रात्र झालीय अन् तिला टकटक ऐकूच आली नाहीय. खिडकीत उभी राहून ती आवाज न करता रात्रीनं चेरीची झाडं कशी घेरलीयत ते पाहतेय. एकेक पान रात्र गिळत चाललीय अन् पानंही मुळीच प्रतिकार न करता कुजबुजत तो अंधार स्वीकारताहेत. थकूनभागून आयलिश खिडकीत उभीच. काचेतून बाहेर बघत राहणं, ही तिची जणू विसाव्याची घडी. मुलांची अंथरुणं घालायची तेवढी राहिलीयेत. ती अंधारलेली बाग आणि त्यात मिसळून जायची तिची इच्छा. पानगळीसोबत बागेत पहुडायचा तिचा विचार. तशीच सारी रात्र अंगावरून जाऊ द्यावी. त्या पानांसोबतच पहाटे उठून नव्या सकाळी तरतरीत व्हावं, पण ती टकटक. ती तिच्या विचारात शिरलीय. टकटक आता जोराच्या थापा बनलीय. मुलगा बेअली खुणेनं सांगतोय- दार वाजतंय. छोट्या बाळाला कडेवर घेऊन ती दार उघडतं. अंधारात जवळपास बिनचेहऱ्याची बनलेली दोन माणसं उभी. ती पोलीस असतात. विचारतात- ‘मिसेस स्टॅक, तुमचे पती आहेत का घरी?....’
आयर्लंडमधल्या हुकूमशाहीच्या आगमनाची दखल ही अशी आहे. ना परिच्छेद, ना अवतरणं, ना संवादाची स्वतंत्र मांडणी. एक सलग, थंड लेखनशैली. फक्त प्रकरणांपुरती जागा कोरी. ‘प्रॉफेट साँग’चा लेखक पॉल लिंच वाचकांना बर्फाळ नदीत खेचत नेतो. एक स्त्री तिच्या देशात अवतरलेल्या फॅसिस्ट सरकारच्या पोलादी पकडीमधून आपली उर्वरित दोन मुलं आणि स्वत:ला कशी वाचवते, त्याची ही कहाणी आहे.
तिचा नवरा बेपत्ता होतो. म्हणजे त्याची धरपकड होते ती त्याच्यासंबंधी कधीही न कळण्यासाठी. १७ वर्षांचा मोठा मुलगा बंडखोरांना सामील होतो. जिवंत आहे का नाही कळत नाही. १३ वर्षांचा दुसरा मुलगा पोलिसांनी केलेल्या छळामुळे मृतावस्थेत एका शवागारात तिला सापडतो. बेन नावाचं काही महिन्यांचं बाळ आणि मॉली नावाची १४ वर्षांची मुलगी, यांना सोबत घेऊन आयलिश कसाबसा आयर्लंडमधून पळ काढते. ३०९ पानांच्या या थरारक कादंबरीत प्रथमपासून अखेरच्या पानापर्यंत आयलिश, आयलिश अन् आयलिश सर्वत्र व्यापलेली…
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
२०२३चं ‘बुकर पारितोषिक’ पटकावलेली ही कादंबरी. लिंच यांची ती पाचवी. पण ती लिहिताना आपल्याला अत्यंत कठीण गेलं, असं त्यांचं म्हणणं. आपल्याच देशाबद्दल आणि त्यातल्या राजकीय बदलाबद्दल लिहायचं म्हणजे केवढं धाडस! ज्याला ‘डिस्टोपियन’ म्हणतात अशा प्रकारात ही कादंबरी मोडते. भीतीदायक अन् क्रूर असं भवितव्य कल्पून ते कागदावर उतरवणं फार अवघड. आपला समाज कसा बदलतो आणि राजकारण कसं जुलमी, लोकविरोधी अन् बेगुमान होत जातं, हे सांगू शकणारा आणि ते सांगू देणारा देश आजही जगात आहे. ही कादंबरी वाचणाऱ्याला ते सतत जाणवतं.
बहुतेक देश उजव्या विचारांच्या पक्षांच्या ताब्यात जात आहेत. वर्ण, वंश, धर्म, भाषा, प्रदेश, लिंग, जात अशा घटकांना प्राधान्य देणारी राजकीय विचारधारा सत्तेवर निवडून येते अन् लोकांचा कसा छळ करत सुटते, याची वर्णनं आपण बातम्यांमधून वाचतो-ऐकतो. पण जॉर्ज ऑर्वेलची ‘नाईन्टीन एटीफोर’ असो की, आल्डस हक्सलेची ‘ब्रेव्ह न्यू व्लर्ड’, यांनी राज्यकर्ते कसे दडपशाही, दहशत यांचा वापर करून हुकूमशहा बनतात, याचा जणू पायाच रचला!
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती बनल्यावर तर अनेक लेखकांनी त्यांच्या कलाकृतींतून उजवी विचारधारा कशी फॅसिझमकडे जाईल, याचा इशारा दिला. त्यात हरी कुंझरू या भारतीय वंशाच्या लेखकाची ‘रेड पिल’ अग्रभागी आहे. भारतात नयनतारा सहगल (‘द फेट ऑफ बटरफ्लाईज’) आणि गीता हरिहरन (‘आय हॅव बिकम द टाईड’) यांनीही त्या सादर केल्या. गतवर्षी ज्यांना ‘बुकर पारितोषिक’ मिळालं, त्या गीतांजली श्री यांची ‘हमारा शहर उस बरस’ हीसुद्धा त्याच वळणावर जाते. मराठीत अशी एकही कलाकृती नाही. उलट हिटलर आणि तत्सम नाझी व फॅसिस्ट तत्त्वज्ञानाच्या प्रचारकांची पुस्तकं आजही भरपूर खपतात.
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
आयलिशचा पती लॅरी ‘टीचर्स युनियन ऑफ आयर्लंड’चा डेप्युटी जनरल सेक्रेटरी असतो. त्याला पकडायला आलेले पोलीस ‘गार्दा नॅशनल सर्व्हिसेस ब्युरो’ अर्थात ‘जीएनएसबी’चे. हे गार्दाच या कादंबरीत ‘एनएपी’ या राज्यकर्त्या पक्षाचे स्वयंसेवक-हेर-रक्षक आणि पोलीस असल्यासारखे जिथंतिथं दिसतात. लॅरी चौकशीसाठी स्वत:हून ठाण्यात जातो. तिथं त्याला जे सांगितलं जातं, त्यातून वाचकांना त्याच्या देशात काय चाललं आहे ते कळतं.
पोलीस सांगतात, “मिस्टर स्टॅक, सरकार, देशापुढे मोठी कठीण परिस्थिती उभी आहे. आपल्या देशावर केलेले आरोप गांभीर्यानं घेण्यास सांगितलं गेलं आहे. तुम्हाला ‘इमर्जन्सी पॉवर्स अॅक्ट’ची जाण असेलच. हा कायदी जीएनएसबीला सार्वजनिक सुव्यवस्था टिकवण्यासाठीचे अधिकार देतो. तुमची वर्तणूक देशाविरुद्ध चिथावणी दिल्यासारखी वाटते. तुम्ही देशात अशांतता व बेबनाव पेरत आहात. याचा अर्थ तुम्ही राष्ट्रविरोधी कारवायांत गुंतला आहात किंवा तुम्ही जे करत आहात, त्याची तुम्हाला जाणीव नाही.” तेव्हा लॅरी त्यांना विचारतो, “माझं कार्य राष्ट्रद्रोही नाही, असं तुम्ही मलाच सिद्ध करायला लावता? मी एक कामगार संघटक म्हणून काम करतो. ते घटनेनुसार करतो.” त्यावर पोलीस म्हणतात की, “काय ते आम्ही ठरवू.”
लॅरीनंतर त्याच्या संघटनेचे इतर नेतेही पकडले जातात. पुढे त्यांचा मागमूस कधीही लागत नाही. इथून आयलिश समजून चुकते की, तिच्या देशात काय चाललं आहे. ती एके ठिकाणी ‘मोलक्युलर बायोलॉजिस्ट’ म्हणून काम करत असते. त्या विषयात तिची डॉक्टरेट असते. पण तिच्या कार्यस्थळीही ‘नॅशनल अलायन्स पार्टी’चा माणूस नेमला जातो, आणि पुढे तिथून तिची हकालपट्टी होते. ही अशी राज्यकर्त्यांची कृती सर्वांनाच परिचित आहे. इंग्रजीत एक म्हण आहे : ‘कॉल द डॉग मॅड अँड शूट इट’.
३०९ पानांच्या या थरारक कादंबरीत प्रथमपासून अखेरच्या पानापर्यंत आयलिश, आयलिश अन् आयलिश सर्वत्र व्यापलेली… आपल्याच देशाबद्दल आणि त्यातल्या राजकीय बदलाबद्दल लिहायचं म्हणजे केवढं धाडस! ज्याला ‘डिस्टोपियन’ म्हणतात अशा प्रकारात ही कादंबरी मोडते. भीतीदायक अन् क्रूर असं भवितव्य कल्पून ते कागदावर उतरवणं फार अवघड. या कादंबरीला बुक मिळणं क्रमप्राप्तच होतं, कारण ही एका सुशिक्षित, स्वतंत्र आईच्या लढ्याची कहाणी आहे.
आयलिशचे वडील स्मृतिभ्रंशाचे रुग्ण असतात. तरीही बऱ्याचदा ते विद्यमान राजकीय परिस्थितीवर रोखठोक भाष्य करताना दिसतात. ते एके ठिकाणी हातातलं वृत्तपत्र टाकून देत म्हणतात, ‘मी हे का वाचत बसतो कळत नाही. भल्या मोठ्या थापांखेरीज यांत काही नसतं.’ अजून एके ठिकाणी म्हणतात, ‘देशात गुप्त पोलीस कधी नव्हते, पण या ‘नॅशनल अलायन्स’ने जीएनएसबी उभा केला. त्यांनी ‘स्पेशल डिटेक्टिव्ह युनिट’ची जागा घेतली. एक आठवडा त्याविरुद्ध आरडाओरड झाली आणि नंतर सारं दाबलं गेलं.’
एक भाष्य ते मोठं विलक्षण करतात. ते आयलिशला म्हणतात, “आपण दोघंही वैज्ञानिक आहोत. आपण एका परंपरेशी जोडलेलो आहोत. पण परंपरा म्हणजे सर्वांना मान्य असणारी गोष्ट, शास्त्रज्ञ, शिक्षक, संस्था या सर्वांना, दुसरं काही नाही. पण या संस्थांवरची मालकी तुम्ही बदलली की, तुम्हाला वस्तुस्थितीवरचा ताबाही गमवावा लागतो. तुम्हाला तुमचे विश्वास बदलायला लागतात. सध्या त्यांचं हेच चालू आहे. आयलिश, तू व मी ज्याला सत्य म्हणतो, तेच एनएपी बदलायला निघाली आहे. ज्याला तू व मी सत्य मानतो, तेच त्यांना गढूळ करायचं आहे. समजा तू एखादी गोष्ट भलतीच आहे, असं सांगत राहिलीस, तर लोकांनी ती मान्य होईल. ही अर्थात जुनीच युक्ती आहे. त्यात नवं काही नाही. पण ती तुला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे, पुस्तकामधून नाही.”
आयलिशचे वडील तिला कॅनडात जायला सांगतात. तिथं त्यांची दुसरी मुलगी असते, पण ती ऐकत नाही तिच्या या देशप्रेमाबद्दल पुढे तिला खूप काही गमवावं लागतं. मार्क हा तिचा मुलगा बंडखोरांना सामील होतो. बंडखोरांविरुद्ध सरकार लढाई सुरू करतं. मार्कला सक्तीनं सैन्यात भरती करण्याची आज्ञा होते, पण तो ती झुगारतो. काही सरकारी गुंड आयलिशच्या घरावर दगडफेक करतात. काही दिवसांनी तर विमानातून टाकलेल्या बॉम्बमुळे तिचं घरच उदध्वस्त होतं.
कुटुंब कितीही सावरायचं ठरवलं, तरी बाहेरची हवा आत येतेच. ती घरातल्यांवर खूप परिणाम करते. या कादंबरीमध्ये त्याचं अचूक पण मर्मभेदी चित्रण आहे. अनेक देशांच्या राजकीय प्रमुख बायका आहेत. त्या उजव्या विचारांच्या व एकाधिकारवादी आहेत. त्यांच्या विरोधात आयलिशचं भक्कम, पण अत्यंत संवेदनशील पात्र उभं करून लेखक पॉल लिंच यांनी माणसाच्या स्वातंत्र्याची जपणूक किती महत्त्वाची असते, हे सांगितलं आहे. स्वातंत्र्याची लढाई प्रत्येकालाच अनिवार्य करणारा काळ आपल्या पुढ्यात आहे. ते समजून घेण्यासाठी ही कादंबरी वाचणं अपरिहार्य आहे!
संचारबंदी, दुकानं-शाळा बंद, रस्त्यांवर कडक गस्त, प्रत्येकाची झडती, असा सारा बंदोबस्त सरकार करतं. नागरिकांचे प्रचंड हाल होतात. आयलिशचा दुसरा मुलगा घराबाहेर जातो, तो परतत नाही. अखेर एका इस्पितळात आयलिशला त्याचं प्रेत सापडतं. मग मात्र छोटं बाळ व मोठी मुलगी यांना घेऊन ती देश सोडण्याचं ठरवतं. उत्तर आयर्लंड अथवा इंग्लंड या देशांत चोरून नेणाऱ्या टोळ्या तयारच असतात. अखेरीस आयलिश अनंत अडथळे, संकटं, दैन्य पार करून इंग्लंडला जाणाऱ्या बोटीत चढते.
‘प्रॉफेट साँग’ या शीर्षकाचा उलगडा अगदी शेवटून चौथ्या पानांत होतो. प्रत्येक संकटग्रस्त माणसाला वाटतं की, आता सगळं संपलं, कडेलोट झाला, जगाचा अंत झाला. पण प्रेषितांनी त्यांच्या गीतांत म्हटलेलं असतं- ‘जग असं कधी संपत नाही. तुमचं आयुष्य म्हणजे जग नव्हे. ते एके ठिकाणी जरूर नष्ट होतं, परंतु अन्यत्र ते असतंच. जगाचा अंत ही एक स्थानिक घटना असते. सारा दुष्टपणा नंतर नाहीसा होतोच.’
या कादंबरीला बुक मिळणं क्रमप्राप्तच होतं, कारण ही एका सुशिक्षित, स्वतंत्र आईच्या लढ्याची कहाणी आहे. बायकांना अ-राजकीय वा राजकारणाविषयी अजाण ठरवून अगदी निष्क्रिय ठरवलं जातं. या कादंबरीत मात्र आयलिश एक सुजाण नागरिक म्हणून पाहायला मिळते. ती जी हक्क, अधिकार, स्वातंत्र्य यांबाबतीत फार जागरूक आहे. एक चळवळ्या पती, आपलं स्वातंत्र्य जपू पाहणारा किशोरवयीन मुलगा आणि आपला भाऊ कोठे आहे, हे न सांगितल्यामुळे प्राणास मुकलेला दुसरा मुलगा, अशी तिहेरी दु:खं पचवून, भ्रमिष्ट वडिलांची प्रचंड काळजी वाहणारी... आयलिशचा देश तिच्याच कुटुंबाची दुर्दशा करतो. तरीही ती सारी आव्हानं स्वीकारत एकेक जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहते. तिची मुलं तिला देशप्रेमाचं प्रात्यक्षिक देतात. अखेर ती देश सोडते, पण आपल्या मातृभूमीबद्दल काहीही कडवट न बोलता.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
लेखक लिंच यांनी प्रत्येक घडामोड, संवाद अन् चिंतन आयलिशच्या माध्यमातून केलं आहे. उद्धव शेळक्यांच्या ‘धग’मधली कौतिक सतत आठवत राहावी, इतकी आयलिश धडपडी आणि ठाम आहे. ती स्वत:साठी जगतच नाही. नवरा, मुलं अन् विधुर वडील यांचा सांभाळ हाच तिचा पूर्णवेळचा कार्यक्रम. एक-दोन प्रसंग तिच्या कार्यालयाचे आहेत, पण ती शास्त्रज्ञ म्हणून काय करते ते सांगितलेलं नाही. ना ती देवाचा धावा करते, ना दैवाला दोष देते. सत्ताधारी पक्ष सर्वत्र आपली माणसं भरत चालल्यानं तिचा नाईलाज होतो. न्यायसंस्थेवर तिचा भरोसा, पण तिथंही तिला दाद मिळत नाही. इस्पितळही राजकीय कार्यकर्त्यांनी व लष्करानं व्यापलेलं.
एक निरंकुश, सर्वव्यापी सत्ता सर्वसामान्य नागरिकाची ससेहोलपट कशी करत जाते, याची ही कादंबरी अगदी उत्तम उदाहरण! तुर्की, हंगेरी, पोलंड, रशिया, चीन, अफगाणिस्तान, म्यानमार, इटली असे अनेक देश एकाधिकारशाहीच्या हाती जात आहेत.
कुटुंब कितीही सावरायचं ठरवलं, तरी बाहेरची हवा आत येतेच. ती घरातल्यांवर खूप परिणाम करते. या कादंबरीमध्ये त्याचं अचूक पण मर्मभेदी चित्रण आहे. अनेक देशांच्या राजकीय प्रमुख बायका आहेत. त्या उजव्या विचारांच्या व एकाधिकारवादी आहेत. त्यांच्या विरोधात आयलिशचं भक्कम, पण अत्यंत संवेदनशील पात्र उभं करून लेखक पॉल लिंच यांनी माणसाच्या स्वातंत्र्याची जपणूक किती महत्त्वाची असते, हे सांगितलं आहे. स्वातंत्र्याची लढाई प्रत्येकालाच अनिवार्य करणारा काळ आपल्या पुढ्यात आहे. ते समजून घेण्यासाठी ही कादंबरी वाचणं अपरिहार्य आहे!
‘प्रॉफेट साँग’ – पॉल लिंच
वन वर्ल्ड पब्लिकेशन, लंडन | पाने – ३२० | मूल्य – ५९९ रुपये.
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment