावासा वाटत नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. तृतीयपंथीयांबाबत समाजाची मानसिकता नकारात्मक का असते किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तृतीयपंथी का उपेक्षित राहिले आहेत, अशा अनेक प्रश्नांचा शोध मी घेत होते. हा शोध घेत असताना या प्रश्नाचे अनेक पैलू माझ्यासमोर उलगडत गेले.

तृतीयपंथीयांबाबत समाजाच्या असलेल्या नकारात्मक मानसिकतेचे मुख्य कारण म्हणजे सामाजिक पूर्वग्रहांचे होणारे प्रचंड कंडिशनिंग. हे कंडिशनिंग इतक्या मोठ्या प्रमाणात होते, की वेगळा विचार करण्याची क्षमताच आपण हरवून बसतो. या ‘कंडिशनिंग’ची सुरुवात बालपणातील संस्कारक्षम वयापासून होते. लहान मुले जेव्हा तृतीयपंथीयांना पहिल्यांदा बघतात, तेव्हा त्यांच्याबद्दल भीती उत्पन्न करण्याचे काम पालक करत असतात. ‘हे तुला पळवून नेतील’, असा धाक मुलांना घालतात. सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथी कसा त्रास देतात, बाळ जन्माला आले की पैसेवसुली कशी करतात, याच्या कहाण्या पालक मुलांना ऐकवतात. तृतीयपंथी सर्वसामन्यांपेक्षा वेगळे दिसत असल्यामुळे ते नक्की कोण आहेत, कसे आहेत, याबाबतचे प्रश्न मुलांनी कुतूहल वाटून विचारले, तर त्यांची समाधानकारक उत्तरे पालक देऊ शकत नाहीत. कारण, पालकांनाच ती उत्तरे माहीत नसतात किंवा ती माहीत करून घ्यावीत, असे त्यांना कधी वाटत नाही. कारण तेही या ‘कंडिशनिंग’चे बळी असतात. त्यांच्या समग्र विचारांत तृतीयपंथीयांबद्दलच्या विचारांना नगण्य स्थान असते. ते इतके नगण्य असते की, जणू काही तृतीयपंथी अस्तित्वातच नाहीत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अनेकदा पूर्वग्रह हे नेणिवेच्या पातळीवर (unconscious biases) असतात. त्यांची स्पष्ट जाणीव आपल्याला असतेच असे नाही. मात्र तृतीयपंथीयांबद्दलचे पूर्वग्रह हे नेणिवेबरोबर जाणिवेच्या पातळीवरही (conscious biases) कार्यरत असतात व तरीही ते पूर्वग्रह आहेत याची जाणीवही कित्येकांना नसते.

तृतीयपंथीयांबद्दलचे असणारे सामाजिक पूर्वग्रह हे फक्त खोल असतात असे नाही, तर त्यांची व्याप्तीही मोठी असते. पूर्वग्रहांच्या प्रकारांकडे नजर टाकली, तर तृतीयपंथीयांबद्दल जवळजवळ सगळ्या प्रकारचे पूर्वग्रह जोपासले जातात. यातले मुख्य प्रकार म्हणजे-

अप्रगट पूर्वग्रह (Implicit Bias) - हे पूर्वग्रह सुप्तपणे जोपासले जातात. उदाहरणार्थ, तृतीयपंथी व्यक्ती डोळ्यांसमोर आल्यावर नकळतपणे भीती व घृणा या नकारात्मक भावना मनात निर्माण होणे.

प्रगट पूर्वग्रह (Explicit Bias) - हे पूर्वग्रह प्रगटपणे जोपासले जातात. उदाहरणार्थ, तृतीयपंथी व्यक्ती समोर आल्यावर त्यांच्यापासून दूर जाणे.

व्यवस्थात्मक किंवा संस्थात्मक पूर्वग्रह (Systematic or Institutional Bias) - हे पूर्वग्रह जोपासण्यास व्यवस्था किंवा संस्था व्यापक पातळीवर हातभार लावतात. उदाहरणार्थ, शैक्षणिक अभ्यासक्रमातील मजकुरात स्त्री-पुरुष असे ‘बायनरी’ उल्लेख व त्याला अनुसरून सर्वनामे वापरली जातात. ‘नॉन-बायनरी’ उल्लेख जवळपास नसतातच.

जवळिकीचा पूर्वग्रह (Affinity Bias) - यात आपल्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तींबद्दल आत्मीयता वाटते व वेगळ्या दिसणाऱ्या किंवा वागणाऱ्या व्यक्तींबद्दल पूर्वग्रह जोपासला जातो. तृतीयपंथी वेगळे दिसत असल्याने या पूर्वग्रहाचे शिकार होतात.

प्रगट व सूक्ष्म आक्रमकता (Macro & Microaggression) - बहुतेक तृतीयपंथी हे लैंगिक अत्याचारांना बळी पडलेले असतात, म्हणजेच प्रगट आक्रमकतेचे बळी असतात. याशिवाय रोजच्या जीवनात संपर्कात येणाऱ्या जवळपास सगळ्याच व्यक्तींकडून त्यांना अपशब्द, टोमणे, कुत्सित शेरे, टिंगल यांच्याशी म्हणजेच सूक्ष्म आक्रमकतेशी सामना करावा लागतो.

तृतीयपंथीयांबद्दलच्या पूर्वग्रहांनी सामाजिक मानसिकतेला घातलेला विळखा किती प्रचंड आहे, हे यावरून लक्षात येईल. यातून सुटायचे असेल, तर या पूर्वग्रहांचे ‘डी-कंडिशनिंग’ करावे लागेल. हे ‘डी-कंडिशनिंग’ वयाच्या कोणत्याही टप्प्यावर करता येते. परंतु, शालेय जीवनापासून या डी-कंडिशनिंगची सुरुवात केली तर पूर्वग्रह मूळ धरण्याआधीच उखडले जातील. मुलांना पूर्वग्रहांच्या मानसिकतेचे वाहक बनणे थांबवायचे असेल, तर पालक, शिक्षक, समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या प्रभावी व्यक्ती अशा प्रेरणास्रोतांच्या माध्यमातून जागृती करणे व मुलांना अधिक संवेदनशील बनवणे गरजेचे आहे.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

पूर्वग्रहांचे डी-कंडिशनिंग करण्यासाठी एक महत्त्वाचे प्रारूप वापरले जाऊ शकते. या प्रारूपाचे नाव आहे, ‘पाहा, शिका, करा, शोधा’. या प्रारूपात पुढील चार पायऱ्यांचा समावेश होऊ शकतो-

पाहा - अंतरंगात डोकावून पाहा - ही पहिली पायरी आहे. या पायरीवर अंधानुकरण न करता आपण जे वर्तन करत आहोत, ते योग्य आहे का, याचा अंतर्मुख होऊन विचार करणे अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ, इतर करत आहेत म्हणून तृतीयपंथी व्यक्तीची टिंगल करणे हे वर्तन योग्य आहे का, याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.

शिका - इतरांकडून शिका - आपल्यापेक्षा भिन्न लोकांबद्दल जाणून घेण्यास व त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकण्यास या पायरीवर उत्तेजन दिले जाते. भिन्नता म्हणजे अपसामान्यता (abnormality) नव्हे, तर भिन्नतेचे स्वागत केले पाहिजे, हे या पायरीवर बिंबवले जाते. उदाहरणार्थ, तृतीयपंथी व्यक्ती कोणत्या गोष्टींत भिन्न आहेत, भिन्न वैशिष्ट्यांमुळे समाज समृद्ध कसा होतो, भिन्नतेचा समावेश मुख्य प्रवाहात कसा करता येईल, इत्यादींचा विचार या पायरीवर केला जातो.

करा - संवाद सुरू करा - प्रत्यक्ष संवाद साधण्यास सुरुवात करणे, ही तिसरी पायरी आहे. उदाहरणार्थ, तृतीयपंथी व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्याबद्दलचे गैरसमज खोडून काढता येतात. शाळा-कॉलेजात ज्या तृतीयपंथी व्यक्ती सकारात्मक ‘रोल मॉडेल’ होऊ शकतील, अशांना आमंत्रित करून संवाद साधण्यास प्रोत्साहन दिले तर नकारात्मक मानसिकतेची मुळे छाटली जातील.

शोधा - नवीन पर्याय शोधा - नवीन पर्याय शोधून विचारदृष्टी विस्तारित करणे ही शेवटची पायरी आहे. आधीच्या पायऱ्यांवर काम केले, तर खुली विचारदृष्टी विकसित होण्यास मदत होते व समाजाने संक्रमित केलेले पूर्वग्रह नाकारण्याची क्षमता व्यक्तीमध्ये निर्माण होते. उदाहरणार्थ, या पायरीपर्यंत पोहोचल्यास तृतीयपंथीयांबद्दलची नकारात्मक मानसिकता दूर होऊन एक व्यक्ती म्हणून त्यांचा स्वीकार केला जाईल व त्यांचे मुख्य प्रवाहात सामायिकीकरण कसे होईल, याबद्दल नवीन पर्याय शोधले जातात.

या प्रारूपाची उपयुक्तता मोजण्यासाठी व तृतीयपंथीयांशी संबंधित अनेक मुद्द्यांचा शोध घेण्यासाठी मी काही प्रकल्प राबवले. शोधाचा हा प्रवास अजूनही चालूच आहे. अशा टप्प्यावर असताना तृतीयपंथीयांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले ‘आम्हीही भारताचे लोक’ हे प्रस्तावना लिहिण्यासाठी माझ्याकडे आले. आणि ज्या विषयाबाबतचा माझा शोधप्रवास चालू आहे, तो अधिक समृद्ध होण्याची संधी मला मिळाली.

वाचकांना चिंतनशीलतेला प्रवृत्त करणे हे सकारात्मक मानसिकता जोपासण्याच्या प्रयत्नांमधले महत्त्वाचे पाऊल आहे. या पुस्तकामुळे हे पाऊल उचलले गेले. आहे. तृतीयपंथीयांबद्दलच्या सर्वंकष माहितीचे एक मोठे दालनही या पुस्तकामुळे उघडले गेले आहे. तृतीयपंथीयांबद्दलची सामाजिक मानसिकता सकारात्मक करण्यात व त्यांच्याबद्दलच्या पूर्वग्रहांचं उच्चाटन करण्यास हे पुस्तक कळीची भूमिका बजावेल; तसेच त्यांच्या लढ्यास कृतिशील बळ पुरवेल, अशी मला आशा आहे.

प्रस्तुत पुस्तकाचे बीज हे १४-१५ सप्टेंबर २०२२ या कलावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या ‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर झालेल्या परिषदेत आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या या विषयावर परिषद घेण्याची कल्पना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सुचली व विद्यापीठाच्या सहकार्याने त्यांनी ती अमलात आणली. राज्यपातळीवर अशी परिषद घेणे व त्यावर विविधांगी चर्चा घडवून आणणे हे सामाजिक जाणिवा विस्तारण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘पाहा-शिका-करा-शोधा’ या मॉडेलचे प्रत्यक्षात अवलंबलेले ते उपयोजन आहे.

त्याही पुढचे पाऊल म्हणजे, या परिषदेत व्यक्त झालेल्या विचारांचा वेध घेणारे पुस्तक प्रकाशित करणे. या परिषदेत चर्चिलेले अनेक मुद्दे व त्या जोडीने जे मुद्दे पुरेसे स्पष्ट झाले नव्हते, त्यांचाही समावेश करून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. या पुस्तकामुळे या विषयावरचा एक कायमस्वरूपी दस्तावेज तयार झाला आहे. शिवाय, पुस्तकरूपात असल्यामुळे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल व या विषयाबद्दल अधिकाधिक जागृती होईल, अशी आशा करण्यास हरकत नाही. हे पाऊल उचलल्याबद्दल अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, संपादक डॉ. दीपक पवार व संपादन-साहाय्य करणाऱ्या साधना गोरे व इतर संबंधितांचे मन:पूर्वक अभिनंदन!

प्रस्तुत पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाचा आकृतिबंध सर्वसामान्यपणे आढळून येणाऱ्या रूढ आकृतिबंधापेक्षा वेगळा आहे. यात एकच एक कथन सलगपणे केले गेले नाही; तर कथनाची वेगवेगळी माध्यमे या पुस्तकात समाविष्ट आहेत. यात चर्चा आहेत, भाषणे आहेत, मनोगते आहेत, मुलाखती आहेत. पाणी जसे खळाळतपणे वाहत पुढे जात राहते व वाटेत येणाऱ्या पाण्याच्या सर्व प्रवाहांना एकत्र घेऊन प्रवास करत राहते, तसा या पुस्तकाचा सर्व माध्यमांतून प्रवास होत राहतो.

हे प्रवाह एकमेकांत इतके मिसळून गेले आहेत, की आपण चर्चा संपवून मनोगत कधी वाचतोय किंवा मुलाखतीपर्यंत कधी पोहोचतोय, त्याचा पत्ता लागत नाही. यातल्या काही अभिव्यक्ती धबधब्याप्रमाणे कोसळणाऱ्या आहेत, काही नदीच्या शांत प्रवाहाप्रमाणे संयतपणे वाहणाऱ्या आहेत तर काही समुद्राच्या लाटांप्रमाणे खळाळत राहणाऱ्या आहेत. या अभिव्यक्ती वाचकांना कधी हेलावून सोडतात, कधी पिळवटून टाकतात, कधी अचंबित करतात, तर कधी कौतुकाची दाद द्यायला लावतात. पण मुख्य म्हणजे त्या वाचकांना विचारप्रवृत्त करतात. या सगळ्या अभिव्यक्ती इतक्या पारदर्शक व खऱ्याखुऱ्या आहेत की, हे पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकांना खिळवून ठेवते.

या पुस्तकात तृतीयपंथीत्व स्वीकारलेल्या मुलांच्या पालकांशीही संवाद साधला गेला आहे. हे पालक अनेक चढ-उतारांतून गेले आहेत. सुरुवातीला बसलेल्या धक्क्यापासून ते स्वतःच्या मुलांचे तृतीयपंथीत्व स्वीकारण्याचा त्यांचा प्रवास व त्यांनी स्वतःशी व समाजाशी दिलेली लढाई अस्वस्थ करणारी आहे. समष्टीवादी संस्कृतीचा प्रभाव असलेल्या आपल्या समाजात पालकांवरचे सामाजिक दडपण किती प्रचंड असते व त्यातून कोणते अघोरी प्रकार घडू शकतात, हे वाचून मन विषण्ण होते.

एकाच पुस्तकात ही सर्व माध्यमे एकत्र गुंफण्यात संपादकांचे कौशल्य तर दिसतेच, पण पुस्तकाच्या आकृतिबंधातून सर्वसमावेशकतेचे दर्शनही घडते, जे विषयाच्या आशयाशी अत्यंत सुसंगत आहे. हे सामायिकीकरण फक्त माध्यमांतच नाही तर ते भाषांमध्येही आहे. पुस्तकातील भाषा बहुतांशी मराठी असली तरी हिंदी भाषाही यात सामावून घेतलेली आहे. तसेच पुस्तकात येणाऱ्या काही टिप्पण्या या प्रासंगिक असल्या, तरी संपादित न करता त्या जशाच्या तशा नमूद केल्यामुळे त्यामधला सच्चेपणा मनाला भिडतो.

या पुस्तकात तृतीयपंथीयांच्या कहाण्या तर आहेतच, पण त्या जोडीने त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थेतील व्यक्तींचे कथन आहे, राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी अशा अनेकांची मनोगते आहेत. त्यामुळे पुस्तक एकारलेले न होता बहुविध आयामांतून या विषयाची चर्चा होताना दिसते. तुकड्यातुकड्यांत माहिती न मिळता साकल्याने या विषयाचा विचार करण्यास व पुस्तकाला समग्रतेचे स्वरूप प्राप्त करून देण्यास हे आयाम हातभार लावतात.

तृतीयपंथीयांच्या अनेक समस्या या पुस्तकात मांडल्या आहेत. त्या काय आहेत ते समाजापर्यंत पोहोचणे व त्यांच्याबद्दल जागृती होणे अपेक्षित आहे. परंतु फक्त समस्या मांडून हे पुस्तक थांबत नाही, तर या समस्यांच्या निवारणासाठी काय करता येईल, याचा ऊहापोहही राजकीय पक्ष, शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक संस्था, शासकीय विभाग अशा वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून त्यात केला आहे. त्यामुळे हे पुस्तक कृतिशीलतेला चालना देणारे आहे आणि हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

पुस्तकातील चर्चांतून कृतिशीलतेशी संबंधित अनेक मुद्दे सामोरे येतात. शैक्षणिक क्षेत्रापासून ते शासकीय व राजकीय पातळीवर तृतीयपंथीयांच्या विकासासाठी काय केले जाते, कोणते पुढाकार घेतले जातात, त्यांच्या रोजगारासाठी काय प्रयत्न केले जातात, त्यांना कोणते प्रशिक्षण दिले जाते, त्यांच्यासाठी कोणत्या योजना आखल्या आहेत, त्यांना निधी कसा प्राप्त करून दिला जातो, तृतीयपंथीयांच्या कायद्यातील शिक्षा व दंडाच्या तरतुदींमधील त्रुटी कशा भरून काढल्या पाहिजेत, शिक्षणव्यवस्थेत किंवा राजकीय धोरणांत काय बदल करावयास पाहिजे, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर पुस्तकात प्रकाश टाकला आहे.

सर्वसामान्यांच्या मनात असलेले अनेक गैरसमज या पुस्तकाच्या वाचनाने दूर होतात. तृतीयपंथी म्हणजे हिजडा असे सरसकट मानले जाते, पण हिजडा होणे हा विधी आहे, हे पुस्तकातून कळते. ‘जेंडर डिस्फोरिया’ऐवजी ‘जेंडर इनकॉन्ग्रुअन्स’ हा शब्द वापरणे का उचित आहे, याबद्दलची दृष्टी विकसित होते. त्याचबरोबर ‘बायसेक्शुअल’ आणि ‘क्रॉस-डेसर’ यांतला फरक किंवा ‘ट्रान्समॅन’ व ‘ट्रान्सवुमन’ यांतील फरक, जोगता व तृतीयपंथी यांमधील फरक, अशा अनेक संज्ञांमधील फरक सर्वसामान्यांना माहीत नसतो. पुस्तकातील चर्चातून तो उलगडत जातो.

या समुदायासाठी काम करणाऱ्या संस्था कोणते प्रकल्प चालवतात, कोणत्या सुधारणांसाठी प्रयत्न करतात, लिंगभावाशी संबंधित प्रशिक्षण कसे देतात, भीक मागणे व सेक्स वर्क सोडवण्यास कसे प्रोत्साहित करतात, अशा उद्बोधक मुद्द्यांची चर्चा आहे. या जोडीने तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी काय केले पाहिजे किंवा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक सर्वसमावेशकता आणण्यासाठी सर्व पातळ्यांवर काय प्रयत्न केले पाहिजेत, अधिक व्यापक पातळीवरच्या मुद्द्यांचाही समावेश यात केला आहे.

तृतीयपंथीयांना अनेक समस्या असल्या तरी त्यांची मानसिकता ‘बळी’ (victim) असल्याची नाही, हे अधोरेखित करण्यासाठी व्यावसायिक जगात यशस्वीपणे वावरणाऱ्या तृतीयपंथीयांचे अनुभव पुस्तकात व्यक्त केले आहेत. त्यात त्यांनी स्वतःशी, कुटुंबाशी व समाजाशी दिलेल्या लढतीचे चित्र वाचावयास मिळते. त्यांनी दाखवलेले असामान्य धैर्य व प्रबळ मनोधारणा, यातून आम्ही केवळ समस्या मांडत नाही, तर आव्हानांना तोंड देऊन यशस्वी ठरलो आहोत, हा भक्कम सकारात्मक संदेश मिळतो.

एका निवेदनात निष्ठा निशांत म्हणतात, “आयुष्यात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींकडे मी संधी म्हणून पाहिलं. त्याचा कधी ताण घेतला नाही.” (पृ. ११८) खडतर प्रवासातही आशावाद कसा जागता ठेवावा, याची प्रचीती या निवेदनातून येते. अशी अनेकांनी केलेली निवेदने ही तृतीयपंथीयांसाठी दिल्या जाणाऱ्या लढ्यामध्ये ‘पॉझिटिव्ह रोल मॉडेल्स’ म्हणून प्रतिनिधित्व करू शकतात.

हे पुस्तक अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करते. एकटया महाराष्ट्रातच तृतीयपंथीयांची संख्या चार ते पाच लाख आहे, हे कळल्यावर या विषयाचा आवाका किती बहुव्याप्त आहे, हे लक्षात येते. ‘तृतीयपंथी’ या शब्दातील तिसरेपणाचा भेदभाव नाहीसा करण्यासाठी 'पारलिंगी' शब्दाचा वापर करावा, ही सूचना पुस्तकात वाचावयास मिळते किंवा तृतीयपंथीयांची सांकेतिक भाषा असते, याचा पत्ता लागतो.

तृतीयपंथीयांना अनेक समस्या असल्या तरी त्यांची मानसिकता ‘बळी’ (victim) असल्याची नाही, हे अधोरेखित करण्यासाठी व्यावसायिक जगात यशस्वीपणे वावरणाऱ्या तृतीयपंथीयांचे अनुभव पुस्तकात व्यक्त केले आहेत. त्यात त्यांनी स्वतःशी, कुटुंबाशी व समाजाशी दिलेल्या लढतीचे चित्र वाचावयास मिळते. त्यांनी दाखवलेले असामान्य धैर्य व प्रबळ मनोधारणा, यातून आम्ही केवळ समस्या मांडत नाही, तर आव्हानांना तोंड देऊन यशस्वी ठरलो आहोत, हा भक्कम सकारात्मक संदेश मिळतो.

भारतामध्ये तृतीयपंथीयांची कायद्याची लढाई कधी सुरू झाली, त्यांचे वेगवेगळे गट, संस्कृती कोणती आहे, 'एलजीबीटीक्यू मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या संज्ञा व त्यांचे अर्थ, तृतीयपंथीयांना मिळणारी माणूसकीशून्य वागणूक, शौचालयासारख्या गरजेच्या सुविधांमध्ये केला जाणारा भेदभाव, रस्त्यावरून चालताना किंवा टॅक्सीतून फिरताना येणारे हृदयशून्य अनुभव, कर्ज मिळण्यात किंवा सरकारी दस्तावेज अथवा लिंग ओळखपत्र मिळण्यातील अडचणी, तृतीयपंथीयांबद्दल प्रसारित होणाऱ्या अन्यायकारक व खोट्या बातम्या, त्यांच्या आरोग्याचे व निवाऱ्याचे प्रश्न, त्यांच्या घरांचे प्रश्न, स्थलांतरित समुदायांचे प्रश्न, गरिमा गृहतील असुरक्षितता, लिंगबदल शस्त्रक्रिया व हार्मोन्स थेरपी यातील अडचणी, असे बहुविध मुद्दे वाचताना तृतीयपंथीयांबद्दलची सामाजिक असहिष्णुता किती खोलवर रुजली आहे, व तिचे उच्चाटन करणे किती तातडीचे आहे, याचा प्रत्यय येतो.

सर्वसामान्यांच्या मनात असलेले अनेक गैरसमज या पुस्तकाच्या वाचनाने दूर होतात. तृतीयपंथी म्हणजे हिजडा असे सरसकट मानले जाते, पण हिजडा होणे हा विधी आहे, हे पुस्तकातून कळते. ‘जेंडर डिस्फोरिया’ऐवजी ‘जेंडर इनकॉन्ग्रुअन्स’ हा शब्द वापरणे का उचित आहे, याबद्दलची दृष्टी विकसित होते. त्याचबरोबर ‘बायसेक्शुअल’ आणि ‘क्रॉस-डेसर’ यांतला फरक किंवा ‘ट्रान्समॅन’ व ‘ट्रान्सवुमन’ यांतील फरक, जोगता व तृतीयपंथी यांमधील फरक, अशा अनेक संज्ञांमधील फरक सर्वसामान्यांना माहीत नसतो. पुस्तकातील चर्चातून तो उलगडत जातो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

याबाबत लक्ष्य अरोड़ा यांनी केलेले निवेदन बोलके आहे. ते म्हणतात, ‘खुद्द डॉक्टरांनाही ट्रान्सजेंडर आणि इंटरसेक्समधला फरक माहीत नसतो.’ (पृ. ८५). अशा अनेक संज्ञा- संकल्पना मुळातून समजण्यासाठी पुस्तकामधल्या परिशिष्टामध्ये अनेक टिपा नमूद केल्या आहेत व त्या अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच परिषदेत मांडलेले अनेक ठरावही परिशिष्टात सारांशाने नमूद केले असल्यामुळे वाचकांसाठी झटपट संदर्भ उपलब्ध होतो.

भाषा, साहित्य, पत्रकारिता, चित्रपट यांत तृतीयपंथीयांचे स्थान काय आहे व त्यांचे चित्रण कसे होते, यावरील चर्चेचा पुस्तकात अंतर्भाव आहे. अनेक चित्रपटांत तृतीयपंथीयांचे चित्रण विनोदी किंवा खलनायकी पद्धतीने केले असले तरी तृतीयपंथीयांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या काही उत्तम चित्रपटांची माहितीही या चर्चांमधून मिळते. उदाहरणार्थ, ‘चंदिगढ करे आशिकी’ हा मुख्य प्रवाहातला हिंदी चित्रपट तसेच ‘अरेक्ती प्रेमर गोल्पो’, ‘हरिकथा प्रसंगे’, किंवा ‘नानू अवनाल्ला... अवलु’ (I am not He... She) यांसारख्या प्रादेशिक चित्रपटांची माहिती वाचकांचे माहितीविश्व विस्तारण्यास मदत करतात.

या पुस्तकात तृतीयपंथीत्व स्वीकारलेल्या मुलांच्या पालकांशीही संवाद साधला गेला आहे. हे पालक अनेक चढ-उतारांतून गेले आहेत. सुरुवातीला बसलेल्या धक्क्यापासून ते स्वतःच्या मुलांचे तृतीयपंथीत्व स्वीकारण्याचा त्यांचा प्रवास व त्यांनी स्वतःशी व समाजाशी दिलेली लढाई अस्वस्थ करणारी आहे. समष्टीवादी संस्कृतीचा प्रभाव असलेल्या आपल्या समाजात पालकांवरचे सामाजिक दडपण किती प्रचंड असते व त्यातून कोणते अघोरी प्रकार घडू शकतात, हे वाचून मन विषण्ण होते.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

तृतीयपंथीयांबद्दलच्या अनेक पैलूंचा साकल्याने विचार करावयास लावणाऱ्या या पुस्तकात काही मुद्दे मात्र निसटले आहेत. त्याचा विस्तृत परामर्श घेतला असता, तर पुस्तक अधिक परिपूर्ण झाले असते. उदाहरणार्थ, लिंगओळखपत्राचा पुस्तकात फक्त उल्लेख आहे, परंतु त्यावर होणाऱ्या उलटसुलट चर्चेबद्दलचे भाष्य समाविष्ट केले नाही.

तसेच ‘हिजडा संस्कृती’चा उल्लेख पुस्तकात आला असला तरी त्याचे विस्तृत विवेचन आलेले नाही. ‘तृतीयपंथीयांचे मानसिक आरोग्य’ हा विषय पुस्तकात ओघाने येत असला, तरी त्यास स्वतंत्र स्थान दिले गेले नाही. तसे दिले असते, तर या विषयाचे महत्त्व जास्त अधोरेखित झाले असते. सध्याच्या काळात मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या प्रश्नांत मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, तृतीयपंथीयांना कोणत्या मानसिक समस्या असतात, त्यांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतात, त्यांच्याशी ते कसा सामना करतात, त्यांना कोणती सपोर्ट सिस्टीम मदत करते, मानसोपचारतज्ज्ञांची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचते का, अशा प्रश्नांचा आढावा पुस्तकात घेतला गेला असता, तर या दुर्लक्षित परंतु महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल आकलन होऊ शकले असते.

प्रस्तावनेचा समारोप करताना पुस्तकातील काही मौलिक विचारदृष्टी वाचकांच्या नजरेस आणून देण्याचा मोह मला आवरत नाही. या विचारदृष्टी पुस्तकाची आशयघनता तर वाढवतातच, पण वाचकांना अंतर्मुखही करतात. अशा अनेक मौलिक विचारदृष्टी पुस्तकभर विखुरलेल्या आहेत. त्यातील काही वानगीदाखल नमूद करत आहे -

- वेगळेपणाला वाकडेपणा संबोधणारी दिशा पिंकी शेख यांची ‘तू सरळ मी वाकडा’ (पृ. ७३) ही हृद्य कविता समाजाच्या दुटप्पीपणावर आसूड ओढते.

- जमीर कांबळे म्हणतात, “कोणाचंही त्याच्या शारीरिक गुणधर्मावरून वर्गीकरण करणं हेच मुळात चुकीचं आहे... कारण ही ओळख शोषणाला आणखीनच निमित्त ठरते.” (पृ. ८३).

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

- जोया लोबो म्हणतात, “आमच्या शाळेच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावरच ‘सर्व भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा लिहिलेली आहे. त्या बांधवांमध्ये आमचा समावेश का नाही?” (पृ. ९०).

- सान्वी जेठवाणी म्हणतात, “टॉयलेट, घर, रोजगार यांपैकी काही देऊ नका, तर सगळ्यात आधी तुमच्या हृदयात स्थान द्या. मग बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतील.” (पृ. १११).

- प्रणित हाटे म्हणतात, “They laugh at me because I am different; but I laugh at them because of they all are same." (पृ. ११७).

- शमिभा पाटील म्हणतात, “मातृत्वाला जसा लिंगभाव नसतो, तसा कौशल्यालाही लिंगभाव नसतो.” (पृ. १३८).

- दिशा पिंकी शेख म्हणतात, “मी लैंगिकतेचं सार्वत्रिकीकरण करते, Every person in life is one time bisexual. आपण आपल्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला एकदा तरी म्हणालेलोच असतो, किती भारी दिसतोस, मुलगी असतीस तर तुला प्रपोज केलं असतं किंवा चिकनी दिसतेस, पोरगा असतास तर उचलून नेलं असतं.” (पृ. १९८).

अशा अनेक विचारदृष्टी वाचताना आपण थबकतो, प्रतिबिंबित होतो, आत्मपरीक्षण करतो, चिंतनशील होतो. वाचकांना चिंतनशीलतेला प्रवृत्त करणे हे सकारात्मक मानसिकता जोपासण्याच्या प्रयत्नांमधले महत्त्वाचे पाऊल आहे. या पुस्तकामुळे हे पाऊल उचलले गेले. आहे. तृतीयपंथीयांबद्दलच्या सर्वंकष माहितीचे एक मोठे दालनही या पुस्तकामुळे उघडले गेले आहे. तृतीयपंथीयांबद्दलची सामाजिक मानसिकता सकारात्मक करण्यात व त्यांच्याबद्दलच्या पूर्वग्रहांचं उच्चाटन करण्यास हे पुस्तक कळीची भूमिका बजावेल; तसेच त्यांच्या लढ्यास कृतिशील बळ पुरवेल, अशी मला आशा आहे. वाचक या पुस्तकाचे स्वागत करतील, अशा शुभेच्छाही मी व्यक्त करते.

‘आम्हीही भारताचे लोक’ – संपादक डॉ. दीपक पवार

प्रकाशक – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

पाने – ३२२ | मूल्य – १५० रुपये.

हे पुस्तक हवे असल्यास आपले नाव, संपर्क, पिनकोडसह संपूर्ण पत्ता आणि पुस्तकाच्या अपेक्षित प्रती ही माहिती ८६६९०५८३२५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा democracybook2022@gmail.com या ई-मेलवर पाठवावी.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......