‘संस्मरणे व आठवणी’ हा जनाक्का शिंदे यांच्याविषयीचा ग्रंथ चार भागांत विभागलेला आहे. आरंभी जनाक्का यांचे आत्मपर लेखन आहे. दुसऱ्या भागात पत्रवाङ्मयाचा समावेश आहे. तिसऱ्या भागात महर्षी शिंदे यांनी जनाक्कांविषयीचा लिहिलेला मजकूर आहे. तसेच परिशिष्टात त्यांच्यावरील विविध लेखांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्राबरोबरच त्यांच्या कार्याची माहिती या लेखनात आहे.
जनाक्कांच्या जीवनातील टप्पे, त्यांचा संवेदनस्वभाव, त्यांचा जमखंडी (कर्नाटक) ते पुणे-मुंबईत असा प्रवास या कथनात आहे. त्याचबरोबरच प्रार्थना समाजाच्या कार्यावर तसेच महर्षी शिंदे व त्यांच्या कुटुंबावरदेखील नव्याने प्रकाश पडणार आहे. स्त्रीकथन म्हणून या आत्मकथनास वेगळे असे महत्त्व आहे.
या लेखनातून त्यांच्या चरित्रकार्यावर तर प्रकाश पडणार आहेच; त्याचबरोबर एकोणिसाव्या शतकाअखेरीच्या व विसाव्या शतकातील पूर्वार्धातील महाराष्ट्रातील स्त्रीजीवनावर व त्यांच्या भावविश्वावर काहीएक प्रकाश पडणार आहे. बहुजन समाजातील स्त्रियांचे शिक्षण व कुटुंबजीवनाचे स्वरूप लक्षात येईल. वैधव्यस्वरूपाचे जिणे जगणाऱ्या स्त्रीचे हे आगळेवेगळे असे कथन आहे. सासूरवासास कंटाळून परित्यक्तेचे जीवन कंठणाऱ्या स्त्रीचे हे मनोगत आहे.
.................................................................................................................................................................
‘संस्मरणे व आठवणी’ हा ग्रंथ प्रा. रणधीर शिंदे यांनी संपादित केला असून ठाण्याच्या माध्यम पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे. या ग्रंथाला शिंदे यांनी लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
जनाक्का या समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी, एवढीच त्यांची ओळख नाही, तर प्रार्थना समाजाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या, समाजसेविका आणि शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या ‘आठवणी व संस्मरणे’ हे आत्मपर व त्यांच्याविषयीचे लेखन व त्यांचा चरित्रकार्याचा पट प्रथमतःच महाराष्ट्राच्या सामाजिक नकाशावर येतो आहे.
सामाजिक किंवा वाङ्मयीन इतिहासात स्त्रियांच्या कामगिरीची क्वचितच नोंद घेतली जाते. त्यातही स्त्रियांच्या ‘असण्या’ला सामाजिक जीवनाची मर्यादा होती. वसाहतकाळातील प्रबोधनपर्वात संथगतीने का होईना, स्त्रियांचा सामाजिक जीवनात प्रवेश झाला. तो आरंभी मुंबई, पुणे या शहरांपुरताच मर्यादित होता. जनाक्का यांच्याविषयी फारसे लिहिले गेले नाही. प्रार्थना समाजाच्या इतिहासातही त्यांची नोंद नाही.
महर्षी शिंदे यांच्या लेखनात जनाक्का यांची काहीएक चरित्ररेखा आहे. त्यांचे बालपण, सासूरवास व शिक्षणकाळाचा काही भाग महर्षी शिंदे यांच्या आत्मपर लेखनात आहे. तसेच डॉ. गो. मा. पवार यांनी महर्षी शिंदे यांच्याविषयी मिळवलेल्या साधनांमधूनच ‘टाटा समाजविज्ञान संस्था’ व पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीने ‘स्त्रीमुक्तीच्या महाराष्ट्रातील पाऊलखुणा’ या ग्रंथमालेअंतर्गत मृणालिनी जोगळेकर यांनी जनाक्का शिंदे यांच्याविषयी ‘स्त्री अस्मितेचा आविष्कार - एकोणिसावे शतक - भाग-३’ - ताराबाई शिंदे, जनाक्का शिंदे’ हा (पॉप्युलर प्रकाशन, १९९१) छोटेखानी ग्रंथ लिहिला आहे.
याबरोबरच प्रा. गो. मा. पवार यांनी लिहिलेल्या ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य’ (२००४) या बृहत चरित्रग्रंथातील तीन प्रकरणांतून जनाक्का यांची जीवितकथा आली आहे. याशिवाय रा. कृ. बाबर, रा. ना. चव्हाण, लक्ष्मीबाई शिंदे व कृष्णाबाई जव्हेरे यांनी त्रोटक टिपणे जनाक्का यांच्यावर लिहिली आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सामाजिक सुधारणेच्या व स्त्रियांच्या इतिहास लेखनातही जनाक्का यांची नोंद कुठे आढळत नाही. महर्षी शिंदे यांच्या भगिनी म्हणूनच बऱ्याचदा त्यांच्याकडे पाहिले गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांना भारतीय समाजात फारसा अवकाश उपलब्ध नव्हता, तर त्यांच्या कर्तृत्वाच्या नोंदी कुठे असणार?
जनाक्का प्रार्थना समाज, ब्राह्मसमाज व महर्षी शिंदे यांच्या कार्याशी निगडित होत्या. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात प्रार्थना समाजाच्या कार्याकडे स्वातंत्र्यानंतरच्या अस्मितावादी चळवळींनी दुर्लक्ष केले. जनाक्का या प्रार्थना समाजाशी संबंधित असल्यामुळेही त्यांच्याकडे अभ्यासकांचे फारसे लक्ष गेलेले नाही.
महर्षी शिंदे यांच्या कार्याची महाराष्ट्राने नेहमीच उपेक्षा केली. प्रा. एन.डी. पाटील अनेकदा त्यांच्या भाषणांत, गं. बा. सरदार यांनी महाराष्ट्रातील कर्त्या सुधारकांची जी यादी केली, त्यात महर्षी शिंदे यांना स्थान नव्हते. त्यामुळे ते महर्षीना ‘उपेक्षितातले उपेक्षित’ म्हणत. जनाक्का यांच्या उपेक्षेची तर कल्पनाच करवत नाही. मृणालिनी जोगळेकर यांनी जनाक्कांच्या उपेक्षेची विस्ताराने नोंद घेतली आहे.
जनाक्का शिंदे यांची जीवितकथा एक शोकांतकथा आहे. त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा गेला. पुढे सासरच्या छळयातनेचा दोन-चार वर्षांचा संसार त्यांना लाभला. पुढे भावाच्या सोबतीने त्यांचा प्रवास घडला. पुण्यात शिक्षण झाले. त्यानंतर एकाकी आयुष्यात त्यांना अनंत अडचणी आल्या. त्यागी, समर्पित भावनेने जनाक्कांनी महर्षींच्या कार्यात आयुष्यभर सोबत केली. त्यांच्या एकाकी जीवनाला महर्षी शिंदे यांच्या मायेचा आधार लाभला. शिंदे यांच्या पश्चात जनाक्का यांनी शिंदे कुटुंबाची जबाबदारी घेतली. त्यांची आयुरेखा ही एका तपस्वी, एकाकी नायिकेच्या शोकांतिकेची होती.
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा वावर अपवादानेच आढळतो. मुंबई व पुणे शहरांत ब्राह्मण कुटुंब, तसेच त्या काळातील इतर समाजातील काही शिक्षित कुटुंबातील काही मुली व स्त्रियांचा सहभाग होता. बहुजन समाजातील स्त्रियांचा वावर फारसा नव्हता. सावित्रीबाई फुले व ताराबाई शिंदे अशा अपवादात्मक बहुजन समाजातील स्त्रिया या काळात दिसतात. सावित्रीबाई फुले व ताराबाई शिंदे यांना सत्यशोधक समाजाचे पाठबळ मिळाले.
या पार्श्वभूमीवर जनाक्का यांचे कर्तृत्व उठून दिसते. त्यांचा जन्म मराठा कुटुंबात झाला. मराठा समाजात स्त्रियांच्या वावरावर अनेक प्रकारची बंधने होती. स्त्रियांच्या सुधारणेला मराठा समाज फारसा अनुकूल नव्हता. आनंदीबाई शिर्के यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे – “ ‘पाटील’ असोत नाहीतर ‘कुणबी’ असोत, साऱ्यांना ‘देशमुख’ म्हणवून घ्यायची हाव. त्यामुळे त्यांच्या स्त्रिया पडद्यात रहायच्या. कितीही गरिबी असो. मराठ्यांच्या स्त्रिया उघड्यावर कामाला जायच्या नाहीत. हीच त्यांची मोठेपणाची खानदानीपणाची कल्पना.” (‘सांजवात’, पृ. २४९) अशा समाजात जनाक्का शिंदे यांचा जन्म व घडण झाली.
दलित, स्त्रिया आणि वंचित वर्गासाठी अहोरात्र झटणाऱ्या अपवादभूत स्त्रियांपैकी जनाक्का शिंदे होत. जनाक्का यांच्या जीवनात सेवादृष्टीला असाधारण असे स्थान होते. वडीलबंधूंच्या सामाजिक व्रताचा त्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला. जनाक्का शिंदे यांनी निराधार, वंचित दलित, समाजाची विविध पातळ्यांवर सेवा केली. ‘‘तू सामाजिक कार्यकर्ती आहेस, हे ध्यानात आण. सामाजिक कार्याचे वाण घेतलेल्या व्यक्तीला आपल्या व्यक्तिगत भावनांना तिलांजली देऊन ध्येयसिद्धीची पूर्तता करणे, हेच महत्त्वाचे कठोर कर्तव्य कसल्याही परिस्थितीत पार पाडावयाचे असते.” या महर्षी शिंदे यांच्या कठोर कर्तव्याचे पालन जनाक्का यांनी आयुष्यभर केले.
प्रार्थना समाजात जनाक्का शिंदे
१८९७ साली हुजूरपागेत शिकत असताना जनाक्कांचा प्रार्थना समाजाशी संबंध आला. त्या प्रार्थना समाजात गेल्या, त्यास काही कारणे घडली. शाळेत काही प्रमाणात ख्रिस्ती मताचा प्रभाव होता. तो नको इतका होता. ‘उठल्या बसल्या हिंदू देवदेवतांवर टीका केली जाई. हिंदू पोशाख, भोजनपद्धती व राहणीमानावर टीका होत असे. याचा काहीसा सुप्त राग मुलींना असे.’ त्यामुळे जनाक्का व मैत्रिणीचा ओढा प्रार्थना समाजाकडे झाला.
जनाक्का १९०६पासून मुंबईच्या प्रार्थना समाजात व भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीत काम करू लागल्या. १९०८ साली परळजवळील ग्लोब मिल परिसरात अस्पृश्य मुलींसाठी संस्थेच्या वतीने शाळा सुरू केली. या शाळेच्या कामात जनाक्का लक्ष घालू लागल्या. त्या काळचा परळचा भाग हा श्रमिक, मजुरांचा भाग म्हणून ओळखला जायचा. ग्लोब मिलमधील गिरणी मजूर व आजूबाजूच्या अस्पृश्य मुलांसाठी ही शाळा सुरू करण्यात आली होती.
अतिशय प्रतिकूल भौगोलिक, सामाजिक परिस्थितीत हे काम संस्थेने सुरू केले. शाळेत मुलांची संख्या जेमतेम होती. मजुरांची वस्ती बकाल होती. तिथे सर्व तऱ्हेचा अभाव होता. मोलमजुरी करणारी कुटुंबे होती. वस्तीतील स्त्रिया रस्ता झाडणे, चिंध्या गोळा करणे व पुराणवस्तू विकून चरितार्थ चालवत. त्यांना शिक्षणाचे व सुधारणेचे महत्त्व सांगणे, त्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष शाळा चालवण्याचे काम जनाक्का करत.
जनाक्का यांनी समाजाची निरलस सेवा केली. सभोवतालच्या वा कुटुंबातील माणसांविषयी कोणताही आकस न ठेवता ही समाजसेवा त्यांनी केली. ‘‘प्रार्थना समाजाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्या रमाबाई रानडे, उमाबाई केळकर, शांताबाई मोडक, काशिबाई नवरंगे, कृष्णाबाई जव्हेरे वगैरेंच्या मालिकेत गणल्या जातात. पण जनाक्कांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कार्यातून प्रार्थना समाजाचा सुधारणावाद, मानवतावाद खालच्या वर्गापर्यंत जाऊन पोहोचला. त्यांच्या या संन्यस्त व सेवाभावी जीवनामुळे त्यांना ‘भगिनी निवेदिता’ या चालीवर ‘भगिनी जनाक्का’ म्हणण्याचा परिपाठ पडलेला दिसतो.”
त्यांच्याबरोबर प्रार्थना समाजातील लक्ष्मण सत्तूर, कल्याणी सय्यद व जनाक्कांची बहीण तान्याक्का मदतीला होती. जनाक्काचे आई-वडीलही या कामात सहभागी झाले. घरोघरी जाऊन या लोकांना शिक्षण, समाजसुधारणेचे महत्त्व सांगत. अस्पृश्य मुलांना अंघोळी घालणे, त्यांचे तोंड साफ करणे, अशी कामे त्या करत. तसेच त्यांना प्राथमिक औषधोपचार आदी कामे करावी लागत. त्या काळातील प्रार्थना समाजातील सेवाभावी वृत्तीचे डॉ. संतूजी लाड हे तिथे मोफत औषधोपचारांचे काम करत. त्यांच्याकडे जनाक्कांनी प्राथमिक स्वरूपाच्या औषधांची माहिती घेतली होती. त्या या मुलांना, त्यांच्या पालकांना औषधोपचार करत. अंधश्रद्धा, भोंदू महाराजांच्या फसवणुकीपासून सावध राहायला सांगत. खरजेचा मलम, डोळ्यात घालण्याचे औषध, खोकला-सर्दी-तापाच्या गोळ्या त्या लोकांना देत. महार, मांग, चांभार, कोळी, भंगी समाजातील लोक तिथे होते.
संस्थेविषयी लोकांमध्ये गैरसमज होते. लोकांना ते सेवाभाव दाखवून ख्रिस्ती बनवतील म्हणून. हा गैरसमज काढून टाकून त्यांच्यात विश्वास संपादन करण्याचे काम जनाक्का करत. मिशनच्या वतीने अस्पृश्य वर्गातील उन्नतीसाठी शाळा, रात्रशाळा, बोर्डिंग, बुक बायडिंग, धंदेशिक्षण अशी कामे सुरू झाली. जनाक्का मिशनच्या निराश्रित लोकांच्या घरी जाऊन आजारी स्त्रिया व मुलांची सेवा करत. त्यांच्यासाठी धार्मिक, सामाजिक सभांचे आयोजन करत. महिलांना वाचन, लेखन, शिवणकाम शिकवत.
याच काळात जनाक्का यांनी विठ्ठल रामजींबरोबर बेरार, काठेवाड व अन्य प्रदेशांत प्रवास दौरा केला. रूपी फंड योजनेतही सहभागी झाल्या. मदनपुरा शाळेत जनाबाई रविवार क्लास चालवत. भायखळा येथे महिलांची सभा घेत. मिशनमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत. काही वेळा संस्थेस त्यांनी निधीही दिला.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
महर्षि शिंदे यांच्या ‘बहुजनवादा’चा स्वीकार आपल्या राजकीय पक्षांनी केवळ मतांच्या राजकारणापुरताच केला!
सुधारकांची परंपरा टिकवून ठेवण्याचं कार्य करणाऱ्या महात्म्याचं दर्शन
‘रिंगाण’ : मराठी कादंबरीचं एक नवं वळणरूप
..................................................................................................................................................................
भगिनीभावाचे विलोभनीय उदाहरण
विठ्ठल रामजी शिंदे व जनाक्का हे भगिनीभावाचे अत्यंत विलोभनीय उदाहरण आहे. त्या विठ्ठल रामजींपेक्षा वयाने तीन-चार वर्षांनी लहान होत्या. अमानुष छळामुळे त्यांना लहानपणीच सासर पारखे झाले. उदारमतवादी विचारांच्या भावामुळे त्यांची सासरछळातून मुक्तता झाली. महर्षीनी आयुष्यभर या बहिणीचा मोठ्या मायेने सांभाळ केला. विठ्ठल रामजी शिंदे विलायतेहून परत आल्यानंतर त्यांनी समाजकार्यासाठी वाहून घेतले. अस्पृश्यताविषयक कार्यासाठी भारतभर कार्य केले. या सर्व काळात जनाक्का यांनी वडीलबंधूंच्या कामात साथ दिली. परळ व पुणे येथील प्रार्थना समाजाच्या शाळेत त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले. वडीलबंधूने स्वीकारलेल्या कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. शिंदे यांनी जे जे काम पत्करले, त्या सर्व कामात त्या अंतःकरणपूर्वक सहभागी झाल्या.
विठ्ठल रामजी शिंदे यांनी ज्या ज्या कार्याला हात घातला, त्या त्या कार्यात जनाक्का समरसून सहभागी झाल्या. अस्पृश्यताविषयक कार्य, ब्राह्मधर्म प्रसार व कौटुंबिक उपासना या शिंदे यांनी सुरू केलेल्या उपक्रमात त्या हिरिरीने सहभागी झाल्या. बहीण-भावंडांत विलोभनीय असे मायेचे बंध होते. सासरच्या प्रेमापासून पारख्या झालेल्या बहिणीच्या दुःखद अवस्थेचा अपराधभाव शिंदे यांच्या मनात कायमचा होता. शिंदे जनाक्कांची परोपरीने काळजी घेत.
भारतीय समाजातील स्त्रियांच्या छळवणुकीमुळे शिंदे यांच्या मनात अखिल स्त्रीविषयीचा सहानुभाव निर्माण झाला होता. शिंदे ‘मातृदेवो भव’ म्हणण्याऐवजी ‘स्त्रीदेवो भव’ म्हणत. स्त्रीत्वात त्यांना देवत्वाचा साक्षात्कार होतो. स्वतःच्या घरातच आईवर झालेल्या सासूरवासाच्या छळाने त्यांच्या कोवळ्या हृदयावर चर्रर्र डाग पडले होते. या सगळ्यातून शिंदे यांची स्त्रीजीवनाकडे पाहण्याची उदात्त आणि उन्नत दृष्टी तयार झाली. याचाच आविष्कार शिंदे यांच्या जनाक्का यांच्याबाबतच्या वागणुकीत व दृष्टिकोनात पाहायला मिळतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
स्वातंत्र्यपूर्व काळातील बहुजन समाजातील कर्तबगार स्त्रीची जीवनकथा या लेखनानिमित्ताने प्रकाशात येते आहे. बालपणी सासरला पारख्या झालेल्या व पुढे भावाच्या सामाजिक कार्यात वाहून घेणाऱ्या त्यागी स्त्रीची ही जीवनकथा आहे.
जनाक्का यांनी समाजाची निरलस सेवा केली. सभोवतालच्या वा कुटुंबातील माणसांविषयी कोणताही आकस न ठेवता ही समाजसेवा त्यांनी केली. ‘‘प्रार्थना समाजाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्या रमाबाई रानडे, उमाबाई केळकर, शांताबाई मोडक, काशिबाई नवरंगे, कृष्णाबाई जव्हेरे वगैरेंच्या मालिकेत गणल्या जातात. पण जनाक्कांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कार्यातून प्रार्थना समाजाचा सुधारणावाद, मानवतावाद खालच्या वर्गापर्यंत जाऊन पोहोचला. त्यांच्या या संन्यस्त व सेवाभावी जीवनामुळे त्यांना ‘भगिनी निवेदिता’ या चालीवर ‘भगिनी जनाक्का’ म्हणण्याचा परिपाठ पडलेला दिसतो. स्त्रीत्वाच्या हळव्या जाणिवा ओलांडून पल्याड गेलेल्या जनाक्कांना हे भगिनी विशेषण साजूनही दिसते. कारण या विशेषणात स्त्रीत्व तर आहेच, पण स्त्रीत्वाच्या इतर दडपणापासून, बंधनांपासून मुक्त असल्यासारखे वाटते.’’ (मृणालिनी जोगळेकर, १९९१, १२८). दलित, स्त्रिया आणि वंचित वर्गासाठी अहोरात्र झटणाऱ्या अपवादभूत स्त्रियांपैकी जनाक्का शिंदे होत.
जनाक्का यांच्या जीवनात सेवादृष्टीला असाधारण असे स्थान होते. वडीलबंधूंच्या सामाजिक व्रताचा त्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला. जनाक्का शिंदे यांनी निराधार, वंचित दलित, समाजाची विविध पातळ्यांवर सेवा केली. ‘‘तू सामाजिक कार्यकर्ती आहेस, हे ध्यानात आण. सामाजिक कार्याचे वाण घेतलेल्या व्यक्तीला आपल्या व्यक्तिगत भावनांना तिलांजली देऊन ध्येयसिद्धीची पूर्तता करणे, हेच महत्त्वाचे कठोर कर्तव्य कसल्याही परिस्थितीत पार पाडावयाचे असते.” या महर्षी शिंदे यांच्या कठोर कर्तव्याचे पालन जनाक्का यांनी आयुष्यभर केले.
.................................................................................................................................................................
‘आठवणी व संस्मरणे’ – जनाक्का शिंदे,
संपादक – रणधीर शिंदे | माध्यम पब्लिकेशन, ठाणे | पाने – २१९ (हार्डकव्हर) | मूल्य – ३५० रुपये
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment