‘सरकार’ या संस्थेने कोणती धोरणं राबवावीत, याचा अभ्यास करणारे अभ्यासक, विचारवंत आणि सरकार चालवणारी नेते मंडळी, यांच्यातील समन्वय अथवा क्रियाशील परस्परसंवाद, याबाबत आपल्या व्यवस्थेत तसा आनंदीआनंदच आहे. अमुक एखाद्या विषयावर सरकारने ही भूमिका घ्यायलाच हवी, असं राज्यसंस्थेला ठणकावून सांगण्यासाठी केवळ अभ्यासविषयाबद्दल ठाम विश्वास असून चालत नाही, तर आपण जे अंमलात आणायला सांगतो आहोत, त्याने आपल्या एकूण व्यवस्थेचे भले होणार, याची आसही असावी लागते. आपल्याकडे याचीही वाणवा आहे. या तुलनेत ‘परराष्ट्र धोरण’ या विषयातल्या विद्यापीठीय सैद्धान्तिक अभ्यासाची चौकट मोडून, बुद्धिजीवी वर्गाचे अभिन्न अंग असणारा ‘बोटचेपेपणा’ निडरपणाने धुडकावून लावणारे हेन्री किसिंजर हे व्यक्तिमत्त्व म्हणूनच अजब ठरतं.
मागच्या २५ वर्षांत राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांच्या कानी सर्वधारणपणे हेन्री किसिंजर हे नाव कानी पडते. किंबहुना या विद्यार्थ्यांना ‘परराष्ट्र धोरण’ या विषयावरील पुस्तके चाळताना किसिंजर नावाच्या अमेरिकेचा परराष्ट्रमंत्री होऊन गेला, जो स्वतःच या विषयाचा अभ्यासक होता, हे कळतं. कारण हा प्रकारही आपल्या राजकीय व्यवस्थेत क्वचितच पाहायला मिळतो. ज्याला ज्या विषयातलं कळतं, त्याला त्या क्षेत्रात निर्णय घेण्याची संधी मिळते, ही पुन्हा दुर्लभ बाब.
तसे आपल्याकडे आयएफएस म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवेत दीर्घकाळ नोकरी केलेल्यांची वर्णी परराष्ट्र खात्याचा मंत्री म्हणून लागल्याची उदाहरणे देता येतील. पण त्यासाठी व्यापक देशाहिताचा विचार, धडाडी अन् त्या क्षेत्रातील विशेष गती आहे, म्हणून वर्णी लागण्यापेक्षा, आपल्या व्यवस्थेत ‘वेगळी’च कर्तब दाखवावी लागते.
रॉकफेलर यांची भाषणं लिहून देणाऱ्या किसिंजरने रिचर्ड निक्सन यांची ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’पदाची ऑफर स्वीकारली अन् व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश मिळवला, तत्पूर्वी त्यांनी हॉवर्ड विद्यापीठात दिलेली व्याख्याने आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर लिहिलेल्या पुस्तकांची दखल व्हाईट हाऊसने घेतली होती. निक्सन प्रशासनात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची सूत्रे सांभाळणारे किसिंजर परराष्ट्र विभागच चालवत होते, पर्यायाने या विभागाचा संपूर्ण कारभार सचिव म्हणून (भारताच्या दृष्टीने परराष्ट्र मंत्री) किसिंजर यांच्याकडे सोपवण्यात आला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
विशिष्ट परिस्थिती, अमुक काळ राजा घडवतो की, राजा विशिष्ट काळाला कलाटणी देतो, त्याच्यातली ऊर्जा, अंगभूत कौशल्य, मुत्सद्दगिरीला वाव देतो, हे सांगणे जसे कठीण, तसेच जागतिक राजकारणावर ठसा उमटवणाऱ्या धुरीणांच्या निर्णयामुळे बदल होत गेले की, तत्कालीन परीस्थितीच्या रेट्यामुळे त्या धुरीणांना तसे निर्णय घ्यावे लागले, हे विशद करता येत नाही. केवळ सैद्धान्तिक मांडणी करणाऱ्या अभ्यासकांना निर्णय घेण्याचं बंधन नसतं. अमुक एक गोष्ट करायला हवी, असे सुचवून, सल्ला देऊन समित्यावर मिरवणे वेगळे आणि कसोटीच्या काळात एखाद्या गोष्टीची ‘ओनरशिप’ घेऊन धडाडीने निर्णय घेणे वेगळे.
समित्यांवर बसून सुचवणाऱ्यांचे एक बरे असते, आम्ही केवळ सुचवले होते, तसेच घडेल असा दावा केला नव्हता, ही पळवाट (आपल्या बुद्धिजीविंची लाडकी) त्यांच्यासाठी नेहमीच उपलब्ध असते. किसिंजर यांच्यासमोर ही पळवाट नव्हती, त्यांनी धोका पत्करून निर्णय घेतले. कारण नेत्यांना, राजकारण्यांना निर्णय घ्यावेच लागतात.
कदाचित राजकीय घडामोडीने आपल्या कुटुंबाची झालेली होरपळ, बापाची हतबलता पाहूनच किसिंजरच्या मनात जगाच्या राजकारणाला ३६० अंशात वळण देण्याची महत्वाकांक्षा प्रबळ झाली असावी. म्हणूनच १९४६ साली लिहिलेल्या एका पत्रात किसिंजर यांनी ‘‘या जगाला बुद्धिजीवी, आदर्शवादी आणि नैतिक मूल्यांचा उदघोष करणाऱ्यांची काहीच गरज नाही. अस्तित्वात राहण्यासाठी, जीवंत राहण्यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षामुळे मला हे पक्के उमगले आहे. इतिहासात डोकावून पाहण्यात काहीच हशील नाही, दुःख, वेदना आणि विवशता याखेरीज काहीच हाती लागणार नाही. विवशता म्हणजेच मृत्यू”, असे नमूद केले आहे. अन्यथा जर्मनीतील ज्यू समुदायावरील अनन्वित अत्याचार, नरसंहार अनुभवलेला एक पोरगा अमेरिकेत येऊन भावनाशून्य, कर्तव्यकठोर राजकारण करू शकला असता का?
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
भविष्यात किसिंजर यांनी हा विचार प्रत्यक्षात काटेकोर पाळला. आंतरराष्ट्रीय राजकारणात, अमेरिकेचा कुटनितीज्ञ म्हणून खेळलेल्या डावपेचांत, खेळलेल्या खेळीत नीतिमत्ता, आदर्शवाद, मानवता या संकल्पनांचा कधीच बाऊ केला नाही. चीन, कम्बोडिया, व्हितनाम आणि इतर देशांसोबतच्या डावपेचामुळे, किसिंजरच्या धोरणामुळे भलेही जगात त्यांचा उल्लेख कुठे युद्ध गुन्हेगार, क्रूरकर्मा म्हणून केला जात असेल, पण जगाच्या सत्ताकारणात भावनेला स्थान नाही, हे आपल्या कृतिमधून यापूर्वी इतकं ठासून कोणी स्पष्ट केले नव्हते.
कम्बोडिया, पूर्व पाकिस्तानात झालेल्या नरसंहाराबद्दल किसिंजर यांना ‘युद्धगुन्हेगार’ मानले जाते. अगदी बांगलादेश निर्मितीच्यावेळी किसिंजर यांच्या वर्तनाची मीमांसा ‘मॉन्स्टर’ अर्थात ‘राक्षस’ अशी केली जाते. पाकिस्तान, चीनला दिलेल्या पाठबळामुळे भारतीय म्हणून मलाही किसिंजर यांची चीड येणे स्वाभाविक आहे. मात्र किसिंजर हे सर्वांत सामर्थ्यशाली देशाच्या प्रमुखाचे सुरक्षा सल्लागार होते. अमेरिका, रिचर्ड निक्सन यांच्या हितांचे संरक्षण करणे, ही त्यांची प्राथमिकता असणार. ते करताना साम, दाम, दंड आणि भेदनीती देशाचे सर्वोच्च हित डोळ्यांसमोर ठेवत त्यांनी वापरली, हे वास्तव आहे.
कुठे साम्यवादी राजवटी खिळखिळ्या करण्यासाठी लष्करशहांना समर्थन दे, तर कुठे रशियाची ताकद कमी करण्यासाठी त्याच्याशी जवळीक साधणाऱ्या देशाशेजारील किरकोळ देशांचे पाठबळ वाढव, अशा कसरती किसिंजर हे निक्सन यांच्या समर्थनाच्या जोरावरच करू शकले, हेही लक्षात घ्यावे लागेल. एक निर्ढावलेला राजकारणी आणि बुद्धिवंत यांची हातमिळवणी मोठ्या आपत्ती निर्माण करू शकते. कदाचित या शक्यतेमुळेच निक्सन यांच्या प्रस्ताव स्वीकारत किसिंजर यांनी केलेला व्हाईट हाऊसमधील प्रवेश तत्कालीनांसाठी भूवया उंचावणारा, प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आणि शंका घेणारा ठरला होता. किसिंजर यांचा व्हाईट हाऊसमधला प्रभाव आणि अमेरिकेतर्फे जगाच्या राजकारणातला चौफेर वावर निक्सन यांच्यानंतरही सुरूच राहिला.
किसिंजर हे सर्वांत सामर्थ्यशाली देशाच्या प्रमुखाचे सुरक्षा सल्लागार होते. अमेरिका, रिचर्ड निक्सन यांच्या हितांचे संरक्षण करणे, ही त्यांची प्राथमिकता असणार. ते करताना साम, दाम, दंड आणि भेदनीती देशाचे सर्वोच्च हित डोळ्यांसमोर ठेवत त्यांनी वापरली, हे वास्तव आहे. कुठे साम्यवादी राजवटी खिळखिळ्या करण्यासाठी लष्करशहांना समर्थन दे, तर कुठे रशियाची ताकद कमी करण्यासाठी त्याच्याशी जवळीक साधणाऱ्या देशाशेजारील किरकोळ देशांचे पाठबळ वाढव, अशा कसरती किसिंजर हे निक्सन यांच्या समर्थनाच्या जोरावरच करू शकले, हेही लक्षात घ्यावे लागेल.
निक्सननंतर राष्ट्राध्यक्षपदी आलेल्या गेराल्ड फोर्ड यांच्या सत्ताकाळातही किसिंजर यांनी कार्यपद्धतीतील पूर्वीसारखेच स्वातंत्र्य घेतले. यामागे किसिंजर आणि फोर्ड यांच्यात कोण जास्त प्रभावी ठरले? व्हिएतनाम प्रकरणातून अमेरिकेने पुरेसा धडा घेतल्यावर किसिंजर यांनी थेट चीनशी संधान साधत जागतिक राजकारणाच्या पटावर रशियाला सवतासुभा निर्माण केला. जगाच्या राजकारणात अमेरिका अने रशिया या दोन ध्रुवीय समीकरणात चीनला ओढून आणले. निक्सन यांच्या चीन दौऱ्याने जगाच्या घडामोडीत चीनला अवकाश मिळाला. तुम्ही चीनला शत्रू मानायला लागलात की, चीन तुमचा शत्रू बनतो, हे किसिंजर यांचं त्या वेळचं लाडकं भाकीत होतं. अर्थात आज ते खरं असल्याचं दिसूनही आलं आहे.
भारतासाठी रशिया सगळ्यात जवळचा मित्र, पाकिस्तान शत्रू क्रमांक एक, चीन शत्रू क्रमांक दोन आणि अमेरिका शत्रू क्रमांक तीन, असं समीकरण असताना किसिंजर यांनी भारताच्या पहिल्या शत्रूला पाठबळ दिले, नंतर दुसऱ्या शत्रूला त्याच्या पहिल्या शत्रूशी जवळीक साधायला भाग पाडलं. भारताविरुद्ध उभ्या राहिलेल्या एका शत्रूला (पाकिस्तान) मदत करण्याची गळ भारताच्याच दुसऱ्या शत्रूला घातली होती. आता अमेरिका पाकिस्तानला दूर ठेवत आणि चीनवर त्याची सूक्ष्म नजर आहे. त्यामुळे भारतीयांना किसिंजर ‘राक्षस’ वाटणं साहजिक आहे, पण एकदा अमेरिकेचं हित जोपासायचं म्हटल्यावर किसिंजर यांना हे सगळं करणं भाग होतं.
आपण डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत ते अनुभवले आहेच. डॉ. सिंग हे सोनिया गांधी यांच्यासारखे लोकप्रिय नेते नव्हते, सिंग मोदींकडून पराभूत झाले, ते त्यांच्या व्यक्तिगत चुकांमुळे नाही, त्यांना जे सहकारी देण्यात आले होते, त्यांच्या चुकांचे खापर सर्वोच्च नेता म्हणून त्यांच्यावर फुटले. किसिंजर यांनी निर्णय घेतले ते बुद्धिजीवींच्या मर्यादा ओलांडून, कारण बुद्धिजीवी आणि विद्यापीठीय अभ्यासकांना दोन्ही बाजूने रान मोकळे हवे असते. अमुक एखादी गोष्ट करायलाच हवी, हे लिहून मोकळे होणारे विचारवंत, एखादा निर्णय घेतल्यावर तो चुकीचा कसा ठरला, याच्यावरही वांझोट्या चर्चा करायला तयारच असतात. त्यांना सगळं कसं सुरक्षित हवं असतं, कसलीही तोषिश न पडता, आपल्यावर कसलंही बालंट न येता भल्या-बुऱ्याची चर्चा हे बुद्धिजीवींचे अविभाज्य अंग. त्यामुळे किसिंजर यांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करत बेधडक निर्णय घेतले, परिणामांची तमा न बाळगता घेतले.
हे सगळं कसं अपरिहार्य होतं हे उमगतं, किसिंजर यांचा ‘डिप्लोमसी’ हा ग्रंथ अभ्यासताना… मृत्सद्दी, राजकारणी, संशोधक आणि जिज्ञासू अशा प्रत्येकाने वाचावा असा हा ग्रंथ. आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रवाहाशी राष्ट्रीय हिताचा ताळमेळ, युद्धसज्जता, सत्तासंतुलन, शत्रूच्या शत्रूशी मैत्री, संरक्षणात्मक करार, राष्ट्रीय हितसंबंध आणि मैत्री, सतत शत्रुत्व आणि सतत मैत्री, भावनाविरहित बेदरकार कार्यशैली, अशा पायाभूत संकल्पना यातून स्पष्ट होतात.
किसिंजर यांच्या निधनानंतर उमटलेल्या प्रतिक्रियांत तीन प्रवाह दिसताहेत. १९७०च्या दशकात अमेरिकेकडून जे घडले ते कसे चुकीचे होते, अशी चर्चा होत आहे. त्यासाठी निक्सन यांना जबाबदार ठरवत किसिंजर यांच्यावरील दोषारोपणाची धार कमी करणे, अभ्यासक- राजकारणी किसिंजरच्या बुद्धिमत्तेला दाद देणे. मानवता, संवेदनशीलता या मुद्द्यांच्या आधारे आज अमेरिकन जनतेत शीतयुद्ध काळातील तत्कालीन राज्यकर्ते व किसिंजर यांच्या निर्णयावर बोलले जात आहे, त्यांच्या नीतीमत्तेबद्दल चर्चा केली जातेय.
एकीकडे आपण जॉन केनेडी यांच्यासारखे वा दुसरीकडे निक्सन यांच्यासारखेही लोकप्रिय राजकीय नेता नाही, हे किसिंजर यांना ठाऊक होते. लोकप्रियतेचे हे दोन विरुद्ध टोक आपण गाठू शकत नाही, त्यातून आपण क्रियाशील बुद्धिजीवी असल्याचे किसिंजर यांनी दाखवून दिले. जगभरातील बुद्धिवंतांची एक पंचायत असते, ते आपली सैद्धान्तिक मांडणी, अभ्यास प्रत्यक्ष उतरवण्यासाठी कुणी लोकप्रिय नेता आपल्याला संधी देईल, याची वाट पाहत असतात. सभ्य भाषेत सांगायचं तर अशा ‘गुणग्राहक नेत्यां’कडून संधी मिळेल, यासाठी सगळं काही करतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
आपले मुद्दे रेटण्यासाठी किसिंजर यांच्यासमोर आपण कोणाला निवडायचं असा पर्याय नव्हता. निक्सन यांनी किसिंजर यांना निवडले. हा दुर्मीळ असेल, पण निव्वळ योगायोग होता. त्यामुळे किसिंजर यांच्या कर्तृत्वाचा विचार करताना निष्कारण ‘जजमेंटल’ होण्यात काहीच अर्थ नाही, कोण किती चुकीचं, हा तर निव्वळ हास्यास्पद प्रकार ठरतो. जगाचे राजकारण रुळावर ठेवण्यासाठी वा संतुलित राखण्यात आपल्याला भूमिका घ्यावीच लागणार, हा अमेरिकन समज सांभाळत किसिंजर यांनी त्यांच्या देशाचे, नेत्याचे आणि स्वतःचे हित जोपासले, यात वावगे ते काय? कुठलाही धोरणी ते करत असतोच.
आपण डॉ. मनमोहनसिंग यांच्याबाबत ते अनुभवले आहेच. डॉ. सिंग हे सोनिया गांधी यांच्यासारखे लोकप्रिय नेते नव्हते, सिंग मोदींकडून पराभूत झाले, ते त्यांच्या व्यक्तिगत चुकांमुळे नाही, त्यांना जे सहकारी देण्यात आले होते, त्यांच्या चुकांचे खापर सर्वोच्च नेता म्हणून त्यांच्यावर फुटले. किसिंजर यांनी निर्णय घेतले ते बुद्धिजीवींच्या मर्यादा ओलांडून, कारण बुद्धिजीवी आणि विद्यापीठीय अभ्यासकांना दोन्ही बाजूने रान मोकळे हवे असते. अमुक एखादी गोष्ट करायलाच हवी, हे लिहून मोकळे होणारे विचारवंत, एखादा निर्णय घेतल्यावर तो चुकीचा कसा ठरला, याच्यावरही वांझोट्या चर्चा करायला तयारच असतात. त्यांना सगळं कसं सुरक्षित हवं असतं, कसलीही तोषिश न पडता, आपल्यावर कसलंही बालंट न येता भल्या-बुऱ्याची चर्चा हे बुद्धिजीवींचे अविभाज्य अंग.
त्यामुळे किसिंजर यांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करत बेधडक निर्णय घेतले, परिणामांची तमा न बाळगता घेतले. इतिहास आपली नोंद कशी घेईल, याची पर्वा न करता जे-जे करणे अमेरिकेच्या हिताचे असेल ते सर्व केले.
अलीकडील काळातील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या सल्लागारांवर नजर टाकल्यास ओबामा यांच्यानंतरच्या लोकांनी व्हाईट हाऊसचा दबदबा किती घालवलाय, हे सहज दिसून येते. किसिंजर यांनी इतिहासाचे अचूक अवलोकन केलं, आपल्या दशकभराच्या कारकिर्दीत जे धाडशी निर्णय घेतले आणि इतिहास आपली गणना कशी करेल, याची तमा न बाळगता घेतले.
त्यामुळे भविष्यात किसिंजर यांच्यासारखे अभ्यासक अधिकाधिक प्रमाणात होवोत आणि निक्सन यांच्यापेक्षाही अधिक नीतिमान नेतेही!
..................................................................................................................................................................
लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत. त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.
vinay.freedom@gmail.com
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment