बांगला देशाच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या इतिहासाची पुनर्मांडणी करणारं आणि अमेरिकेचा दुटप्पीपणा उघड करणाऱ्या ‘द ब्लड टेलिग्राम’ या इंग्रजीत गाजलेल्या पुस्तकाचा ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे यांनी केलेला मराठी अनुवाद डायमंड पब्लिकेशन्सतर्फे २०१६मध्ये प्रकाशित झाला आहे. या युद्धाच्या वेळी अमेरिकेची गुप्तचरसंस्था सीआयएचे पंचमस्तंभी हस्तक आणि अमेरिकेचे कूटनीतीज्ञ असलेल्या हेन्री किसिंजर यांनी काय भूमिका निभावली, याविषयीचा या पुस्तकातला हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
अमेरिकी हवाई दलाच्या विमानातून ६ जुलै रोजी हेन्री किसिंजर दिल्ली विमानतळावर उतरले. या विमानात गुप्तचर विभागाचे आणि लष्कराचे अधिकारी खच्चून भरले होते. राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यातली सगळी विमानं वापरात असल्याने हवाई दलाकडून उसन्या घेतलेल्या आणि अंतरंग बदललेल्या विमानावर किसिंजर यांना समाधान मानावं लागलं. हे महाकाय विमान अत्यंत गैरसोयीचं होतं आणि जणू काही ते धावपट्टी सोडून नाराजीनेच उड्डाण करत असे. याबाबत किसिंजर यांनी नंतर नोंद केली - ‘या विमानाला खरं तर अपेक्षित ठिकाणी रस्त्यावरूनच जायला आवडत असावं, असं या विमानात बसल्यावर मनात आल्याशिवाय राहिलं नाही.’
विमान धावपट्टीवर संथपणे उतरत असताना एका ऐतिहासिक प्रवासावर निघाल्याची भावना किसिंजरच्या मनात तीव्रपणे दाटून आली. हा प्रवास त्यांच्या आयुष्यातला कदाचित सर्वांत महत्त्वाचा प्रवास असावा असंही त्यांना वाटून गेलं. ही त्यांनी भारताला दिलेली दोन दिवसांची भेट नव्हती. दिल्लीला आणि नंतर इस्लामाबादला त्यांनी कर्तव्य भावनेने भेट दिली असली, तरीही बीजिंगची अखेरची गुप्त भेट हाच या प्रवासाचा खरा हेतू होता.
कोणत्याही दृष्टीने पाहिलं, तरी भारतातला थांबा हा किसिंजर यांच्यासाठी केवळ एक देखावा होता. चीनला जाण्यासाठी त्यांना पाकिस्तानला जावं लागणार होतं, पण पाकिस्तानला जाताना समतोल साधण्यासाठी त्यांना भारतात तोंड दाखवावं लागणार होतं. त्यांनी भारताला दिलेली उडती भेट म्हणजे निक्सन-किसिंजर यांच्या लेखी भारताला असलेल्या नगण्य स्थानाचा पुरावाच होता.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या भेटीप्रसंगी हॅरल्ड सॉन्डर्स त्यांच्याबरोबर होते. किसिंजर यांचे भारतविषयक आणि पाकिस्तानविषयक ज्येष्ठ साहाय्यक या नात्याने कोणत्याही शंकेचं निराकरण करण्यासाठी त्यांनी तिथे थांबणं गरजेचं होतं. याबाबतच्या आठवणीत ते म्हणतात, ‘‘भारतातला थांबा म्हणजे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीचा उघड बनाव होता. भारतात आणि नंतर पाकिस्तानमध्ये किसिंजर यांचं वर्तन सर्व काही व्यवस्थित चालू असल्याप्रमाणे होतं.’’
किसिंजर आणि त्यांचा चमू हे भर पावसात उतरले असले, तरी त्यांच्याविरुद्धची डाव्यांची अनिवार्य निदर्शनं होतच राहिली. विमानतळावर पोलिसांपेक्षाही कमी संख्या असलेले निदर्शक काळे झेंडे फडकवून आणि ‘मृत्युदूत किसिंजर, परत जा.’ तसंच ‘खुनी किसिंजर, परत जा.’ असे फलक दाखवून घोषणा देत होते. अमेरिकी अभ्यागतांना उभ्या मोटारींमध्ये कोंबून वेगाने दूर नेण्यात आलं. याच अवधीत विमानतळातून बाहेर पडण्याचं दुर्भाग्य वाट्याला आलेले किसिंजर निदर्शकांचा डोळा चुकवून गेल्यामुळे संतप्त झालेले निदर्शक कोणत्याही वाहनावर टोमॅटोंचा आणि सडक्या अंड्यांचा मारा करत होते.
इतर निदर्शक अमेरिकी दूतावासासमोर जमत होते. त्यांची संख्या सुमारे ४५० होती. त्यांच्यापैकी अनेक जण अमेरिकी सुरक्षारक्षकांना चकवा देत दूतावासाच्या आवारात घुसले आणि त्यांनी मुख्य द्वाराकडे मुसंडी मारली. हा जमाव दारं मोडून पाडू शकण्यापूर्वीच भारतीय पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून निदर्शकांना अटक केली. या वेळी दूतावासाच्या हिरवळीवर रोवलेला एक लाल झेंडा मात्र मागे राहिला. किसिंजर दूतावासात असतील, असा गैरसमज करून घेतलेल्या डाव्या निदर्शकांनी तिथे त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी चालू ठेवली. प्रत्यक्षात किसिंजरमुळे आणि जेटलॅगमुळे त्रस्त झालेल्या त्यांच्या चमूने आलिशान अशोका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता; पण निदर्शनं आयोजित करणार्या कम्युनिस्ट पक्षाच्या संयोजकांना ही शक्यताच जाणवली नव्हती.
भारतात वास्तव्य असताना पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा राज्यांमधल्या ठसठसत्या वेदनांपासून किसिंजर शक्य तितके लांब होते. किसिंजर यांनी स्वतः विस्थापितांच्या छावण्यांना भेट देण्याविषयी भारत सरकारने त्यांना सुचवलं होतं. दुसर्या कुणा राष्ट्राध्यक्षाच्या कारकिर्दीत किसिंजर व्हाइट हाउसमध्ये कार्यरत असते, तर त्यांनी कदाचित कोलकात्याला एखादी भेट दिली असती किंवा विस्थापितांचं पोषण करण्यासाठी अमेरिकी अर्थसाहाय्याचा होणारा विनियोग पाहण्यासाठी त्यांना पश्चिम बंगालमधल्या शेकडो छावण्यांपैकी एखाद्या छावणीत पाठवण्यात आलं असतं; पण यासाठी किसिंजर यांनी साफ नकार दिला. याबाबत हॉस्किन्सन म्हणतात, ‘‘खरं तर ते किसिंजर यांच्या विशेष आवडीचं काम नव्हतं.’’ एका भारतीय राजनैतिक अधिकार्याने केलेल्या नोंदीनुसार, ‘किसिंजर एकाही विस्थापित छावणीला भेट देऊ शकणार नसल्याबाबत’ त्यांच्या मनात कोणतीही शंका नव्हती.
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
त्या दिवशी हेन्री किसिंजर आणि पी.एन.हक्सर यांची समोरासमोर भेट झाली. किसिंजर हक्सर यांना म्हणाले, ‘‘आपण जाणकार माणसं आहोत.’’ हक्सर यांच्या साउथ ब्लॉकमधल्या कार्यालयात परराष्ट्र धोरणविषयक हे दोन प्रमुख सल्लागार नम्र भाषेचा वापर करत, पण कठोर आणि ठाम भूमिका घेऊन चर्चा करत राहिले. हक्सर आलंकारिक भाषेत पाल्हाळीक कथन करून किसिंजर यांच्यावर प्रभाव पाडण्याचे प्रयत्न करत, तेव्हाच या चर्चेमध्ये खंड पडत असे.
पाकिस्तानला अद्यापही लष्करी सामग्रीची पाठवण होत असल्याच्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने नुकत्याच केलेल्या गौप्यस्फोटांमुळे संतप्त झालेल्या हक्सर यांना किसिंजर यांनी ‘हा नोकरशाहीने केलेला गोंधळ’ असल्याचं सांगून आणि नोकरशाहीवर खापर फोडून या बातम्या वाचताना त्यांना स्वतःलाही आश्चर्य वाटल्याचं सांगितलं. ‘‘असले गोंधळ टाळण्यासाठी शस्त्रास्त्रांचा पुरवठा पूर्णपणे थांबवावा.’’ असं हक्सर म्हणाले. ही सूचना फेटाळताना किसिंजर म्हणाले की, शस्त्रास्त्रांचा पुरवठा अत्यल्प महत्त्वाचा असून याह्या खान यांच्यावरचा प्रभाव कायम ठेवण्यासाठी अमेरिकेला हे साधत राहणं आवश्यक होतं. पाकिस्तानला पूर्वी झालेल्या आणि त्या वेळी चालू असलेल्या शस्त्रपुरवठ्याचा परखड पंचनामा करून ड्वाइट आयझनहॉवर यांच्या काळापासून देण्यात आलेल्या प्रचंड शस्त्रसाठ्याकडे व्हाइट हाउसने दुर्लक्ष न करण्याविषयी हक्सरनी किसिंजरना सांगितलं. या पुरवठ्याचं महत्त्व फार नसल्याचं प्रतिपादन करताना किसिंजर म्हणाले की, ‘मूलतः घातक नसलेला’ तो पुरवठा पूर्णपणे थांबवण्याची संरक्षण मंत्रालयाची इच्छा नव्हती. स्वस्तातल्या सुट्या भागांमुळे मौल्यवान यंत्रसामग्री कार्यरत राहत असल्याची वस्तुस्थिती या दोघांना ज्ञात असल्याने हक्सर कडाडले, ‘‘ ‘घातक नसलेला’ ही पराभौतिक संकल्पनाच मला मान्य नाही.’’
‘‘अमेरिकेने सर्व दोन कोटी नव्वद लाख डॉलर्स किमतीची लष्करी यंत्रसामग्री रवाना केली, तरीही परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही.’’ असा दावा किसिंजर यांनी केला, तेव्हा हक्सर यांचा स्वतःच्या कानांवरच विश्वास बसेना. ‘‘म्हणून अशा निष्प्रभ बाबींसाठी आपण एकमेकांवर ओरडणं थांबवावं.’’ असं किसिंजर यांनी सुचवलं. ते रागावून म्हणाले, ‘‘या मुद्द्यावर भारताची भूमिका आवेशपूर्ण असली, तर त्याला अमेरिका कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देऊ शकणार नाही.’’
आता खूशमस्करीचा अवलंब करत आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एका विधानाचा हवाला देत किसिंजर म्हणाले, ‘‘या खंडात केवळ महाशक्तीच नव्हे, तर शांतता आणि स्थैर्य यांच्यासाठी असणारी शक्ती म्हणून उदयाला येणं केवळ भारतालाच शक्य आहे.’’ पाकिस्तान म्हणजे एक छोटीशी प्रादेशिक शक्ती असल्याचं विश्लेषण ऐकून हक्सर खूश झाले आणि त्यांच्या चेतलेल्या भावना शांत झाल्या. या प्रशंसेचा मोबदला म्हणून हक्सर यांनी पाकिस्तानच्या इस्लामी ओळखीच्या कृत्रिमतेबद्दल किसिंजर यांच्यासमोर एक विद्वत्तापूर्ण प्रवचन झोडलं. यादरम्यान हक्सर म्हणाले, ‘‘राष्ट्रनिर्मितीसाठी धर्म एक व्यासपीठ पुरवू शकत असता, तर युरोपमध्ये आजही पवित्र रोमन साम्राज्यच दिसलं असतं.’’
‘‘याह्या खान यांनी या सर्व घटनाचक्रात दिलेल्या सहकार्याबद्दल मी निक्सन यांच्याबरोबर बोलत असताना किसिंजर यांनी अमेरिकेच्या तथाकथित पोटदुखीबद्दल याह्या खान यांनी किती तत्परता दाखवली होती, याचं रंजक वर्णन केलं. किसिंजर यांनी सोबतीसाठी त्यांच्या परराष्ट्र उपमंत्र्यांना पाठवण्याचं सूतोवाच करताच याह्यांनी त्यांना स्वतःच्या पहाडी विश्रामधामात जाण्यासाठी फर्मावलं. या गोष्टीची जाहीरपणे वाच्यता करून किसिंजर यांच्या आजारपणाच्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध व्हाव्यात आणि त्यांना चीनला जाण्यासाठी आवश्यक असलेला फसवा देखावा निर्माण व्हावा एवढाच या सगळ्याचा हेतू होता.’’
विस्थापित भारताच्या सीमाभागात व्यवधान निर्माण करत असल्याचा इशारा देऊन पूर्व पाकिस्तानमधून पळून जाणार्या लोकांपैकी सुमारे ९० टक्के लोक हिंदू असल्याचा मुद्दा हक्सर यांनी जोरकसपणे मांडला. एक निधर्मी लोकशाही विकसित करण्याच्या भारताच्या प्रयत्नाच्या मुळावरच यामुळे घाव घातला जात असल्याचं हक्सर म्हणाले. पूर्व पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर विस्थापितांना स्वतःची कत्तल होण्याची भीती वाटत असल्याने त्यांना भारताबाहेर हाकलणं शक्य नव्हतं; पण पूर्व पाकिस्तानला लोकशाहीवादी सरकार लाभलं असतं, तर ते परतू शकले असते अशी भारताची भूमिका असल्याचं हक्सरनी स्पष्ट केलं. यामुळे अजिबात न द्रवलेल्या किसिंजरनी हक्सरना फाडकन सांगितलं, ‘‘पूर्व पाकिस्तानमध्ये आक्रमण करण्याची तयारी करण्यासाठी भारतीय बाजू फक्त मोठा आवाज करते आहे.’’
कैचीत सापडलेल्या किसिंजर यांनी सरळ प्रतिहल्ला करताना परिस्थिती ज्वालाग्राही राहण्याचं कारण बंगाली बंडखोरांना भारताकडून मिळणारा पाठिंबा असल्याचं सांगितलं. प्रत्युत्तरादाखल हक्सर म्हणाले, ‘‘मी तुमच्याबरोबर अगदी प्रांजळपणे बोलतो.’’ एखादं ढळढळीत असत्य बोलण्यापूर्वी दिल्लीमधले आणि वॉशिंग्टनमधले राजकारणी अशीच सुरुवात करतात. ‘‘आम्ही शस्त्रं दिलेली नाहीत.’’ असं सांगताना भारत स्वतःच्या सीमा सर्वत्र सीलबंद करू शकणार नसल्याचं हक्सरनी स्पष्ट केलं; पण भारतीय लष्कराने किंवा सीमासुरक्षा दलाने चालवलेल्या प्रशिक्षण छावण्यांचा, त्याचप्रमाणे भारतीय भूमीमधून पूर्व पाकिस्तानमध्ये खोलवर होणार्या चढायांचा उल्लेख त्यांनी शिताफीने टाळला.
किसिंजर यांच्या स्मरणानुसार, उत्तेजित झालेल्या हक्सर यांना शांत करण्यातच या बैठकीचा वेळ खर्च झाला. किसिंजरनी हक्सर यांना शांत केल्याचंही किसिंजरना आठवतं. एकूणच वातावरण शांत करण्याच्या दृष्टीने हक्सर यांना आवाहन करताना किसिंजर म्हणाले, ‘‘भारतीय जनता शांत होऊ शकली, तर पुढच्या काही महिन्यांमध्ये विस्थापितांच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना जोर यावा म्हणून अमेरिका गाजावाजा न करता प्रयत्न करत राहील.’’ भारत सरकारपुढच्या अडचणींचा ऊहापोह करताना हक्सर म्हणाले, ‘‘खरंतर आम्हांला युद्ध नको आहे, पण ते टाळणं आता आमच्या हातांत नाही.’’
किसिंजर इस्लामाबादमध्ये परतल्यानंतरही दिशाभूल करणारा हा खेळ चालू ठेवून ते नाथियागली विश्रामधामातून परत येत असल्याचं चित्र निर्माण करण्यासाठी त्यांना शहराबाहेर नेऊन पुन्हा शहरात आणण्यात आलं. याह्या खान यांचे आभार मानण्यासाठी एक झटपट भेट घेण्यासाठी गेलेले किसिंजर यांना ‘हे कारस्थान यशस्वीपणे पार पडल्याबद्दल याह्या खान एखाद्या लहान मुलासारखे खूश झालेले’ दिसले. एखाद्या लष्करी हुकूमशहासाठी हे वर्णन दुर्दैवी म्हणावं लागेल. किसिंजर यांची उत्तेजित मनोवस्था पाहताना काहीतरी खरी कामगिरी केल्याचं समाधान किसिंजर यांना वाटत असल्याचं हॅरल्ड सॉन्डर्सना आठवतं.
आशियात येण्यामागचं खरं कारण सूचित करताना अमेरिकेला चीनबरोबर वेगाने संबंध सुधारायचे असल्याचं किसिंजरनी हक्सरना अप्रत्यक्षपणे सांगितलं. भारताचा कट्टर शत्रू असलेल्या चीनला अमेरिका भारताच्या वरचढ होऊ देणार नसल्याबाबत किसिंजरनी हक्सरना आश्वस्त केलं, पण पाकिस्तानबरोबर युद्ध पेटल्यास चीन प्रतिक्रियेच्या रूपाने काहीतरी कृती करीन, असा इशाराही किसिंजरनी दिला. असं घडणं भारताच्या दृष्टीने फारच भीतिदायक असणार होतं. तसं झालं असतं, तर भारताला सोव्हिएत देशाची मदत मागणं भाग पडलं असतं. ‘‘यामुळे आम्हां अमेरिकी लोकांसाठी गंभीर परिस्थिती निर्माण होईल.’’ असं ते म्हणाले. चवताळलेले हक्सर उत्तरले, ‘‘भारताचं पाकिस्तानबरोबर युद्ध झालं तर, आणि चीनच्या हस्तक्षेपाची शक्यता समोर आली; तर अमेरिका भारताप्रति सहानुभूती दर्शवेल, अशी आशा आहे.’’
या खानदानी, भारदस्त ज्येष्ठ मुत्सद्द्यासारख्या दिसणार्या अधिकार्यासमोर लोटांगण घालायला किसिंजर यांना प्रत्यवाय नव्हता आणि चाऊ एन लाय यांच्यासमोरही ते असेच झुकणार होते; पण हक्सर यांनी उघड प्रयत्न करूनही किसिंजर त्यांच्याबाबत थंडच राहिले. हक्सर यांच्याबरोबर शाब्दिक चकमक झाल्यानंतर भारत सरकार भावनिक वागत नसून युद्ध सुरू करण्यासाठी योग्य सबब शोधत असल्याचा किसिंजर यांचा समज झाला. दिल्लीत एका दिवसापेक्षाही कमी काळ केलेल्या वास्तव्यात ‘अमेरिका पाकिस्तानला करत असलेल्या शस्त्रपुरवठ्याविरुद्ध अस्सल भारतीय प्रतिक्रिया’ दिसत नसल्याची त्यांची खात्री झाली. हक्सर यांचा निरोप घेतल्यानंतर किसिंजर यांनी भारतीय नेते ‘थंड डोक्याने सत्तेचं राजकारण खेळत असल्याचा’ निष्कर्ष काढला.
किसिंजर यांचा दुसरा दिवसही एका तणावपूर्ण वातावरणातल्या बैठकीतून दुसर्या तशाच बैठकीसाठी जाण्यात व्यतीत झाला. भारतीय अधिकार्यांनी आणि इतरांनी किसिंजर यांचा धिक्कार केला, त्यांना चिथावलं आणि टोचून काढलं. त्यावर कडी म्हणजे देशभक्त भारतीय जंतूंनी किसिंजर यांच्यावर सूड उगवला. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर ढोंग करण्यासाठी स्वतःचं पोट बिघडल्याचा दावा ते कितपत प्रभावीपणे करू शकणार होते यावर सारं काही अवलंबून होतं; पण भारतात लगेचच ते खरोखर आजारी पडले. त्यांचा देखावा शाबूत राहावा म्हणून स्वतःच्या पोटातल्या वेदना सहन करत ते दिल्लीत तडफडत राहिले.
किसिंजर यांच्याप्रति सन्मान दर्शवण्याचे भारत सरकारचे प्रयत्न बेंगरूळ होते (‘डॉ. किसिंजर ज्यू असल्याने’ अरब-इस्राइल संघर्षाचा उल्लेख न करण्याचं स्मरण एका ज्येष्ठ भारतीय महिला राजनैतिक अधिकार्याने तिच्या सहकार्यांना करून दिलं). किसिंजर यांच्या निषेधार्थ होणार्या निदर्शनांना भारतीय वर्तमानपत्रांनी भरपूर प्रसिद्धी दिली आणि संपादकीय पानावर त्यांचे वाभाडे काढले. लष्करी सुटे भाग आणि दारूगोळा यांनी लादलेली आणखी अनेक जहाजं पाकिस्तानला प्राप्त होणार असल्याच्या अफवेने लोकसभा-सदस्यांच्या रागाचा स्फोट झाला. तरीही या बैठकांमधला किसिंजर यांना तोंड द्यावा लागत असलेला मारा याहूनही भेदक होता.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
भारतीय विचारवंत आणि अभ्यासक यांच्याबरोबर अशोका हॉटेलमध्ये न्याहरी करून किसिंजर यांनी त्यांचा दिवस सुरू केला. मात्र ही सुरुवात भयंकर ठरली. उपस्थित भारतीयांपैकी एक जण अतिशय संतापलेला होता - आशिया खंडात भारताचं वर्चस्व प्रस्थापित व्हावं म्हणून पाकिस्तानवर हल्ला करण्याविषयी सर्वोच्च भारतीय नेत्यांना सुचवणारी गुप्त टिपणं एप्रिलमध्ये लिहिणारे तज्ज्ञ के. सुब्रमण्यम... भावनावश अवस्थेत आणि कटू मनःस्थितीत असलेले सुब्रमण्यम यांनी किसिंजर यांना सुनावलं, ‘‘तुम्ही स्वतः एक विस्थापित असल्यामुळे जे काही घडतं आहे, ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हिटलरच्या बाबतीत १९३०च्या दशकात केलेली चूकच अमेरिका आता परत करते आहे - स्वतःची लोकसंख्या घटवण्याचं काम करत असलेल्या हुकूमशाही राजवटीला खूश करणं आणि तिच्याबरोबर व्यवहार करणं.’’ समोर लांबलचक दिवस दिसत असणारे किसिंजर यांनी सुब्रमण्यम यांच्याशी होणारा वाद टाळण्याचा प्रयत्न केला.
दुपारच्या जेवणासाठी हक्सर यांना अशोका हॉटेलमध्ये पुन्हा भेटणं आणि जेवणाचा सत्यानाश करून घेणं किसिंजर यांच्यासाठी क्रमप्राप्त होतं. कारण पाकिस्तानला होणार्या अमेरिकी शस्त्रपुरवठ्यावरून पुन्हा चकमक होणार होतीच. यानंतर संरक्षण मंत्री जगजीवनराम यांनी किसिंजर यांच्या बचावाच्या चिंध्या केल्या. दलित समाजात जन्मलेले आणि पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली वेगाने उदयाला आलेले जगजीवनराम एक आदरणीय राजकीय नेते होते. पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचा असह्य दबाव भारतावर असल्याचं सांगून, नुकतेच ते पूर्व पाकिस्तानच्या सीमेलगत आगरतळा इथे गेले असताना पाकिस्तान भारताच्या भूमीवर तोफा डागत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ‘‘पाकिस्तानला केवळ तुम्हीच धुगधुगी देत आहात.’’ असा आरोप त्यांनी केला. किसिंजर उत्तरले, ‘‘थोडीफार.’’ हसून जगजीवनराम यांनी टोला मारला, ‘‘केवळ थोडीफार नाही, जवळपास पूर्ण.’’
किसिंजर यांचा परराष्ट्र मंत्री स्वर्ण सिंग यांना शांत करण्याचा एक उपचारसुद्धा बाकी होता. स्वर्ण सिंग वॉशिंग्टनहून नुकतेच परतले होते आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधल्या एका विशेष वृत्तानुसार, अमेरिकेकडून पाकिस्तानला शस्त्रपुरवठा चालू असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला असल्याने ते दुखावले होते. त्या वेळी असा पुरवठा होत असल्याची माहिती व्हाइट हाउसला किंवा परराष्ट्र मंत्रालयातल्या वरिष्ठांना नसल्याचा खुलासा किसिंजर यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या साउथ ब्लॉकमधल्या कार्यालयात तत्परतेने करून स्वर्ण सिंग यांच्या जखमेवर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला, पण हे असत्य असल्याची जाणीव किसिंजरना होती. पाकिस्तानला दोन कोटी नव्वद लाख डॉलर्स मूल्य असलेल्या सामग्रीपेक्षा अधिक काहीही पुरवण्यात येणार नसल्याचं सांगून याह्या खान यांच्याबरोबर निक्सन यांच्या असलेल्या वैयक्तिक नात्याच्या संदर्भात किसिंजर म्हणाले, ‘‘अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या शस्त्रपुरवठ्यावर निर्बंध घालण्याचा प्रशासकीय निर्णय म्हणजे निक्सन यांच्यासाठी एक मोठं पाऊल होतं.’’ अवमानित झाल्यामुळे संतापलेले स्वर्ण सिंग या पळवाटेबद्दल राग व्यक्त करून म्हणाले, ‘‘जर माझ्या कर्मचार्यांनी मला संपूर्ण माहिती दिली नाही, तर मी त्यांची चंपी करीन.’’ त्यावर किसिंजर उत्तरले, ‘‘मी तेच करतो आहे.’’ (प्रत्यक्षात ते तसं करत नव्हते.) सिंग म्हणाले, ‘‘पाकिस्तानबरोबर एवढा निकटचा संबंध ठेवण्यामध्ये तुम्हांला एवढं स्वारस्य असण्याचं कारणच माझ्या लक्षात येत नाही.’’ शस्त्रपुरवठा पूर्णपणे थांबवण्यात येण्याची मागणी करून ते किसिंजर यांना स्पष्टपणे म्हणाले, ‘‘तुम्ही पाकिस्तानला करत असलेल्या शस्त्रपुरवठ्यामुळे युद्ध भडकेल.’’
या अतिशय नावडत्या दिवशी किसिंजर यांनी एक वचन वारंवार दिलं - ‘चीनने भारताविरुद्ध लष्करी हालचाली सुरू केल्या, तर अमेरिका भारतामागे उभी राहील.’ हक्सर यांच्याबरोबर भोजन करताना अमेरिकेच्या चीनबरोबरच्या ‘नव्या महत्त्वपूर्ण आरंभाचे’ संकेत किसिंजर यांनी दिले. नंतर किसिंजरनी हक्सर यांना शब्द दिला, ‘‘कोणत्याही चिनी दबावाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत अमेरिका भारतामागे उभी राहील. चीनबरोबर कोणतीही चर्चा करताना भारताविरुद्ध आम्ही चीनला प्रोत्साहन देणार नाही.’’
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
स्वर्ण सिंग यांच्याबरोबरच्या अतिशय वेदनादायी बैठकीनंतर त्यांना बाजूला घेऊन किसिंजर यांनी आगामी चीनभेटीबद्दल त्यांना काही संदिग्ध संकेतही दिले. अमेरिकेचा हा पुढाकार भारताविरुद्ध नसल्यासंदर्भात स्वर्ण सिंग यांना आश्वस्त करताना किसिंजर म्हणाले, ‘‘चीनने भारतावर विनाकारण आक्रमण केलं, तर अमेरिका याबाबत अत्यंत गंभीर भूमिका घेईल.’’ (यामुळे चीनच्या सकारण आक्रमणाच्या शक्यतेचा प्रश्न अनुत्तरित राहिला; म्हणून ‘चीनने आक्रमण केलं, तर अमेरिका भारताला लष्करी सामग्रीचा पुरवठा करेल.’ अशी शपथ घेण्याची मागणी सिंग यांनी किसिंजर यांच्याकडे केली. उपलब्ध माहितीनुसार, स्वर्ण सिंग यांना उत्तर मिळालं नाही.)
नंतर चीनकडून भारताविरुद्ध लष्करी हालचाल होण्याच्या शक्यतेबद्दल प्रचंड उत्सुकता दाखवताना त्याच दिवशी किसिंजर यांनी जगजीवनराम यांना निःसंदिग्ध आश्वासन दिलं, ‘‘चीनने भारताविरुद्ध कोणतीही कारवाई केली, तर आम्ही त्याकडे अत्यंत गंभीरपणे पाहू. हे आम्ही चीनला निश्चित पटवून देऊ.’’ हे ऐकून जगजीवनराम यांना आनंद झाला. स्वतःच्या चीनदौर्याची माहिती मिळाल्यानंतर भारतात धोक्याच्या घंटा वाजणं सुरू होऊ नये यासाठी किसिंजर म्हणाले, ‘‘सलोखा आणि शांतता या गोष्टी वाढीला लागाव्यात यासाठी आम्ही काही विशिष्ट धोरणाचा अवलंब करत असलो; तरी ते (चीन) हिंसाचार करणार असल्याचं दिसलं, तर आम्ही अतिशय कडक भूमिका घेऊ.’’
१९६२च्या युद्धात चीनकडून अत्यंत अपमानास्पद पराभव झाल्याच्या जखमा कुरवाळणार्या भारतीयांसाठी हे अतिशय मोठं आश्वासन होतं; पण खरं तर चीनचे सैनिक भारतासमोर उभे करण्यासाठी किसिंजर पाचच महिन्यांनी चीनला चिथावणी देणार होते.
त्या दिवसाचा परमोच्च बिंदू म्हणजे इंदिरा गांधी यांच्याबरोबर किसिंजर यांची झालेली चर्चा! शानदार, घुमटाकारी साउथ ब्लॉकमधल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात किसिंजरना नेण्यात आलं; पण किसिंजरच्या दिल्लीतल्या इतर चर्चांप्रमाणे ही बैठकही कलहपूर्ण ठरली.
पाकिस्तानप्रति अमेरिकेने मित्रनिष्ठा दाखवली असती, तर चीनवर त्याचा अनुकूल प्रभाव पडण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद आता किसिंजर यांनी केला. निक्सन यांच्यासाठी याचा सारांश बनवताना ते लिहितात, ‘भारतीयांबद्दल चिनी नेत्यांना वाटत असणारा तिरस्कार या भेटीत अगदी स्पष्टपणे जाणवला. याउलट, पाकिस्तानचा ठाम आणि विश्वसनीय मित्र म्हणून चीनचे असलेले संबंध असेच स्पष्टपणे दर्शवण्यात आले. ‘चीनची साथ देतील आणि स्वतःचा शब्द पाळतील, अशा राष्ट्रांना चीनची मदत लाभेल.’ हा संदेश चाऊ एन लाय कदाचित देऊ इच्छित असावेत.’ याची बरोबरी करण्याची किसिंजर यांना इच्छा होती.
किसिंजर यांनी एकट्यांनी पंतप्रधानांबरोबरची बैठक सुरू केली. या प्रसंगी दोन्ही बाजूंच्या अधिकार्यांना बाहेर ठेवण्यात आलं होतं. या एकांतात किसिंजरनी इंदिरा गांधींना अमेरिकेच्या चीनबरोबरच्या संबंधांमधल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत संदिग्धपणे दिले. या घडामोडी भारताविरुद्ध नसणार असल्याचंही त्यांनी इंदिरा गांधींना सांगितलं. त्याचप्रमाणे निक्सन यांचं शुष्क भाषेतलं एक पत्रही त्यांनी इंदिरा गांधींना दिलं. मानवतेच्या भूमिकेतून विस्थापितांसाठी अमेरिका देत असलेल्या मदतीचं स्मरण या पत्रात करून देण्यात आलं असलं, तरी शस्त्रपुरवठ्याबद्दल कोणतंही समर्थन करण्यात आलं नव्हतं.
यानंतर हक्सर, केनेथ किटिंग (दिल्लीतला जुलैचा उन्हाळा बाधू नये म्हणून सीअरसकर सूट परिधान केलेले) आणि हॅरल्ड सॉन्डर्स यांना एकत्रितपणे पंतप्रधानांच्या कार्यालयात जाण्याची अनुमती देण्यात आली. या कलहपूर्ण दौर्याचा प्रभाव किसिंजरवर पडायला लागला होता. भारताच्या भावनांच्या तीव्रतेमुळे ते प्रभावित झाले असल्याचं त्यांनी गंभीरपणे सांगितलं. विस्थापितांना परतण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी याह्या खान यांच्यावर दबाव राहावा, हे पाकिस्तानला पाठिंबा देण्याचं अमेरिकेचं मुख्य कारण असल्याचं निक्सन यांच्या पाकिस्तानविषयक भूमिकेचा पुनरुच्चार करताना किसिंजर यांनी सांगितलं. विस्थापितांनी परतण्यासाठी पाकिस्तानमध्ये राजकीय तोडगा निघण्याची आवश्यकता मान्य करून याबाबत त्या क्षणी अमेरिकेच्या कोणत्याही कल्पना नसल्याचं त्यांनी कबूल केलं.
तोपर्यंत सत्तर लाख विस्थापित आले असल्याचं सांगून इंदिरा गांधींनी भारतीयांच्या ‘भावनाप्रधान’ मानसिकतेची पुरेपूर कल्पना किसिंजरना दिली. ‘‘ही परिस्थिती हाताळण्यापलीकडे कधी जाईल?’’ असं किसिंजर यांनी विचारताच ती त्यापूर्वीच हाताबाहेर गेली असल्याचं सांगून इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘‘आम्ही केवळ इच्छाशक्तीमुळे टिकून आहोत. आमचं धोरण पसंत असलेले दोन सदस्यही संसदेत नसतील.’’
कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आणखी थोडे महिने थांबावं, असं किसिंजरनी वेळकाढूपणा करण्यासाठी भारताला सुचवलं. पाकिस्तानची आर्थिक आणि लष्करी मदत थांबवण्यात काही अर्थ नसल्याचं मत मांडून ते म्हणाले, ‘‘आता पाकिस्तानला पाठवण्यात येणार्या मर्यादित शस्त्रास्त्रांमुळे लष्करी समतोलावर जवळपास काहीच परिणाम होणार नाही.’’ इंदिरा गांधी उत्तरल्या, ‘‘शस्त्रपुरवठ्याचा प्रत्यक्ष प्रभाव कोणताही असेल, पण त्याचा मानसिक आणि राजकीय परिणाम फार मोठा असतो.’’
पाकिस्तानवर कडाडून टीका करताना इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘‘भारतविरोधी भावना भडकवण्यावर पाकिस्तानने स्वतःचं अस्तित्व अवलंबून ठेवलं आहे. ‘आपण काहीही केलं, तरी अमेरिकेचा पाठिंबा आपल्याला मिळणारच.’ असं दीर्घ काळ वाटत आल्यामुळे पाकिस्तानी ‘साहसवाद आणि भारतद्वेष’ यांना खतपाणी मिळालं आहे.’’ पाकिस्तान प्रत्येक प्रश्नाला हिंदू विरुद्ध मुसलमान संघर्ष असं स्वरूप देत असल्याची तक्रार करून त्या म्हणाल्या, ‘‘धर्मयुद्ध आणि इस्लामचं संरक्षण अशा तत्त्ववादी भाषेचा वापर भारतद्वेष लपवण्यासाठी करण्यात येतो. पाकिस्तानला इस्लामबद्दल खरोखर आस्था असती, तर भारतातल्या सहा कोटी मुसलमानांवर स्वतःच्या कारवायांचा काय परिणाम होईल याचा विचार पाकिस्तानने केला असता.’’ असं भेदक निरीक्षण त्यांनी नोंदवलं. भारताला टोकाचं पाऊल उचलायचं नसलं; तरी परिस्थिती जे वळण घेईल, त्यावर सगळं अवलंबून राहणार असल्याचं इंदिरा गांधींनी स्पष्ट केलं. अशा प्रकारे युद्धाचा पर्याय त्यांनी सताड उघडा ठेवला.
किसिंजर पाकिस्तानमध्ये परतण्यापूर्वी चिनी अधिकार्यांनी अत्यंत रुचकर चिनी खाद्यपदार्थ, माओ यांच्या लिखाणाची नवी इंग्रजी आवृत्ती आणि या भेटीच्या छायाचित्रांचा अल्बम इत्यादी भेटवस्तूंनी विमान भरून टाकलं. आता निक्सन यांच्या स्वतःच्या बीजिंगभेटीची तयारी झालेली होती. अमेरिकेच्या चिनी यजमानांना उद्देशून किसिंजर शुष्कपणे म्हणाले, ‘‘तुमच्यावर अनेक रानटी आक्रमणं झालेली आहेत, पण या वेळी तुम्ही कितपत तयारीत आहात याबाबत मी साशंक आहे.’’
गरज नसतानाही थापा मारण्याची चमत्कारिक सवय किसिंजर यांना होती. पश्चिम पाकिस्तानी सरकारतर्फे पूर्व पाकिस्तानमध्ये बळाचा वापर होणं अशक्य असल्याचं मूल्यमापन अमेरिकेतल्या सगळ्या विशेषज्ञांनी मार्चमध्ये केल्याचा हवाला त्यांनी इंदिरा गांधी यांना दिला. हे खोटं होतं. मार्चच्या आरंभी, पाकिस्तानी लष्कर कत्तल सुरू करण्याच्या शक्यतेचा इशारा हॅरल्ड सॉन्डर्स या किमान एका विशेषज्ञाने किसिंजर यांना दिला होता आणि या प्रसंगी ते सॉन्डर्स किसिंजरच्या बाजूलाच उभे होते. अशा वेळी किटिंग यांनी सुज्ञपणे विषय बदलला.
अखेर किसिंजर यांनी त्यांचं मोहिनीअस्त्र बाहेर काढलं. ‘अमेरिकेचे महत्त्वाचे राष्ट्रीय हितसंबंध न गुंतलेल्या तद्दन प्रादेशिक वादात पडून’ एका सशक्त लोकशाहीतल्या पन्नास कोटी जनतेबरोबरच्या नात्याला धोका निर्माण करण्याची अमेरिकेची इच्छा नसल्याचं ते म्हणाले. त्या वेळी किसिंजर देत असलेला संदर्भ चीनबद्दल असल्याचं भारतीयांना लवकरच समजणार होतं. याबाबत वचन देताना ते म्हणाले, ‘‘कोणत्याही बाह्यशक्तीने भारतावर दबाव आणण्यासाठी किंवा त्याला धमकी देण्यासाठी अमेरिका कोणत्याही परिस्थितीत अनुमती देणार नाही.’’
हे कथन ऐकून यजमान भारतीय सुखावले. चिनी दबावाविरुद्ध अमेरिका भारताला देणार असलेल्या पाठिंब्याच्या वेगवेगळ्या आश्वासनांचा भारत सरकारने घाईघाईने वापर करून घेतला आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या भारतीय मंत्र्याबरोबर झालेल्या भेटींमध्ये जणू काही ही सर्वांत महत्त्वाची बाब असल्याप्रमाणे या आश्वासनांना भरघोस प्रसिद्धी दिली.
अखेर किसिंजर यांनी इंदिरा गांधींना वॉशिंग्टनला भेट देण्याची विनंती केली, पण खरं तर या शक्यतेमुळे किसिंजर गारठून गेले होते. तंग वातावरणातली ही बैठक पंतप्रधानांनी एका उद्धट उत्तराने समाप्त केली. स्मितहास्य करून त्या म्हणाल्या, ‘‘मला यायला जरूर आवडेल, पण याबाबतचा जाहीर उच्चार मी करू शकणार नाही.’’ कारण तसं झालं असतं, तर त्यांच्या टीकाकारांनी त्यांच्यावर प्रचंड दडपण आणून या भेटीला नकार देण्यासाठी त्यांना भाग पाडलं असतं.
किसिंजर यांच्यासाठी हा अत्यंत धावपळीचा दिवस ठरला. इस्लामाबादच्या आणि बीजिंगच्या विमानप्रवासासाठी ते रवाना झाले, तेव्हा हक्सरनी आणि त्यांनी स्वतः ह्या भयाण भेटीबद्दल विचार सुरू केला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
प्रत्यक्षात किसिंजर तिथे काय करणार होते, याबद्दल हक्सर यांना अद्याप काहीही कल्पना नव्हती. त्यांची नोंद म्हणते, ‘भूतकाळापासून दूर जाण्याबद्दल किसिंजर धाडसाने बोलत होते; पण भूतकाळ जमिनीत पुरला, तरीही त्याच्या थडग्यातून विचार आणि कृती यांच्यावर तो हुकूमत गाजवत असतो.’ अमेरिकेच्या धोरणातल्या गोंधळामुळे स्तिमित झालेल्या हक्सरना वाटलं की, चीनबरोबरचा समतोल साधण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज वाटत होती. याच्या अगदी विरुद्ध घडत असल्याचं हक्सर यांच्या लक्षात आलं नाही. भारताविरुद्ध समतोल साधण्यासाठी निक्सन आणि किसिंजर चीनचा वापर करण्याचा प्रयत्न करणार होते.
ताळ्यावर येऊन सावध झालेले किसिंजर भारतातून रवाना झाले. त्यांनी भारतीय प्रसारमाध्यमांच्या खुनशीपणाबद्दल कुरकुर केली. वॉशिंग्टनला परतल्यानंतर ते निक्सन यांना म्हणाले, ‘‘भारतीयांना खरोखर काय हवं आहे, हे मला माझ्या भेटीत स्पष्टपणे जाणवलं. त्यांना असं वाटतं की, ते पूर्व पाकिस्तान खच्ची करू शकले, तर पश्चिम पाकिस्तानमध्ये (फुटीरतवादी) तत्त्वांना अतिशय बळकटी मिळून पाकिस्तानचा सगळा प्रश्नच निकालात निघेल. भारतीय आणि पश्चिम पाकिस्तानी परस्परांचा तिरस्कार करतात.’’
पाकिस्तानकडे रवाना होताना किसिंजर यांनी गुप्तपणे नोंद केली, ‘भारताच्या तीव्र भावना माझ्यासमोर पूर्णपणे उघड झाल्या.’ भारतावरचा दबाव असह्य असून सरकार केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर टिकून असल्याच्या इंदिरा गांधींच्या विधानावर किसिंजरनी बराच विचार केला. पुढे ते म्हणतात, ‘‘युद्ध अटळ असल्याची वाढती भावना किंवा किमानपक्षी व्यापक हिंदू-मुस्लीम हिंसाचार कुणाची इच्छा असल्यामुळे नव्हे, तर अखेर हे सगळं कसं टाळायचं याचा उपाय सापडत नसल्यामुळे कायम आहे.’’ हक्सर यांचं किमान एक तरी अर्थगर्भ विधान प्रभावी ठरलं होतं.
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
किसिंजर यांच्या गुप्त चीनभेटीची बातमी अमेरिकेत फुटल्यास लगेच कळवण्याविषयी सांगून याह्या खान यांनी त्यांचा व्यक्तिगत दूरध्वनी क्रमांक लिहिलेलं एक चिटोरं सॉन्डर्स यांना दिलं. हा गौप्यस्फोट झाला असताच, तर याह्या खान बीजिंगला फोन करणार होते.
किसिंजर यांच्या आजारपणाबद्दल इस्लामाबादमध्ये संशय वाढत असल्याचं सॉन्डर्स यांना जाणवलं असलं, तरी यासाठी याह्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये काहीच हयगय झालेली नव्हती. किसिंजर यांना नाथियागलीकडे नेण्याचा देखावा निर्माण करण्यासाठी याह्या खान यांनी मोटारींचा एक बनावट ताफासुद्धा धाडला होता. किसिंजर यांची ४९ तासांची अनुपस्थिती कुणाच्याही नजरेस येऊ नये यासाठी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला ज्येष्ठ पाकिस्तानी अधिकार्यांची ये-जा चालू असल्याबद्दलच्या काल्पनिक बातम्या पाकिस्तानने वर्तमानपत्रांमध्ये पेरल्या.
किसिंजर यांच्या आठवणीनुसार, पहाटेपूर्वीच्या अंधारात लाभणार्या गुप्ततेत ते एका पाकिस्तानी विमानात स्थानापन्न झाले. त्यासाठी याह्या यांनी पाकिस्तानी एअरलाइन्सचं बोइंग ७०७ विमान पुरवून त्याचं सारथ्य करण्यासाठी स्वतःचा वैमानिक दिला होता. रेडिओ-संदेश मध्येच ऐकले जाऊ नयेत म्हणून हा वैमानिक सावध होता. विमानात अनेक वरिष्ठ चिनी अधिकार्यांनी किसिंजर यांचं स्वागत केलं. केवळ याच भेटीसाठी ते बीजिंगहून आले होते. या प्रवासाबद्दल नंतर मोठ्या दिमाखात लिहिताना या अभूतपूर्व प्रवासामुळे किसिंजरना त्यांचं बालपण आठवल्याचं नमूद केलं आहे. ते म्हणतात, ‘‘कारण बालपणी आयुष्याच्या अर्थाचं आकलन करताना प्रत्येक दिवस म्हणजे एक विलक्षण साहसच होतं. विमानाने हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं ओलांडून उगवत्या सूर्याच्या तांबूस प्रकाशात आकाशाकडे झेप घेतली, तेव्हा माझी हीच भावना होती.’’ (विमान चिनी भूमीवर उतरायला लागलं, तेव्हा त्यात सर्वांत पुढे बसलेल्या विन्स्टन लॉर्ड यांना १९४९नंतर चीनमध्ये प्रवेश करणारे ते पहिलेवहिले अमेरिकी अधिकारी असल्याची बढाई मारण्याची संधी प्राप्त झाली.) ‘‘बीजिंगमधल्या एका लष्करी विमानतळावरून चिनी बनावटीच्या आलिशान गाड्यांमधून, खिडक्यांचे पडदे ओढून; रुंद, स्वच्छ रस्त्यांवरून; किसिंजरना वेगाने नेण्यात आलं. या वेळी सायकली वगळता फारशी रहदारी नव्हती.’’ असं किसिंजर यांनी नंतर निक्सन यांना सांगितलं.
भारताचं मनपरिवर्तन करण्यासाठी अमेरिकेने स्वतःच्या बळाचा वापर करण्याविषयी चाऊ यांनी सुचवलं. ‘‘आम्हांला शक्य ते सर्व काही करू.’’ असं वचन किसिंजर यांनी चाऊंना दिलं. निक्सन यांच्याकडे नंतर खुलासा केल्यानुसार, चाऊ यांना वाटणार्या काळजीचं स्पष्टीकरण करताना किसिंजर म्हणाले, ‘‘आपण दहा हजार मैल दूर असल्यामुळे फार काही करू शकणार नाही अशी चिंता त्यांना आहे. मात्र चीन भारताच्या फार जवळ आहे. १९६२ साली चीनकडून झालेल्या भारताच्या पराभवाची आठवण काढून त्याची पुनरावृत्ती होणं शक्य असल्याचं चाऊ यांनी स्थूलमानाने, पण धाडसीपणे सूचित केलं.’’
डिऔयू इथल्या भारदस्त वातावरणाने किसिंजर प्रभावित झाले. बीजिंगमधून त्यांनी कळवलं, ‘माझ्या व्हाइट हाउसच्या कारकिर्दितली ही चर्चा अतिशय सखोल, महत्त्वाची आणि दूरगामी झाली.’ चीनहून परतल्यानंतर ते निक्सन यांना म्हणाले, ‘‘सरकारमध्ये राहून आत्तापर्यंत केलेल्या चर्चांपैकी सर्वाधिक अन्वेषक, व्यापक आणि महत्त्वपूर्ण चर्चा आम्ही केली.’’ थोडक्यात केवळ एक तुलना देऊन या चर्चेची भव्यता लक्षात आली नसती. ‘‘तुम्ही आणि माओ यांना इतिहासाचं एक पान उलटता यावं, यासाठीची आवश्यक पायाभरणी आम्ही करून ठेवली आहे.’’ चाऊ एन लाय यांचा ‘स्पष्टवक्तेपणा आणि वक्तृत्व, त्यांचा तत्त्वज्ञानविषयक आवाका, त्यांचं इतिहासविषयक विश्लेषण, डावपेचात्मक चाचपणी आणि विनोदाचा शिडकावा’ यांमुळे किसिंजर दिपून गेले होते. ‘मला भेटलेला सर्वाधिक प्रभावी परकीय मुत्सद्दी’ असं बिरुद चाऊ यांना लावून किसिंजर यांनी चाऊ यांची तुलना ‘चार्ल्स द गॉल’ यांच्याबरोबर केली. भारावलेल्या अवस्थेत त्यांनी निक्सन यांना कळवलं, ‘मला अगदी मोकळेपणाने सांगावंसं वाटतं की, ही भेट म्हणजे अतिशय हृद्य अनुभव होता. या प्रसंगाची ऐतिहासिक बाजू, चिनी नेत्यांचं स्नेहपूर्ण आणि अदबशीर वर्तन, ‘फॉरबिडन सिटीचं’ वैभव, चिनी इतिहास आणि संस्कृती, चाऊ यांचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि आमच्या चर्चेचं गांभीर्य तसंच तिचा आवाका यांनी माझ्या मनावर अमीट ठसा उमटवला आहे.’
किसिंजर यांना भारताबद्दल अशी भावना कधीच वाटली नव्हती. विन्स्टन लॉर्ड यांनी नोंद केल्यानुसार, भारतीय लष्करबाजीबद्दल सचिंत असणारे किसिंजर चीनच्या आक्रमकतेला मात्र बगल देत असत. कितीही दोष असले, तरी भारत म्हणजे जगातली सगळ्यांत मोठी लोकशाही असूनही किसिंजर यांनी तिचं मात्र असं गुणगान केलं नाही. निक्सन आणि किसिंजर यांच्याबाबत लॉर्ड म्हणतात, ‘‘भारत लोकशाही राष्ट्र असल्याचं वास्तव त्यांना आवडत नसल्याचं ते कदापि मान्य करणार नाहीत. मला असं वाटतं की, निर्णय घेण्यासाठी हुकूमशहांबरोबर व्यवहार करणं कधीकधी अधिक सोपं असतं असं त्यांना वाटत असावं. कारण मुक्तपणे होणारी चर्चा आणि संसद यांच्यामुळे लोकशाही जटिल असते. मला खात्री आहे आणि सखेदपणे नमूद करावंसं वाटतं की, ‘केवळ माओकडे किंवा चाऊकडे गेलं, तरी पुरेसं आहे.’ अशी यांची भावना असणार. याह्यांबाबतही हेच सत्य आहे, पण याबाबतीत त्यांना भारत हे प्रकरण मात्र जास्त गुंतागुंतीचं वाटत असणार.’’
किसिंजर आणि चाऊ एन लाय यांच्या भेटीच्या पहिल्या दिवशी चाऊ एन लाय किसिंजरशी अत्यंत खानदानीपणे आणि अदबीने वागत होते, पण दुसर्याच दिवशी त्यांनी किसिंजर यांना बुचकळ्यात पाडलं. चिनी नेतृत्वाच्या भारताविरुद्धच्या ‘विखारी, खदखदणार्या वैरभावामुळे’ किसिंजर स्तिमित झाले. चाऊ यांचा भारतविषयक ‘तुच्छताभाव आणि ऐतिहासिक अविश्वास’ त्यांना लक्षणीय वाटल्याचं त्यांनी नंतर निक्सन यांना सांगितलं. चीनचे पंतप्रधान १९६२ सालच्या भारताबरोबरच्या युद्धाच्या छायेने ग्रासलेले दिसले. ते भारताला वारंवार ‘आक्रमक’ म्हणून दोष देत होते.
किसिंजर आणि त्यांचा चमू हे भर पावसात उतरले असले, तरी त्यांच्याविरुद्धची डाव्यांची अनिवार्य निदर्शनं होतच राहिली. विमानतळावर पोलिसांपेक्षाही कमी संख्या असलेले निदर्शक काळे झेंडे फडकवून आणि ‘मृत्युदूत किसिंजर, परत जा.’ तसंच ‘खुनी किसिंजर, परत जा.’ असे फलक दाखवून घोषणा देत होते. अमेरिकी अभ्यागतांना उभ्या मोटारींमध्ये कोंबून वेगाने दूर नेण्यात आलं. याच अवधीत विमानतळातून बाहेर पडण्याचं दुर्भाग्य वाट्याला आलेले किसिंजर निदर्शकांचा डोळा चुकवून गेल्यामुळे संतप्त झालेले निदर्शक कोणत्याही वाहनावर टोमॅटोंचा आणि सडक्या अंड्यांचा मारा करत होते.
‘ग्रेट हॉल ऑफ द पीपल’ या महाकाय सभागृहात दीर्घ काळ चाललेल्या एका बैठकीत चाऊ यांनी भारत आक्रमणाची योजना करत असल्याचा आरोप थंडपणे करून भारत अमेरिकेचा चोरून पाठिंबा मिळवत असल्याचं सूचित केलं. भारतमित्र म्हणून कधीच शिक्का न बसलेल्या किसिंजरसाठी हा खरोखर एक धक्काच होता. काय बोलावं ते न सुचल्यामुळे ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान महोदय, आमच्याकडून भारताला लष्करी सामग्रीचा पुरवठा प्राप्त होत नाही.’’ चाऊ ताडकन उत्तरले, ‘‘हे माझ्या कानांवर आलेलं आहे, पण तुम्ही पाकिस्तानला काही सामग्री देत आहात.’’ प्रत्युत्तरादाखल किसिंजर म्हणाले, ‘‘होय, पण तुम्हीही देत असता.’’
विद्यमान संकंटाचं संपूर्ण खापर चाऊ यांनी भारतावर फोडलं. ते म्हणाले, ‘‘तथाकथित बांगला देश सरकारने स्वतःचं मुख्यालय भारतातच स्थापन केलंय. हा पाकिस्तानी सरकार उलथवण्याचा प्रयत्न नाही का?’’ किसिंजर पुन्हा गोंधळून गेले. त्यांनी विचारलं, ‘‘याला आम्ही सहकार्य करत आहोत, असं तर पंतप्रधानांना वाटत नाही ना?’’ पाकिस्तानबाबत अमेरिकेची आणि चीनची भूमिका एकसारखी असल्याचं आश्वासन चिनी पंतप्रधानांना देऊन ते म्हणाले, ‘‘याह्या खान यांच्याशी आणि त्यांच्या देशाशी असलेल्या आमच्या गाढ मैत्रीबद्दल त्यांच्याकडून तुम्हांला कळलंच असेल.’’
निक्सन प्रशासनापेक्षाही याह्या खान यांचं अधिक कट्टर समर्थक असणारं एक राष्ट्र जगात असल्याचं यामुळे निष्पन्न झालं. चीनच्या भारताप्रतिच्या कटू वैरभावामुळे किसिंजर आश्चर्यचकित झाले. याचा वापर भारताविरुद्ध करून घेणं शक्य असल्याचं त्यांना तत्क्षणी उमजलं. या ऐतिहासिक बैठकीचा समारोप करताना चाऊ यांनी उच्चारलेले अखेरचे शब्द पाकिस्तानबाबत होते. ते म्हणाले, ‘‘भारताने आक्रमण केलं, तर आम्ही पाकिस्तानला पाठिंबा देऊ हे आपण अध्यक्ष याह्या खान यांना सांगा. तुमचासुद्धा भारताला विरोध आहे.’’ हे शब्द म्हणजे लष्करी समर्थनाचा निर्धार असल्यासारखं किसिंजर यांना वाटलं. ते उत्तरले, ‘‘आम्ही भारताच्या आक्रमणाचा विरोध करू, पण लष्करी कारवाई करू शकणार नाही.’’ त्यांच्याबरोबर सहमती दर्शवून चाऊ म्हणाले, ‘‘तुम्ही फारच दूर आहात.’’ मात्र भारताचं मनपरिवर्तन करण्यासाठी अमेरिकेने स्वतःच्या बळाचा वापर करण्याविषयी चाऊ यांनी सुचवलं. ‘‘आम्हांला शक्य ते सर्व काही करू.’’ असं वचन किसिंजर यांनी चाऊंना दिलं. निक्सन यांच्याकडे नंतर खुलासा केल्यानुसार, चाऊ यांना वाटणार्या काळजीचं स्पष्टीकरण करताना किसिंजर म्हणाले, ‘‘आपण दहा हजार मैल दूर असल्यामुळे फार काही करू शकणार नाही अशी चिंता त्यांना आहे. मात्र चीन भारताच्या फार जवळ आहे. १९६२ साली चीनकडून झालेल्या भारताच्या पराभवाची आठवण काढून त्याची पुनरावृत्ती होणं शक्य असल्याचं चाऊ यांनी स्थूलमानाने, पण धाडसीपणे सूचित केलं.’’
किसिंजर पाकिस्तानमध्ये परतण्यापूर्वी चिनी अधिकार्यांनी अत्यंत रुचकर चिनी खाद्यपदार्थ, माओ यांच्या लिखाणाची नवी इंग्रजी आवृत्ती आणि या भेटीच्या छायाचित्रांचा अल्बम इत्यादी भेटवस्तूंनी विमान भरून टाकलं. आता निक्सन यांच्या स्वतःच्या बीजिंगभेटीची तयारी झालेली होती. अमेरिकेच्या चिनी यजमानांना उद्देशून किसिंजर शुष्कपणे म्हणाले, ‘‘तुमच्यावर अनेक रानटी आक्रमणं झालेली आहेत, पण या वेळी तुम्ही कितपत तयारीत आहात याबाबत मी साशंक आहे.’’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
याचबरोबर अमेरिका आणि चीन यांच्या दृष्टीने याह्या खान यांची असणारी विशेष उपयुक्तता समाप्त झाली. यानंतर चिनी नेत्यांबरोबर सहजपणे संपर्क साधण्याचे मार्ग उपलब्ध होते. विन्स्टन लॉर्ड म्हणतात, ‘‘आम्ही जे करत होतो, त्याबाबत चीनला माहिती देण्यात आली होती. आम्ही न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या चिनी प्रतिनिधीमार्फत आणि पॅरिसच्या मार्गाने चीनशी संपर्क साधत होतो.’’ व्हाइट हाउस त्यापुढे पॅरिसमधल्या विश्वसनीय लष्करी दूतामार्फत गोपनीय पत्रं पाठवू शकणार होतं आणि तो लष्करी दूत ही पत्रं इथल्या चिनी राजदूताच्या हवाली करू शकणार होता. नंतर चीनच्या पॅरिसमधल्या राजदूताबरोबर बोलताना किसिंजर म्हणाले, ‘‘मी फ्रान्समध्ये अकरा वेळा पाच वेगवेगळ्या मार्गांनी गुप्तपणे आलो आहे. हे सगळं संपल्यावर याबाबत मी एक गुप्तहेर कथा लिहिणार आहे.’’
पण चीनची याह्यांबाबतची कृतज्ञता शिल्लक राहिली होती. चाऊ म्हणाले, ‘‘आपण याह्या खान यांना कृपया असं सांगा की, गरज पडेल, तेव्हा यापुढेही आम्ही त्यांची मध्यस्थी वापरू.’’ याबाबत नम्रपणे सहमती दर्शवताना किसिंजर म्हणाले, ‘‘एक शिष्टाचार म्हणून आपण त्यांच्यामार्फत काही संदेशांची देवाणघेवाण करण्यावर विचार करू या.’’ चाऊ म्हणाले, ‘‘अमेरिकी नेत्यांचा याह्यांवर विश्वास असून आम्हीही त्यांचा आदर करतो.’’ मात्र याह्या खान यांची उपयुक्तता संपल्याची कल्पना दोन्ही बाजूंना होती. किसिंजर म्हणाले, ‘‘मित्र कितीही विश्वसनीय असले, तरी काही गोष्टी आपल्याला मित्रांच्या मार्फत बोलता येण्यासारख्या नाहीत.’’ हे मान्य करून चाऊ म्हणाले, ‘‘महत्त्वाचं असं काहीच आपण पाठवणार नाही.’’
पाकिस्तानप्रति अमेरिकेने मित्रनिष्ठा दाखवली असती, तर चीनवर त्याचा अनुकूल प्रभाव पडण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद आता किसिंजर यांनी केला. निक्सन यांच्यासाठी याचा सारांश बनवताना ते लिहितात, ‘भारतीयांबद्दल चिनी नेत्यांना वाटत असणारा तिरस्कार या भेटीत अगदी स्पष्टपणे जाणवला. याउलट, पाकिस्तानचा ठाम आणि विश्वसनीय मित्र म्हणून चीनचे असलेले संबंध असेच स्पष्टपणे दर्शवण्यात आले. ‘चीनची साथ देतील आणि स्वतःचा शब्द पाळतील, अशा राष्ट्रांना चीनची मदत लाभेल.’ हा संदेश चाऊ एन लाय कदाचित देऊ इच्छित असावेत.’ याची बरोबरी करण्याची किसिंजर यांना इच्छा होती. लॉर्ड यांच्या आठवणीनुसार, ‘‘आम्ही चीनबरोबर चर्चा करत असलेल्या ठिकाणी बावीस वर्षांनंतर घडत असलेला हा पहिलाच संकटाचा प्रसंग होता. त्यामुळे या पेचप्रसंगाबाबत आमचा आणि चीनचा दृष्टीकोन काही अंशी एकसमान असल्याचं आणि आम्ही विश्वसनीय मध्यस्थ ठरू शकत असल्याचं चीनला दाखवण्याची ही नक्कीच निक्सन आणि किसिंजर यांची खेळी असणार होती. पाकिस्तानला पाठिंबा देण्याखेरीज आम्ही इतर काहीही करत असल्याचं चीनने पाहावं असा आम्हांला वाटत नव्हतं.’’
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
‘द ब्लड टेलिग्राम’ : १९७१च्या युद्धाचा आंतरराष्ट्रीय साज
बांगला देश मुक्तिसंग्रामाची धगधगती कहाणी
..................................................................................................................................................................
अशा प्रकारे अनौपचारिक मध्यस्थ म्हणून पाकिस्तानची उपयुक्तता संपल्यानंतरही कत्तली चालू असतानाच्या काळात पाकिस्तान सरकारला निक्सन आणि किसिंजर यांनी ठाम पाठिंबा दिला. जेणेकरून, संकटकाळ किंवा सण असं काहीही असलं, तरी अमेरिका एक विश्वसनीय सहकारी राष्ट्र असल्याचं माओ आणि चाऊ यांना दिसून यावं. अशा तर्हेने पाकिस्तानने व्हाइट हाउसवरचा आणखी एक दावा पदरात पाडून घेतला. काही काळाने बीजिंगहून परतल्यानंतर किसिंजर म्हणाले, ‘‘आपण पाकिस्तानकडे पाठ फिरवू शकणार नाही. कारण मला वाटतं की, चीनबरोबरच्या संबंधांवर त्याचा विनाशी परिणाम होईल. कारण पाकिस्तानने आपल्याला एक विमानतळ वापरायला दिल्यानंतर आपण त्यांना कंठस्नान घातलं, असा अर्थ आपल्या विपरीत वागण्याचा होईल.’’ (या ठिकाणी किसिंजर यांच्यासाठी ‘कंठस्नान’ म्हणजे प्रत्यक्ष कत्तल नव्हती, तर एखाद्या सरकारवर दबाव टाकणं होतं.) अमेरिका हा एक चंचल मित्र असून पाकिस्तानने स्वतःच्याच लोकांना ज्या प्रकारे वागवलं, त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानबरोबरची मैत्री तोडली असल्याचा चिनी नेतृत्वाचा समज व्हावा, अशी व्हाइट हाउसची इच्छा नव्हती. माओ यांच्यासाठी ही गोष्ट बिकट ठरली असती, कारण त्यांनी घेतलेल्या बळींची संख्या याह्या खान यांच्या कत्तलींपेक्षाही फार जास्त म्हणजे लक्षावधींमध्ये होती.
किसिंजर इस्लामाबादमध्ये परतल्यानंतरही दिशाभूल करणारा हा खेळ चालू ठेवून ते नाथियागली विश्रामधामातून परत येत असल्याचं चित्र निर्माण करण्यासाठी त्यांना शहराबाहेर नेऊन पुन्हा शहरात आणण्यात आलं. याह्या खान यांचे आभार मानण्यासाठी एक झटपट भेट घेण्यासाठी गेलेले किसिंजर यांना ‘हे कारस्थान यशस्वीपणे पार पडल्याबद्दल याह्या खान एखाद्या लहान मुलासारखे खूश झालेले’ दिसले. एखाद्या लष्करी हुकूमशहासाठी हे वर्णन दुर्दैवी म्हणावं लागेल. किसिंजर यांची उत्तेजित मनोवस्था पाहताना काहीतरी खरी कामगिरी केल्याचं समाधान किसिंजर यांना वाटत असल्याचं हॅरल्ड सॉन्डर्सना आठवतं. चेहर्यावर आनंदाची भावना दाखवणार्यांपैकी किसिंजर नसले, तरी या प्रसंगी ते अतिशय भावनावश झाल्याचं नोंदवून सॉन्डर्स म्हणतात, ‘‘चाऊ यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल त्यांनी किती सखोल विचार केला असावा, हे आपल्याला यातून दिसतं. किसिंजरनी पाकिस्तानबरोबर ज्या प्रकारे संबंध राखले होते, त्याचंच हे प्रतिबिंब म्हणता येईल.’’
सॅन क्लेमेन्ट, कॅलिफोर्निया इथल्या प्रासादात निक्सन सचिंत अवस्थेत थांबले होते. ते म्हणाले, ‘‘हेन्री परतला की या युगातला तो रहस्यपुरुष ठरेल.’’ स्वतःची जादू उघड व्हावी अशी निक्सन यांची इच्छा नव्हती. ‘‘या संपूर्ण कथानकाची गोम म्हणजे संशय आणि रहस्य यांची निर्मिती करणं. पाकिस्तानमधल्या ‘पोटदुखीचा’ कधीही इन्कार करायचा नाही. ते खरंच असल्याची, पण नंतर इतर गोष्टीही घडल्या असल्याची बतावणी करायची.’’ सॅन क्लेमेन्ट इथे १३ जुलै रोजी हसर्या चेहर्याने किसिंजर सकाळी सात वाजता पोहोचले, तेव्हा निक्सन यांनी त्यांचं स्वागत केलं आणि ते त्यांना न्याहरीसाठी घेऊन गेले. ‘‘आमच्याइतकीच चिनी नेत्यांनाही या संबंधाची गरज आहे.’’ अशी नोंद एच. आर. हाल्डेमन यांनी करून ठेवली. राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार अॅलेक्झांडर हेग यांनी किसिंजर यांच्या चमूची भेट घेतली. सॉन्डर्स यांच्या आठवणीनुसार, ‘‘आम्ही कुठे गेलो होतो, याची वाच्यता कुणासमोरही न करण्याविषयी हेग यांनी आमच्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः जरबपूर्वक सांगितलं होतं. निक्सन यांनी घोषणा करेपर्यंत ही माहिती येऊ नये, अशी आमची इच्छा होती. हेग म्हणाले, ‘काय घडलं, हे आता मला परराष्ट्रमंत्री रॉजर्स यांना समजावून सांगावं लागणार आहे.’ ’’
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
चीनभेटीचं निमंत्रण स्वीकारलं असल्याचं, अमेरिकी जनतेला आश्चर्याचा धक्का देणारं निवेदन करण्यासाठी निक्सन दोन दिवसांनी म्हणजे १५ जुलै रोजी राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर गेले. किसिंजर यांच्या गुप्त कामगिरीमुळे जगभरातल्या लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली. जोसेफ फारलॅन्ड यांनी इस्लामाबादहून किसिंजर यांना कळवलं, ‘‘आ वासलेली इतकी माणसं मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहतो आहे.’’
‘‘तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं आहे, त्याचं मी नेहमी कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवीन.’’ असं निक्सन यांनी याह्यांना गदगदल्या स्वरात सांगितलं. त्यांना लिहिलेल्या पत्रात किसिंजर म्हणतात, ‘तुम्हांला धन्यवाद देण्यासाठी माझ्याकडे एवढी कारणं आहेत की, कुठून सुरुवात करावी हे समजेनासं झालं आहे.’ निक्सन पाकिस्तानच्या राजदूताला म्हणाले, ‘‘याह्यांबरोबरच्या मैत्रीसंबंधांपासून या गोष्टीला सुरुवात झाली.’’ अनेक वर्षांनंतर निक्सन यांना खेद होत राहिला की, या वेळी याह्या खान यांच्याप्रति पुरेसं उदारहस्ते वागणं अमेरिकेला जमलं नाही. याबाबत राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या चर्चेचा गोषवारा नोंदवून ठेवताना हाल्डेमन लिहितात, ‘‘याह्या खान यांनी या सर्व घटनाचक्रात दिलेल्या सहकार्याबद्दल मी निक्सन यांच्याबरोबर बोलत असताना किसिंजर यांनी अमेरिकेच्या तथाकथित पोटदुखीबद्दल याह्या खान यांनी किती तत्परता दाखवली होती, याचं रंजक वर्णन केलं. किसिंजर यांनी सोबतीसाठी त्यांच्या परराष्ट्र उपमंत्र्यांना पाठवण्याचं सूतोवाच करताच याह्यांनी त्यांना स्वतःच्या पहाडी विश्रामधामात जाण्यासाठी फर्मावलं. या गोष्टीची जाहीरपणे वाच्यता करून किसिंजर यांच्या आजारपणाच्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध व्हाव्यात आणि त्यांना चीनला जाण्यासाठी आवश्यक असलेला फसवा देखावा निर्माण व्हावा एवढाच या सगळ्याचा हेतू होता.’’
या चीनभेटीनंतर इंदिरा गांधी सरकारची दातखीळ बसली. भारताच्या यातनांकडे किसिंजर यांचं लक्ष जाईल अशी कल्पना करणार्या भारतीयांना अमेरिकेच्या लेखी किती क्षुल्लक महत्त्व होतं, हे समजून आल्यानंतर विटंबना झाल्यासारखं वाटायला लागलं.
.................................................................................................................................................................
द ब्लड टेलिग्राम – गॅरी बास, अनुवादक – दिलीप चावरे,
डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, पाने – ४८२, मूल्य – रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी लिंक -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/275
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment